डिजिटल अर्काईव्ह

झोरान ममदानी यांनी अमेरिकेतील न्यू यॉर्क सिटीची महापौरपदाची निवडणूक जिंकली. ते भारतीय वंशाचे आहेत. मुस्लीम आहेत. पहिल्यांदा इतिहासात असं घडलं की, न्यू यॉर्क सिटीची महापौरपदाची निवडणूक मुस्लीम माणसाने जिंकली. तर हे नक्की काय आहे, याबद्दल आज आपण बोलू आणि त्याचं महत्त्व काय आणि त्यातून पुढे काय घडेल याबद्दल थोडासा अंदाज, हा आजचा विषय आहे.

झोरान ममदानी यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अँड्र कोमो नावाच्या एका जुन्या आणि दिग्गज कॅटेगरीतला नेत्याला हरवलं. अँड्र कोमोचे वडीलसुद्धा न्यू यॉर्क राज्याचे गव्हर्नर होते. आणि तो स्वतः न्यू यॉर्कचा गव्हर्नर राहिलेला आहे. तो प्रसिद्ध होता, त्याला ममदानी यांनी हरवलं. ममदानीला 50.2 टक्के मतं मिळाली आणि कोमो यांना 40 टक्के. रिपब्लिकन पक्षाचा आणखी एक उमेदवार होता, त्याला सात-आठ टक्के मतं मिळाली.

झोरान ममदानींचा जन्म युगांडामध्ये झाला आणि तो लहान असताना कधीतरी न्यू यॉर्कमध्ये आईवडिलांबरोबर येऊन स्थायिक झाला. आई पंजाबी हिंदू आणि वडील गुजराती मुस्लीम. वडील प्राध्यापक आहेत, पोस्ट कलोनिअल युगांडा हा त्यांचा मुख्य विषय आहे. आई प्रसिद्ध चित्रपट निर्माती (मीरा नायर) आहे.

न्यू यॉर्क हा डेमोक्रॅट पक्षाचा बालेकिल्ला आहे, हा पुरोगामी पक्ष आहे. न्यू यॉर्क हे मुख्यतः इमिग्रंट लोकांचे शहर आहे. ते अक्षरशः मुंबईसारखे आहे, जिथे संपूर्ण देशाचे प्रतिबिंब उमटते. ते एक उद्यमशील व श्रीमंत शहर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी डेमोक्रॅट पक्षाचे वर्चस्व आहे.

अमेरिकेतील शहरं बऱ्यापैकी डेमोक्रॅट असतात, कारण तिथे लोकसंख्येत वैविध्य असते. शिकलेले लोक असतात. त्यामुळे पुरोगामी विचारांचा पगडा असतो. माझ्या मते, भारतातही असेच आहे. बेंगलोर-पुणे-मुंबई पाहिले तर तिथे पुरोगामी लोक जास्त सापडतील.

पण तरीही एक नवखी भारतीय, मुस्लीम व समाजवादी व्यक्ती निवडून यावी आणि तेही एका बलाढ्य पक्षाच्या नेत्याचा पराभव करून, हे अगदीच अतर्क्स घडले.

अशा पुरोगामी शहरात एक मुस्लीम तरुण महापौर झाला हे या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य नाही. वैशिष्ट्य हे आहे की, त्यांनी निवडणुकीत समाजवादी विचारसरणी वापरली. त्यांनी लोकांना मोफत बसप्रवास, स्वस्त किंवा मोफत शिशुगृहे (चाइल्ड केअर), भाडेवाढीविरुद्ध संरक्षण, सरकारी स्वस्त किराणा मालाची दुकाने इत्यादी वचने दिली.

अमेरिकेत एकूण जं काही घरगुती बजेट असते, त्यात सगळ्यात मोठा हिस्सा घराचा हप्ता असतो. पूर्वी किराणा माल मोठा विषय नसायचा. पण आता महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे लोकांना ग्रोसरी हा विषय महत्त्वाचा होत चालला आहे. यावरून लक्षात येईल, अमेरिकेत राजकारण आणि अर्थकारण कोणत्या दिशेने चाललंय.

अमेरिकेत घराचे भाडे 3 ते 5 टक्के वाढलं तरी लोक इतके हैराण होणार नाहीत. पण एकेका वर्षात 10 टक्क्यांनी घराचं भाड वाढलं तर सहनशीलतेचा कडेलोट होतो आहे. न्यू यॉर्कमध्ये दोन बेडरूम अपार्टमेंटचे भाडे कमीत कमी पाच हजार डॉलर्स आहे. ते वीस हजारसुद्धा असू शकते. अनेक लोक तसे कमवत असतील. परंतु बव्हंशी लोकांच्या आवाक्याबाहेर गोष्टी जात आहेत. आणि हीच कथा सर्व मोठ्या शहरांची आहे. सॅन फ्रान्सिस्को, लॉस अँजेलिस, शिकागो, वॉशिंग्टन डीसी इथलं राहणीमान महाग झाले आहे. आणि घरे खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे आवाक्याबाहेर चालले आहेत. किराणासुद्धा महाग होत चालला आहे. त्यामुळे ममदानी यांची समाजवादी धोरणे आणि आश्वासने लोकप्रिय झाली आणि ते निवडून आले.

ममदानी यांच्या विजयात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. त्यांचे बोलणे, वागणे आणि व्यक्तिमत्त्व अतिशर लाघवी आहे. त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली त्याचे व्हिडिओज आहेत. लाघवी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर, संभाषणकलेवर आणि दाखवलेल्या नीतिधैर्यावर त्यांनी अक्षरशः 11 महिन्यांत प्रचारयंत्रणा उभी केली.

त्यांची बोलण्याची, विचार मांडण्याची आणि लोकांशी संवाद साधण्याची पद्धत; विरोधकालासुद्धा आपल्याकडे वळवून घेते. हे इतकं मॅग्नेटिक आणि इतकं चार्मिंग आहे की, त्यांनी लोकांच्या मनाची पकड घेतली. निवडणुकीच्या आधी पोल्स असतात, खाजगी कंपन्या ते प्रसिद्ध करतात. त्याच्यामध्ये ते एक-दोन टक्के असायचे. हळूहळू त्याचे 10 टक्के झाले, 20 टक्के झाले. मग ते चर्चेत यायला लागले. असे करत अवघ्या 11 महिन्यांत त्यांनी न्यू यॉर्कमधल्या 50.2 टक्के लोकांची मतं त्यांनी मिळवली.

अमेरिकेच्या राजकारणात 'समाजवादी' हा शब्द अगदीच अस्पृश्य आहे. 'लिबरल' हा शब्दसुद्धा अस्पृश्य आहे; समाजवादी असणे तर पाप ! तरीही तिथे लोकांनी समाजवाद वगैरे लेबल न पाहता विचार ऐकले, हा मोठा बदल आहे, हे या निवडणुकीचे मोठे यश आहे.

मला आठवते, 2004 च्या सुमारास मी टीव्हीपुढे बसलो होतो आणि ओबामांचे भाषण चाललं होतं. त्या वेळी ओबामा अगदी नवखे होते आणि त्यांना जॉन केरी यांच्या प्रेसिडेन्शिअल नॉमिनेशनचे भाषण करण्याची संधी मिळाली होती. त्या काळात ते डेमोक्रॅटिक पक्षात कोवळे तरुण होते, सेनेटरसुद्धा झालेले नव्हते. पण त्यांनी केलेले भाषण इतके प्रभावी होते की, मी ते ऐकत होतो. तेव्हा माझी बायको स्वयंपाक करत होती. मी तिला बोलावले आणि म्हणालो, बघ हा किती प्रभावी भाषण करत आहे.

सगळ्या मोठ्या नेत्यांमध्ये एक कॅरिसमॅटिक गोष्ट असते, ते आपले विचार अतिशय स्पष्टपणे मांडू शकतात. सामान्य लोकांना समजेल असे मांडू शकतात आणि लोकांना जोडून घेऊ शकतात. तेच गुण या निवडणुकीत ममदानी यांनी दाखवले.

न्यू यॉर्क हे जरी सर्वसमावेशक शहर आहे, पण तिथे ज्यू आणि इटालिअन लोकांचा वरचश्मा आहे. त्यांना आपल्या बाजूला वळवून घेणं सोपे नाही. अमेरिकेत माणसे प्रगल्भ आहेत, जातिधर्मावरून खूप भेदभाव होत नाही. पण तरीही माणसं शेवटी माणसंच असतात. सगळ्यांचा एक बायस असतो, मला माझ्यासारख्या माणसांना मत द्यायला आवडतं. हे जगभर आहे. तर त्यांचा तो बायस ओव्हरकम करणं, विश्वास निर्माण करणं, उत्साह निर्माण करणं, हे ममदानी यांचं फार मोठं यश आहे.

अमेरिकन माणसे, (विशेषतः शहरातील) दुसऱ्या माणसाचा रंग बघत नाहीत, त्याची जात बघत नाहीत, त्याचा धर्म बघत नाहीत. ते तुमच्या विचारांची आणि कामाची कदर करतात. इथे अजूनही अशा पद्धतीचं राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण आहे. बातम्या येतात की, अमेरिकेत भारतीयांचं वाईट चाललंय तर इतकं वाईट चाललेलं. पण बातम्या रंजित करून देणं हे माध्यमांचे काम आहे.

डोनाल्ड ट्रम्प हा एक मोठा फॅक्टर नक्कीच या निवडणुकीमध्ये होता. त्यांनी मोठा धुमाकूळ घातलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतींनी लोकशाही खच्ची करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. त्याचीही रिअॅक्शन म्हणून ममदानींकडे काही मतं वळली. अख्ख्या अमेरिकेत 90-95 टक्के डेमोक्रॅटस् निवडून आले; इतकं अमेरिकेत ट्रम्पच्या विरुद्ध सुप्त वातावरण आहे. जसा भारतामध्ये हिंदुत्ववादाचा बेस आहे, तसा ट्रम्पचा अमेरिकेत आहे. त्यांचा आवाज खूप मोठा आहे आणि त्यांच्या मागे पैशाची ताकद एकवटलेली आहे. सगळे पैसेवाले लोक सुरुवातीला अनिच्छेने त्यांच्यासोबत आले, पण आता ते स्वेच्छेने ट्रम्पला साथ देत आहेत. त्यांच्यावरील जनतेची नाराजी या निवडणुकीत स्पष्ट दिसली.

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षात ममदानी मोठे नेते होऊ शकतात का, हे पुढील काळात दिसेल. न्यूयॉर्क हे प्रगतिशील शहर आहे; अमेरिका मोठा देश आहे आणि मध्यमवर्गीय/ग्रामीण भागातही समान प्रश्न आहेत. ममदानींचे निवडणूक मॉडेल तिथेही असे कार्य करेल का, हे भविष्यात दिसेल.

ममदानी यांनी वचने अनेक दिली. पण त्यानुसार ते काम करू शकतील का? त्यांच्या समाजवादी विचारसरणीचा हा खरोखरच विजय आहे का? समाजवादी विचारसरणी अमेरिकेत इतरत्र मान्य होईल का? जगात समाजवादी विचार पुन्हा मूळ धरू लागतील का? भारतीय विशेषतः मुस्लीम तरुण त्यामुळे प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश करतील का?

न्यू यॉर्क सिटीचं बजेट आहे, 110 अब्ज डॉलर्स. अमेरिका जरी भांडवलशाहीवादी देश असला तरी, तो लोककल्याणकारी देशही आहे. या 110 अब्ज डॉलर्सपैकी बराचसा पैसा लोककल्याणकारी योजनांवर खर्च होतो आहे. पण तरी सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. मग ममदानी आपली वचने पूर्ण करण्यासाठी पैसे कुठून उभे करणार? त्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. 1) श्रीमंत लोकांवर 2 टक्के जास्तीचा कर लावणार. 2) उद्योगांवर 3.5 ते 4 टक्के जास्त कर लावणार. अमेरिकेमध्ये शहर किंवा राज्य स्वतःला हवा तसा कर लावू शकते. इंग्लिशमध्ये म्हणतात 'Ability to tax is ability to govern.' उत्पन्नासाठी दुसऱ्या कुणावर अवलंबून राहिले तर राजकीय सत्तेला अर्थ राहत नाही. प्रत्येक राजकीय युनिट (राज्य, शहर, जिल्हा, तालुका) आर्थिक दृष्ट्या जितके स्वायत्त असेल तितकी राजकीय सत्ता तळागाळापर्यंत पोहोचते. (भारतामध्ये सगळ्या जिल्ह्यांची, राज्यांची, शहरांची ती राजकीय सत्ताच हिरावून घेतली आहे. जीएसटी सगळा केंद्राला दिलेला आहे. राज्याचा असा करच राहिला सेल्स टॅक्स होता तोसुद्धा काढून घेतला आणि आता केंद्र सरकार राज्याला त्याचे पैसे परत देताना खळखळ करते. महाराष्ट्राला तर 100 रुपयांतले 7 रुपये परत येत आहेत. अमेरिकेत ते होत नाही.) साहजिकच आणखी 2 टक्के टॅक्स लावून श्रीमंतांना फारशी झळ बसणार नाही, उद्योगांना आणखी 3.5 टक्केमुळे झळ बसणार नाही. उच्च शिक्षित आणि अतिशय कुशल कामगार वर्ग हवा असेल तर त्यासाठी समाजाला, शहराला आणि राज्याला अधिक टॅक्स देण्यात चुकीचे काही नाही. त्यात जनतेचाच फायदा आहे. पण तरीही ते सगळं ममदानी यांना जमेल की नाही हे आता सांगण्यात काहीच अर्थ नाही.

ममदानींची समाजवादी विचारसरणी इतर शहरात तरी स्वीकारली जाईल का? सांगता येणे कठीण आहे. कारण न्यू यॉर्कइतके प्रगत शहर अमेरिकेत नाही. सॅन फ्रान्सिस्को, सिअॅटल, शिकागो, डायव्हर्स ही शहरे, पुरोगामी आहेत. पण न्यू यॉर्कइतकी नाहीत. त्यामुळे सगळीकडे ममदानी स्वीकारला जाईलच याची खात्री नाही. शहरांना जे प्रश्न भेडसावत आहेत तसेच प्रश्न अमेरिकेच्या मध्यम वर्गाला. शहराच्या बाहेर सबर्ब (उपनगरात) मध्ये तो वर्ग राहतो. ग्रामीण भागातील लोकांनाही असेच प्रश्न भेडसावत आहेत.

झोरान ममदानी यांचे यश मला अजून एका कारणासाठी महत्त्वाचे. मुस्लीम म्हणजे कोणीतरी हिंस्र, लोकांचे गळे कापणारा माणूस हे जे चित्र इ.स. 2000 नंतर अमेरिकेत जाणीवपूर्वक निर्माण केले गेले, उभे केले; त्याला छेद देणारा हा विजय आहे. ममदानी हा मॅग्नेटिक पर्सनॅलिटीचा आणि निर्भीड माणूस आहे. सगळ्या जगालाही आश्वासक आहे; पण भारतातल्या मुस्लीम तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन राजकारणात प्रवेश करावा. अर्थकारणात आणि समाजकारणात मुसंडी मारावी.

ममदानींव्यतिरिक्त अजून दोन भारतीय वंशाची माणसे या निवडणुकीत जिंकली. एक म्हणजे गजाला हाशमी नावाची आंध्रमध्ये जन्मलेली स्त्री व्हर्जिनिया राज्यात उपराज्यपाल झाली. दुसरा, आफताब पुरेवाल सिनसिनाटी शहराचा महापौर झाला. आफताब पुरेवालची आई तिबेटी बुद्धिस्ट आणि वडील पंजाबी मुस्लीम आहेत. भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. भारताच्या विरुद्ध जिओपॉलिटिक्समध्ये नॅरेटिव्ह रचले गेलेले आहे, त्याला पुरून उरत ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन नेतृत्व करतायत.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी