डिजिटल अर्काईव्ह

दिग्दर्शक हाच सिनेमाचा 'सब कुछ' असतो असं म्हटलं तर एकेकदा असंही होतं की, एखादी गुणवान नटी किंवा नट आख्खा सिनेमा आपल्या खांद्यावर उचलते : उदाहरणार्थ, 'ऑटम सोनाटा'त इन्ग्रिड बर्गमन आणि लिव उलमान. किंवा आपल्याकडे 'कुंकू'तल्या शांता आपटे. नाटक हे नटाचं असतं असं म्हटलं तर एकेकदा असंही होतं की, भल्या भल्या नटाला /नटीला नाटकाचं वजन कळत नाही. यात पुष्कळ grey area आहे. नाटक असो वा सिनेमा, लहान-थोर सगळ्या पात्रांना त्यांच्या त्यांच्या भूमिकेनुसार 'स्पेस' आणि योग्य तो वाव देणं ही दिग्दर्शकाची मुख्य जबाबदारी असते.

विजया मेहता यांच्या 'झिम्मा' आत्मचरित्राचं काम वर्ष-दीड वर्ष सुरू होतं. त्या काळात मी बाईंना अधूनमधून रंगभूमीविषयक प्रश्न विचारत असे. त्या मोकळेपणानं उत्तरं द्यायच्या. बाईंशी झालेल्या अनौपचारिक संभाषणाचा हा संक्षिप्त वृत्तान्त.

प्रश्न : सत्तरेक वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय, सुशिक्षित मराठी कुटुंबातली मुलगी नाटकात काम करते हे बरंच क्रांतिकारी असणार. तुम्हाला विरोध झाला असणार.

- नाही. एकतर मी कायस्थ समाजातली. कायस्थ समाज हा बराच पुढारलेला होता. दुसरं, माझ्या वडिलांवर रॉयिस्ट विचारसरणीचा प्रभाव होता. ते मानवेंद्रनाथ रॉयना मानायचे. त्या वेळी असं बघ की, 'चले जाव' चळवळ जोरात होती. जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली आमचे हिरो होते.

तिसरं म्हणजे दुर्गाबाई खोटे, शांता आपटे, लीलाबाई चिटणीस, स्नेहप्रभा प्रधान, नलिनी जयवंत सिनेमात काम करत होत्या नि त्यांचं पुष्कळ नाव झालं होतं. त्या सगळ्या पदवीधर होत्या.

प्रश्न : एका अर्थी तुमच्या कारकिर्दीची सुरुवात इंग्रजी रंगभूमीवर झाली; इब्राहिम अल्काझी, अदी मर्झबान हे तुमचे गुरू. तिथल्या वातावरणाशी तुमचं छान जुळलं होतं. परंतु, आपण मराठी रंगभूमीवर काम करावं असं तुम्ही ठरवता.

- सुरुवातीला इंग्रजी रंगभूमीशी माझा निकटचा संबंध आला हे खरं; परंतु, माझा जीव मराठी रंगभूमीत अडकला होता. मुंबईतल्या इंग्रजी रंगभूमीची एक शैली, पद्धत ठरून गेली होती. ती मंडळी बहुधा पाश्चात्त्य नाटककारांची नाटकं करायची अभिजात (शेक्सपियर, सोफोक्लस्) किंवा आधुनिक (शॉ आणि टेनेसी वुइल्यम्स). त्यांचा प्रेक्षकवर्गही मर्यादित आणि दक्षिण मुंबईपुरताच. मला अस्सल भारतीय नाटक करायचं होतं खास करून मराठी सांस्कृतिक-सामाजिक विचारव्यूहाशी मेळ खाणारं नाटक करावं असं मला वाटायचं.

प्रश्न : दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास मराठी रंगभूमीवर बरेच चांगले प्रयोग होत होते 'आंधळ्यांची शाळा', 'सवाई माधवराव यांचा मृत्यू', 'कुलवधू', वगैरे. मामा वरेरकर, रांगणेकरांच्या नाटकांत स्त्रीविषयक विचार होता. मांडणी ओबडधोबड असेल, परंतु नव्या रंगभूमीची चाहूल लागली होती.

- होय, मला वाटतं की मामा, रांगणेकर यांनी जमिनीची मशागत केली. दुसरीकडे, गणपतराव बोडस, दुर्गाबाई खोटे, नानासाहेब फाटक पारंपरिक शैलीतली नाटकं करत असले तरीही त्यांच्या अभिनयात एक विलक्षण फोर्स होता. नानासाहेब फाटक रंगमंचावर उभे राहिले की किती भव्य दिसायचे. गणपतराव बोडस अभिनयाच्या कितीतरी सूक्ष्म छटा दाखवायचे.

शिवाय, माझ्या उमेदवारीच्या काळात दुर्गाबाई खोटेंचं मार्गदर्शन मला मिळालं. पुढे मी त्यांची सून झाले. प्रयोगशील रंगभूमीविषयी दुर्गाबाईंना आस्था होती.

दुर्गाबाई, नानासाहेब फाटक, गणपतराव बोडस हे मराठी रंगभूमीचे श्रेष्ठ कलावंत. मराठीत गुणी कलावंतांची उणीव नव्हती. गरज होती ती नवी आवाहनं समर्थपणे पेलणाऱ्या नाटककाराची. मराठीत काहीतरी नवं, प्रयोगशील करावं असं मला तीव्रपणे वाटत होतं. इंग्रजीतच राहिले असते तर 'रंगायन' घडलं नसतं.

प्रश्न : 'रंगायन' ही काळाची गरज आहे असं तेव्हा तुम्हाला वाटत होतं काय ?

- काळाची गरज वगैरे तेव्हा डोक्यात नव्हतं. जे काही घडलं ते आपसूक घडत गेलं. आम्ही सगळे तेव्हा वयानं लहानच होतो. एक खरं की, महाराष्ट्राच्या वैचारिक-सांस्कृतिक परंपरेचं बळ आपल्या पाठीशी आहे ह्याची आम्हाला जाणीव होती.

प्रश्न : तुम्ही 'झिम्मा'त 'रंगायन' विषयी ममत्वानं लिहिलंय.

-'रंगायन'चा अनुभव रसरशीत नि बहुआयामी होता. एकीकडे आमची नाटकं सुरू होती तर दुसरीकडे हुसेन, गायतोंडे, सूझा हे चित्रकलेत खूप मोठा विचार मांडत होते, तर पं. कुमार गंधर्व, किशोरी (आमोणकर) संगीताकडे नव्या नजरेनं पाहात होते. हे सगळे प्रवाह एकमेकांत मिसळून गेले. 'लिट्ल मॅगझिन'ची चळवळ जोरात होती. श्री.पु. (भागवत), वा.ल. कुलकर्णी, पु. शि. रेगे यांच्याशी मी नियमित चर्चा करत असे. वा.ल. माझे मराठीचे प्राध्यापक होते. सगळ्या गोष्टी जुळून आल्या.

प्रश्न : तुमच्या नाटकांत संगीत, चित्रकलेचा प्रभाव दिसतो. तुम्ही नाटक मध्यलयीत बांधता. मध्यलयीतलं गाणं हे खरं गाणं असं संगीतात मानतात; दुसरं, तुमच्या नाटकांतल्या प्रतिमा. चित्रकलेतून त्या तुम्ही घेतल्या असं वाटतं.

- मला संगीतातलं कळत नाही, पण नाटकाला एक लय असावी हे पं. कुमार गंधर्व, किशोरी (आमोणकर), जितेंद्र (अभिषेकी) यांच्या सहवासात कळत गेलं. कायेय की, सगळे कलाप्रकार एकमेकांवर प्रभाव टाकत होते. तुला सांगते की, एकदा आमचा कुठंतरी प्रयोग होता. मुंबईतच, पण कुठं ते नक्की आठवत नाहीए. तर शेवटची लोकल गाडी चुकली. मी, माधव (वाटवे), वृंदावन (दंडवते) वगैरे आम्ही सगळे स्टेशनवर अडकून पडलो. आता करायचं काय? पहिली गाडी पहाटे चार वाजता. तर वृंद्यानं झोळीतून नेमाडेचं 'कोसला' काढलं आणि आम्ही त्या कादंबरीचं सामूहिक वाचन केलं.

प्रश्न : व्यावसायिक शिस्त, वक्तशीरपणा, नियोजनकौशल्य, कार्यकौशल्य या इंग्रजी रंगभूमीच्या काही चांगल्या प्रथा तुम्ही मराठीत रुजवल्या.

- होय. आपल्याकडे बराच गचाळपणा असतो. 'चालतंय की' ही आपली वृत्ती. इंग्रजी रंगभूमीवर तसं होत नाही. पुन्हा, आपल्याकडे नटसम्राट, नटशार्दुल, अभिनयचंद्रिका वगैरे पदव्या असतात. नाटक हा एक रसरशीत जीवनानुभव आहे आणि तो प्रेक्षकांसमोर सादर करताना कोणीही मोठं किंवा छोटं नसतं याचं भान इंग्रजी रंगभूमीला होतं.

मुळात कमिटमेंट असायला हवी. आपल्या कामावर श्रद्धा असायला हवी. जे काम हाती घेतलंय त्यात पूर्ण कमिटमेंट असली पाहिजे, हा विचार 'रंगायन 'नं रुजवला असं मला वाटतं. दांडेकरांच्या (गो. नी. दांडेकर) 'शितू'ची गोष्ट सांगते. नाटकाला कोकणाची पार्श्वभूमी आहे. गावातली घरं, वगैरे. मला शेण हवं होतं. अशोक (शहाणे) आणि वृंदावन यांनी बरीच पायपीट करून एक गोठा शोधला नि शेणाच्या टोपल्या आणल्या.

प्रश्न : नाट्यशिबिरं, कार्यशाळा ही पद्धतदेखील तुम्ही सुरू केली.

- नाटकाचा सर्वंकष विचार के. नारायण काळे, पार्श्वनाथ आळतेकर यांनी पूर्वी केला होता. नाटकाचा एक प्रोसेस असतो. तो समजून घ्यायचा तर त्यासाठी कलावंताचं प्रशिक्षण झालं पाहिजे. अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेषभूषा आणि मुख्य म्हणजे संवाद, भाषा. संहितेच्या पोटात नेमकं काय दडलंय ते समजून घ्यायचं. पुन्हा, एक कॅरेक्टर म्हणून तुम्ही नाटकात किती गुंतायचं हाही एक मुद्दा असतो. संयत नि तरीही विलक्षण शक्तिमान, सौष्ठवपूर्ण अभिनय हा नाटकाचा कणा असतो.

प्रश्न : गणपतराव बोडस, नानासाहेब फाटक, मामा वरेरकर, के. नारायण काळे या पूर्वसुरींकडूनही तुम्ही काहीतरी घेत होतात. नि आपलं नवंही करत होतात.

- कलेत असंच असतं. मागच्या पिढीशी तुम्ही पूर्णपणे फारकत नाही घेऊ शकत. विधायक, निर्भेळ परंपरा मी मानते. मी 'मुद्राराक्षस' करते तेव्हा मी परंपरेचं संचित धुंडाळत असते आणि तीत नवं काहीतरी टाकत असते. परंपरेचं re-interpretation करत असते.

प्रश्न : इंग्लंडहून शिकून परत आल्यावर तुम्ही, ज्यांना मराठी नाटकवाले धंदेवाईक म्हणतात अशा कंपन्यांसाठी नाटकं केली.

- व्यावसायिक रंगभूमीचा पर्याय पडताळून पाहावा, असं मला वाटलं. म्हणून 'मला उत्तर हवंय', 'माता द्रौपदी', 'अखेरचा सवाल' वगैरे नाटकं केली. नाटक कंपन्या धंदेवाईक असतात तर त्या असोत. नाटकात पैसा लागतोच. मात्र, मी नाटकाकडे व्यवसाय म्हणून पाहते. आणि व्यवसायाची काही मूल्यं असतात, काही शिस्त असते. फक्त फायद्याचा विचार हा कलेला मारक ठरतो.

प्रश्न : 'रंगायन' सारखी एक प्रयोगशील संस्था सुरू करावी असं नाही वाटलं ?

- प्रायोगिक नाटकाच्या मर्यादा आहेत हे लक्षात येत होतं. त्या आजदेखील आहेत.

एक तर नवे, डोळस विचार स्वीकारायला समाज सहसा तयार नसतो. त्यामुळे प्रायोगिक नाटकांची आर्थिक बाजू ही दुबळीच राहते. दुसरं, सभागार मिळणं कठीण असतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाटकासंबंधीचा माझा विचार, माझी मूल्यं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असं मला वाटलं. दामूसुद्धा (नट-दिग्दर्शक दामू केंकरे) मला म्हणाला, 'भर समुद्रात उडी घे'.

प्रश्न : म्हणजे लोकांचा पाठिंबा महत्त्वाचा.

- होय, पण त्यासाठी लोकानुनय नको. नाटकाच्या मूळ कंदाला ढळ लागेल असे समझोते नाही करायचे. लोकांपर्यंत तर गेलं पाहिजेच ना. रंगभूमी, सिनेमा ही लोकरंजनाची माध्यमं आहेत. म्हणून मुख्य प्रवाहातल्या नाटकांना मी 'लोकमान्य' रंगभूमी म्हणते. रंजनाचा दर्जा वरचाच असला पाहिजे.

प्रश्न : मुख्य प्रवाहातल्या नाटकांत तुम्ही 'रंगायन'चं नॅरटिव घेऊन पुढे गेलात.

- तू असं बघ की, आगरकरांनी, म. फुल्यांनी प्रबोधनयुग आणलं. म. फुल्यांनी स्त्री-शिक्षणाचा पाया घातला. स्त्रीचं एक स्वायत्त व्यक्तिमत्त्व असतं, तिला तिचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे असा विचार आपल्याकडे रुजला. विजय तेंडुलकर, चिं. त्र्यं. खानोलकर, (जयवंत) दळवी, अनिल (बर्वे) आणि महेश (एलकुंचवार) यांच्या नायिका म. फुल्यांच्या मुली आहेत असं मला वाटतं.

प्रश्न : 'रंगायन'मधली फूट अटळ होती ?

- संस्था, चळवळी यथावकाश फुटतात. मुख्य उद्दिष्ट समान असलं तरीही तपशिलावरून, कार्यशैलीवरून मतभेद होतात, गटबाजी सुरू होते आणि बारीकसारीक बाबी उग्र रूप धारण करतात. हे होतंच. 'रंगायन' आज ना उद्या फुटली असती. पण 'रंगायन'चा विचार पुढे वीस-तीस वर्षं वेगवेगळ्या स्वरूपात पसरला हे विशेष. आजची मुलं प्रयोगशील नाटक करतात. काळ आणि परिस्थितीनुसार मांडणी, शैलीत बदल होणार हे उघड आहे; पण प्रत्येक प्रयोगशील नाटकाच्या मुळाशी 'रंगायन'ची प्रेरणा आहे, असं मी मानते.

प्रश्न : नाटक हे माध्यम अभिनेत्याचं / अभिनेत्रीचं आणि सिनेमा हे दिग्दर्शकाचं अशी एक ढोबळ विभागणी केली जाते.

- तसं नाहीए. दिग्दर्शक हाच सिनेमाचा 'सब कुछ' असतो असं म्हटलं तर एकेकदा असंही होतं की, एखादी गुणवान नटी किंवा नट आख्खा सिनेमा आपल्या खांद्यावर उचलते उदाहरणार्थ, 'ऑटम सोनाटा 'त इन्ग्रिड बर्गमन आणि लिव उलमान. किंवा आपल्याकडे 'कुंकू'तल्या शांता आपटे. नाटक हे नटाचं असतं असं म्हटलं तर एकेकदा असंही होतं की, भल्या भल्या नटाला / नटीला नाटकाचं वजन कळत नाही. यात पुष्कळ grey area आहे. नाटक असो वा सिनेमा, लहान-थोर सगळ्या पात्रांना त्यांच्या त्यांच्या भूमिकेनुसार 'स्पेस' आणि योग्य तो वाव देणं ही दिग्दर्शकाची मुख्य जबाबदारी असते.

प्रश्न : 'बॅरिस्टर', 'वाडा चिरेबंदी', 'हमिदाबाईची कोठी' इ. नाटकांत तुम्ही अभिनय करता आणि दिग्दर्शनही. या दोन जबाबदाऱ्यांतला समतोल साधणं कठीण असतं काय ?

- कठीण असू दे, पण तो बॅलेन्स सांभाळावा लागतो. माझीच भूमिका खुलवावी किंवा मला चार संवाद जास्त मिळावेत, असं मी केलं नाही. शेवटी, एक नाट्यानुभव म्हणून नाटकाचा संपूर्ण आणि एकात्म असा परिणाम असतो. त्याला इजा पोहोचू नये असा दिग्दर्शकाचा प्रयत्न असतो, असावा.

नाटकातला प्रत्येक क्षण, पात्रांची प्रत्येक हालचाल ही अंतिम नि एकात्म परिणामाकडे जाणारी असली पाहिजे. नेपथ्य, प्रकाशयोजना, props ही सगळी सामग्री घेऊन नाटक अंतिम क्षणाकडे वाटचाल करत असतं. अगदी नाटकातला काळोखसुद्धा. तू बघशील की, महेशच्या (एलकुंचवार) नाटकातला काळोखही किती अर्थगर्भ असतो.

प्रश्न : नाटकाच्या मूळ संहितेत दिग्दर्शकानं किती बदल करावेत ?

- असा काही निश्चित फॉर्मुला नाहीए. पहिली गोष्ट म्हणजे लेखकाला आपल्या लिखाणात इतकासादेखील बदल नको असतो. तू लेखन करतोस, बातमी लिहितोस. तुला वाटतं की, माझी बातमी, माझा लेख आहे तसा छापून यावा; त्यात बदल नको. परंतु, तुझं लिखाण संपादक तटस्थ नजरेनं वाचतो नि त्याला काही ठिकाणी कात्री चालवावी लागते; वरचा परिच्छेद खाली घ्यावा किंवा खालचा परिच्छेद वर घ्यावा असं त्याला वाटतं. त्याची काही कारणं असतात. वर्तमानपत्रात जागेचा प्रश्न असतो; कोणत्या बातमीला किती स्पेस द्यायची हे ठरवावं लागतं. बऱ्याचदा लिखाणात पुनरुक्ती असते, लिखाण पाल्हाळिक होतं, वगैरे. लेखक आपल्या लिखाणाकडे तटस्थ नजरेनं पाहू शकत नाही. म्हणून तर संपादक ही संस्था जन्माला आली. नाटकाचंदेखील संपादन करावं लागतं.

दुसरं एक लक्षात घे की, नाटककारानं लिहिलेलं नाटक रंगमंचावर सादर करायचं असतं. नाटक हे एक वेगळंच माध्यम आहे नि त्याच्या काही मागण्या नि मर्यादा असतात. लिखाण ते रंगमंच हे एक transformation असतं. स्टेजवर एक वेगळीच प्रतिमासृष्टी उभी करायची असते. परिवर्तनाची ही प्रक्रिया गुंतागुतीची असते. तीत अनेक factors काम करत असतात.

मुख्य म्हणजे नाटकाची स्वतःची एक रंगभाषा असते. रंगभाषा जाणणारे नाटककार आपल्याकडे फार कमी. 'रंगायन'च्या काळात पी.एल. (पु. ल. देशपांडे) मला नेहमी चेष्टेनं म्हणायचे, 'कुठे गेला तुझा तो अर्धा नि दीड वाक्यांचे संवाद लिहिणारा नाटककार ?' म्हणजे तेंडुलकर. मराठी रंगभूमीला पल्लेदार, भरजरी संवादांची हौस. परंतु नाटकातली visual ताकद रंगभूमीवर प्रकट झाली पाहिजे ना. तशा शक्यता हुडकून काढण्याचं काम हे दिग्दर्शकाचं.

युद्धाचा प्रसंग तुम्ही रंगमंचावर कसा दाखवणार? युद्धभूमीवर पन्नास हजार सैनिक लढत होते, असं लेखक लिहितो. त्याचं काय जातंय लिहायला? ते रंगमंचावर कसं दाखवणार? मग तुम्हाला काही रंगमंचीय क्लृप्त्या वापराव्या लागतील devices. हे काम दिग्दर्शकाचं. हे मी थोडक्यात सांगितलं. खरंतर लेखक रंगभूमी किंवा लेखक-सिनेमा हा झगडा फार मजेशीर असतो नि तो चालतच राहणार. तो जितका चालेल तितका रंगभूमीला लाभ. कारण नवनवे प्रश्न चर्चेला येतील.

प्रश्न : नाटक हा नाशवंत प्रकार आहे. पडदा पडला की नाटक संपतं असं वाटतं काय ? सिनेमा पुन्हा पुन्हा पाहण्याची सोय आहे.

- तंत्रज्ञानामुळे सिनेमा पुन्हा पुन्हा पाहता येतो हे खरं; परंतु किती लोक पुन्हा पुन्हा सिनेमे व्हिडिओवर पाहतात ? पुन्हा पुन्हा 'पाहणं' हा निकष असू शकत नाही. त्या कलाकृतीचा मनावर दीर्घ नि सघन परिणाम होतो किंवा नाही हा मुद्दा आहे. अजिंठा-वेरूळची लेणी आपण रोज पाहत नाही; 'मोनालिसा' आपण एकदाच पाहतो, पण त्याचा परिणाम दीर्घ काळ टिकतो, टिकला पाहिजे. नाटकाचंही तसं आहे. दुसरं, छापील नाटक एकट्याशी वाचता येतं की. नि ते मनातल्या रंगभूमीवर उभं राहतं.

केरळात एक पारंपरिक नृत्य आहे. ते देवळात सादर केलं जातं. आधी देवळाच्या अंगणात एक मोठी रांगोळी काढली जाते. खूप मोठी. तिच्याभोवती फेर धरून मुलं-मुली नृत्य करतात. तीनेक तास हा सोहळा सुरू असतो. नंतर ती रांगोळी पुसून टाकतात. अनुभव संपला असा ह्याचा अर्थ नाही. उद्या पुन्हा नवी रांगोळी, नवं नृत्य सादर होणार आहे. नाटक संपत नाही. उद्या पुन्हा प्रयोग होणार असतो नि तो नव्या ताकदीनं होणार असतो. नाटकाचा हा दुर्दम्य आशावाद लेखकाला, नटांना, दिग्दर्शकाला बळ देत असतो.

प्रश्न : तुम्हाला हिंदी सिनेसृष्टीतून बोलावणं आलं होतं, पण तुम्ही सिनेमात नाही गेलात.

- हिंदी सिनेमाच्या ऑफर्स आल्या होत्या. करदार प्रॉडक्शन्सकडून आली होती. विख्यात निर्माता ए. आर. करदार. त्या वेळचा मोठा निर्माता; इतरही ऑफर्स आल्या. पण माझं मन नाटकात मराठी नाटकात गुतलं होतं. अर्थात, नंतरच्या काळात मी टेलिविजन, सिनेमा केला.

प्रश्न : तुम्ही स्वतःला स्त्रीवादी मानत नाही.

- नाही. चळवळ, विद्रोह वगैरे गोष्टी मला मानवत नाहीत. स्त्रीविषयक विचार मी माझ्या नाटकांतून मांडला जरूर, परंतु मी फेमिनिस्ट नाही. बाई आणि पुरुष ही अखेर माणसं असतात. माणसाचे सगळे गुण-दोष त्यांच्यात असतात. संवाद-विसंवादातून त्यांचं नातं आकार घेत असतं. त्यातले बारकावे समजून घेतले तर स्त्री-पुरुष संबंधाचं आपलं आकलन अधिक व्यापक होईल.

प्रश्न : नवं नाटक करावंसं वाटतं ?

- नाही. तालमीसाठी दीड-दोन महिने देणं आता कलावंतांना शक्य होत नाही आणि मनसोक्त तालमींशिवाय उत्तम नाटक शक्य नाही.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Ashwini Ayachit- 31 Jul 2026

    खूप सुंदर ! बाईंच्या बद्दल कितीही वाचलं तरी समाधान होत नाही.

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके