पुढे बरीच वर्षं 'द लिट्ल प्रिन्स ऑफ करेज' हे चित्र राजगोपाल यांच्या आईच्या पडुक्कोट्टाईच्या घरात होतं. दिवाणखान्यातल्या भिंतीवर. पुढे ते एका चित्ररसिकानं विकत घेतलं. त्याची मूळ किंमत (आजच्याप्रमाणे) वीस कोटी रुपये अशी नक्की करण्यात आलीए. तैलचित्राचा लिलाव लवकरच होणार आहे. राजा रविवर्मांच्या चित्रकृतींवर धनाढ्य मंडळींचा डोळा असतोच. पुण्याच्या सेरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांनी घसघशीत 167 कोटी रुपये मोजून 'Yashoda and Krishna' हे विलक्षण सुंदर चित्र विकत घेतलं आणि रविवर्मा यांचा कलाक्षेत्रातला दबदबा काय आहे ते लक्षात आलं. जगभरातून रविवर्मांच्या चित्रांना जोरदार मागणी असते.
तर येऊन जाऊन मुद्दा प्रेमाचा आहे. खरं तर प्रेम म्हणजे बहिष्कृत फळ. त्या बाबा आदम आणि इवाबाईचे काय हाल झाले. स्वर्गाच्या बागेतून दोघांची हकालपट्टी झाली. मिर्झा गालिबचं काहीतरी वेगळंच. प्रेम केलं नि मला एकट्यालाच काय तो वनवास घडला अशी तक्रार मिर्झा गालिब आपल्या प्रेयसीकडे करतो :
निकलना खुल्द से आदम का सुनते आए थे लेकिन
बडे बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले
(स्वर्गातल्या बगिच्यातून आदमला बाहेर पडावं लागलं ते मी ऐकून होतो; तुझ्या गल्लीतून मलादेखील बाहेर पडावं लागलं नि माझी केवढी अप्रतिष्ठा झाली.) हे सांगता सांगता गालिबनं पुढे एक इशाराही देऊन ठेवलाय :
हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहोत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले
(मनात हजारो इच्छा तडतडत असतात नि प्रत्येक इच्छा सफल व्हावी म्हणून आपले प्राण कंठाशी येतात; खूप आकांक्षा बाळगल्या तरीही त्या कमीच पडतात.)
प्रेम ही माणसाची सगळ्यांत पहिली ख्वाहिश. आदिम प्रेरणा. प्रेमाची ओढ कधी संपतच नाही. ती माणसाच्या बोकांडी बसते नि एकीकडे त्याला छळते तर दुसरीकडे जगण्याची प्रचंड ऊर्जा नि चैतन्यही बहाल करते. हुरहुर, तगमग, भांडण, संशय, रुसवे-फुगवे, वगैरे बरंचसं लचांड मागे लागतंच.
ताटातूट हे दुर्दैव. प्रेमाचं की प्रेम करणाऱ्या दोन जिवांचं ? सोचिए.
प्रेमाच्या असंख्य छटा आप्तस्वकीयांचं प्रेम, मित्रांचं, मुलाबाळांचं, सहकाऱ्यांचं. पाळीव मुक्या प्राण्यांचं प्रेम मिळणं सहज शक्य असतं नि ते प्रेम अनिर्बंध असतं. हे अलीकडे लोकांच्या लक्षात येतंय.
प्रेमाला प्रणयाची डूब मिळाली तर आणखी काय पाहिजे? माणूस निहाल होतो.
प्रेमाचे कितीही गोडवे गायले तरीही जगातल्या सगळ्या संस्कृतींना प्रेमाचं वावडं.
चाफेकळीसारखं नाक, बदामासारखे डोळे वगैरे कविकल्पना माणसाला प्रेमातच सुचतात. पण अशा भलत्याच रोमँटिक कल्पना ठेवून चालत नसतं. स्त्री-पुरुषाला संसाराचा गाडा ओढायचा असतो. त्यासाठी वास्तवाचं चौरस भान असावं लागतं. माणूस मग लग्नाचा पर्याय स्वीकारतो. आणि मनात लुकलुकणारं अलौकिक प्रेम कलेत नि काव्यात शोधतो. दगडात कोरतो. लोकसंस्कृतीनं असफल प्रेमाच्या कहाण्या नि गाणी अमर केलीएत. लैला -मजनू, हीर -रांझा, रोमियो-ज्युलिएट.
हे सगळं आठवण्याचं कारण गेल्या महिन्यातली एक बातमी. शेवाळलेल्या, जीर्ण भिंतीच्या खाचेतून अचानक गवताचं एक कोवळं पातं छनछन करत उगवावं तशी ती बातमी. दक्षिण भारतातल्या एका पुरोगामी राजाच्या प्रेमकहाणीची.
राजा मार्तंड भैरव तोंडाइमन हा पडुक्कोट्टाईच्या सिंहासनावर बसला तेव्हा फक्त दहा वर्षांचा होता. पडुक्कोट्टाई हे मध्य तामिळनाडूतलं एक छोटंसं संस्थान. निसर्गाच्या सावलीत बहरलेलं. राजकुमार सज्ञान होईपर्यंत संस्थानाचा कारभार ब्रिटिशांनी बरेपणानं चालवला. राजा मार्तंडकडे राज्यपद आलं आणि त्यानं पडुक्कोट्टाईत पुष्कळ सुधारणा केल्या.
संस्थानात वीज, रस्त्यांची सोय केली; सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था नीटपणे लावली, लोकांना पायाभूत सुविधा दिल्या. एक छानसं ग्रंथालय सुरू केलं. पुढे तामिळनाडू सरकारनं त्या ग्रंथालयातच एक वस्तुसंग्रहालय सुरू केलं. संस्थानाची प्रगती व्हावी म्हणून राजा मार्तंड असं बरंच काही करत होता. पाश्चात्त्य मूल्यांचा त्याच्यावर खोल परिणाम झाला होता. उत्तम कारभार करून त्यानं लोकांची वाहवा मिळवली. मात्र, राजा लग्न करत नाहीए याचा रयतेला विषाद वाटे.
वयाच्या चाळिसाव्या वर्षी राजा बोहल्यावर उभा राहिला. ऑस्ट्रेलियाला गेला. तिथं प्रेमात पडला. निळ्या डोळ्यांची, डाळिंबी ओठांची एस्मे मेरी सॉरैट उर्फ मॉली फिंक या मेलबॉर्नच्या मुलीवर त्याचा जीव जडला. दोघांनी लग्न केलं, अशी नोंद राजाच्या चरित्रात सापडते : लेखक : एडवर्ड डूकर आणि कॉरॅली यंगर.
राजा मार्तंड सपत्नीक पडुक्कोट्टाईला परत आला. रयतेनं त्याचं शानदार स्वागत केलं. परंतु, ब्रिटिश सरकारनं राजाच्या लग्नास मान्यता दिली नाही. इतकंच नव्हे तर राणीला दिवस गेल्याचं कळलं तेव्हा सरकारच्या काही हस्तकांनी विषप्रयोग करून तिला ठार मारण्याचा प्रयत्नही केला. राजा मार्तंडनं राणी मॉलीसह ऊटीला राहण्याचा निर्णय घेतला. राजाला तिथं राहायला जागा मिळणार नाही अशी व्यवस्था ब्रिटिश सरकारनं केली. आणि मग राजा-राणी कायमचे परदेशी गेले.
राणीला मुलगा झाला. परंतु ब्रिटिश राज्यकर्ते राजपुत्र सिडनीला राजाचा उत्तराधिकारी मानण्यास तयार नव्हते. अखेरीस राजा मार्तंडने पडुक्कोट्टाईचं राज्यपद सोडलं. नि तो ऑस्ट्रेलिया देशात स्थाईक झाला. पडुक्कोट्टाईचे लोक हळहळले. राणीच्या प्रेमापोटी राज्यपदावर लाथ मारणाऱ्या राजाचा त्यांना अभिमानही वाटला. आस्ते आस्ते राजाभोवती एक मिथक तयार झालं.
खरं तर राजा मार्तंडची गोष्ट जगाला कळलीच नसती; परंतु युगप्रवर्तक चित्रकार राजा रविवर्मा यांच्या एका तैलचित्रामुळे पडुक्कोट्टाईची आख्यायिका भूतकाळाच्या तळातून एखाद्या निखाऱ्याप्रमाणे उफाळून वर आली. तैलचित्राचं शीर्षकदेखील समर्पक आहे : 'द लिट्ल प्रिन्स ऑफ करेज' (The Little Prince of Courage). हा राजकुमार म्हणजे राजा मार्तंड.
झालं असं की, 1878 च्या एका दुपारी राजा रविवर्मांना तामिळनाडूच्या त्रिची रेल्वे स्टेशनवर ए. शशैय्या शास्त्री भेटले. शास्त्री तेव्हा पडुक्कोट्टाई संस्थानाचे पंतप्रधान होते. त्या काळी राजघराण्याच्या सदस्यांची तैलचित्रं चितारण्याचा रिवाज होता. शास्त्रींनी ती जबाबदारी रविवर्मांवर सोपवली. राजा मार्तंड तेव्हा दहा वर्षांचा होता आणि नुकताच राज्यपदावर विराजमान झाला होता.
चित्रात राजा मार्तंड रुबाबदार दिसतोय; कोवळ्या चेहऱ्यावर निर्धाराची एक झगझगीत रेखा आहे. अंगात भरजरी पोशाख, दागदागिने, पायात बूट; डोक्याला राजमुकुट नि हातात तलवार आहे. तलवार राजाच्याच उंचीची आहे.
रविवर्मांनी 53.5 x 42 इंचाचा कॅनवास निवडल्यामुळे चित्राची भव्यता डोळ्यांत भरते. राजाच्या शेजारी एक सुंदर स्टूल आहे नि त्यावर परदेशी बनावटीचं एक छानसं घड्याळ ठेवलंय.
राजा मार्तंड 1928 मध्ये वयाच्या बावन्नाव्या वर्षी वारला. त्याचा अंत्यसंस्कार त्याच्या गावी व्हावा अशी राणी मॉलीची इच्छा होती. तिनं ब्रिटिश सरकारला तसं लिहून कळवलं; सरकारनं परवानगी नाकारली. राणी मॉलीनं राजाचा अंतिम संस्कार लंडन शहरात केला. हिंदू रिवाजाप्रमाणे.
राजा मार्तंडनंतर त्याच्या भावाचा नातू पडुक्कोट्टाईच्या गादीवर बसला. राजा राजगोपाला हा पडुक्कोट्टाईचा अखेरचा राजा ठरला. स्वातंत्र्यानंतर राजा राजगोपालानं आपलं संस्थान अतिशय आनंदानं भारतात विलीन केलं. करारावर राजानं सोन्याच्या पेननं सही केली नि पेन टेबलावरच ठेवलं. सरदार पटेलांनी राजाला पेनची आठवण करून दिली. राजा म्हणाला, "या लेखणीवर माझा नव्हे तर पडुक्कोट्टाईच्या जनतेचा हक्क आहे." इतकंच नव्हे तर राजकोषातले रुपये सत्तावन्न लाख राजानं सरदार पटेलांच्या हाती सुपुर्द केले, असं राजगोपाल तोंडाइमन म्हणतात. राजगोपाल तोंडाइमन हा राजा राजगोपालाचा दत्तक मुलगा.
पुढे बरीच वर्षं 'द लिट्ल प्रिन्स ऑफ करेज' हे चित्र राजगोपाल यांच्या आईच्या पडुक्कोट्टाईच्या घरात होतं. दिवाणखान्यातल्या भिंतीवर. पुढे ते एका चित्ररसिकानं विकत घेतलं. त्याची मूळ किंमत (आजच्याप्रमाणे) वीस कोटी रुपये अशी नक्की करण्यात आलीए. तैलचित्राचा लिलाव लवकरच होणार आहे. राजा रवि वर्षांच्या चित्रकृतींवर धनाढ्य मंडळींचा डोळा असतोच. पुण्याच्या सेरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांनी घसघशीत 167 कोटी रुपये मोजून 'Yashoda and Krishna' हे विलक्षण सुंदर चित्र विकत घेतलं आणि रविवर्मा यांचा कलाक्षेत्रातला दबदबा काय आहे ते लक्षात आलं. जगभरातून रविवर्मांच्या चित्रांना जोरदार मागणी असते.
राजा रविवर्मांच्या कलाकृतीत युरोपियन आणि अभिजात भारतीय संस्कृतीचा सुरेख संयोग पाहायला मिळतो. भारतीय पुराण, महाकाव्यं आणि संस्कृत नाटकातली पात्रं हे राजा रविवर्मांचे चित्रविषय. दुसरीकडे, त्या व्यक्तिरेखांवर ते युरोपियन तंत्राचा लेप चढवतात. तपशिलाकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. तसंच, चित्राच्या अवतीभवती छायाप्रकाशाची लिपझिप रचण्याचं त्यांचं कसब अद्भुत म्हटलं पाहिजे. त्यांच्या चित्रकृतींत अवकाशाचा space विचार असतो.
दुसरं, रविवर्मांच्या चित्रांतले रंग गहिरे असतात नि पाण्यावरच्या सावलीप्रमाणे तरलसुद्धा. त्यांच्या रेखाकृती सुडौल नि प्रमाणबद्ध. टेबल, घड्याळ इ. वस्तू आधुनिकतेचा संदर्भ पुरवत असतात. रविवर्मांची थोर परंपरा पुढे नेण्याचं काम मैसूर स्कूलच्या चित्रकारांनी कौशल्यपूर्वक केलं.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस राष्ट्रीय विचारांचा मोठा जाळ पेटला.
इंग्रजी विद्येमुळे भारतीयांना स्वत्व आणि देशाच्या सांस्कृतिक परंपरेची जाणीव झाली. राजा रविवर्मांच्या चित्रांमुळे ती प्रखर झाली. नवशिक्षित मध्यमवर्गाला एक व्यापक सांस्कृतिक आधार मिळाला. सिनेमा, कॅलेंडर अशा नव्या दृश्यमाध्यमांवरसुद्धा त्यांच्या शैलीचा खोल प्रभाव पडलेला दिसतो. मूक काळातले बरेचसे चित्रपट रविवर्मांच्या चित्रांची आठवण करून देतात.
या कथेचा तिसरा पेड म्हणजे भारताचे संस्थानिक. फाळणीच्या सुमारास भारतात एकूण 562 छोटी-मोठी संस्थानं होती. भारतीय उपखंडाच्या दोन पंचमांश भूभागावर या संस्थानांचा अंमल होता. साठ टक्के संस्थानं गुजरात-मारवाड नि मध्य भारतात विखुरलेली होती. विस्तीर्ण, मोकळ्या पठारावर उगवलेली गवताची पातीच जणू. तर 108 संस्थानं देशाच्या पाच लाख चौरस मैलावर एखाद्या सुस्त अजगराप्रमाणे पसरलेली होती. पैकी, काही मोठी होती कोल्हापूर, इंदूर, ग्वाल्हेर, पतियाळा, बिकानेर, भोपाळ, हैद्राबाद, बडोदे इ; तर काही तुळशीच्या पानाएवढी लहान पडुक्कोट्टाईसारखी.
ब्रिटिश राज्यकर्ते आणि भारतातले संस्थानिक हे एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. पाश्चात्त्य इतिहासकारांनी या समीकरणाकडे वसाहतवादी चष्म्यातून पाहिलं आणि सगळे संस्थानिक बदमाष, बदफैली आणि स्वार्थी होते असा निवाडा दिला. वस्तुस्थिती तशी नव्हती. अनेक संस्थानिक ब्रिटिशांविरुद्ध विचारव्यूह रचत होते आणि आपली स्वायत्तता टिकून राहावी नि देशकार्याला आपल्याकडून हातभार लागावा म्हणून धडपडत होते. लोककल्याणासाठी झटत होते.
ब्रिटिश साम्राज्यावर आपली पूर्ण निष्ठा आहे असं वरकरणी दाखवायचं नि दुसरीकडे जमेल तिथं इंग्रजांची कोंडी करायची असा हा डावपेचाचा खेळ खूप रंगला खास करून 1857 च्या बंडानंतर. कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा इथं आवर्जून उल्लेख करावा लागेल.
आपण विक्टोरिया राणीच्या चरणी कमळं वाहतो आहोत असं एकीकडे भासवायचं नि दुसरीकडे स्वातंत्र्याच्या कामी मदत करायची हे डावपेच शाहू महाराज, इंदूरचे तुकोजीराव होळकर (दुसरे) इ. राजेमंडळी कौशल्यानं आखत होती. ग्वाल्हेर, कोल्हापूर, बडोदे, त्रावणकोर, मैसूर, औंधचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी इ. संस्थानिकांनी पुरोगामी मूल्यं आणि कल्याणकारी धोरणांचा पुरस्कार केला हे विसरता येत नाही. या विषयावर इतिहासाचे जाणकार मनू एस. पिल्लई यांनी एक अभ्यासपूर्ण निबंध लिहिलाय.
राजा मार्तंड भैरव तोंडाइमन, राजा रविवर्माचं तैलचित्र आणि देशाभिमानी संस्थानिक मंडळी असा एक सुंदर गोफ पाहता पाहता तयार झाला की.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या