सुनील पाटील आणि सानिया कर्णिक यांना ग. प्र. प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्राची अभ्यासवृत्ती..
कुलगुरू पदावर असणाऱ्या व्यक्तीला विद्यापीठाच्या संदर्भात आणि एकूणच शिक्षणाच्या संदर्भातही अनेक गोष्टी सांगता येत नाहीत. याउलट, विद्यापीठाच्या स्तरावर काय काय नवे चालू आहे हे सांगण्यामध्ये कुलगुरू कार्यालयाला अधिक रस असतो, मात्र वाचकांना त्यात अत्यल्प रस असतो. या दोन्ही मर्यादा लक्षात घेऊनही महाराष्ट्रातील 'दहा कुलगुरूंच्या मुलाखती' ही मालिका करणे आवश्यक वाटते आहे. त्या मुलाखती घेण्यासाठी सुनील पाटील यांना अभ्यासवृत्ती दिली आहे. ते जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी होते आणि आयुष्याच्या सुरुवातीला त्यांनी दशकभराहून अधिक वर्षे पत्रकारिता केलेली आहे. त्यामुळे, त्यांना विद्यापीठाचे अंतरंग आणि नियतकालिकाच्या वाचक मनाचा कानोसा या दोन्हीचा चांगला परिचय आहे.
विद्यापीठाची सद्यस्थिती, आगामी वाटचालीसाठी आव्हाने व संधी याबाबतचे कुलगुरूंचे मानस तर या मुलाखतींमधून पुढे येईलच; पण एकूणच उच्च शिक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात, भारतात आणि जगात होत असलेले बदल किंवा येत असलेले नवे प्रवाह या संदर्भातील त्यांचे आकलनही या मुलाखतीत शब्दबद्ध होणार आहे. आणि अर्थातच त्यांची कुलगुरू पदापर्यंतची वाटचालही ! प्रत्येक मुलाखत साधारणतः तीन ते साडेतीन हजार शब्दांची होईल.
जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या दहा महिन्यांत या मुलाखती घेतल्या जातील आणि याच काळात त्या साधना साप्ताहिकात प्रसिद्ध होत राहतील. ही अभ्यासवृत्ती एक लाख रुपये रकमेची असेल. त्यातील अर्धी रक्कम प्रवास व अनुषंगिक खर्च यासाठी तर अर्धी रक्कम लेखनाचे मानधन असेल.
रवींद्रनाथ टागोर यांनी 1924 मध्ये पावणेदोन महिने चीनला भेट दिली. तिथे विविध शहरांत विविध विचारपीठांवर भाषणे दिली. ती प्रामुख्याने भाषा, साहित्य, समाज, संस्कृती या अंगाने झाली. मात्र त्या दौऱ्याला चीनमधून वेगवेगळ्या कारणांनी विरोध झाला होता. त्या मूळ इंग्रजी भाषणांचे पुस्तक Talks in China या नावाने 1925 मध्ये प्रकाशित झाले. शंभर वर्षांपूर्वीची ती भाषणे मराठीत यावीत असे आम्हाला वाटत होते. त्यासाठी सानिया कर्णिक या युवतीला अभ्यासवृत्ती दिली आहे. ती मागील दोन वर्षे चीनमध्ये वास्तव्य करीत असून, बीजिंगमधील विद्यापीठात Translation Studies मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
रवींद्रनाथ टागोर यांच्या सात मूळ इंग्रजी भाषणांचा मराठीत अनुवाद करणे आणि टागोरांचा तो दौरा आयोजित करणारे संयोजक व त्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या व्यक्ती व संस्था-संघटना यांनी चिनी भाषेत जे काही लिहिले त्यातील निवडक भाग मराठीत आणणे हेही या अभ्यासवृत्तीतून अपेक्षित आहे. म्हणजे 'रवींद्रनाथांची भाषणे व त्यावरील वादसंवाद' हा ऐवज पुस्तकरूपाने साधना प्रकाशनाकडून येईल, त्यापूर्वी त्यातील काही भाग साधना साप्ताहिकात प्रसिद्ध केला जाईल.
या अभ्यासवृत्तीचा कालावधी जानेवारी ते जून 2026 असा सहा महिन्यांचा राहील. अभ्यासवृत्तीची रक्कम पन्नास हजार रुपये असेल. त्यातील काही भाग पुस्तके व अनुषंगिक खर्च यासाठी असेल तर उर्वरित रक्कम अनुवादाचे मानधन असेल.
मेल : gpp.rtc@gmail.com
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या