डिजिटल अर्काईव्ह

अकाली मृत्यू पावलेल्या शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्याचे मनोगत

शाळा बंद का पडली? मराठी माणसांची एकमेव संस्था बंद होते आहे म्हणून कुणीच अस्वस्थ का झालं नाही ? गेल्या काही वर्षांतले समाजातले बदल याला कारणीभूत आहेत का? दिखाऊपणाला आलेलं महत्त्व, जे महाग ते चांगलं हा गैरसमज, आत्मकेंद्रीपणा, कोणत्याही गोष्टीबद्दल खोलवर विचार न करता वरवरचा विचार करणे आणि कुणीतरी जातंय म्हणून मेंढ्यांच्या कळपासारखं सगळ्यांनी त्याच्या मागे धावणं याचा हा परिणाम आहे का?

शाळेचा मृत्यू विद्यानिकेतनच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत क्लेशकारक आहे. शाळेने शेकडो विद्यार्थ्यांमध्ये विवेकी विचारांची बीजे रोवली आहेत. ते कायमच समाजाला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करतील. कदाचित भविष्यात समाजाला शाळेचं महत्त्व कळेलही आणि शाळेची नितांत आवश्यकताही भासेल, पण तेव्हा शाळा नसेल!

हो, अगदी खरंय, आज माझी शाळा वारली.

खूप खूप वाईट वाटलं. शाळेसाठी काहीतरी करण्याची संधी मिळण्यापूर्वीच माझ्या शाळेचा शेवट झाला. शाळेचा गेल्या वीस वर्षांचा अवघड पण आनंददायी प्रवास डोळ्यांसमोरून सरकत गेला.

कर्नाटक-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आणि हिरण्यकेशी नदीच्या तीरावर असलेल्या संकेश्वरमध्ये वीस वर्षांपूर्वी काही तरुण मराठी भाषिक मंडळींनी सुरू केलेली माझी शाळा विद्यानिकेतन आणि मी विद्यानिकेतनचा पहिला विद्यार्थी.

वेगळ्या वाटेवर चालणारी, इतर शाळांप्रमाणे चाकोरीबद्ध शिक्षणात न अडकणारी, आम्हा विद्यार्थ्यांना विचार करायला उद्युक्त करणारी आणि योग्य विचार रुजवणारी, विवेकी विचार करण्याची सवय लावणारी ही माझी शाळा.

आज मनात अनेक आठवणी दाटून आल्या आहेत. आमच्या शाळेतील शिक्षकांना टीचर किंवा सर न म्हणता आम्ही ताई आणि दादा म्हणत असू. माझ्या इतर शाळेतील मित्र-मैत्रिणींना याची खूपच गंमत आणि आश्चर्य वाटत असे. त्या वयात ताई आणि दादा म्हणण्यामागचं कारण कळलं नाही, पण आज जाणवतंय की कुणालाही काहीही प्रश्न विचारायचं (अर्थात नम्रपणे) धाडस जे माझ्या अंगी आहे, त्याचं श्रेय माझ्या शाळेतल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातल्या मोकळेपणाला जातं. आणि हा मोकळेपणा शिक्षक आणि विद्यार्थी या धाकाच्या आणि हुकूमशाहीच्या नात्याची जागा ताई आणि दादा या हक्काच्या आणि प्रेमळ नात्याने घेतल्यामुळेच आला. हा मोकळेपणा कधीतरी थोडासा मर्यादा ओलांडूनही जायचा. मला आठवतं की एकदा आम्हाला विज्ञान शिकवण्यासाठी एका नवीन दादांची नेमणूक झाली. विज्ञान विषय असल्यामुळे तर आम्हाला प्रश्न विचारायचं पूर्ण स्वातंत्र्य होतं आणि आम्ही ते पुरेपूर घेतलं. प्रश्न विचारून आम्ही त्या दादांना भंडावून सोडलं. शिक्षकांनी प्रश्न विचारायचे आणि विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची या संस्कृतीत रुजलेल्या दादांना आमच्या शाळेतल्या या वेगळ्या संस्कृतीत रुजता आलं नाही आणि वर्षभरातच ते शाळा सोडून गेले. तेव्हा आम्हा मुलांना तो आमचा पराक्रम वाटत होता, पण आज कळतंय की तो आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव होता.

आमच्या व्रात्यपणाचा असाच एक प्रसंग माझ्या मनावर अगदी कोरला गेलाय. वर्गात ताई नसल्या की वेगवेगळे आवाज काढणे, बेंच वाजवणे असे उद्योग करायला आम्हाला अगदी चेव यायचा आणि आम्ही ताईंच्या रागवण्यालाही दाद द्यायचो नाही. शेवटी ही तक्रार आमच्या शाळेच्या सुप्रीम कोर्टात म्हणजे अरुणा मॅडमकडे गेली. त्या आमच्या ताईंच्याही ताई. आम्ही सगळे वादक कोर्टात हजर झालो. काय होऊ शकेल याचा काहीच अंदाज येईना. झालेल्या गोष्टी पालकांपर्यंत पोहोचल्या तर काय याची भीती मनात होतीच. पण मॅडमनी एकदम वेगळाच पवित्रा घेतला आणि म्हणाल्या, "अरे, एवढे छान आवाज काढता येत असतील, बेंचवर ठेका धरता येत असेल, तर या कौशल्याचा वापर रागवून घेण्यासाठी न करता शाब्बासकी मिळवण्यासाठी करा. आपण या वर्षी कलाविष्कार (वार्षिक स्नेहसंमेलन) मध्ये तुमचा एक कार्यक्रम बसवू या. लागा तयारीला." आमच्यासाठी हा अत्यंत सुखद धक्का होता.

मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन कार्यक्रम बसवले. पहिल्यात अनेक प्रकारचे आवाज आम्ही काढले. त्यात पशुपक्ष्यांसह इतर अनेक गोष्टींचा समावेश होता आणि दुसऱ्या कार्यक्रमासाठी आम्ही विविध प्रकारचे धातूंचे पृष्ठभाग मिळवले. जसे की, चांदी, तांबे, पितळ, स्टेनलेस स्टील, लोखंड, त्याचबरोबर काच आणि लाकूड यांचाही आम्ही समावेश केला. पाच मिनिटांचा वादनाचा एक अत्यंत सुंदर कार्यक्रम आम्ही सादर केला. आमचं प्रचंड कौतुक झालं. आमच्याही नकळत एखादी गोष्ट कौतुकास पात्र होण्यासाठीचं सादरीकरण, धातू-अधातू मधील फरक, प्रत्येक धातूचा आवाज वेगवेगळा येण्याची वैज्ञानिक कारणे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आमच्या मुलांमधलं को-ऑर्डिनेशन. इतक्या गोष्टी आम्ही सहज शिकलो होतो. शाळेनं आम्हाला नकारात्मकतेच्या वाटेवरून अलगदपणे सकारात्मकतेच्या वाटेवर आणून सोडलं होतं. आणि या प्रवासाकरता आमच्या शाळेतला कलाविष्कार आणि कौतुक संमेलन ही उत्तम संधी मॅडमनी वापरली होती. आमच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन हा एक आनंदोत्सव असायचा. शाळेतला प्रत्येक जण या आनंदोत्सवात सामील व्हायचा. दरवर्षी आमचा कलाविष्कार हा एका थीमवर आधारित असायचा. ढग, पाऊस, जंगल, अंतरिक्ष यान, राष्ट्रीय एकात्मता, अंधश्रद्धा असा कोणताही विषय घेऊन त्या भोवती कलाविष्कार गुंफला जायचा. नृत्य, नाट्य, मूकनाट्य, कविता वाचन, लेझीम, पिरॅमिड असे अनेक प्रकार आम्ही ताईंच्या मदतीनं सादर करायचो. आमच्या शाळेचं स्नेहसंमेलन खूप वेगळं असतं असं तेव्हाही वाटायचं आणि आजही तेवढाच अभिमान वाटतोय की ते खूप उत्तम दर्जाचं असायचं. कमी साधनं, कमी खर्च आणि उत्तम दर्जा ही कसरत शाळेत नेहमीच यशस्वीपणे सांभाळली गेली.

असाच आणखी एक उपक्रमही माझ्या मनात घर करून राहिलाय. मी बहुदा सातवीत असेन. मार्चमध्ये परीक्षा संपल्यावरही एक आठवड्यानंतर सुट्टी सुरू व्हायची. इतर शाळा परीक्षा संपली की सुट्टी द्यायच्या. आमची शाळा नियमानुसार चालणारी! त्यामुळे परीक्षा संपल्यावरही एक आठवडा शाळा असायची. परीक्षा संपल्यावर अभ्यासाचा मूड नसायचा मग करायचं काय ? एकदा मॅडमना एक भन्नाट कल्पना सुचली. मॅडम म्हणाल्या की, आपण शाळा रंगवू या. आम्ही एकदम खूश. मॅडमनी जेवढ्या खोल्या तेवढे गट बनवायला सांगितले आणि प्रत्येक गटाचा एक गट प्रमुख. एरवी भांडणं आणि दादागिरी करणारे आम्ही का माहिती नाही, पण सर्व मुलांचे एकत्र गट बनवले. लहान मुलं स्वतंत्रपणे हे काम करू शकणार नव्हती म्हणून त्यांना मोठ्या मुलांच्या गटात विभागलं.

मॅडम गटप्रमुखांशी बोलायच्या आणि गटप्रमुख आपल्या गटाशी. आम्हाला लागणाऱ्या साहित्याची यादी आणि आमच्या कामाचं वेळापत्रक बनवायला सांगितलं. आणि आम्हाला ते जमलंही. काही साहित्य घरून, काही शाळेत आणि फार थोडं साहित्य विकत घेतलं. शाळेत आल्यावर ड्रेस बदलून, डोक्याला फडकं गुंडाळून आम्ही कामाला लागलो. आमच्या शाळेच्या भिंती मातीच्या होत्या. त्यामुळे प्रथम त्या लिंपून, त्यानंतर सारवून, मग रंगवायला सुरुवात केली. सगळ्या उंच मुलांनी मनापासून सर्व गटांना भिंतीचा वरचा भाग रंगवायला मदत केली. ताईपण हातात रंगाचा डबा आणि ब्रश घेऊन मैदानात उतरल्या. मग तर खूप मज्जा आली. ठरलेलं काम आम्ही वेळेआधी दोन दिवस पूर्ण केलं. मॅडम आणि सगळ्या ताई आमच्यावर खूश. मग हळूच आम्ही मॅडमसमोर शाळेच्या भिंतींवर चित्र काढण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो पटकन मान्यही झाला. प्रत्यक्षात चित्र काढताना आणि रंगवताना वहीत चित्र काढणे आणि भिंतीवर चित्र काढणे यातला फरक कळला आणि वाटलं होतं तेवढं हे काम सोपं नाही हेही लक्षात आलं. पण भरपूर मेहनतीनं आणि जिद्दीनं आम्ही आमच्या मनातली चित्रं भिंतीवर साकारली. तो एक अप्रतिम आणि संस्मरणीय अनुभव होता. आज नोकरी करताना आम्ही त्याला मॅनेजमेंट ट्रेनिंग किंवा वर्कशॉप म्हणतो! जे आम्हाला वयाच्या बारा-तेराव्या वर्षी अगदी सहज मिळालं होतं.

उन्हाळ्याच्या सुट्टीची आम्ही सर्व मुलं फार आतुरतेने वाट पाहायचो. दोन कारणं होती, पहिलं सर्वमान्य कारण होतं, मोठ्या सुट्टीमध्ये मामाकडे जायचं आकर्षण आणि दुसरं शाळा आयोजित करत असलेलं उन्हाळी शिबिर. हे शिबिर सर्वांसाठी खुलं असायचं. त्यात आमचे इतर शाळांमधले मित्रही सामील व्हायचे. शिबिरात आम्ही खूप धमाल करायचो. चित्र काढायचो, नवीन खेळ खेळायचो, गाणी म्हणायचो, व्यायाम करायचो, नवीन वस्तू बनवायला शिकायचो, अक्षर सुधारण्यावर भर असायचा, विज्ञानाचे प्रयोग करायचो, छान छान गोष्टी ऐकायचो. दरवर्षी एखादा दिवस बाबासाहेब काका (बाबासाहेब नदाफ, राष्ट्र सेवा दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता) यायचा. शिबिरातला तो दिवस म्हणजे धमाल असायची. लेझीम आणि एरोबिक्स तो खूप छान शिकवायचा. डफलीच्या तालावर सेवा दलाची गाणी शिकवायचा. त्याची डफलीवरची थाप, खडा आवाज आणि प्रेरणादायी गाण्यांमुळे वातावरणात आणि माझ्या मनात निर्माण होणारी विलक्षण ऊर्जा मी कधीच विसरू शकणार नाही. आज हजारो रुपये फी घेऊन, प्रचंड जाहिरात करून आयोजित केली जाणारी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे माझ्या शाळेने कोणताही अभिनवेश न बाळगता अत्यंत कमी फीमध्ये अनेक वर्षं आयोजित केली.

विद्यानिकेतन जेवढी आमची होती, तेवढीच आमच्या पालकांचीही होती. पालक सभेत पालकांना काहीही बोलण्याची मुभा होती. किंबहुना पालकांनी बोलायलाच हवं असाच आग्रह असायचा. दरवर्षी मातृदिनाच्या दिवशी मुलांच्या मातांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जायचे. कधी मार्गदर्शनपर व्याख्यान, तर कधी स्पर्धा, कधी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी एखादं प्रशिक्षण, तर कधी एखादा सुंदर चित्रपट, कधी आरोग्य शिबिर, कधी सहल असे अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जायचे. नवऱ्याला आणि मुलांना सोडून घालवलेला सहलीचा एक उनाड दिवस अनेक स्त्रियांना स्वतःला शोधायला मदतनीस झाला असेल. हळूहळू या कार्यक्रमांचे स्वरूप व्यापक होऊ लागले. स्त्रियांसाठी आयोजित केलेले कार्यक्रम फक्त विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या माता पालकांसाठी मर्यादित न राहता सर्वसमावेशक होऊ लागले. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांत आमच्या संस्थेतर्फे स्त्रियांकरता शिबिरे घेतली जाऊ लागली. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल शाळा सजग असली तर काय होऊ शकतं, हे सांगण्यासाठी एका घटनेचा उल्लेख मला करावासा वाटतो.

वातावरणाचा परिणाम म्हणून पाचवी ते सातवीतली काही मुलं शाळेत येताना नामा ओढून यायची. शिक्षकांच्या अनुपस्थितीत 'जय शिवाजी, जय भवानी'च्या आवेशपूर्ण घोषणाही व्हायच्या. हा विषय मॅडमपर्यंत पोहोचला. त्यांनी सगळ्या वर्गांना एकत्र केलं आणि गप्पा सुरू झाल्या. नामा का ओढायचा या प्रश्नापासून विषयाला सुरुवात झाली. मॅडमनी प्रश्न विचारायचे आणि मुलांनी मोठ्या आवेशात उत्तरं द्यायची हा सिलसिला शेवटी, प्रत्येकाने शिवाजी महाराजांबद्दल एक वाक्य सांगा आणि ते रिपीट होता कामा नये येथे येऊन पोहोचला. 'रिपीट न होता' हे अवघड होतं आणि अपेक्षेप्रमाणे मुलांना ते जमलं नाही. आपल्याला जमत नाही म्हटलं की आपण समोरच्याचं निदान ऐकून घ्यायला तरी तयार होतो. मॅडमनी सांगितलं की, रोज शाळा सुटायच्या आधी पंधरा मिनिटं सगळी मुलं एकत्र येतील आणि शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेतील. कधी वाचन, कधी कथन, कधी बाबासाहेब पुरंदरे यांच्या ओजस्वी भाषेतल्या कथांचं वाचन आणि शेवटी त्यावर मॅडमची खास टिप्पणी. हळूहळू वातावरण शिवमय होऊ लागलं. पण नामा ओढणे म्हणजे शिवाजी महाराजांवरचे प्रेम दाखवणे नव्हे, हे मुलांना उमगू लागलं. कित्येकदा तलवार उपसण्यापेक्षा ती म्यान करण्यात जास्त मुत्सद्दीपणा असतो आणि तो शिवाजी महाराजांच्या अंगी होता हे मुलांना कळलं. आणि या भारावलेपणातून मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सगळ्या ताईंच्या अथक प्रयत्नांतून अत्यंत कमी संसाधनांमध्ये विद्यानिकेतनच्या 150 विद्यार्थ्यांनी साकारलं एक अप्रतिम नृत्य नाट्य, 'शिवकल्याण राजा'. माझ्या किंवा विद्यानिकेतनच्या परिवाराच्या नव्हे, तर तो कार्यक्रम पाहिलेल्या संकेश्वरच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये विद्यानिकेतनची ही कलाकृती अजरामर झाली आहे.

आज शाळेच्या अनेक आठवणींनी मनात गर्दी केली आहे आणि प्रत्येक आठवण सर्व ताकदीनिशी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे. अशीच एक सुंदर आठवण, आमच्या पुणे सहलीची.

खरंतर वर्षभरात आम्ही अनेक सहलींना जायचो.
चिनमुरे भट्टी, सरकारी रुग्णालय, जनावरांचा बाजार, भाजी बाजार, ओढा, नदी, वटवृक्ष, मधाचं पोळं, गणपती तयार करण्याचा कारखाना, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन आणि अशा अनेक ठिकाणी आम्ही सहलीला जायचो.

दर सहा इंचांवर गाठ मारलेली एक लांब दोरी होती आमच्या शाळेत. दोन गाठींमध्ये प्रत्येक मुलांनी दोरी धरायची आणि मग रस्त्यावरच्या रहदारीला जराही अडथळा न करता अगदी सुरक्षितपणे ती दोरी आम्हाला इच्छित ठिकाणी जायला मदत करायची. पण या सगळ्या छोट्या सहली. वर्षातून एकदा मोठ्ठी सहल असायची. एकदा आम्ही पुण्याला गेलो होतो. दोन दिवसांची सहल होती. सहलीचं मुख्य आकर्षण होतं पुणे विद्यापीठातलं 'आयुका' आणि सिंहगड! आयुकामध्ये गेल्यावर आम्ही हरखूनच गेलो. वैज्ञानिक खेळणी बघितली आणि बनवली. अरविंद गुप्तांना भेटलो. ते जवळजवळ तासभर आमच्याबरोबर होते. शास्त्रज्ञ म्हणजे काय हे समजायचं ते वय नव्हतं, पण तरीही त्यांचं मोठेपण आमच्यापर्यंत पोहोचलं होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आम्ही भारावून गेलो होतो. अंजू ताई, समीर दादा आणि बन्सी दादा आमच्या शाळेचे हितचिंतक आमचे पुण्यातले मार्गदर्शक होते. केळकर म्युझियमने करून दिलेली इतिहासाची ओळख, रात्री पाहिलेला म्युझिक शो, अक्षरनंदनमधील मुक्काम, रात्री टेलिस्कोपमधून केलेलं आकाश दर्शन, अंजू ताईबरोबर केलेला सिंहगडचा ट्रेक, समीर दादा व बन्सी दादा यांच्याबरोबर त्यांच्या डॉक्युमेंटरीजवर मारलेल्या गप्पा सगळंच आमच्या नकळत आम्हाला प्रगल्भ करणारं. या सहलीत आणखी एक गोष्ट अत्यंत अविस्मरणीय होती. दोन दिवसांच्या सहलीत पहिल्या दिवसाचं जेवण आम्ही घरून नेलं होतं आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता आणि जेवण आमच्या ताईंनी सहलीमध्ये आमच्यासाठी स्वतः बनवलं होतं.

त्रास नको म्हणून दिवसाचं पॅकेज ठरवून सहल वॉटर पार्कला घेऊन जाण्याच्या जमान्यात, सहलीचा खर्च वाढू नये, जास्तीत जास्त मुलांना सहलीला येता यावं म्हणून ताईंनी गाडी थांबवून आम्हाला स्वतः करून वाढलेल्या आमटी-भाताची चव आयुष्यात विसरता येणार नाही.

हे सारं या शाळेत आम्हाला मिळत होतं, संस्थेचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी (सर) आणि अरुणा मॅडम यांच्या अथक प्रयत्नांमुळे ! विद्यानिकेतन हे जणू अपत्यच होतं त्यांचं. ही शाळा मुळातच विशिष्ट उद्देशाने स्थापन झाली. समाजातल्या गरीब श्रमिक वर्गातल्या मुलांना कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण देणं, मराठी मातृभाषा असणाऱ्या मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देणं, मुलांचा सर्वांगीण विकास करणं, त्यांना विवेकी व चांगला माणूस बनवणं या तत्त्वांपासून शाळा कधीच दूर गेली नाही.

शाळेने आपली गुणवत्ता सतत सिद्ध केली आहे. सरकारी आंतरशालेय स्पर्धांमध्ये विविध क्षेत्रांत विद्यानिकेतनचे विद्यार्थी नेहमीच जिल्हा व राज्यस्तरापर्यंत पोहोचले. विद्यानिकेतनचे विद्यार्थी आठवीनंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून नेहमीच टॉपर्स राहिले आहेत. मागच्या वर्षी तर दहावी इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम दोन्हींमध्ये विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. विद्यानिकेतनमधून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आपल्या गुणवत्तेवर उच्च शिक्षण मिळवून डॉक्टर, इंजिनिअर झाले आहेत. आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. माझ्या क्षेत्रामध्ये अनेक बाबतीत इतरांपेक्षा माझा आत्मविश्वास हा खूप जास्त असल्याचे मी अनेकदा अनुभवले आहे.

मग एवढं सगळं असूनही समाजाचा प्रतिसाद का नाही? शाळा बंद का पडली? मराठी माणसांची एकमेव संस्था बंद होते आहे म्हणून कुणीच अस्वस्थ का झालं नाही? गेल्या काही वर्षांतले समाजातले बदल याला कारणीभूत आहेत का?

दिखाऊपणाला आलेलं महत्त्व, जे महाग ते चांगलं हा गैरसमज, आत्मकेंद्रीपणा, कोणत्याही गोष्टीबद्दल खोलवर विचार न करता वरवरचा विचार करणे आणि कुणीतरी जातंय म्हणून मेंढ्यांच्या कळपासारखं सगळ्यांनी त्याच्या मागे धावणं याचा हा परिणाम आहे का?

शाळेचा मृत्यू विद्यानिकेतनच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत क्लेशकारक आहे. शाळेने शेकडो विद्यार्थ्यांमध्ये विवेकी विचारांची बीजे रोवली आहेत. ते कायमच समाजाला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करतील.

कदाचित भविष्यात समाजाला शाळेचं महत्त्व कळेलही आणि शाळेची नितांत आवश्यकताही भासेल, पण तेव्हा शाळा नसेल!

असो.
माझी शाळा माझ्या हृदयात, माझ्या विचारांमध्ये कायम असेल. शाळेची आठवण नेहमीच येत राहील.

 


इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर गिरीश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी न्यूक्लिअर फिजिक्सची प्राध्यापक अरुणा कुलकर्णी या दोघांनी, वयाच्या चाळिशीच्या टप्प्यावर आपापल्या कामातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन, बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथे विद्यानिकेतन ही प्राथमिक शाळा 2005 मध्ये सुरू केली. पहिली ते आठवी हे वर्ग असलेली ती मराठी माध्यमाची शाळा वीस वर्षे उत्तम प्रकारे चालवली. त्या शाळेतून बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. मात्र या वर्षीच्या जूनपासून ही शाळा बंद करण्यात आली आहे. शाळा बंद होण्यास अनेक कारणे आहेत, पण मुख्य कारण मराठी माध्यमात शिकण्यासाठी विद्यार्थी पुरेसे येत नाहीत.

गिरीश व अरुणा यांचा मुलगा चिनार हा त्या शाळेचा पहिला विद्यार्थी, साहजिकच त्याने या शाळेची संपूर्ण वीस वर्षांची वाटचाल जवळून पाहिली आहे. त्याने नंतर कोल्हापूर येथून अॅग्रिकल्चर बी.टेक केले आणि आता तो बंगलोर येथे नोकरी करतो. या कळत्या वयात, त्याला आपल्या शाळेचा झालेला अकाली मृत्यू दुःखदायक ठरला असणार. तरीही મૃત્યુğiર त्याच्या मनातील व्यथा-वेदना या लेखामधून संयमित पद्धतीने आली आहे. अरुणा व गिरीश यांनी शाळा बंद केल्यावर नव्या जोमाने (आधीपासून करत असलेली)

सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आहे. त्या दोघांच्या ध्येयवादी आयुष्याचा एकूण प्रवास रोचक असणार हे तर उघड आहे. त्यामुळे, त्या दोघांची एकूण वाटचाल सांगणारी एक दीर्घ मुलाखत लवकरच साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध करण्याचा विचार आम्ही करतो आहोत.

संपादक, साधना
 

Tags: sankeshwar aruna kulkarni physics professor girish and aruna memories vidya niketan chinnar kulkarni education school weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी