डिजिटल अर्काईव्ह

न्या. रानडे यांचे तीन ग्रंथ कोणते काम करतील?

न्यायमूर्ती रानडे यांच्या 'Essays on Indian Economics', 'Religious and Social Reform', 'Miscellaneous Writings' या तीन इंग्रजी ग्रंथांचे प्रथमच झालेले मराठी अनुवाद साधना प्रकाशनाकडून आले आहेत. अवधूत डोंगरे यांनी अनुवादित केलेल्या या तीन ग्रंथांचे प्रकाशन न्या. रानडे यांच्या 125 व्या स्मृती वर्षाचा प्रारंभ होत असताना, 16 जानेवारी 2025 रोजी पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या सभागृहात झाले. त्या वेळी गिरीश कुबेर हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, तर अरविंद गणाचारी व अभय टिळक यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभात सुहास पळशीकर यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचे हे शब्दांकन आहे.

गिरीश कुबेर, अभय टिळक आणि 'धार्मिक व सामाजिक सुधारणा' या खंडासाठी प्रस्तावना लिहिणारे अरविंद गणाचारी इथे उपस्थित आहेत. अरविंद गणाचारी आणि गिरीश कुबेर हे एका अर्थाने एकोणिसावे शतकवाले आहेत. स्वाभाविकच या तीन संग्रहांचे महत्त्व, न्या. रानड्यांचे महत्त्व आणि त्यांचे कार्य यांच्याबद्दल या दोघांनी आत्ता केलेल्या विवेचनामधून काही ठळक गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. मी या ग्रंथांच्या प्रकाशनाबद्दल (साधनाचा विश्वस्त असल्यामुळे) साधना ट्रस्टचे अभिनंदन करू शकत नाही. पण खरं तर तसं नाहीये, हे सगळं ट्रस्टच्या नावाने विनोद शिरसाठ यांनी केलेलं आहे आणि आत्तापर्यंतच्या कार्यक्रमात त्यांनी त्यांची सेल्समनगिरी दाखवून त्याचा पुरावा तुम्हाला दिलेला आहे. अ. के. भागवत व ग.प्र. प्रधान लिखित टिळकांचे चरित्र किंवा लुई फिशर लिखित गांधींचे चरित्र आणि आता न्या. रानडे यांचे हे तीन खंड पाहिले, तर मराठीमध्ये काय यायला हवं आणि वाचकांपर्यंत काय पोहोचायला हवं याची जाण किंवा दृष्टी असणाऱ्या प्रकाशकांपैकी विनोद शिरसाठ हे एक उत्तम उदाहरण आहेत. आणि म्हणून मी आवर्जून त्यांचा उल्लेख करतोय.

न्यायमूर्ती रानडे यांचे कार्य, व्यक्तिमत्त्व, त्यांच्या एकूण कार्याची व्याप्ती याच्याबद्दल आपण ऐकलेले असतेच, आता ते द्विगुणीत झालेले आहे. विनोद प्रास्ताविकात म्हणाले त्याप्रमाणे, 'न्या. रानडे यांनी फक्त इंग्रजीमध्ये लिहिले' असा आक्षेप घेतला गेलेला असला, तरी ते त्या काळातल्या द्विभाषिक पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांची बरीचशी भाषणे मराठीमध्ये आहेत. तरीही घेतल्या जाणाऱ्या या आक्षेपाचं कारण म्हणजे, मराठी अभ्यासकांना व विचारवंतांना सहसा इंग्रजीत न वावरण्याचा न्यूनगंड असतो. न्या. रानडे मात्र त्यापलीकडे गेलेले होते. टिळक किंवा रानडे यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अशा न्यूनगंडांमध्ये कधीच अडकले नाहीत. त्या कालखंडातील मराठी दिग्गजांनी केवळ मराठी लोकांसाठी काम न करता अखिल भारतीय पातळीवर आपल्या कामाची, प्रज्ञेची प्रतिमा निर्माण केली.

न्या. रानड्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची समतोल आणि सम्यक् दृष्टी. त्यांचा कायमच समतोल साधण्याचा प्रयत्न असायचा, त्यामुळेही बऱ्याच वेळेला त्यांच्यावर टीका झालेली आहे. इतपत की, त्यांचा सुधारणावाद हा कितपत खरा होता किंवा कितपत आग्रही होता? अशी टीका केली गेलेली आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे, त्यांची चौफेर प्रज्ञा. त्यांना कुठल्याही चौकटीत बसवता येत नाही. समाजाचा सम्यक् विचार करून, समाजासाठी जे योग्य आहे ते करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्या काळात पुण्यामध्ये घडणाऱ्या सर्वच सार्वजनिक घडामोडींमागे न्या. रानडे असायचे. त्या काळात मांडल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विचारांच्या, विषयांच्या संदर्भात झालेल्या वादांमध्ये त्यांनी हस्तक्षेपही केलेला होता.

टिळकांच्या प्रसिद्ध लेखातील एक वाक्य सगळ्यांनाच माहीत असतं "थंड गोळ्यासारख्या -झालेल्या महाराष्ट्राला ऊब आणण्याचं काम माधवरावांनी केलं." पण महाराष्ट्र त्या वेळी थंड गोळा होता, ही अतिशयोक्ती आहे. कारण बाळशास्त्री जांभेकरांपासून मराठी विचार विश्वामध्ये मोठे मंथन होत होते. त्या काळातील या विचारवंतांना एकमेकांबद्दल आदर असण्याचं कारण म्हणजे ते एकमेकांशी बोलायचे (ही त्यांची मर्यादासुद्धा होती). टिळक व नामजोशी किंवा आगरकर व रानडे किंवा गोखले, हे सर्व जण एकमेकांशी बोलत होते. त्याच वेळी त्या चर्चाविश्वाला पंक्चर करणारे जोतिबा फुलेसुद्धा त्या काळात होऊन गेले, हे महत्त्वाचं अंगही लक्षात ठेवलं पाहिजे. मर्यादित चौकटीत काम करत असल्यामुळे फुले किंवा ब्राह्मणेतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याची सवड किंवा धमक त्या वेळेला या लोकांमध्ये नव्हती. पण आज दीडशे वर्ष मागे वळून त्या कालखंडाकडे पाहताना लक्षात येतं की, एका वेगळ्या प्रकारचं मराठी चर्चाविश्व एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आकाराला येत होतं. त्या काळात न्या. रानड्यांचं फार महत्त्व होतं, कारण त्यांचा काउंटर पॉईंट (जणू काही प्रतिबिंदू) तयार होत होता. टिळक मोठे असण्याचं कारण, त्यांचे आणि रानडे किंवा आगरकरांचे वाद हे नसून, त्यांचा प्रतिवाद करणारा प्रतिबिंदू त्या काळामध्ये निर्माण होत होता. त्यातून मराठी चर्चाविश्वाची श्रीमंती दिसते. न्या. रानडे हे या अशा काळाचे अपत्य होते. ते एकोणिसाव्या शतकातील सगळ्या घालमेलीचे, खळबळीचे प्रतिनिधित्व जाणता-अजाणतासुद्धा करत होते. रानडे टिळक इत्यादींचा एकमेकांबद्दलचा आदर त्या प्रस्थापित चौकटीच्या चर्चाविश्वाचा भाग होता, त्याच्या पलीकडे जाण्याचं काम त्यांच्याकडून झालं नाही, ही मर्यादासुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. ती मर्यादा म्हणजे त्यांचा कमीपणा किंवा उणेपणा नसून ती एकोणिसाव्या शतकाने निर्माण केलेल्या मराठी चर्चाविश्वाची श्रीमंती, त्याचा बहुप्रवाहीपणा, त्याची बहुविधता होती.

न्या. रानडे यांच्या या तीन ग्रंथांमधील विषयांत विविधता तर आहेच, पण त्या विविधतेमध्येसुद्धा थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या एकाचा उल्लेख विनोद शिरसाठ यांनी केला, तो म्हणजे, न्या. रानडे यांनी एका दीर्घ लेखात स्वानुभवाधारे मराठी साहित्याची घेतलेली झाडाझडती. म्हणजे कविता संग्रह, गद्य लेखसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह यांची संख्या सांगून, त्यांनी नंतर संक्षेपाने टिप्पणी केलेली आहे. तिचा अर्थ म्हणजे, 'याच्यात काही दम नाही.' मुळात रानडे हे सौम्य होते, त्यामुळे सौजन्य आणि सौम्यता यांच्यानुसार त्यांनी हे विवेचन केलेलं आहे.

विनोद यांनी त्या काळातील परदेशी स्थलांतरितांवरील न्या. रानडे यांच्या लेखाचा उल्लेख केला, तसाच यातील एका ग्रंथात जनगणनेबद्दलसुद्धा एक लेख आहे. त्यात त्यांनी 1891 च्या जनगणनेची तुलना 1871 च्या जनगणनेशी केली आहे. आजच्या डेमोग्राफी नावाच्या शाखेच्या कामाच्या जवळ जाणारे हे काम आहे. म्हणजे, जनगणनेचे वेगवेगळे तपशील घेऊन, त्यांची आधीच्या जनगणनेशी तुलना करून, समाजात काय फरक पडतोय हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणं. पण त्या निबंधातल्या पहिल्याच वाक्यात जे आजच्या डेमोग्राफर्सची किंवा अन्य कुणाची आजच्या संदर्भात उच्चारायची हिंमतही होणार नाही त्यांनी 1891 च्या जनगणनेचे अहवाल प्रसिद्ध व्हायला (ब्रिटिश सरकारकडून) विलंब झाला याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे. आज आपल्या देशाची स्थिती काय आहे? 2021 ला अपेक्षित असणाऱ्या जनगणनेला अद्याप सुरुवात नाही, तरीही आपल्याला खेद होत नाही. त्यामुळे अहवालांना विलंब झाल्याबद्दल आज कोणी खेद व्यक्त करण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, रजिस्ट्रार ऑफ सेन्ससकडे अभ्यासकांची फौज तयार झाली तरीसुद्धा जनगणनेचे अहवाल साधारणपणे सात-आठ वर्षांनी म्हणजे पुढच्या जनगणनेची तयारी सुरू होते तेव्हा तयार होतात. आणि आता तर पाच-सात वर्ष उलटत आली तरीही जनगणनेची तयारीसुद्धा चालू नाही. या पार्श्वभूमीवर, 'जनगणनेचा अहवाल विलंबाने आला, त्यामुळे चर्चा करण्यात काही हशील नाही' अशी टीका करणारे रानडे होते.

न्या. रानडे कोण होते, याची चर्चा करताना त्यांच्यावर शिक्के मारण्याची नेहमीच अहमहमिका लागते. आणि साधारणपणे आमच्या विषयात (राज्यशास्त्रात) त्यांचा उल्लेख 'उदारमतवादी' असा केला जातो. पण या कोट्या किंवा वर्गवाऱ्या कुचकामी आहेत. म्हणजे त्यांचं सगळं लेखन, शेतीबद्दलचे निबंध वाचले, त्यांचं इकॉनॉमिक्स लक्षात घेतलं तर त्यांना किती लिबरल म्हणायचं, कंजर्वेटिव्ह कुठे आणि किती म्हणायचं? आणि जहागीरदारांबद्दलची त्यांची भूमिका लक्षात घेतली तर, त्यांना काय म्हणायचं? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे रानड्यांसारखे लोक आपल्यापुढे खरं आव्हान उभं करतात ते वैचारिक वर्गवाऱ्या किंवा कोट्या तपासून पाहण्याचं. आपल्या मूळच्या एकोणिसाव्या शतकातल्या विचारांकडे कसं जायचं, त्यांची व्यवस्था कशी लावायची आणि ती व्यवस्था लावण्यासाठी कोणती लेबल्स किंवा कोट्या वापरायच्या हे आव्हान रानड्यांची पिढी आपल्यापुढे निर्माण करत असते.

गिरीश कुबेरांनी रानडे यांच्या धार्मिकतेचा उल्लेख केला. पण, मागील सव्वाशे वर्षांत रानडे यांची धर्मपर व्याख्याने बाजूला राहिलेली दिसतात. म्हणजे ती इंग्रजीतही (माझ्या माहितीप्रमाणे) नाहीत आणि मराठीतही आता सहजगत्या उपलब्ध नाहीत. म्हणजे अलीकडे आपण धार्मिक झालो असं म्हणायचं असेल तर, आपल्याला सव्वाशे वर्षांपूर्वीची ती धर्मपर व्याख्याने मात्र नकोशी वाटतात. अशी आपली काहीतरी विचित्र अवस्था झालेली आहे. त्यांची धार्मिकताही आपल्याला नकोशी आहे आणि म्हणूनच कुबेरांनी अचंबा व्यक्त केला की, रानडे धार्मिक असूनसुद्धा आपल्याला कसे काय चालू शकतात ? त्या धर्मपर व्याख्यानांमध्ये एका व्याख्यानाचं शीर्षकच 'सनातन आर्य धर्म' असं आहे. त्यामुळे या नावामुळे आजच्या पुरोगाम्यांना ताबडतोब राग यायला हरकत नाही. पण ते व्याख्यान किंवा तो निबंध वाचला तर लक्षात येईल की, न्या. रानडे या वर्गवाऱ्या वापरत असले तरी ते प्रत्यक्षात त्यांचे अर्थ बदलण्याचा सतत व कसोशीने प्रयत्न करत होते. त्या निबंधात त्यांनी म्हटलेलं आहे की, 'वेळोवेळी संत, महंत, विचारवंत, अभ्यासक यांनी भर घालून तयार केलेला धर्म म्हणजे आर्य धर्म' म्हणजे सतत उत्क्रांत होण्याच्या आणि धर्मामध्ये सतत भर घालण्याच्या या प्रक्रियेला ते मध्यवर्ती मानतात. मग पुढे जाऊन असंही सांगतात की, 'या सगळ्या परंपरेला, तथाकथित सनातनी आर्य धर्माला, काही आधार असेल वा एखादे सूत्र असेल, तर ते म्हणजे प्रेम.' (म्हणजे तुमचा सनातन आर्य धर्म गेला बाजूला.) इथे खरं तर रानडे आणि गांधी यांचा धर्माविषयीचा दृष्टीकोन हा एकसारखा दिसतो. कारण गांधीदेखील सनातन धर्माची भाषा बोलतात, पण प्रत्यक्षात त्या सनातन धर्मामध्ये प्रेम घालतात (आणि त्या सनातन धर्माला गुंडाळून ठेवतात). इथे रानडे यांची प्रज्ञा दिसते आहे. म्हणजे मी धर्म मानतो, पण तो माझ्या विवेकाप्रमाणे तयार करतो, पाळतो आणि तसा आग्रह धरतो. किंबहुना एका व्याख्यानामध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म आणि हिंदू धर्म यांची तुलनादेखील केलेली आहे. न्या. रानडे यांच्या धर्मपर व्याख्यानांमध्ये ही चौकस बुद्धी आणि तुलनात्मकता दिसते. म्हणूनच मी म्हणेन की, या तीन ग्रंथांइतकीच किंबहुना त्याहून जास्त गरज आज आहे ती न्या. रानडे यांची धर्मपर व्याख्याने पुन्हा एकदा तपासण्याची, वाचण्याची आणि ती मराठीत येण्याची !

अर्थातच त्यासाठी खुली चर्चा व्हायला हवी. 'मी ज्याला सनातन आर्य धर्म म्हणतो, त्याला तुम्ही तसं म्हणत नसलात तरी मी तो शब्द वापरीन आणि माझा धर्म मांडीन', हे केवळ बुद्धिमत्तेतून होत नाही, तर त्याला एक सामाजिक वातावरण आणि सामाजिक परिसर लागतो. त्यामुळे टिळक महाराष्ट्राला जो थंड गोळा म्हणाले, तसा गारठा खरं तर आज आहे. आजच्या महाराष्ट्रातील मराठी चर्चाविश्वाकडे पाहिलं तर असं दिसतं की, ज्या गारठ्याची भीती एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाटत होती, तो आज एकविसाव्या शतकात ओढवून घेतलेला गारठा आपला समाज अनुभवतोय. किंबहुना, आजूबाजूला बर्फाचे ढीग तयार करून स्वतःला गारठा वाटायची व्यवस्था करणारा किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं तर गांधारीने डोळे बंद केले होते त्या प्रकारचं कुठल्या तरी विचारांचं पातिव्रत्य आजच्या समाजाने स्वीकारलं आहे.

अशा काळामध्ये मराठी चर्चाविश्वात हा हस्तक्षेप करणं, त्यासाठी जुनं मराठी संचित पुढे आणणं, त्याचं नव्याने परिशीलन करण्याचं आव्हान वाचकांपुढे ठेवणं, हे काम न्या. रानडे यांचे हे तीन ग्रंथ करतील आणि न्या. रानड्यांची आठवण ते काम करायला आपल्याला साहाय्यभूत ठरेल, अशी आशा व्यक्त करू या. कारण न्या. रानड्यांचे बाकी सगळं सोडलं तरी, एक बेस लाईन शिल्लक राहते ती म्हणजे दुर्दम्य आशावाद, सगळ्या गोष्टींकडे अत्यंत विधायक दृष्टीने पाहणं. समाज जेव्हा अडकलेले, दुभंगलेले, साचलेले असतात तेव्हा असा आशावाद फार आवश्यक असतो. तो आशावाद कदाचित न्या. रानड्यांचं लेखन आपल्याला देऊ शकेल. म्हणून आजच्या या निमित्ताने न्या. रानड्यांच्या लेखनाकडे परत जाताना, केवळ ते किती थोर होते असे म्हणून न थांबता; ज्या चर्चाविश्वात न्या. रानडे शक्य होतील, अशा प्रकारचं चर्चाविश्व आपल्याला शक्य आहे का हा प्रश्न विचारणं आपल्या सगळ्यांना जास्त आवश्यक वाटलं पाहिजे.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुहास पळशीकर,  पुणे, महाराष्ट्र ( 71 लेख )
suhaspalshikar@gmail.com

राजकीय विश्लेषक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी