शालेय शिक्षणव्यवस्थेत 50 वर्षे आपल्या योगदानाचा ठसा उमटवणारे मेजर थॉमस कँडी यांनी आपल्या पदाची कामे करता करता मराठी ग्रंथव्यवहारात जे अनन्यसाधारण कार्य केले आहे, त्याची वरवरची जरी जंत्री करायची म्हटली तरी ती खूप मोठी होईल. आपण त्यातील काही प्रमुख बाबीच पाहणार आहोत. त्यांचे वैशिष्ट्य आणि त्यांचा मोठा गुण म्हणजे ते कमालीचे सोशीक, शांत होते आणि ते कुणाचाच अनादर करीत नसत. त्यांच्या कामाचा भाग म्हणून ते दुसऱ्याला अप्रिय वाटणारी मते (अनुकूल-प्रतिकूल) सरकारला कळवत असत. त्यातूनच त्या काळात कँडी यांच्याविरुद्ध मराठीतील काही विद्वान मंडळींचे जाहीर वाद झाले.
इंग्रज राजवट भारतात स्थिरावल्यानंतर (1818), जरी ईस्ट इंडिया कंपनीकडे 1857 पर्यंत कारभार होता तरीही, आणि त्यानंतरही इंग्रजी सत्तेने भारतात ब्रिटिशांना अनुकूल असणाऱ्या ज्या ज्या सुधारणा केल्या, त्याचे बरे आणि वाईट दोन्ही परिणाम भारतावर व भारतीय समाजमनावर पडले यात शंका नाही. या सुधारणांमध्ये विविध भारतीय भाषांसाठी मुद्रणकला वापरणे, शिक्षणव्यवस्था एका सूत्रात बांधणे, दळणवळण, टपालसेवा, न्याय व पोलीस यंत्रणा अमलात आणणे इत्यादी बाबी ठळकपणे सांगता येतील. 1857 च्या बंडाचा धसका घेऊन धार्मिक सुधारणांबाबत मात्र सरकारचे धोरण नेहमीच नमते राहिले. अर्थात, अशा सुधारणा घडवून आणण्यासाठी इंग्लंड देशातून अनेक जाणकार शिकलेले तरुण भारतात धाडण्यात आले. असे तरुण तत्पूर्वी 'मिशनरीज' म्हणूनही इंग्लंड, अमेरिका, पोर्तुगाल इत्यादी देशांतून धार्मिक प्रचारार्थ येत असत. त्यांतून आलेला विल्यम कॅरे नावाचा हरहुन्नरी माणूस भारताला मुद्रणकलेची देणगी देऊन गेला. कॅरीपूर्वी विल्किन्सनेही मुद्रणाचा प्रयोग यशस्वी केला होता; पण दुर्दैवाने त्याच्या मुद्रणशाळेला आग लागून त्याचे बहुतांश काम जळून गेले होते. विल्किन्सपूर्वीही गोव्यात रोमन लिपीत मराठी वाङ्गय छापण्याची कला मिशनरीज लोकांनी प्रत्यक्षात आणली होती; मात्र कॅरीने प्रथमच देवनागरी लिपीत मराठी पुस्तके छापायला प्रारंभ कलकत्ता येथील श्रीरामपूर येथे केला होता (1805). प्रथम मोडी आणि मोडी लिपीला शास्त्रीमंडळींनी विरोध केल्यावर देवनागरी लिपीत मुद्रणे होऊ लागली. धार्मिक विचारांचा प्रसार आणि नवी शिक्षणपद्धती यांच्या इतिहासात मुद्रणकला व मुद्रणकलेने केलेला विकास अत्यंत मोलाचे कार्य बजावताना दिसतो. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा तर धार्मिक ग्रंथांच्या-विचारांच्या पुस्तिका, पुस्तके आणि नियतकालिके हवीत, तसेच नवी शिक्षणपद्धती जर रुजवायची असेल तर नक्कीच विद्यार्थिवर्गाला वाचनसाहित्य हवे. या दोन गरजांतून भारतातील ग्रंथनिर्मितीचा प्रारंभीचा व्यवहार विकसित झालेला दिसून येतो. भारतात जे जे तरुण इंग्लंडमधून आले त्यांत लष्करसेवा, सनदी सेवा आणि शिक्षणसेवेसाठी प्रामुख्याने तरुण आले. गरजेनुसार त्यांच्या सेवा विविध विभागांनी उपयोगात आणल्या. भारतीय भाषांचे ज्ञान अशा परदेशी तरुणांना देण्यासाठी खास शिक्षणव्यवस्था भारतात उभारण्यात आली. त्यात त्यांना प्रशिक्षण देऊन, रीतसर परीक्षा घेऊन, त्या त्या व्यक्तीने आपापली वाटचाल सरकारी धोरणांच्या संपूर्णतया अधीन राहून केली. अशा अनेकानेक तरुण अभ्यासकांपैकी जेम्स मोल्सवर्थ आणि जुळे असणारे कँडी बंधू होते, ज्यांनी मराठी भाषा, मराठी वाङ्गय यांची अपूर्व सेवा केली.
'दर्पण'पूर्व स्थिती
1832 मध्ये मराठीतले पहिले नियतकालिक जन्माला आले असे मानले जाते. बाळशास्त्री जांभेकर हे आपल्या शिक्षित वर्गाचे आद्य गुरू! त्यांनी दादोबा पांडुरंगांपासून अनेक जणांची मुंबई प्रांतात नवी पिढी घडवली. अर्थात, मदतीला इंग्रज तज्ज्ञ अधिकारीही होतेच.
1832 पूर्व कलकत्त्यात मुंबईपासून दूर श्रीरामपूर येथे 1805 पासून मराठी ग्रंथ छापायला प्रारंभ झाला होता. मोल्सवर्थ यांचा 'मराठी-इंग्रजी शब्दकोश' जन्माला येण्यापूर्वी काही छोटेमोठे शब्दकोशही आले होते. काही व्याकरणाची पुस्तकेही आली होती. सिंहासन बत्तीशी, इसापनीतीसारखी पुस्तकेही आली होती, परंतु, 1831 मध्ये प्रकाशित झालेला मोल्सवर्थ यांचा मराठी-इंग्रजी शब्दकोश हा मराठी भाषिक वाङ्गयीन इतिहासातला मैलाचा दगड आहे आणि त्यातून मराठी भाषेचा व्यवहार विशिष्टार्थाने प्रमाणित होऊ लागला. अर्थात, या प्रचंड मोठ्या कोशकार्यामध्ये भारतीय शास्त्रीमंडळींचा सिहाचा वाटा होता. हा शब्दकोश पूर्ण झाल्याझाल्याच मोल्सवर्थ यांनी इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे कार्य सुरू केले. 1831 ते 1835 पर्यंत अथक परिश्रमानंतर कोशाचे काही काम पूर्ण झाल्यावर मोल्सवर्थ आजारी पडले आणि मायदेशी परतले. मराठी-इंग्रजी शब्दकोशाच्या कार्यात मोल्सवर्थ यांना महत्त्वपूर्ण सहकार्य करणारे कँडी बंधूंपैकी थॉमस कँडी यांच्यावर इंग्रजी-मराठी शब्दकोशाची जबाबदारी टाकण्यात आली (1840) आणि त्यांनी ती 1847 मध्ये पूर्ण केली. या दोन्ही कोशांची दुसरी आवृत्तीही पुढे प्रकाशित झाली. पैकी मराठी-इंग्रजी कोशाची दुसरी आवृत्ती 1857 मध्ये प्रकाशित झाली व ते कार्यही मोल्सवर्थ यांनीच पूर्ण केले. इंग्रजी-मराठी शब्दकोशाची दुसरी आवृत्ती 1873 मध्ये प्रकाशित झाली आणि त्याचे कार्यही थॉमस कँडी यांनीच पूर्ण केले.
'दर्पण' पूर्व ज्या दोन कोशांचे कार्य ज्या तीन परदेशी अभ्यासकांनी अंगावर घेतले व तडीस नेले, ते मोल्सवर्थ आणि कँडी बंधू यांनी शब्दकोशाच्या निमित्ताने मराठी भाषा, तिचे व्याकरण, उच्चार, लेखनपद्धती, शुद्ध रूप-रूपे, अर्थ, अनेकार्थ, इत्यादींचा किती बारकाईने अभ्यास कोशनिर्मितीसाठी केला असणार, याची आपण कल्पना करू शकतो. यापैकी थॉमस कँडी याने त्याच्यावर टाकण्यात आलेल्या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अथकपणे मराठी भाषेची सेवा 50 वर्षे निष्ठेने केली. त्याचे फलित पुढच्या पिढीने सहज उपयोगात आणले.
थॉमस कँडीचे कार्य आणि पिंगे-कुलकर्णी यांचे संशोधन
थॉमस कँडी यांचा जीवनपट पाहण्यापूर्वी काही बाबी नमूद करायला हव्यात. मोल्सवर्थ, थॉमस कँडी, इतर युरोपिअन अभ्यासकांनी केलेली मराठी भाषावाङ्गयाची सेवा, 19व्या शतकातील ग्रंथनिर्मिती व तिची वाटचाल, मराठी भाषेच्या व्याकरणाची व्यवस्था व त्यावर झालेली साधक-बाधक चर्चा, वाद, प्रतिवाद, शालेय अभ्यासक्रमांची वाटचाल आणि शालेय वाचन अभ्याससाहित्य यांचे अत्यंत खोलात जाऊन संशोधन, अध्ययन केलेले तीन विद्वान अभ्यासक, प्रा. प्रियोळकर, डॉ. श्री. म. पिंगे आणि डॉ. कृ. भि. कुलकर्णी यांच्या पुस्तकलेखनाचा अभ्यास करूनच हे भाष्य करता येणे शक्य झाले आहे. यात आणखी एका भाषांतरकाराची भर पडलेली आहे. ते म्हणजे श्री. अरुण नेरुरकर. 'शब्दप्रभू मोल्सवर्थ' या पुस्तकानंतर ते आता थॉमस कँडीच्या लेखनाच्या भाषांतराकडे वळलेले आहेत. मी या चार अभ्यासकांचा ऋणी आहे.
विशेषतः, डॉ. पिंगे आणि डॉ. कुलकर्णी यांनी सरकारी दफ्तरखान्यातून इतकी कागदपत्रे तपासली आहेत, ते पाहून थक्क व्हायला होते आणि त्यातून त्यांनी उद्धृत केलेला मजकूर इतका मोठा आहे की, मूळ कागदपत्रांत त्याव्यतिरिक्त असलेला मजकूर किती असेल यांचा अंदाज लागतो. मोल्सवर्थ काय, कँडी काय, किवा इतर युरोपिअन लेखक अभ्यासक काय; यांच्याविषयीची माहिती एकत्रित मिळण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे पिंगे-कुलकर्णी यांचे ग्रंथ आहेत. मीही अर्थात त्यांच्याच संशोधनाच्या आधारावर कँडीविषयी काही सांगू शकेन. कुलकर्णी-पिंगे यांच्या माहितीत अत्यंत भिन्नता आहेच; तसेच दोघांचे संशोधन एकत्रित वाचल्याशिवाय कँडी यांच्या कार्याची पूर्णतः ओळख होणे शक्य नाही. विशेषतः कँडी यांनी बजावलेल्या वेगवेगळ्या भूमिका व पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, त्यातून उभे केलेले मराठी भाषेचे विशाल कार्य यांचे चित्र उभे करायला कुलकर्णी यांच्या पुस्तकात अनेक वेगवेगळ्या पानांवर विखुरलेला मजकूर गोळा करावा लागतो, त्यांची संगती लावावी लागते. इथे पिंगे कुलकर्णी यांच्या माहितीची सांगड घालत आणि कुलकर्णी यांच्या पुस्तकभर विखुरलेल्या माहितीचे तपशील गोळा करीत, हा आढावा मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मी जुळारी आहे, मूळ श्रेय प्रियोळकर, पिंगे, कुलकर्णी आणि नेरुरकर यांनाच आहे.
थॉमस कँडीचा जीवनपट
13 डिसेंबर 1804 रोजी थॉमस आणि जॉर्ज कँडी या जुळ्या भावांचा जन्म झाला. 1820 मध्ये दोघेही भाऊ दहाव्या नेटिव्ह इंन्फ्रंटीत दुसऱ्या बटालिअनमध्ये भारतात आले. भारतीय भाषांचा, विशेषतः मराठी-हिंदीचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर 1823 मध्ये 'दुभाषी' व 'क्वार्टरमास्टर' म्हणून त्यांची नेमणूक झाली. थॉमस कँडीच्या आधीच मोल्सवर्थ भारतात आले होते, त्यामुळे त्यांची भेट व पुढे परिचयही वाढत गेला.
1822 मध्ये मोल्सवर्थ सोलापुरात कार्यरत होते. तिथे मोल्सवर्थ यांनी थॉमस कँडीच्या मदतीने भाषांतरासाठी उपयुक्त ठरावी म्हणून एक छोटेखानी शब्दावली तयार केली होती. त्यातूनच मोल्सवर्थ यांना मराठी-इंग्रजी आणि इंग्रजी-मराठी शब्दकोशाची कल्पना सुचली. 1824 मध्ये ती योजना मोल्सवर्थ यांनी सरकारला कळवली. ती मान्यही झाली. त्यांनी ते काम सुरू केले. मात्र, त्या वेळी त्यांची बदली गुजरात प्रांतातल्या खेडा भागात झाली होती. शब्दकोशाचे काम त्यांना तिथे राहून करता येत नाही म्हणून त्यांनी आपली बदली मुंबईस व्हावी असे सरकारला कळवले.
ती विनंती थोड्या विलंबाने का होईना, 4 मे 1825 रोजी मान्य झाली. मोल्सवर्थ मुंबईत आले; परंतु मुंबईची हवा त्यांना मानवेना, ते आजारी पडू लागले. शब्दकोशाचे काम मनासारखे होईना म्हणून त्यांना निराशा व हताशा आली. त्यांनी सरकारला विनंती केली की, कोशकार्यासाठी मला कँडी बंधूंची मदत मिळावी. मोल्सवर्थ यांची विनंती मान्य होऊन 1826मध्ये कँडी बंधू कोश-कार्यालयात आले आणि कोशकार्याला गती आली. 10 महिने झाल्यावर सरकारने पुन्हा कँडी बंधूंना त्यांच्या मूळ कचेरीत परतण्याचा आदेश दिला (22 फेब्रु. 1827). मोल्सवर्थ पुन्हा एकाकी पडले. त्यांची तब्येत पुन्हा बिघडली म्हणून त्यांनी सरकारला विनंती करून आपले कोशकार्य बाणकोटला हलवले. 1828 मध्ये थॉमस कँडी लष्करातून निवृत्त होऊन मायदेशी परतणार असल्याचा सुगावा मोल्सवर्थ यांना लागला. त्यांनी थॉमस कँडी यांना 'कोशकार्यासाठी याल का?' म्हणून विचारले. ते तयार आहेत हे पाहून त्यांनी पुन्हा सरकारची संमती विचारली. संमती मिळताच थॉमस कँडी आले (21 जाने. 1828). त्यांनी कोशाच्या कामास पुन्हा सुरुवात केली; परंतु तेच आजारी पडले व त्यांनी मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला व ते परतही गेले. त्यांच्या जागी जॉर्ज कँडी आले (3 फेब्रु. 1829) आणि 1829 ते 1831 या काळात कोणत्याही अडचणी/अडथळ्यांच्या विना मोल्सवर्थ यांच्या कोशकार्याचे काम पूर्ण होऊन, 1831 मध्ये मराठी-इंग्रजी कोश प्रकाशित झाला. हे कार्य हातावेगळे होताच मोल्सवर्थ यांनी इंग्रजी-मराठी कोशाचे कार्य हाती घेतले. त्याच काळात थॉमस कँडी भारतात परत आले होते. मोल्सवर्थ यांच्या इंग्रजी मराठी शब्दकोशकार्यात ते सहभागी झाले. 1831 ते 1835 या काळात थॉमस कँडी यांनी मोल्सवर्थ यांना सहकार्य केले; मात्र मोल्सवर्थच आजारी पडले आणि ते इंग्लंडला परतले.
1837 मध्ये थॉमस कँडी यांची पुणे पाठशाळेत मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. शाळा तपासण्याचेही कार्य त्यांच्यावर सोपवण्यात आले. शाळेची जबाबदारी आल्याने शालेय ग्रंथांची तपासणी, निर्मिती, आखणी इत्यादी कामेही त्यांना करावी लागत. हे कार्य करीत असतानाच त्यांच्यावर 1840 मध्ये इंग्रजी-मराठी शब्दकोशाच्या संपादनाची जबाबदारी टाकण्यात आली. ती त्यांनी 1840 ते 1847 पर्यंत नेटाने निभावली आणि कँडीकृत इंग्रजी-मराठी शब्दकोश 1847 मध्ये प्रकाशित झाला. अशा विविध भूमिकांतून काम करीत (शाळा तपासणीचे कार्य मात्र कोशकार्यामुळे कमी करण्यात आले होते) असल्याने ताण येत होता म्हणूनही आणि मूळ कामाकडे दुर्लक्ष होऊन काहीशी पुणे पाठशाळेत अव्यवस्था निर्माण झाल्याने, सरकारची चौकशीही होऊन, त्यांना केवळ मराठी ट्रान्स्लेटर व रेफरी या पदाचेच काम देण्यात आले. सरकारने त्यांची पगार कपात केली. 600 रुपयांवरून त्यांना 267 रुपयांवर आणले. कँडी यांना हा आघातही सहन करावा लागला. त्यांनी तो सहनही केला. अर्ज-विनंत्या करीत राहिले. आपली बाजू मांडत राहिले. 1856मध्ये ते आजारी पडले. त्यामुळे ते इंग्लंडला जाऊन 1857 मध्ये परतले. 1857 चे बंड पाहून त्यांनी सरकारला काहीही त्रास दिला नाही. आर्थिक हलाखी सोसत राहिले. पुढे 1863 मध्ये त्यांना Classifier of records म्हणून नेमणूक देऊन दरमहा रु.300/-द्यायचे सरकारने ठरविले. 1865 मध्ये सरकारने त्यांना क्रमिक पुस्तकांच्या रचनाकार्यासाठी तीन हजार रुपये मानधन दिले. हे सर्व पुढे घडले; परंतु 18 ऑक्टो. 1849 रोजी 'मराठी ट्रान्स्लेटर व रेफरी' म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि त्यांच्या आयुष्यातला हा तिसरा महत्त्वाचा टपा सुरू झाला.
1840 ते 1847 कोशरचना, 1837 ते 1849 पुणे पाठशाळेचे मुख्याधिपती, 1849 ते 1876 पर्यंत त्यांनी मराठी ट्रान्स्लेटर या पदावर कार्य केले आणि शालेय मराठी ग्रंथांची निर्मिती, रचना, भाषाशुद्धी, भाषांतरे, संपादने, पुस्तकांची तपासणी, पुस्तकांची परीक्षणे करून सरकारला त्यांची शिफारस करणे, पुस्तके मंजूर-नामंजूर करणे अशी अनंत कामे त्यांनी केली. त्यातून मराठी भाषेला व्याकरणशुद्ध लेखनपद्धती बहाल करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. आपल्या सुधारणांवर, मतांवर ते ठामही राहिले. त्यातून मुंबई प्रांतात सार्वजनिकरीत्या वादंगही झाले. शालेय क्रमिक पुस्तकांची सुधारणा समिती (1873) साठी महत्त्वाचे योगदान दिले आणि पहिल्या क्रमिक पुस्तकाचे (1854) तर ते निर्मातेच होते. या सर्व व्यापातून त्यांनी 1873 मध्ये इंग्रजी-मराठी शब्दकोशाची दुसरी सुधारित आवृत्ती पूर्ण केली. 21 ऑगस्ट 1876 रोजी दृष्टिदोषामुळे त्यांनी 'मराठी ट्रान्स्लेटर' या पदाचा राजीनामा दिला. 26 फेब्रुवारी 1877 रोजी महाबळेश्वर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शालेय शिक्षणव्यवस्थेत 50 वर्षे आपल्या योगदानाचा ठसा उमटवणारे मेजर थॉमस कँडी यांनी आपल्या पदाची कामे करता करता मराठी ग्रंथव्यवहारात जे अनन्यसाधारण कार्य केले आहे त्याची वरवरची जरी जंत्री करायची म्हटली तरी ती खूप मोठी होईल. आपण त्यातील काही प्रमुख बाबीच पाहणार आहोत. त्यांचे वैशिष्ट्य आणि त्यांचा मोठा गुण म्हणजे ते कमालीचे सोशीक, शांत होते आणि ते कुणाचाच अनादर करीत नसत. त्यांच्या कामाचा भाग म्हणून ते दुसऱ्याला अप्रिय वाटणारी मते (अनुकूल-प्रतिकूल) सरकारला कळवत असत. त्यातूनच त्या काळात कँडी यांच्याविरुद्ध मराठीतील काही विद्वानमंडळींचे जाहीर वाद झाले. तो वाद-विवाद कृ. भि. कुलकर्णी यांच्या पुस्तकात इंग्रजीत आपण वाचू शकतो. दुसरा त्यांचा महत्त्वाचा सगुण म्हणजे ते स्वतः धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी त्या विषयावर काही पुस्तकेही लिहिली होती; मात्र शालेय पुस्तकांत कुठेही धार्मिकतेचे दर्शन घडेल असे लेखन त्यांनी कदापि येऊ दिले नाही. त्या बाबतीत ते कमालीचे दक्ष होते.
शालेय शिक्षणातील योगदान
पुणे पाठशाळेचे मुख्याधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी तिथे अनेक सुधारणा घडवून आणल्या; परंतु तेथील त्यांचे लक्षवेधी जर कोणते कार्य असेल तर ते म्हणजे, त्यांनी भाषांतर वर्ग सुरू केले. चांगले भाषांतरकार निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी हे वर्ग सुरू केले. त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांच्या परीक्षा घेतल्या. त्यांच्यासाठी भाषांतर कसे करावे, असावे याविषयीची एक नियमावली तयार केली. त्या परीक्षेत पहिले आलेले कृष्णशास्त्री चिपळूणकर व काही इतर विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भाषांतरित करून घेतलेले धडे पुढे क्रमिक पुस्तकांमध्ये (वाचनपाठमाला) समाविष्ट केले. त्यांनी तयार केलेली भाषांतराची नामावली आज वाचताना अगदीच प्राथमिक स्वरूपाची वाटत असली तरी, त्या काळी ती मार्गदर्शक ठरली होती यात वाद नसेल.
कँडीपूर्व शालेय अभ्यासक्रमात त्या काळी निर्माण झालेली पुस्तकेच विद्यार्थ्यांना अभ्यासावी लागत. सिहासन बत्तीशी, इसापनीती इत्यादी पुस्तके कँडी यांनी बाद केली आणि नवी योजना आखली. नवी संपादित, भाषांतरित पुस्तके निर्माण केली. वाचन पाठमाला (व्हर्नाक्युलर रीडर नं.1) 1850, दुसरी आवृत्ती 1855 आणि शाळेतील मुलांकरिता पुस्तके 'एक ते सहा' या पुस्तकांचे काम त्यांनी स्वतः केले व ते 1858 ते 1861 पर्यंत सुरू होते. इंग्रजी-मराठी कोशाची शालेय आवृत्ती त्यांचे सहकरी श्रीकृष्ण तळेकर यांच्याकडून 1861 मध्ये करवून घेतली. भूगोलविषयक दोन खंड स्वतः तयार केले. भाग पहिला, यात आशिया खंडाची माहिती होती. हा भाग 1863मध्ये प्रसिद्ध केला. 1865 मध्ये दुसरा भाग तयार केला, ज्यात युरोप, आफ्रिका व अमेरिका खंडांची माहिती आहे.
ग्रंथसंपादक म्हणून त्यांनी काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या सरकारी धोरणानुसार तयार करून घेतल्या. त्यात सदाशिव काशीनाथ छत्रे यांचे 'बालमित्र' भाग 1 व भाग 2 येते. 1828ची ही पुस्तके नव्या रूपात 1854 आणि 1857 मध्ये त्यांनी तयार करून घेतली. तसेच बाळशास्त्री जांभेकरांचे 'हिदुस्थानचा इतिहास', 'हिदुस्थानातील इंग्लिशांच्या राज्याचा इतिहास', छत्रे यांची 'इसापनीति कथा' अशी काही इतरही उदाहरणे आहेत. तपशील खूप मोठा आहे; मात्र यावरून त्यांच्या कार्याचे ओझरते दर्शन घडू शकते.
'मराठी ट्रान्स्लेटर' म्हणून कँडी यांचे भरीव कार्य
ब्रिटिशकालीन मुंबई प्रांतातील शिक्षणपद्धती व व्यवस्थेचा इतिहास मोठा आहे. मुंबईची हेंदशाळा-शाळापुस्तक मंडळी, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुढे 1840 ते 1855 या काळातील बोर्ड ऑफ एज्युकेशनपुढे तेही बंद करून 1855 पासून डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन (D.P.I.) कडे शिक्षणव्यवस्थेचा अधिकार आला. 1837 पासून थॉमस कँडी यांचा या विभागांशी संबंध आला. आपले अहवाल (रिपोर्ट्स), पत्रव्यवहार, मते, परवानग्या, आज्ञा व आदेश मिळण्याचे ठिकाण कँडीसाठी या विभागांच्या कचेऱ्या होत्या. शिक्षण विभागाकडून आलेल्या आदेशांची अंमलबजावणी थॉमस कँडी यांना करावी लागत असे. त्याचबरोबर अनुदान, ग्रंथखरेदीच्या संमती-परवानग्या देण्याचे अधिकारही याच शिक्षण विभागाकडे होते. शाळेसाठी लागणारी पुस्तके लिहून घेणे, वा खरेदी करणे वा अनुदान संमत करणे यांसाठी ती पुस्तके प्रकाशनपूर्व शिक्षण विभागाकडे दाखल होत आणि विभाग ती ती पुस्तके तज्ज्ञ म्हणून थॉमस कँडीकडे पाठवीत असे. त्या काळातले एकही मराठी पुस्तक, मग ते स्वतंत्र असो वा भाषांतरित, ते कँडींच्या नजरेखालून गेले नाही असे झाले नाही. कँडींच्या निर्णयावर लेखकांच्या पुस्तकांचे भवितव्य अवलंबून असे.
कँडींनी त्या काळात केलेल्या मराठी पुस्तकांच्या परीक्षणांचे भरपूर दाखले डॉ. पिंगे आणि डॉ. कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात दिले आहेत. शालेय पुस्तके, भाषांतरित पुस्तके, व्याकरण-कोशादी ग्रंथ इतकेच नव्हे, तर कादंबरी-नाटकांसारखी पुस्तकेही कँडीच्या नजरेखालून गेली आहेत.
लेखकांनी वापरलेले शब्द, त्यांचे शुद्धलेखन, वाक्यरचना, व्याक्य शब्दांचे व्याकरण, योग्य-अयोग्य केलेली भाषांतरे, एकूण ग्रंथविषयाची समज, लेखनपद्धती, अशा असंख्य बारकाव्यांनी भरलेली ही सर्व परीक्षणे दिसून येतात. कँडी यांनी सुचवलेल्या सुधारणा, दुरुस्त्या, बदल ज्या ज्या लेखकांनी स्वीकारले त्यांची सुधारित पुस्तके संमत झाली. काही पुस्तके प्रथम वाचनातच 'नाकारावीत' अशा शिफारशींसह सरकारकडे कँडी यांनी पाठवली. काही प्रथम वाचनातच स्वीकारलीही गेली; पण असे अपवाद अल्पच. कँडीकृत शिफारस केलेल्या पुस्तकांचा प्रकाशन प्रवासही डॉ. पिंगे यांनी अत्यंत बारकाईने शोधला आहे. दोलामुद्रितांची सूची, दाते यांची मराठी ग्रंथसूची, काही प्रमुख ग्रंथालयांचे कॅटलॉग तपासून पुस्तके पुढे केव्हा प्रसिद्ध झाली, यांचा घेतलेला शोध थक्क करणारा आहे. यातली काही पुस्तके प्रकाशितही न झालेली दिसतात. ह्या हस्तलिखितांचे पुढे काय झाले असेल ?
कँडीकृत परीक्षणे जर सरकारी दफ्तरखान्यातून कुणी संशोधकाने गोळा केली तर 1837 ते 1876 या काळातील मराठी ग्रंथव्यवहार तर समोर येईलच; परंतु त्या काळातील भाषिक वाङ्गयीन लेखनव्यवहाराचा मोठाच दस्तऐवज जमा होईल. पिंगे-कुलकर्णीकृत कँडी यांचा काळ वाचत असताना असे जाणवते की, थॉमस कँडी हे मराठी भाषेचे आद्य भाषिक-ग्रंथ-संपादक होते. प्रकाशनपूर्व ग्रंथांचे परीक्षणकर्ते होते, ते महत्त्वाचे परिष्करणकर्ते होते असेच मानायला हवे.
मराठी कादंबरी, नाटक, नियतकालिकांपासून इतिहासाच्या पुस्तकांमधील भाषाही कशी असावी याबाबत ते आग्रही होते. लेखनपद्धती, शुद्धलेखन, व्याकरण, वाक्यशैली, इत्यादींवर त्यांचा कटाक्ष तर असेच; परंतु तो ठामही असे, त्यामुळे त्या काळात कोंकणी लेखकांच्या शैलीसह देशी (विशेषतः पुणे-साताऱ्याकडील) बोली भाषांचाही लेखनपद्धतीत त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे रूढीनुसार वापरात असणाऱ्या बोलण्या-लिहिण्याच्या पद्धतीत बरेच बदल, विशेषतः कोकणस्थ ब्राह्मण लेखकांना (आणि त्यांच्याभोवती व सहकार्य करणाऱ्यांत तीच शास्त्रीमंडळी अधिक होती) ते स्वीकारावेही लागले.
दादोबा पांडुरंग (जे मराठी व्याकरणाचे 'पाणिनी' म्हणून प्रसिद्ध होते) यांच्या व्याकरणाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने, तसेच 'प्रभाकर', (भाऊ महाजन), 'विविध ज्ञानविस्तार' अशा नियतकालिकांतून कँडी यांच्या विरुद्ध गदारोळही उठला. कँडी ठाम राहिले. प्रत्येक टीकेबाबत कुठेही जाहीर वाच्यता न करता ते सरकार दफ्तरी आपले मत, आपली बाजू नोंदवत राहिले. एक मात्र अपवाद, त्यांनी अत्यंत शांत पद्धतीने कुणाचाही अपमान न करता 'ज्ञानोदय'मध्ये आपली बाजू इंग्रजीत मांडली, तीही 'ज्ञानोदय 'कार 'प्रभाकर'मधले वाद तिथे आपल्या वाचकांना पोहोचवत असत म्हणून. डॉ. कुलकर्णी यांनी हा सर्व इंग्रजीतील वादविवाद तीन-चार परिशिष्टांमध्ये आपल्या पुस्तकात दिला आहे. तो सर्व वाचल्यानंतर असे दिसते की, कँडी यांनी निर्माण केलेली अनेक शब्दरूपे, व्याकरणिक ऊहापोह, वाक्यरचना पुढे मराठीत स्थिर झाली, स्वीकारलीही गेली, हे डॉ. कुलकर्णी यांचे मत सत्यच होते.
विरामचिन्हांची परिभाषा सांगणारे कँडी
मराठी प्राचीन गद्य आणि पद्य वाङ्गयात विरामचिन्हे दोनच होती. दंड (1) आणि विसर्ग (:). भारतातल्या शिक्षित मंडळींचा जेव्हा इंग्रजी भाषेशी संबंध निर्माण झाला तेव्हा त्यांना विरामचिन्हांचा परिचय होऊ लागला आणि त्यांनी मराठी लेखनात प्रवेश करायला प्रारंभ केला; मात्र त्यामागची कारणमीमांसा, तर्कशास्त्र लक्षात न घेतल्याने किंवा आपण इंग्रजी भाषेचेही चांगले जाणकार आहोत हे दाखवण्याच्या भरात मराठी लेखनात कुठेही आणि कसेही स्वल्पविराम शिरले. प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविराम देऊन काही मंडळींनी मराठी लेखनात उच्चांक गाठले. हे सर्व प्रकार पाहून थॉमस कँडी यांनी 1850 मध्ये 'विरामचिन्हांची परिभाषा' अशी एक छोटेखानी पुस्तिका तयार केली.
कँडी यांनी इंग्रजीतील 5 चिन्हे मराठी लेखनपद्धतीसाठी स्वीकारली. 1. स्वल्पविराम (,) 2. अर्धविराम (;) 3. पूर्णविराम (.) 4. प्रश्नचिन्ह (?) 5. उद्गारचिन्ह (!). या प्रत्येक चिन्हासाठी त्यांनी ते का व कधी, कुठे वापरायचे यामागचे तर्कशास्त्र त्या पुस्तिकेत समजावून दिलेच; पण त्याची नियमावली तयार केली. या नियमांतील स्वल्पविरामसाठी तयार केलेले 14 नियम पाहिले की वाटते, या नियमांच्या अंमलबजावणीची आणि मराठीला विरामचिन्हांचीही प्रमाणबद्धता, एकसारखेपणा येण्यासाठी आजही त्यांचे काटेकोर पालन होण्याची आवश्यकता आहे. कँडी यांचे मराठी भाषेला लाभलेले हे एक मोठेच योगदान आहे.
डॉ. कुलकर्णी यांना त्यांच्या संशोधनकाळात कँडीची ही पुस्तिका पाहायला मिळाली नसावी; मात्र पुढे प्रा. प्रियोळकरांना शंकर गणेश दाते यांच्या मदतीने पुस्तिकेचा शोध लागला आणि त्यांनी ती पुस्तिका मिळवली. 1957 मध्ये मराठी संशोधन मंडळाने ती पुनर्मुद्रित केली. डॉ. कुलकर्णी यांच्या पुस्तकात दोन दाखले वाचायला मिळतात. पैकी एक 1854 मधला. बायबलच्या मराठी अनुवादात विरामचिन्हे द्यावीत की नाही, यावर चर्चा झालेली दिसून येते आणि त्यात विद्वानांची मते चर्चा विचारात घेतली गेली होती. डॉ. कुलकर्णी दुसरा संदर्भ देतात तो इतिहासकार वि. का. राजवाडे यांचा. राजवाडे यांनी मराठीत आणखी कोणत्या विरामचिन्हांची आवश्यकता आहे यावर 14-15 पानांचा लेख लिहून त्याकडे लक्ष वेधले होते, मात्र, तो लेख व तो विचार यांवर पुढे कधीच फारशी चर्चा झाली नाही. आजही त्या लेखावर विचार होण्याची गरज आहे.
प्रा. प्रियोळकरांनी कँडी यांची विरामचिन्हांची पुस्तिका छापताना बायबलच्या मराठी भाषांतराबाबत झालेली चर्चा इंग्रजीत संक्षित रूपात सोबत छापली आहे.
कोश-संपादक कँडी
वस्तुतः 'कोशकार कँडी' ही थॉमस कँडीची खरी ओळख. मोल्सवर्थ यांचे सहकारी आणि पुढे स्वतंत्रपणे इंग्रजी-मराठी शब्दकोशाच्या पहिल्या आणि दुसऱ्या आवृत्त्यांचे संपादक, अशी त्यांची ओळख. 1826-1827 मधील दहा महिने, 1832 ते 1835 अशी चार वर्षे, अशी अंदाजे 5 वर्षे मोल्सवर्थ यांच्या कोशातील प्रमुख सहकारी आणि पुढे 1840 ते 1847 असे स्वतंत्रपणे केलेले कोशाच्या संपादनाचे आठ वर्षांचे कार्य, अशी एकूण 12-13 वर्षे कँडी यांनी मराठी-इंग्रजी आणि इंग्रजी-मराठी शब्दकोशासाठी अत्यंत मनोभावे झोकून दिलेली होती. यातील सात- आठ वर्षांत तर स्वतःच्या नोकरीची, पदाची जबाबदारी सांभाळून त्यांनी हे कोशकार्य पार पाडले.
मोल्सवर्थ यांच्याच दोन्ही कोशांच्या मूळ योजना असल्याने कँडी यांनी त्यांच्या नावाचा आदरयुक्त उल्लेख आणि श्रेय पहिल्या आणि दुसऱ्याही आवृत्तीत मोल्सवर्थ यांना दिले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक बोडेन यांनी त्यांच्या इंग्रजी-संस्कृत शब्दकोशातील प्रस्तावनेत कँडीकृत इंग्रजी-मराठी शब्दकोशाच्या पहिल्या आवृत्तीचा गौरवपूर्ण उल्लेख केला असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी नोंदवले आहे.
मोल्सवर्थ यांच्या मराठी-इंग्रजी शब्दकोशाला लिहिलेली जॉन विल्सन यांची 'मराठी वाङ्गयाचा घेतलेला इंग्रजीतील परामर्श' ही प्रस्तावना महत्त्वाची ठरली, त्याचप्रमाणे थॉमस कँडी यांच्या इंग्रजी-मराठी शब्दकोशाला स्टीव्हन्सन यांनी लिहिलेल्या भाषा-व्याकरण विषयाच्या परामर्शाची प्रस्तावना महत्त्वाची गणली जाते. दोन्ही कोशांच्या दुसऱ्या आवृत्तीतही या दोघांच्या प्रस्तावना समाविष्ट केल्या आहेत.
मोल्सवर्थ आणि कँडी दोघांच्याही कोशकार्याचे महत्त्व अनमोल आहे यात शंकाच नाही; परंतु या दोघांनाही मदत करणारी शास्त्रीमंडळी यांचे योगदानही कमी मोलाचे नाही. कँडी यांचे खाजगी पंडित तर परशुरामपंत गोडबोले यांच्यासारखे प्रख्यात विद्वान होते, तर पाठशाळेतील सहकारी कृष्णशास्त्री चिपळूणकर होते. कँडी आजारी पडून मायदेशी गेले असताना भास्कर दामोदर पाळंदे आणि काही काळ महादेव गोविंद रानडे यांनी त्यांचा कार्यभार पाहिला.
मुद्रितशोधनाचे श्रेय बळवंत परशुराम गोडबोले यांना कँडी यांनी कोशात खुल्या अंतःकरणाने दिलेले दिसते.
विल्यम कॅरे यांनी तयार केलेल्या कोश-मराठी व्याकरणादी पुस्तकांपासून ते थेट मोरो केशव दामले यांच्या व्याकरणापर्यंत किंवा 1800 ते 1900 या शंभर वर्षांतील वा कॅरी ते हरिभाऊ केशवसुत यांच्यापर्यंतच्या आधुनिक मराठी गद्य लेखन परंपरेपर्यंतचा भाषिक-वाङ्गयीन विकास मोल्सवर्थ-कँडीकृत कोशांना मध्यवर्ती ठेवून तपासायला हवा, त्यातील विशेषतः कँडीच्या ठाम मतांमुळे निर्माण झालेले फायदे-तोटे हा संशोधनाचा नवाच विषय होऊ शकतो.
दीडशेवा स्मृतीदिन
26 फेब्रु. 2026 रोजी थॉमस कँडी यांचा 150वा स्मृतिदिन सुरू होतोय आणि त्यांच्या 'विरामचिन्हांची परिभाषा' (1850) या पुस्तिकेला 175 वर्षे पूर्ण झालेली असताना, थॉमस कँडी यांच्या स्मरणार्थ 26 फेब्रुवारी हा 'विरामचिन्ह दिवस' म्हणून घोषित करावा ही साधना साप्ताहिकाची विनंती अगदी रास्त आहे.
कँडी यांच्या गुण-दोषांची चर्चा जरूर व्हावी; परंतु कँडी यांनी 50 वर्षे मराठी भाषेची निरपेक्ष भावनेने केलेल्या सेवेबाबत वाद असू नये. महाबळेश्वर येथील त्यांचे दफनभूमीतील चिरनिद्रेचे ठिकाणही शोधून काढायला हवे. मोल्सवर्थ कँडीकृत कोशांची स्वस्त आवृत्ती शासनाने काढायला हवी. करण्यासारखे खूप आहे; पण किमान करणारेही खूप नसून अपवादात्मक आहेत.
कँडी यांना साक्षात दंडवत !
संदर्भ :
1. कुलकर्णी, कृ. भि., 'आधुनिक मराठी गद्याची उत्क्रांती'. मुंबई, मराठी संशोधन मंडळ, 1956. पृ.399 + 77 2. कँडी थॉमस, 'विरामचिन्हांची परिभाषा'. पहिली आ. 1850. दुसरी आ. मुंबई, मराठी संशोधन मंडळ, 1957 3. पिंगे श्री. म., 'युरोपिअनांचा मराठीचा अभ्यास व सेवा'. मुंबई, मराठी संशोधन मंडळ, 1960. पृ.412 4. नेरुरकर अरुण, (भाषांतर आणि संपादन). 'मराठी भाषेचा शिलेदार थॉमस कँडी'. (मराठी संशोधन मंडळातर्फे लवकरच प्रकाशित होणारे पुस्तक) हस्तलिखित.
मराठी संशोधन मंडळ, मुंबई ही चिंतामण द्वारकानाथ देशमुख आणि अनंत काकबा प्रियोळकर यांच्या प्रेरणेने व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने, 1 फेब्रुवारी 1948 रोजी स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेच्या वतीने मागील पाऊण शतकात अनेक महत्त्वाची हस्तलिखिते व पुस्तके नव्याने प्रकाशात आणून, संपादन करून प्रकाशित केली आहेत. या संस्थेचे संचालक राहिलेले प्रदीप कर्णिक यांनीही त्या परंपरेत मोलाचे योगदान दिले आहे. 'एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र' हा त्यांच्या खास अभ्यासाचा आणि विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या