डिजिटल अर्काईव्ह

शॉर्ट फिल्म फेस्टिवलकडून आपली नेमकी अपेक्षा काय असते? कोणत्या प्रकारचे सिनेमे आपल्याला बघायचे असतात ? पूर्ण लांबीच्या फिचर फिल्मऐवजी जी गोष्ट कमी शब्दांत /फ्रेम्समध्ये सांगता येते ती शॉर्ट फिल्म असते का? किंवा मग गोष्टीच्या पलीकडे जाऊन काही भावना, काही अनुभव, काही आठवणी आपल्याला हव्या त्या फॉर्ममध्ये मांडणं, त्यासाठी काही प्रयोग करणं म्हणजे शॉर्ट फिल्म असते ? उबरहौजन आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळालीच, पण वेगवेगळ्या देशांमधल्या दिग्दर्शकांनी केलेले प्रयोग आणि त्यांच्या सिनेमांमधलं वैविध्य पाहून या आणि अशासारख्या महोत्सवांमधून काय साध्य होतं याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

जर्मनीमधल्या उबरहौजन नावाच्या एका छोट्या शहरात भरणाऱ्या या चित्रपट महोत्सवाचं हे 72वं वर्ष होतं. 1954 मध्ये सुरू झालेल्या या महोत्सवाने अनेक चढ-उतार बघितलेले आहेत, अनेक बदल बघितलेले आहेत आणि अनेक प्रयोगही केलेले आहेत. गेली काही वर्षं इथे एखादा विभाग हा 'मेमरीज कॅन वेट, फिल्म विदाऊट फिल्म', 'सॉलिडॅरिटी इज डिसरप्शन' अशासारख्या एका खास थीमवर आधारलेला असतो. या वर्षीची थीम एआयच्या प्रचंड हस्तक्षेपाशी संबंधित, 'बेस्ड ऑन टू इव्हेन्ट्स ?' ही होती. इतर काही स्पर्धांसह इथे लहान मुलं आणि तरुणांचा सिनेमा असाही एक स्पर्धा विभाग होता. लहान मुलांच्या स्पर्धेसाठी पंधरा वर्षांपर्यंतच्या वयोगटातली मुलं ज्युरी म्हणून काम पाहतात आणि तरुणांच्या स्पर्धेचे ज्युरी अर्थातच तरुण असतात. हे काम करण्यासाठी शाळांमधून मुलांची वर्कशॉप्स घेतली जातात. मुख्य म्हणजे मुलांनी मुलांसाठी बनवलेले सिनेमे शाळांमधून मुलं रांगा लावून पाहायला येतात. सिनेमाची संस्कृती, चांगला सिनेमा कुठला, प्रयोग करणं म्हणजे काय हे सगळं लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर आपोआप बिंबवलं जातं.

आजही आर्थिक दृष्ट्या हा फेस्टिवल श्रीमंत नाही, पण आपली साधनं कुठे वापरायची याची जाणीव संयोजकांमध्ये आहे. फेस्टिव्हलची स्वतःची अशी व्हिडिओ लायब्ररी आहे जी पाहुण्यांसाठी खुली आहे, त्यांच्या अर्काइव्हजमध्ये गेल्या सत्तरहून अधिक वर्षांतल्या सिनेमांच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या अशा हजारो शॉर्ट फिल्म्स आहेत. आणि जगभरातल्या शॉर्ट फिल्म्स बनवणाऱ्यांसाठी हा महोत्सव म्हणजे एक महत्त्वाचं व्यासपीठ बनलेला आहे. मॅडेलिन बर्नस्टॉफ आणि सुसाना पॉलहाईम या दोन फेस्टिव्हलच्या डिरेक्टर आपल्या भाषणात म्हणाल्या त्यानुसार, 'या वर्षी आमच्याकडे आलेल्या सिनेमांच्या संख्येत वीस टक्क्यांनी वाढ झालेली दिसली. या काही हजार सिनेमांमधून आमच्या निवड समितीने महोत्सवामध्ये दाखवले जाणारे सिनेमे निवडलेले आहेत. मात्र, अशा प्रकारचा महोत्सव कोणत्या परिस्थितीत भरवला जातो यावर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. आर्थिक संकटाच्या काळात कलात्मक स्वातंत्र्य, वैचारिक चर्चा आणि आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण या गोष्टी गृहीत धरता येणार नाहीत याची आम्हाला जाणीव आहे.' हा सांस्कृतिक सोहळा म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. विशेषतः तो उबरहौजनसारख्या छोट्या शहरात होत असेल तर अधिकच.

फ्रैंकफर्टहून ट्रेनने ड्युजलडॉर्फला जायचं, तिथून दुसरी ट्रेन करून उबरहौजनला पोहोचायचं. स्टेशनच्या बाहेर पडल्यावर समोरच बस स्टँड. त्या पलीकडे फूटपाथवर दुकानं. पण शहरी वर्दळ अजिबात नाही. वाहनंसुद्धा आवाज न करता धावणारी. अशी शांतता एकाच वेळी दिलासाही देते आणि अस्वस्थही करते. अस्वस्थ कारण आपल्याला तिची सवय नसते. दिलासा मिळतो कारण माणसं आपल्या लयीत, आपल्या गतीने आपापली कामं करताना दिसतात.

कोणे एके काळी उबरहौजन अतिशय समृद्ध शहर होतं. कोळशाच्या खाणी होत्या, स्टीलचे कारखाने होते. पण हळूहळू ते बंद पडू लागले. आज या शहरात फिरलं की असे बंद पडलेले कारखाने, ओसाड चिमण्या दिसतात. या ओसाड जागांवर बांधलेलं छोटंसं नाट्यगृह, पब्स दिसतात. शहराच्या मुख्य भागात खूप सारी दुकानं, मॉल्स, कॅफे, रेस्टॉरन्ट्स आहेत. सगळीकडे गर्दी दिसते, पण तरीही गजबजाट नाही जाणवत.

स्टेशनवरून चालत दहा-पंधरा मिनिटांवर हॉटेल होतं. संयोजकांनी ट्रेन, हॉटेलचं लोकेशन सगळं शेअर करून ठेवलं होतं. त्यामुळे ना कुणी स्वागत करायला एअरपोर्टवर आलं होतं, ना स्टेशनवर. तुमची काळजी घ्यायला तुम्ही समर्थ आहात हा विश्वास असावा. आमच्या हॉटेलवरही तेच. आमच्या म्हणजे, महोत्सवासाठी आलेल्या आमच्यासारख्या ज्युरींच्या.

फिप्रेसी या चित्रपट समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने ज्युरी म्हणून मी तिथे गेले होते. माझ्याबरोबर जर्मनीचे फाबिआन आणि इराणचे अमिराटा (जे गेली दोनेक वर्षं जर्मनीमध्येच स्थायिक झालेले आहेत) होते. सहा दिवसांमध्ये आम्ही पन्नासहून जास्त शॉर्ट फिल्म्स बघितल्या. यात फिक्शनबरोबरच डॉक्युमेंटरीही होत्या, डॉक्युड्रामा होता आणि काही वेळा निव्वळ विनोदही. कुणी आपली गोष्ट सांगितली होती, तर कुणी आपल्या भूतकाळाला सामोरं गेलं होतं. विस्थापन तर होतंच. मात्र, एवढे सिनेमे बघितल्यानंतर त्यातून एकाची निवड करणं अजिबातच सोपं नव्हतं. आम्ही पुरस्कार दिलेल्या सिनेमाचं नाव होतं, 'ऑपेरा'.

मिट्ट काळोखाची रात्र. रस्त्यावरच्या दिव्याचा मंद प्रकाश अगदीच अपुरा आहे. त्या उजेडात दिसणारी झाडं, त्यांच्या फांद्या वातावरणातली रहस्यमयता वाढवताहेत. त्या अस्पष्ट प्रकाशात दूर एका खिडकीत दिवा लागलेला दिसतो. कुणीतरी काम करत असल्याचे आवाज ऐकू येतात. एका घराचा आकार नजरेला पडतो. आता वाहनाची घरघर ऐकू येऊ लागते. कुठून येतंय हे वाहन? मग रस्त्यावरून एक ट्रक जाताना दिसतो. त्याच्या हेडलाईट्समध्ये आणखी काही तपशील आपल्याला दिसतात. ट्रक निघून जातो, रस्ता पुन्हा सुनसान होतो आणि त्या काळोखाची सवय करून घेण्याचा प्रयत्न आपण करतो. आता तर रातकिड्यांची किरकिरही कानावर पडू लागलीये. मग दुसऱ्या एका खिडकीतला दिवा लागतो. माणसांच्या दोन आकृत्या दिसतात, एक बाई आणि एक पुरुष. बहुधा त्यांच्या घराच्या बागेत असावेत. दरम्यान, तिसऱ्या घरामध्ये जाग आलेली दिसते. डावीकडच्या खिडकीतही हालचाल जाणवते. कुंपण दिसू लागतं. मग थोड्या वेळाने दिव्यांची माळ पेटते. पार्टी आहे का त्यांच्याकडे? नाही कळत. पण कुंपणाच्या सावल्या मात्र भेडसावत राहतात. एका खिडकीतला दिवा बंद होतो. दुसरा मात्र अजूनही सुरू आहे. त्यातच कचरा काढणारी बाई दिसते. आणखी एक ट्रॅक्टर घरघराट करत रस्त्यावरून जातो.

एका घराच्या बाल्कनीमध्ये एक पुरुष सिगारेट ओढतोय. अंधारात त्याच्या थोटकाचा प्रकाश विचित्र वाटतो. मग एक बाई येते, कपडे वाळत घालते आणि निघून जाते. पुरुषही सिगारेट संपवून दिसेनासा होतो.

आकाशात चंद्र आहे. त्या एका खिडकीतला दिवाही बंद झालाय. मग नुसताच चंद्रप्रकाश. दूरवरून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागलाय. पहाट होत असल्याची जाणीव होते. आकाशात फटफटू लागतं. समोरच्या दृष्याची आउटलाईन स्पष्ट होऊ लागते. काय दिसतं या प्रकाशात ? एवढा वेळ आपण बांधत असलेला अंदाज किती चुकीचा होता हे ? रात्रीच्या अंधारात दिसणारं जग आणि सकाळच्या लख्ख प्रकाशात दिसणारं वास्तव यांच्यातला फरक पाहून आश्चर्याचा धक्का बसतो.

पर्सेप्शन, आपलं वाटणं आणि वास्तव यातला फरक क्रोएशियाच्या इगोर झेलिक यांच्या या 19 मिनिटं 40 सेकंदाच्या सिनेमातून इतक्या प्रभावीपणे मांडला गेलाय की आपण अवाक् होऊन जातो. संपूर्ण सिनेमाभर कॅमेरा एकाच ठिकाणी आहे. एकाच अँगलमधून आपण हा खेळ पाहतो आणि तरीही आपण सतत तिथे काय आहे याची अटकळ बांधत राहतो, आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि कधी एकदा आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं वाटत राहतं. रात्रीचा तो दिव्यांचा खेळ दिग्दर्शकाने जणू कोरिओग्राफ केलाय असं वाटतं. एक प्रकारचं कुतूहल सबंध वेळ आपल्या भोवती रेंगाळत राहतं. प्रकाश, ध्वनी आणि अवकाश या सिनेमाच्या मूलभूत तत्त्वांचा दिग्दर्शकाने केलेला वापर अप्रतिम होता. त्यात कला आणि कुसर दोन्ही होतं.

मात्र, 'ऑपेरा' व्यतिरिक्त प्रभावित करणारे इतर अनेक सिनेमे होते. कोणतीही गोष्ट न सांगता, निव्वळ दृष्यांच्या माध्यमातून कहीतरी बोलू पाहणारा, चीनचे दिग्दर्शक यू झे यांचा 11 मिनिटांचा 'डार्क चॅनेल' सिनेमा हे एक उदाहरण. 'ऑपेरा'प्रमाणेच इथेही टाइम अँड स्पेस, काळ आणि अवकाश यांचा खेळ होता. एक छोटासा बोगदा एवढाच अवकाश. वर्षातल्या चार मोसमांमध्ये या बोगद्यात दिवस आणि रात्रीच्या अंधारात होणारे बदल आपण बघतो. पाऊस पडल्यावर रात्री वाढणारी पाण्याची पातळी, सकाळच्या वेळी त्या पाण्यात पडणारी प्रतिबिंबं, बाजूने जाणारा कुणी सायकलस्वार, मधूनच भिंतीवर कोळीष्टकांमध्ये वावरणारा कोळी किंवा पाण्याच्या डबक्यातला आणि दुसऱ्या दिवशी कोरड्या जमिनीवर बसून राहिलेला हिरवा बेडूक इतकंच. पण सायकलच्या चाकांमधून पाण्यात उमटणारे तरंग कधी एखाद्या विजेच्या प्रवाहाप्रमाणे वाटतात, तर कधी नुसत्याच एखाद्या आकृतीचा भास करून देतात. बोगद्याच्या त्या कोंदट जागेमध्ये श्वास कोंडल्यासारखाही वाटतो आणि पाण्यातल्या प्रतिबिंबांमधून मोकळेपणाचा भासही होतो. दोन अगदी विरुद्ध भावना एकाच वेळी मनात निर्माण करण्याची ताकद दिग्दर्शकामध्ये होती. पारंपरिक कथनाच्या अगदी पलीकडे जाणारी.

'ऑपेरा' काय किंवा 'डार्क चॅनेल' काय, दोन्हीमध्ये एकही संवाद नव्हता. कोणतीही गोष्ट नव्हती. पण प्रेक्षकांना पकडून ठेवण्याचं, विचार करायला लावण्याचं सामर्थ्य निश्चितच होतं.

'5-6-7-8' या जेमतेम साडेनऊ मिनिटांच्या दिग्दर्शक एमिलिओ बिॲनचिक (युरुग्वे / मेक्सिको) यांच्या सिनेमाला मात्र नीट गोष्ट होती. विजेच्या धक्क्याने एका साध्यासुध्या मेकअप आर्टिस्टचं रूपांतर होतं एका नृत्य करणाऱ्या कलाकारामध्ये आणि सुरू होतो या कलाकाराचा यशाच्या शिखरापर्यंतचा आणि तिथून पुन्हा पायथ्याशी होणारा प्रवास. तो प्रवास पाहताना आपण पोल डान्ससकट विविध प्रकारची नृत्यं पाहतो. भान हरपून टाकणारी नृत्यं.

पण खरी मेख या गोष्टीत नाहीच. दिग्दर्शकाने ही संपूर्ण कहाणी हाताच्या बोटांमधून अतिशय ताकदीने पेश केलेली आहे. सगळी नृत्यं हाताची बोटं करतात आणि आपल्याला प्रत्यक्ष एखादी व्यक्ती आपल्यासमोर नाचतेय असा भास होतो. थोड्या वेळाने ती बोटं दिसेनाशी होऊन त्यांची जागा जणू त्या-त्या व्यक्तिरेखा घेतात. आणि त्या जगात आपण गुंतून जातो.

'ऑगस्ट अँड द वॉर'मध्येही गोष्ट आहे. इथे ती माणसांच्या माध्यमातूनच सांगितलेली आहे, पण त्यात विडंबन आहे, विनोद आहे आणि उपहासही आहे. दिग्दर्शक लिॲन्ड्रो सेरॉन आणि सामोरी तोवात या स्वीडनच्या दिग्दर्शकांचा हा सिनेमा 14 मिनिटांचा आहे. ऑगस्ट हा तरुण मुलगा, खूप जास्त उंच आणि ऑकवर्ड वावर यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्येच एक विक्षिप्तपणा आहे. संगीतामध्ये त्याला रुची आहे, पण देशासाठी युद्ध करायला आपण तयार आहोत की नाही असा गहन प्रश्न त्याला पडलाय. जेवणाच्या टेबलवर त्याची आई या प्रश्नाचं उत्तर देते, 'जबाबदारी घ्यायचीच असेल तर आधी घरातल्या कामांची घे, कपडे धुण्याची घे.'

ऑगस्टच्या घरी संगीताचं वाद्य येण्याऐवजी मशीनगन येते आणि ती बाहेर काढतानाच त्याची दमछाक होते. छोट्या छोट्या विनोदी घटनांमधून, संवादांमधून दिग्दर्शकांनी आपली युद्ध विरोधी भूमिका प्रेक्षकांपर्यंत नेमकी पोहोचवली आहे.

आणखी दोन विनोदी अंगांनी पेश केलेल्या सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो. 'टोस्ट' (दिग्दर्शक नेला ग्लुहाक, क्रोएशिया) दोन मिनिटांचा, तर 'स्लो फास्ट स्लो' (दिग्दर्शक यागोदा झारनेक, पोलंड) केवळ एका मिनिटाचा सिनेमा. 'टोस्ट' मध्ये एक मुलगी तिला भेट म्हणून टोस्टर मिळाल्याचं सांगते, तेव्हापासून टोस्ट बनवण्याचा नाद लागल्याचं सांगते, 'ऑन द 24थ ऑफ जून 2024 माय मदर बॉट मी अ टोस्टर, अँड माय लाईफ हॅज चेंज्ड फॉरएवर' असं म्हणते आणि संपूर्ण पडदाभर आपल्याला पावाचे वेगवेगळ्या प्रकारे केलेले टोस्ट दिसत राहतात. मधूनच एखादा पदार्थ दिसतो आणि 'धिस इज नॉट अ टोस्ट' असं कानावर पडतं. या कथनामध्ये गेयता आहे आणि बहुधा तेच त्याचं वैशिष्ट्यही. बाकी इथे घडत काहीच नाही. मजा मात्र नक्की येते. 'स्लो फास्ट स्लो' विषयी मजा येते असं म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. एक झोपलेली मुलगी आपल्याला दिसते, मग जोराने घड्याळाचा गजर वाजतो, ती दचकून जागी होते आणि धाडकन् जमिनीवर पडते आणि काहीतरी भलतंच घडतं. बस्स, इतकंच. माणसाचं आयुष्य घड्याळाच्या तालावर नाचू लागलंय का? ते आपल्या हातून निसटू पाहतंय का? एका मिनिटाच्या सिनेमामधून तुम्हाला जे अर्थ काढायचे आहेत ते काढा.

या आणि अशा अनेक फिक्शन्सबरोबर (यात भारताच्या भाव्या कार्तिकेयन यांची 23 मिनिटांची 'टी पावडर' नावाची फिल्मही होती) खूप साऱ्या डॉक्युमेंटरीजही होत्या. मॅनहॅटनच्या चायनाटाऊनमध्ये बांधलेल्या तुरुंगामध्ये 1838 पासून चार वेळा कसकसे बदल केले गेले, कोणकोणत्या आर्किटेक्ट्सनी ते केले आणि त्यांना तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्यांच्या परिस्थितीची किती जाणीव होती याचा वेध घेणारी 'डेलाईट' (दिग्दर्शक अॅना हायस्टरकाम्प, युएसए/आयर्लंड) ही सुमारे 22 मिनिटांची डॉक्युमेंटरी होती. एसे एरा या टर्किश दिग्दर्शकाची 'डॉग्स अँड डस्ट' ही साधारण 14 मिनिटांची डॉक्युमेंटरीही तुरुंगाशीच संबंधित होती. एसे एरा प्रायोगिक सिनेमेच करते. त्यातूनही रस्त्यावरचे प्राणी आणि वेशीबाहेरचं जग हे तिचे खास अभ्यासाचे विषय आहेत. ही डॉक्युमेंटरीही त्याला अपवाद नव्हती. तुर्कस्तानाच्या युरोपिअन सीमेवरची एक ओसाड जागा. युद्धाचे अवशेष तसेच पडून असलेली. शेकडो कुत्रे तिथे वावरताहेत. ही जागा हे त्यांचं घर बनलंय. आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या तुरुंगासाठी ती मोकळी करण्याचं ठरतं. या डॉक्युमेंटरीमध्ये बांधकाम सुरू होण्यापूर्वीचे शेवटचे काही दिवस या सिनेमामध्ये चित्रित करण्यात आलेत. कुत्र्यांचं विस्थापन हे एक प्रतीक आहे. नव्याने तुरुंग बांधावे लागताहेत हे वास्तव आहे. या दोन्हीची सांगड दिग्दर्शकाने सुरेख घातलीये.

'अॅन ओपन फिल्ड'च्या सुरुवातीलाच पडद्यावर 'अ फिल्म आय डिड नॉट वॉन्ट टू मेक' असं लिहून येतं. दिग्दर्शक तेबोहो एडकिन्सने बोईंग विमान अपघातात मृत्यू पावलेल्या आपल्या भावाला वाहिलेली ही एक प्रकारची आदरांजली आहे. सहा वर्षांपूर्वी इथिओपिआमध्ये बोईंगचं विमान त्यांच्या सॉफ्टवेअरमधल्या दोषामुळे कोसळलं आणि सर्व 157 प्रवासी त्यात मारले गेले. तेबोहो आणि त्यांचे वडील गेल्या वर्षी विमान ज्या जागी पडलं होतं तिथे गेले आणि ही डॉक्युमेंटरी बनली. तिथे गेल्यावर या दोघांना कळलं की स्थानिक मंडळी गेली सहा वर्षं अपघाताच्या दिवशी त्यांच्या प्रथेनुसार काही विधी करताहेत. मृतांना श्रद्धांजली वाहताहेत. दुसऱ्या बाजूला विमानाच्या वैमानिकाचे वडील हताश होऊन सांगताहेत, 'सगळा दोष माझ्या मुलावर टाकला गेला.' तेबोहोचे वडील त्यांना आपण एकत्र येऊन संघर्ष करू असं सुचवू पाहतात, पण समोरचा शत्रू पैशाने किती ताकदीचा आहे याची जाणीव त्यांना आहे. आपण ही लढाई कधीच जिंकू शकणार नाही हे वास्तव त्यांनी स्वीकारलंय.

'फ्लो' सारख्या डॉक्युमेंटरीमध्ये दिग्दर्शक कागोमा त्वाहिरवा (रवांडा, 22.15 मिनिटं) यांनी 1884च्या रवांडातल्या नरसंहारानंतर जन्माला आलेल्या, पण ते दुःख भोगत मोठं झालेल्या मुलीचा प्रवास प्रभावीपणे मांडलाय. या मुलीचे क्लोजअप्स तिचं दुःख आपल्यापर्यंत पोहोचवतात. जणू तिला ते शब्दात मांडता येत नाहीये, पण तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतंय. आजूबाजूची तरुण मंडळी लहान असतानाच्या आपापल्या अनुभवांविषयी बोलताना आपण ऐकतो. या बोलण्यात कुठेही अभिनिवेश नाही आणि कदाचित म्हणूनच ते अंगावर येतं. प्रत्यक्ष पडद्यावर कोणतीही हिंसा दिसली नाही तरीही.

विस्थापन, युद्ध, भूतकाळाला सामोरं जाणं, स्वतःचं दुःख मांडणं, कौटुंबिक कहाणी सांगणं, आपली मुळं शोधण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक थीम्स दिग्दर्शकांनी हाताळलेल्या होत्या. अगदी स्वतःच्या आजाराविषयीही कुणी बोलत होतं.

'ऑटोबायोग्राफी ऑफ माय डाएबिटिस' (मॅथ्यू लॅन्सिट, फ्रान्स/कॅनडा, 30.39 मिनिटं) ही डॉक्युमेंटरी अशीच. 'ऑपेरा'नंतर माझ्या मनात ही सर्वाधिक काळ रेंगाळत राहिली. मॅथ्यू लॅन्सिटना लहान असतानाच मधुमेह झाला. त्याचे आपल्यावर, आपल्या शरीरावर काय परिणाम झाले याचं तपशीलवार वर्णन त्यांनी सिनेमात घडवलं आहे. पण ते थेटपणे अर्थातच मांडलं जात नाही. लॅन्सिट त्याला सिनेमाचीच जोड देतात. सिनेमा हे त्यांचं पॅशन. त्यातून लहान असल्यापासून बॉडी हॉरर हा सिनेमातला जॉनर त्यांच्या आवडीचा. अशा सिनेमांमधून दिसणारा शरीराचा ऱ्हास, विरघळणारे अवयव, हिंसेचे परिणाम अशा अनेक दृष्यांचा वापर त्यांनी बेमालूमपणे मधुमेहाशी आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांशी जोडलाय. ते म्हणतात, "माझ्या डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये गर्दी केलेल्या कौटुंबिक मुव्हीज आणि लहानपणातल्या बॉडी हॉरर मुव्हीजच्या तळाशी काय दबा धरून बसलंय? काही वैद्यकीय ग्रंथ, काही माझ्या आजाराचा वैद्यकीय इतिहास आणि थोड्या यात मिसळून गेलेल्या आठवणी. कॉम्प्युटरच्या माझ्या स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या प्रतिमांना, एका मधुमेही व्यक्तीच्या नजरेतून, या व्हिडिओ निबंधाच्या माध्यमातून मी पुन्हा आपलंसं करतोय."

एका आजाराकडे, स्वतःला झालेल्या एका आजाराकडे इतक्या अलिप्तपणे पाहणं फार कमी वेळा दिसतं. आणि अशा प्रकारे तर नाहीच नाही. यात मधुमेहासारख्या आजाराची तीव्रता सांगताना कुठेही बिचारेपणाचा आव नाही. व्यक्तिशः बॉडी हॉरर हा सिनेमाचा प्रकार माझ्या आवडत्या जॉनरपैकी नाही. मुळातच एवढ्या वर्षांत हॉररशी माझं फारसं नातं जुळलेलं नाही. अनेकदा अशा सिनेमांमधली दृष्य पाहताना अंगावर शिसारीही येते. पण अशा सिनेमांमधली शरीराशी 'खेळणारी' दृष्यं आणि स्वतःच्या शरीरावर मधुमेहाचे होणारे परिणाम हे दिग्दर्शकाने इतक्या प्रभावीपणे जक्स्टापोज केलंय की त्याला दाद द्यावीशी वाटते.

पन्नासहून जास्त सिनेमे बघितल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणे जाणवली ती ही की, बहुसंख्य दिग्दर्शकांनी आपल्याला जे म्हणायचंय ते सांगण्यासाठी सर्वसाधारण नॅरेटिव्हचा वापर अजिबातच केला नव्हता. हे दिग्दर्शक तरुण होते, त्यांची व्यक्त व्हायची पद्धत आधुनिक होती आणि त्याच वेळी जे सांगायचंय त्यात ठामपणा होता. याचा अर्थ सगळेच सिनेमे उत्कृष्ट होते अशातला भाग नाही, किंवा सगळेच खूप काही सांगू पाहणारे होते असंही नाही. पण प्रयोग करण्याची ऊर्मी मात्र सगळ्यांमध्ये होती असं नक्की म्हणता येईल. शॉर्ट फिल्म हा पूर्ण लांबीच्या फिचर फिल्मचा छोटा अवतार नसून ते एक स्वतंत्रपणे हाताळण्याचं माध्यम आहे, त्याचं स्वतःचं असं व्याकरण आहे, त्याची सादरीकरणाची पद्धत वेगळी आहे आणि दृक्-श्राव्य माध्यमामधलं त्याचं स्थान आगळं आहे याची प्रखर जाणीव या सिनेमांनी नव्याने करून दिली. उबरहौजनसारख्या महोत्सवांमधून या दिग्दर्शकांना व्यासपीठ मिळतं, त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते हे म्हणूनच महत्त्वाचं ठरतं.


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मीना कर्णिक,  मुंबई ( 86 लेख )
meenakarnik@gmail.com

पत्रकार, चित्रपट समीक्षक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके