डिजिटल अर्काईव्ह

जी. डी. पारेख यांनी "सत्य असत्याशी मन केले ग्वाही" हे पुस्तक लिहिले असून, ते गोल्डन पेज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केले आहे. तुकोबांच्या व्यक्तित्वाचा आणि कवित्वाचा वेध मराठीतील विविध अभ्यासकांनी घेतला आहे. त्यांचे विहंगावलोकन करून हे पुस्तक लिहिले गेले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ 3 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झाला. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात अभय टिळक प्रमुख पाहुणे होते. पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए.पी. शाह यांच्या हस्ते झाले, तेव्हा त्यांनी केलेले संपूर्ण भाषण, येथे प्रसिद्ध करीत आहोत.

आताच प्रकाशित झालेल्या 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही' या पुस्तकाचे लेखक जी.डी. पारेख यांची एक अभ्यासू आणि निःस्पृह न्यायाधीश म्हणून ओळख आहे. मुंबई उच्च न्यायालयात काही काळ आम्ही एकत्र काम केले आहे; पण त्यांच्या आयुष्याचे इतरही अनेक पैलू आहेत. आणीबाणीच्या विरोधात कार्यरत असणे असो, वा ग. प्र. प्रधान, भाई वैद्य यांसारख्या सामाजिक विचारधारेच्या व्यक्तींबरोबरचा निकट संपर्क असो किंवा सध्या PUCL, आंतरभारती, साधना यांसारख्या संस्थांमध्ये झोकून देऊन काम करणे असो; यातून त्यांची निखळ मानवतावादी भूमिका आपल्याला दिसून येते. एखादा विचार घडलेली घटना किंवा समोर आलेली कोणतीही बाब केवळ सत्य किंवा असत्य याच तराजूत तोलून बघायची असते, कोणत्याही व्यक्तीचा किंवा शक्तीचा वा बहुमताचा त्यावर दबाव किंवा अंकुश असू शकत नाही. किंबहुना स्वतंत्र विचारसरणी हे जगण्याचे द्योतक असते.

'सत्य असत्याशी मन केले ग्वाही,
मानियले नाही बहुमता'

हा या पुस्तकाचा गाभा आहे तसेच हेच पारेख यांच्याही व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

पुस्तकाच्या प्रारंभी पारेखांनी फार सुंदर मनोगत लिहिले आहे. ते आपल्या मनोगतात म्हणतात, 'इंद्रायणीच्या काठाकाठाने चाललेला माझा प्रवास माझ्या आयुष्यातील कुठल्याही प्रवासापेक्षा अधिक

मंत्रमुग्ध करणारा होता. त्यातून एक ओळखीचा स्वर ऐकू येतो. तिथल्या ओबडधोबड धोंड्यांवर विखुरलेले पांढऱ्यांवर काळे केलेले काही ठिपके दिसतात. इंद्रायणीच्या पात्रात ते काळे पांढरे विखुरलेले ठिपके म्हणजे त्या इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा आणि वाऱ्याच्या सळसळीतून उमटणारे धीरगंभीर आवाज म्हणजे तुकारामांचे अभंग.' तरंगणाऱ्या गाथांचं असं वर्णन क्वचितच कुणी केलं असावं. पुढे ते म्हणतात, 'शेजारच्या टेकडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचं आणि इंद्रायणीच्या पात्रातून अधूनमधून उचल खाणाऱ्या तरंगांचा काही खाणाखुणांमधून संवाद चालू असल्याचा भास होतो. हा स्वर ओळखीचा वाटतो आणि शब्द कानांत ताल धरू लागतात.

आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।'

या प्रकारे या पुस्तकाच्या शब्दांचा प्रवास सुरू होतो. साहजिकच या प्रवासाचा पहिला टप्पा हा वाचन होता. आजवर अनेक लेखकांनी तुकारामांवर अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. पारेख म्हणतात, 'प्रत्येकाला कळला, भावला, जाणवला त्याप्रमाणे त्यांनी तुकारामांना शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केला. पारेखांनी त्या साऱ्यांचे म्हणजे विनोबांपासून पु.ल. देशपांडे व दि. पु. चित्रेपासून नेमाडेंपर्यंत अनेक साहित्यिक आणि विचारवंतांचं वाचन, चिंतन केले.' ते म्हणतात की, या सर्वांचे अक्षरऋण व्यक्त करण्यासाठी हे संकलन केले. परंतु संकलन करताना सर्वांत महत्त्वाचे आहे ते या सर्वाच्या निरूपणावर त्यांनी केलेले स्वतःचे भाष्य. तुकारामांच्या अभंगांतील प्रत्येक पैलूवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. एकूणच, तुकारामांच्या जीवनचरित्राचा तसेच गाथेतील अभंगांद्वारे त्यांनी व्यक्त केलेल्या सामाजिक जाणिवेचा अभ्यास आणि चिंतन यांतून दिसून येतो. या सर्वांतून पारेख महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडतात. आजच्या द्वेषमूलक वातावरणात 'भेदभाव अमंगळ' असे म्हणणाऱ्या तुकारामांचे फार महत्त्व आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या मूल्यांबाबत तुकाराम आग्रही असल्याचे पारेख जागोजागी दाखवून देतात. इथे त्यांनी त्र्यं. शं. शेजवलकरांच्या विचारांची दखल घेतली आहे. शेजवलकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीशी जोडण्याऐवजी मराठी संतांशी जोडली आहेत. एकनाथांची समता, तुकोबांचा बंधुभाव आणि रामदासांचे स्वातंत्र्य अशी मांडणी त्यांनी केली आहे. मात्र, यापुढे जाऊन पारेख म्हणतात की, आपल्या संविधानातील मूळ मूल्येसुद्धा हीच तर आहेत. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यांचा आग्रह धरलेला आहे. तुकारामांच्या सर्व साहित्यातून ही मूल्ये आपल्याला दिसत राहतात.

जवळजवळ हजार वर्षं जुनी अशी आपली मराठी भाषा आहे. आणि त्यातली साहित्याची परंपरा सातशे वर्षांपूर्वीपासून आहे. तर मग या मराठी भाषेचा मानदंड म्हणावा असा लेखक कोण? याबाबत चित्रे यांनी फार छान सांगितले आहे, 'तुम्ही शेक्सपिअरला वगळून इंग्रजी वाङ्मयीन संस्कृतीचा किंवा समाजाचा विचार करू शकता का ? गटेला वगळून जर्मन समाजाचा विचार करू शकता का ? तसंच मराठी भाषेचा विचार तुकारामांशिवाय होऊच शकत नाही. गेल्या 400 वर्षांत मराठी भाषेत जो कस आलेला आहे, तो तुकारामांच्या मूळ कवित्वामुळेच आहे.' आजचे काही समकालीन कवी विशेषतः साठनंतरचे कवी, भालचंद्र नेमाडे, दिलीप पु. चित्रे, ना. धों. महानोर, ते अगदी नामदेव ढसाळांपर्यंत सर्वांवरच तुकारामांचा फार मोठा प्रभाव आहे. पु. ल. देशपांडेंचा असा एकही ललित लेख नाही की, ज्याच्यात तुकारामांचा उल्लेख नाही. त्यांचं पहिलं नाटकच तुकारामांवर होतं. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले यांनी जरी कुठे तुकारामांचा उल्लेख केला नाही, तरी त्यांची भाषा, त्यांची विचारसरणी तुकारामांचीच आहे. म्हणूनच तुकारामांची शिकवण, संविधानातील मूल्ये, आणि फुले-आंबेडकर यांचे विचार यांची आपण सांगड घालू शकतो.

आपल्याकडच्या संतपरंपरेमध्ये तेराव्या शतकात ज्ञानदेव 12 व्या शतकात, एकनाथ 16 व्या शतकात आणि 17 व्या शतकात तुकाराम हे तिघे वैश्विक मनोविचारांचे मोठे संत होऊन गेले. परंतु गौतम बुद्धाच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या नितांत मानवी स्पर्शाची खूण तुकारामांमध्येच दिसते. मानवी स्पर्श ही काही कोरडी शिकवण नाही. त्यातही गौतम बुद्ध किंवा येशू हे तर दैवी प्रेषित होते. तुकारामांनी मात्र अज्ञानातून आत्मज्ञान मिळवले. समतेची सुरुवात आपल्याच दैवताशी बरोबरी करून करताना ते म्हणतात, 'देवपण हा माणूसपणाचाच गर्भितार्थ आहे.' 'गाऊ, नाचू, करू विठू तुझा अनुवाद' हे त्यांचेच शब्द आहेत. मराठी भाषकांवर तुकारामांचा विलक्षण प्रभाव आहे. आषाढी-कार्तिकीच्या दिंड्यांमधून लाखो लोक तुकारामांचे अभंग तल्लीन होऊन गातात. या संदर्भात भालचंद्र नेमाडे यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. ते म्हणतात की, 'तुकारामापाशी साध्या-सोप्या पद्धतीने व खऱ्या अर्थाने मानवी दृष्टीकोनातून जगाचे सर्वेक्षण करण्याची शक्ती आहे. ही शक्ती संस्कृताळलेल्या शब्दकळेच्या उच्चभ्रू ब्राह्मणी भपक्यापासून पूर्णपणे मुक्त आहे. कारण ही संस्कृताळलेली शब्दकळाच वाचकांना साहित्यापासून दूर घेऊन जात असते. तुकारामाच्या जीवनदृष्टीत शूद्रांविषयीचा कळवळा उत्कटपणे भरलेला आहे, हे त्याच्या वाङ्गयीन मोठेपणाचे एक कारण आहे. म्हणी म्हणून रूढ झालेल्या त्याच्या शेकडो ओळींतून व्यक्त होणारी सर्वसामान्य माणसाविषयीची जवळीक, शूद्र जातीत जन्म झाल्याचे दुःख, समतेचा प्रेमी म्हणून आलेली पराकोटीची संवेदनशीलता इत्यादी वैशिष्ट्यांमुळे तुकाराम जनतेच्या फारच जवळ गेलेला आहे.'

मित्रांनो, मी धार्मिक नाही. एका अर्थी मला तुम्ही नास्तिक म्हणू शकता; पण साहित्य ही माझी प्रथमभूत आवड (first passion) आहे. कायद्याची आवड त्यानंतर येते. दिलीप चित्रे सांगतात, तुकारामांच्या अस्तित्वाचे अवतार अनेक आहेत. संत असणं, कवी असणं, माणूस असणं, ज्ञानी असणं, भक्त असणं, तडफडत असणं, दिक्कालात असणं, ब्रह्मानंदी असणं, संपूर्णपणे असणं, या अवतारांना क्रम नाही. ते म्हणतात, जो कवी आहे तोच माणूस आहे, भक्त आहे, तडफडत आहे, संत आहे, ज्ञानी आहे, स्वतःच्या देशकाळात स्वतःला पाहणारा आहे. ब्रह्मानंदात मग्न आहे, मुक्त व स्वयंपूर्ण आहे आणि तोच अस्तित्वाचा निरोप घेऊन अनादी अनंत अनस्तित्वाकडे जाणारा, कधी न परतणारा यात्री आहे. एकूणच, तुकारामांच्या सर्व पैलूंमधला मला आवडलेला सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे कवित्व. त्यांच्या कवित्वामधला समाजसुधारणेचा भाव मला क्रांतिकारी वाटतो. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ते नेहमीच सर्वार्थाने लढत राहिले. समाजातून सतत छळ होऊनही त्यांनी अभंग रचण्याचे सोडले नाही. ते बोलत राहिले, व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत राहिले. जेमतेम 41 वर्षांच्या आयुष्यात साधारण 20 वर्षं त्यांनी कवित्वाची जोखीम पत्करली. त्यांचे सर्व साहित्य हे या वीस वर्षांतलेच. पण ही कवित्वाची ऊर्मी त्यांना कुठून आली असेल ? ते म्हणतात की -

'नामदेवे केले स्वप्नामाजी जागे 
सवे पांडुरंग येऊनिया 
सांगितले काम करावे कवित्व'

याचा अर्थ सांगताना 'स्वप्नामाजी' आणि 'जागे' या दोन्ही शब्दांचा अर्थ आध्यात्मिक जागृती आणि आत्मभान यासंदर्भात घ्यावा लागेल असे चित्रे सांगतात. इ.स. 1629 च्या दुष्काळात तुकोबांची पहिली पत्नी अन्नान्न अवस्थेत त्यांच्या समक्ष तडफडत मेली आणि अशा वेळेला तुकाराम यांनी कवित्व हे जीवितकार्य मानलं. आणि या कवित्वाच्या जोखमीतून आणि कवित्वाच्या श्रद्धेतून गाथेची निर्मिती केली. म्हणूनच ते म्हणतात की -

'शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन 
शब्दे वाटू धन जनलोका 
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव 
शब्देचि गौरव पूजा करू.'

तुकारामांचे कवित्व त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीच्या आधाराने आणि स्वतःच्या भक्तिभावनेतून प्रकट झालेले आहे. त्यांच्याकडे व्यवहारजन्य प्रचंड शब्दभांडार होतं. बोलीच्या सहजतेतून छंदाच्या डौलदार तोऱ्यात विविधपणे चकित करत येणारे पद्मप्रभुत्व त्यांच्याकडे होतं. कविता ही रचली जाते किंवा बोलावली जाते. याबद्दल ते म्हणतात -

'माझी वदवितो वाणी 
ज्याने धरिली धरणी 
जोडिली अक्षरे 
नव्हती बुद्धीची उत्तरे.'

तुकारामांच्या कर्तृत्वाला केवळ कवितेचेच नव्हे, तर भाषेचेदेखील आयाम आहेत. मोठा कवी फक्त कविता लिहीत नसतो, तो भाषाही घडवत असतो. नामदेव ढसाळ म्हणतात, "जीवनाच्या दहा हजार पातळ्यांवरील संघर्ष, आंतर्विरोध, त्यातील तीव्रतेला व्यक्त करणारी प्रतिमा, तिच्यातला प्राकृत डौल, माणसाच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, अज्ञान, द्वेष, मत्सर, लोभ, वासना या सर्वांचा आनंद घेणारा देणारा श्रेष्ठ कवी मराठीत दुसरा कोणी नाही. 'तुका आकाशाएवढा' झाला."

तुकारामांची कविता आत्मसंतुष्ट वा अहंमन्य नव्हती. त्यांना मानवी अवस्थेविषयी तीव्र तळमळ होती. ते म्हणतात -

'करावसे वाटे जिवा स्तनपान। 
नव्हे हे वचन शृंगारिक। 
सत्यासाठी माजी शब्द विवंचना। 
जोडील्या वचनाचे हे नव्हे। 
तुका म्हणे माझी कळवळ्याची कीव ।
भागलासे जीव कर्तव्याने ॥'

दिलीप चित्रे यांनी 1976 मध्ये तुकोबांच्या दीडशे अभंगांच्या इंग्रजी अनुवादाचे हस्तलिखित बऱ्याच पाश्चात्त्य कवी व लेखकांना दिले. तेव्हा व्हाइसबोर्ट यांना तुकोबा हे वैश्विक महात्मतेचे कवी वाटले, कोणाला जॉन डन या एलिझाबेथकालीन कवीसारखी त्यांची कविता वाटली. कोणाला विल्यम ब्लॅकसारखी, तर कोणी सन हुवान द कुझ या स्पॅनिश गूढवादी कवीशी तुकारामांची तुलना केली, काहींना हायडेगर यांच्यासारख्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाची आठवण झाली. या वाचकांच्या दृष्टीने तुकाराम जुना नव्हता. निव्वळ मराठी नव्हता. भक्तिमार्गी हिंदूही नव्हता तर कायमचा समकालीन असा अभिजात कवी होता. या लोकांना ना पंढरपूर माहीत ना विठ्ठल माहीत; पण ही
समकालीन अभिजात कविता आहे. या कवितेला स्थळकाळाचं बंधन नाही.

त्या काळात वेदांतील नीतिनियमांचा अर्थ सांगण्याचा अधिकार केवळ अभिजनांना (ब्राह्मणांना) होता. शूद्रांना मुळीच नव्हता. तुकाराम हे कुणबी असल्याने त्या काळी शूद्रच मानले जात. तुकाराम जेव्हा 'वेदांचा अर्थ आम्हासिच ठावा', असं म्हणू लागले तेव्हा त्या काळाचा पुरोहित वर्ग हादरून गेला.

कर्मकांडाचे अवडंबर माजवणाऱ्या तथाकथित धार्मिकांपासून धर्माचा गैरफायदा घेऊन स्वार्थ साधणाऱ्या मठाधिपतींपर्यंत सर्वांचा तुकोबांनी कठोर निषेध केला आहे. गुरुबाजी, अंधश्रद्धा याचा समाचार घेतला आहे. मानवी दम्भावर त्यांचे विचार अतिशय स्पष्ट आहेत. त्यांची भाषा फटकळ परखड आणि काही वेळेला शिवराळ, पण अचूक आहे. 'जळो त्यांचे तोंड मोजून माराव्या पैजारा त्यांच्या तोंडावर थुका' असे कोरडे ते ओढतात. तुकाराम हा भिंतीवर यमके लिहून वाड्यातील निवांत स्थळी अक्षरे जुळवीत बसलेला कवी नव्हता. त्याच्या कवितेत आडपडदा नाही आणि सौजन्यही नाही.

काहींचं मत असं आहे की, संत असणाऱ्या लोकांच्या श्रद्धेचं कारण त्यांच्या काव्यप्रतिभेत नसून त्यांच्या धार्मिकतेमध्ये होते. ते धार्मिक होते म्हणून लोकांची त्यांच्यावर श्रद्धा होती. काही संतांबद्दल हे खरे असेलही; पण तुकारामांबद्दल हे खरे नाही. तुकाराम हा केवळ अस्सल प्रतिभावंत कवी म्हणूनच आजपर्यंत जिवंत राहिला. कवी म्हणूनच तो मोठा आहे. तुकारामांचे क्रांतिकारी कवित्व त्यांच्या सुधारणावादाचा भाग होता. नेमाडेंनी लिहिलेला फार महत्त्वाचा विचार या पुस्तकात नमूद करण्यात आला आहे, ते म्हणतात, 'वारकरी संप्रदायाची स्थापना तेराव्या शतकात झाली. हा संप्रदाय दृढ करण्याचे कार्य तुकाराम व इतर संतांनी 17व्या शतकात पार पाडले. नानाविध जाती-जमातींच्या लोकांना, मुसलमानांनाही या समतेच्या प्रवाहात सामावून घेण्यात आलं. या संप्रदायांनी आपल्या उदार भूमिकेने व सहानुभूतीने महाराष्ट्रात ब्राह्मणवादाचा पूर्ण पराभव केला. या संप्रदायाचा लोकशाहीवादी प्रभाव इतका परिणामकारक होता की, जाती-जातींमधली कठोर बंधने तुटली आणि सर्वांना सन्मानाने जगणं शक्य झालं.'

वारकरी संप्रदायाची आध्यात्मिकता उच्चतम दर्जाची होती. ती काही विशिष्ट वर्गाची नव्हती. ती स्त्री-पुरुष, साक्षर, निरक्षर, हिंदू, मुसलमान सर्वांसाठीच होती. तुकारामांची वाणी विठ्ठलभक्ती आणि रुढीप्रिय सनातन्यांविरुद्ध अधिकच लोकप्रिय होती. त्यांच्या धर्मविषयक धारणेत ग्रंथपठण, जप-तप, व्रतवैकल्ये, गुरू-शिष्य संबंध, मंत्र-तंत्र, जादूटोणा, भगवी वस्त्रे, ब्राह्मणांना दक्षिणा, याला मुळीच स्थान नाही. त्यांच्या या विचारांमुळेच सनातानी ब्राह्मणांनी त्यांना अतिशय छळले आणि त्यांचे आयुष्य दुःसह्य बनवलं. शेवटी रामेश्वर भटाने तुकारामांना फर्मावलं की 'तू लिहिलेले सर्व अभंग स्वतःच्या हातानं नदीत बुडव.' यामुळे त्यांचं व्यक्तिस्वातंत्र्यच हिराहून घेतलं गेलं.

तुकारामाने धर्मग्रंथांच्या ब्राह्मणांच्या आकलन-शक्तीविषयीच शंका व्यक्त केली.

'वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावा 
येरानी वहावा भार माथा 
बरा देवा कुणबी केले 
नाहीतरी दंभेची असतो मेले 
देव म्हणून न येती देवळा 
अशी यांची अहंता 
स्वार्थाकरिता विकी 
स्नान, संध्या, जप.'

तुकारामांनी अशा अर्थाचे कित्येक अभंग लिहिले होते. सतराव्या शतकात एका शूद्राने ब्राह्मणांच्या अधिकाराविरुद्ध बंड पुकारावे ही फार मोठी क्रांती होती. तुकारामाची वृत्ती प्रखर विद्रोही आणि धर्म सुधारणावादी होती. हिंदुत्वात खऱ्या सश्रद्ध व्यक्तीस अध्यात्मप्राप्ती-पासून वंचित करणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचा तो विरोधक होता. हिंदुधर्मात शिरलेल्या असंख्य अनिष्ट रूढींवर त्यांनी कठोर प्रहार केले. याविषयी जयंत लेले म्हणतात, 'A Self-Conscious Self Proclaimed Shudra Varakaree standing taller in his Purity and Simplicity of Mirror. To the hypocrisy and elaborate Self-Indulgence of the brahmins.'

आपल्या पुस्तकात भाष्य करताना पारेख म्हणतात, 'तुकोबांचा आयुष्यातील सारा प्रवास तर ठार अंधकारमय वातावरणात गेला.' त्यापुढे जाऊन ते म्हणतात, तुकारामांनी जी व्यवस्था बदलण्यासाठी जिवाच्या आकांताने लढाई केली, त्या व्यवस्थेतच त्यांच्या मृत्यूची बीजे होती. आ. ह. साळुंखे यांच्या या विचारांचीही त्यांनी दखल घेतली आहे.

जी मूल्ये आपण पश्चिमेकडून आयात केली असे सामान्यपणे मानले जाते (अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बंधुभाव इत्यादी.) ती वारकरी परंपरेत आधीपासूनच अंतर्भूत होतीच, असे दिलीप चित्रे आपल्या 'जीभ' या कवितेत सुचवितात.

'ही जीभ मी जोपासली, सातशे वर्षे 
स्वतंत्र प्रज्ञेच्या परंपरेत आणि अशा मुलखात 
जिथं भसाड्या भजनांनी पोखरून काढला
मयूर कर्मठांचा धर्म आणि मोकळी केली 
भक्तीमधून भावनेची अचाट शक्ती 
त्यांनी वाघावर स्वार होऊन करामत दाखवली 
तेव्हा किंचित हसून आम्ही भिंत चालवली 
सर्वांग चाचपून महारानं शुद्ध केला परमेश्वर
कुणब्यानं केलेल्या आकांतापुढे चळवळा कापला खुद्द विठ्ठल,
आणि आम्ही आवाज चढवून ओलांडले देवांचे उंबरठे,
पुकारले जन्मसिद्ध हक्क.'

मनोगतात पारेख म्हणतात की, 'अलीकडेच पंढरपुराकडे प्रस्थान ठेवणाऱ्या वारीमध्ये संविधान व पर्यावरण यांबद्दल प्रबोधन करणाऱ्या वारकऱ्यांची 'अर्बन नक्षल' म्हणून संभावना करण्यात आली. आजच्या द्वेषमूलक वातावरणात तुकारामांच्या विचारांची आठवण करून देण्याची किती नितांत गरज आहे हे प्रकर्षाने जाणवते.'

देशात अशी द्वेषाची संस्कृती जाणीवपूर्वक जोपासली जात आहे. अनिर्बंध ध्रुवीकरण होत आहे. अल्पसंख्याकांचे खलचित्रण (vilification) होत आहे. मुस्लीम आपले शत्रू आहेत असं बिंबवलं जात आहे. राजकारणी आणि राजकीय पाठबळ असलेली प्रसारमाध्यमे नियमितपणे सांप्रदायिक द्वेषाला खतपाणी घालतात. सनातनीपणा आणि अंधश्रद्धा पुन्हा जोमाने तोंड वर काढत आहे. ज्यांनी 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता', (म्हणजे मेजॉरिटीझम ज्यांनी मान्य केला नाही, ज्यांचे विचार सोईस्कर नाहीत किंवा नको आहेत असे विचार मांडणाऱ्यांना) त्यांना अर्बन नक्षल, राष्ट्रद्रोही असे सहज ठरवून टाकले जाते. ही प्रस्थापित हिंदुत्वाची नवसंस्कृती आहे. त्यांना विचारांची फार भीती वाटते. त्यांच्याशी ज्यांचे विचार सुसंगत नाहीत त्या सर्वांना ते अर्बन नक्षलवादी म्हणतात. सुहास पळशीकर म्हणतात, 'भारतीय परंपरेतील समावेशकता हा त्यांच्यासाठी एक बोचरा काटा झालेला आहे.' खरे आहे ते.

नेहरूंनी एकदा म्हटलं होतं की, सांप्रदायिकता वाद ही मागासलेल्या राष्ट्राची खूण आहे. शिवाय, तिचं आयुष्यही मर्यादित असतं. राजकीय क्षेत्र असो वा सामाजिक क्षेत्र असो, द्वेष व विभाजनकारी वृत्ती फार काळ टिकाव धरू शकत नाही, हे इतिहासाने आपल्याला वारंवार शिकवले आहे. त्यामुळे राजकारणावर आणि अर्थकारणावर प्रभाव टाकणाऱ्या अशा गटांना सध्या मोठं यश मिळत असेलही, (जगभरच ते घडत आहे) पण हे केवळ तात्कालिक आहे. शांततापूर्ण समाज हा मानवी समाजाचा स्वाभाविक समतोल आहे. तुकारामाने सांगितलेली सत्य, समता, दयाभाव, समावेशकता ही अनाहत काळापासून टिकून राहिलेली आणि आगामी काळातही टिकून राहतील अशी वैश्विक मूल्यं आहेत. आपण हे विसरता कामा नये की, भारत हा बहुभाषिक व बहुसांस्कृतिक देश आहे आणि हेच आपल्या विविधतेमागचे कारण आहे. आणि यातही आपल्या सर्वांना बांधून ठेवणारा धागा म्हणजे आपलं 'भारतीयत्व'.

मानवी चांगुलपणा, वैविध्य, सहनशीलता, सर्व समावेशकता या वैश्विक मूल्यांची प्रेरणा आजही तुकारामांच्या गाथांतून मिळते. तुकारामाने ऐहिक पारलौकिक सीमारेषा जगतानाच पुसून टाकल्या. म्हणूनच ते कालातीत जगू शकले. ते म्हणतात -

'निरंजनी आम्ही बांधियेले घर 
निराकारी निरंतर राहितो आम्ही 
निराभासी पूर्ण जालो समरस 
अखंड ऐक्यास पावलो आम्ही 
तुका म्हणे आता नाही अहंकार 
जालो तदाकार नित्य शुद्ध'
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी