12 एप्रिल ते 29 मे 1924 हे पन्नास दिवस रवींद्रनाथ टागोर यांनी चीनचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी इंग्रजीतून भाषणे दिली, त्यातील प्रमुख सात भाषणांचे पुस्तक 'Talks in China' या शीर्षकाखाली 1925 मध्ये प्रकाशित झाले. शंभर वर्षे झाली त्याला, त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद (प्रथमच) साधना प्रकाशनाकडून येत आहे. तो दौरा आयोजित करणारे लियांग छिछाव यांनी लिहिलेला लेख, त्या दौऱ्याच्या वेळी झालेले वादसंवाद आणि त्या दौऱ्याचे इतर तपशीलही या अनुवादित पुस्तकात आहेत. हे सर्व अनुवाद सानिया कर्णिक या युवतीने केले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन 19 जुलै 2026 रोजी पुणे येथे होत आहे. त्या निमित्ताने, त्या पुस्तकाला सानियाने लिहिलेले मनोगत इथे प्रसिद्ध करीत आहोत.
जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या राष्ट्रांमध्ये भारत आणि चीनची गणना होते. अतिशय समृद्ध संस्कृती, इतिहास, लोकपरंपरा, साहित्य, कला, तत्त्वज्ञान, भौगोलिक साधनसंपत्ती आणि प्रचंड लोकसंख्या असलेले हे दोन देश स्वतंत्र संशोधनाचा विषय आहेत. चीनमधील राजकीय आणि सामाजिक नेते लियांग छिछाव (Liang Qichao) आपल्या 1924 मध्ये लिहिलेल्या निबंधात भारत आणि चीनच्या ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख 'जिव्हाळ्याचे संबंध असलेली बंधु राष्ट्र' असा करतात. सद्यःस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे उद्गार वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या जातील. काहींना नेहरूंनी 1950 मध्ये दिलेल्या 'हिंदी चिनी भाई भाई' या नाऱ्याची आठवण होईल. 1962 चे युद्ध, सीमावाद, जागतिक मुद्द्यांवरची चीनची भूमिका या सर्व बाबींमुळे भारत आणि चीन यांच्या संबंधांबद्दल बोलणे गुंतागुंतीचे आणि संवेदनशील झाले आहे. इतिहास, संस्कृती आणि भाषा अभ्यासकांना मात्र भारत आणि चीन हा विषय जिव्हाळ्याचा वाटत आला आहे. भारतात अनेक विद्वान 'चायना स्टडीज'चा अभ्यास करतात. चीनच्या प्रमुख विद्यापीठांमध्येही 'इंडिया स्टडीज' ही महत्त्वाची ज्ञानशाखा आहे.
मी बारावीनंतर मुंबई विद्यापीठात चायनीज स्टडीजमध्ये बॅचलर्स करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांसाठी ती कुतूहलाची बाब होती. "तुला शिकण्यासाठी चिनी सोडून दुसरी भाषा मिळाली नाही का?" असा नाराजीचा सूर ओळखीतील पाच वर्षीय चिमुरडीपासून ते मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यापर्यंत अनेकांनी बोलून दाखवला. दहावीनंतर भाषाप्रेमातून सुरू झालेल्या चिनी भाषेच्या शिक्षणाच्या प्रवासात मिळालेल्या अनेकांच्या प्रतिक्रियांमध्ये मला बहुतेकांच्या मनामध्ये असलेली चीनबद्दलची काहीशी भीती, तिरस्कार, बरेचसे कुतूहल आणि अज्ञान बघायला मिळाले. "चिनी भाषा शिकून पुढे काय करणार?" असा प्रश्न इतरांप्रमाणे माझ्या मनातही अधून मधून डोकावत असे. मात्र, 'तुला जे आवडते ते नक्की शिक' असे पूर्ण स्वातंत्र्य घरच्यांकडून मिळाल्याने, मला खुणावणारी चिनी भाषा शिक्षणाची वाट मी बिनधास्त चालू लागले.
मुंबई विद्यापीठात चायनीज स्टडीज या विषयात पदवीचे शिक्षण घेत असताना, कोविड काळात जरा उशिराने सुरू झालेल्या त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा अडीच-तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात मी चिनी भाषेसोबतच चीनचा इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान, साहित्य यांचा अभ्यास केला. भारतात राहून ज्या चीन देशाचा आणि भाषेचा अभ्यास केला, त्याला खऱ्या अर्थाने अनुभवांमधून समजून घ्यायचे असेल, तर तिथे केवळ एक प्रवासी म्हणून नाही, तर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी म्हणून गेले पाहिजे असे मला वाटले. पदव्युत्तर शिक्षणासाठी मेजरची निवड करताना आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार या विषयांची निवड करिअरसाठी अधिक फायद्याची ठरेल असा सल्ला काही शिक्षकांकडून आणि तज्ज्ञांकडून मिळाला. मात्र, तेव्हा मला स्वतःला त्या विषयांमध्ये तितके ज्ञान आणि गती नाही असे वाटले. त्यामुळे विषय निवडीच्या वेळी मी आजवर जे नेहमी करत आले तेच केले. आवडते म्हणून कला शाखेची निवड केली, चिनी भाषा शिकायचे ठरवले, त्यातच पदवीचे शिक्षण घ्यायचे ठरवले. त्याप्रमाणे मी भाषा, साहित्य, भाषांतर यांच्या आवडीमुळे ट्रान्सलेशन स्टडीज या विषयात मास्टर्स करायचे ठरवले.
बीजिंग लँग्वेज अँड कल्चर युनिव्हर्सिटीमध्ये ट्रान्सलेशन स्टडीज (मास्टर्स) च्या अभ्यासक्रमात आम्ही चिनी भाषेच्या भाषांतराचा इतिहास शिकलो. चीनमध्ये लिखित स्वरूपाच्या भाषांतराची सुरुवात भारतातून आणलेल्या संस्कृत आणि पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांच्या चिनी भाषांतरापासून झाली. चीनमधील सर्वात जुन्या ट्रान्सलेशन थेअरीजदेखील संस्कृत आणि पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर कसे करावे याभोवती रचल्या गेल्या आहेत. ही सर्वच माहिती माझ्यासाठी नवीन होती. इसवीसन सातव्या शतकात भारत भेटीस आलेला चिनी प्रवासी श्युआन चांग (Xuan Zang) बद्दल मी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचले होते. पुढे चायनीज स्टडीजमध्ये बॅचलर्स करताना त्यासंदर्भातील इतिहासाबद्दल आणि श्युआन चांगने भारत प्रवासाबद्दल लिहिलेल्या 'रेकॉर्ड्स ऑफ द वेस्टर्न रिजन्स' या ग्रंथाबद्दल मी शिकले. मात्र, ट्रान्सलेशन स्टडीजचा अभ्यास करताना इतिहासातील एक महान भाषांतरकार या दृष्टीने मी पहिल्यांदाच श्युआन चांगकडे बघितले. श्युआन चांग चीनला परत गेल्यावर त्याने भाषांतराची मोठाली केंद्रे स्थापन केली, जिथे एका वेळी शंभर-दोनशे भाषांतरकार एकत्र येऊन एका ग्रंथाचे भाषांतर करत. या केंद्रांमध्ये त्याने भाषांतराच्या कामाचे पद्धतशीर वर्गीकरण आणि व्यवस्थापन केले. मूळ भाषेतील मजकूर मोठ्याने वाचणे, तो मजकूर तोंडी भाषांतरित करणे, तोंडी भाषांतरित केलेला मजकूर लिहून काढणे, काव्यात्मक ओळींचा अनुवाद करणे, व्याकरण आणि शुद्धलेखन तपासणे, चिनी भाषेतील भाषांतर मोठ्याने वाचून ते संस्कृत किंवा पालीतील मूळ मजकुराशी पडताळून घेणे अशा कामांचे त्याने चक्क स्वतंत्र विभाग बनवले. भारत आणि चीन या दोन देशांमधील ऐतिहासिक संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये भाषांतराने बजावलेली मोलाची भूमिका समजून घेतल्यावर मला चीनमध्ये भाषांतराचा अभ्यास करणे फारच मीनिंगफुल वाटू लागले.
अलीकडच्या शंभर वर्षांच्या काळात चिनी भाषेमध्ये सर्वांत मोठ्या प्रमाणावर भाषांतरित झालेले भारतीय साहित्य आहे, रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य. भारत आणि चीन यांच्यातील ऐतिहासिक संबंध बळकट करण्यात प्राचीन काळी बौद्ध धर्माने मोलाची भूमिका बजावली, त्याप्रमाणे अलीकडच्या काळात रवींद्रनाथ टागोर आणि डॉ. द्वारकानाथ कोटणीस या दोघांचे महत्त्वाचे योगदान आहे. टागोरांचे नाव चीनमधील सर्वांत लोकप्रिय परदेशी साहित्यिक म्हणून घेतले तर ती अतिशयोक्ती म्हणता येणार नाही. चीनमधील शालेय अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकेतर वाचन सूचीमध्ये टागोरांच्या कविता संग्रहांचे नाव असते. टागोरांच्या 'गीतांजली' आणि 'स्ट्रे बर्ड्स' या कवितासंग्रहांची पिंग शिन (Bing Xin) या चिनी कवयित्रीने केलेली चिनी भाषांतरे आधुनिक चिनी कवी आणि काव्यप्रेमींना आजही भावतात. चिनी भाषेतून वाचलेल्या टागोरांच्या कवितांमध्ये त्यांना शुद्ध, तरल, गूढतेची अनुभूती येते. भारतीय साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान यांना समजून घेण्याचा झरोका म्हणून टागोरांच्या साहित्याकडे पाहिले जाते. टागोरांची चीनमधील लोकप्रियता निर्विवाद आहे.
मागच्या वर्षी, जानेवारी 2025 मध्ये हिवाळ्याच्या सुट्टीत मी चीनवरून घरी (पुण्यात) आले होते, तेव्हा एके दिवशी साधनाच्या ऑफिसमध्ये संपादक विनोद शिरसाठ यांच्याशी गप्पा मारत होते, तेव्हा त्यांनी टागोरांच्या चीन दौऱ्याचा विषय काढला. टागोरांनी विश्वभारती विद्यापीठात (शांतिनिकेतन) भारतातील पहिले चिनी भाषेच्या अभ्यासाचे केंद्र स्थापन केले, हे मला माहीत होते. परंतु, 1924 च्या एप्रिल आणि मे महिन्यात ते तब्बल 50 दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते ही माहिती माझ्यासाठी नवीन होती. "त्या दौऱ्यानंतर टागोरांच्या भाषणांचे 'टॉक्स इन चायना' या नावाचे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले. त्यातील एक भाषण जून 2013 च्या साधना साप्ताहिकात प्रसिद्ध केले आहे. (अनुवाद : सुमन ओक) त्यासोबत रामचंद्र गुहांनी लिहिलेला 'एका नेहरूवाद्याची चीनमधील सफर' हा लेख घेऊन तो अंक मिनी विशेषांक बनवला होता. आता टागोरांच्या दौऱ्याला शंभर वर्षे पूर्ण होत असताना, ते संपूर्ण पुस्तक साधनातर्फे मराठीत आणावे" असे विनोद सरांनी बोलून दाखवले.
ऑक्टोबर 2024 च्या युवा दिवाळी अंकापासून मी साधनामध्ये माझे चीनमधील शिक्षण, स्पर्धा, कार्यक्रम, प्रवास असे अनुभव सांगणारे लेख लिहायला सुरुवात केली होती. शिवाय, चीनमध्ये राहून चिनी भाषेचा अभ्यास करत होते. त्यामुळे 'टॉक्स इन चायना'चे मराठी भाषांतर मी करावे असे त्यांनी सुचवले. त्याला मी 'हो' म्हटले. यानिमित्ताने टागोरांच्या चीन दौऱ्याबद्दल अधिक समजून घेण्याची चांगली संधी मला मिळाली.
सुट्टी संपून चीनला परत गेल्यानंतर, बीजिंग लँग्वेज अँड कल्चर युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला 'आधुनिक चिनी साहित्य' हा विषय शिकवणारे शिक्षक, श्यु वेईफंग (टोपण नाव पेईथा), यांना मी टागोरांच्या चीन दौऱ्याबद्दल विचारले. थोड्याच दिवसांत त्यांनी मला सुन यिश्युए (Sun Yixue) नावाच्या लेखिकेचे चिनी भाषेतील एक पुस्तक भेट दिले. पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी माझ्यासाठी छोटासा संदेश लिहिला 'प्रिय खा च्युनयान (माझे चिनी नाव) हीस, भारत आणि चीनच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीस हातभार लावण्यासाठी अनेक शुभेच्छा.' हे पुस्तक दोन भागांमध्ये विभागलेले आहे. पहिल्या भागात टागोरांची चीन दौऱ्यादरम्यानची भाषणे, तर दुसऱ्या भागात टागोरांच्या चीन दौऱ्यासंदर्भात चीनमधील विविध लेखकांनी लिहिलेले लेख आहेत. भाषांतर प्रकल्पासाठी अतिशय उपयोगी असे पुस्तक सहज मिळाल्याने मला खूप आनंद झाला.
पेईथा सरांनी दिलेले पुस्तक म्हणजे 'टॉक्स इन चायना'चे चिनी व्हर्जन आहे असे मला सुरुवातीला वाटले. मात्र 'टॉक्स इन चायना' या इंग्रजी पुस्तकातील भाषणे विषयानुसार काही ढोबळ शीर्षकांखाली एकत्र करून मांडण्यात आली होती. बरीच दीर्घ अशी ती भाषणे होती. चिनी पुस्तकामध्ये मात्र सर्व भाषणे तारखेनुसार देण्यात आली होती. प्रत्येक भाषणाच्या शीर्षकाखाली ते भाषण कोणत्या शहरात केले गेले, कोणी आयोजित केले, कोणत्या कार्यक्रमासाठी केले गेले असे तपशील होते. मात्र चिनी पुस्तकातील भाषणे म्हणजे टागोरांनी स्वतः लिहिलेले भाषणांचे मसुदे नसून, 1924 च्या विविध चिनी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या भाषणांचे सार होते. त्यामुळे 'टॉक्स इन चायना'च्या भाषांतरासाठी इंग्रजी पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून त्यातला आशय ओळखीचा झाल्यानंतर त्या भाषणांचा तारखेवार असलेल्या चिनी भाषणांशी मेळ घालायचा प्रयत्न करून पाहिला. तो प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. काही ठिकाणी 'टॉक्स इन चायना' मध्ये छापलेले इंग्रजी भाषण आणि चिनी पुस्तकातील भाषण यांच्यात भिन्नता दिसून आली. नंतर मला हपेई एज्युकेशन पब्लिशिंग हाऊसने इ.स.2000 मध्ये प्रकाशित केलेल्या 24 खंडांच्या 'टागोर रचनावली'तील विसाव्या खंडात 'टॉक्स इन चायना' मधल्या भाषणांची चिनी भाषांतरे सापडली. त्याच सोबत 'थायकअळ यानचुंग त चुंगकुओ' म्हणजेच 'टागोरांच्या नजरेतून चीन' नावाचे 'टॉक्स इन चायना' या पुस्तकाचे चिनी भाषांतरही सापडले.
विविध पुस्तकांमधून अधिक माहितीचे वाचन करत असताना 'टॉक्स इन चायना' या इंग्रजी पुस्तकाबद्दलही नवीन माहिती मिळाली. शिशिर कुमार दास आपल्या 'द कोंट्रोवर्सियल गेस्ट' या लेखात लिहितात, "1924 मध्ये टागोरांचा चीन दौरा पूर्ण झाल्यानंतर लगेचच 'टॉक्स इन चायना' पुस्तक प्रकाशित झाले. मात्र पुढच्याच वर्षी टागोरांनी ती आवृत्ती थांबवून, त्यात अनेक बदल करून नवीन आवृत्ती काढली. 1925 च्या नव्या आवृत्तीमध्ये जुन्या आवृत्तीमधील 'अॅट अ बुद्धिस्ट टेम्पल', 'टू द जॅपनीज कम्युनिटी इन चायना' आणि 'अॅट मिसेस बेनाज शांघाय' ही तीन भाषणे वगळण्यात आली." 1999 मध्ये शिशिर कुमार दास यांनी संपादित केलेली 'टॉक्स इन चायना' ची एडिटेड अँड एन्लार्ज्ड एडिशन विश्वभारतीकडून प्रकाशित करण्यात आली. मला ऑनलाइन पीडीएफ स्वरूपात मिळालेली आणि अॅमेझॉनवर उपलब्ध असलेली 'टॉक्स इन चायना' ही 1925 ची आवृत्ती होती. 1999 ची आवृत्ती विकत घेण्याबाबत मी विश्वभारतीच्या ग्रंथालयाला ईमेल लिहिले. त्यामध्ये साधनाच्या ग. प्र. प्रधान संशोधन केंद्राच्या शिष्यवृत्तीबद्दल विस्तृत माहिती दिली. टागोरांच्या चीन दौऱ्याबद्दलची पुस्तके, लेख, फोटो या संदर्भात काही मार्गदर्शन मिळण्याबद्दलदेखील विचारपूस केली. त्यावर मला मिळालेल्या उत्तरात त्यांनी टागोरांचे साहित्य, संदर्भग्रंथ, फोटो इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी विश्वभारतीतील रवींद्रभवनच्या वाचनालयात येण्याचे सुचवले, परंतु मी चीनवरून सुट्टीसाठी मोजक्या कालावधीसाठी भारतात असल्याने तिकडे जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे हे पुस्तक 'टॉक्स इन चायना' च्या 1925 च्या आवृत्तीचे भाषांतर आहे. इच्छा असूनही त्यात 1924 आणि 1999 च्या आवृत्त्यांमधला रोचक आशय घेऊ शकले नाही.
टागोर स्वतः कवी असल्याने 'टॉक्स इन चायना' मधील त्यांची भाषणे काव्यात्मक स्वरूपाची आहेत. इंग्रजीत वाचताना ती बरीचशी समजली, पण मराठीमध्ये भाषांतर करायला घेतले तेव्हा फक्त इंग्रजी शब्दांचा, उपमांचा, अलंकारांचा वरवर अर्थ समजणे पुरेसे नाही, तर त्यात दडलेला संदेश समजणे गरजेचे आहे हे मला प्रकर्षाने जाणवले. कारण भाषांतर म्हणजे एका भाषेतील शब्दाचा अर्थ दुसऱ्या भाषेत आणणे नसते, तर एका भाषेतील लिखाणाचा स्वतःला समजलेला आशय दुसऱ्या भाषेत मांडणे असते. टागोरांच्या भाषणांचा नेमका अर्थ समजून घेणे ही प्रक्रिया आव्हानात्मक होती. त्याचप्रमाणे समजलेला अर्थ मराठीत प्रवाहीपणे मांडणे हेही तितकेच आव्हानात्मक होते. मराठी माझी मातृभाषा आहे, दहावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील अक्षरनंदन या मराठी माध्यमाच्या प्रयोगशील शाळेत झालेले आहे आणि मराठीत लेखन करण्याची मला आवड आहे. असे असूनही अनेकदा मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये काही वाक्यं किंवा शब्द वापरणे किती सोपे आहे असे वाटून गेले. उदाहरणार्थ, इंग्रजी भाषणांत 'सोल' आणि 'स्पिरिट' हे शब्द प्रत्येकी तीस ते चाळीस वेळा आले आहेत. इंग्रजीमध्ये ते अतिशय तरल, काव्यात्मक, सकारात्मक वाटत असले तरी मराठीतील त्यांचा प्रतिशब्द 'आत्मा' हा काहीसा गंभीर आणि गूढ वाटतो. त्यामुळे मी भाषांतर करताना आत्म्याच्या जोडीने अनेक ठिकाणी हृदय, मन, अंतःकरण, वृत्ती, भावना असे शब्द वापरले. मटेरिअल पॉवर आणि मटेरियलिझम हे शब्ददेखील पुस्तकामध्ये पन्नासहून अधिक वेळा आलेले आहेत. शब्दांच्या पुनरुक्तीने लेखाची शोभा जाऊ नये यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.
इंग्रजीतील भाषणे मुळात गंभीर, फिलॉसॉफिकल आणि काहीशी अमूर्त असल्याने ती मराठीमध्ये भाषांतरित केल्यावर नैसर्गिक आणि ओघवती वाटावी यासाठी शब्दांशी बरीच झटापट करावी लागली. अनेक वाक्ये इंग्रजीत वाचताना अतिशय काव्यात्मक वाटली, मात्र ती मराठीत भाषांतरित केल्यावर जरा विचित्रच वाटू लागली. भाषांतर या विषयाचा मी पद्धतशीरपणे अभ्यास करत असल्याने, प्रत्येक भाषांतर करण्याआधी पुरेपूर रिसर्च करण्याची सवय मात्र अतिशय कामी आली. चांगले भाषांतर करण्यासाठी आधी मूळ मजकूर चांगल्या प्रकारे समजणे गरजेचे आहे हे माहीत असल्याने, केवळ दोन वाक्ये भाषांतर करण्याआधी त्यावर किमान दोन तास माहिती शोधणे नॉर्मल आहे हे कळले. चीनमध्ये चिनी आणि इंग्रजीच्या भाषांतर शास्त्राचा अभ्यास करताना आम्ही इंटरनेटवर उपलब्ध असलेली चिनी आणि इंग्रजी भाषांतराची उपयोगी अॅप्स, वेबसाईट, ऑनलाइन शब्दकोश, संदर्भकोश इत्यादींबद्दल शिकलो. इंटरनेटवर ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. 'टॉक्स इन चायना'च्या भाषांतराच्या निमित्ताने पहिल्यांदाच इंग्रजीतून मराठी भाषांतर इतक्या मोठ्या प्रमाणावर मी केले. त्या वेळी चिनी आणि इंग्रजी भाषांतरासाठी सहज उपलब्ध असलेली अशा प्रकारची साधने इंग्रजी आणि मराठीसाठी उपलब्ध नाहीत हे जाणवले. अर्थ व्यक्त करण्यासाठी नेमका शब्द न सापडणे ही एका भाषांतरकारासाठी फारच जटिल समस्या आहे असे वाटले.
या प्रकल्पाच्या निमित्ताने टागोरांच्या कविता, कथा, कादंबरी अशा विविध प्रकारच्या साहित्याचे आजवर झालेले चिनी भाषांतर आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद या विषयाबद्दल मला अधिक कुतूहल वाटू लागले. त्याबद्दलचे रिसर्च पेपर्स आणि पुस्तके शोधून वाचताना टागोरांच्या साहित्याच्या महत्त्वाच्या भाषांतरकारांबद्दल तर मला वाचायला मिळालेच, पण त्यासोबतच टागोरांच्या चीन दौऱ्याबद्दलचे अधिकचे तपशीलही अचानक सापडले. 'टागोर आणि आधुनिक चिनी साहित्य' नावाच्या चिनी पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये मला चक्क टागोरांच्या चीन दौऱ्याचा तारखेवार तपशिलात लिहिलेला तक्ता मिळाला. त्या तक्त्यामध्ये टागोरांनी कोणत्या दिवशी कोठे प्रवास केला, कोणत्या स्थळांना भेटी दिल्या, कोणत्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या, कोणती भाषणे केली हे सर्व अगदी पद्धतशीरपणे मांडले होते. दौऱ्यातील भाषणांना सोडून इतर बाबींबद्दलही माहिती मिळाल्याने नवीन काहीतरी वाचायला मजा आली. तक्त्यातल्या तारखा मी चिनी पुस्तकातील भाषणांच्या तारखांशी तपासून घेतल्या आणि माहिती अचूक असल्याची उलट तपासणी केली. सर्व बारकावे अतिशय व्यवस्थित नोंदवून ठेवण्याची पद्धत चीनच्या अगदी प्राचीन पुस्तकांमध्येही दिसून येते. जे तपशील इंग्रजी, मराठी साहित्यातून मिळवणे कदाचित अवघड गेले असते, ते मला चिनी भाषा येत असल्याने खूप चांगल्या प्रकारे जमा करता आले.
कुतूहल म्हणून मी 1924 ची काही चिनी वृत्तपत्रेही वाचून पाहिली. 'शन पाव' (Shen Bao) हे 1872-1949 या काळातील शांघायमधील महत्त्वाचे वृत्तपत्र होते. 13 एप्रिल 1924 च्या 'शन पाव' वृत्तपत्रात 'भारतीय कवी टागोर यांचे काल शांघायमध्ये आगमन' या मथळ्याखाली टागोरांच्या सहप्रवाशांची ओळख, टागोरांच्या आगामी दौऱ्याचे तपशील वगैरे वाचायला मिळाले. 'टागोरांनी काळ्या रंगाचा अंगरखा घातलेला असून त्यांची दाढी लांब आणि पांढरी आहे' अशी चिनी पत्रकारांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचताना मजा आली. सोबतीने टागोरांचा शांघाय बंदराला बोटीतून उतरल्यावर गळ्यात हार घातलेला फोटो आणि त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या चिनी लेखक, कवी तसेच चीनमधील भारतीय लोकांसोबतचा ब्लॅक अँड व्हाईट फोटोही पाहायला मिळाला. त्याच वृत्तपत्रामध्ये विविध प्रकाशन संस्थांनी 'टागोरांचे चीनमध्ये स्वागत' या मथळ्याखाली दिलेल्या (त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या टागोरांच्या पुस्तकांच्या चिनी भाषांतरांच्या) जाहिरातीही पाहायला मिळाल्या. पुस्तकांची किंमत अडीच च्याव (पैसे), साडेतीन च्याव अशी लिहिलेली होती. शंभर वर्षांपूर्वीच्या चिनी वर्तमानपत्रांमध्ये चिनी अक्षरांची वरून खाली, उजवीकडून डावीकडे अशी मांडणी होती. 1949 मध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाल्यानंतर देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी किचकट अशा पारंपरिक चिनी लिपीतील अक्षरांना लिहिण्या-वाचण्यासाठी सोपे बनवण्यात आले. 1956 पासून आतापर्यंत वापरत असलेल्या नव्या लिपीला सिंप्लिफाइड स्क्रिप्ट म्हणतात. हाँगकाँग, मकाऊ आणि तैवान मध्ये मात्र आजही ट्रॅडिशनल स्क्रिप्टचाच वापर केला जातो. 1924 ची वर्तमानपत्रे ट्रॅडिशनल चिनी लिपीत असल्याने मी पुढील मागील संदर्भ पाहत, साधारण अंदाज बांधत, त्यांचे वाचन केले. अनोळखी व्यक्तींची नावे वाचताना मात्र अचूक अंदाज बांधणे शक्य नसल्याने तिथे चिनी मित्राची मदत घेतली.
'टॉक्स इन चायना' मध्ये टागोरांना चीन दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण देणारे लियांग छिछाव (Liang Qichao) यांचे भाषण प्रस्तावना म्हणून घेण्यात आले आहे. इंग्रजी पुस्तकातले हे भाषण वाचताना त्यात अनेक चिनी शब्द असल्याने ते वाचायला आणि समजून घ्यायला कठीण जात होते. समजायला अधिक सोपे जावे म्हणून मी लियांग यांचे भाषण मूळ चिनी भाषेत शोधून काढले आणि त्याचे वाचन केले. अनेक वेळा इंग्रजीमध्ये वाचताना जे शब्द वाचून फारसा अर्थबोध होत नव्हता ते चिनी भाषेत वाचल्याने खूप व्यवस्थित समजून घेता आले. उदाहरण द्यायचे झाले तर अॅस्ट्रॉनॉमी (खगोलशास्त्र) या शीर्षकाखाली 'टॉक्स इन चायना' मध्ये इंग्रजीत लिहिले आहे, "This special branch of science was early cultivated in China, but received further development in the Tang period, when the publication of Ju Tchu Sie showed the distinct influence of India." वरील इंग्रजी वाक्य वाचून सामान्य वाचकाला भारतीय खगोलशास्त्राचा नेमका काय प्रभाव चीनवर पडला याची कल्पना येत नाही. येथे 'Ju Tchu Sie' असे चिनी पुस्तकाच्या नावाचे शब्दशः भाषांतर दिल्याने हा ग्रंथ नेमका काय आहे असा प्रश्न आपल्याला पडतो. चिनी भाषेतले भाषण वाचल्याने मला पुस्तकाचे नेमके नाव काय होते हे सापडले आणि मी चिनी भाषेमध्येच त्याबद्दल अधिक माहिती शोधायचा प्रयत्न केल्यावर 'Ju Tchu Sie' चा नेमका अर्थ नवग्रह कालमापन पद्धतीच्या नोंदी असा होतो हे कळले. त्यातच अधिक खोलात जाऊन थांग राजवटीच्या काळात कोणत्या लेखकाने भारतातील नवग्रह कालमापन पद्धतीची ओळख करून देणारा ग्रंथ लिहिला अथवा भाषांतरित केला असे शोधल्यावर आठव्या शतकात चीनमधील शिआन शहरात स्थायिक झालेल्या गौतम सिद्ध या भारतीय वंशाच्या विद्वानाचे नाव समोर आले. हे नाव थेट विकिपीडियावर शोधले तरी भारतीय आणि चिनी खगोलशास्त्रामधील देवाणघेवाणीसाठी त्याने केलेले योगदान याबद्दल माहिती आता सहज सापडते. मला नवीन मिळालेली ही माहिती मराठी भाषांतरामध्ये अगदी थोडक्यात जोडल्याने तो लेख वाचकांना अधिक भावू शकेल असे मला वाटते.
एकूणच चिनी संस्कृतीला भारतीय संस्कृतीकडून काय काय मिळाले असा या भाषणाचा विषय असल्याने त्यात अनेक रोचक बाबी वाचायला मिळाल्या. मात्र लेखात अनेक चिनी व्यक्तींची, जागांची, पुस्तकांची वगैरे नावे असल्याने त्याचे मराठीत भाषांतर करणे सोपे काम नव्हते. या चिनी शब्दांचा वाचकांना अडथळा न वाटता, कुतूहल वाटावे, आणि त्या माध्यमातून त्यांना नवीन माहिती प्राप्त व्हावी या हेतूने मी भाषणातील महत्त्वाच्या चिनी शब्दांच्या थोडक्यात टिपा लिहायचे ठरवले. या टिपा लिहिण्यासाठी मी प्रामुख्याने इंग्रजी संदर्भापेक्षा चिनी भाषेतील संदर्भाना प्राधान्य दिले आणि मग शोधलेली माहिती मराठीत भाषांतरित केली. टिपांच्या परिशिष्ट सूचीमध्ये चिनी शब्दांच्या उच्चारानुसार देवनागरी लिपीत शब्द लिहिले आणि त्या जोडीनेच चिनी शब्द रोमन लिपीत लिहिण्यासाठी वापरली जाणारी फिनयिन (Pinyin) ही पद्धत वापरून त्यांचे इंग्रजी नावही सोबत जोडले. यामुळे ज्या वाचकांना एखादी व्यक्ती किंवा घटनेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांना तो इंग्रजी शब्द गुगलवर टाकून सहजरीत्या माहिती मिळवता येऊ शकते. परिशिष्टामध्ये साधारण पन्नास चिनी शब्दांच्या टिपा लिहिल्या. लेखात विविध राजवटींचा उल्लेख आल्याने त्यांचाही एक तक्ता सोबत जोडला.
टागोरांच्या चीन भेटीचे तपशील देणारा तक्ता, लियांग यांच्या भाषणातील चिनी शब्दांचे परिशिष्ट यांच्या जोडीने टागोरांच्या चीन भेटीवरील मतमतांतरे याबद्दल माहिती देणारा लेखही या पुस्तकात आहे. टागोर चीन दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांचे अतिशय उत्साहाने स्वागत करण्यात आले. कलकत्त्यावरून चीनला निघालेले जहाज शांघाय बंदराला टेकले, तेव्हा टागोरांच्या स्वागताला तीसहून अधिक लोक उपस्थित होते. मात्र पुढील पन्नास दिवसांच्या दौऱ्यात टागोरांच्या भेटीबद्दल विविध मते व्यक्त करणारे लेख चीनच्या विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून लिहिले गेले. टागोरांच्या साहित्याच्या चाहत्यांनी टागोर चीनला येत असल्याचा प्रचंड उत्साह व्यक्त केला. तर राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी टागोर चीनमधील तरुणांना हलाखीतून बाहेर येऊन देशाचे भवितव्य घडवण्याची प्रेरणा देतील असा आशावाद दाखवला. चीनमध्ये सामाजिक क्रांती घडवून आणण्याची धडपड करणाऱ्या तरुण नेत्यांना मात्र टागोरांची चीन भेट आपल्या कामात आलेला व्यत्यय वाटला. इंग्रजी भाषा समजत नसतानाही टागोरांची भाषणे ऐकण्यासाठी चिनी माणसांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. त्या गर्दीमध्ये टागोरांना विरोध करणारी पत्रके विद्यार्थी नेत्यांनी वाटली. या साऱ्या घडामोडी समजून घेणे फारच इंटरेस्टिंग आहे. या भाषांतरित पुस्तकात 'टागोरांच्या चीन भेटीवरील मत-मतांतरे' या लेखात वाचकांना त्याबद्दल सविस्तर वाचता येईल.
हा लेख लिहिण्यासाठी मी पेईथा सरांनी दिलेल्या पुस्तकातील चिनी लेख वाचले, चीनमधील गुगल स्कॉलर 'CNKI' वरून चिनी भाषेतील रिसर्च पेपर्स डाउनलोड करून वाचले. लियांग छिछाव यांच्या भाषणांचे समग्र संकलन, चिनी कवी श्यू चिळमो (Xu Zhimo) च्या पत्रांचे संकलन, पद्मभूषण पुरस्कार विजेते चिनी इंडोलॉजिस्ट चि शिएनलिन (Ji Xianlin) यांचा टागोरांवरील निबंधांचा संग्रह इत्यादी अनेक चिनी पुस्तके मी या निमित्ताने वाचली आणि लेखासाठी संदर्भग्रंथ म्हणून वापरली. 2010 मध्ये टागोरांच्या 150 व्या जयंतीनिमित्त चीनच्या पेकिंग युनिव्हर्सिटीमध्ये 'अंडरस्टैंडिंग टागोर : न्यू पर्सपेक्टिव्ह्ज अँड न्यू स्टडीज' नावाचा शैक्षणिक परिसंवाद आयोजित केला होता. टागोरांच्या चीन भेटीबद्दल तेव्हादेखील चर्चा झाली आणि त्याबाबतचे पेपर्स सबमिट केले गेले. डॉ. अमर्त्य सेन यांचा लेखही चिनी भाषेत भाषांतरित करून त्या परिसंवादामध्ये सादर केला गेला होता. भारतातील 'चायना स्टडीज' क्षेत्रातले महत्त्वाचे अभ्यासक डॉ. थान चुंग यांनी संपादित केलेले 'टागोर अँड चायना' हे पुस्तकही त्यादरम्यान पेकिंग युनिव्हर्सिटीने प्रकाशित केले. त्या पुस्तकातून मला विविध चिनी आणि भारतीय अभ्यासकांनी टागोरांच्या चीन भेटीवर केलेले लिखाण वाचायला मिळाले. टागोरांच्या चीन भेटीमागील पार्श्वभूमी आणि त्यांना झालेल्या विरोधाची आणि टीकेमागची कारणमीमांसा समजून घेता आली.
चीन भेटीदरम्यान अनेकांनी टागोरांवर 'जुनाट पौर्वात्य संस्कृतीचे पुजारी' म्हणून टीकेची झोड उठवली. टागोर खरेच पौर्वात्य संस्कृतीतील जुनाट रूढी परंपरांना कवटाळून ठेवणारे होते का? मला तरी तसे वाटत नाही. एका भाषणामध्ये स्वतःची ओळख करून देताना टागोर म्हणतात की, 'धर्माबद्दल भिन्न मते बाळगल्याने व आधुनिक विचार जोपासल्याने त्यांच्या कुटुंबाला समाजाकडून बहिष्कृत करण्यात आले.' त्या काळी स्त्रियांना सर्रास दुय्यम वागणूक मिळत असताना टागोरांनी स्त्री-पुरुष समानतेचा ठाम प्रचार केला. टागोर पश्चिमात्य देशांच्या वैज्ञानिक प्रगतीवर शंका उठवतात आणि त्याऐवजी पूर्वेकडच्या आध्यात्मिक संस्कृतीचे गोडवे गातात, ही बाब चीनमधील तरुण नेत्यांना खटकली. त्यामुळेच त्यांनी टागोरांना कालबाह्य घोषित केले. हे म्हणजे चिनी तत्त्वज्ञ कन्फ्युशियस जुन्या संस्कृतीचे प्रतीक आहेत असे म्हणून 'कन्फ्युशियसचे दुकान बंद पाडा' अशा घोषणा देणे आणि प्रगती साधण्यासाठी जुने ते सर्व नाकारण्याचा आततायीपणा करण्यासारखे नाही का? आज याच कन्फ्युशियसच्या नावाने 150 देशांमध्ये 500 हून अधिक चिनी भाषा अध्ययनाच्या कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट्स चिनी सरकारने स्थापन केल्या आहेत. कल्चरल रिव्होल्युशनच्या नावाखाली जुन्या वास्तूंची मोठ्या प्रमाणावर नासधूस करणारा चीन आज त्याच संस्कृतीचा जगभरातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी सॉफ्ट पॉवर म्हणून वापर करत आहे. या उदाहरणांमधून 'पौर्वात्य संस्कृतीचे पुजारी' म्हणून टागोरांवर झालेल्या टीकेमागे त्या काळातील चिनी नेत्यांची नेमकी मानसिकता लक्षात येते.
टागोरांनी चीनमधील सद्यःस्थिती समजून न घेता केवळ जागतिक शांतीचा पोकळ संदेश देण्याचे काम केले, असेदेखील टीकाकार म्हणतात. टागोरांनी चीन दौऱ्यादरम्यानच्या भाषणांत जागतिक शांतीचा पुरस्कार करण्यामागे पहिल्या महायुद्धाचे विध्वंसक स्वरूप पाहून त्यांना झालेल्या यातना कारणीभूत होत्या. टागोर कायमच अन्यायाचा आणि युद्धांचा जाहीर विरोध करत होते. चिनी लोकांना अफूचे व्यसन लावण्याच्या इंग्रजांच्या वर्तनाचा टागोरांनी एका बंगाली लेखात निषेध केला होता. जपानी सैन्याने केलेल्या चिनी जनतेच्या क्रूर छळाचा त्यांनी धिक्कार केला होता. टागोरांचा जागतिक शांतीचा संदेश पोकळ नक्कीच नव्हता. हातातील शस्त्रे खाली ठेवून क्रांती थांबवायला, आणि मूग गिळून अन्याय सहन करत राहायलादेखील तो सांगत नव्हता. टागोरांचा संदेश आदर्शवादी होता. वैज्ञानिक प्रगतीच्या गैरवापराला आळा घालण्याचे, पश्चिमेचे अंधानुकरण थांबवण्याचे, माणुसकीवर श्रद्धा ठेवण्याचे आवाहन करणारा तो संदेश कालबाह्य नव्हे, तर कालातीत होता. तो संदेश आजही महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच टागोरांचा चीन दौरा या ऐतिहासिक घटनेला 102 वर्षे पूर्ण झाली असूनही चीन आणि भारत संबंधांवरील
परिसंवादांमध्ये तो विषय चर्चिला जातो. भारत आणि चीनमधील सांस्कृतिक आदानप्रदानात टागोरांची ही भाषणे आणि त्यानिमित्ताने चीनमध्ये झालेली वैचारिक घुसळण हा एक महत्त्वाचा थांबा आहे. त्यामुळे टागोर आणि चीन या विषयाबद्दल आस्था असणाऱ्या आणि अधिक जाणून घ्यायची इच्छा असणाऱ्या वाचकांना या पुस्तकातून काहीतरी नवे वाचायला मिळेल अशी आशा आहे.
विनोद शिरसाठ सरांनी हे अतिशय जबाबदारीचे काम माझ्यावर विश्वासाने सोपवल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देते. आज हे काम संपवून हातावेगळे करताना, जरा अवघडच कामाला आपण 'हो, करते!' असे सहज म्हणून टाकले होते, हे जाणवून हसू येते. मी 'हो' म्हणणे आणि प्रत्यक्षात हे पुस्तक तयार होणे ह्या मधल्या काळात त्यांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. नंतर या भाषांतर प्रकल्पासाठी साधना ट्रस्टच्या ग. प्र. प्रधान संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची मला अभ्यासवृत्ती मिळाली. त्यासाठी त्या केंद्राची मी अतिशय आभारी आहे. मी पुण्यात नसतानाही, ज्या आपलेपणाने साधना प्रकाशनातील सर्वांनी या पुस्तकांच्या प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली, त्यासाठी त्यांचे विशेष आभार. भाषांतरात अडचणी आल्यावर हा शब्द घ्यावा की तो शब्द घ्यावा यासाठी होणाऱ्या घमासान चर्चामध्ये माझे आई, बाबा आणि माझा लहान भाऊ अर्णव हे तिघेही हिरीरीने सहभागी होत असत. या प्रकल्पाच्या निमित्ताने टागोरांसोबत जवजवळ आठ-दहा महिने राहता आले, हा या उपक्रमातला मला झालेला सगळ्यात मोठा फायदा.
भाषांतराच्या प्रयत्नात कुठे चुका झाल्या असतील तर मला त्या नक्की कळवा. कारण ट्रान्सलेशन स्टडीजच्या विद्यार्थिनीला वाचकांच्या प्रतिसादातून खूप काही शिकायला मिळणार आहे. आणि या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीमध्ये त्या चुका दुरुस्त करण्याची संधीही मिळणार आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या