डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी बारामतीला पोहोचल्यावर मला फोन केला, "तू परवा इकडे येणार आहेस आणि आपण दोघे रविवारी रात्री परत पुण्यात येणार आहोत, त्यानंतर लगेच सोमवारी अंक छापायला सोडणार आहोत. पण आज-उद्या तू पुण्यात आहेस तर इकडे येण्यापूर्वीच अग्रलेख लिहून ठेवतोस का?" मी विचारले, "कशावर लिहू?" ते म्हणाले, "हा अंक 2 ऑक्टोबरचा आहे, तर 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमावर लिही." मी विचारले, "काय फोकस करू ?" ते म्हणाले, "त्यात गांधीगिरी फार सोपी दाखवली आहे, प्रत्यक्षात तशी ती नाही, असे तुला वाटते, हाच फोकस ठेव." मी 'ठीक आहे' म्हणालो आणि फोन ठेवला.
दि. 1 सप्टेंबर 2006 रोजी 'लगे रहो मुन्नाभाई' हा हिंदी चित्रपट भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित झाला. अभिजात जोशी यांची पटकथा, राजकुमार हिराणी यांचे दिग्दर्शन आणि विधू विनोद चोप्रा यांची निर्मिती असा तो सिनेमा. मुन्नाभाई (संजय दत्त), त्याचा मित्र सर्किट (अर्शद वारसी) आणि रेडिओ जॉकी जान्हवी (विद्या बालन) अशा तीनच प्रमुख व्यक्तिरेखा त्यात होत्या. गांधीगिरी ही कल्पना त्या कथानकाच्या मध्यवर्ती होती. आबालवृद्धांना खेळवून ठेवणारा, हसता हसवता अंतर्मुख करायला लावणारा, असा एक धम्माल विनोदी आणि सर्वांगसुंदर चित्रपट.
पहिल्याच आठवड्यात त्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. त्या सिनेमामुळे देशभरात विविध ठिकाणी गांधीगिरीचे प्रयोग होऊ लागले. परिणामी 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचा खप प्रचंड वाढला. 'बंदे मे था दम, वंदे मातरम्' हे त्या सिनेमातील गाणे लहान-थोरांच्या ओठांवर खेळू लागले. गांधीगिरीने आपले प्रश्न सुटू शकतात असे लोक मानूलागले. सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात गांधीगिरीच्या पद्धतीने छोटी छोटी आंदोलने होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. गांधीमार्गाविषयी मागील साठ वर्षांत जे जनप्रबोधन झाले नाही, ते या सिनेमाने केले असे अनेक गांधीवादीही म्हणू लागले. अमेरिकेत प्रदर्शित झालेला पहिला हिंदी चित्रपट असा विक्रम नोंदला गेला. अन्य काही देशांतही हा चित्रपट प्रदर्शित झाला. वीस कोटी रुपयांत तो तयार झाला आणि महिनाभरातच त्याने चारशे कोटींचा गल्ला जमवला.
हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकर साधना साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांची मुख्य ओळख 'अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते' अशी होती, परंतु साधनाचे संपादक होऊन त्यांना आठ वर्षे झाली होती. त्यांनी 2006 या वर्षासाठी चौघांचे संपादक मंडळ नियुक्त केले होते. रझिया पटेल, सुबोध वागळे, हेरंब कुलकर्णी आणि विनोद शिरसाठ. महिन्यातून एकदा मीटिंगला यावे, अधून मधून लेखन करावे आणि शक्य असेल तेव्हा अन्य लोकांकडून चांगले लेखन मिळवावे असा मर्यादित सहभाग संपादक मंडळाकडून अपेक्षित होता. त्या चारमध्ये मी सर्वार्थाने ज्युनिअर होतो, केवळ अडीच वर्षापासून साधनाशी जोडलेला होतो, पण त्या काळात साधनाच्या व डॉ. दाभोलकरांच्या जास्त संपर्कात होतो. कारण 2004 व 2005 या दोन वर्षी मी अनुक्रमे 'लाटा लहरी' व 'थर्ड अँगल' ही युवा सदरे साधनात लिहिली होती आणि त्या दोन्ही वर्षांच्या अखेरीस दहा-दहा अंकांसाठी युवा अतिथी संपादक म्हणून काम केले होते. 2006 या वर्षभरात साधनाचा प्रत्येक महिन्यातील पहिला अंक 'वाचन संस्कृती अभियान अंक' म्हणून काढला जाणार होता आणि त्या अंकांचे संपादकीय लेख लिहिण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली गेली होती. त्या व्यतिरिक्त अन्य लहान-मोठ्या कामांत मी कमी-अधिक मदत करीत होतो.
तर तो सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच्या आठवड्यात साधना मीडिया सेंटरचे व्यवस्थापक सुरेश माटे मला म्हणाले, "तू हा सिनेमा पाहायला हवास आणि त्यावर साधनेत लेख लिहायला हवा, खूपच महत्त्वाचा सिनेमा आहे." त्याच आठवड्यात इतरही काही लोकांनी त्या सिनेमाची जोरदार शिफारस केली होती. त्यामुळे तो सिनेमा मी पाहणारच होतो.
त्या महिन्याच्या अखेरीस (23 व 24 सप्टेंबर रोजी) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी, अंधश्रद्धा निर्मूलनाचा शैक्षणिक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी बारामती येथे दोन दिवसीय परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून चारशे ते पाचशे कार्यकर्ते येणार होते. विजय मोरे हे डॉ. दाभोलकरांचे वर्गमित्र, त्या स्पर्धेचे स्थानिक संयोजक होते. ते माजी आमदार होते आणि शरद पवारांचे स्थानिक विरोधक म्हणून ओळखले जात होते. मात्र त्या परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी डॉ. दाभोलकरांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना बोलावले होते, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्र जाधव हे प्रमुख पाहुणे या नात्याने येणार होते. बाबा आढाव, पुष्पा भावे, यशवंत सुमंत व अन्य डझनभर मान्यवर त्या परिषदेत भाषण करणार होते. त्या परिषदेचे एक छोटे पण महत्त्वाचे काम माझ्याकडे सोपवले गेले होते. ते कोणते? तर 'परिषद दोन दिवस चालेल, रोज तीन-चार सत्रे होतील, प्रत्येक सत्रात दोन-तीन व्यक्ती असतील. वृत्तपत्रांचे स्थानिक प्रतिनिधी येतील, ते प्रामुख्याने उद्घाटन व समारोप सत्राच्या बातम्या करतात. शिवाय, त्या बातम्या स्थानिक आवृत्तीमध्ये येतात. मात्र या परिषदेच्या बातम्या राज्यभरातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना व काही टीव्ही चॅनेल्सला जायला हव्यात. तसे घडायचे असेल संयोजकांकडूनच ती व्यवस्था करावी लागणार होती. म्हणून प्रत्येक सत्र संपल्याबरोबर त्याची बातमी लिहायची आणि एका कार्यकर्त्याने फॅक्सद्वारे विविध ठिकाणच्या प्रसारमाध्यमांना रवाना करायची', असे नियोजन केले होते. आणि त्या बातम्या लिहिण्याचे काम माझ्याकडे सोपवले गेले होते. अर्थातच प्रत्येक सत्रातील प्रत्येक भाषण काळजीपूर्वक ऐकणे, विपर्यास न होऊ देता बातमी लिहिणे, ती कमी शब्दांत व सुस्पष्ट पद्धतीने आणि मोठ्या अक्षरात लिहिणे असे ते काम होते. हे म्हटले तर छोटे, पण वेगवान पद्धतीने करायचे काम होते.
त्या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी डॉ. दाभोलकर दोन दिवस आधीपासून बारामतीत थांबणार होते. मात्र बारामतीला जाण्याच्या आदल्या दिवशी ते पुण्यात होते आणि त्या दिवसभरात त्यांना दोन कामे मार्गी लावायची होती. त्यातील एक काम, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या शैक्षणिक जाहीरनाम्याचा मसुदा अंतिम करण्यासाठी यशवंत सुमंत यांच्या घरी जायचे होते. आणि दुसरे काम, साधना दिवाळी अंकासाठी एका महत्त्वाच्या मुलाखतीचे संयोजन करायचे होते. गिरीश कर्नाड, अरुंधती नाग व श्रीराम लागू या तीन नाट्यकर्मीची मुलाखत पुष्पा भावे घेणार होत्या. त्या मुलाखतीचे रेकॉर्डिंग ताहेरभाई पूनावाला यांच्या घरी होणार होते. आणि त्या दोन्ही प्रसंगी मी डॉ. दाभोलकरांसोबत असावे असे ठरले होते.
ठरल्याप्रमाणे 20 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता मी साधना कार्यालयात गेलो. आणि मग आम्ही दोघे मॉडेल कॉलनीतील ताहेरभाई पूनावाला यांच्या घराकडे रिक्षाने निघालो. ते घर जवळ आले असताना डॉ. दाभोलकरांनी मला सहज विचारले, " 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमा पाहिलास का?" मी म्हणालो, "हो, कालच पाहिला." त्यांनी विचारले, "कसा वाटला?" मी म्हणालो, "सिनेमा चांगलाच आहे, पण गांधीगिरी फार सोपी आहे असे त्यात दाखवले आहे." माझे ते वाक्य संपले आणि रिक्षातून आम्ही उतरलो. घरात गेलो. नियोजित पाहुणे आमच्या आधीच तिथे येऊन बसले होते. त्या सर्वांचे चहापाणी व गप्पा झाल्या होत्या, रेकॉर्डिंगसाठी आवश्यक सेटिंग तयार होते. ते सर्व जण आमचीच वाट पाहत होते. त्यामुळे डॉ. दाभोलकरांनी त्या सर्वांशी दोन-चार मिनिटे अनौपचारिक संवाद केला. आणि रेकॉर्डिंग सुरू झाले. त्या तिघांची मुलाखत ठरली होती, पण प्रत्यक्षात त्या चौघांच्या गप्पा असे स्वरूप त्या संवादाला आले. कारण पुष्पाबाई नाट्यशास्त्र शिकवत होत्या, त्या अन्य तिघांच्या समवयस्क होत्या आणि त्या सर्वांचे परस्परांशी मित्रत्वाचे संबंध होते. प्रामुख्याने मराठी व अधूनमधून इंग्रजी असा तो संवाद झाला, कारण अरुंधती नाग यांना मराठी समजत होते, पण मराठीतून पूर्णतः व्यक्त होता येत नव्हते. एक-दीड तास मुलाखत चालली. त्यानंतर तिथेच जेवणाची व्यवस्था केली होती. ताहेरभाईंची पत्नी व मुलगी (शबनम) यांनी, त्या नाट्यकर्मीची आवडनिवड लक्षात घेऊन छान जेवण तयार ठेवले होते. जेवताना गप्पांमध्ये पहिलाच विषय आला, 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमाचा. 'कोणी पाहिलाय का?' सर्व जण एकमेकांना विचारत होते. त्यांच्यापैकी कोणीच पाहिला नव्हता. तेव्हा डॉ. दाभोलकर म्हणाले, "मी नाही पाहिला, पण याने पाहिलाय काल. तो म्हणतोय, 'सिनेमा चांगला आहे, पण गांधीगिरी फार सोपी आहे असे त्यात दाखवलेय'." त्यावर कोणीही मला काही विचारले नाही, मी स्वतःहून काही सांगितले नाही. त्यामुळे अन्य विषयांकडे गप्पा वळल्या. जेवण संपले. डॉ. दाभोलकर आणि मी साधनात आलो. दोनेक तास इतर कामे करत बसलो.
संध्याकाळी पाच वाजता यशवंत सुमंत यांच्या घरी जाण्यासाठी आम्ही कोथरूडला रिक्षाने निघालो. यशवंत सुमंत हे तेव्हा पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते आणि गांधी अध्यासनाचे प्रमुखही होते. धर्मनिरपेक्षता, जातीसंस्था, संविधान आणि गांधी हे त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचे विषय होते. डॉ. दाभोलकरांचा त्यांच्यावर खूपच विश्वास होता.
वैचारिक बाबतीत कुठे काही कोंडी निर्माण झाली किंवा संदिग्धता जाणवली तर त्याचे निराकरण करण्यासाठी ज्या काही लोकांशी डॉ. दाभोलकर संवाद करीत असत, त्यातील एक हक्काचे व हुकमी ठिकाण म्हणजे यशवंत सुमंत. 'यशवंत म्हणजे नव्या पिढीतील महत्त्वाचा विचारवंत', असा उल्लेख ते नेहमी करीत. त्यामुळेच, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या शैक्षणिक जाहीरनाम्याचा प्राथमिक मसुदा डॉ. दाभोलकरांनी काही अभ्यासक व कार्यकर्त्यांच्या मदतीने तयार केला होता, परंतु तो मसुदा अंतिम करण्याचे काम यशवंत सुमंत यांच्याकडे सोपवले होते. त्या मसुद्यात शेवटच्या काही किरकोळ दुरुस्त्यांसाठी ती भेट ठरली होती.
यशवंत सुमंत यांच्या भुसारी कॉलनीतील घरी आम्ही गेलो. त्या दोघांनी तो मसुदा समोर ठेवून, त्यातील एकेक मुद्दा वाचायला सुरुवात केली. किरकोळ दुरुस्त्या करत, किरकोळ भर टाकत, त्यांनी तो मसुदा अंतिम केला. तोपर्यंत मी त्यांच्या शेजारी शांत बसून होतो. त्यांच्या बाजूने मसुदा अंतिम झाल्यावर डॉक्टर मला म्हणाले, "वाचून घे पटकन आणि तुला काही सुचवायचं असेल तर सांग लगेच." जेमतेम दोन पानांचा, दहा-बारा कलमे असलेला तो मसुदा मी पटकन वाचला आणि म्हणालो, "चांगला आहे, पण जातीनिहाय आरक्षणाच्या धोरणात क्रिमीलेयरची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि क्रिमीलेयरच्या तरतुदीची व्याप्ती व खोली अधिक वाढवली पाहिजे, हा मुद्दा यात असायला हवा." त्या दोघांनी परस्परांकडे पाहिले. डॉ. दाभोलकरांना माझी आरक्षणाच्या संदर्भातील भूमिका चांगलीच माहीत होती. कारण त्या संदर्भात आमची काही वेळा चर्चा झाली होती आणि 2004 च्या सप्टेंबर महिन्यात मी साधना साप्ताहिकात 'लाटा लहरी' या युवा सदरात आरक्षणावर लेख लिहिला होता. त्यात क्रिमीलेअरचा मुद्दा ठासून मांडला होता, प्रत्येक समाजघटकाचे पुरेसे प्रतिनिधित्व झाल्यावर आरक्षण कमी कमी करत जाण्याच्या दिशेने प्रवास व्हायला हवा, अशी भूमिकाही त्यात ठामपणे मांडली होती. एवढेच नाही तर 'अन्यथा हा खेळ रडीचा डाव ठरेल!' असे त्या लेखाचे शीर्षक दिले होते. त्यामुळे, माझी ती सूचना ऐकून 'मला नेमके काय म्हणायचे आहे' हे डॉ. दाभोलकरांना पूर्ण कळले होते. सुमंत सरांना पूर्ण कळले नव्हते, पण त्यांनाही माझा थोडा अंदाज होता. त्यामुळे दोघांनीही परस्परांकडे पाहिले. 'ती सूचना जाहीरनाम्यात ठळकपणे मांडणे गैरसोयीचे ठरेल' असा त्या दोघांच्या मनातील अर्थ होता. कारण तशी भूमिका मांडली तर पुरोगामी वर्तुळातील लोक 'तुम्ही आरक्षणाचे छुपे विरोधक आहात' असे म्हणणार होते आणि बहुजन समाजातील लोक 'हा तर ब्राह्मणी कावा आहे' असा आरोप करणार हे उघड होते. पण केवळ त्या दोन कारणांमुळे ते बॅकफूटवर होते असे नाही, तर आरक्षणाचा लाभपिछाडीवरील सर्व सामाजिक घटकांना अद्याप पुरेसा मिळालेला नाही, असे त्या दोघांचेही आकलन होते. त्यामुळे, क्रिमिलेयरबाबत आग्रह धरणे आणि त्यासाठीच्या तरतुदीची व्याप्ती व खोली वाढवण्याचा जाहीर उच्चार करणे घाईचे ठरेल, असे त्या दोघांचेही प्रामाणिक मत होते. आणि त्यांचे ते आकलन व मत मला माहीत होते. त्यामुळे, माझी ती सूचना त्यांनी डावलली नाही, पण जाहीरनाम्यातील एका कलमात अगदी सौम्य शब्दांत समाविष्ट केली. कारण ते दोघेही जबाबदार पदावर होते. याउलट माझी स्थिती होती, लेखन संपादनाच्या क्षेत्रात मी नवखा होतो आणि युवा अभिव्यक्ती करण्यासाठी मुक्त होतो.
अखेर तो मसुदा अंतिम झाला. तेव्हा सुमंत सर म्हणाले, 'आज आमच्या घरी काही नातलग आले आहेत. इथे आपल्या निवांत गप्पा होणार नाहीत. आपण जवळच एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ या.' मग आम्ही तिघे बाहेर पडलो. जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे बसल्याबरोबर डॉ. दाभोलकरांनी सुमंत सरांना विचारले, " 'लगे रहो मुन्नाभाई' पाहिलास का?" ते म्हणाले, "हो, परवाच आम्ही सहकुटुंब गेलो होतो." "कसा वाटला सिनेमा?" दाभोलकरांचा प्रश्न. त्यांचे उत्तर, "अप्रतिम आहे, खूपच महत्त्वाचा सिनेमा." दाभोलकर म्हणाले, "पण गांधीगिरी फार सोपी आहे असे त्यात दाखवलेय का?" सुमंत सर म्हणाले, "हो, पण गांधीगिरी सोपीच आहे. सर्वसामान्य माणसांना झेपेल अशीच आहे अन्यथा एवढा मोठा स्वातंत्र्यलढा गांधीजी उभा करू शकले नसते." दाभोलकरांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. 'गांधीगिरी सोपी आहे, असे त्यात दाखवले आहे' हे विनोदचे निरीक्षण आहे, असे त्यांनी सुमंत सरांना सांगितले नाही. अर्थातच मी त्यावर काहीच बोललो नाही. अन्य विषयांकडे गप्पा वळल्या. जेवण झाले आणि आम्ही बाहेर पडलो, आपापल्या घरी आलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. दाभोलकर बारामतीला गेले. त्यानंतर दोन दिवसांनी मी पुण्याहून बारामतीला पोहोचणार होतो. यशवंत सुमंत व पुष्पा भावे या दोघांना एका गाडीतून आणण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती. परिषदेचे उद्घाटन सत्र सुरू होण्यापूर्वी आम्ही तिघांनी तिथे पोहोचणे अपेक्षित होते. त्यामुळे, डॉ. दाभोलकरांनी बारामतीला पोहोचल्यावर मला फोन केला, "तू परवा इकडे येणार आहेस आणि आपण दोघे रविवारी रात्री परत पुण्यात येणार आहोत, त्यानंतर लगेच सोमवारी अंक छापायला सोडणार आहोत. पण आज-उद्या तू पुण्यात आहेस तर इकडे येण्यापूर्वीच अग्रलेख लिहून ठेवतोस का?" मी विचारले, "कशावर लिहू?" ते म्हणाले, "हा अंक 2 ऑक्टोबरचा आहे, तर 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमावर लिही." मी विचारले, "काय फोकस करू?" ते म्हणाले, "त्यात गांधीगिरी फार सोपी दाखवली आहे, प्रत्यक्षात तशी ती नाही, असे तुला वाटते, हाच फोकस ठेव." मी 'ठीक आहे' म्हणालो आणि फोन ठेवला.
त्याच दिवशी रात्री मी 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमा पुन्हा पाहिला. तो पाहताना कागद-पेन सोबत ठेवला होता. त्यामुळे काही प्रसंगांच्या व संवादांच्या नोंदी करता आल्या. दुसऱ्या दिवशी दुपारी मी अग्रलेख लिहिला, साधनात घेऊन गेलो. तिथे तो टाईप झाला, मी तो तपासून दिला आणि घरी आलो.
दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी पुष्पा भावे व यशवंत सुमंत यांना त्याच्या घरातून घेतले आणि सकाळी 10 वाजता आम्ही बारामतीला पोहचलो. शरद पवार ऐनवेळी आले नाहीत. इतर सर्व वक्ते आले होते. चांगली भाषणे झाली. चार-पाचशे कार्यकर्ते होते. दिवसभरातील अन्य सत्रेही व्यवस्थित पार पडली. सभा मंडपात पत्रकार कक्ष होता. त्यांच्या बाजूलाच, पण वेगळी बसण्याची व्यवस्था माझ्यासाठी केली होती. एक कार्यकर्ता माझ्या शेजारी बसवला होता. प्रत्येक सत्राची बातमी लिहून झाल्यावर तो कार्यकर्ता ती बातमी तत्परतेने घेऊन जात असे आणि फॅक्स करणाऱ्याकडे देऊन येत असे. साहजिकच सर्व भाषणे मी काळजीपूर्वक ऐकत होतो. श्रोत्यांचा प्रतिसाद व माहोल टिपत होतो आणि बातम्यांमध्ये तो आवश्यकतेप्रमाणे टाकत होतो.
परिषदेचा पहिला दिवस संपला. रात्री जेवणे झाली. काही लोक इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले होते, काही लोक परिसरात फेरफटका मारत होते. दूर अंतरावरून आलेले काही लोक झोपण्यासाठी निवासस्थानी गेले होते. साधारणतः रात्री नऊ वाजता मीही निवास स्थानाकडे जायला निघालो. मी जातोय, असे सांगण्यासाठी मी डॉक्टरांकडे गेलो. ते रिकाम्या सभा मंडपात एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसले होते, त्यांच्या सभोवताली पंधरा-वीस कार्यकर्ते होते. त्यांची संघटनात्मक बैठक चालू होती. डॉ. दाभोलकर हळू आवाजात, पण सूत्रबद्ध पद्धतीने बोलत होते. 'संघटन कसे करावे, कार्यक्रमाचे व वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, कमीत कमी साधनांत अधिक परिणाम कसा साधता येतो, प्रसार माध्यमांच्या संपर्कात कसे राहावे, पोलीस व प्रशासन यांच्याशी कसे वागावे, नव्या कार्यकर्त्यांना कसे जोडावे', हे आणि असे बरेच काही. छोट्या-मोठ्या टिप्स देत होते, संघटनेची ताकद कशात आहे, संघटनेच्या मर्यादा काय आहेत, याबद्दलही अगदी जिव्हाळ्याने आणि पारदर्शक पद्धतीने सांगत होते. कार्यकर्ते त्यांच्या सभोवती कोंडाळे करून मांडी घालून बसले होते, कान गोळा करून ऐकत होते. सर्वांच्या डोळ्यात कुतूहल होते, कौतुक होते, चकाकी होती. समाधान आणि आनंद या दोन्हींच्या मधली ती अवस्था होती. डॉ. दाभोलकरही नेहमीपेक्षा अधिक फ्रेश आणि मुक्त वाटत होते. तेव्हा माझ्या नजरेसमोर एक दृश्य तरळून गेले, 'एखाद्या जंगलात एखाद्या विस्तीर्ण झाडाखाली एखादा वाघ किंवा सिंह स्थानापन्न झालाय, त्याचे बछडे किंवा अन्य प्राणी सभोवताली बसलेत आणि त्यांच्यात छान हितगुज चाललेय.' डॉ. दाभोलकरांच्या संदर्भात इतके विलोभनीय दृश्य मी तोपर्यंत कधीच पाहिले नव्हते. त्यांचे ते हितगुज इतके तल्लीन होऊन चालले होते की, डॉक्टरांचा निरोप न घेता मी निवास स्थानाकडे निघून गेलो.
परिषदेचा दुसरा दिवसही भरगच्च होता. सर्व सत्रे कमी-अधिक प्रभावी, पण वेळेनुसार पार पडली. त्या रात्री डॉ. दाभोलकर आणि मी एकाच गाडीने पुण्यात पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच डॉक्टर साधना कार्यालयात पोहोचले. गेल्याबरोबर त्यांनी मी लिहून तयार ठेवलेला अग्रलेख वाचला. मी गेलो तर ते भलतेच खुशीत दिसले. म्हणाले, "तुझीच वाट बघत होतो, अप्रतिम लिहिलास. या सिनेमाकडे या पद्धतीने कोणीच पाहिलेले नाही, तू पकडलेस ते कोणीच लिहिलेले नाही." त्या दिवशी तो अंक छापायला गेला. डॉक्टर साताऱ्याला गेले. आणि मी तीन-चार दिवस पुण्याबाहेर आमच्या गावी गेलो.
मी पुन्हा पुण्यात आलो, तर मी राहत होतो त्या पत्त्यावर सुरेश माटे यांचे आंतरदेशीय पत्र आले होते. साधना कार्यालयात दर सोमवारी व मंगळवारी मी जात होतोच आणि त्या व्यतिरिक्तही आठवड्यातून एखादी चक्कर होत असे. तरीही माटे यांनी पत्र का पाठवले, असा संभ्रमित करणारा प्रश्न मनात आला. आंतरदेशीय पत्र फोडले. मोठ्या व सुंदर अक्षरात चार-पाचच ओळी होत्या. त्यात लिहिले होते, "तू लिहिलेला 'लगे रहो मुन्नाभाई 'वरील अग्रलेख वाचला. आम्हाला पुस्तके नीट वाचता येत नाहीत हे माहीत होते, पण आम्हाला सिनेमेही नीट पाहता येत नाहीत, हे या अग्रलेखामुळे कळले. म्हणून आभार मानण्यासाठी हे पत्र !"
त्यानंतरच्या एक-दोन आठवड्यांत त्या अग्रलेखावर कौतुकाच्या काही प्रतिक्रिया येणार हे साहजिक होते. 'आमच्या कसे लक्षात आले नाही किंवा आम्हाला कोणालाच कसे हे कळले नाही' असा त्या प्रतिक्रियांचा सूर होता. 'आम्ही खूपच एक्साईट झालो होतो, हवेत उडत होतो, तुझ्या अग्रलेखांमुळे जमिनीवर आलो' असा त्यातला आशय होता. त्याच आठवड्यात डॉक्टरांनी मला एकदा फोन केला आणि गमतीने म्हणाले, "मी तुझी एक छोटी चोरी करू का?" मी विचारले, "कोणती?" ते म्हणाले, "लोकमतने त्यांच्या एका अंकासाठी मला अतिथी संपादकीय लिहायला सांगितले आहे. छोटेच लिहायचे आहे, चार-पाचशे शब्दांचे. त्यात गांधींगिरीने भारावलेल्या लोकांचा मी उल्लेख करणार आहे. तो सिनेमा मी पाहिलेला नाही, पण तुझी निरीक्षणे मी त्यात मांडणार आहे." मी हसत म्हणालो, "हो, जरूर!" त्या वर्षी 'लोकमत'मध्ये दर आठवड्याला एका मान्यवराला अतिथी संपादकीय लिहिण्यासाठी आमंत्रित केले जायचे. त्या आठवड्यात डॉ. दाभोलकरांना सांगितले गेले होते. त्याप्रमाणे त्यांनी तो लेख लिहिला, प्रसिद्ध झाला. त्यात त्या सिनेमावर एक परिच्छेद होता.
त्यानंतर महिनाभराने मला अवधूत परळकरांचा मुंबईवरून फोन आला. तेव्हा ते साधनाचे स्टार लेखक होते ('जन अरण्य' आणि 'माध्यम कल्लोळ' ही त्यांची सदरे प्रचंड वाचली जात होती). ते म्हणाले, "काल मुंबईला एका कार्यक्रमात डॉ. दाभोलकरांचे भाषण होते. सूत्रसंचालकाने त्यांची ओळख करून देताना, 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमावरील साधनाच्या अग्रलेखाचा उल्लेख केला. इतका वेगळा लेख लिहिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पण भाषणाला उभे राहिल्यावर डॉक्टर म्हणाले, 'तो अग्रलेख मी लिहिला असता तर मला निश्चितच आनंद झाला असता, पण माझ्या तरुण सहकाऱ्याने तो लेख लिहिला आहे, याचा मला विशेष आनंद होतो आहे'." अवधूत परळकर यांनी हा प्रसंग सांगितला तेव्हा मी म्हणालो, "त्यात काय विशेष ? डॉ. दाभोलकर जातील तिथे माझ्याबद्दल सांगतच असतात." परळकर म्हणाले, "अनेक मोठे संपादक तसं करत नाहीत. अन्य कोणी संपादक असता तर सूत्रसंचालकाच्या त्या उल्लेखानंतर गप्प बसला असता, त्याने तो उल्लेख आपल्या भाषणात केलाच नसता."
तर अशी ही 2 ऑक्टोबर 2006 च्या साधना अंकातील अग्रलेखाची गोष्ट. बरोबर वीस वर्षे झाली त्याला. गमतीदार योग असा की, 2004 च्या 2 ऑक्टोबरला 'लाटा लहरी' सदरात 'गैरसमजांच्या भोवऱ्यात अडकलेला महात्मा' हा लेख मी लिहिला होता. त्याला 'आउटलूक'च्या 'What if?' विशेष अंकाचा संदर्भ होता. त्याच आठवड्यात डॉक्टरांनी माझी ओळख साधनाचे कार्यकारी विश्वस्त सदानंद वर्दे यांना करून दिली, तेव्हा वर्दे सरांनी अक्षरशः जागेवर उभे राहून, 'त्या लेखासाठी एका स्वातंत्र्य सैनिकाचा सलाम' असे म्हटले होते. तेव्हा मी कमालीचा संकोचून गेलो होतो. 2005 च्या 2 ऑक्टोबरला मी 'थर्ड अँगल' सदरात 'गांधींविषयी इतके गैरसमज का आहेत?' हा लेख लिहिला होता, तो लुई फिशर लिखित 'A Week with Gandhi' या डायरीची ओळख करून देणारा होता. तो वाचून साधनाचे विश्वस्त अप्पासाहेब सा.रे. पाटील म्हणाले होते, "हा लेख वाचल्यावर, मला इंग्रजी येत नाही याचे अधिक दुःख झाले." आणि 2006 च्या 2 ऑक्टोबरला मी 'कृपया, गैरसमज करून घेऊ नका!' हा अग्रलेख लिहिला, तो 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमावर होता. ते तीन लेख म्हणजे एक प्रकारची हॅटट्रिक झाली होती.
'लगे रहो मुन्नाभाई' वरील त्या अग्रलेखासंदर्भात मागील वीस वर्षांत मी वेगवेगळ्या लोकांशी अनौपचारिक पद्धतीने अनेक वेळा बोललो आहे. त्यामुळे, त्या संदर्भातील सर्व तपशील माझ्या स्मरणात पक्के आहेत. पण त्या प्रत्येक वेळी मी असेच म्हणत होतो की, 'तो सिनेमा अखेरपर्यंत न पाहणाऱ्या डॉ. दाभोलकरांनी ज्या परिस्थितीत व ज्या पद्धतीने मला अग्रलेख लिहायला सांगितला होता, त्यातून त्यांचा माझ्या क्षमतांवरील विश्वास अधोरेखित होतो.' पण हा लेख लिहिताना मला असा साक्षात्कार झालाय की, 'डॉ दाभोलकरांचे गांर्धीविषयीचे आकलन अधिक चांगले होते. गांधीगिरी सोपी नाही हे त्यांना पक्के ठाऊक होते आणि नेमके तेच निरीक्षण मी टिपले होते, म्हणून त्यांनी मला तो फोकस ठेवून अग्रलेख लिहायला सांगितले होते.' डॉ. दाभोलकर गेल्यावर त्यांचा उल्लेख मी 'संपादकांचा संपादक' असा केला होता, त्याचे हे एक कारण होते.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या