डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रायन शाळेतून घरी गेला, तेव्हा आई-बाबांना म्हणाला, ‘मला ७० डॉलर द्या.’ आई-बाबा हसले. पण रायनने हट्ट धरला. ‘तेवढे पैसे आपल्याकडे नाहीत’ असे आई म्हणाली. रात्री रायनने पुन्हा विषय काढला. नकारच आला. तो रुसून बसला. ‘तिकडे माणसं पाण्याअभावी मरताहेत आणि तुम्ही ७० डॉलर देत नाही’ असे रडकुंडीला येऊन म्हणू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा विषय काढला. तेव्हा आई म्हणाली, ‘तुला एवढीच त्या लोकांची काळजी आहे, तर पैसे साठवायला लाग. हा घे, एक डॉलर.’ मग आईने त्याला पैसे जमवण्यासाठी एक आकर्षक डबा दिला. त्याने ठरवले, आपल्या खाऊचे पैसे या डब्यात टाकायचे आणि ७० डॉलर जमा झाले की, हा डबा प्रेस्टबाईकडे द्यायचा. त्या तो युगांडाला पाठवतील आणि मग शाळेतील सर्व मुलांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल.

जगात १९५ देश आहेत. काही आकाराने खूप लहान आहेत, काही आकाराने खूप मोठे आहेत. काही देश लोकसंख्येने खूप लहान आहेत, काही लोकसंख्येने खूप मोठे आहेत. यापैकी कॅनडा देश कसा आहे? आकाराने खूप मोठा, जगात दुसऱ्या क्रमांकाचा. त्याची लोकसंख्या मात्र तुलनेने खूपच कमी आहे. किती? अवघी साडेतीन कोटी. 

अशा या कॅनडाची राजधानी आहे ‘ओटावा’ हे शहर. त्या शहरापासून ५६ किमी अंतरावर केम्टव्हिले नावाचे गाव आहे. छोटे पण टुमदार. जेमतेम पाच हजार लोकवस्तीचे. या गावात सर्व सुविधा आहेत.  लोकांना रहायला छान घरे आहेत, स्वच्छ रस्ते आहेत, भरपूर झाडी आहे, मुलांना खेळण्यासाठी बागा आहेत. उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या तीन शाळा आहेत. तेथील ‘होली क्रॉस’ या शाळेत, बरोबर वीस वर्षांपूर्वी एक ठिणगी पडली. नेमके सांगायचे तर जानेवारी १९९८ मध्ये एके दिवशी, पहिलीच्या वर्गात सकाळी नॅन्सी प्रेस्ट नावाच्या एक शिक्षिका आल्या. ‘पाणी’ हा धडा शिकवू लागल्या. पृथ्वीवर पाणी किती आहे- जमीन किती आहे, पाण्याचे घटक कोणते असतात, पाण्याला उष्णता दिल्यावर काय होते आणि थंड केल्यावर काय होते, पाण्याचा वापर कुठे-कुठे केला जातो, असे बरेच काय-काय सांगू लागल्या. सोप्या पद्धतीने, अगदी शांतपणे. समोर बसलेली सहा वर्षांची मुले तल्लीन होऊन ऐकत होती.

आणि मग प्रेस्टबाई म्हणाल्या, ‘मुलांनो, जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. उदा. आजच मी बातमी वाचली, युगांडा देशाची. आफ्रिका खंडात युगांडा नावाचा अगदीच छोटा देश आहे. त्याची लोकसंख्या कॅनडापेक्षा जास्त आहे, परंतु कॅनडाचे क्षेत्रफळ युगांडाच्या ४० पट जास्त आहे. त्या देशात पाण्याचे खूपच दुर्भिक्ष्य आहे. तिथल्या लाखो लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही, लहान मुले व महिलांना पाणी आणण्यासाठी रोज काही किलोमीटर चालत जावे लागते. अनेक वेळा ते पाणी दूषित असते. त्यामुळे साथीचे रोग होतात, माणसे आजारी पडतात. काही वेळा त्या आजारातच त्यांचा मृत्यू होतो. त्या देशात गरिबी आहे, त्यामुळे लोकांकडे उपचार करण्यासाठी पैसे नसतात. तेथील सरकार प्रयत्न करते, पण इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा ते पूर्ण करू शकत नाही. म्हणून जगातील अन्य देशांतील लोक युगांडामध्ये जाऊन तेथील लोकांना थोडीफार मदत  करतात. अशी मदत करणारी आपल्याकडील एक संस्था आहे- वॉटरकॅन. या संस्थेने असे आवाहन केले आहे की, ७० डॉलर रक्कम मिळाली तर युगांडातील एका शाळेची एका वर्षाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, आणि २००० डॉलर मदत मिळाली तर एका संपूर्ण गावाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कायमची होईल. तर मुलांनो, त्या देशाला आपण थोडीशी रक्कम मदत म्हणून पाठवू या का? तुम्ही तुमच्या खाऊची रक्कम दिली तर ती एकत्र करून वॉटरकॅन संस्थेकडे पाठवू या का?’ 

प्रेस्टबाईंचे हे भावपूर्ण आवाहन ऐकून सर्व मुले एका सुरात ‘हो’ म्हणाली. दुसऱ्या दिवशी सर्व मुलांनी आपापल्या खाऊची रक्कम प्रेस्टबाईंकडे दिली. ती एकूण रक्कम होती ३० डॉलर. परंतु त्या मुलांमध्ये रायन हर्लजॅक नावाचा मुलगा होता, तो बाईंना म्हणाला, ‘मी ७० डॉलर जमा केले तर एका शाळेची पूर्ण सोय होईल  ना?’ प्रेस्टबाई हसल्या आणि म्हणाल्या, ‘रायन आपण केली तेवढी मदत पुरे. आता अधिकची मदत इतर लोक करतील.’ 

रायन शाळेतून घरी गेला, तेव्हा आई-बाबांना म्हणाला, ‘मला ७० डॉलर द्या.’ आई-बाबा हसले. पण रायनने हट्ट धरला. ‘तेवढे पैसे आपल्याकडे नाहीत’ असे आई म्हणाली. रात्री रायनने पुन्हा विषय काढला. नकारच आला. तो रुसून बसला. ‘तिकडे माणसं पाण्याअभावी मरताहेत आणि तुम्ही ७० डॉलर देत नाही’ असे रडकुंडीला येऊन म्हणू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा विषय काढला. तेव्हा आई म्हणाली, ‘तुला एवढीच त्या लोकांची काळजी आहे, तर पैसे साठवायला लाग. हा घे, एक डॉलर.’ मग आईने त्याला पैसे जमवण्यासाठी एक आकर्षक डबा दिला. त्याने ठरवले, आपल्या खाऊचे पैसे या डब्यात टाकायचे आणि ७० डॉलर जमा झाले की, हा डबा प्रेस्टबाईकडे द्यायचा. त्या तो युगांडाला पाठवतील आणि मग शाळेतील सर्व मुलांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल. 

दुसऱ्या दिवशी रायनच्या घरी एक नातेवाईक आले. तेव्हा रायनचा संकल्प काय आहे, ते आई- बाबांनी त्यांना गंमत म्हणून सांगितले. ते नातेवाईक म्हणाले, ‘रायन, छान करतोस हं. हे घे माझे पण थोडे पैसे.’ रायन खूष झाला. तेव्हा त्याला वाटले, ‘आपण इतरांकडून अशी मदत मिळवली तर आपले ७० डॉलर लवकर जमा होतील.’ 

मग तो शेजारच्या व आसपासच्या घरांमध्ये जाऊ लागला. आणि ‘युगांडातील मुलांसाठी पाण्याची विहीर करण्यासाठी थोडी मदत करा’, असे सांगू लागला. त्यानंतर मित्रांच्या घरी जाऊ लागला. मित्रांच्या आई-बाबांना तेच सांगू लागला. मग बागेत जाऊ लागला आणि मित्रांना घेऊन काही दुकानांतही फिरू लागला. एक सहा वर्षांचा मुलगा छोटा डबा घेऊन येतोय आणि हजारो किलोमीटर अंतरावरील युगांडाच्या मुलांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून मदत मागतोय; हे दृश्य लोकांना गंमतीदार वाटू लागले. लोक रायनचे कौतुक करून, थोडी रक्कम त्याच्या डब्यात टाकू लागले. पैशांचा डबा भरू लागला, रायनचा उत्साह वाढू लागला. शाळा सुटल्यावर व सुट्टीच्या दिवशी तो अनेक घरी जाऊ लागला. 

हे असे बरेच दिवस चालले, तेव्हा रायनच्या बाबांच्या एका मित्राने तेथील वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला सांगितले. त्या पत्रकाराने छोट्या रायनचा फोटो काढला आणि ‘ॲडव्हान्स’ या वृत्तपत्रात बातमीच छापून टाकली. त्या बातमीत रायनच्या घराचा पत्ता आणि त्याच्या शाळेचे नाव छापले होते. त्यामुळे ती बातमी वाचून अनेक लोकांनी थोडीथोडी मदत रायनकडे पाठवली. काहीजण कुतूहल म्हणून त्याला बघायला, त्याच्या घरी किंवा शाळेत गेले. 

असे करता करता चार महिने झाले. आणि रायनच्या डब्यात ७० डॉलर जमा झाले. त्याने ते प्रेस्टबाईंकडे दिले. बाईंनी ती रक्कम वॉटरकॅन संस्थेला  पाठवली आणि रायनने हे पैसे कसे जमवले तेही कळवले. त्या संस्थेचे एक कार्यकर्ते रायनला भेटायला आले, त्याचे कौतुक करून म्हणाले, ‘एका गावात पाण्याची कायमची सोय करण्यासाठी, एका विहिरीला २००० डॉलर खर्च येतो. तुझी मदत आम्ही जरूर पाठवू.’ रायन म्हणाला, ‘मी २००० डॉलर जमा केले तर?’ सर्वजण पुन्हा हसले. रायनचे त्यांना कौतुक वाटले, पण इतका छोटा मुलगा इतकी जास्त रक्कम कशी जमा करणार असे त्यांना वाटले. 

पण रायनने हट्ट धरला, ‘मी २००० डॉलर जमविणारच’. मग तो पुन्हा मदत जमवू लागला. आता त्याच्या हट्टाची बातमी टीव्हीवर झळकली. आणखी मदत वाढू लागली. काही व्यक्तींनी व छोट्या संस्थांनीही रायनकडे चेकद्वारे मदत पाठवली. आणि जवळपास वर्षभरात रायनकडे २००० डॉलर जमा झाले. 

वॉटरकॅन संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तो आश्चर्याचा धक्का होता. त्यांनी रायनची गोष्ट सर्वत्र सांगायला सुरुवात केली. आणि रायनने जमवलेली २००० डॉलर मदत उत्तर युगांडामधील अंगोला नावाच्या गावातील प्राथमिक शाळेत एक विहीर खोदण्यासाठी वापरली. आणि मग संस्थेने असेही ठरवले की, त्या विहिरीचे उद्‌घाटन करण्यासाठी रायनलाच तिथे घेऊन जावे. म्हणजे सर्वत्र चांगला संदेश जाईल, ‘इतका छोटा मुलगा इतके करतोय तर आपण का नाही’ असे लोकांना वाटेल. 

वॉटरकॅन संस्थेने रायन व त्याचे आई-बाबा यांना युगांडाला घेऊन जाण्याची व्यवस्था केली. (एका विमान कंपनीने रायनसाठी तिकीट मोफत दिले.) आधी ते विमानाने युगांडाच्या राजधानीत आले. मग मोटारीने अंगोला गावात आले. २७ जुलै २००० रोजी, त्या शाळेजवळ मोटार गेली. तर अनेक लहान मुले गाडीच्या मागे धावत ‘रायन...रायन’ असे ओरडत होती. येथील मुलांना आपले नावही माहीत आहे, हे कळले तेव्हा रायनला रडू कोसळले. रायन गाडीतून उतरला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लहान मुले आणि गावकरी रांगेत उभे होते. आसपासच्या खेडेगावातून पाच हजार लोक तिथे आले होते. रायन चालत निघाला, तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करीत होते. 
Thank you Ryan
For Water
You have brought
That to our school
हे वाक्य सर्वजण गाण्याप्रमाणे म्हणत होते. त्या सर्व मुलांच्या, माणसांच्या नजरा रायनवर खिळल्या होत्या. रायनला त्या नव्या देशातील नव्या माणसांना पाहून आनंद झाला होता. त्याच्या हस्ते विहिरीचे उद्‌घाटन झाले. तेव्हा रायन म्हणाला, ‘मी सुदैवी आहे, कारण माझा जन्म जिथे दुष्काळ नाही, अशा देशात आणि जिथे गरिबी नाही त्या घरात झाला. त्यामुळे दुष्काळ आहे तिथे मला काम करावेसे वाटले.’

त्या विहिरीवर ‘रायन्स वेल’ असे नाव कोरले होते.   रायनने त्या गावासाठी, त्या शाळेसाठी, तेथील मुलांसाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून रक्कम कशी जमवली ते गावकऱ्यांना आधीपासून माहीत होते. त्यामुळे उद्‌घाटन झाल्यावर ते सर्वजण वाद्यसंगीताच्या तालावर नाचत होते, गाणी म्हणत होते. त्यात लहान मुले व त्यांचे शिक्षक होते, म्हातारी माणसेही होती. रायनला व त्यांना एकमेकांची भाषा कळत नव्हती, पण तरीही एकमेकांच्या भावना कळत होत्या. त्या दिवशी अंगोला गावात आगळावेगळा जल्लोष झाला. त्या शाळेत दरवर्षी २७ जुलै हा ‘रायन्स डे’ म्हणून साजरा केला जाणार, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी जाहीर केले. रायनला त्यावेळी एक करडू (शेळीचे पिल्लू) भेट देण्यात आले. त्याचे नाव शांती (Peace) असे ठेवले गेले.

दोन-तीन दिवस रायन त्या गावात राहिला, तेव्हा अनेक लहान मुलांशी त्याची ओळख झाली. त्यातील जिमी अकाना या मुलाशी रायनची फारच पटकन्‌ मैत्री झाली. कारण त्यांचा पत्रसंवाद आधीच झाला होता. रायन पुन्हा कॅनडाला निघून गेला. आणखी मदत जमा करू लागला. आता अनेक संस्था रायनच्या साथीने मदतनिधी गोळा करू लागल्या. एका मोठ्या संस्थेने तर जाहीरच करून टाकले, ‘रायनने एक डॉलर निधी मिळवला तर आम्ही त्यात दोन डॉलर टाकू.’ मग रायनचे काम आणखी झपाट्याने वाढत गेले आणि पुन्हा आश्चर्य, पुढच्या दोन वर्षांत रायनने ६१००० डॉलर निधी जमवला. तो निधीही युगांडाला  पाठवण्यात आला, त्यातून तीस गावांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 

रायनच्या कामाची चर्चा कॅनडा देशात सर्वत्र व अन्य देशांतही होत होती, त्याला अनेक ठिकाणी आमंत्रणे येत गेली. टीव्हीवर व यु-ट्यूबवर तो अनेक वेळा बोलला, ते बोल जगभर पोहोचले. त्यानंतर रायन एका बाजूला  शाळेत शिकत होता, अभ्यास करीत होता, जग समजून  घेत होता. आणि दुसऱ्या बाजूला पाणी व स्वच्छता या क्षेत्रांत कामही करीत होता. २००९ मध्ये तो चांगल्या मार्कांनी दहावी उत्तीर्ण झाला आणि २०१३ मध्ये ग्रॅज्युएट झाला. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील विकास, या विषयात त्याने पदवी मिळवली.

दरम्यान ‘रायन्स वेल फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली गेली. रायनचे आई-बाबा (सुसान व मार्क) पूर्णवेळ त्या संस्थेचे काम करू लागले. शिक्षण संपल्यावर म्हणजे २०१६ मध्ये रायन त्या संस्थेचा प्रमुख झाला आहे. आतापर्यंत त्या संस्थेमार्फत १६ देशांमध्ये पाणी व स्वच्छता यासाठी काम झालेले आहे. ते सर्व देश आफ्रिका खंडातील आहेत. (घाना,  टांझानिया, केनिया, सुदान, नायजेरिया, मलावी, इथिओपिया इत्यादी देशांत जाऊन रायनने पाणी व स्वच्छता यांचे काम व्यवस्थित होत आहे ना, हे पाहिले.) आतापर्यंत ११०० विहिरी आणि १६०० स्वच्छतागृहे रायन्स वेल फाउंडेशनने बांधली आहेत.  त्यामुळे १० लाखांपेक्षा अधिक लोकांची सोय झाली आहे. 

परंतु केवळ सुविधा निर्माण करून रायनची संस्था थांबत नाही. लोकांना पाणी वापराचे व स्वच्छतेचे महत्त्व ते पटवून देतात, त्यासाठी शाळांतील मुलांना स्वयंसेवक बनवतात. त्या ठिकाणच्या लोकांनी पुढे यावे आणि श्रमदान  करून किंवा मदतनिधी जमा करून  असे प्रकल्प राबवावेत, यासाठीही रायनची संस्था काम करीत आहे. ‘दिव्याने दिवा पेटवत जावे आणि अंधार नाहीसे करण्याचा प्रयत्न करावे’ असे ते सूत्र  आहे. 

रायनने केलेल्या  या कामासाठी त्याला खूप पुरस्कार मिळणार, हे तर उघडच होते. कॅनडातले अनेक पुरस्कार त्याला मिळालेच, पण मुलांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा नोबेलच्या तोडीचा पुरस्कारही त्याला मिळाला. आफ्रिका खंडात काम करणाऱ्यांना नेल्सन मंडेला यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो, तोही रायनला मिळाला आहे.  

रायन आता २५ वर्षांचा आहे. मागे वळून पाहिल्यावर त्या सहा वर्षांच्या वयात तुला काय वाटले होते,  असे विचारले तर तो म्हणतो, ‘‘आंघोळीसाठी,  पोहण्यासाठी, खेळण्यासाठी हवे तितके पाणी मला मिळत होते आणि दूरवर कुठेतरी माझ्याच वयाच्या  मुलांना पिण्यासाठीही पाणी मिळत नाही, उलट ते आणण्यासाठी रोज काही किलोमीटर पायपीट करावी लागते, हे मला त्या वयात समजूच शकत नव्हते.  त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. आपण जसे जगतोय तसेच, सर्व लोक जगतात, असे मला सहा वर्षांचा असताना वाटत होते. पण प्रत्यक्षात तसे नाही,  वस्तुस्थिती खूप वेगळी आहे, हे मला कळले तेव्हा मी हादरलो होतो, ते चित्र बदलण्यासाठी झपाटून गेलो  होतो. आपली ताकद खूप थोडी आहे, असे मला त्यावेळी वाटतच नव्हते. त्यामुळे आजही मला वाटते की, तुम्ही कितीही लहान असला तरी काम सुरू करू  शकता. कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरी तुम्ही तिच्यावर मात करू शकता...आजही जगात ६ पैकी १ माणूस असा आहे, ज्याला  पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. म्हणजे आज जगाची लोकसंख्या सातशे  कोटी आहे, त्यातील सव्वाशे कोटी लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. आणि जगातील केवळ २९ टक्के  लोकांनाच घरात नळाद्वारे येणारे पाणी मिळते, उर्वरित  ७१ टक्के लोकांना पाण्यासाठी बाहेर जावे लागते, दूरवरून पाणी आणावे लागते. कॅनडामध्ये दरमाणशी  दरदिवशी ३४३ लिटर पाणी वापरले जाते, तर युगांडामध्ये तेच प्रमाण केवळ १० लिटर आहे. आणि  उत्तर युगांडाच्या ज्या भागात पहिली विहीर खोदली, तिथे तर ते प्रमाण ३ लिटर इतकेच आहे. त्यामुळे पाणी  व स्वच्छता हे मला जगण्यासाठी सापडलेले उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे मी काम करीत राहणार आहे.’’  

अशा या रायनच्या अनोख्या दोस्तीची एक कहाणीही रोचक आहे. इ.स. २००० मध्ये तो युगांडात पहिल्यांदा गेला, तेव्हा तेथील जिमी अकाना हा मुलगा त्याचा मित्र झाला. या जिमीचे आई-वडील तो लहान असतानाच वारले होते. नंतर जिमीला त्याच्या काकीने वाढवले होते. त्याला रोज मध्यरात्री पाणी आणण्यासाठी पाच किलोमीटर दूरवर चालत जावे लागे, कारण सकाळी शाळा आणि दुपारनंतर त्या पाण्याच्या ठिकाणी खूप गर्दी  असे. कधीकधी तर त्याला एकाच रात्री तीन खेपा  कराव्या लागत. रायनची विहीर झाल्याने जिमीचा तो त्रास वाचला होता. हे कळल्यामुळे रायनला जिमीविषयी  जास्त जवळीक वाटत होती.  

इ.स.२००२ मध्ये युगांडामध्ये अंतर्गत युद्ध सुरू  झाले. तेव्हा या जिमीला तेथील बंडखोरांच्या गटाने पळवले होते. नंतर जिमीने तिथून स्वत:ची सुटका करून घेतली होती. ही बातमी वॉटरकॅन संस्थेमार्फत रायनपर्यंत पोहोचली. तेव्हा रायनने आपल्या आई- बाबांकडे हट्ट धरला, ‘जिमीला आपल्या घरी आणा.’ तेव्हा रायन व जिमी हे दोघेही दहा वर्षांचे होते. त्यानंतर वॉटरकॅन संस्थेच्या माध्यमातून जिमी व रायन यांचा पत्र व फोन-संवाद होत राहिला. आणि मग कॅनडा व युगांडा या दोन देशांच्या बऱ्याच प्रशासकीय बाबी पूर्ण करून, रायनच्या आई-बाबांनी जिमीला दत्तक घेतले.  अखेर २००७ मध्ये जिमी कॅनडाचा नागरिक झाला, रायनच्या घरात त्याचा भाऊ म्हणून राहू लागला. आता जिमी व रायन दोघेही सोबतच काम करतात. या दोघांच्या जानी दोस्तीची कहाणी सांगणारे ‘रायन ॲन्ड जिमी’ हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध आहे, ते तुम्हाला मराठीतून वाचायची इच्छा झाली आहे का? मग थोडी वाट पहा... 

(लेखन : विनोद शिरसाठ)

Tags: विनोद शिरसाठ रायन हर्लजॅक दक्षिण आफ्रिका दुष्काळ पाणी शिक्षक प्रेरणादायी २०१७ बालकुमार दिवाळी अंक विकास आंतरराष्ट्रीय कॅनडा Funding Teacher teenage Inspiratioal story Watercan ani rayans well Vinod Shirsath Canada Ryan's well 2017 Balkumar Diwali ank Ryan harljack Drought Water weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके