डिजिटल अर्काईव्ह

महाराष्ट्रात आडनावावरून होणाऱ्या भेदभावाची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, मुंबई किंवा पुण्यात घर भाड्याने घेताना, दलित किंवा मागासवर्गीय आडनाव असलेल्या व्यक्तींना नकार दिला जातो. एका व्यक्तीने सांगितले की, माझे आडनाव पाहून ब्रोकरने सरळ सांगितले, अमुक जातीचे लोक इथे घेत नाहीत. कोल्हापूरमध्ये एका विद्यार्थ्याने सांगितले की, पीजी बुकिंग करताना आडनावावरून SC/ST असल्याची शंका घेतली गेली आणि ओपन कॅटेगरी सांगितल्यावर वागणूक बदलली. लग्न बाजारातही हे दिसते. उच्चवर्गीय कुटुंबे आडनाव पाहून जोडीदार निवडतात, ज्यामुळे आंतरजातीय विवाह कमी होतात.

गेली 17 वर्षे चालू असलेल्या 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या सोनालिका जोशी यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचे विवाहापूर्वीचे 'कांबळे' या आडनावावरून सिनेसृष्टीत कसा भेदभाव केला जात होता, हे सांगितले आहे.
सतराव्या शतकातील सुप्रसिद्ध संत महिपती महाराज ताहाराबाद यांचे मूळ आडनाव 'कांबळे' आहे. ते देशस्थ ब्राह्मण. सोनालिका त्यांच्या परिवाराशी संबंधित आहेत.
माझेसुद्धा पहिले आडनाव कांबळे होते. नंतर ते कागदोपत्री बदलून 'नगरकर' केले आहे. मीसुद्धा संत महिपती महाराज यांच्या परिवाराशी संबंधित सदस्य आहे. माझी जात ब्राह्मण.
प्रश्न हा आहे की, मी जात का लपवली?
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावे कितीही ढोल ताशे, डीजे कर्कश आवाजात वाजत असले, तरी जात ही ओळख कुणालाच लपवता येत नाही. मला 'कांबळे' या आडनावामुळे काही फायदे-तोटे पदरी पडले.
दलित समाजात महार या जातीत कांबळे हे ब्रँड नेम आहे. तसे हे आडनाव सकुन साळी, जैन, ब्राह्मण, मराठा या अन्य जातींतसुद्धा आहे.
मी ज्या कलानगर भागात राहतो, तेथे राष्ट्रीय स्तरावर सुप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार प्रमोद कांबळेदेखील राहतात. ते माझे मित्र. माझी 'कांबळे' या नावावर आलेली पत्रे प्रमोद कांबळे यांच्या लेटर बॉक्समध्ये टाकली जात असत. नंतर प्रमोदने ती पत्रे फोन करून दिली आहेत. ते साळी जातीचे प्रमुख कलाकार. परंतु सुदैवाने त्यांना कांबळे आडनाव पावले आणि ते प्रसिद्ध झाले.

महाराष्ट्रात उच्च वर्गात बालपणीच उच्च अहंकारगंड पाळला जातो. मूल शाळेत घालण्याआधीच अनेक आडनावांची जातनिहाय ओळख करून दिली जाते. नंतर मोठेपणी ते जातीचे नाव हुंगत राहतात व आपल्या कळपात निवांत रवंथ करतात.

खरे पाहता जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची जुनी जखम आहे, ज्यात दलित कुचंबणा हे सर्वांत गंभीर रूप आहे. कायदे आणि सुधारणांमुळे प्रगती झाली असली, तरी हिंसा आणि भेदभाव कायम आहे. दलितांच्या संघर्षाने एक समान समाज निर्माण करण्याची आशा आहे.

माझे वडील पोलीस खात्यात नोकरीस होते, त्यामुळे सुदैवाने पोलीस चाळीत अनेक जातींच्या मुलांसोबत खेळलो-बागडलो. तिथे ब्राह्मण अत्यंत अल्पसंख्याक. आमचे नातेवाईक आम्ही पोलीस चाळीत राहतो असे समजले की नाक मुरडत. लहानपणी आमच्याकडे कोणी नातलग आला की आमची जानवे शोधण्याची धावपळ सुरू होई. आईने सक्त ताकीद दिली होती की, नातलग आले तर निदान जानवे तरी घालत जा.

माझ्या वर्गातील मुसलमान मित्र फारुक मला म्हणाला, 'तुमचे जानवे व शेंडी ही एरियल आहे. त्यामुळे तुम्हाला आकाशातून ज्ञान लहरी प्राप्त होतात.' या त्याच्या विनोदावर मी खूप हसलो होतो.

मी जेव्हा टेलिफोन खात्यात नोकरीस लागलो, तेव्हा माझे प्रशिक्षण औरंगाबाद येथील क्रांती चौकातील टेलिफोन भवन येथे पूर्ण झाले. माझ्या बॅचमध्ये माझ्या शेजारी देशपांडे नावाचा मराठवाडा भागातील मित्र होता. मी त्याला विचारले, "तुम्ही देशस्थ का कोकणस्थ ?" त्याला माझ्या प्रश्नाचा रोख कळला नाही. मी म्हणालो, "हे बघ, माझे आडनाव जरी कांबळे असले तरी मी देशस्थ ब्राह्मण आहे."

यावर तो स्मित हास्य करीत म्हणाला, "मी ब्राह्मण नाही."
मी जागेवरच उडायचो काय ते राहिलो होते. आश्चर्याच्या धक्क्यातून स्वतःला सावरत मी विचारले, "तर मग तुम्ही सीकेपी का?"
त्याने नकारार्थी मान हलवत उत्तर दिले, "मी मुस्लीम आहे."
मला प्रथम वाटले तो धर्मांतरित असावा. परंतु नंतर कळले की देशपांडे ही उपाधी आहे. अनेक मुस्लीम बंधूंची नावे पाटील, देशमुखसुद्धा आहेत. अनेकांची आडनावे व्यवसाय, उपाधीमुळे स्थापित झाली आहेत. पारशी समाजात बाटलीवाला, इंजिनियर अशी आहेत.
एकदा मला कार्यालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने केबिनमध्ये बोलावले. मला म्हणाले, "जय भीम ! कसे आहात? कुणी काही त्रास देत नाही ना? कांबळे हे आपले ब्रँड नेम आहे. तुझ्या सर्व्हिस बुकात चुकून तुझी जनरल कॅटेगरी झाली आहे. अनुसूचित जातीचा दाखला जोडून एक अर्ज मला दे."
त्या वेळी मी भीत भीत म्हणालो, "सर, मी ब्राह्मण आहे."
त्या वेळी चकित होण्याची पाळी त्यांची होती.

एकदा मला मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रमात तेथील संयोजक प्राध्यापकाने आमंत्रित केले होते. मी मला दिलेल्या विषयावर अभ्यास करून बोललो. सर्वांना भाषा आणि कॉम्प्युटर हा नवीन विषय आवडला. व्याख्यान संपल्यावर अनेक मागासवर्गीय प्राध्यापक माझ्याभोवती जमा झाली. ते म्हणाले, "आपल्या लोकांना संधी दिली जात नाही. जातीमुळे बाजूला ठेवले जाते. आज संध्याकाळी बामसेफ संघटनेची बैठक आहे, त्याला तुम्ही मार्गदर्शन करा."

मी त्या वेळी मौन पाळले, माझी जात लपवली.
नामांतरामुळे मराठवाड्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. त्या काळात माझी बदली मराठवाड्यातील बीड कार्यालयात झाली होती. मी प्रथमच मराठवाडा भागात आलो होतो. भाड्याने जागा शोधत होतो. परंतु कांबळे आडनाव ऐकून कोणीच जागा देत नव्हते.
त्या वेळी मला मागासवर्गीय लोकांच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली. मी ब्राह्मण असूनसुद्धा केवळ कांबळे आडनावामुळे तिरस्कृत झालो होतो.

-26 बाबुराव बागूल (17 जुलै 1930 मार्च 2008) हे आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडप‌ट्टीतील, फूटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा कथासंग्रह 'जेव्हा मी जात चोरली होती' मराठी साहित्यात खूप गाजला.

शेक्सपियर भले म्हणो, 'नावात काय आहे'. परंतु भारतीय समाजात नावात तिरस्कार, अपमान, दुर्लक्ष सर्व काही आहे. नंतर माझे मामा तेथे पोलीस खात्यात नोकरीस होते. मी त्यांना शरण गेलो. मामाने भाच्यासाठी ब्राह्मण वाड्यात खोली मिळवून दिली.
कांबळे आडनावाने माझा चांगला पिच्छा पुरवला. माझ्या मुलीला शाळेत प्रवेश मिळत नव्हता, तेव्हा माझ्या मित्राने ओळख काढून ब्राह्मण संचालकाकडे माझी शिफारस केली की आपलाच माणूस आहे.
माझ्या कारवर बदली ड्रायव्हर रवी चाबुकस्वार आहे. तो खूप नम्र आणि प्रामाणिक आहे. तो एकदा मला म्हणाला की, "साहेब या देशातून आरक्षण हटवले पाहिजे."
मला त्याच्या जातीचा अंदाज नव्हता. मी विचारले, "तू जनरल कॅटेगरीमध्ये आहेस का?"
तो म्हणाला, "मी महार जातीचा आहे, आम्हाला आरक्षणाचा तसा काही विशेष फायदा होत नाही. मागासवर्गात आम्हाला अपमानास्पद वागवले जाते. आमच्या लोकांत खूप भेदाभेद आहेत. चांभार समाजाला विशेष फायदा मिळतो. नवबौद्ध लोकांची संघटना खूप मजबूत आहे. साहेब, प्रामाणिक काम केले, कष्ट घेतले, तर आरक्षण कुबडी काय कामाची ? सरकार तरी किती नोकऱ्या देणार आहे?"
त्याचा सवाल रास्त वाटला.

माझा एक मित्र व्यावसायिक नाट्यक्षेत्रातील ब्राह्मण परिवारातील आहे. त्याच्या मुलाचे प्रेम वडार समाजातील मुलीवर जडले. दोघे उच्चशिक्षित. माझा मित्र लग्नास तयार झाला. मुलगी म्हणाली, "तुम्हाला माझ्या आई-वडिलांसोबत बोलणी करावी लागेल."
मित्र त्यांच्या घरी गेला. मुलीचे वडील म्हणाले, "तुम्ही-आम्ही तयार असून काय फायदा? आम्हाला आमच्या जात पंचायतीसोबत चर्चा करावी लागेल."
नंतर मित्र त्या जात पंचायतीत गेला. लग्न जुळले.

अनेक ब्राह्मण कुटुंबातील पौरोहित्य करणाऱ्या मुलांना ब्राह्मण जातीत मुली मिळत नाहीत. त्यांना आता कर्नाटक, तेलंगणात जाऊन, लाखो रुपये देऊन, मागासवर्गीय मुली आणाव्या लागतात. याच गुरुजी मंडळींना उच्चवर्गीय समाजातील लग्न विवाह विधीत मानाचे स्थान आहे, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दयनीय परिस्थिती आहे. उच्चशिक्षित ब्राह्मण कुटुंबाने आता पूर्वपरंपरेतील पौरोहित्याचे काम सोडून दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अन्य जातींतील लोकांनी मंदिरे ताब्यात घेऊन ते आता पुजारी, ह.भ.प. झाले आहेत. ते म्हणतात, 'आताच्या बामनाने धर्म बुडवला.'
माझा मराठा जातीचा बालमित्र दत्तात्रय परभणे खूप दिवसांनी भेटला. त्याने माझ्या हातात त्याचे व्हिजिटिंग कार्ड दिले. त्यावर लिहिले होते सर्व धार्मिक विधी, लग्न, अभिषेक करून दिले जातील. ह.भ.प. पंडित दत्तात्रय परभणे.

महाराष्ट्रात आडनावावरून होणाऱ्या भेदभावाची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, मुंबई किंवा पुण्यात घर भाड्याने घेताना, दलित किंवा मागासवर्गीय आडनाव असलेल्या व्यक्तींना नकार दिला जातो. एका व्यक्तीने सांगितले की, माझे आडनाव पाहून ब्रोकरने सरळ सांगितले, अमुक जातीचे लोक इथे घेत नाहीत.
कोल्हापूरमध्ये एका विद्यार्थ्याने सांगितले की, पीजी बुकिंग करताना आडनावावरून SC/ST असल्याची शंका घेतली गेली आणि ओपन कॅटेगरी सांगितल्यावर वागणूक बदलली.
लग्न बाजारातही हे दिसते. उच्चवर्गीय कुटुंबे आडनाव पाहून जोडीदार निवडतात, ज्यामुळे आंतरजातीय विवाह कमी होतात.

आजही महाराष्ट्रात जातिवाद कायम आहे. शहरी भागात तो छुपा आहे. बीड पोलिसांनी आडनावे काढून टाकण्याचा निर्णय घेतला, ज्यात पोलिसांच्या युनिफॉर्म आणि नेमप्लेटवर फक्त पहिले नाव वापरले जाते. हे देशमुख हत्येनंतरच्या तणावामुळे; ज्यात जातीवरून पक्षपाताचे आरोप होतात. मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी याचे समर्थन केले. ते म्हणाले की, हे संविधानिक मूल्ये जपेल. पण ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आणि न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी म्हटले की, हे केवळ लक्षणे दूर करते, मूळ कारणे नाही.

मानव मातृ वंशावळी 'माइटोकॉन्ड्रियल ईव' संबंधित आधुनिक संशोधन सांगते की, सर्व मानव आपल्या मातृ वंशावळीने एका विशिष्ट स्त्रीशी संबंधित आहेत, जिला 'माइटोकॉन्ड्रियल ईव' म्हणून ओळखले जाते.
ही स्त्री सुमारे दीड ते दोन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत होती. ती अशी शेवटची स्त्री पूर्वज आहे, जिचे माइटोकॉन्ड्रियल डीएनए आज जगातील प्रत्येक जिवंत व्यक्तीपर्यंत अखंडपणे पोहोचले आहे.
म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांची सर्वांत मोठी आजी आफ्रिकेत राहत होती. मग ह्या जातिभेदाच्या भिंती का रचल्या गेल्या आहेत?

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी