डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शिक्षणासाठी हवं ते करायला तो तयार होता. म्हणून मग त्याने गावातील वाचनालय गाठलं. रोज तिथे जाऊन विज्ञान या विषयाची- विशेषतः भौतिकशास्त्राची- पुस्तकं वाचू लागला. इंग्रजी भाषेतील माहिती त्याला फार कळत नव्हती. पण चित्रं-आकृत्या बघून नेमकं काय सांगितलंय, हे तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. असंच एकदा त्याच्या हाती ‘ऊर्जेचा वापर’ हे पुस्तक लागलं. त्याच्या मुखपृष्ठावर पवनचक्कीचा फोटो होता. पुस्तकात लिहिलं होतं की- पवनचक्कीच्या साह्याने पाण्याचा पंप चालवता येतो, ते पाणी मग शेतीसाठी वापरता येतं. विल्यमच्या गावात मुळात पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती होती. सिंचनाचं पाणी मिळालं, तर प्रश्न सुटू शकला असता. आणि शेतात चांगलं पीक आलं, तर त्याला पुन्हा शाळेतही जाता आलं असतं. तिथेच त्याने ठरवलं- ‘मी एक पवनचक्की बनवणार!’

वयाच्या फक्त चौदाव्या वर्षी विज्ञानाच्या साह्याने काही तरी भन्नाट करून दाखवणाऱ्या विल्यम कामक्वाम्बा या मुलाची ही खरी-खुरी गोष्ट. आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर मलावी देशात तो राहतो. या देशाचं नाव पूर्वी कधी ऐकलं नसेल ना? तर, या देशाबद्दल थोडं जाणून घेऊ. 

आफ्रिका खंडाच्या दक्षिण-पूर्व भागात न्यासालँड नावाचा प्रदेश होता. तिथे पूर्वी इंग्रजांचं राज्य होतं. दि.६ जुलै १९६४ रोजी हा प्रदेश स्वतंत्र झाला आणि मलावी नावाचा एक छोटासा देश जगाच्या नकाशावर अस्तित्वात आला. साधारण दीड कोटी लोकसंख्येचा हा देश आहे. या भागात फार पूर्वी ‘न्यांजा’ या आदिवासी जमातीचे लोक राहायचे. त्यांना ‘मरावी लोक’ असंही म्हटलं जायचं. त्यावरूनच या देशाचं नाव मलावी असं पडलं. या देशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे- त्याला समुद्र-किनाराच नाही, चारही बाजूंनी तो जमिनीनेच वेढलेला आहे. अशा देशांना 'Landlocked Country' असं म्हणतात. जगात सध्या असे ४९ देश अस्तित्वात आहेत. 

मलावी हा तसा गरीब आणि अप्रगत देश मानला जातो. येथील लोक प्रामुख्याने मका आणि तंबाखूची शेती करतात. वीज आणि सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे बहुतांश शेती कोरडवाहूच आहेत. अशाच एका शेतकरी कुटुंबात विल्यमचा जन्म झाला. कोण हा विल्यम? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तो तुमच्या-माझ्यासारखाच एक विद्यार्थी. विम्बे परिसरातील मासिताला नावाच्या एका लहानशा खेड्यात तो राहायचा. शेताजवळच एका झाडाच्या आडोशाला त्याचं झोपडीवजा घर आहे. आई-बाबा आणि सहा बहिणी असं त्याचं कुटुंब. कोरडवाहू शेतीतून मिळणाऱ्या थोड्याशा उत्पन्नामुळे तो गरिबीतच वाढला. प्राथमिक शिक्षण मोफत असल्यामुळे तो विम्ब्याच्या शाळेत जाऊ लागला. त्याला शिक्षणाची गोडी लागली. इंग्रजी भाषेची मुळाक्षरे गिरवतानाच विज्ञानाचंही थोडं-थोडं शिक्षण त्याला मिळू लागलं. त्याच्या गावात वीज नव्हती. त्यामुळे सूर्यास्त झाला की, आई रॉकेलचा कंदील लावायची. धुराने काळपट झालेल्या काचेतून कसाबसा थोडा प्रकाश यायचा. पण अशा प्रकाशात अभ्यास वगैरे करणं शक्यच नव्हतं. त्याचं विल्यमला नेहमी वाईट वाटायचं. विल्यमचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं, पण पुढचं शिक्षण मोफत नव्हतं. 

विल्यमच्या गावात २००१ मध्ये भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा तो १४ वर्षांचा होता. पावसाचा थेंबही न मिळाल्याने शेतीत काहीच पिकलं नाही. काही महिन्यांतच सर्वांवर उपासमारीची वेळ आली. विल्यमचं कुटुंबही दिवसातून फक्त एक वेळ जेवून दिवस काढत होतं. ‘न्सीमा’ नावाचा मक्यापासून बनवलेला इडलीसारखा पदार्थ ते खायचे. एवढी हलाखीची परिस्थिती असल्यामुळे विल्यमच्या शिक्षणासाठी खर्च करणं शक्य नव्हतं. शेवटी त्याला शाळा सोडावी लागली. शाळा नसल्यामुळे घरी बसून रेडिओवर गाणी ऐकत बसणं एवढा एकच कार्यक्रम सुरू होता. ‘रेडिओच्या आतून हा आवाज कसा काय येतो?’, याचं त्याला कुतूहल वाटायचं. आत अगदी लहान माणसं असतील आणि तेच ही गाणी वगैरे म्हणत असावीत, असा त्याचा भाबडा समज होता. म्हणून एक दिवस घरी एकटा असताना त्याने तो रेडिओ उघडून बघितला. त्याच्या आत खूप सारे छोटे छोटे यांत्रिक भाग त्याला दिसले. त्यातला एक भाग काढला, तर रेडिओचा आवाजच येईनासा झाला. दुसरा भाग काढला, तर स्टेशन लागेनासं झालं. असं करत-करत रेडिओबद्दल बरीच माहिती त्याने मिळवली. पुढे तर तो एवढा तरबेज झाला की, गावात कुणाचाही रेडिओ बिघडला, तर तो विल्यमच दुरुस्त करून देत असे. त्यातून चार-दोन पैसेही त्याला मिळायचे. पण तेवढं पुरेसं नव्हतं. कोरडी पडलेली शेतमजमीन आणि वडिलांच्या हतबल चेहऱ्यावर लिहिलेलं भविष्य त्याला पाहवत नव्हतं! 

शिक्षणासाठी हवं ते करायला तो तयार होता. म्हणून मग त्याने गावातील वाचनालय गाठलं. रोज तिथे जाऊन विज्ञान या विषयाची- विशेषतः भौतिकशास्त्राची- पुस्तकं वाचू लागला. इंग्रजी भाषेतील माहिती त्याला फार कळत नव्हती. पण चित्रं-आकृत्या बघून नेमकं काय सांगितलंय, हे तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. असंच एकदा त्याच्या हाती ‘ऊर्जेचा वापर’ हे पुस्तक लागलं. त्याच्या मुखपृष्ठावर पवनचक्कीचा फोटो होता. पुस्तकात लिहिलं होतं की- पवनचक्कीच्या साह्याने पाण्याचा पंप चालवता येतो, ते पाणी मग शेतीसाठी वापरता येतं. विल्यमच्या गावात मुळात पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती होती. सिंचनाचं पाणी मिळालं, तर प्रश्न सुटू शकला असता. आणि शेतात चांगलं पीक आलं, तर त्याला पुन्हा शाळेतही जाता आलं असतं. तिथेच त्याने ठरवलं- ‘मी एक पवनचक्की बनवणार!’

पण ती बनवायची कशी? आणि त्यासाठी लागणारं सामान कुठून आणायचं? बरेच प्रश्न विल्यमपुढे होते. आणि पुस्तकात तर सर्वच माहिती उपलब्ध नव्हती. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात छोटं पाऊल टाकूनच होते, असं आपण म्हणतो. विल्यमनेही तसंच केलं. पुस्तकातील चित्रं आणि आकृत्या बघून प्रथम त्याने एक छोटी प्रतिकृती बनवली. त्यातून नेमकं काय करायचं, याचा त्याला अंदाज आला. पवनचक्कीसाठी लागणारं साहित्य विकत वगैरे घेणं तर शक्यच नव्हतं. म्हणून भंगारातच काही कामाची वस्तू मिळते का, हे तो शोधू लागला. एखादी वस्तू मिळाली की, ती आपल्या प्रतिकृतीसोबत जुळवून बघायची; नाही पटलं, तर पुन्हा नवा शोध सुरू. बरेच दिवस त्याचा हा उपक्रम सुरू होता. शेवटी त्याला हवं असलेलं सगळं साहित्य मिळालं. त्यात एक ट्रॅक्टरचा पंखा, भंगारातील सायकल, प्लॅस्टिकचे पाईप असं बरंच काही होतं. त्यातूनच पवनचक्कीची निर्मिती सुरू झाली.

विल्यम त्या भंगारातील वस्तूंसोबत दिवसभर खेळत बसायचा. त्याच्या आईसह शेजाऱ्यांनाही हे सगळं हास्यास्पद वाटत होतं. विल्यमच्या प्रयत्नांत मात्र खंड पडत नव्हता. कुठे काही अडलं की लगेच वाचनालय गाठायचं, पुस्तकात पुन्हा नीट सगळं बघायचं आणि काम सुरू करायचं- असा खटाटोप तब्बल दोन महिने सुरू होता. अखेर विल्यमची पवनचक्की तयार झाली आणि तिचा वापर करून वीजनिर्मितीही करता येऊ लागली. पण प्रयोग अद्याप पूर्णपणे यशस्वी झाला नव्हता. पुस्तकात दाखविल्याप्रमाणे विल्यमच्या पवनचक्कीलासुद्धा तीन पाती होती. पण त्यातून फार कमी वीज निर्माण होऊ लागली, म्हणून त्याने चौथं पातं जोडलं. मग कुठे सगळं नीट सुरू झालं. पवनचक्कीचा वापर करून घरात विजेचे चार दिवे आणि दोन रेडिओ चालू शकत होते. म्हणजेच अंधार पडल्यावरही घरात लख्ख प्रकाश होता. रेडिओवर गाणी ऐकण्यासाठी बॅटरी सतत बदलण्याची गरज नव्हती.

रात्री फक्त विल्यमच्याच घरात प्रकाश होता, ते बघून शेजाऱ्यांना आश्चर्य वाटलं. प्रत्येक जण येऊन चौकशी करू लागला. हळूहळू विल्यमच्या पवनचक्कीची बातमी गावभर पसरली. विल्यम वाचनालयात सतत एकच पुस्तक घेऊन बसायचा. ते बघून तिथल्या निरीक्षकाने एकदा त्याला सहज विचारलं, ‘‘एवढं काय आवडतं तुला हे पुस्तक?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘सर, या फोटोतल्यासारखी पवनचक्की मी बनवली आहे.’’ 

त्यांचा दोन क्षण विश्वासच बसला नाही. मोठ्या कौतुकाने ते विल्यमची पवनचक्की बघायला लगेच गेले आणि तो सगळा प्रयोग पाहून ते थक्क झाले. तिथून परतल्यावर त्यांनी ही सगळी बातमी त्यांच्या एका पत्रकार मित्राला कळवली आणि विल्यमच्या पवनचक्कीची गोष्ट थेट वृत्तपत्रात प्रकाशित झाली.

दुष्काळ आणि उपासमारीच्या परिस्थितीमुळे सर्वत्र निराशेचा काळोख पसरलेला होता. त्या परिस्थितीत विल्यमच्या पवनचक्कीने आशेचा एक नवा किरण दिला होता, म्हणून तिचं महत्त्व काही वेगळंच होतं. पुढे कधी तरी विल्यमच्या कामाबद्दल इंटरनेटवर एक लेख लिहिला गेला आणि खऱ्या अर्थाने ही बातमी जगभर पसरली. तंत्रज्ञान, मनोरंजन आणि निर्मितिक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी TED (Technology, Entertainment, Design) नावाची संस्था एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. या संस्थेशी निगडित कुणाला तरी विल्यमबद्दल कळलं. त्यांनी विल्यमला त्याच्या पवनचक्कीची गोष्ट सांगायला टांझानिया या देशात येण्याचं निमंत्रण दिलं.
 
सगळंच अनपेक्षितपणे घडत होतं. कधीही घर सोडून न गेलेल्या विल्यमला परदेशातून बोलावणं आलं होतं. तो विमानात पहिल्यांदाच बसणार होता. हॉटेल कसं असतं, हे बघणार होता. आणि शेवटी त्याला शेकडो लोकांसमोर थेट मंचावरून बोलायचं होतं. आणि त्याचं ते बोलणं जगभरातील लोक व्हिडिओवरून पाहणार होते. या सगळ्या विचारांनी त्याच्या पोटात गोळा येत होता. दबक्या पावलांनी तो व्यासपीठावर पोचला. तिथे त्याला एक प्रश्न विचारला गेला- ‘‘इतक्या कठीण परिस्थितीत हे सगळं तू कसं करू शकलास?’’ अगदी मोजक्या शब्दांत तो म्हणाला- ‘‘प्रयत्न केले आणि शक्य झालं!’’ त्यानंतर सगळीकडून मदतीचे हात पुढे येऊ लागले. 

आपल्या पवनचक्कीचं कौतुक होत असलं, तरी विल्यम समाधानी नव्हता. त्याचा मूळ उद्देश अद्याप सफल झाला नव्हता. त्याला पवनचक्कीचा वापर करून पाण्याचा पंप चालवायचा होता, शेतीला पाणी द्यायचं होतं. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, शिकायचं होतं. ‘टेड’मध्ये भाषण करून परत आल्यावर, त्याने आहे त्यापेक्षाही मोठी पवनचक्की बनवायला सुरुवात केली. आठ महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर दुसरी, अधिक ऊर्जा निर्माण करणारी पवनचक्की तयार केली. त्याद्वारे पाण्याचा पंप चालू शकत होता, शेतीला पाणी देता येऊ शकत होतं. पण हे सगळं केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता, गावातल्या इतरांसाठीही त्याने मदत केली. नंतर हवेसोबतच सौरऊर्जेचा वापर करून तो वीजनिर्मिती करू लागला. दरम्यान गावात पाण्यासाठी एक खोल विहीर खोदली गेली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. या सर्व प्रयत्नांमुळे दुष्काळ आणि उपासमारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नवा मार्ग त्याने निर्माण केला.

कसं आहे पहा... शिक्षणाचं महत्त्व आपण सगळेच जाणतो. पण तेच शिक्षण आपल्याला विज्ञान नावाचं एक साधन उपलब्ध करून देतं आणि त्याचा वापर करून वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी विल्यमने एका संकटावर मात केली. 

बरीच वर्षे शाळेपासून दूर राहिल्यावर, २००८ मध्ये विल्यमचं शिक्षण पुन्हा नियमितपणे सुरू झालं. त्याच वर्षीच्या उन्हाळ्यात इंग्लंडमधील ‘रेंजेन्ट्‌स लँग्वेज ॲकॅडमी’मध्ये तो इंग्रजी भाषा शिकायला गेला. सन २०१० मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी विल्यमला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. न्यू हॅम्पशायरमधील ‘डार्टमाऊथ कॉलेज’मध्ये त्याने प्रवेश घेतला. त्याच परिसरात पवनचक्कीद्वारे वीज निर्माण करण्याचा फार मोठा प्रकल्प आहे. विल्यम तो प्रकल्प बघायला एकदा गेला. इतक्या भव्य आकाराच्या पवनचक्क्या त्याने कधीच बघितल्या नव्हत्या. पण आपणही असंच काही तरी बनवल्याचा त्याला नक्कीच अभिमान वाटला असेल, नाही का? आज विल्यम ३० वर्षांचा झालाय. त्याच्या आयुष्याची गोष्ट सांगणारं एक पुस्तकही त्याने लिहिलंय. त्याचं नाव- ’The Boy Who Harnessed the Wind’ (म्हणजे ऊर्जेलाच कामाला लावणारा मुलगा). 

जिद्दीने व चिकाटीने सुरू केलेल्या प्रवासात विल्यमने खूप यश मिळवलं आणि आजही ऊर्जानिर्मितीची त्याची धडपड सुरूच आहे. विल्यमला ढएऊ च्या व्यासपीठावर पुन्हा एकदा बोलावलं गेलं होतं. तेव्हा तिथे बोलताना तो म्हणाला, ‘‘मला खूप शिकायचंय आणि ऊर्जेच्या क्षेत्रात आयुष्यभर काम करायचंय. सौरऊर्जा, वायुऊर्जेचा वापर करून उपयोगी वस्तू बनवणारी एक कंपनी सुरू करायची आहे. वाट अजून खूप लांब आहे. पण माझ्याप्रमाणे कठीण परिस्थितीत आयुष्य घालवणाऱ्यांना एकच सांगावंसं वाटतं- मित्रांनो स्वतःवर विेशास ठेवा. कितीही संकटं आली, तरीही प्रयत्न थांबवू नका. कारण आपण प्रयत्न करत राहिलो, तर अशक्य वाटणारं कामही सहज शक्य होतं!’’

(लेखन : नीलेश मोडक)
 

Tags: विल्यम कामक्वाम्बा बालकुमार दिवाळी अंक प्रेरणादायी विज्ञान नीलेश मोडक पवनचक्की दुष्काळ ऊर्जा मलावी दक्षिण आफ्रिका गरिबी poverty dakshin Africa 2017 balkumar Diwali ank teenage malavi William Kamkvamba Dushkal ani Pavanchakki Pavanchakki Windmill Science Neelesh Modak Drought Energy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके