'अ वुईक वुइथ गांधी' हा पौर्वात्य-पाश्चात्त्य संस्कृतीचा समंजस संवाद आहे. दोन्ही विचारपरंपरेतल्या शुभमय तत्त्वांचं सुभग दर्शन त्यात घडतं. जगातल्या सर्वशक्तिमान सत्ताधीशांची मग्रुरी पाहून झाली आणि फिशर भारतात आले. गांधीजी त्यांना पहिल्या पावसासारखे वाटले. 'जलते हुए जंगल पर जैसे बरखा बरसे रुक रुक, थम थम.' राजकारण हे सत्तेसाठीच करायचं असतं असं युरोप-रशियातले हुकूमशहा म्हणत होते. तर राजकारण माणसांसाठी असतं हे गांधीजींचं मूळ तत्त्व होतं. म्हणून 'रशियन जनतेनं स्टॅलिनची आज्ञा पाळली तर भारतीयांनी गांधींवर प्रेम केलं', असं फिशर म्हणतात.
विख्यात अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांच्या पुस्तकाचा परामर्ष घ्यायचाय.
'अ वुईक वुइथ गांधी' या पुस्तकावर 'चले जाव' आंदोलनाची भव्य सावली पडलीए. मार्च ऑगस्ट 1942 हे पाच-सहा महिने भारतात बरीच राजकीय धकाधक सुरू होती. मार्चच्या 23 तारखेला क्रिप्स मिशन दिल्लीत दाखल झालं. 'भारताच्या स्वातंत्र्याची काहीतरी तड लावा' असा अमेरिकेनं ब्रिटनकडे लकडा लावला होता. काहीतरी करतो आहोत हे दाखवणं चर्चिलला भाग होतं, कारण इंग्लंडला युद्धकाळात अमेरिकेकडून घसघशीत मदत हवी होती.
चर्चिलनं सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांचं एक शिष्टमंडळ दिल्लीला पाठवलं. गांधीजी, पं. नेहरू, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी; तसंच संस्थानिकांचे प्रतिनिधी, बॅ. जिन्ना वगैरे ज्येष्ठ-श्रेष्ठ भारतीय नेत्यांशी क्रिप्स यांची प्रदीर्घ चर्चा झाली; परंतु मिशन अपयशी ठरलं. गांधींजींनी क्रिप्स मिशनवर खरपूस टीका केली. मिशनच्या शिफारशींत भारताच्या फाळणीची बीजं आहेत, असं ते म्हणाले. बॅ. जिन्नांनीदेखील क्रिप्स योजना फेटाळून लावली.
खरं तर महायुद्धाचा आसुरी राडा सुरू असताना चर्चिलला भारताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा अजिबात नको होता. अमेरिकेची समजूत पटावी म्हणून चर्चिलनं तात्पुरती मलमपट्टी केली आणि क्रिप्सना भारतात मिशनवर पाठवलं. लंडनमध्ये बसून चर्चिलनं चाव्या फिरवल्या आणि वॉइसरॉयच्या मदतीनं क्रिप्स योजनेला डांबर फासलं. क्रिप्सचं हसू झालं नि चर्चिल मनातल्या मनात खूश झाला. दुसरीकडे ब्रिटननं आपल्याला गंडवलं असा गांधी-नेहरू-आझाद वगैरे नेत्यांचा समज झाला नि तो निराधार नव्हता.
अशी सगळी गजबज 1942 च्या मार्च महिन्यात सुरू असताना फिशरना गांधीजींच्या मुलाखतीसाठी घसघशीत आठ दिवस मिळतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. फिशर यांच्या नावावर जवाहरलालजी शिक्कामोर्तब करतात नि गांधीजींकडे त्यांची जोरदार शिफारस करतात यामागची कारणं आपण समजून घेतली पाहिजेत.
एक, दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटन कात्रीत सापडला होता. स्वातंत्र्याचं प्रकरण जगासमोर मांडण्याची हीच योग्य वेळ आहे, हे गांधीजी-पं. नेहरू प्रभृतींच्या लक्षात आलं होतं. दोन, युरोपीय वार्ताहरापेक्षा अमेरिकन पत्रकारानं गांधीजींची भूमिका समजून घेतली नि ती जगासमोर मांडली तर ते जास्त परिणामकारक ठरेल. अमेरिकेला भारताबद्दल सहानुभूती होती.
तीन, फिशर मानवतावादी होते. स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. फिशर फिलाडेल्फियाच्या झोपडपट्टीत लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील एका कारखान्यात मजुरी करायचे. पुढे ते ढकलगाडी ओढत रस्तोरस्ती फळं नि मासे विकू लागले. "वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत विजेचे दिवे, नळाचं पाणी वगैरे गोष्टी मी पाहिल्या नव्हत्या. स्वयंपाकघरातली कोळसा-चूल हीच काय ती घराला मिळणारी जेमतेम ऊब", असं फिशर 'मेन अॅण्ड पॉलिटिक्स' या पुस्तकात म्हणतात. असा माणूस गांधीजींचे विचार नीट समजून घेईल.
3 जून 1942 रोजी फिशर वर्ध्याला आले.
एका मोठ्या ढगातून अनेक ढगांच्या लडी सुटत जाव्यात त्याप्रमाणे गांधीजी फिशर मुलाखत उलगडत जाते. पहिले दोन-तीन दिवस फिशर सावध असतात. गांधीजींचा अंदाज घेत घेत पुढं जाऊ असं ते मनाशी पक्कं करत असताना गांधीजी त्यांना हाताशी धरून खोल पाण्यात उतरतात.
फिशर मुलाखतीसाठी सेवाग्रामला आले तेव्हा गांधीजी मनातल्या मनात 'चले जाव'चा आराखडा रेखाटत होते. आंदोलनाची रूपरेषा ते फिशरसमोर मांडतात नि त्यांचं मत आजमावतात. 'आमचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा आणि जगालाही ओरडून सांगा', असं फिशरना सांगतात. आस्ते आस्ते मुलाखतीची कोमट औपचारिकता गळून पडते आणि सुरू होतो दोन मित्रांतला दिलखुलास स्नेहसंवाद. फिशर हे गांधीजींचे sounding board झाले.
एका चतुर कूटनीतिज्ञाप्रमाणे गांधीजी अनेक शक्यता पडताळून पाहताहेत हे लक्षात येतं. त्यांना लवकरात लवकर स्वातंत्र्य हवं आहे. युद्ध संपण्याची वाट पाहायला ते तयार नाहीत. 'मी स्वातंत्र्यासाठी अधीर झालोय', असं ते म्हणतात. परंतु, युद्धप्रयत्नात खोडा घातला असा आरोप भारतावर होऊ नये याबाबतीतही ते सावध आहेत. म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाला मदत करण्याची तयारी दाखवतात. लष्करी तळ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघानं भारताच्या भूमीचा उपयोग करण्यास त्यांची हरकत नाहीए. तसा निरोप ते फिशर यांच्यामार्फत अमेरिकेला पोहोचवतात.
ब्रिटननं उद्याच्या उद्या भारत सोडून जावं असा गांधीजींचा हट्ट नाही. ब्रिटिशांनी शांतपणे नि सुनियोजित पद्धतीनं भारत देश सोडावा; मग भारतात एक तात्पुरतं सरकार स्थापन होईल. संयुक्त राष्ट्रसंघाशी रीतसर करार करणं हे त्या तात्पुरत्या सरकारचं पहिलं काम असेल. त्या करारान्वये आक्रमक शक्तींना (हिटलर, मुसोलिनी, जपान वगैरे) रोखण्यासाठी संरक्षणविषयक योग्य ती पाऊलं आम्ही उचलू. भारताचा फॅसिस्ट शक्तींशी (हिटलर, मुसोलिनी, जपान) काडीमात्र संबंध नाहीए; संयुक्त राष्ट्रसंघाला मदत करण्यास भारत नैतिकदृष्ट्या बांधील आहे, असं फिशर यांच्या लेखी प्रश्नांना दिलेल्या लेखी उत्तरात गांधीजी म्हणतात. संयुक्त राष्ट्रसंघ हा अमेरिकेचा soft spot आहे याची गांधीजींना जाणीव आहे.
थोडक्यात, गांधीजींची नजर अमेरिकेवर आहे. दुसरं महायुद्ध सुरू झाल्या झाल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू युरोपकडून अमेरिकेकडे सरकला. अमेरिकेचा वसाहतवाद-विरोध भारताच्या फायद्याचा होता. शिवाय, अमेरिकेला भारताविषयी सहानुभूती होती. असं असलं तरीही एकीकडे संयुक्त राष्ट्रसंघाला युद्धप्रयत्नात मदत करण्याची तयारी दाखवताना गांधीजी 'चले जाव'चा पर्यायदेखील हाताशी ठेवतात आणि 'अमेरिकेनं माझी समजूत काढली तर मी समझोत्याला तयार आहे', असंही म्हणतात.
अनेकदा गांधीजींच्या विरोधकांना त्यांच्या विधानांत विसंगती आढळते, असं फिशर म्हणतात आणि गांधीजींच्या वैचारिक प्रक्रियेचं सुरेख विश्लेषण करतात : Gandhi really opens his mind and allows the interviewer to see how the machine inside works.
मूळ मुद्दा तपशिलाचा होता : ब्रिटिश राज्यकर्ते देश सोडून कधी जाणार ? हिंदू-मुस्लीम प्रश्नाची उकल कशी होणार ? संस्थानिकांचं काय होणार? भारतानं महायुद्धात भाग घ्यायचा की नाही? ब्रिटिश गेल्यावर देशात अ-राजक माजलं तर काय ? भारताला स्वातंत्र्य कधी मिळणार? युद्ध संपण्याअगोदर की नंतर ? गांधीजी -फिशर यांची चर्चा मुख्यत्वे या प्रश्नांभोवती फिरतेय.
(परंतु फिशर तात्कालिक प्रश्नांपलीकडे जातात आणि गांधीजींच्या मौलिक विचारांची समीक्षा करू पाहतात. त्यामुळे 'अ वुईक वुइथ गांधी'ला आगळंवेगळं महत्त्व आहे. खरं तर पुस्तक बारीकसंच आहे, एकूण 98 पानांचं, परंतु मजकुराला महाकाव्याची भव्यता आहे.)
फिशर यांनी गांधीजींना हिंदू धर्म, इतिहास, हिंदू मुसलमान प्रश्न; निघृण म्हणावी अशी भारतातली सावकारी आणि अस्पृश्यतेची पद्धत; काँग्रेसला मिळत असलेला धनाढ्य उद्योगपतींचा आर्थिक पाठिंबा, स्वतंत्र भारताचा आर्थिक आणि औद्योगिक विकास, भारताची वाढती लोकसंख्या वगैरे प्रश्नांवर बोलतं केलंय. गांधीजींनीदेखील मनमोकळी नि टोकदार उत्तरं दिली आहेत. 'मरणानंतर आत्म्याचं काय होतं' असंही फिशर यांनी गांधीजींना एकदा विचारलं.
गांधीजी एकेकदा prophetic बोलून जातात : हिटलर, मुसोलिनी वगैरे हुकूमशहांशी लढणारे पाश्चात्त्य देश अखेरीस फॅसिस्ट पद्धती स्वीकारतील, असं ते एके ठिकाणी म्हणतात. आज जगातले प्रगत, लोकशाहीप्रधान देश आक्रमक नि खुनशी नेत्यांच्या अस्वलविळख्यात अडकलेत.
सगळं काही गिळून टाकण्याच्या 'स्टेट'च्या (राज्यसंस्था) आसुरी वृत्तीविषयी गांधीजींचं भाष्य चिंतनीय आहे. अर्थशास्त्राचं भांडवलदारी प्रारूप धोक्याचं आहे, कारण त्यामुळे 'स्टेट'चा अर्थव्यवस्थेत सतत हस्तक्षेप होत असतो, असं त्यांनी म्हटलंय.
पाश्चात्त्य संस्कृतीच्या विलासी वृत्तीविषयी गांधीजी नापसंती व्यक्त करतात. "अमेरिका आणि ब्रिटन संस्कृतीतला झगमगाट आणि शस्त्रसज्जता वगैरे गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत नि तो संस्कार घेऊन तुम्ही सेवाग्रामात आला आहात; परंतु रुळलेल्या नि कप्पेबंद विचारांहून स्वतःला वर उचलणं तुम्हाला शक्य नसेल तर तुमचे इथले दिवस वाया गेले असं म्हणावं लागेल", असा स्पष्ट इशारा ते फिशर यांना देतात. लोकशाहीचं पाश्चात्त्य मॉडेल मला मान्य नाही, असंही ठणकावून सांगतात.
"आत्मनिर्भरता आणि सहकार्य यांवर आधारलेलं एक स्वयंपूर्ण ग्रामजीवन भारतात कैक शतकं सुरू आहे. या व्यवस्थेत काही दोष आहेतच. म्हणून तर हा देश परकीय सत्तांपुढे नमला. तरीही, या ग्रामजीवनाची मुळं अद्याप रसरशीत आहेत", असं गांधीजींनी म्हटलंय. ते अर्थातच पं. नेहरूंना मान्य नव्हतं.
स्वातंत्र्यानंतर भारतानं संघराज्यात्मक मॉडेल स्वीकारलं पाहिजे, असं गांधीजींनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटलंय. परंतु, भारताची भावी समाजरचना काय असेल हे सांगणं-समजणं माझ्या आवाक्यापलीकडचं आहे, अशी लगेचच पुस्तीही जोडतात.
(पं. नेहरूंपासून सगळ्याच राज्यकर्त्यांनी राष्ट्राच्या भल्याची नि सुरक्षेची सबब पुढे करून मजबूत केंद्राचा आग्रह धरला आणि देशाचं सगळं राजकारण दिल्ली केंद्रित झालं. दक्षिणेच्या राज्यांचा कणा मजबूत, म्हणून त्यांच्या वाटेला दिल्लीवाले फार जात नाहीत; मात्र, हिमालयाच्या मदतीला धावून गेलेल्या सह्याद्रीची गेल्या दोन दशकांत पुरती फजिती झालीए. प्रादेशिक पक्षांचा पद्धतशीरपणे धुव्वा उडवण्याची कामगिरी केंद्रातली सरकारं मग ती कोणत्याही पक्षाची असोत - चोख करत असतात.)
फिशर यांनी पुस्तकात सेवाग्राम आणि तिथल्या लहान-थोर कार्यकर्त्यांची अनेक सुरेख चित्रं रेखाटलीएत. निसर्गाशी मैत्र साधून जगणारी माणसं, त्यांचं साधंसरळ जगणं; समाजजीवनाची ठाय लय या सगळ्यांचा फिशर यांच्यावर परिणाम झाला. गांधीजींचा विचारव्यूह समजून घेत असताना आपण आश्रमातल्या भावजीवनाशी कधी समरस झालो ते त्यांचं त्यांनादेखील कळलं नाही. अनेक छोट्या छोट्या प्रसंगांतून नि मोजक्या शब्दांत ते सेवाग्रामाचं कणखर नि शालीन व्यक्तिमत्त्व उभं करतात.
फिशर यांची निरीक्षणशक्ती विस्मयकारक आहे. पाणी भरणाऱ्या स्त्रीच्या हालचाली, तिचे कपडे नि तिच्या चालण्याची लय; आश्रमवासीयांचे कपडे; आश्रमातली लहान मुलं; गांधीजींच्या झोपडीतली साधी सजावट, गांधीजींचा चेहरा नि त्यांच्या हातांची बोटं; गांधीजी जेवायला बसले असताना त्यांना वारा घालणाऱ्या कस्तुरबा - फिशर यांच्या नजरेतून एकही तपशील सुटत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीत भौतिक निरीक्षणाला फार महत्त्व आहे.
आश्रमातल्या जीवनक्रमाशी जुळवून घेणं फिशर यांना अनेकदा जड जात असे. वर्ध्यातला कडक उन्हाळा हे एक मोठं संकटच होतं. दिवसातून दोनदा अंघोळ करणं किंवा थंड पाण्याच्या टबात बसून, टबाच्या कडेवर फळकूट ठेवून नि त्यावर टाइपरायटरची स्थापना करून मजकूर टाइप करायचा असे झटपट उपाय त्यांना आपोआप सुचत गेले. आंबा पिळून नि चोखून खाणं जमेना. ते पाहून आश्रमातल्या गांधीजींसकट सगळ्यांची करमणूक झाली.
फिशर यांच्या खुसखुशीत नि नर्मविनोदबुद्धीमुळे (ब्रिटिशांना self-deprecating humour विशेष आवडतो. ते आपणच आपली छान खिल्ली उडवतात.) आश्रमवासीयांना ते प्रिय झाले. महादेवभाई देसाई, खुशेंद नवरोजी, किशोरीलाल मश्रुवाला इत्यादी गांधीजींच्या सहकाऱ्यांशी फिशर अधूनमधून गप्पा मारायचे. एकदा महादेवभाई आपल्या झोपडीत बसून सूत कातत होते. फिशर त्यांच्यासमोर बसले नि सूतकताईवर त्यांना प्रश्न विचारू लागले.
गांधीजींच्या अलौकिक निग्रहशक्तीचं कारण विशद करताना महादेवभाई देसाई म्हणाले, "गांधीजींचा स्वतःवर अद्भुत ताबा आहे. सेक्स, संताप वगैरे विकारांचं ते मनातल्या मनात विसर्जन करत असतात."
वॉइसरॉय आणि गांधीजी यांची भेट घडवून आणाल तर बरं होईल, असं महादेवभाई फिशर यांना सुचवतात. फिशर यांच्यावर गांधीजींचा आणि गांधी-परिवाराचा किती विश्वास होता हे यावरून लक्षात यावं.
जेवताना पुष्कळ हसाहस होत असे. आश्रमातल्या त्याच त्या फिक्कट भाज्या खाऊन फिशर वैतागले होते. ते जेवायला बसले रे बसले की गांधीजी त्यांच्या पानात एक उकळलेला कांदा ठेवायचे. फिशर तो हळूच बाजूला सरकवायचे. त्यावरून त्यांचा गांधीजींशी हास्यविनोद चालायचा.
एकेकदा गांधीजी-फिशर संवाद सुरू असताना काही नेते वा कार्यकर्ते खोलीत बसलेले असायचे. फिशर यांच्या इंग्रजीविषयी कार्यकर्त्यांना कुतूहल असायचं. फिशर एकदा गांधीजींना म्हणाले, " 'मेन अॅण्ड पॉलिटिक्स' हे मी लिहिलेलं पुस्तक तुम्ही वाचलं का, असं विचारण्याचं धाडस मी करणार नाही; पण तुम्ही ते चाळलं असेल अशी आशा करतो." पुस्तक चाळणे यासाठी फिशर यांनी paging through असा शब्द वापरला. 'याचा अर्थ काय ?' असं गांधीजींच्या एका सचिवानं विचारलं.
गांधीजी म्हणाले, "Paging through म्हणजे आधी पुस्तकाचं शेवटचं पान पाहायचं, मग पहिलं पान नि मग मधलं पान." सगळे हसले.
अशा निखळ गप्पांतून फिशरना भारतीय माणूस कळला. "पाश्चात्त्य माणसांपेक्षा भारतीय माणसं जास्त प्रामाणिक वाटतात. भारतीय माणूस आत्मपरीक्षण करत असतो नि स्वतःला बोचकारे काढत असतो, असं त्यांनी पुस्तकात नमूद केलंय. पुस्तकाला प्रसन्नतेचा अत्तरसुगंध आहे.
फिशर यांचं इंग्रजी सुरेख आहे. पाण्यात मासोळीनं पदन्यास करावा तसं त्यांचं इंग्रजी आहे. डौलदार, राजस. केवळ इंग्रजी भाषा समजून घेण्यासाठी फिशर यांचं पुस्तक वाचलं पाहिजे. गांधीजींचं इंग्रजी बायबलच्या तोडीचं आहे, असं फिशर यांनी नमूद केलंय.
पुस्तक वाचताना एक गोष्ट लक्षात येते की, पाश्चात्त्य संस्कृतीशी गांधीजींचा एक बारीकसा धागा घट्ट जुळलेला होता. वागण्या-बोलण्यात संयम, वक्तशीरपणा, सुटसुटीपणा, एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे सहज वळणं, सोशल ग्रेस, हलकाफुलका विनोद ही पाश्चात्त्यांची सार्वजनिक व्यवहारातली पथ्यं. ती पाळताना गांधीजींना कोणतीही अडचण वाटत नाही. त्यांची comfort level छान वाटते.
गांधीजी-फिशर यांच्यातला अकृत्रिम स्नेहभाव पानोपानी दिसून येतो. गांधीजी फिशर यांची अगत्यानं खरं तर मायेनं विचारपूस करायचे 'आश्रमात तुम्ही उपाशी तर राहात नाही ना ?' 'डोक्यावर हॅट ठेवा', वगैरे. जेवताना गांधीजी त्यांना प्रश्न विचारायचे स्टॅलिन निष्ठुर आहे काय ? चर्चिलविषयी लॉईड जॉर्जचं मत काय आहे? वगैरे. एकदा ते फिशर यांच्या मुलग्यांची विचारपूस करतात.
'अ वुईक वुइथ गांधी' हा पौर्वात्य-पाश्चात्त्य संस्कृतीचा समंजस संवाद आहे. दोन्ही विचारपरंपरेतल्या शुभमय तत्त्वांचं सुभग दर्शन त्यात घडतं. जगातल्या सर्वशक्तिमान सत्ताधीशांची मग्रुरी पाहून झाली आणि फिशर भारतात आले. गांधीजी त्यांना पहिल्या पावसासारखे वाटले. 'जलते हुए जंगल पर जैसे बरखा बरसे रुक रुक, थम थम.'
राजकारण हे सत्तेसाठीच करायचं असतं असं युरोप-रशियातले हुकूमशहा म्हणत होते. तर राजकारण माणसांसाठी असतं हे गांधीजींचं मूळ तत्त्व होतं. म्हणून रशियन जनतेनं स्टॅलिनची आज्ञा पाळली तर भारतीयांनी गांधींवर प्रेम केलं, असं फिशर म्हणतात: Stalin gets obedience, Gandhi gets love and loyalty.
फिशर स्वतःची प्रतिष्ठा सांभाळून वागले, गांधीजींचा आब राखला. तटस्थ वृत्तीनं सगळं पाहिलं नि संवेदनशील मनानं लिहिलं. वर्ध्याच्या नंग्या फकिरासमोर ते विनम्र झाले, पण भावनांची दलदल केली नाही. फिशर गांधीजींना 'मिस्टर गांधी' म्हणायचे, बापू नाही.
विख्यात ब्रिटिश विचारवंत आणि क्वेकर चळवळीचे नेते कार्ल हीथ यांनी फिशर यांच्या पुस्तकावर वीस ओळींचं आटोपशीर परिचय टिपण लिहिलंय. 'ओघवत्या शैलीत लिहिलेला वृत्तपत्रीय दस्तऐवज' असं पुस्तकाचं वर्णन करून हीथ पुढं म्हणतात, "मिस्टर गांधी यांना गूढसदृश वातावरणातून फिशर बाहेर काढतात आणि त्यांना मानवीय मूल्यांच्या व्यापक परिप्रेक्ष्यात पाहताहेत."
पुस्तकाच्या अखेरीस फिशर यांनी मोजक्या नि समर्पक शब्दांत गांधीजींचं वर्णन केलंय: Gandhi is immersed in India. He identifies himself with India. All his antennae are out to catch the voice of India. He hears it. He is sure he interprets it correctly. In his pursuit of independence there is a musical harmony between Gandhi and millions of Indians.
त्या मधुर हार्मनीचे सूर पुस्तकातून झंकारताहेत.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या