डिजिटल अर्काईव्ह

शंकराचार्यांच्या वादाची ही अशी तन्हा (साधना : 31 मार्च 1973)

शंकराचार्य पावणेदोन तास बोलतील याची कल्पना नसल्याने दर पाच मिनिटांनी मला वाटायचे, आता बोलण्याची आपली पाळी. मला घशाचा जरा त्रास असल्याने बोलण्यापूर्वी मी थोडे पाणी पितो. आपल्याला बोलायचे आहे असे समजून दोन-तीन वेळा मी पाणी प्यायलो. शंकराचार्य माझ्याकडे बोट करून, विकट हास्य करीत म्हणाले, "पिओ पिओ, और पानी पिओ, देखो एक घंटे के अंदर से चार बार पानी पिए. मैने तो एक बूंद भी जल प्राशन नहीं किया. ये क्या मुझे हरा सकते?" अशा असंख्य गमती. सगळ्या देणे केवळ अशक्य आहे.

शंकराचार्याचे पीठ म्हणजे हिंदूधर्म प्रचाराचे मुख्य स्थान. शंकराचार्यांनी हिंदू धर्माचा प्रचार करण्याबाबत कोणाचाच विरोध नाही. त्यांनाही वाणी स्वातंत्र्य, प्रचार-स्वातंत्र्य निश्चितच आहे. त्यांच्या अभिव्यक्तीला विजय तेंडुलकरांच्या अभिव्यक्तीइतकेच स्वातंत्र्य हवे. लोकशाहीने दोघांनाही त्यांचे विचार सांगताना शांतता व सुरक्षितता पुरविली पाहिजे.

हिंदुत्ववाद्यांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांचे म्हणणे, आम्हाला पसंत आहे तेवढेच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आम्ही चालू ठेवू; बाकीच्यांना मनगटाच्या जोरावर हाणून पाडू. पुरीचे शंकराचार्य त्याच पठडीतले. अर्थात सगळेच प्रतिगामी, आंधळे, धर्मवादी, हुकूमशाहीचे पुरस्कर्ते असतात. दलित पँथरने जोडे फेकले शंकराचार्याच्या रोखाने, तर शंकराचार्य थयथयाट करून 'माझे वाक् स्वातंत्र्य, माझे वाक् स्वातंत्र्य' म्हणून आक्रोश करू लागले ! 'सखाराम बाइंडर' बंद पाडणारी झुंडवादी शिवसेना, जनसंघ सारे लगेच पुढे सरसावले. वाणीस्वातंत्र्य इत्यादी मूल्ये त्यांच्या सोयीने बदलत असतात. दलित पँथरने पत्रक काढले आहे, "हा शंकराचार्य चातुर्वर्ण्य अस्पृश्यता या कालबाह्य विचारांचा पुरस्कार करतो. त्याच्या अशा विचारामुळे आम्ही हजार वर्षे मार खातो आहोत. सरकारने त्याला अटक करावी. कारण हा जातीय तेढ वाढवतो. आम्ही त्याला बोलू देणार नाही."

युक्रांदची भूमिका अशी : कोणी कोणाला जोडे मारू नयेत. पण 'सखाराम बाइंडर'च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा शंकराचार्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अधिक पवित्र नाही. म्हणून जोडे फेकण्याचा प्रकार वृत्तपत्रांतून कळल्याबरोबर फोन करून मी सांगितले होते, "शंकराचार्यांची प्रकृती ठीक आहे ना? झाला प्रकार व्हायला नको होता." पण सायंकाळी "कुमार सप्तर्षीने 'माफी' मागितली पाहिजे!" असा धोशा लावून सभा बंद पाडण्यात आली! मी वा युक्रांदने 'माफी' मागण्याचा सवालच नव्हता. जे कृत्य केलेलेच नाही त्याची माफी जबरदस्तीने, मनगटाच्या, झुंडशाहीच्या दबावाने मागायला लावणे ही असभ्यता होती. अर्थात, पुरीच्या शंकराचार्यांच्या वादाची एकूण तहऱ्हाच अशी होती की, कोठेही सभ्यता, सुसंस्कृतता, सहिष्णुता यांचे दर्शन झाले नाही. सखाराम बाइंडर बंद पाडले गेले; त्याबद्दल तेंडुलकर वा कमलाकर सारंग यांनी युक्रांदला माफी मागायला सांगणे हे जसे हास्यास्पद होईल, तितकाच हास्यास्पद प्रकार जोडे मारण्याबद्दल कुमार सप्तर्षीला माफी मागायला लावण्याचा होता.

शंकराचार्यांच्या वादाच्या एकूण पद्धतीचा पहिल्यापासून शोध घेतला म्हणजे चर्चेचे सामान्य शिष्टाचारदेखील या गृहस्थांना ठाऊक नसावेत अशी शंका येते. "निसर्गात विषमता आहे. समाजवादी समतेचा पुरस्कार करतात, ही गोष्ट निसर्गाविरुद्ध आहे", असा प्रचार पुरीच्या शंकराचार्यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यात सर्व ठिकाणी चालू ठेवला होता. त्याविरुद्ध कोल्हापूर,नांदेड व अन्य ठिकाणी निदर्शनेदेखील झाली. पुण्यात त्यांनी आणखी वरताण केली. "निसर्गात विषमता आहे. समता निसर्गाविरुद्ध आहे या माझ्या विधानाचे खंडन करणाऱ्याबरोबर मी झाडाखालीदेखील जाहीर वाद घालण्यास तयार आहे. पुरीला जाण्याचे रद्द करून मी पुण्यात रात्रंदिवस वाद घालण्यास तयार आहे." जाहीर वादाचे हे आव्हान स्वीकारावे की नाही याबद्दल युक्रांदमध्ये विचार झाला.

प्रथम शंकराचार्यांकडे दुर्लक्ष करावे असा आमचा विचार होता. दुष्काळी परिस्थितीतून आपण काम करत असताना, आपले लक्ष आर्थिक प्रश्नावरून बाजूस सारू नये हे मुख्य कारण. शिवाय शंकराचार्यांचे स्थान हिंदू धर्मात पोपप्रमाणे सर्वशक्तिमान नाही. आणखी एक कारण म्हणजे, बुद्धिप्रामाण्य मानणाऱ्यांनी ग्रंथप्रामाण्य मानणाऱ्याबरोबर चर्चा तरी कोणत्या पातळीवर करायची ? हा अडचणीचा प्रश्न होता. ग्रंथप्रामाण्य मानून धर्मवाद्यांबरोबर काही पुरोगामी (मर्यादित) लोकांनी यापूर्वीच वाद घातले आहेत. विवेकानंद, दयानंद सरस्वती, सावरकर, टिळक, डॉ.पु. ग. सहस्रबुद्धे यांनी हे वाद उत्कृष्ट रितीने घातले आहेत. आपण सामाजिक दृष्टिकोणातून विचारसरणीकडे बघतो. ग्रंथात काय लिहिले आहे त्याचे अर्थ उलटसुलट न ताणता, सरळ सरळ हल्ला करणाऱ्या आगरकर, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पठडी आपण मानतो. मग वादाच्या फंदात कशाला पडा ? पण या विचारानंतर आणखी विनिमय होऊन अखेरीस शंकराचार्यांचे जाहीर वादाचे आव्हान स्वीकारायचे ठरले !

निसर्गाचे निमित्त पुढे करून पुरीचे शंकराचार्य सामाजिक विषमतेला आवश्यक असलेले मनोमस्तिष्क तयार करत आहेत. त्यांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. ते त्यांच्या भक्तांपुरते धर्मवेडेपणा सांगत असते तर आपण दुर्लक्ष करू शकलो असतो. पण ते समतेच्या सामाजिक विचारसणीचा सामाजिक क्षेत्रात पराभव करण्याचा विडा उचलून बोलत आहेत. त्याला प्रत्युत्तर दिलेच पाहिजे. आपण शंकराचार्यांबरोबरच्या वादाचे निमित्त करून, ज्या जनतेच्या डोक्यात चातुर्वर्ण्य जन्माधिष्ठित प्रतिष्ठा, पूर्वसंचितानुसार पुनर्जन्म इत्यादी संकल्पना पक्क्या रुजल्या आहेत त्या संकल्पनांबरोबर संघर्ष दिला पाहिजे. 'ब्राह्मण्य' हे आता जातीवाचक राहिले नसून प्रवृत्तीवाचक बनले आहे. मराठा, माळी इत्यादी जातींमध्येदेखील नवश्रीमंत वर्ग 'ब्राह्मण्य' प्रवृत्तीचा वाहक बनतो आहे. ब्राह्मण्याविरुद्ध झगडा हा खऱ्या अर्थाने प्रस्थापितांविरुद्धचा झगडा बनला आहे. चातुर्वर्ण्य जातिसंस्था, पूर्वसंचितानुसार पुनर्जन्म या कल्पना जनतेच्या डोक्यातून काढून टाकल्याशिवाय आर्थिक प्रश्नावर श्रमिक जनतेला संघटित करता येत नाही. हा गेल्या चाळीस वर्षांचा डाव्या चळवळीचा अनुभव आहे. आंधळ्या धर्मवादाचे बळी करून प्रस्थापित हितसंबंधी वर्ग श्रमिक जनतेला शिवसेनेसारख्या संघटनांत ओढत असतो, हे कटू सत्य लक्षात घ्यावेच लागते. म्हणून शंकराचार्याबरोबर वैचारिक सामना युक्रांदने करावाच, असा निर्णय झाला. हा निर्णय घेताना राष्ट्र सेवा दलाचा गटही होता. देशातले वातावरण लक्षात घेता प्रतिगामी, जातीयवादी व भांडवली शक्ती हातमिळवणी करून आक्रमक बनतात असे दिसते. त्यांना काटशह दिला पाहिजे, त्यांचे आव्हान स्वीकारले पाहिजे, असे राष्ट्र सेवा दाल, युक्रांद व मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी ठरवले. तिघांची संयुक्त निदर्शने मनुस्मृतीच्या प्रवचनाबाहेर झाली. त्याच वेळी तिघांच्या काही कार्यकर्त्या मंडळींनी आत जाऊन शंकराचार्यांना पत्र देण्याचे ठरले.

शंकराचार्यांना लिहिलेल्या पत्रात "आम्ही आंधळे ग्रंथप्रामाण्य मानणारे नाही. पण अलीकडे आपण धर्मग्रंथाबाहेर जाऊन काही सामाजिक तत्त्वज्ञान सांगत असता, म्हणून तर्कप्रत्यक्ष प्रमाण, कॉमनसेन्स यांच्या आधारे आम्ही आपणाबरोबर वाद घालू इच्छितो. वादविवादाच्या नेहमीच्या शिष्टाचारानुसार व सर्वमान्य पद्धतीने चर्चा करू. तुम्ही वादाचे जाहीर आव्हान स्वीकारले आहेच. आपण आता माघार घेऊ नये. आपल्या सोयीची वेळ सांगावी" इत्यादी मजकूर होता. सदर पत्र समक्ष शंकराचार्यांच्या हातात दिले. त्यांनी आमच्या पोरसवदा अवताराकडे पाहिले. 'मनुस्मृतीवरच्या प्रवचनाआधीच म्हणजे तत्काळ वाद सुरू करू' असे ते म्हणाले. आमचीही तयारी होतीच. आमच्यातर्फे मी बोलायचे ठरले. "सगळ्यांची नाके समान नाहीत. वेगवेगळ्या गाईच्या दुधात चरबीचे प्रमाण कमी-जास्त असते. सगळ्यांना टीबी होत नाही. दोन विहिरीच्या पाण्यांत फरक असतो. चार मुलांनी दगड फेकले तर कमी-जास्त अंतरावर पडतात. गुरुत्वाकर्षण उत्तर ध्रुवावर वेगळे आहे", इत्यादी विधाने त्यांनी चर्चेमध्ये केली. पाच-दहा मिनिटांची प्रत्येकाची वक्तव्ये अशी जुगलबंदी दोन तास चालली ! विषमतेची उदाहरणे म्हणून वास्तविक विविधतेची उदाहरणे ते सांगत. प्रतिपक्ष म्हणून मी सांगितले, "नाके वेगवेगळी असली तरी माणसाचे नाक म्हणून एक विशिष्ट आकाराचा अवयव सर्व मानवांना समान आहे. डॉक्टर एका मानवी शरीराचा अभ्यास करतो आणि दुनियेतल्या कोणत्याही माणसाला औषध देतो. निसर्ग विषम असता तर शंकराचार्यांचे पडसे, कुमार सप्तर्षीचे पडसे, असे स्पेशल अभ्यास करावे लागले असते. कोणत्याही विहिरीचे पाणी आणले तरी दुनियेतल्या कोणत्याही पाण्याच्या नमुन्याप्रमाणे ते 100 डिग्रीलाच उकळते. उद्यान प्रसादच्या कार्यालयावर जाऊन सर्वांनी गच्चीवरून उड्या टाकल्या तर निसर्गातील गुरुत्वाकर्षणाची शक्ती सर्वांना समानपणे पृथ्वीवर आणील. पूर्व जन्मीच्या पाप-पुण्याप्रमाणे कोणी वरचेवर तरंगेल व केवळ पापीच खाली आपटतील असे घडणार नाही. चार मुलांचे दगड कमी-जास्त अंतरावर पडले तरी त्याचे कारण त्यांच्या दंडातील कमी-जास्त शक्ती हे असते. व्हेलॉसिटीचा सिद्धान्त निसर्गात समान व सार्वत्रिक असतो. इ. इ."

शंकराचार्य सारखे गडबड करून "मीच जिंकले, मीच जिंकले" असे म्हणत ! आकांड तांडवाची ही तऱ्हा त्यांनी दोन्ही दिवस कायम ठेवली होती. आपल्या भक्तगणाची श्रद्धा जागृत करण्यासाठी, "कुमार सप्तर्षी आपल्या नावात सात ऋषी असूनही वेद, स्मृती, ब्राह्मण्य यांचा उपहास करतात. कुराण, बायबल यांच्यावर टीका करण्याची त्यांची हिंमत आहे का? ते आपले नाव डेव्हिड किंवा महंमद का ठेवत नाहीत?" इत्यादी सवाल त्यांना विचारीत. शेवटी त्यांनी अगदी विनोदाचा कहर केला ! "रंग ही विविधता आहे; त्यावरून विषमता सिद्ध होत नाही. पांढऱ्या गाईचे दूध पांढरे असते व काळ्या गाईचे दूधदेखील पांढरेच असते", असे एक विधान मी केले असता शंकराचार्यांनी एकदम आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पत्त्याच्या डावात लहान मुलाने थयथयाट करावा तसे ! "कुमार सप्तर्षीचा वादाचा मूलभूत पायाच उखडला गेला आहे. गाईचे दूध सफेद नसतेच. ते पिवळे असते. सप्तर्षी हरले आहेत. हरले आहेत!" हे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यांत विलक्षण चमक दिसत होती. मी कपाळाला हात लावला. त्या दिवशीची वादसभा तेथेच संपली. पुन्हा दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजता वादसभा सुरू करण्याचे ठरले, रात्री कितीही वेळ बसायचे ठरले.

22 मार्चला पुन्हा सात वाजता वादसभा सुरू झाली. चारशे-पाचशे पोलीस. आजूबाजूचे रस्ते, चौक अडवलेले. प. वसंत गाडगीळ कमांडर ! पुरीच्या शंकराचार्यांचे ते महाराष्ट्रातील प्रतिनिधी. प्रवेश पत्रिकेशिवाय प्रवेश नव्हता. ज्यांना वादसभेस येण्याची इच्छा आहे त्यांनी दुपारी 3 ते 4 या वेळात पासेस घेऊन जावेत असे जाहीर झाले होते. त्या वेळी पं. गाडगीळ चेहरा पाहून पासेस देत. गोरा, नाकेला व धान्या डोळ्यांचा इसम असल्यास त्याला आठ-दहा पासेस देत. काळ्या, बिगर तुकतुकीत चेहऱ्याच्या इसमांना एक पास मिळणेदेखील कठीण होते. शिवाय नाव लिहून घेत. अधिक पास मिळवण्यासाठी काही भोसले, कांबळे, गायकवाडनी आपली नावे कुलकर्णी, देशपांडे, भिडे, बापट, अशी सांगितली. मी सकाळीच फोनवर पं. वसंत गाडदीळांना सांगितले होते, आम्ही वादातला एक पक्ष आहोत; म्हणून युक्रांदला पन्नास पास लागतील. आम्ही एका गटाने वेगळे बसू. नावांची पादी पाठवा, म्हणजे तेवढे पासेस देतो, असे त्यांनी कबूल केले. बरोबर दुपारी 3 वाजता युक्रांदच्या एका कार्यकर्त्यांस यादी देऊन पाठविले. "थांबा आता, देतो. आणखी थोडा वेळ बसा जरा", असे करत करत 3 ते 4 ही प्रवेशपत्रिका देण्याची वेळ संपविली; आणि 4 वाजता सांगितले, "हे पाच पास घ्या. अधिक पास देऊ शकत नाही." याउलट आरएसएस, जनसंघ, कट्टर हिंदुत्ववादी यांना खास निमंत्रण देऊन वाटेल तेवढे पास दिले होते! पोलीस बंदोबस्त इतका कडक की, दलित युवकासारखा चेहरामोहरा दिसला तरी गचांडी मारत! वादविवाद ऐकण्यासाठी आलेले शेकडो लोक पास नाही म्हणून परत गेले. शिवसेनेचा मात्र मोर्चाच पोलीस बंदोबस्त बाजूला सारून सरळ आत नेण्यात आला. बिनपासवाले बरेच जण त्या मोर्चात घुसून आत प्रवेश करते झाले.

शंकराचार्यांनी वादविवादातला त्यांचा आत्मविश्वास गमावला होता. शिवाय पं. वसंत गाडगीळ हे त्यांचे उजवे हात. हा वादविवाद आपल्या अंगलट येणार हे त्यांनी ताडले होते. यासाठी पूर्वरचित योजना व्यवस्थित आखून सभा उधळायची हे ठरलेले उघडउघड दिसत होते. तातडीने छापून घेतलेल्या प्रवेश पत्रिकेवर आधी ठरलेले असूनही वादसभा असे न छापता 'शंकराचार्यांचे प्रवचन' असे छापले होते ! श्रीमती शांताबाई व कु. लीलाताई परुळेकर यांची अपॉइंटमेंट रात्री 9 वाजता घेतलेली होती. जर अखंड वाद करायचा होता तर 9 वाजता कार्यक्रम कसा ठरवता येतो? 7 वाजता शंकराचार्य आले. पं. गाडगीळ संस्कृतमध्ये काही तरी प्रास्ताविक बोलले. नंतर शंकराचार्यांनी आपल्या भक्तगणांना विविध धार्मिक घोषणा द्यायला लावून त्यांना व्यवस्थित गुंगी आणली. मग पावणेदोन तास बोलतच सुटले ! खंडन-मंडन, पूर्वपक्ष उत्तरपक्ष या पद्धतीने चर्चा उभयपक्षी ठरली असताना व तसेच वृत्तपत्रांत जाहीर झालेले असताना ते एकटेच बोलत राहिले. त्याच वेळी माझ्या शेजारी बसलेल्या युक्रांद व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना मी सांगितले, "वाद करण्याचे यांच्या मनात नाही. यांचे झाले की सभा उधळणार. आपण शांत बसून यांचे सगळे नाटक पाहू या !"

त्या पावणेदोन तासांत शंकराचार्यांनी माझी वैयक्तिक व युक्रांदची यथेच्छ टिंगल टवाळी केली. "हे मार्क्सवादी आहेत. रशिया हे यांचे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु आहेत, यांना समानता पाहिजे. सगळ्या स्त्रियांना पुरुष किंवा सर्व पुरुषांना स्त्रिया बनवायचे आहे. समानता म्हणून सर्वांना तृतीयपंथी नपुंसकलिंगी बनवणार आहात?" हे शेवटचे वाक्य माझ्याकडे बघून म्हणाले व भक्तगणांनी टाळ्या माराव्यात म्हणून थांबून राहिले! नंतर भक्तगणांना प्रश्न विचारला, "पुरुषांपैकी कोणी पुढच्या जन्मी स्त्री बनू इच्छितो काय?" कोणी हात वर केला नाही! यावरून त्यांनी जाहीर केले की, जनतेला स्त्री पुरुष समानता नको आहे. त्या वेळी युक्रांदच्या लोकांनी हात वर केले होते. पण 'इनके दालमें कुछ काला है' असे म्हणून उपहास केला. मनुःस्मृती हातात घेऊन ते बोलू लागले, तेव्हा मी माझ्याजवळची मनुस्मृतीची प्रत उघडून पाहू लागलो. खरे सांगताहेत की नाही हे पाहायचे माझे कामच होते. त्यावर ते खूप चिडले. "देखो, देखो. उसमें क्या मिलेगा ? तुम तो ट्रान्सलेशन देखोगे। असली संस्कृत आना चाहिये।" माझ्या हातात अ. भि. शहा यांचे पुस्तक होते. त्यांत त्यांचा व शंकराचार्याचा 'गोमांस खाण्याची ऋग्वेद काळात प्रथा होती' या विषयावर झालेला पत्रव्यवहार होता. माझ्या हातातले ते पुस्तक बघून शंकराचार्य पुन्हा बरसले, "शहा के पास पैसा है, इसलिये किताबें छपवाता है। वो ओरिजनल नहीं है। दूसरे ग्रंथोंसे लेता है। वो हार गये है। हम जीते है।" असे घोकून घोकून अ. भि. शहा या विषयावर 15 मिनिटे प्रवचन झाले.

युक्रांदकडे या दिवशीचे संपूर्ण टेपरेकार्ड आहे. कोणीही ऐकू शकतो. खूप अशास्त्रीय, बुद्धीला मारक अशी विधाने शंकराचार्यांनी केली आहेत. "चंदगीराम पहेलवान शाकाहारी आहे. तो शाकाहारी असल्यामुळे दुनियेतल्या सर्व मांसाहारी पहेलवानांना त्याने हारवले आहे. (दोन शाकाहारी पहेलवान लढतात तेव्हा कोणीतरी हरत असेलच ना?) भाक्रा नांगल बांधून काय दुष्काळ जातो? खरे कारण शोधले पाहिजे. गोहत्या चालू आहे, म्हणून दुष्काळ आहे. प्रगतीच्या गप्पा मारतात. कुमार सप्तर्षीचा विज्ञानावर भर. त्यांचे विमान चंद्रावर जाताना कधी जळू शकते, बिघडू शकते. आमच्याकडे त्या पेक्षा किती तरी प्रगती झाली होती. तुकाराम सदेह वैकुंठाला गेला. अगदी सदेह हो. आणि ते विमान बिघडले नाही बरं का? (हे म्हणताना माझ्याकडे दृष्टिक्षेप. काय बिनतोड युक्तिवाद केलाय, असा आविर्भाव)"

'शोषण' या शब्दाची शंकराचार्यांची व्याख्या अगाध, अनाकलनीय होती. मनातल्या मनात मी त्यांना नमस्कार केला. "सप्तर्षी बोलता है शोषण, शोषण। अरे, किसी औरतका बच्चा जंगलमें पैदा होता है और किसी बंगलेवाले के घर महिना या दो महिने में अबॉर्शन होता है। अभी बोलो, जिसका अबॉर्शन हुआ, उसका शोषण किसने किया? किसीको जनमसेही टी. बी. की बिमारी होती है, उसका शोषण किसने किया ? किसको लॉटरी लगती नहीं, उसका शोषण किसने किया ? कोई जनमसे अशक्त होता है। उसका शोषण किसने किया ? कोई जादा उमर तक जिंदा रहेगा, तो जादा खाएगा, जादा पियेगा, जादा कपड़े पहनेगा। तो क्या वो जनताका शोषण नहीं करता? देखो, देखो, कुछ देखना सीखो. मार्क्सवादसे अंध हुए लोगों।" पुन्हा माझ्याकडे पाहून "तुमने तो सिर्फ मार्क्स डार्विन पढा है। हमने तो मार्क्स डार्विन और मनुःस्मृति पढी है।"

शंकराचार्य पावणेदोन तास बोलतील याची कल्पना नसल्याने दर पाच मिनिटांनी मला वाटायचे, आता बोलण्याची आपली पाळी. मला घशाचा जरा त्रास असल्याने बोलण्यापूर्वी मी थोडे पाणी पितो. आपल्याला बोलायचे आहे असे समजून दोन-तीन वेळा मी पाणी प्यायलो. शंकराचार्य माझ्याकडे बोट करून, विकट हास्य करीत म्हणाले, "पिओ पिओ, और पानी पिओ, देखो एक घंटे के अंदर से चार बार पानी पिए. मैने तो एक बूंद भी जल प्राशन नहीं किया. ये क्या मुझे हरा सकते ?" अशा असंख्य गमती. सगळ्या देणे केवळ अशक्य आहे.

पावणेनऊला शंकराचार्य थांबले. प्रवचन संपण्याचे वेळी होतात त्या धार्मिक घोषणा दिल्या. म्हणजे त्यांना सर्व संपवायचे होते. महाराज फार युक्तीबाज आहेत. अगदी राजकीय पुढाऱ्याप्रमाणे सावरकर, शामप्रसाद मुकर्जी यांची नावे घेतली. महाराष्ट्राच्या भूमीचे, संतांचे डोळ्यांत पाणी आणून गोडवे गाईले.

प्रवचन संपल्याबरोबर त्यांनी, सप्तर्षीनी माफी मागावी, असा प्रश्न उपस्थित केला. मी म्हटले, "महाराज हमने जूते नही फेके, आप हमपर झूठे इल्जाम लगा रहे हो." तर म्हणाले, "माझे जेवढे विरोधक आहेत तेवढे सर्व जबाबदार आहेत. काँग्रेस, समाजवादी, शे. का. प. और युक्रांद!" नंतर मी वृत्तपत्रवाल्यांना सांगितले, "जर चातुर्वर्ण्यचा विरोधक आहे म्हणून जोडे मारण्यास मी कारणीभूत आहे, तर शंकराचार्य म. गांधींचे कट्टर विरोधक होते. मग त्या न्यायाने ते म. गांधींच्या खुनाला कारण आहेत असे म्हणता येईल." शंकराचार्यांना माझ्याकडून माफीच हवी होती, आणि ती दिल्याशिवाय ते जर वाद घालावयास तयार नव्हते तर त्यांनी हा प्रश्न सभा सुरू होण्यापूर्वीच उपस्थित करायचा. आम्ही शांतपणे सभा सोडून गेलो असतो. स्वतःचे बोलून झाल्यानंतर शंकराचार्यांनी भक्तगणांना चक्क चिथावणी दिली. "जनतेने परवानगी दिली तर कुमार सप्तर्षीनी बोलावे." या चिथावणीनंतर 'आधी माफी मागा'चा गदारोळ उठला. मी सांगितले, कालच्या प्रकाराबद्दल आमचे विश्लेषण सांगणारे निवेदन करतो. पण माझ्या हातातला माईक चालकांनी हिसकावून घेतला. जणू सगळी पात्रे ठरल्याप्रमाणे वागत होती. माझ्याभोवती दोन असि. पोलीस कमिशनर होते. सभागृहात माझे रक्षण करण्याची युक्रांद, सेवा दलाची संघटनात्मक कुवत निश्चितच होती. सगळे एका कोपऱ्यात परिस्थितीवर नजर ठेवत होते. अन् सर्वांत महत्त्वाचा मार्ग म्हणजे मी स्वतःला ब्राह्मण म्हणवीत नसलो तरी शंकराचार्य, गाडगीळ, काका वडके व त्यांचे प्रत्येकाचे भक्तगण मनुस्मृती मानणारे होते. मग मनुस्मृतीच्या आज्ञा मानणारे एका ब्राह्मणाला कसा हात लावतील? मनुस्मृतीच्या आज्ञेनुसार ते माझ्या अंगावर हात टाकू शकत नव्हते. मला मारले की, आम्ही म्हणू शकलो असतो, 'यांनी मनुस्मृती तुडवली, जाळली !'

मी निर्विकार चेहऱ्याने उभा असताना शंकराचार्य उठले. माझ्यासमोर येऊन पोज घेऊन उभे राहिले! खाणाखुणा झाल्या. भराभर फोटो झाले. तोपर्यंत स्पीकरवरून पं. वसंत गाडगीळांची कॉमेंट्री चालू होती, "लोक हो, शांत व्हा. आपण श्रीशिवाय कोणाचेही ऐकायचे नाही. सर्व जण श्रींकडे पहा. ते आपल्या छातीचा कोट करून कुमार सप्तर्षीला वाचवीत आहे. (निःशब्द शांततेत जनता पाहत होती. एवढ्या शांततेत श्री कोणापासून माझे रक्षण करत होते कोणास ठाऊक!) लोक हो. आपण घरी जा व श्रींची सुटका करा. श्रींनी अद्यापि स्नान, संध्या केली नाही. त्यांची तपश्चर्या राहिली आहे. त्यांनी अद्यापि आचमनही केले नाही. त्यांना मोकळे करण्यासाठी घरी जा." पं. गाडगीळ, काका बडके, श्री बोलू लागले की, एकदम शांतता पसरे. शांतता झाल्यावरसुद्धा सभा चालू करण्याबद्दल कोणी बोलत नव्हते.

फोटोचा कार्यक्रम उरकताक्षणीच माझ्या जिवाचे संरक्षण करण्याचे सोडून श्री माईकवर गेले. "सप्तर्षी माफी नहीं मांगते तो नहीं मांगने दो. उनकी आत्मा के आंतरिक शुद्धिके लिये मैं उनकी ओरसे माफी मांगता हूँ।" पुन्हा धीर गंभीर शांतता! शांतता झाली की वादसभा पुढे चालू होईल ही भीती निर्माण व्हायची. शांतता पाहून श्री बोलले, "आप लोग उत्तेजित हुये है। इसलिये घर जाईये और मेरे प्रति अधिकाधिक श्रद्धा रखिये।"

माफीचा आग्रह धरणारा माणूस उदार अंतःकरणाने दुसऱ्याची माफी स्वतः मागतो. हे आश्चर्यजनक होते. त्याचे खरे म्हणणे असे कुमार सप्तर्षीच्या वतीने मी माझी माफी मागतो. कसेही करून कुमार सप्तर्षीवर माफी लादायची व अप्रत्यक्षपणे जोडा फेकण्याची जबाबदारी टाकायची हा डाव. मी नंतर म्हणालो, "मी आता जनतेपुढे जाऊन म्हणतो, 'शंकराचार्यांनी एका व्यक्तीचा खून केला आहे, पण काय करावे बुवा, ते कबूल करीत नाहीत. त्यांचे म्हणणे की, मी खून केलाच नाही! ते कबूल नको करू देत. मी मोठ्या उदार अंतःकरणाने त्यांच्या वतीने जनतेपुढे जाहीररीत्या कबूल करतो की, शंकराचार्य महाराजांनी खून केला आहे!"

एकूण काय? पोकळ विचार आक्रमक रितीने कोठपर्यंत सांगता येतात? जोपर्यंत अंधश्रद्धाळू, बौद्धिकदृष्ट्या पंगू असलेली अडाणी भक्त जनता समोर आहे तोपर्यंत ! पोकळ विचारांना तर्काने आव्हान दिले, तर सर्व फोलपणा उघड होतो. विज्ञानाचे आव्हान स्वीकारण्याची कुवत अंधश्रद्धाळू विचारसरणीत नसते. ग्रंथप्रामाण्य बुद्धिप्रामाण्यासमोर टिकू शकत नाही. पोकळ विचारांच्या वाहकांना 'माझ्यावर श्रद्धा ठेवा हो' असा आक्रोश करण्याची पाळी येते.

पण पुरोगामी शक्तींनी केवळ वैचारिक आव्हानावर थांबता कामा नये. आपल्या विचारामागे जनसंघटनेची ताकद उभी करण्याकडे किचिंतही दुर्लक्ष करता कामा नये. नाहीतर, भांडवलशाही प्रतिगामी धर्मवादी हातांत हात घालून आपल्या झुंडी पुरोगामी विचारांच्या लोकांवर घालतील. याचेच नाव असते फॅसिझम ! म्हणून श्रमिकांच्या, दलितांच्या कणखर संघटना करणे व त्यांच्या क्रांतिकारक जाणिवा तीव्र बनविणे हेच खरे शंकराचार्यांना आणि त्यांच्या अन्य दोस्तांना उत्तर होय.

साधना 31 मार्च 1973

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कुमार सप्तर्षी ( 18 लेख )
mgsnidhi@gmail.com

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, युवक क्रांती दलाचे संस्थापक व राजकीय लेखक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके