चितमपल्ली यांनी आपल्या आयुष्यातील पाऊण शतक त्यासाठी खर्ची घातले होते प्राणी, पक्षी, झाडे आणि निसर्ग यांचे रहस्य उलगडणे हेच त्यांचे जीवित कार्य बनले होते. प्रत्यक्ष जंगलातला वावर आणि त्याला अभ्यासाची जोड अशा दुहेरी प्रक्रियेमुळे ते असे व इतके काम करू शकले. कोणत्याही क्षेत्रातील जाणकार माणसांना अचंबा वाटत राहील अशी गुणवत्ता, अशी चिकाटी आणि असे सातत्य चितमपल्ली यांनी दाखवली. त्यांच्या लेखनाचा गाभा व आवाका कोणाही लहान थोर व्यक्तीने समजून घेतला तर त्यांना मनोमन सलामच करावासा वाटेल. त्यामुळे त्यांना अरण्यऋषी हे संबोधन पूर्णतः शोभून दिसते.
5 नोव्हेंबर 1932 ते 18 जून 2025 असे तब्बल 93 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मारुती चितमपल्ली यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातील आणखी एक तेजस्वी तारा निखळला आहे. अर्थात, दीड डझन पुस्तकांच्या रूपाने ते मराठी साहित्य विश्वात चिरकाल राहणार आहेत. जोपर्यंत मराठी भाषा व मराठी साहित्य आहे तोपर्यंत आजकालचे कोणते साहित्य टिकून राहील, याची लघुत्तम यादी करायची ठरली तर चितमपल्ली यांच्या साहित्याचा क्रम बराच वरचा असेल. मराठीतील असे कोणते साहित्य जगभरातील सर्व भाषांमध्ये आज उद्या घेऊन जायलाच हवे म्हणजे त्या भाषा व त्यांचे साहित्य समृद्ध होईल, अशी छोटीच यादी करायची ठरली तर तर चितमपल्ली यांचे स्थान आणखी वरचे असेल. आणि मराठी भाषेतील कोणते लेखन असे आहे की जे भविष्यात निसर्गविज्ञानातील जीव, भौतिक आणि रसायन या तीनही शाखांमध्ये विशेष उपयुक्त ठरेल अशी यादी करायची ठरली तर चितमपल्ली यांचे नाव त्या यादीत अव्वल स्थानी असेल. अशी वैश्विकता लाभलेले मराठी साहित्यिक किंवा लेखक हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच आहेत.
1975 नंतरचे अर्धशतक मराठी मधील चोखंदळ वाचकांचे कुतूहल शमवणारे आणि त्याहून अधिक वाढवणारे असे हे लेखक होते. त्यांनी जे दालन मराठीत उघडून दिले ते अधिक समृद्ध करता येणे अवघडच होते. कारण ते कोणालाही सहज साध्य नव्हते. चितमपल्ली यांनी आपल्या आयुष्यातील पाऊण शतक त्यासाठी खर्ची घातले होते प्राणी, पक्षी, झाडे आणि निसर्ग यांचे रहस्य उलगडणे हेच त्यांचे जीवित कार्य बनले होते. प्रत्यक्ष जंगलातला वावर आणि त्याला अभ्यासाची जोड अशा दुहेरी प्रक्रियेमुळे ते असे व इतके काम करू शकले. कोणत्याही क्षेत्रातील जाणकार माणसांना अचंबा वाटत राहील अशी गुणवत्ता, अशी चिकाटी आणि असे सातत्य चितमपल्ली यांनी दाखवली. त्यांच्या लेखनाचा गाभा व आवाका कोणाही लहान थोर व्यक्तीने समजून घेतला तर त्यांना मनोमन सलामच करावासा वाटेल. त्यामुळे त्यांना अरण्यऋषी हे संबोधन पूर्णतः शोभून दिसते.
गेल्या महिन्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन झाले आणि आता अरण्यऋषी चितमपल्ली यांचे. नारळीकरांनीही मागील पन्नास वर्षे असेच सातत्य व अशीच चिकाटी दाखवून मराठीत विज्ञान साहित्याचे दालन खुले करून दिले. या दोघांनीही nonfiction प्रकारातील साहित्य लिहिले, त्याच प्रमाणे कथा कादंबऱ्या या प्रकारातील Fiction साहित्यही निर्माण केले. त्यामुळे मराठी विचारविश्व या दोघांच्या प्रति कायम कृतज्ञ राहील. मात्र या दोघांच्याही अभ्यासाचे व संशोधनाचे अपेक्षित चीज त्यांच्या हयातीत झालेले नाही. त्यांचा मोठा उपयोग मराठी लेखन वाचन व्यवहारातील लोकांनी करून घेतलेला नाही. यापुढील काळात तरी, ती दोन्ही दालने अधिक समृद्ध करण्यासाठी विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, प्रकाशक मोठ्या प्रमाणात पुढे येतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !
Tags: writer nonfiction fiction researcher student language marathi forest maruti chitampalli weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या