जॉर्ज बिहारात कायमचा गेला आणि मुंबईच्या युनियन क्षेत्राचं नुकसान झालं. पुढे जॉर्ज दिल्लीचा झाला आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईचा कब्जा घेतला. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि जॉर्ज एकत्र यावेत असा एक प्रयत्न 1982 मध्ये झाला. तिघांनी शिवाजी पार्कवर भाषण वगैरे केलं. परंतु मामला पुढे गेला नाही. हे तिघे नेते एकत्र आले असते तर? 'दिल बहला ने के लिए खयाल अच्छा है।' सत्तालोभ हे राजकारणाचं इंधन असतं. सत्ता आणि धन यापायी वाया गेलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. जॉर्जचं अधःपतन झालं नाही. तो साधं जगला. आपले कपडे आपण धुवायचा. मद्य, सिगरेटचा शौक नव्हता.
परवा जॉर्ज फर्नांडिस असा विषय निघाला. मुंबई महापालिका मुख्यालयाच्या मोठ्या चौकाला जॉर्जचं नाव दिलंय. 3 जून रोजी एक रीतसर नि छानसा सोहळा झाला. त्या दिवशी जॉर्जची पंचाण्णववी जयंती होती. या निमित्तानं मला माझ्या पेपरसाठी जॉर्जवर लिहायचं होतं.
अरुण नाईक, अमरेंद्र नंदू धनेश्वर हे जॉर्जचे सख्खे मित्र नि सहकारी त्याच्या आठवणी सांगताहेत नि मी त्या पटापट लिहून काढतोय. हे सगळं फोनवर. विषय होता जॉर्ज फर्नांडिस. नि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की अरुण नाईक, अमरेंद्र हे जॉर्जचा एकेरी उल्लेख करत होते. नि मीसुद्धा. हे होतं जॉर्जचं मोठेपण. तो सगळ्यांना आपला वाटायचा. एकेरीतला.
माझ्या ओळखीतल्या एक संपादिका जॉर्जचा उल्लेख 'Georgie' असा करायच्या. तर दुसऱ्या एका संपादकानं त्याला स्वखुषीनं George, the 75th अशी पदवी बहाल केली होती. म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरचा जॉर्ज आणीबाणी-पर्वातला जॉर्ज.
आणीबाणीतला जॉर्ज हा आख्ख्या भारताचा झाला. पण ही नंतरची गोष्ट. आधी वीसेक वर्षं तो मुंबईच्या भट्टीत शिजत, मुरत होता. मुंबई जिंकून जॉर्ज पुढे बिहारला गेला नि तिथून दिल्लीला वगैरे तपशील आपल्याला ठाऊक असतो. तो मोरारजीभाईंच्या मंत्रीमंडळात मंत्री झाला नि शेवटी देशाचं मानाचं संरक्षण मंत्रिपदही त्याला मिळालं, वगैरे. पण अखेरपर्यंत त्याच्या रक्तात मुंबईची रग नि धग खेळत होती. मुंबई आणि जॉर्ज फर्नांडिस हे एक अफलातून प्रेमप्रकरण होतं. 'प्रेम करावे शुद्ध पशुसम' याच धर्तीचं.
मुंबई नि मुंबईकरांनी जॉर्जवर इतका जीव का पाखडावा ?
अमरेंद्र नंदू धनेश्वरांनी छान मुद्दा मांडला. "मुंबईकरांना जॉर्ज आपला वाटला. मुंबईचे सगळे उत्तम गुण त्यानं आत्मसात केले. शाळा, घर वगैरे सोडून तो मंगळूरहून 1950 च्या आसपास मुंबईला आला नि सुरू झाला जगण्याचा संघर्ष.
"महानगरात हा संघर्ष कोणालाही चुकत नाही. साहस, परिश्रम, चिकाटी या गुणांच्या बळावर मुंबईत तरून जाता येईल, हा सुविचार तेव्हा समाजात रुजला होता. मुंबईतल्या 'नाही रे' वर्गातल्या प्रत्येकाला जॉर्जची गोष्ट ही आपली गोष्ट वाटली."
सुरुवातीला जॉर्जनं किरकोळ नोकऱ्या केल्या. दीडेक वर्ष 'टाइम्स ऑफ इण्डिया'त प्रुफ रीडर म्हणून काम केलं; मुंबईतल्या धोबी तलाव परिसरात (मेट्रो सिनेमागृहाच्या बरोब्बर समोर) 'फुर्तादो'ज' ('Fur-tado's) नावाचं वाद्यांचं दुकान आहे. फार प्रतिष्ठित आणि गाजलेलं. ते दुकान म्हणजे सिनेमात वाद्यं वाजवणाऱ्या गोंयकार ख्रिश्चन वादकांचं तीर्थक्षेत्र. तर जॉर्ज तिथं सेल्समन म्हणून लागला. वर्षभर काम केलं.
आजूबाजूला गोंयकार ख्रिश्चन मंडळींचा वावर. चार-पाच ख्रिश्चन खाणावळी जवळपासच सुरू असायच्या. रात्री दुकानाला कुलूप लावलं की, भात नि माशाच्या कालवणावर ताव मारून जॉर्ज पायी पायी हॉर्निमन सर्कल गाठायचा नि तिथल्या हिरवळीवर झोपायचा. 'फुर्तादो'ज' आजही सुरू आहे. दुकानातून गिटारीचे टप्पोरे, दाणेदार सूर ऐकू येतात. एक सिंफनी जॉर्जचीसुद्धा.
विख्यात युनियन नेते पी. डिमेलो यांनी विशी-बाविशीतल्या जॉर्जला घडवलं. डिमेलो हे मुंबई बंदर कामगारांचे नेते होते. मुंबईच्या गोदी परिसरात दोन तरुण खूप मोठे झाले. एक जॉर्ज फर्नांडिस, दुसरा हाजी मस्तान. अर्थात दोघांचे मार्ग भिन्न होते. हाजी मस्तानला फैज अहमद फैज, साहिर लुधियानवीच्या गजला आवडायच्या.
हे सगळं फार रोमँटिक आहे. हो आहे, पण गिळगिळीत नाहीए. मुळात जॉर्ज हा रोमँटिक स्कूलचा. माणुसकीवर प्रेम करणारा. नि त्यासाठी संघर्ष करणारा. डॉक्टरसाहेबसुद्धा (राममनोहर लोहिया) रोमँटिक. 'मी तयांशी झुंजताना भोगिले ऐश्वर्य मोठे.' हा दोघांचा जीवनमंत्र.
एका टळटळीत दुपारी मुंबईतल्या हुतात्मा चौकातल्या गच्च गिचमिड वाहनगर्दीत जॉर्ज मधोमध उभा राहायचा आणि आपला उजवा हात वर करायचा की, शेकडो बेस्ट बसेस आणि शेकडो टॅक्स्या तिथल्या तिथं बंद व्हायच्या. हे रोमँटिकच असतं.
एसेम जोशीही त्याच पंथातले, परंतु स्वभाव मृदू. जॉर्ज-लोहिया हे तापसी.
संपकाळात महापालिका आयुक्त किंवा 'बेस्ट'च्या महाव्यवस्थापकांशी बोलणी करताना जॉर्जचा ट्रेड युनियनीय चाणाक्षपणा नि नाट्यमय आवेश उफाळून यायचा. आकडेवारीच्या फायली घेऊन तो चर्चेला बसायचा. आपला मुद्दा अजिबात ढिला करत नसे. संप काळातली त्याची भाषणं जोरकस असायची. वार्ताहरांना कॉपी मिळायची.
खूप मागे, 1980 वगैरेच्या सुमारास 'बेस्ट'चा मोठा संप झाला. चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या. पण तिढा सुटत नव्हता. 'बेस्ट'चे महाव्यवस्थापक कामगारांच्या पगारात एक दमडाही वाढवायला कबूल नव्हते. 'बेस्ट'च्या कुलाबानजीकच्या मुख्यालयापाशी जॉर्जची गेट मीटिंग होती. त्यानं घणाघाती भाषण केलं.
महाव्यवस्थापक आपल्या ऑफिसच्या खिडकीमागे (पडद्याआड) लपून जॉर्जचा थयथयाट पाहात होते. नि तेवढ्यात आम्ही दोन-चार वार्ताहर त्यांच्या ऑफिसात शिरलो. त्यांनी हातानं खूण करून आम्हाला 'बसा' म्हणून सांगितलं. पडदा स्वतःभोवती लपेटून घेतला नि खिडकीतून सभा पाहू लागले.
असा बराच high drama सुरू असताना जॉर्जनं गर्जना केली. हातातला कागदी लिफाफा हवेत फडकवत तो म्हणाला, "या जनरल मॅनेजरचे बरेच संशयास्पद उद्योग सुरू आहेत. नि माझ्याकडे त्याची साद्यंत माहिती आहे. या लिफाफ्यात सगळे पुरावे आहेत", वगैरे. महाव्यवस्थापक पांढरेफटक पडले. लगेचच त्यांनी चर्चेच्या चौथ्या फेरीसाठी जॉर्जना बोलावून घेतलं. नि संप मिटला.
वार्ताहरांच्या हातावर पेढा ठेवताना जॉर्जचा एक सहकारी मिस्कीलपणे म्हणाला, 'त्या लिफाफ्यात काहीही नव्हतं. कोरा होता लिफाफा.'
लोकांच्या पेंगुळलेल्या मनाला जागं करण्याचं एक तंत्र असतं. लोकनेत्याकडे ते असतं. 'चले जाव'च्या दिवसांत हजारीबाग तुरुंगाच्या उंच भिंतीवरून उडी मारून जयप्रकाश नारायण पसार झाले नि जनता थरारून गेली. थोर कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी फिन्ले गिरणीच्या फाटकावरून कशी हनुमानउडी मारली नि संपकरी गिरणी कामगारांत कसं चैतन्य पसरलं हे आजही लालबाग-परळ भागातले जुने लोक सांगतात. जनता सरकार असताना इंदिरा गांधी बेलछी गावी हत्तीवर बसून दलितांना भेटायला गेल्या आणि लोकमत त्यांच्या बाजूनं झुकू लागलं. अशा धक्कातंत्रात जॉर्ज पारंगत होता.
आणीबाणीत जॉर्जला अटक होणार याचा सुगावा लागताच त्याच्या मित्रांनी लैलाबाईंना (जॉर्जच्या पत्नी आणि विख्यात शिक्षणशास्त्री डॉ. हुमायून कबीर यांची मुलगी.) गाडीत बसवलं नि लपत छपत दिल्लीचं विमानतळ गाठलं. बाकी सर्व व्यवस्था अगोदरच झाली होती.
लैलाबाई आपल्या चार वर्षांच्या मुलासह घाईघाईनं विमानात बसल्या. कल्पना करा की, दिल्ली पोलिसांच्या गाड्या पालम विमानतळावर झुंझुंझू करत पोचल्याहेत, रन-वेच्या दिशेनं हवालदिल पोलीस धावताहेत आणि विमान आकाशात झेपावलंय. फ्रैंकफर्टच्या दिशेनं चाललंय. हे असं अद्भुतरम्य जॉर्जला सहज जमायचं. तर दुसरीकडे साध्या, लहानसहान गोष्टीसुद्धा तो मन लावून करायचा.
एक आठवण सांगतो. कावसजी जहांगीर सभागृहात (मेट्रो टॉकीज परिसरात) खादी आणि हस्तकलेचं प्रदर्शन भरलं होतं. तिथं सुरेख वस्तू मिळायच्या. एका दुपारी मी तिथं गेलो. तर जॉर्ज भेटला. प्रदर्शन जया जेटलींच्या संस्थेतर्फे होतं. 'कसं काय ? सध्या काय लिहितोएस', वगैरे आमचं बोलणं सुरू असताना गुजराती महिलांचा एक जत्था तिथं आला. सधन घरातल्या होत्या. त्या महिलांना जॉर्ज फर्नांडिस कोण नि काय काहीही माहीत नाही. त्यांना तो विक्रीवाला माणूस वाटला.
"इस साडी की क्या प्राईस, भाईसाहाब?” एका बाईनं जॉर्जला विचारलं.
"देढ हजार", असं म्हणत जॉर्जनं तत्परतेनं गड्ढे बाहेर काढले नि पटापट साड्या दाखवू लागला. 'ही पटोला. ही इकट और यह कांजीवरम्' असं म्हणत त्यानं प्रत्येक साडीचा पदर उलगडून दाखवला. 'बघा हा मोर किती सुरेख आहे', वगैरे.
मी थक्कच झालो.
एका बाईंना चंदनावरचं कोरीवकाम हवं होतं. जॉर्जनं सगळे नमुने एक-एक करून टेबलावर कौशल्यानं मांडले नि तो घडाघडा किमती सांगू लागला. मग माझ्याकडे पाहून मिश्कील हसला.
विख्यात समीक्षक-मुद्रक अरुण नाईक हे जॉर्जचे मित्र आणि सहकारी. त्यांनी जॉर्जला प्रथम शिवाजी पार्कच्या एका सभेत ऐकलं. आस्ते आस्ते ओळख झाली. 1980 च्या आसपास जॉर्जनं एक मासिक सुरू केलं. त्यात तो स्वतः लिहायचा. अरुण नाईकांच्या छापखान्यात मासिकाची छपाई होत असे. मासिक जवळजवळ वीस वर्षं चाललं. जॉर्जची वाचन-लिखाणावर निष्ठा होती. वेगवेगळ्या विषयांची ताजी माहिती त्याच्याकडे असायची.
जॉर्जचं मोठेपण कशात ?
अरुण नाईक जॉर्जनं मुंबईच्या ट्रेड युनियन संस्कृतीला पक्की वैचारिक बैठक दिली. दुसरं, कॉ. डांगे, गं.दे. आंबेकर प्रभृती मुंबईच्या युनियन नेत्यांनी गिरणी कामगारांना एकत्र आणलं; परंतु युनियन चळवळीचं पात्र विस्तारलं जॉर्जमुळे. सफाई कामगार, 'बेस्ट'चे चालक-कंडक्टर, हॉटेल मजूर, परिचारिका; कापड, दवा, लोखंड बाजारातले गुमास्ते आणि रेल्वेतले मजूर-कर्मचारी, टॅक्सीवाले, वगैरे असंघटित वर्गाला त्यानं युनियनचं संरक्षण दिलं. हे जॉर्जचं सायलेंट रेवल्यूशनच होतं.
1967 च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्जनं स.का.पाटलांचा पराभव केला आणि मुंबईनं जॉर्जला कडेवर घेतलं. 'जायंट किलर', 'बंद सम्राट' अशा पदव्या त्याला मिळाल्या. अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक' कादंबरीमुळे जॉर्ज कल्ट फिगर झाला.
दुसरीकडे, मोठे उद्योगपती त्याला बिचकून होते. नवल टाटा यांनी 1971 मध्ये दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली ती फक्त जॉर्जला हरवण्याकरता हे सगळ्यांना तेव्हा ठाऊक होतं. नवल टाटा पडले, जॉर्ज पडला आणि दक्षिण मुंबईची जागा आयती काँग्रेसला मिळाली.
दरम्यान, युनियनचा पसारा वाढत होता. गिरगावातल्या साध्या, दोन खोल्यांत बसून जॉर्ज नवनव्या योजना आखू लागला. त्यानं बँक काढली. चांगले सहकारी मिळवले नि त्यांना घासून पुसून लख्ख केलं. काही चांगले राहिले, काही बहकले. जनता प्रयोग फसल्यावर एकदा मुंबईत प्रेसवाल्यांशी गप्पा मारताना जॉर्ज म्हणाला, "आम्ही आमची सगळी ताकद आर्थिक प्रश्नांवर लावली; सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. कार्यकर्त्यांचं राजकीय प्रशिक्षण करू शकलो नाही."
जॉर्ज बिहारात कायमचा गेला आणि मुंबईच्या युनियन क्षेत्राचं नुकसान झालं. पुढे जॉर्ज दिल्लीचा झाला आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईचा कब्जा घेतला. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि जॉर्ज एकत्र यावेत असा एक प्रयत्न 1982 मध्ये झाला. तिघांनी शिवाजी पार्कवर भाषण वगैरे केलं. परंतु मामला पुढे गेला नाही. हे तिघे नेते एकत्र आले असते तर? 'दिल बहला ने के लिए खयाल अच्छा है।'
सत्तालोभ हे राजकारणाचं इंधन असतं. सत्ता आणि धन यापायी वाया गेलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. जॉर्जचं अधःपतन झालं नाही. तो साधं जगला. आपले कपडे आपण धुवायचा. मद्य, सिगरेटचा शौक नव्हता. संरक्षणमंत्री असताना आपली छोटीशी बॅग आपण उचलायचा. ऑर्डर्ली, सुबेदार, सेवक वगैरे नाही. बॅगेत कपड्याचे दोन जोड, नॅपकिन, बिस्किटाचा पुडा, फणी.
बीजेपीशी त्यानं हातमिळवणी केली त्यामागे बिगर-काँग्रेसवादाचा विचार होता. नि तो विचार जॉर्ज अखंडपणे करतच होता. ती त्याची तात्त्विक भूमिका होती. डॉ. लोहिया आणि जॉर्ज यांच्या बिगर-काँग्रेसवादापायी अखेरीस भाजपचा फायदा झाला असं माझे काही समाजवादी मित्र मानतात. यावर कधीतरी वेगळी चर्चा करू.
अरुण नाईकांनी चांगला मुद्दा मांडला. "जॉर्ज एनडीएत गेला हे आपल्या लक्षात असतं, परंतु गोध्रा प्रकरण झाल्यावर जॉर्जनं (तेव्हा तो संरक्षण मंत्री होता) अहमदाबादेत सैन्य धाडलं होतं हे आपण विसरतो."
मागे एकदा दिल्लीत भेट झाली. मी जॉर्जला विचारलं, "तुम्ही मूळचे मंगळूरचे. मुंबईत आलात नि मग बिहारला मुक्काम केलात."
मला मध्येच थांबवून जॉर्ज म्हणाला, "एका विशिष्ट गावात, वा प्रांतात मी जखडून राहू शकत नाही. तो माझा स्वभाव नाही. पूर्ण भारत माझा आहे असं मला वाटतं."
साथी जॉर्ज फर्नांडिसचं हे वाक्य प्रत्येक दगडावर कोरलं पाहिजे.
मागील वर्षभर महिन्यातून दोन वेळा याप्रमाणे अंबरीश मिश्र यांचे लेख साधना साप्ताहिकात 'बोहारणीचं गाठोडं' या सदराखाली प्रसिद्ध होत आलेत, हे सर्व लेख www.weeklysadhana.in वर वाचता येतील.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या