डिजिटल अर्काईव्ह

नागरिक विरुद्ध उत्सवखोर असा हा संघर्ष आहे !

महापालिकेच्या बैठकीतही तेच दिसलं की सभागृहात नागरिकांच्या बाजूने बोलणारा मी एकटाच होतो. मला बोलावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मी नंतर विचारलं की, मला बाहेर नेल्यानंतर तुम्ही पाच वाजेपर्यंत होतात, मग पुढे काही बोललात की नाही? तर ते म्हणाले, 'नाही, आम्ही काहीच बोललो नाही'! रॉस फेरेरोची एक व्याख्या अशी आहे की, "पाणी घाण आहे हे सांगणारा कार्यकर्ता नव्हे तर पाणी स्वच्छ करणारा कार्यकर्ता असतो." त्या बैठकीत नागरिकांच्या बाजूने बोलणारं दुसरं कोणीही नव्हतं आणि उत्सवाच्या बाजूने उभे ठाकलेले ते सगळे उत्सवखोर होते. तर उत्सव विरुद्ध नागरिक हा संघर्ष तयार झाला आहे.

 

 

प्रश्न - गणेश उत्सवातील कर्णकर्कश आवाज आणि रहदारीला होणारे अडथळे या विरोधात तुम्ही आवाज उठवला आहे, त्यामागील तुमची भूमिका सुरुवातीलाच सांगता का ?

- आपण जर युरोप किंवा मध्य-पूर्व जगाशी तुलना केली तर भारतात खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात. उदाहरणार्थ, तिथे वर्षातून चार-पाच सण साजरे होत असतील तर आपल्याकडे 365 दिवस कमी पडावेत एवढे सण-उत्सव साजरे होतात. हे सण दोन प्रकारात विभागले गेले पाहिजेत. एक म्हणजे, वैयक्तिक किंवा कौटुंबिक पातळीवर साजरे केले जाणारे, जे व्यक्तीस्वातंत्र्य किंवा धर्मस्वातंत्र्य यात समाविष्ट होतात आणि स्खलन स्वातंत्र्य म्हणून मान्य केले जातात. आणि दुसरा प्रकार म्हणजे सार्वजनिकरीत्या साजरे होणारे सण. उदाहरणार्थ, गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र आणि अन्य काही सण. देशाच्या इतर काही भागांतसुद्धा असे सण साजरे केले जातात.

सार्वजनिकरीत्या सण-उत्सव साजरे करताना त्यांचं खर्च-लाभ विश्लेषण (cost benefit analysis) गरजेचं ठरतं. म्हणजेच त्यातून लाभ काय होतोय आणि किती त्रास सहन करावा लागतोय याचं विश्लेषण. फक्त गणेशोत्सवच नव्हे तर, सार्वजनिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या, सर्वच धर्मांच्या सणांबद्दल सध्याची परिस्थिती अशी आहे की, त्यातून होणारा फायदा शून्य आहे.

अंधार युगापर्यंत युरोपात धर्म आणि सांस्कृतिक बाबी एकमेकांमध्ये गुंतलेल्या होत्या. मायकेल अन्जेलोची चित्रं किंवा त्या वेळचं संगीत हे चर्चशी निगडित असायचं. पण प्रबोधन कालखंडापासून या दोन्हींची फारकत होत जाऊन धर्म पारलौकिक घटकांपुरता मर्यादित राहिला आणि संगीत, कला वगैरे सांस्कृतिक घटक सेक्युलर होत गेले. त्यामुळे, आता धर्मासाठीसुद्धा सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक सण-उत्सवांना मूलभूत अधिकार मानून चालणार नाही, त्याला विशेषाधिकार किंवा दुय्यम अधिकारच मानावा लागेल आणि त्यावर काही वचक असायलाच लागेल.

उत्सवखोरांना ध्वनिप्रदूषण करण्यापासून रोखणं, सार्वजनिक ठिकाणी लाउड स्पीकर, वाद्ये न वाजवू देणं, आणि रहदारी सुरळीत राखण्यासाठी उत्सवांचे मंडप रस्त्यावर अतिक्रमण करून बांधू न देणं, आणि त्यांच्या मिरवणुका रहदारीच्या रस्त्यावरून काढण्याचा दुराग्रह त्यांनी सोडणं, या चार सुधारणा ताबडतोब आणि गरज पडल्यास बंधनकारकरीत्या सरकारी बलप्रयोग वापरून लागू होणं गरजेचं आहे.

प्रश्न - ही भूमिका तुम्हाला होणाऱ्या वैयक्तिक त्रासातून आली आहे की तत्त्वज्ञानातून तयार झाली आहे ?

- खरंतर माझी भूमिका शरीरशास्त्रातून तयार झाली आहे. मनुष्यजातीतल्या प्रत्येक व्यक्तीचं शरीर सारखंच असल्यामुळे भारतीय आणि परदेशी वैद्यकशास्त्र वेगळं नसतं. खूप मोठ्या गोंगाटाला संमतीने सामोरे जाताना तुमची मानसिक संमती (Placebo effect) असते, ज्यामुळे तुम्ही तो गोंगाट सहन करू शकाल; जसं की पब आणि नाईट क्लबमध्ये जाणाऱ्यांना त्या आवाजाने काही होत नाही, कारण त्यांनी ती मानसिक तयारी बनवलेली असते. पण ध्वनीप्रदूषणाची व्याख्याच अशी आहे की, नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी, नको असलेला आवाज. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी डीजे, कोणतेही वाद्ये, लाउड स्पीकर किंवा इतर कशाच्याही माध्यमातून गोंगाट केला जातो, तेव्हा आजूबाजूला असलेले, राहणारे, नोकरी करणारे, त्या सगळ्यांना वेठीला धरून सक्तीचे श्रोते बनवले जाते. ते कान बंद करून घेऊ शकत नाहीत. त्या वेळी त्यांची मानसिक तयारीही नसल्यामुळे प्रचंड त्रास होतो, प्रत्येकालाच ! त्यामुळेही ते म्हणतात त्या प्रकारची वैयक्तिक आवडनिवड अजिबातच नाही.

वैयक्तिक आवडीचं उदाहरण म्हणजे, विदर्भात केले जाणारे फ्लॉवर पोहे कांदा-बटाटा पोह्यांपेक्षा जास्त आवडत असतील तर ती माझी वैयक्तिक आवडनिवड आहे. पण ध्वनीप्रदूषणाने होणारा त्रास काही फक्त पुणे, महाराष्ट्र किंवा भारतापुरता सीमित नसून, जगभरात, किंवा मनुष्यजात कधी मंगळावर गेली तर तिथेसुद्धा होणाराच आहे. त्यामुळे ती वैयक्तिक बाब नसून पूर्णपणे सार्वत्रिक, सामूहिक, सार्वजनिक आणि जनहिताची आहे.

प्रश्न - भारतात सतत कोणते न कोणते तरी उत्सव, जयंत्या, नमाजचे मोठे सोहळे, किंवा कावड सारखे काही ना काहीतरी सार्वजनिक कार्यक्रम चालूच असतात, ज्याचा फायदा काहीच लोकांना होतो पण त्रास मात्र मोठ्या प्रमाणात होतो, असं तुमचं निरीक्षण आहे का?

- नक्कीच. तो फायदासुद्धा भासमान आहे. उत्सवखोर म्हणतात की, त्यांना मानसिक समाधान मिळतं. पण त्याचा दृश्य फायदा आपल्याला काहीच दिसत नाही. त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर, त्यांचं स्खलन स्वातंत्र्य, म्हणजे चुकीचा असण्याचा अधिकार, म्हणून आपण ते मान्य केलं, तरी त्या सबबीखाली जर ते आजूबाजूच्या नागरिकांना वेठीस धरत असतील, किंवा ध्वनिप्रदूषण करत असतील, किंवा रहदारीला अडथळा करत असतील, तर इतरांनी ते का सहन करावं? या सगळ्याचा त्रास सहन करत राहणं तार्किकदृष्ट्या पटणारं नाही.

संविधानात मूलभूत अधिकार लिहिलेले असले तरी वास्तवात ते असून नसल्यासारखेच असतात. सोशल सिक्युरिटी अथवा सेफ्टी नेट नसल्यामुळे प्रत्येकाला उद्याची भ्रांत असते. त्यामुळे संविधानिक अधिकार कितीही असले तरी या घटकांमुळे अधिकारांची अंमलबजावणी करायलाच नागरिक घाबरतात. संविधानात नागरिकांना संचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा शांततेत जगण्याचं स्वातंत्र्य (Right live in peace and tranquility) ठळकपणे दिलं असलं, आणि सर्वोच्च न्यायालयानेदेखील त्याबद्दल सतत वाच्यता केली असली, तरी या भांडवली व्यवस्थेमुळे नागरिक ते स्वातंत्र्य बजावायला, त्याबद्दल जाहीररीत्या वाच्यता करायला, आवाज उठवायला कचरतात. आणि यालाच हे उत्सवखोर त्यांची मूकसंमती गृहीत धरतात, किंवा त्यांच्या शांततेचा अपप्रचार करू लागतात. हे भांडवली अर्थव्यवस्थेचे दोष आहेत.

प्रश्न - सध्या साजऱ्या होणाऱ्या उत्सवांची स्थिती आणि नागरिक हा एक संघर्ष आहे असं वाटतंय, पण मग यात सरकारची काय भूमिका असावी ?

- तुम्ही केलेला शब्दप्रयोग खूप छान आहे. हल्लीच मी तो गगनभेदी थत्ते यांच्या लेखात पाहिला- 'उत्सव विरुद्ध नागरिक'. महापालिकेच्या बैठकीतही तेच दिसलं की सभागृहात नागरिकांच्या बाजूने बोलणारा मी एकटाच होतो. मला बोलावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मी नंतर विचारलं की, मला बाहेर नेल्यानंतर तुम्ही पाच वाजेपर्यंत होतात, मग पुढे काही बोललात की नाही? तर ते म्हणाले, 'नाही, आम्ही काहीच बोललो नाही'! रॉस फेरेरो (Rose ferrero) ची एक व्याख्या अशी आहे की, "पाणी घाण आहे हे सांगणारा कार्यकर्ता नव्हे तर पाणी स्वच्छ करणारा कार्यकर्ता असतो." त्यामुळे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेऊन, ते शांत कसे काय बसले कुणास ठाऊक ? त्या बैठकीत नागरिकांच्या बाजूने बोलणारं दुसरं कोणीही नव्हतं आणि उत्सवाच्या बाजूने उभे ठाकलेले ते सगळे उत्सवखोर होते. तर उत्सव विरुद्ध नागरिक हा संघर्ष तयार झाला आहे, हे खरंच आहे.

यात सरकारची, खासकरून पुणे महापालिकेची भूमिका बघायची झाली तर, 'वरं जनहितं ध्येयम्' असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे आणि 'केवल न जनस्तुतिः' असा त्याचा उत्तरार्ध आहे. म्हणजेच नागरिकांचे हित हे आमचं ध्येय आहे, आणि सण-उत्सवाच्या नावाखाली होत असलेल्या धांगडधिंग्याला कायदेशीर मान्यता देण्यात यावी असा दुराग्रह धरणाऱ्या गावगुंडांचं, उत्सवखोरांचं तुष्टीकरण करणं हे आमचं ध्येय नाही, असं स्पष्टपणे त्यांचं ब्रीदवाक्यच सांगतंय. किंवा पोलिसांच्या 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदाचा अर्थ शांतताप्रिय नागरिकांचं रक्षण करणे, आणि वाईट प्रवृत्तीचा - या विषयासंदर्भात, सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा घालता यावा अशी दुराग्रही मागणी धरणाऱ्या वाईट प्रवृत्तीचं निग्रहण करणे असा होतो.

प्रत्येक सरकारी संस्थेचं खरंतर हेच ध्येय आहे. त्यामुळे सरकारने निश्चितपणे नागरिकांची बाजू उचलून धरणंच अपेक्षित आहे. पण लोकशाहीमध्ये सरकारला नेहमी पुढची निवडणूक दिसत असल्यामुळे सतत या प्रकारचं तुष्टीकरण चालू असतं. म्हणजे तुकारामाच्या 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता' या वचनाला आपण आदर्श म्हणून मिरवत असलो, तरीपण प्रत्यक्षात लोकशाही ही बहुमताचीच असते. सतत पुढची निवडणूक दिसत असल्यामुळे, बरेचसे राजकारणी जनहितार्थ भूमिका घ्यायला कचरतात. काही अपवाद असतात, पण कोणत्याही अपवादाने नियम सिद्ध होतो, अपवाद नाही. सध्या सरकारची भूमिका वरून तटस्थ आणि बोलघेवडी दिसून येते आहे. म्हणजे वर्षभरापूर्वीची त्यांची मशिदींच्या लाउड स्पीकरबंदीची भाषा बघण्यासारखी आहे. मुंबई आता लाउड स्पीकर मुक्त झाली आहे. पण तेवढीच ठाम भूमिका गणेशोत्सवाबाबत घेतली जात नाही. पण हे निर्विवादच आहे की, सरकारची भूमिका ही नागरिकांच्याच हिताची असायला हवी.

प्रश्न - हे सगळं तुम्ही सॉक्रेटीस, अलेक्झांडरियाच्या हायपेशिया (Alexandria's Hypesia) सोबत कसं काय जोडून घेता?

- एकाने मला विचारलं होतं की, 'तुम्हाला तुमच्या जिवाची भीती नाही का वाटत?' त्या संदर्भात मी तेव्हा हे संदर्भ दिले होते. दाभोलकरांचा खून झाल्यानंतर अंनिस लोकरंगमंचाने एक नाटक बसवलं होतं, ज्यात सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम असा प्रवास दाखवला होता. त्यात सॉक्रेटीस, अलेक्झांडरियाच्या हायपेशिया, युरोपमधले गॅलिलिओ, ब्रुनो, निकोलस कोपर्निकस, यांच्यापासून ते महाराष्ट्रातले तुकाराम, दाभोलकर आणि अन्य काही जण या सगळ्यांची गुंफण केली होती. त्या संदर्भात मी म्हणत होतो की, आज सॉक्रेटीसला कोणी मारलं याची काही माहिती नाहीये किंवा ब्रुनोला तर जिवंत जाळूनच टाकलं होतं. किंवा इंग्लंडमध्ये अँलन ट्युरिंग (Alan Turing) चं उदाहरण आहे. भारतातसुद्धा दाभोलकरांच्या बाबतीत ते दिसून आलं. 'व्यक्ती मरते पण विचार मरत नाहीत', म्हणजे अकरा वर्षे ते ज्या कायद्यासाठी लढले, ज्यासाठी रक्ताची पत्रे लिहिली गेली, तो कायदा त्यांच्या खुनानंतर लगेचच पारित झाला. त्यामुळे मला अजिबात भीती वाटत नाही, आणि ती न वाटण्याचं कारण म्हणजे ही सगळी इतिहासातली उदाहरणं.

प्रश्न - जॉन स्टूअर्ट मिलच्या नावावर एक वाक्य सांगितलं जातं की, 'माझी काठी फिरवण्याचं सार्वजनिक स्वातंत्र्य तिथे जाऊन थांबतं जिथे दुसऱ्याचं नाक असतं', तुमचं म्हणणंसुद्धा अशाच प्रकारचं आहे का?

- अगदीच ! इथे आपण नाकाऐवजी शरीर म्हणू. मथितार्थ म्हणजे, अहिंसेचं तत्त्व 'जगा आणि जगू द्या' हेच या वाक्यातून अभिप्रेत आहे. त्यामुळे ते वाक्य तर लागूच होतं. मुळात आम्ही कोणत्याही सणावर पूर्ण बंदी आणा अशी मागणी करत नाही आहोत.

आपण वैयक्तिक आणि सामाजिक असं वर्गीकरण केलंच आहे. या घडीला वैयक्तिक सणांना आम्ही स्खलन स्वातंत्र्य म्हणून मान्य करतो आहोत. तसं तर घटनेनुसार वैज्ञानिक दृष्टीकोन पाळणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं म्हटलं आहेच, तेसुद्धा आम्ही बजावू. त्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून धडपड करू.

रिचर्ड डॉकिन्स (Richard dawkins) यांना विचारलं गेलं की, 'नास्तिक सत्तेत आले तर तुम्ही धर्माला हद्दपार कराल का?' त्यावर ते स्पष्टपणे 'नाही, तसं करणं म्हणजे, नास्तिकतेचा धर्म बनवण्यासारखं होईल' असं म्हणाले होते. त्यामुळे सरकारी सक्ती करून नास्तिक्य लादायची आमची इच्छा नाही. दाभोलकरांच्या म्हणण्यानुसार आम्ही दशकांची नाही तर शतकांची लढाई लढू.

बरेच मुलाखतकार असाही प्रश्न विचारतात की, जर हे सगळं काढूनच टाकलं तर सण-उत्सव साजरे तरी कसे करायचे? आम्ही तत्त्वतः सण-उत्सव साजरे करणं योग्य समजतच नाही, पण स्खलन स्वातंत्र्य म्हणून ते मान्य करतो, पण लाउडस्पीकर-वाद्ये वाजवणं, रस्त्यांवर 70-80 टक्के अतिक्रमण करून मंडप घालणं, रहदारी सुरळीत होण्यासाठी बांधण्यात आलेल्या रस्त्यांवरून मिरवणुका काढण्याचा दुराग्रह धरणं या सगळ्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचे आणि त्रासाचे कोणी धर्मस्वातंत्र्याच्या सबबीखाली समर्थन करत असेल, तर ते मान्य नाही. तो आमच्या नागरिकी अधिकारांवर हल्ला आहे. याप्रकारे हे उत्सवखोर, ते ज्या धर्माचे आहेत त्या धर्माच्या इतर लोकांच्या, इतर धर्मीय लोकांच्या आणि बिनधर्मीय नास्तिक लोकांच्याही नागरिकी मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत आहेत. ते उल्लंघन आम्हाला तातडीने आणि गरज पडल्यास बळप्रयोगाने थांबवून हवंय. त्यात पोलिसी बळ कमी पडत असेल, तर हवंतर सैन्य बोलावून ही उत्सवखोरी मोडून काढावी. जंतर-मंतर वगैरे मोच्यांवेळी सरकार हे करतंच! शेवटी एवढंच वाटतं की, नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करावं आणि उत्सवखोरांच्या चैनीचा दुराग्रह गरजेपुरत्या बलप्रयोगाने मोडून काढावा. 

प्रश्न - तुम्ही स्वतःला नास्तिक आणि डावे म्हणवता, मग तुम्हाला या सगळ्यात वर्गीय घटक जाणवतो का ?

- भांडवली अर्थव्यवस्थेत नागरिक सोशल सिक्युरिटी किंवा सेफ्टी नेट म्हणून काही गोष्टी मूर्खपणानेसुद्धा करायला लागतात. आणि सरकार व धर्मसत्तेचे हितसंबंध त्यामध्ये गुंतलेले असल्यामुळे, ते त्यांना नवनवीन गोष्टी तयार करून देत असतात. भारतात सध्या जे आयडेंटीटी पॉलिटीक्स किंवा प्रतीकांचं किंवा धर्मवादाचं राजकारण चालू आहे, तो हाच प्रकार आहे. उदाहरणार्थ, शहरांची नावं बदलणं. औरंगाबादमध्ये मलिक अंबरने त्या काळात 24 तास पाणी पुरवठा ठेवला होता, आणि आता मोठी धरणं असूनसुद्धा पाण्याची, घाणीची अडचण आहे. तर नागरिकी समस्यांच्या नावाने काहीही खटाटोप न करता फक्त नाव बदलून, आपण खूप मोठी मजल मारल्याचा दंडोरा पिटला जातो. जसं नाव हे प्रतीक असतं, तसंच सण-उत्सवसुद्धा बिनउपयोगाची प्रतीकेच आहेत.

महाराष्ट्रात किंवा खासकरून पुण्यात, भाद्रपदातले गणेशोत्सव रस्त्यावर साजरे होतातच, पण आजकाल फक्त कोकणात साजरा होणारा माघी गणेशोत्सवसुद्धा पुण्यात सार्वजनिकरीत्या चालू झालाय. किंवा रामनवमी सारखा सण जो फक्त मंदिरापुरता मर्यादित असायचा तोसुद्धा रस्त्यावर साजरा होऊ लागलाय, आणि आणखी पण अन्य सटरफटर सण सार्वजनिकरीत्या करायला सुरुवात झाली आहे. याच्यामागे धर्मवादाचं किंवा जातवादाचं राजकारण करून नवनवीन प्रतीकं तयार करण्याचीच धडपड आहे. जनतेच्या हाती काही तरी खेळणी द्यायची आणि त्यातच त्यांना गुंतवून ठेवून वास्तविक समस्यांपासून दूर ठेवायचं हा हेतू या मागे असतो. थोडक्यात, मार्क्स म्हणतो तसं, अफूच्या गोळीप्रमाणे त्यांना गुंगवून त्यांची दिशाभूल करत राहायची.

प्रश्न - हे सगळं करताना भीती वाटत नाही का? पूर्वी असं म्हटलं जायचं की, 'पुण्यात कुठेही दगड फेकला तरी विद्वानालाच लागायचा', पण सध्या शिक्षित आणि सुसंस्कृत यात काही फरक पडला आहे का? कारण या प्रश्नासाठी तुमच्यासोबत अनेक नागरिकांनी उभं राहणं अपेक्षित होतं, पण ते होताना दिसत नाहीये. लोक समाजमाध्यमांवर बोलतायत, पण प्रत्यक्षात दिसत नाहीयेत.

- खरंय ! समाजमाध्यमावर यासाठी खूपच पाठिंबा येतोय. किंवा असेही लोकं आहेत जे त्यांच्या परीने याबाबत विविध व्यासपीठांवरून हा प्रश्न मांडत आहेत. ही नागरिकी सक्रियता (citizen activism) लोकशाहीसाठी अत्यावश्यक असते, किंबहुना तो लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठीचा एकमात्र घटक आहे. तो नसेल तर लोकशाही फक्त निवडणुकी बहुमत बनून राहते, ज्यातून 'हम करे सो कायदा' ही राज्यकर्त्यांची मानसिकता होऊन जाते. त्यामुळे सरकारवर वचक राहत नाही. ही नागरिकी सक्रियता (citizen activism) अमेरिकी नागरिकांमध्ये प्रचंड कळसाला पोहोचलेली आहे, कारण त्यांचे निर्माणकर्ते असलेली सगळी मंडळी मध्यमवर्गीय कार्यकर्ती होती. त्यामुळे तिथे ही सक्रियता सुरुवातीपासूनच होती आणि अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. या विरुद्ध परिस्थिती भारतात आहे. एकदा निवडणुकीची औपचारिकता झाली (जीसुद्धा 50 टक्के लोकच करतात) की, त्यानंतर बेछूट धुडगूस चालू असतो.

मध्यंतरी, लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार (Right to Recall) किंवा सरकारी उत्तरदायित्व विधेयक (Government Accountability Bill) सारख्या छोट्या बदलांचा प्रयत्न झालाही. हे असे नवनवीन कायदे आणणे तर आहेच, पण त्यापलीकडेसुद्धा नागरिकांनी त्यांच्या समस्या स्पष्ट, निसंदिग्ध, परखड शब्दांत जाहीर स्वरूपात वेगवेगळ्या व्यासपीठांवरून मांडायला हव्यात. भांडवली अर्थव्यवस्थेमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात बसल्याने संविधानिक अधिकार असून नसल्यासारखे राहतात. त्यामुळे नागरिकी सक्रियता वाढवणं गरजेचं आहे. माझ्यासाठी महापालिकेची घटना हालचालीची सुरुवात नव्हती, पण इतरांसाठी जर ती सुरुवात असेल तर ती कौतुकाचीच बाब आहे. त्या घटनेनंतरचा पुढचा आठवडा मी माध्यमांशी संवाद आणि इतर गोष्टींमध्येच व्यस्त असल्यामुळे त्या सगळ्याला अजून संघटित स्वरूप देण्याबाबत काही ठोस रूपरेषा ठरवता आलेली नाही. पण विचार चालूच आहे, वेळेनुसार ते जाहीर करूच...

प्रश्न - तुम्ही बोलल्यानंतर किंवा मुलाखतीनंतर समाजमाध्यमांवर जणू महापूरच आलाय. काही जण तर तुम्ही व्यक्ती नसून AI आहात असंही म्हणतायत. एकाने तुम्हाला 'मिस्टर बिन' म्हटलंय, तर काहींनी मोठ्या प्रमाणावर मीम्स तयार केल्या आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ?

- या सगळ्यातून सवंग प्रसिद्धी मिळावी हा हेतू अजिबातच नव्हता, पण जर ती या प्रश्नाच्या कारणासाठी होत असेल आणि ती प्रश्नासाठी गरजेची असेल, तर त्यापासून मी परान्मुखसुद्धा होणार नाही. पण फक्त 'येन केन प्रकारेण' प्रसिद्धी हा हेतू नव्हताच. या प्रसिद्धीमागे व्यक्तीमहात्म्य वाढवणं हा हेतू नसण्यापेक्षा हे कार्य सिद्धीस जावं एवढाच हेतू असावा. थोडक्यात, सुभाषिताच्या शब्दात सांगायचं झालं तर,

'न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् ।
कामये दुःखतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम् ।'

म्हणजे मला राज्य, स्वर्ग, पारलौकिकता काहीच नकोय, तर समस्या मुळापासून सुटावी हीच अपेक्षा आहे. 'त्वं देहत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः।' या गणपतीच्या स्तोत्राप्रमाणे काहीही अर्थ नसलेली, नुसत्या शब्दालंकाराची स्तुती धर्मामध्ये केली जाते, तशी स्तुती माझ्याबद्दल केली जावी अशी माझी आजही इच्छा नाही. मुळात मीच व्यक्तीप्रामाण्यवादी नसल्यामुळे इतरांनी तसं किंवा ग्रंथप्रामाण्यावादी बनावं असंही मी कधी म्हणू शकणार नाही. उलट मी बुद्धिप्रामाण्यवादी आहे, आणि इतरांनीही तसंच बनावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पातळीवर कार्यरत राहावं. शेवटी एवढंच की, व्यक्ती मरते पण विचार मरत नाही.

प्रश्न - विद्यानंद बापटांच्या म्हणण्याप्रमाणे बुद्धिप्रामाण्यवाद महत्त्वाचा आहे. काही जण त्यांच्या या कृतीला 'नारायण पेठ क्रांती' असंही म्हणत आहेत. पुण्यात एक नागरिक मंचसुद्धा तयार झालाय. त्यांनी बापट यांचा '26 सप्टेंबर' रोजी सत्कार करून त्यांना दोन लाख रुपयांची थैली देण्याचेसुद्धा जाहीर केले आहे. त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि यावर काम करणं गरजेचं आहेच... 

शब्दांकन : सृजन वाटवे
संवादक : नितीन ब्रह्मे


पुणे शहरातील गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषण आणि रस्ते बंद केल्यामुळे येणारे अडथळे हे दोन मुद्दे उपस्थित करून, पुण्याच्या सार्वजनिक जीवनात केवळ दोन आठवड्यांत सर्वपरिचित झालेल्या विद्यानंद बापट यांना एका बाजूने प्रचंड समर्थन मिळाले, तर दुसऱ्या बाजूने मोठा विरोधही पत्करावा लागला. त्यामुळे, मागील दोन आठवड्यांत त्यांच्या पन्नासहून अधिक व्हिडिओ मुलाखती झाल्या आहेत, आणि त्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. त्यातील एक मुलाखत 'द एन्काऊंटर' या मराठी यूट्यूब चॅनेलवर, 2 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झाली, त्या 30 मिनिटांच्या मुलाखतीचे हे शब्दांकन आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके