हिंदू म्हणून जोरजोराने बाता मारणारे लोक, हिंदू धर्मातील जातीय विषमता आणि तिचे पराकोटीचे अस्पृश्यतेसारखे हिडीस नमुने याबाबत काहीच करीत नव्हते. आणि हिंदू धर्मातील जातीय विषमतेवर तुटून पडणारे लोक, मुस्लीम जमातवादाच्या रक्षणार्थ शर्थीने लढताना दिसत होते. त्या दोहोंची ती उसनी खोटी लढाई हा फक्त करमणुकीचा कार्यक्रम झाला होता, त्यातून जीवन बदलण्याची सुताराम शक्यता नव्हती. धर्मचिकित्सा करण्याचे नाकारून विद्वान मंडळी स्वतःचीच फसवणूक करून घेत होती आणि स्वतःच्या फसवणुकीची परिणती शेवटी समाजाच्या भरून फसवणुकीत होत असते.
हमीद पुण्यात आला की त्याचा घरी किंवा साधनेत फोन यायचा आणि मग त्याला फुरसत असेल त्याप्रमाणे तो एकतर घरी किंवा साधनेत यायचा. तो गुपचूप कधीच यायचा नाही. गडगडाट करीत यायचा. त्याच्या बोलण्याच्या, वागण्याच्या काही लकबी होत्या आणि त्या पटकन मनात ठसत. कोणत्याही घरात तो आला की दिवाणखाण्यापुरता त्याचा शिरकाव मर्यादित नसे. सारे घरच त्याचे होऊन जाई. घरातली स्त्री त्याची वहिनी, ताई किंवा तत्सम कोणीतरी होई आणि मुलांचा काका तो स्वयमेव बनत असे. हमीद काका बऱ्याच दिवसांत आला नाही की, घरातल्या सर्वांना त्याची आठवण येऊ लागे. सर्व तऱ्हेच्या लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी आवश्यक असा बोलण्याचा मालमसाला त्याच्याकडे भरपूर असे. त्यावरून त्याचे वाचन किती विविधतापूर्ण असेल याचा प्रत्यय येई. गोष्टी वेल्हाळपणा त्याच्या स्वभावातच असल्याने, तो कुठूनही आला तरी नाना अनुभव सांगू लागे.
माणूसमात्रांबद्दल त्याला जिव्हाळा असल्याने, त्याचा संबंध नाना प्रकारच्या लोकांशी येई आणि त्यांची नेटकी चित्रे तो एखाद्या व्यंगचित्रकाराप्रमाणे किमान शब्दांत काढत असे. तो इतक्या लोकांना आवड नावड अशी निवड न करता कसा भेटू शकतो, त्याचे अनेकांना आश्चर्य वाटत असे. सर्वांबद्दल त्याला जिव्हाळा असायचा, अगदी विरोधकांबद्दलसुद्धा. कारण ईश्वरावर श्रद्धा नसणारा तो एक नितांत आस्तिक होता. माणूस बदलू शकतो याबद्दल त्याच्या मनात दुर्दम्य विश्वास होता. त्यामुळे, 'आजचा मित्र हा उद्याचा प्रतिस्पर्धी आहे' असे राजकीय नेत्याप्रमाणे त्याने कधीच मानले नाही. उलट, 'आजचा विरोधक हा उद्याचा सहकारी आहे' अशा जाणिवेने तो वागत असे. त्यामुळे त्याचा वैयक्तिक गोतावळा फार मोठा होता.
संख्या आणि सत्ता यांचा मुकाबला सत्यच करू शकते, ही जाणीव त्याला असल्याने सत्य कथन करताना मात्र तो कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसे. सत्यासाठी आपल्याला प्रसंगी बलिदान करावे लागेल, याची त्याला जाणीव होती. तो गमतीने म्हणायचा, "अरे, प्रेषिताला चहासुद्धा तुम्ही देत नाही, मला हिजरत करावी लागेल, हा! आधीच सांगून ठेवतो!" आणि मग चहा वसूल केल्यावाचून जागचा हलायचा नाही. मध्यंतरी तो असाच पुण्याला आला, खूप दिवसांत घरी आला नव्हता. म्हणून 'घरी येणार म्हणाला आणि जेवायलाच येणार', असेही म्हणाला. वाटले, त्याचे काही पथ्य पाणी असावे. म्हणून, 'जेवायला काय करायचे' असे विचारले, तर गडगडाट करत म्हणाला, “बरं का वहिनी, अमेरिकेत गेलो तेव्हा तिथे एक कोकणच्या भगिनी भेटल्या. अगत्याने जेवायला बोलावले. म्हणाल्या, 'दलवाई साहेब घरी जेवायला या, आमटी भात करते.' मी म्हणालो, 'अहो, आमटी भात रोजचाच आहे. अमेरिकेत येऊन पुन्हा आमटी भातच कशाला खायचा, हा?' " तो जेवायचा चोखंदळपणाने. जेवताना त्याचे अनेक हास्यविनोद चालत. त्या विनोदामागे सत्यदर्शनाची अभिलाषा असे. सत्य बोचक शब्दांत सांगितले तर ते नकोसे वाटते, पण तेच विनोदात सांगितले की माणसाच्या मनात ठसते, असे तो मानत असे.
एकदा म्हणाला, "अहो यदुनाथ, तुम्हाला एक गंमत सांगतो. एकदा एक रशियन शेतकरी शेत नांगरत असताना त्याला तांब्याची एक तार सापडली. रशियन सरकारने जाहीर करून टाकले की, 'तारायंत्राचा शोध रशियाने लावला आहे त्याचा पुरावा म्हणजे ही तार होय. रशियन विज्ञानाचा विजय असो, थोर सोवियत क्रांतीचा विजय असो, समाजवादाचा विजय असो. भांडवलशाहीच्या आधी विज्ञानाच्या क्षेत्रात समाजवाद आघाडी मारणारच.' त्यानंतर कित्येक वर्षे त्या शेतकऱ्याने नांगरट केली, पण तारेचा तुकडा वगैरे काहीच सापडले नाही. तेव्हा रशियाने जाहीर करून टाकले, 'ज्या अर्थी तार सापडली नाही त्याअर्थी बिनतारी संदेशाचाही शोध आमच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे. सोवियत रशियाचा विजय असो, 'समाजवादाचा विजय असो.'
एकदा अलीगडचा एक किस्सा सांगताना म्हणाला, "मुसलमानांवर इतिहासाचा जबर पगडा असतो. त्यांना भूगोल मात्र कळत नाही. अलीगडच्या काही मुसलमानांना अलीगड पाकिस्तानात कधीच जाणे शक्य नाही, हे कधीच कळले नव्हते. त्यामुळे, पाकिस्तान झाल्यावर तिथला एक माणूस म्हणाला, 'तोबा तोबा, हमने व्होट इधर डाला, लेकिन पाकिस्तान उस तरफ निकला, अजीब बात है'."
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ मिरजोळी ह्या खेड्यात हमीद जन्मला, वाढला. इतर मुलांमध्ये मिळून मिसळून राहिला. पुढे चिपळूणला इंग्रजी शिकायला आला. तेव्हा इतर मुलांबरोबर खेळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर गेला. पण त्याचे नाव शाखेवर कळले आणि तो मुसलमान आहे हे समजल्यावर त्याला शाखेवर यायला बंदी घातली गेली. पहिला आघात त्याच्या बालमनावर तिथे झाला. इथे माणसाकडे माणूस म्हणून पाहिले जात नाही, त्याच्या जाती धर्माचा विचार करूनच तो आपला किंवा परका हे ठरवले जाते, हे त्याला कळले. पण त्याला हे कळेना की, संघाच्या शाखेत जाणाऱ्या इतर मुलांमध्ये आणि आपल्यात काय फरक आहे? माणसाने माणसाकडे माणसासारखे पाहावे, हा साधा धडा इथली माणसे शिकली नाहीत हे केवढे आश्चर्य आहे, असे त्याला वाटले. हमीदमधला समाज सुधारक इथून अंकुरू लागला.
हमीदची भाषा मराठी, जन्मापासून तो तिचाच वापर करत आला. इतरांच्या भाषेत आणि त्याच्या भाषेत कसलाच फरक नव्हता. मराठी हीच त्याची मातृभाषा होती. पण त्याच्या परिसरातच मातृभाषा मराठीऐवजी मादरी जबान उर्दू असल्याचा दावा मांडला जात होता. हमीदच्या मनावर दुसरा आघात इथे झाला. धर्माचा संबंध भाषा, पोशाख, नाव इत्यादी बाह्य गोष्टींशी आधीच लावला जातो आणि मुसलमानांना भीतीने असे घेरलेले आहे की, आपली पृथगत्व सांभाळण्यासाठी ते धर्माच्या ऐवजी अशा अवांतर गोष्टींनाच महत्त्व देत सुटतात. कोकण पाकिस्तानात जाणार नाही आणि आपणही कोकण सोडून पाकिस्तानात जाणार नाही, ही साधी वास्तवता पाकिस्तानचा कैफ चढलेल्या भाई-बंदांना समजत नाही, हे सत्य हमीदला त्याच वयात आकलन झाले. वास्तवतेकडे डोळेझाक करून अनेक मुसलमान स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहेत, हे पाहून त्याचे मन आक्रंदन करून उठे. अंधत्व आणणाऱ्या ह्या प्रचाराला धर्म कसे म्हणायचे, या प्रश्नाने त्याला बेचैन केले. त्यातूनच त्याच्यातला लेखक जागा झाला. शाळकरी विद्यार्थी असतानाच त्याने 'कोकणचे मुसलमान व उर्दू' या विषयावर एक लेख लिहिला. तेव्हापासून एक आग्या मोहोळ त्याच्याभोवती घोंगावू लागले ते अखेरच्या श्वासापर्यंत घोंगावत राहिले. आग्या मोहोळाच्या सान्निध्यात तो बेदरकारपणे जगत राहिला.
घरची गरिबी. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण त्याला फारसे मिळाले नाही. पण त्याचाही त्याला फायदाच झाला. तो कागदी ग्रंथाऐवजी जीवनच वाचू लागला. तेव्हा पुस्तकाच्या जगातले जीवन आणि वास्तव जीवन यातले महदंतर त्याला जाणवले. पुस्तके वाचायला शिकल्यामुळे सुशिक्षित मुसलमान आपल्या समाजातून मनाने निर्वासित झालेला असतो, हे त्याला दिसून आले. तो स्वप्नच सत्य म्हणून कवटाळतो आणि वर्तमानाचे दाहक चटके बसू नयेत म्हणून डोळे उघडून बाहेरचे पाहण्यापेक्षा स्वतःच्याच विश्वात रममाण होतो. त्यामुळे हमीदने लेखणी हातात धरली आणि मराठीतून तो कथा लिहू लागला. त्याच्या ललित कथा गुणतःच वेगळ्या होत्या. त्यातून, समाजातील वास्तव तो कलात्मक पातळीवर सांगत होता. पण मुस्लीम समाजातील व्यापक निरक्षरता आणि उर्दूच्या किल्ले कोटात आत्मरक्षणाच्या विकृत जाणिवेने स्वतःला कोंडून घेणारे लोक यामुळे समाजाची दुरवस्था झालेली आहे, यामुळे हमीद बेचैन असे.
शालेय जीवनातच त्याचा राष्ट्रसेवा दलात प्रवेश झाला. जाती धर्मातीत राष्ट्रवादाची जोपासना करण्यासाठी झटणारी ही संस्था त्याच्या पसंतीस उतरली. तेथेच त्याचा समाजवादाकडे ओढा निर्माण झाला. मुंबईत समाजवादी मित्रांच्या मेळाव्यात तो स्वाभाविकच पोहोचला. निर्वाहासाठी तो पत्र व्यवसायात पडला. 'दैनिक मराठा' हे एक अजब विश्व होते. कट्टर हिंदू महासभेपासून कट्टर कम्युनिस्टांपर्यंत, अनेक नमुन्याची माणसे तिथे होती. आणि ती माणसे खुमखुमी असल्यासारखी तिथे चर्चा करीत. त्या चर्चेमुळे हमीदच्या विचारांना स्पष्ट आकार येऊ लागला. त्याचबरोबर, तथाकथित विचारवंतांमधील गतानुगतिकताही त्याला पाहायला मिळाली, त्यामुळे त्याने बुद्धीनिष्ठेचा स्वीकार केला आणि व्यक्ती प्रामाण्य व ग्रंथ प्रामाण्य यांचा त्याग केला. त्याच्या युक्तिवादांना तोंड देणे परंपरावाद्यांना अवघड झाले. कारण ते जीवनापेक्षा ग्रंथाश्रीतच अधिक होते.
हिंदू म्हणून जोरजोराने बाता मारणारे लोक, हिंदू धर्मातील जातीय विषमता आणि तिचे पराकोटीचे अस्पृश्यतेसारखे हिडीस नमुने याबाबत काहीच करीत नव्हते. आणि हिंदू धर्मातील जातीय विषमतेवर तुटून पडणारे लोक, मुस्लीम जमातवादाच्या रक्षणार्थ शर्थीने लढताना दिसत होते. त्या दोहोंची ती उसनी खोटी लढाई हा फक्त करमणुकीचा कार्यक्रम झाला होता, त्यातून जीवन बदलण्याची सुताराम शक्यता नव्हती. धर्मचिकित्सा करण्याचे नाकारून विद्वान मंडळी स्वतःचीच फसवणूक करून घेत होती आणि स्वतःच्या फसवणुकीची परिणती शेवटी समाजाच्या भरून फसवणुकीत होत असते.
वयाच्या पस्तिशीनंतर हमीदला रोजचा पोटाचा व्यवसाय नकोसा वाटू लागला, कारण जीवनाची हाकच फार जबरदस्त होती. आता दोन घोड्यांवर स्वार होणे केवळ अशक्य होते. म्हणून त्याने ताडकन् नोकरी सोडली. त्याची पत्नी मेहरूनिसा नोकरी करून संसाराचा गाडा रेटू लागली. हमीद वाऱ्यासारखा फिरू लागला, सर्वांशी वाद घालू लागला. त्याचा वादविवादातला पवित्रा अत्यंत आवश्यक व आक्रमक असायचा. बिनतोड युक्तिवाद करण्यात त्याचा हातखंडा असे. काही वेळा तो नेमका वर्मावर आघात करीत असे आणि मग माणसे त्याच्यावर संतापत, चिडत असत. पण हमीदचे भांडण कोणा व्यक्तीशी कधीच नसे, त्याचा राग तत्त्वज्ञानावर असायचा. माणसाला रोग झाल्यावर, त्या रोगावर कठोर उपाययोजना करताना दयाबुद्धी दाखवणे म्हणजे रोग वाढण्याला वाव करून देणे असते. तेव्हा रोग्याचा रोग दुरुस्त करून माणूस शाबूत ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी अत्यंत धारदार हत्याराने शस्त्रक्रिया करावी लागते, सुई द्यावी लागली किंवा कडू औषध पाजावे लागले तरी ते केले पाहिजे. अशा वेळी रोगी संतापला तरी, तो रोगी आहे हे विसरता येत नाही. हमीदचे सर्व वागणे हे असे असायचे. त्याच्याभोवती मुस्लीम तरुण मोठ्या संख्येने उभे राहिले. तेव्हा तो म्हणाला, 'आता मी पूर्वीइतका आक्रमक पवित्रा घेणार नाही, धारदार शब्द वापरणार नाही. एकट्यालाच चक्रव्यूह भेदायचा असतो, त्या वेळी तसे करणे अपरिहार्य असते.'
सर्व समाज सुधारणांचा प्रारंभ स्त्रियांच्या दास्य मुक्तीपासून आणि दलितांचे आत्मकर्तृत्व जागृत करण्यापासूनच होतो. हमीदने हेच काम प्रथम हाती घेतले. मुस्लीम स्त्री जबानबंद आहे आणि त्यामुळे ती आपला आवाज बुलंद करीत नाही, पण म्हणून ती आनंदात आहे असे समजण्यात अर्थ नाही. तोंडी तलाक आणि सवत यांची तलवार टांगती असल्याने, तिला तोंड उघडणे अशक्य होते. म्हणून हमीदने (18 एप्रिल 1966 रोजी) सात मुस्लीम स्त्रियांचा एक विराट मोर्चा मुंबईत हुतात्मा स्मारकापासून विधानभवनापर्यंत काढला. डॉ. रमेशचंद्र शहा यांच्या मदतीने पुण्यातून चार मुस्लीम भगिनी आंतरभारतीच्या वतीने त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. मोर्चाला सामोरे जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सोळभोग सल्ला असा होता की, 'तुम्ही तुमच्या समाजाला हे सारे पटवून द्या.' मुख्यमंत्र्यांची याबाबत काही जबाबदारी आहे याचे साधे भान त्यात नव्हते. जबानबंद स्त्रियांनी आपल्या समाजाला हे पटवायचे आणि मुख्यमंत्र्यांनी घाऊक मतांचे सौदे पटवण्याच्या मोबदल्यात गप्प बसायचे, असा हा सिद्ध साधकी प्रकार होता. हमीदला या गोष्टीची फार चीड होती !
- यदुनाथ थत्ते
1932 ते 1977 असे जेमतेम 45 वर्षांचे आयुष्य लाभलेले मुस्लीम समाजसुधारक हमीद दलवाई यांची 29 सप्टेंबर ही जयंती. त्या निमित्ताने, साधनाचे भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते यांच्या एका लेखातील पूर्वार्ध येथे प्रसिद्ध करीत आहोत. 1979 मध्ये प्रकाशित झालेल्या 'अशी मंडळी बहुत असावी' या यदुनाथांच्या पुस्तकात हा लेख आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या