डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

एका संपादकाच्या नजरेतून टिळक आणि आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने साहित्य अकादमीने, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने, 'लोकमान्य टिळक व्यक्तित्व आणि कर्तृत्व' या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्र 17 व 18 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केले होते. तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात, 'लो. टिळक आणि डॉ. आंबेडकर' या विषयावर वाचलेले हे लिखित भाषण आहे. हे भाषण त्यानंतर कुठेही प्रसिद्ध झालेले नाही. मात्र या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आहे, त्या निमित्ताने तीन वर्षांपूर्वीचे ते भाषण इथे प्रसिद्ध करणे औचित्यपूर्ण वाटते.

मित्रहो, साहित्य अकादमीने आयोजित केलेल्या कोणत्याही विषयावरील चर्चासत्रात वक्त्याकडून अकादमीक शिस्तीत मांडणीची अपेक्षा असते. त्यामुळे त्यात प्रामुख्याने विद्यापीठीय स्तरांवरील अभ्यासक-संशोधक सहभागी होत असतात. मी स्वतः रूढ अर्थाने अभ्यासक-संशोधक नसल्याने 'लो. बाळ गंगाधर टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर अकादमीक मांडणी करू शकणार नाही. ही माझी मर्यादा आहे. मात्र एका नियतकालिकाचे संपादन दहा-पंधरा वर्षे करतोय. ते नियतकालिक वैचारिक व परिवर्तनवादी आहे, आणि त्यात प्रामुख्याने राजकीय-सामाजिक विषयांवरील लेख असतात, ते विश्लेषणात्मक व चिकित्सक असतात. त्यामुळे आजची माझी मांडणी 'एका संपादकाच्या नजरेतून टिळक व आंबेडकर' या पद्धतीने पाहावी, अशी मी विनंती करतो.

काल आणि आज झालेल्या सर्व सत्रांमध्ये टिळकांच्या व्यक्तित्वाचा, विचारांचा व कार्याचा वेध तुकड्यातुकड्यांत घेण्याचा प्रयत्न झाला आहे, होतो आहे. त्यातील आजच्या सत्रात टिळक आणि त्यांचे समकालीन म्हणावेत असे तीन महापुरुष शाहू महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर, यांचा वेध घेतला जाणार आहे. टिळकांचा जन्म 1856 चा, शाहू महाराजांचा 1874, गांधीजींचा 1869 आणि आंबेडकर 1891. म्हणजे शाहू महाराज हे टिळकांपेक्षा 18 वर्षांनी, तर गांधीजी 13 वर्षांनी लहान होते. त्या दोघांचाही टिळकांशी काही वर्षे तरी थेट संबंध आलेला होता, आदान-प्रदान झालेले होते.

डॉ. आंबेडकर यांचे तसे नव्हते. ते टिळकांपेक्षा तब्बल 35 वर्षांनी लहान होते. त्यांची आणि टिळकांची कधीही भेट झाल्याचा उल्लेख कुठे सापडत नाही. एवढेच नाही तर, टिळकांचा मृत्यू झाला त्याच वर्षी म्हणजे 1920 मध्ये डॉ. आंबेडकर यांचे सार्वजनिक जीवन सुरू झाले. मात्र, त्या दोघांचे विचार व कार्य परस्परांना कसे व किती छेद देणारे वा पूरक होते, यावर दृष्टिक्षेप टाकायचे ठरवले तर असंख्य धागे हाती लागतात. पण त्यातील काहीच धागे समोर ठेवून, ते जुळवून व सुटे करून, काही एक चित्र उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातून कदाचित काही एक निष्कर्ष काढता येऊ शकेल.

त्या दोघांबद्दल एक चांगली गोष्ट अशी की, त्यांच्या आयुष्याची वाटचाल ढोबळमानाने सर्वांना परिचयाची असते. विद्यापीठीय स्तरावर कमी-अधिक वावरलेल्या भारतातील सर्वांना आणि महाराष्ट्रात तर शाळा-महाविद्यालयात गेलेल्या सर्वांना. त्यामुळे त्या दोघांचे चरित्र आणि त्यांची वाटचाल सांगण्याची गरज नाही. म्हणून माझे या पुढील 20 मिनिटांचे भाषण तीन भागांत विभागतो.

1. टिळक व आंबेडकर यांच्यातील साम्य आणि फरक
2. त्यांच्या विचारकार्याचा गाभा व आवाका
3. त्यांचे योगदान व आजची प्रस्तुतता

भाग 1 - साम्य आणि फरक

त्यांची काही साम्यस्थळे पाहू. टिळकांना 1856 ते 1920 असे 64 वर्षांचे आयुष्य लाभले, आंबेडकरांना 1891 ते 1956 असे 65 वर्षांचे आयुष्य लाभले. म्हणजे जवळपास सारखेच. टिळक वयाच्या 24 व्या वर्षी सार्वजनिक कार्यात आले, तर आंबेडकर वयाच्या 28 व्या वर्षी, म्हणजे दोघेही पंचविशीच्या टप्प्यावर सार्वजनिक कार्यात आले आणि पुढील 35 वर्षे कार्यरत राहिले.

टिळक व आंबेडकर हे दोघेही महाराष्ट्रीय, दोघेही मराठी भाषक. दोघांनीही वकिलीचे शिक्षण घेतले. दोघांनीही सुरुवातीच्या काळात आपल्या सार्वजनिक कार्यासाठी वृत्तपत्रे सुरू केली आणि चालवली. दोघेही प्रकांड पंडित. दोघांची विद्वत्ता प्रखर. दोघांनीही तत्त्व चिंतन म्हणावे असे ग्रंथ लेखन केले. दोघांकडेही तेजस्वी भाषा होती, जोरदार युक्तिवादासाठी आवश्यक कौशल्य होते, दोघेही आक्रमक व प्रतिपक्षावर तुटून पडणारे होते. दोघांनाही अनेक कडवे विरोधक लाभले. टिळकांना पूर्वार्धात आगरकर आणि उत्तरार्धात काँग्रेसमधील मवाळ गट प्रमुख विरोधक होते. आंबेडकरांना सर्व काळ प्रामुख्याने गांधी व काँग्रेस. पण दोघांनाही त्यांच्या हयातीतच प्रचंड लोकप्रियता लाभली. आणि दोघांनीही अखिल भारतीय पातळीवर कर्तृत्व गाजवले.

त्यांच्यातील प्रचंड मोठ्या फरकाचे काही मुद्दे लक्षात घेऊ. टिळक हे हिंदू धर्मातील जातीय स्तरीकरणात सर्वांत वरच्या स्तरात जन्माला आले, त्या जातीतील लोक शतकानुशतके चालत आलेल्या व्यवस्थेचे लाभार्थी. डॉ. आंबेडकर हे सर्वांत खालच्या स्तरावरील जातीत जन्माला आले, त्या जातीतील लोक शतकानुशतके शोषित. या प्रचंड मोठ्या दरीमुळे दोघांचे सार्वजनिक आयुष्य व संघर्ष दोन भिन्नच नव्हे, तर परस्पर विरोधी स्तरांवर वटचाल करीत राहिले. टिळकांचा लढा परकीय सत्तेच्या जोखडातून आपला देश मुक्त करण्यासाठी, तर आंबेडकरांचा लढा आपल्या समाजाला उर्वरित भारतीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी.

भाग 2 - विचार कार्याचा गाभा व आवाका

'आधी राजकीय की आधी सामाजिक' या वादात टिळक हे राजकीयच्या बाजूचे तर होतेच, पण आधी सामाजिक म्हणणाऱ्यांवर तुटून पडत होते. पुढील आयुष्यभर स्वराज्य मिळवण्यासाठी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही तीन हत्यारे वापरत होते. त्यासाठी कठोर परिश्रम घेत होते, कठोर तुरुंगवास भोगत होते. स्वराज्य हेच त्यांचे अंतिम ध्येय होते.1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचा मृत्यू झाला, त्याच्या सहाच महिने आधी आंबेडकरांचे सार्वजनिक आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू झाले. कारण 31 जानेवारी 1920 रोजी त्यांनी 'मूकनायक' हे पाक्षिक सुरू केले. त्या वेळी आंबेडकर 29 वर्षांचे होते. तेव्हा 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हा टिळकांनी देशाला दिलेला मंत्र गाजत होता. फेब्रुवारी 1920 मध्ये मूकनायकच्या अंकात आंबेडकरांनी लिहिले आहे, "तत्त्व म्हणून स्वराज्याला आपला नकार नाही. पण व्यवहार म्हणून पाहिले तर कोणाचे व कशासाठी स्वराज्य हे कळल्याशिवाय या तत्त्वाची री आम्ही तरी ओढू शकत नाही. मग कोणी ओढील तो ओढो बिचारे."

यातून उघडपणे दिसते, ही टीका राष्ट्रीय स्तरावर वावरणाऱ्या टिळकांविरुद्ध होती. टिळक आणखी जगले असते तर कदाचित गांधींकडे इतक्या लवकर देशाचे नेतृत्व गेले नसते आणि गेले असते तरी आंबेडकरांचा मोठा संघर्ष महाराष्ट्रात टिळकांविरुद्धच झाला असता.

त्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे 1939 मध्ये मुंबई विधीमंडळात भाषण करताना आंबेडकर म्हणतात, "जेव्हा वैयक्तिक हित व देशाचे हित असा प्रश्न येईल तेव्हा मी देशाच्या हिताला प्राधान्य देईल. मात्र अस्पृश्यांचे हित व देशाचे हित असा प्रश्न आला तर मी अस्पृश्यांच्या हिताला प्राधान्य देईल." हे वाक्य वाचून आंबेडकर हे टिळकांच्या पूर्णतः उलट उद्दिष्ट ठेवतात असे वरवर पाहणाऱ्यांना दिसेल. हे ऐकून/वाचून आंबेडकरांना देशविरोधी ठरवण्याचा मोह काहींना होईल. पण हे लक्षात घेतले पाहिजे की, टिळकांना दुःख होते आपला भव्य दिव्य वारसा असणारा देश पारतंत्र्यात असल्याचे, म्हणून ते सर्वस्वाचा त्याग करायला सिद्ध झाले होते; तुरुंगात जायला तयार होते. पण टिळकांना होता त्या अर्थाने आंबेडकरांना देशच नव्हता, त्यांना आपला अस्पृश्य समाज हिंदू समाजाच्या जोखडात खितपत पडलेला दिसत होता; तुरुंगापेक्षा भयानक यातना हा समाज रोज भोगत असलेला दिसत होता.

टिळकांनी भगवद्‌गीतेचा नवा अर्थ लावणारा 'गीता रहस्य' हा ग्रंथ लिहिला, त्याच्या मध्यवर्ती कर्मयोग आहे. मात्र हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा याकडे टिळक दुर्लक्ष करतात, काही वेळा समर्थन करतात, काही वेळा शास्त्रात समर्थन शोधतात.

दुसऱ्या बाजूला डॉ. आंबेडकरांनी 'मूकनायक' सुरू केले तेव्हा त्याच्या शिरोभागी प्रत्येक अंकात, तुकारामांचा पुढील अभंग छापला जात होता -

काय करू आता धरूनियां भीड। 
निःशंक हे तोंड वाजविले ॥ 
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण। 
सार्थक लाजून नव्हे हित ॥

आणि 'बहिष्कृत भारत'च्या प्रत्येक अंकात शिरोभागी 'ज्ञानेश्वरी'तील पुढील ओवी छापली जात होती -

आता कोदंड घेऊनि हातीं। आरूढ पा इये रथीं।
देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने. 
जगी कीर्ति रूढवीं। स्वधर्माचा मानु वाढवी। 
इया भारा पासोनि सोडवी। मेदिने हे. 
आतां पार्था निःशंकु होई। या संग्रामा चित्त देई।
एथ हे वांचूनि कांही। बोलो नये.

इथे लक्षात येते, टिळकांना ब्रिटिश हे कौरावाप्रमाणे वाटत असणार. आणि आंबेडकरांना स्पृश्य हिंदू समाज कौरवाप्रमाणे वाटत होता. 1914 मध्ये मंडालेहून सुटून आल्यावर टिळकांनी लिहिलेल्या पहिल्या अग्रलेखाचे शीर्षक 'पुनश्च हरि ओम'. आणि 1926 मध्ये आंबेडकर सहा वर्षांनी विलायतेतील शिक्षण पूर्ण करून परत आले आणि 'बहिष्कृत भारत' सुरू केले, तेव्हा पहिल्या अंकातील अग्रलेखाचे शीर्षक 'पुनश्च हरि ओम' असेच आहे.

बहिष्कृत भारत अडीच वर्षे चालले, त्यात लोकहितवादी यांची 'शतपत्रे' नंतरची दीड वर्षे पुनर्मुद्रित केली आहेत. ही शतपत्रे 1848 ते 1850 या काळात प्रसिद्ध झालेली आहेत.. म्हणजे तब्बल 70 वर्षांपूर्वीची पत्रे आंबेडकर पुनर्मुद्रित करीत होते. त्या पत्रांमधून काय आले आहे? प्रामुख्याने इंग्रजी विद्येचे महत्त्व आणि हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा. (आज लोकहितवादींचे स्मरण करायचा हवे. कारण त्यांचे 200 वे जयंती वर्ष सुरू होत आहे. 18 फेब्रुवारी 1823 हा त्यांचा जन्मदिवस) कशाच्या विरोधात आणि कशाच्या साह्याने लढायचे हे त्यातून ध्वनित होते. हिंदू समाजाच्या विरोधात आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे सूत्र घेऊन.

जानेवारी 1920 मध्ये सुरू केलेले 'मूकनायक' सहा महिन्यांनी बंद करून, विलायतेत जाऊन पुढील उच्च शिक्षण घेऊन, आंबेडकर सहा वर्षांनी परत आले. तेव्हा त्यांच्या मनावर फ्रेंच राज्यक्रांतीतील 'स्वातंत्र्य, समता, न्याय' या तत्त्वत्रयींचा प्रभाव स्पष्ट दिसतो. चवदार तळे सत्याग्रहाचे वर्णन त्यांनीच फ्रेंच राज्यक्रांतीच्या जाहीरनाम्याशी केले आहे. त्या वेळी 1927 मध्ये ते बहिष्कृत भारत समोर ठेवतात, मनू स्मृतीचे दहन करतात. त्यानंतर काळाराम मंदिर प्रवेशासाठीचा अयशस्वी लढा होतो आणि मग 1935 मध्ये येवल्यात ते घोषणा करतात - 'हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.' ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणायला ते आणखी 20 वर्षे घेतात, पण मृत्यूपूर्वी काही आठवडे ती प्रतिज्ञा पूर्ण करतात. धर्मांतर करताना सामाजिक, ऐहिक, तात्त्विक व धार्मिक या चारही अंगांचा विचार त्यांनी केलेला आहे आणि त्या सर्वांच्या मागचे सूत्र नवसमाज निर्मिती हेच आहे.

इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, आंबेडकरांचे हे संपूर्ण साडेतीन दशकांतील कार्य पाहायला टिळक हयात नव्हते. पण टिळकांकडून गांधींकडे देशाचे नेतृत्व गेले. त्यानंतर गांधींनी हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट घटकांचा धिक्कार केला असला तरी स्वतःला खरा हिंदू म्हणवून घेतले आणि 'हिंदू धर्मासमोरील मोठे आव्हान' असे आंबेडकरांना संबोधले होते. त्या काळात टिळक हयात असते तर त्यांची प्रतिक्रिया अधिक टोकाची राहिली असती. 'हिंदू धर्माचे मारेकरी' असेही कदाचित ते आंबेडकरांना म्हणाले असते.

इथे एक मर्यादा अशी आहे की, आंबेडकरांचे संपूर्ण सार्वजनिक कार्य टिळकांच्या मृत्यूनंतर असल्याने, टिळकांच्या विचारकार्याला आंबेडकरांचा प्रतिसाद दाखवता येतो. पण आंबेडकरांच्या कार्याला टिळकांनी कसा प्रतिसाद दिला असता हे मात्र एका मर्यादेपलीकडे ताणण्यात अर्थ नाही, जर-तरची भाषा योग्य नाही. कदाचित गांधी जसे बदलले, तसे टिळकही बदलत गेले असते. पण टिळक व आंबेडकर हा संघर्ष झालाच असता. आता पुढचा काव्यगत न्याय असा की, टिळकांचे चिरंजीव श्रीधर पंत यांच्या भूमिका आगरकरांच्या आणि आंबेडकरांच्या जवळ जाणाऱ्या होत्या. श्रीधर टिळक आणि आंबेडकर यांच्यात चांगलेच नाते निर्माण झाले होते. आणि 'श्रीधरपंत हे खरे लोकमान्य' असेही आंबेडकरांनी म्हटले आहे.

आंबेडकरांनी ब्राह्मण, ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत अशी मांडणी केली असली आणि उच्चवर्णीय समाजावर व नेत्यांवर कठोर टीका केली असली, तरी लोकहितवादी आणि न्या. रानडे यांच्याविषयी आंबेडकरांच्या मनात नितांत आदर होता. 'रानडे, गांधी अॅन्ड जीना' हे त्यांचे भाषण प्रसिद्ध आहे. रानडे यांनी सामाजिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे त्यात म्हटले आहे. या उलट 'गांधी व जीना यांच्या आत्मश्लाघेशी स्पर्धा करू शकेल अशी व्यक्ती या देशात नाही', असेही ते म्हणालेत.

भाग 3 - त्या दोघांचे योगदान आणि वारसा किंवा प्रस्तुतता

टिळक म्हणजे प्रखर राष्ट्रवाद. 'हिंदी असंतोषाचे जनक' हे टीकात्मक बिरुद त्यांना ब्रिटिशांनी लावले, नंतर ते भारतीयांनी अभिमानाने मिरवले. मात्र, 'बहिष्कृत भारताचा नायक' हे बिरुद आंबेडकरांसाठी अस्पृश्य समाजाने प्रेमाने लावले, स्पृश्य समाजाने त्याकडे अलिप्ततेने किंवा उपहासाने पाहिले.

टिळकांना ते स्थान कसे मिळाले? 1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये टिळक अधिक सक्रिय झाले ते 1895 नंतर (अर्थात त्याला अन्य कारणे आहेत, पण आगरकरांचा मृत्यू त्या वर्षी झाला, हे लक्षात घ्यावे असे). पुढील दहा वर्षे काँग्रेस संघटना थोडी विस्तारली. पण 1905 च्या बंगालच्या फाळणीनंतर काँग्रेस देशव्यापी होत गेली. मात्र त्यानंतर दोन-तीन वर्षांनी टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली. 1908 ते 14 ही सहा वर्षे त्यांची मंडाले येथील कारावासात गेली. तिथून सुटल्यावर त्यांना जेमतेम पाच-सहा वर्षे मिळाली, त्यातला टर्निंग पॉइंट म्हणता येईल अशी घटना म्हणजे लखनौ करार. काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यात 1916 मध्ये झालेल्या त्या कराराचे कर्ते करर्विते म्हणजे टिळक व जीना. त्या करारानुसार, मुस्लीम समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त मतदारसंघ दिले. स्वतंत्र मतदारसंघ. हा देश एकत्रपणे ब्रिटिशांच्या विरोधात लढत राहावा किंवा हिंदू-मुस्लीम दुही वाढवण्याचा ब्रिटिशांच्या प्रयत्नाला शह म्हणून असेल किंवा या देशात हिंदू-मुस्लीम एकत्र राहणार तर सामंजस्य वाढवावेच लागेल हा विचार प्रबळ झाला म्हणून असेल, पण टिळकांनी तो करार घडवून आणला. तेव्हा टिळक काँग्रेसचे सर्वोच्च नेते बनले.

पुढे त्या कराराचा उपयोग गांधींनी हिंदू-मुस्लीम यांच्यातील दरी कमी करण्यासाठी केला. त्यानंतर 16 वर्षांनी तसाच प्रश्न, अस्पृश्यांचे स्वतंत्र मतदारसंघ करण्याचा निर्णय ब्रिटिशांनी केला तेव्हा उद्भवला. तेव्हा गांधींनी अस्पृश्यांना 'स्वतंत्र ऐवजी राखीव मतदार संघ, पण संख्येने जास्त' असा डॉ. आंबेडकर यांच्यासोबत पुणे करार केला. अर्थात तो करार आंबेडकरांनी खुशीने नाही, तर गांधींच्या उपोषणामुळे निर्माण झालेल्या दबावातून केला. पण त्या टप्प्यावर केवळ 40 वर्षे वयाचे आंबेडकर देशातील अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते बनले.

त्यानंतर आंबेडकर जाहीरपणे म्हणू लागले की, 'आपल्या राजकारणाची दिशा हीच आहे की, आपण आता हिंदू समाजाचे घटक नाही.' त्याही पुढे जाऊन ते असेही म्हणू लागले की, 'आपण आता भारतीय समाजाचे मुसलमानांप्रमाणे स्वतंत्र घटक आहोत.' मात्र त्याच काळात त्यांनी 'Thoughts on Pakistan' हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी फाळणी अपरिहार्य आणि हिंदू-मुस्लीम या दोहोंच्या हिताची आहे, असे स्पष्टपणे बजावले. जबरदस्ती करून अखंड भारत शक्य नाही, एकत्र राहण्याची इच्छा नसेल तर तसा आग्रह धरण्यात अर्थ नाही, असेही सांगितले. ते पुस्तक काही बाबतीत हिंदुत्ववाद्यांना, तर काही बाबतीत मुस्लीम लीगला बळ देणारे वा युक्तिवाद पुरवणारे वाटेल. मात्र ते पुस्तक मूलतः स्पृश्य हिंदू समाज व मुस्लीम समाज या दोहोंच्या विरोधातील आहे, दोन्ही धर्माच्या विरोधात आहे.

इथले आंबेडकर हे टिळकांच्या आणि गांधींच्या पूर्णतः विरोधातील वाटतात. मात्र 1946 च्या डिसेंबरमध्ये भारतीय संविधान सभा भरते, तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या प्रस्तावातील तरतुदी देशातील केंद्र दुबळे करणाऱ्या व प्रांतांना फुटून निघण्यास वाव देणाऱ्या असल्याचे ते ठोसपणे मांडतात. आणि त्याच वेळी संविधान सभेवर मुस्लीम लीगच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला म्हणून संविधान बनवण्याचे काम थांबवण्याची गरज नसल्याचेही सांगतात. इथे मात्र आंबेडकर देशाची बांधणी करण्यासाठी पूरक भूमिका घेताना दिसतात. या बदलाचे काहींना आश्चर्य वाटेल. पण याचे कारण नवे संविधान ही आंबेडकरांना नव्या भारताची आशा वाटू लागली असणार. (मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड त्यानंतर झालेली आहे, कदाचित या भूमिकेमुळेही ती निवड सोपी झाली असेल.)

आता टिळकांना जाऊन 100 वर्षे झालीत आणि आंबेडकरांना जाऊन 65 वर्षे झाली आहेत. जसजसा काळ पुढे जातो आहे, तसतसे डॉ. आंबेडकरांचे योगदान अधिकाधिक अधोरेखित होते आहे, त्यांनी स्थापन केलेला पक्ष नीट उभाच राहू शकलेला नाही. पण त्यांची सर्वस्तरीय व सर्वपक्षीय स्वीकारार्हता वाढत चालली आहे. दलितांचे कैवारी, बहिष्कृत भारताचा नायक, भारतीय संविधानाचा शिल्पकार, भारतीय लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ प्रवक्ता, आणि आता मानवी हक्कांचा उगाता असे चढत्या क्रमाने त्यांचे वर्णन सर्वमान्य होताना दिसत आहे. आणखी 35 वर्षांनी त्यांचे स्मृती शताब्दी वर्ष येईल, तेव्हा तर डॉ. आंबेडकरांचे स्थान भारतीय जनमानसात आणखी मोठे झालेले असेल. विशेष म्हणजे त्यांनी अत्यंत कठोर व कडवट टीका केली त्या महात्मा गांधींचे स्थानही आणखी मोठे झालेले असेल. मात्र लोकमान्य टिळक यांचे नाव काँगेस पक्ष गेली अनेक वर्षे घेत नाही, त्यांचे नाव सर्वच स्तरांवर विस्मृतीत जात आहे, आजसाठी ते प्रस्तुत वाटेनासे झाले आहेत. याचे मुख्य कारण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टिळकांना 35 वर्षे सहभागी होण्याची संधी मिळाली, पण तेव्हा संपूर्ण देश जागा झालेला नव्हता. त्यानंतर 25 वर्षे लढा चालला आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले. आणि आता स्वातंत्र्य मिळूनही 75 वर्षे झाली आहेत. पण टिळकांचे राजकारणच गांधीजींनी पुढे अधिक व्यापक व सखोल करीत नेले हे सूत्र, साधार व प्रभावीपणे मांडण्याचे काम काही अभ्यासकांनी केले आहे. त्यात आचार्य जावडेकर ते सदानंद मोरे यांचा समावेश आहे. लोकमान्य टिळकांची महनीयता अधोरेखित करण्यासाठी तेवढेही पुरेसे आहे.

Tags: भाषण टिळक व आंबेडकर विनोद शिरसाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे ( 99 लेख )
vinod.shirsath@gmail.com

मागील दोन दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके