नीती लोकांपासून व लोक तिच्यापासून फटकूनच राहतात. तिची देहबोली, चेहऱ्यावरचे भाव व एकंदर व्यक्तिमत्त्वच हा समज दृढ करणारे आहे. म्हणूनच कदाचित 'व्हाय आर यू सो हार्ड टू युअरसेल्फ ?' या परकीय मित्राने विचारलेल्या प्रश्नाला तिच्याकडे उत्तर नव्हते. ते देण्याची गरजही तिला वाटली नाही, इतका तो कडकपणा तिच्या अंगी मुरलेला आहे. तरीदेखील माझ्यासारख्या चिवट मैत्रिणी तिने स्वतःभोवती घालून घेतलेल्या तटबंदीला अधूनमधून धडक देऊ पाहतात. विशिष्ट क्षेत्राची चौकट मोडून, त्याविषयी जराही गवगवा न करता, हरहुन्नरी राहून, मान व पाठ दुबळी झाली तरी त्यांना सांभाळून नवे आकार व नवे आयाम शोधण्याची आस कायम राखलेली माणसे त्याहून कमी असतात. नीती त्यांपैकी एक आहे.
एकंदरीतच, ललित साहित्यापेक्षा नीतीचे लक्ष भाषेच्या संरचनेकडे अधिक आहे. तिचा संशोधन विषयही संप्रेषण सिद्धांताशी संबंधित होता. काही काळ परदेशस्थ विद्यार्थ्यांना तिने मराठी शिकवले. त्यावर न थांबता 'लर्निंग मराठी अॅज अ फॉरेन लँग्वेज' हे पाठ्यपुस्तकही तिने तयार केले. भाषा आणि जीवन या त्रैमासिक नियतकालिकात तिने सातत्याने लेखन केले. पण याहून महत्त्वाचे म्हणजे 2022 मध्ये भाषेकडे बघताना, मराठी भाषेकडे बघताना, आणि बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे अशी तीन पुस्तकांची मालिकाच 'अनंत अक्षर' भाग एक, दोन व तीन या शीर्षकांवर तिने स्वतः परिश्रमपूर्वक सिद्ध तर केलीच; शिवाय प्रसिद्धही केले.
तशी तर साधारण 1980 सालापासून तिला मी दुरून का होईना; पण पाहत होते. तेव्हापासून ती मला माहीत होती. ती पुण्यातील 'विश्वकर्मा प्रकाशना'चे संस्थापक राजाभाऊ व मालुताई माटे यांची मुलगी आणि तिच्याहून अवघ्या एका वर्षानं मोठ्या असलेल्या उत्तम गिर्यारोहक उमद्या भावाची निनादची बहीण, तशीच आरती व नितात्त या धाकट्या भावंडाची ही ताई. पण याहून महत्त्वाचे म्हणजे त्या काळात अप्रूप असलेल्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषा व साहित्य यांमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केलेली, कायम विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेली अत्यंत अभ्यासू व शिस्तशीर विद्यार्थिनी ! हुजूरपागा या त्या वेळी नावाजलेल्या शाळेत शिक्षण घेऊन, पुढे सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून व पुणे विद्यापीठातून आपले अध्ययन एकमार्गीपणे नीतीने पूर्ण केले. तिच्याविषयी आत्मीयता आणि अंशतः आकर्षण वाटायला इतपत चारित्रात्मक तपशीलसुद्धा पुरेसे होते.
त्यात नीतीचे दर्शन काहीसे धाक उत्पन्न करणारे असे. आपण बरे आणि आपले काम बरे, अशा पद्धतीने तिचे सरळमार्गी चालणे, रोखठोक बोलणे व आखडून वागणे होते, आजही वयोमानाने चेहऱ्यावरचे कठोर भाव काहीसे सौम्य झाले असले तरी तिचा मूळ स्वभाव कायम आहे. म्हणून आपला आखीव रेखीव दिनक्रम विसकटेल अशी कोणतीही कृती ती सहसा करत नाही. स्वतःच्या अटींवर जगण्याचा निश्चय पक्का असल्याने आणि याचे सहसा कधीही विस्मरण होत नसल्याने ती तिने ठरवलेले काम करत राहते.
1975-80च्या सुमारास जर्मन भाषा शिकणारे विद्यार्थी व शिकवणारे प्राध्यापक संख्येने फार नव्हते. या विषयाकडे तेव्हा गरज म्हणूनच पाहिले जाई. उद्योगजगातला किंवा वकिलातीला भाषांतरकार / दुभाषे लागत. यापलीकडे जर्मन भाषेला व साहित्याला महत्त्व नव्हते. मराठी विद्वानांना व साहित्यिकांना त्यातल्या त्यात फ्रान्स काफ्का, हाईनिरीश ब्योल, बट्रॉल्ड बेश्ट व ग्युंथर ग्रास, ग्यो एथे. इ ची नावे व त्यांचे थोडेफार लेखन ज्ञात होते, त्याहून कमी जणांनी ते इंग्रजीतून वाचले होते. अशा परिस्थितीत नीतीला 1973 मध्ये शैक्षणिक वर्षाच्या आरंभी पार्ले महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरी मिळाली. स्वतःच्या उत्तम अध्यापनामुळे ती तिथे टिकून राहिली. एवढेच नव्हे, तर तिच्या उपलब्धीमुळे या महाविद्यालयाने जर्मनचा अभ्यासक्रम पदवीच्या स्तरापर्यंत वाढवला. तशी सोय त्या वेळेस एखादुसरा अपवाद वगळता कुठेही नव्हती. वास्तविक नीतीला अध्यापन क्षेत्रात येण्याची व तेथेच स्थिरस्थावर होण्याची फारशी इच्छा नव्हती. बुद्धिमान असल्याने तिने प्रशासकीय अधिकारी व्हावे त्यासाठी आवश्यक त्या परीक्षा द्याव्यात अशी भाऊंची (म्हणजे वडिलांची) इच्छा होती. तर तिला स्वतःलापण सिरॅमिक्सची वेगवेगळ्या आकारांची भांडी तयार करून, तो छंद जोपासावा अथवा एखाद्या समाजसेवी संस्थेत काम करावे, समाजातील अभावग्रस्त नानाविध समस्यांनी गांजलेल्या लोकांसाठी झटावे असे वाटत होते. इरादे नेक होते, क्षमताही होती; पण हळूहळू शिकण्या-शिकवण्यातला तिचा रस व गती वाढत गेली. तसेही शासकीय यंत्रणेचा भाग व्हावे असे तिला मनोमन वाटत नव्हते आणि नोकरी करून सामाजिक कार्यात ती सहभागी होऊ शकत होती. त्यामुळे या दोन्ही वाटांवरून ती गेली नाही हे एक प्रकारे चांगलेच झाले. कारण कित्येक विद्यार्थ्यांना तिने घडवले. मातीला सुघड, सुबक आकार देऊन कलात्मक वस्तू तयार करता करता तरुण मुलांचे आयुष्यही कसदार होईल याकडे तिने आजपर्यंत लक्ष दिले. त्यामुळे नीतीच्या घरात जागोजागी तिच्या हस्तकौशल्याच्या खुणा आपले लक्ष वेधून घेतात. अध्यापन करत असताना नेहमी वाटते की, शिक्षकाने विद्यार्थ्यांची नावे सांगण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी हे / ह्या मला / आम्हाला शिकवायला होते / होत्या असे आवर्जून सांगितले तर ते शिक्षकाच्या दृष्टीने अधिक अभिमानास्पद ठरते. नीतीचे नाव घेणारे तिचे अनेक विद्यार्थी व सहकारी मला माहीत आहेत. सवंग लोकप्रियतेची कोणतीही तंत्रं तिच्या अंगी नाहीत. तिचा स्वभावही रूढ अर्थाने मनमिळावू, सौम्य, शीतल वगैरे नाही. बाह्य दर्शनापासूनच ती किती चोखंदळ आहे हे जाणवते. सुरुवातीच्या काळात ती सुती रेशमी साड्या नेसत असे आणि व्हेस्पा स्कूटर चालवत असे. मुंबईत नोकरी करत असतानाही ती बांद्र्याला राहून पार्थ्यापर्यंत हमरस्त्यावरूनच जात असे. एकीकडे जर्मन शिकवत असताना दुसरीकडे प्रभादेवीच्या 'रचना वास्तुरचना' विद्यालयातून तिने एक वर्षाचा टेक्स्टाइल डिझायनिंगचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केला. कारण निरनिराळ्या वस्त्रांचे पोत, त्यातील धागेदोरे यांत तिला रस होता. जमले तर त्यात काहीतरी करावे ही ऊर्मीही होती. पुढे जरी तिने शिक्षकी पेशा स्वीकारला आणि तो आवडीने व निष्ठापूर्वक केला तरी 'कौशल्य आहे रचनेत मोठे' याची प्रचिती तिच्या घरातील नीटनेटक्या मांडणीवरूनही येते.
विशेष हे की, पुण्यामध्ये एके काळी अभिजनांची वस्ती असलेल्या डेक्कन जिमखान्यावर अतिशय मोक्याच्या जागी राहत असूनही नीती राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वास्तवाबद्दल सजग व सतर्कही असते. सामाजिक जाणीव आणि समाजातील शोषित-वंचितांविषयी सहसंवेदना असल्याने ती आत्मनिष्ठ असली तरी आत्मकेंद्रित नाही. किंबहुना, तशी ती असती तर कदाचित आमची (उशिराने झालेली व सहजपणे वाढत गेलेली) मैत्री झाली व टिकलीही नसती. कारण शैक्षणिक प्रावीण्य उच्च विद्याविभूषित असणे, पद, पैसा व प्रतिष्ठा कमावणे आणि आत्मसन्मान अबाधित राखणे हे कितीही मूल्यवान असले तरी सुहृदयता, अंतर्यामीचा ओलावा, करुणा आणि मुख्य म्हणजे मानवी नातेसंबंध मग त्यातले राग, लोभ, प्रेम, तिरस्कार आणि संवाद-विसंवाद यांचे रंग कधी गडद तर कधी फिके होत असले तरी नीतीचा प्रयत्न त्यांना सामोरे जाण्याचा व ते जपण्याचा असतो. त्याकडे पाठ फिरवून ती सहसा पलायनवादी होत नाही. काही वेळा ती अप्रिय होते. तिला आपल्या विचारांची, कृतीची किंमत मोजावी लागते. पण खेळ मध्येच सोडून देणं किंवा मैदानातून दूर निघून जाणं हा तिचा स्वभाव नाही.
1990 मध्ये धारवाडस्थित डॉ. श्रोतीच्या मार्गदर्शनानुसार तिने 'तौलविक युवा रंगभूमी आणि संप्रेषण सिद्धान्त' या विषयात विद्यावाचस्पती पदवी संपादन केली. 1979मध्येच ती पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागांतर्गत जर्मनचे अध्यापन करू लागली तरी त्यानंतरची प्रत्येक बढती (जी तिला सहज साध्य व्हायला हवी होती) मिळवण्यासाठी तिला झगडावे लागले वस्तुतः या पदवीपर्यंत पोहोचलेली ती पहिली प्राध्यापक होती. तरीही तिला अन्याय सहन करावा लागला. कोणाच्याही पुढे पुढे करणे किंवा अनाठायी गोडवे गाणे किंवा काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी लाचारी पत्करणे स्वभावात नसल्याने नीतीला नंतर जरी वेळोवेळी बढत्या मिळत गेल्या, (ती सुरुवातीपासून पूर्ण वेळ प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख झाली.) तरी यातले काहीही सरळ मार्गे घडले नाही. चार दशकांकडून अधिक काळ नीतीने नोकरी केल्यावर अगदी निवृत्तिवेतनासंबंधीचा तंटाही न्यायालयात जाऊन तिला सोडवावा लागला. त्यासाठी दाद मागावी लागली. यात तिच्यासमवेत आणखी सात-आठ जणही असले तरी या गटाचे नेतृत्व तिच्याकडे आपसूक आले. कारण आपली बाजू समोरच्यालाच नव्हे तर वकिलाला समजावून सांगणे पटवून देणे व त्यासाठी तर्कशुद्ध युक्तिवाद करणे तिला साधते. (त्यामुळे कदाचित तिच्या वकिलांनीही तिला प्रशस्तिपत्रक दिले.) अखेरीस, त्या सात वर्षे केलेल्या कायदेशीर लढाईला यश आले आणि नीतीबरोबर असलेल्या सर्वांनाच नियमानुसार निवृत्तिवेतन (शासनाकडील थकबाकीसकट) मिळू लागले. या विलंबाची पूर्वकल्पना नसली तरी एरवीच गरजा फारशा नसल्याने आणि राहायला स्वकमाईतून आधीच घेऊन ठेवलेलं घर (त्यातही काही वाटा वडिलांनी उचलला होता हे सांगायला ती विसरत नाही) असल्याने ती स्वतंत्र राहू शकली. त्यामुळे प्रत्येकाने आणि विशेषतः एकट्या स्त्रीने आर्थिकदृष्ट्या सक्षम असायलाच हवे, आपल्या स्वतःच्या पायांवर उभे राहण्याची ताकद तिने कधीही गमावता कामा नये हे ती आग्रहपूर्वक अधोरेखित करते.
तसेच आपण निवडलेल्या कार्यक्षेत्रातही गुंतवणूक असायला हवी हे ती कटाक्षाने पाहते. कोणत्या ना कोणत्या कामात ती सदैव मग्न असते. आता आत्तापर्यंत सर्व गृहकृत्ये ती बिनतक्रारच नव्हे, तर आवडीने करत होती. स्वच्छता, शोभिवंतपणा व सौंदर्यदृष्टी यांबाबत दक्ष असल्याने चादरी, उश्यांचे अभ्रे बदलण्यापासून स्वतःचे लेखन संगणकावर बसून क्रमवार करण्या, लावण्यापर्यंत ती टापटिपीने पार पाडते. रुचकर स्वयंपाक तर ती करतेच; पण ते जिन्नस नीट मांडलेलेही असतात. नीतीला मी कधी यात कुचराई करताना, कंटाळा व आळशीपणा करून कसेबसे उरकताना पाहिलेले नाही किंवा त्यात तडजोड करायलाही तिची तयारी नसते. मी तिच्या हातचे पदार्थ बऱ्याचदा खाल्ले आहेत. एवढेच नाही, तर मला काय आवडते तेही तिला माहीत आहे. ते जर केले असेल तर कसेही करून आवर्जून ते मला मिळेल हे ती बघते. काही वेळेस तर तोशीस घेऊन स्वतः आणून देते. तिच्या या आत्मीयतेने पोटच नव्हे तर त्याहून कितीतरी पटींनी अधिक माझे मन भरून आले आहे.
ऋत्विक (माझा मुलगा) रुग्णालयात असताना तुफान गर्दीचा रस्ता ओलांडून तिने मला डबा पोहोचवला आहे. ऋत्विकच्या प्रकृतीची विचारपूस ती करते. त्यामागे केवळ चौकशी नसून, आम्हा दोघांबद्दल तिला वाटणारी काळजी मला जाणवते. याचे मोल मोजता येणारे नाहीच आहे. किंवा शब्दांतूनही ते सांगितल्याने समाधान होत नाही म्हणून तसा प्रयत्नही मी करत नाही. यातून तिच्या अंतर्यामी असलेले प्रेम आणि वात्सल्यभाव प्रत्ययास आल्यावाचून राहत नाही. वरपांगी मात्र नीतीचे दर्शन कडक आणि कठोर असल्याने माणसे तिला बिचकतात. शिवाय, बोलता-वागताना ती बऱ्यापैकी सावध तपशिलांबाबत (ही) काटेकोर असते, त्यामुळे आपल्यालाही जागृत राहावे लागते.
हे सारे स्वभावविशेष तिच्या आजवर केलेल्या अभ्यासपूर्ण लेखनातही उतरले आहेत. मग ती परिषदांच्या परिसरात आणि पर्यटनाच्या परिघात राहून केलेली विविध देशांची (युरोप खंडातील जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया इ.) वा म्युनिक, बर्लिन, ब्रेमन, पॅरिस, व्हिएन्ना व साल्बर्ग यांसारख्या शहरांची वा लोसान, स्काग, फुल्डा यांसारख्या छोट्या गावांची केलेली मनसोक्त मुशाफिरी असो अथवा यापेक्षा मूलतः भिन्न स्वरूप असलेले गावखेड्यातील, वाड्यावर त्या सहा अशिक्षित शोषित बायकांनी जिद्दीने असामान्य धैर्य दाखवून काबाडकष्ट करून सावरलेल्या कुटुंबकथा शब्दांकित करणारे 'बिकट वाट' असो; पिंडधर्म चिकित्सक अभ्यासकाचा असल्यामुळे प्रमाण / आधार दिल्याशिवाय नीती विधान करत नाही. अनाठायी सांगोवांगीच्या गोष्टी लिहून किंवा अतिशोक्ती करून वाचकांना रंजक वाटतील असे विनोद, शाब्दिक कोट्या करून ती आपला मजकूर सजवत नाही. यथातथ्य तर लिहायचे; पण ते वाचनीयदेखील असायला हवे तसेच त्यात भावपूर्णताही हवी, हे साधणे अत्यंत अवघड असते. कारण अशा तऱ्हेच्या साहित्याचा वाचकही सुबुद्ध, सुजाण व संवेदनशील असावा लागतो. भोवतालचे अनेकांगी भान लेखकाप्रमाणे त्यालाही असणे आवश्यक ठरते. कारण तरच बर्लिनची भिंत, मोझार्टचे संगीत, रोदाँचे शिल्प, रिल्कचे काव्य आणि ब्रेश्तचे श्री पेनी ऑपेरा यांची महती वाचकाला कळू शकते. या दृष्टीने 1992 मध्ये तिचे काफ्का ते केलमान हे संपादित पुस्तक गटे इन्स्टिट्यूटच्या पुढाकाराने प्रकाशित झाले. काफ्का, ब्योल, ग्रास, जेलीनेक व केल्मान या पाच मातब्बर साहित्यिकांचा आणि त्यांच्या वाङ्गयीन कामगिरीचा परिचय करून देणारे हे लेखन आहे. त्यात काफ्काच्या कादंबऱ्यांवर नीतीने दीर्घ लेख लिहिला आहे. हे पुस्तक आणि 'निवडक काफ्का' या शीर्षकाला अनुसरून काफ्काच्या वेचक साहित्यकृतींचा अनुवाद व त्यावर भाष्य समाविष्ट असलेला संग्रह हे नीतीने केलेले काम मला प्रशंसनीय वाटते. कारण मुळात काफ्का हा माणूस समजावून घेणे कठीण आहे. त्याचे असंगतता, परात्मता यांची प्रचिती देणारे साहित्य डोक्याला पुरेपूर ताण देणारे आहे. साक्षात मूळ भाषांतून म्हणजे जर्मनमधून नीतीने हे मराठीत आणल्याने त्याची विश्वासार्हता मोठी आहे. पण हेच तिने हाईनिरीश ब्योल, बट्रॉल्ड बेश्ट व ग्युंथर ग्रास इ.च्या साहित्याबाबतही केले असते तर मराठी वाचकांच्या दृष्टीने तेही मौलिक व सोयीचे ठरले असते, यात शंका नाही. भविष्यातही लेखस्वरूपात का होईना; पण तिने ते करावे असे मला तीव्रतेने वाटते. त्याचप्रमाणे; नीतीने मराठी साहित्याकडे जेवढे लक्ष द्यायला हवे होते तेवढे ते दिलेले नाही. नियतकालिकांतून तिने जे विपुल लेखन केले आहे ते प्राधान्याने भाषा व व्याकरण यांच्याशी संबंधित आहे. परंतु मराठी गद्य-पद्याचे जर्मन अनुवाद करणे, तिकडच्या वाचकांपर्यंत इकडचे संगीत पोहोचवणे, मध्ययुगीन व आधुनिक साहित्याची त्यांना ओळख करून देणे, त्याचे रसग्रहण व मर्म कथन करणे हे परकीय भाषा विभागातले विद्वान लोक जाणीवपूर्वक का करत नाहीत हे उमजत नाही. गेल्या 25 वर्षांत अंतरसांस्कृतिक आकलनाला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर साहित्यिक कृतींचे विश्लेषण नीतीसारख्या तयारीच्या अभ्यासकांनी केले तर ते उपयुक्त व पथदर्शी ठरू शकेल.
एकंदरीतच, ललित साहित्यापेक्षा नीतीचे लक्ष भाषेच्या संरचनेकडे अधिक आहे. तिचा संशोधन विषयही संप्रेषण सिद्धांताशी संबंधित होता. काही काळ परदेशस्थ विद्यार्थ्यांना तिने मराठी शिकवले. त्यावर न थांबता 'लर्निंग मराठी अॅज अ फॉरेन लँग्वेज' हे पाठ्यपुस्तकही तिने तयार केले. भाषा आणि जीवन या त्रैमासिक नियतकालिकात तिने सातत्याने लेखन केले. पण याहून महत्त्वाचे म्हणजे 2022 मध्ये भाषेकडे बघताना, मराठी भाषेकडे बघताना, आणि बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे अशी तीन पुस्तकांची मालिकाच 'अनंत अक्षर' भाग एक, दोन व तीन या शीर्षकांवर तिने स्वतः परिश्रमपूर्वक सिद्ध तर केलीच; शिवाय प्रसिद्धही केले. यासाठी केवळ कल्पना सुचणे व बौद्धिक तयारी असणे पुरेसे नसते तर बारीक-सारीक तपशील पुन्हा पुन्हा चिकाटीने तपासावे लागतात. कोणताही अवयव कुरकुरत असला किंवा अगदी आजारपण आले तरी नीती बऱ्याचदा संगणकाला चिकटलेली, हनुवटीवर हात ठेवून तीक्ष्ण नजरेने समोरच्या पडद्यावर दिसणाऱ्या शब्दांकडे एकटक पाहत असते. यात भ्रमणध्वनीने व्यत्यय आणला तरी तेवढ्यापुरते संभाषण करून ती पुन्हा एकाग्रतेने स्वतःच पत्करलेल्या कामावर रुजू होते. कोणतेही बाह्य बंधन नसताना स्वयंप्रेरणेने कसे (बिनखपाऊ व अनाकर्षक) प्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेणे सोपे नसते; पण नीतीने ते पूर्ण केले. केवळ विद्या आणि कलाविषयकच नव्हे, तर राजकीय-सामाजिक घटनांविषयीही ती जागरूक असते. एके काळी ती शिवणकाम सफाईने करत होती, वाहन चालवत होती, साडी नेसून सिंहगड चढत-उतरत होती, डोळसपणे आणि आस्वादक वृत्तीने नाना प्रकारच्या आविष्कारांकडे बघत होती. 1973 मध्ये झालेल्या तिच्या लग्नात सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात राजाभाऊ माटे यांनी त्यांच्या सख्ख्या मामेभावाच्या म्हणजे अरुण जोगळेकरांच्या पत्नीने अनुवादित व दिग्दर्शित केलेल्या, तेव्हा गाजलेल्या 'नांदा सौख्यभरे' या नाटकाचा प्रयोग ठेवला होता. हीच उत्सुकता आणि उत्साह तिने आजही कायम ठेवला आहे.
मध्यंतरी, या दिनक्रमाला खीळ बसते की काय, अशी विपरीत परिस्थिती तिच्या पाठीच्या दुखण्यामुळे निर्माण झाली. पाठीच्या कण्यातील मणक्यामध्ये अचानक रक्तस्राव (हिमेटोमा) झाल्याने एके दिवशी सकाळी तिला असह्य वेदना होऊ लागल्या. मग रुग्णालय, त्यावरचे औषधोपचार, वैद्यकीय चर्चा हे चक्र सुरू झाले. धाकट्या भावाकडे ती काही दिवस राहिली खरी; पण दुखणे जरा आटोक्यात आल्यावर ती तिच्या स्वतःच्या घरी परत आली.
गेली जवळपास पाच दशके नीती जबाबदारीच्या पदांवर काम करते आणि एकटी राहते आहे. एरवी यात विशेष काही वाटत नाही. कारण कितीतरी वयस्कर व्याधिग्रस्त स्त्रिया एकट्या असतात. दिवसा, रात्री कोणाच्यातरी सोबतीने त्या हे एकटेपण निभावतात. नीतीला सोबतीची गरज वाटत नाही. याची दोन कारणे ती सांगते. एक तर स्वातंत्र्य हे मूल्य तिला अतिप्रिय आहे. भाडोत्री सोबत कशाला हवी? वास्तविक ती परदेशात गेली असताना घरात चोरी झाली; पण या अनुभवाने तिने स्वतंत्र राहण्याच्या आपल्या निर्णयाला किंचितही मुरड घातली नाही. तरुण वयात लग्नानंतर जेमतेमही अडीच वर्षांत पतिनिधनाचे दुःख पचवल्यानंतर तिने जो निश्चय केला तो आजतागायत कायम राहिला. 'माझी तीन दगडांची चूल मी वेगळी मांडेन' हे आपले म्हणणे तिने खरे केले. ती तसे करू शकली याचे एक कारण तिची तीनही भावंडे पुण्यात आहेत आणि मध्यरात्री जरी हाक मारली तरी ती धावून येतील या आधाराची तिला खात्री आहे. आणि आतापर्यंत त्यांनी तिचा विश्वास सार्थ ठरवला आहे. सध्याच्या दिवसात नात्यांचे बंध विरळ होत असताना या चार भावंडांचे मैत्र (त्यातही नीती व आरती या दोघी बहिणींमध्ये एका पिढीचे अंतर आहे) त्यांच्यातील साम्य-भेदांसकट अबाधित राहिले आहे हे उल्लेखनीय म्हटले पाहिजे. कदाचित, यामुळे नीतीला भय व असुरक्षितता वाटत नाही. किंबहुना, ती निर्भय नसती तर कोणाच्या ना कोणाच्या कृपाकटाक्षावर अवलंबून राहण्याची वेळ तिच्यावर आली असती, सहानुभूतीचा विषय बनली असती, कारण तब्बल पन्नास वर्षे ती एकटी राहते आहे. जेव्हा पुणे-मुंबई विमानतळापर्यंत टॅक्सीसेवासुद्धा नव्हती आणि तिला हक्काचे घर नव्हते तेव्हा पेईंग गेस्ट म्हणून राहणे, परदेशात प्रवास करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, त्याकरिता लागणारे पैसे, परकीय चलन यांची तरतूद करून शिवाय, बौद्धिक तयारीने तिकडे जाणे, राहणे या अनुषंगाने येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या नीतीने बिनबोभाट पेलल्या.
ती कधी कोणाच्या वाकड्यात शिरत नाही कारण त्यासाठी तर फारच उद्योग, उपद्व्याप करावे लागतात. नीतीला दुसऱ्यांच्यात एवढा रसच नसतो. तिच्या जवळच्या मोजक्या माणसांमध्ये ती काही एका मर्यादेपर्यंत (च) रमते. तिला मी कधीही घोळक्यात, गोतावळ्यात व मैत्रिणींच्या वेगवेगळ्या गटांमध्ये खाता-पिताना, खरेदी करताना, निरुद्देश सहलींना जाताना व गावगाड्यात वेळ घालवताना पाहिलेले नाही. किंवा ती कधी कंटाळलेली, आळसटलेली, सुस्त व गबाळग्रंथीही दिसत नाही. यामुळेच कदाचित 1988-90 या दोन वर्षांत तिने आपले संशोधन पूर्ण केले असावे.
निर्भय आणि निर्भीड असल्याने लौकिक अर्थाने कोणी कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या सहवासात ती वाहवत जात नाही. त्याच्या प्रभावाने दिपून जाऊन तिचा विवेक तारतम्य हरपत नाही. यामुळे नीतीचे आसपास असणे काही वेळा अडचणीचेही ठरू शकते. पण कोणत्याही बाह्य दडपणाची परवा न करता स्वतःला जे पटते तेच ती बोलते आणि करते. आता अशा कोणापुढे पदर न पसरणाऱ्या, कैफियत न मांडणाऱ्या, रडगाणे न गाणाऱ्या आणि मुख्य म्हणजे मान टाकण्यासाठी कोणाचातरी पदोपदी खांदा न शोधणाऱ्या स्वयंपूर्ण स्त्रिया बहुतांश लोकांना मनापासून आवडत नाहीत. कारण त्या व्यावहारिकदृष्ट्या दर वेळेस प्रसंगोचित, सर्वांना रुचेल व सोयीचे ठरेल असे बोलतील, वागतील याची खात्री नसते.
परिणामी, नीती लोकांपासून व लोक तिच्यापासून फटकूनच राहतात. तिची देहबोली, चेहऱ्यावरचे भाव व एकंदर व्यक्तिमत्त्वच हा समज दृढ करणारे आहे. म्हणूनच कदाचित 'व्हाय आर यू सो हार्ड टू युअरसेल्फ?' या परकीय मित्राने विचारलेल्या प्रश्नाला तिच्याकडे उत्तर नव्हते. ते देण्याची गरजही तिला वाटली नाही, इतका तो कडकपणा तिच्या अंगी मुरलेला आहे. अगदी आजारपणासंबंधीची माहिती, निदान व औषधोपचारही तिने नेमक्या शब्दांत वस्तुनिष्ठपणे लिहून काढले व हे माहितीपत्रक तिच्या निकटवर्तीयांना पाठवले. म्हणजे पुनरुक्तीने येणारा कंटाळवाणेपणा व ताण आपसूक टळेल. तरीदेखील माझ्यासारख्या चिवट मैत्रिणी तिने स्वतःभोवती घालून घेतलेल्या तटबंदीला अधूनमधून धडक देऊ पाहतात. कारण आपापल्या क्षेत्रात पारंगत असलेल्या व्यक्ती, मग त्या संख्येने कमी (च) असल्या तरी आसपास दिसतात; पण विशिष्ट क्षेत्राची चौकट मोडून, त्याविषयी जराही गवगवा न करता, हरहुन्नरी राहून, मान व पाठ दुबळी झाली तरी त्यांना सांभाळून नवे आकार व नवे आयाम शोधण्याची आस कायम राखलेली माणसे त्याहून कमी असतात. नीती त्यांपैकी एक आहे. तिची धार कधीही बोथट होणार नाही, होऊ नये. कारण अंतर्यामी ऐवज असलेली आणि त्याचे प्रदर्शन तर सोडाच; पण दर्शनही येता-जाता न घडवणारी अशी कितीशी माणसे आता शिल्लक आहेत ?
जर्मन भाषेच्या प्राध्यापक आणि मराठी लेखिका नीती बडवे यांनी, 15 डिसेंबर 2025 रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या