योग्य मजकुराची निवड करणे, तो मजकूर तपासून गोळीबंद करणे, गरजेनुसार रचना व पुनर्रचना करणे, आवश्यक तो भाग वगळणे व भर टाकणे आणि आकर्षक पद्धतीने सादर करणे हे तर त्या संपादन प्रक्रियेत येतेच; पण त्याचे महत्त्व थोडक्यात अधोरेखित करता येणे, सारांश सांगता येणे, प्रास्ताविक जोडता येणे आणि त्याची जाहिरात करता येणे, या सर्व प्रक्रियेसाठीही उत्तम संपादक आवश्यक आहेत. अर्थातच त्यांच्या जोडीला चांगले मुद्रितशोधन करणारे, चांगले भाषांतर करणारे यांच्या फौजा निर्माण कराव्या लागतील. त्या सर्व घटकांना त्यांच्या कामाचा चांगला मोबदला द्यावा लागेल, योग्य ते श्रेय द्यावे लागेल. आणि योजकांच्याकडे कल्पकतेची खाण असावी लागेल. कुठे मजकूर आहे, तो कसा मिळवायचा, कसा तयार करायचा, अंतिम रूप कसे द्यायचे, कुठे आणि कसा वापरायचा, तो परिणामकारक होईल हे कसे पाहायचे इत्यादी बाबतीत योजकाची कसोटी लागते. अर्थातच या संपूर्ण प्रक्रियेसाठी आर्थिक तरतूद आवश्यक बनते. आपल्या समाजामध्ये योजकत्व दुर्लभ आहेच.
जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या एका माहितीपटात कुसुमाग्रज यांना एक प्रश्न विचारला होता, "परमेश्वर या संकल्पनेविषयी तुमचे मत काय?" ते म्हणाले, "ज्यांना परमेश्वराची गरज आहे त्यांच्यासाठी तो आहे, ज्यांना त्याची गरज नाही त्यांच्यासाठी तो नाही." शतकानुशतके चर्चिल्या जात असलेल्या एका विश्वव्यापी संकल्पनेबाबत कुसुमाग्रजांनी दिलेल्या त्या उत्तराचा खरा अर्थ, "आता त्यावर आणखी चर्चा वाद नको, किमान मी तरी चर्चा वाद करू इच्छित नाही" असा होतो. त्याचप्रमाणे आता कुसुमाग्रज हयात असते आणि त्यांना जर विचारले असते, "मराठी ही अभिजात भाषा आहे काय?" तर त्यावर त्यांचे उत्तर, 'ज्यांना मराठी ही अभिजात भाषा वाटते त्यांच्यासाठी ती आहे, ज्यांना ती अभिजात वाटत नाही त्यांच्यासाठी ती तशी नाही" असेच दिले असते. साहजिकच, मराठी भाषेच्या विकासाच्या संदर्भात चालू असलेल्या (कधीही न संपणाऱ्या) वाद-संवादावर, त्यांचा प्रतिसाद तसाच राहिला असता. म्हणजे 'ज्यांना मराठीच्या विकासाच्या मार्गात अन्य भाषा या ना त्या प्रकारे अडथळा वाटतात, त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रचार-प्रसार करावा आणि ज्यांना अन्य भाषा मराठीसाठी या ना त्या प्रकारे उपयुक्त वाटतात, त्यांनी त्या मार्गाने जावे' असेच त्यांचे उत्तर आले असते. फार तर ते म्हणाले असते, दोन्ही वाटा एकाच सागराला मिळतात; त्यामुळे आपापल्या वाटेने पुढे पुढे जा. "स्वातंत्र्यदेवतेची विनवणी" या त्यांच्या अखेरच्या काळातील कवितेतूनही तसेच सूचित केले आहे.
अशा या कुसुमाग्रजांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस 2013 पासून अधिकृतपणे (म्हणजे सरकारी इच्छेनुसार) 'मराठी भाषा गौरव दिवस' म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांच्या 101 व्या जयंतीपासून त्याचा प्रारंभ झाला आणि आता ती परंपरा चांगलीच रुजली आहे. त्यानिमित्ताने शासकीय व अशासकीय पातळीवर बरेच कार्यक्रम उपक्रम होत असतात. गेल्या वर्षीपासून 3 ऑक्टोबर हा 'अभिजात मराठी भाषा दिवस' म्हणून शासनाकडून साजरा करायला सुरुवात झाली आहे, कारण 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने बहाल केला. आणि 1 मे हा 'मराठी राजभाषा दिवस' तर 1965 पासून राज्य सरकारकडून साजरा केला जातो. या तीनपैकी मराठी भाषा गौरव दिवस पुढील आठवड्यात येत आहे. अर्थातच, त्या निमित्ताने लहान-मोठे उपक्रम शासकीय व अशासकीय पातळीवर होतील, घोषणा केल्या जातील आणि संकल्पही सोडले जातील. त्यातील काही बऱ्या पद्धतीने होतील, काही हवेत विरून जातील, काही मात्र बोलाची कढी आणि बोलाचाच भात असे ठरतील. हरकत नाही, समाजाच्या स्थितीगतीनुसार ते होत राहील. पण त्या निमित्ताने इथे खूप मोठी चर्चा करण्यापेक्षा, तीन साधनांविषयी किंवा हत्यारांविषयी (टूल्स) थोडा उहापोह करावासा वाटतो, आग्रह धरावास वाटतो आहे. ती हत्यारे म्हटले तर चिमुकली आहेत, पण प्रचंड शक्तिशाली आहेत. ती हत्यारे अगदीच नवीन नाहीत, पण त्यांचा वापर करायला कधी नव्हे इतकी अनुकूल स्थिती आता निर्माण झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत हजारो पट सुलभ व जलद काम करता येईल, अशी ती हत्यारे आहेत आणि पूर्वीच्या तुलनेत वेळ, उर्जा, श्रम, पैसा यांची शेकडो पटीने बचत होणार आहे. ती तीन हत्यारे म्हणजे तंत्रज्ञानाच्या साह्याने टंकलेखन (OCR), शब्दांकन (Transcription) आणि भाषांतर (Translation).
आधुनिक मराठीचा प्रारंभ ब्रिटिश राजवटीपासून सुरू झाल्याचे मानले जाते, त्याचे एक प्रमुख कारण, मुद्रण तंत्रज्ञान भारतात अवतरले, दुसरे गद्य लेखनाचा प्रवाह जोमाने वाहू लागला आणि तिसरे इंग्रजी लेखनाचे मराठी भाषांतर होऊ लागले. 1805 मध्ये मराठीत पहिले पुस्तक छापले गेले, त्यानंतरच्या 220 वर्षांत मराठीत गद्य-पद्य प्रकारांतील दोनेक लाख पुस्तके छापली गेली असावीत. त्यापैकी 1805 ते 1950 या दीडशे वर्षांत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची उत्तम सूची गणेश शंकर दाते यांनी केलेली आहे, तसाच एक बरा प्रयत्न नंतरच्या पन्नास वर्षांत काही लोकांनी केला; त्यानंतरच्या 25 वर्षांची मात्र तशी सूची तयार झाल्याचे ऐकण्यात वाचण्यात आलेले नाही. पण मुद्दा काय, तर मागील सव्वादोनशे वर्षांत दोनेक लाख पुस्तके मराठीमध्ये प्रकाशित झाली आहेत. त्यातील हजारो पुस्तकांच्या आवृत्त्या उपलब्ध नाहीत (आऊट ऑफ प्रिंट आहेत) आणि हजारो पुस्तके गायब झाली आहेत किंवा एखाद्या दुसऱ्या प्रतींच्या रूपात राज्यभरातील काही जणांच्या व्यक्तिगत संग्रहात व वेगवेगळ्या ग्रंथालयांत पडून आहेत. म्हणजे हरवलेली, उपलब्ध नसलेली किंवा केवळ ग्रंथालयात पडून असलेली लाखभर तरी पुस्तके अशी आहेत, ज्यांचा मजकूर दैनंदिन वापरात येतच नाही. तो मजकूर टंकलिखित (टाईप) करणे, मुद्रित तपासणे (प्रूफींग), आणि छापून घेणे हे काम पूर्वी खूपच जिकिरीचे होते. खूप जास्त वेळ, ऊर्जा व पैसा खाणारे होते.
आता, गेल्या दशकभरापासून मराठीत प्रचलित असलेल्या ओसीआर तंत्रज्ञानामुळे कोणतेही छापील पुस्तक अत्यल्प वेळेत व अत्यल्प खर्चात टंकलिखित करता येते. पाच सेकंदात एक पान स्कॅन करून टंकलिखित स्वरूपात आणता येते, म्हणजे शंभर पानांचे पुस्तक जास्तीत जास्त शंभर मिनिटांमध्ये टाईप करून, त्याची व्यवस्थित फाईल तयार करता येते. ओसीआर तंत्रज्ञान अवतरले तेव्हा मुद्रिते तपासण्याचे काम बरेच जास्त करावे लागत होते, आता ते अगदीच नगण्य करावे लागते. एवढेच नाही तर टाईप न केलेला म्हणजे केवळ हाताने लिहिलेला मजकूरसुद्धा दहा सेकंदात मोबाईलच्या सहाय्याने स्कॅन करून टाईप करता येतो. अक्षर सुवाच्च असेल तर टंकलेखन अचूक होते आणि शुद्धलेखन चांगले असेल तर तोही प्रश्न येत नाही. त्यामुळे, या ओसीआर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लक्षावधी पुस्तके खूप कमी वेळात, कमी खर्चात व कमी मनुष्यबळात उपलब्ध करून देता येतील, वेबसाईटवर टाकता येतील, सोशल मिडियावर वापरता येतील आणि अर्थातच छापून घेता येतील. साहजिकच, आउट ऑफ प्रिंट किंवा अनुपलब्ध ही संज्ञा मराठी ग्रंथव्यवहारातून हद्दपार करता येईल. अर्थातच, त्यासाठी त्या त्या लेखकांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी, चाहत्यांनी आणि संस्था-संघटनांनी व शासनाने पुढे यायला हवे. कारण ते समूहाने करायचे काम आहे किंबहुना ती एक सार्वजनिक मोहीम झाली पाहिजे. 'केवळ उपलब्ध असणे किंवा नसणे' याचा आपण समजतो त्यापेक्षा कित्येक पट (चांगला वा वाईट) परिणाम ज्ञानव्यवहारावर होत असतो. आज सुरुवात केली आणि सर्व बाजूंनी प्रचंड जोर लावला तरी, आडबाजूला पडून असलेला मजकूर ओसीआरने उपलब्ध करून द्यायला किमान दहा वर्षे लागतील. मात्र ज्या नैसर्गिक गतीने हे होत आहे, ते पाहता पुढील पन्नास वर्षांतही तो सगळा मजकूर उपलब्ध होणार नाही. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, एकदा तयार झालेला मजकूर साठवून ठेवणे, पुन्हा पुन्हा वापरणे, प्रक्रिया करून वापरणे, रूपांतर करून वापरणे यासाठी आता अनंत शक्यता आहेत.
टंकलिखित मजकूर भाषांतरीत स्वरूपात भारतातील व जगातील भाषांमध्ये घेऊन जाण्यासाठी किमान क्षमता असणारे भाषांतरकार मिळणे, हे काम कोणत्याही काळात कठीणच होते. शिक्षणाचा प्रचंड प्रसार झाल्यानंतरही ते काम कूर्मगतीने च होत आले आहे. आता मात्र भाषांतरासाठी कधी नवी इतकी अनुकूलता प्राप्त झाली आहे, ती मोठ्या प्रमाणात वाढती राहणार आहे. गुगल किंवा एआयद्वारे होणारे भाषांतर हे क्षेत्र कमालीचे विस्तारते आहे. अर्थातच, या तंत्रज्ञानाच्याद्वारे माहितीपर मजकुराचे भाषांतर चांगले होते, वैचारिक मजकुराचे कमी चांगले होते आणि सर्जनशील म्हणावे अशा मजकूराचे (उदा. कविता, विनोद, संकल्पना) भाषांतर तितकेसे चांगले होत नाही, किंवा वाईट होते असेही म्हणता येईल. मात्र या पद्धतीने दहा वर्षांपूर्वी मिळणाऱ्या भाषांतराचा दर्जा आणि आताचा दर्जा, यामध्ये शंभर पट फरक झालेला आहे. आता माहितीपर मजकूर नव्वद ते नव्याण्णव टक्के अचूक भाषांतरित होतो. अन्य मजकूर त्या त्या प्रमाणात कमी अधिक दर्जाचा होतो. परंतु आपल्या समाजजीवनात माहितीपर मजकुराचे प्रमाण प्रचंड आहे, हे लक्षात घेतले तर त्याचे महत्त्व पटेल. शिवाय अन्य भाषकांना दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी असे भाषांतर खूपच उपयोगी पडते आहे. साहित्याच्या क्षेत्रात त्याच्याकडे हिणकस पद्धतीने पाहिले जाते आणि पाहायलाही हवे. परंतु दैनंदिन आदान-प्रदान आणि उद्योग व्यापार क्षेत्रांत हे भाषांतर अतिशय उपयुक्त ठरते आहे.
एवढेच नाही तर कोणत्याही मजकुराचे वाचन हा प्रकार अनेक शिक्षित, अशिक्षित लोकांस कटकटीचा वाटतो. त्यांना असा मजकूर ऑडिओ स्वरूपात ऐकण्याची सुविधा अतिशय सहज साध्य झाली आहे. अर्थातच, ते ऑडिओ वाचन एकरेषीय वा एकसुरी असते. परंतु तिथेही दुधाची तहान ताकावर भागवणे हा प्रकार होतो आहे. शिवाय, मागील पाच वर्षांत टंकलेखन व भाषांतर या दोन्ही प्रकारांत झालेले दर्जात्मक बदल अनेक पट आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षांत यामध्ये होणारे बदल आजच्यापेक्षा कित्येकपट चांगले असतील. कारण हे क्षेत्रच असे आहे की, जेवढा वापर जास्त तेवढी अचूकता वाढत जाते आणि जेवढा वापर कमी तेवढे ते सदोष राहते. अर्थातच, या तंत्रज्ञानातून मिळणारे भाषांतर अधिक चांगले करण्यासाठी त्या त्या भाषेतील जाणकार लागतील. मात्र आत्ताच्या स्थितीत एका पुस्तकाचे भाषांतर करायला जो वेळ द्यावा लागतो, त्याच्या दहापट पुस्तके तेवढ्याच वेळेत भाषांतरकार करू शकतील. भारतातील व जगातील शेकडो भाषांमधील मजकुराचे असे आदान-प्रदान इतके सहजपणे करता येणे हे मानवजातीला किती मोठे वरदान आहे !
शब्दांकन हे तिसरे हत्यार दिवसेंदिवस कमालीचे सुलभ व जलद झाले आहे. पूर्वी एखाद्या व्यक्तीची मुलाखत किंवा भाषण रेकॉर्ड केल्यानंतर त्याचे शब्दांकन करताना, एकेक शब्द व एकेक वाक्य ऐकून हाताने लिहिणे असा प्रकार करावा लागत होता. नंतर ऐकून टाईप करणे असा थोडा कमी ताणाचा प्रकार आला, त्यानंतर एकेक वाक्य वाचून व्हॉईस टाइप करणे असा आणखी कमी ताणाचा प्रकार आला. आणि आता ऑडिओ रेकॉर्डिंग जसेच्या तसे टाईप करता येते. यामुळे नवे-जुने असे लक्षावधी ऑडिओ आणि व्हिडिओ शब्दांकन करण्यासाठी त्या ऑडिओ इतकाच वेळ पुरणार आहे. उच्चार जेवढे सुस्पष्ट तेवढे शब्दांकन सुस्पष्ट आणि वाक्यरचना व बोलणे जेवढे गोळीबंद तेवढे ते शब्दांकन अचूक होते आहे. एवढेच नाही तर लेखनाचे अजिबात अंग नसणारी, पण व्यक्त होऊ शकणारी माणसे असतील, तर त्यांना बोलते करून शब्दांकन करणे चमत्कारिक गतीने साध्य करता येते आहे. आणि ते एकदा झाले की, त्याचे भाषांतर व ऑडिओमध्ये रूपांतर हेही ओघानेच करता येते आहे. कोणत्याही समाजात वेगवेगळ्या क्षेत्रांत सूज्ञ व तज्ञ व्यक्ती अनेक असतात, मात्र त्यातील अनेकांच्या आयुष्यामध्ये जे काही संचित असते, ते कधीच कागदावर उतरत नाही. ते त्यांच्यासोबत पंचतत्वात विलीन होत असते. त्यामुळे, मानवजातीचे प्रचंड नुकसान होत आले आहे. गेल्या काही वर्षांत अशा लोकांकडील संचित ऑडिओ, व्हिडिओद्वारे जतन करण्यासाठी मोठी अनुकूलता आली आणि त्याचा चांगला उपयोग मराठीतही करून घेतला जात आहे. परंतु तो व तसा न आलेला ऐवज शब्दांकन करून लेख किंवा पुस्तक रुपात आणायला आता प्रचंड वाव आहे.
या सर्व प्रक्रियेत सर्वाधिक कळीचा मुद्दा ठरणार आहे, तो म्हणजे संपादक आणि योजक. वरील सर्व प्रकारांसाठी (ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट) संपादकांची गरज मोठ्या प्रमाणात आहे. मग ते मजकुराचे संपादन असेल, शब्दांकनाचे असेल किंवा भाषांतराचे. योग्य मजकुराची निवड करणे, तो मजकूर तपासून गोळीबंद करणे, गरजेनुसार रचना व पुनर्रचना करणे, आवश्यक तो भाग वगळणे व भर टाकणे आणि आकर्षक पद्धतीने सादर करणे हे तर त्या संपादन प्रक्रियेत येतेच; पण त्याचे महत्त्व थोडक्यात अधोरेखित करता येणे, सारांश सांगता येणे, प्रास्ताविक जोडता येणे आणि त्याची जाहिरात करता येणे, या सर्व प्रक्रियेसाठीही उत्तम संपादक आवश्यक आहेत. अर्थातच त्यांच्या जोडीला चांगले मुद्रितशोधन करणारे, चांगले भाषांतर करणारे यांच्या फौजा निर्माण कराव्या लागतील. त्या सर्व घटकांना त्यांच्या कामाचा चांगला मोबदला द्यावा लागेल, योग्य ते श्रेय द्यावे लागेल. आणि योजकांच्याकडे कल्पकतेची खाण असावी लागेल. कुठे मजकूर आहे, तो कसा मिळवायचा, कसा तयार करायचा, अंतिम रूप कसे द्यायचे, कुठे आणि कसा वापरायचा, तो परिणामकारक होईल हे कसे पाहायचे इत्यादी बाबतीत योजकाची कसोटी लागते. अर्थातच या संपूर्ण प्रक्रियेसाठी आर्थिक तरतूद आवश्यक बनते. आपल्या समाजामध्ये योजकत्व दुर्लभ आहेच. त्यामुळे संपादकीय विभागातील लोकांनी योजकाच्या भूमिकेमध्ये मोठ्या प्रमाणात शिरायला हवे आणि योजकत्व असलेल्या लोकांनी संपादकीय कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे सर्व करता आले तर स्काय इज द लिमिट अशीच स्थिती अनुभवता येते. आणि मग मराठी भाषेच्या संदर्भात काय होत नाही याकडे लक्ष जात नाही, किती प्रचंड काम करायला वाव आहे याकडेच लक्ष राहाते !
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या