इतक्या वेळात आम्ही गावापासून तीन मैल दूर आलो होतो. चारही बाजूला शांतता होती. पश्चिमेला लांबवर भीम तलाव पसरलेला होता. लहान असताना इथे येऊन आम्ही कमळे तोडत असू आणि त्यांचे घोस बनवून कानात अडकवत असू. आता संध्याकाळ होत होती. मी पटकन एका झाडावर चढलो आणि एक फांदी तोडली. कुऱ्हाडीने चटकन त्याचा विटी-दांडू बनवला. खेळ सुरू झाला. मी गलीवर विटी ठेवली आणि कोलली. विटी गयाच्या समोरून निघून गेली. हाताने मासे पकडण्याचा जसा प्रयत्न असतो आणि तो अयशस्वी होतो, तसा काहीसा प्रयत्न गयाने केला. विटी त्याच्या मागे जाऊन पडली... लहानपणी विटी ज्याच्या हातात आपोआप जात होती तोच हा गया का? असे मला वाटले.
आमचे इंग्रज दोस्त मानो किंवा न मानो पण विटी-दांडू हा सगळ्या खेळांचा राजा आहे असे माझे मत आहे. आजही विटी-दांडू खेळताना कुणालाही मी पाहतो तेव्हा माझा जीव वर खाली होतो. असे वाटते की, त्यांच्या बरोबर जाऊन खेळावे. या खेळासाठी काही ठरवायची गरज नसते. कोणतेही साहित्य लागत नाही. सहज एखादी झाडाची फांदी कापली, त्याची विटी बनवली आणि दोन जण जरी खेळायला असले तरी हा खेळ सुरू होऊ शकतो; पण विदेशी खेळाचे तसे नसते. विदेशी खेळाचे सामानच खूप महाग असते आणि हीच त्यातली खरी अडचण आहे. कमीत कमी 100 रुपये खर्च केल्याशिवाय तो खेळ सुरूच होऊ शकत नाही. अगदी त्या विरुद्ध विटी-दांडू हा खेळ आहे. काहीही खर्च न करता तो सुरू होऊ शकतो; पण आपण इतके इंग्रजाळलेले आहोत की, आपल्याला आपल्या कोणत्याच गोष्टीमध्ये रुची वाटेनाशी झालेली आहे. आपल्या शाळांमधून प्रत्येक मुलाकडून वर्षाला तीन-चार रुपये इंग्रजी खेळासाठीचे शुल्क म्हणून घेतले जातात. तसे पाहिले तर भारतीय खेळ काहीही खर्च न करता खेळता येतात. तेच खेळावेत असे कुणाला का वाटत नाही? ज्यांच्यापाशी पैसा असतो त्यांच्यासाठी इंग्रजी खेळ असतात. गरीब लोकांच्या माथी ते का मारता? ठीक आहे, विटीने डोळा फुटायची भीती असते. मग काय क्रिकेटमुळे डोके फुटायची, हात-पाय मोडायची भीती नसते? जाऊ दे. ही ज्याची त्याची आवड झाली. मला मात्र सगळ्या खेळात विटी-दांडू हाच खेळ आवडतो आणि लहानपणाच्या आठवणीत विटी-दांडू या खेळाच्याच आठवणी मला प्रिय आहेत. ते सकाळीच घराबाहेर पडणे, झाडावर चढून फांद्या तोडणे आणि त्याचे विटी-दांडू बनवणे. तो उत्साह, ती एकाग्रता, तो खेळणाऱ्या मित्रांचा ग्रुप, ते खेळणे आणि खेळवणे, ती भांडणे, लहानपणचा निष्पापपणा हे सगळे आठवते. त्यामध्ये शिवाशिव, गरीब-श्रीमंत असा भेद कधीच नव्हता. आमच्यामध्ये श्रीमंतीचे चोचले नव्हते. श्रीमंतीचे प्रदर्शन करायची वृत्ती नव्हती. पण दिवसभर खेळण्याने घरचे लोक आमच्यावर रागावलेले असायचे. मला खाण्या-पिण्याची शुद्ध नसायची. एवढ्याशा विटीमध्ये दुनियेतील सगळा गोडवा भरलेला आहे अशीच त्या वेळी माझी अवस्था असे.
आमच्या मित्रांच्या टोळक्यात गया नावाचा एक मुलगा होता. तो माझ्यापेक्षा दोन-चार वर्षांनी मोठा असावा. हाडकुळा, उंच, माकडासारखी लांब पातळ बोटे असलेला. माकडासारखीच चपळता, तशीच तडफ. विटी कुठलीही असो, तो एखाद्या किड्यावर पालीने झडप घालावी तसा विटीवर झडप घालीत असे. त्याला आई-वडील कुणी होते की नव्हते हे मला आत्ता आठवत नाही. तो कुठे राहायचा, काय खायचा हेही आठवत नाही; पण तो आमच्या टीमचा चॅम्पियन होता. तो ज्याच्याकडून खेळेल त्याचा विजय निश्चित असे. तो दुरून येताना दिसला की, आम्ही पुढे धावत जाऊन त्याचे स्वागत करीत असू आणि त्याला आपल्याकडून खेळण्यासाठी भाग पाडत असू.
एक दिवस मी आणि गया दोघेच खेळत होतो. माझा डाव होता आणि तो झेलणारा होता. जर आपला डाव असेल तर आपण दिवसभरही खेळू शकतो, पण डाव द्यायचा असला तर एक मिनिटदेखील खेळ आपल्याला नकोसा वाटतो. मी मला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी सगळे प्रकार केले. अगदी खेळाच्या नियमानुसार जे करणे शक्य नाही तेही केले; पण आपला डाव घेतल्याशिवाय गया पिच्छा सोडायला तयार नव्हता.
त्याची समजूत काढायचा मी खूप प्रयत्न केला, पण गयावर त्याचा काही परिणाम झाला नाही. मी डाव न देताच घराकडे पळत सुटलो.
गयाने मला पकडले आणि हातातील दांडू उगारून मला म्हणाला, "माझा डाव देऊन कुठे जायचे आहे ते जा. आपला डाव घेताना मला पिदवलेस, आता माझा डाव आल्यावर पळतोस कुठे?"
"तू दिवसभर खेळत राहिलास तर मी दिवसभर पिदवला जाऊ की काय ?" मी म्हणालो.
"हो, दिवसभर तुला पिदावेच लागेल."
"मी जेवायला तरी जाऊ की नको ?"
"नाही, माझा डाव दिल्याशिवाय तू कुठेच जायचे नाही."
"मी काय तुझा गुलाम आहे?"
"हो, तू माझा गुलामच आहेस."
"मी घरी निघालो. तू माझे काय वाकडे करतोस तेच बघू."
"घरी कसा जाशील ? खेळ म्हणजे तुला गंमत वाटली होय ? मी तुला डाव दिला, आता मी डाव घेणारच." तो म्हणाला.
"तू माझा पेरू देत नाहीस तोपर्यंत मी तुझा डाव देणार नाही."
...मला वाटले की, माझी बाजू न्याय्य आहे. मी कोणत्या तरी स्वार्थी भावनेतूनच त्याला पेरू खायला दिला असेल. निःस्वार्थीपणे कोण कुणाशी वागतो? भीकदेखील आपण स्वार्थी भावनेतूनच देतो. गयाने पेरू खाल्ला, मग माझ्याकडून डाव घेण्याचा त्याला अधिकार काय? लाच देऊन लोक खूनदेखील पचवतात. तो माझा पेरू असाच पचवेल ? पेरू एका पैशाला पाच मिळतात. गयाच्या बापाने तरी असे पेरू खाल्ले होते का कधी? हा सरळ सरळ अन्यायच आहे... असे माझे मन म्हणत होते.
गयाने मला आपल्याकडे ओढत म्हटले, "माझा डाव देऊन जा. पेरूबिरू मी काही जाणत नाही."
मी माझे वागणे न्याय्य आहे असे समजत होतो आणि त्याला त्याच्यावर अन्याय झाला आहे असे वाटत होते. मी हात सोडवून घेऊन पळण्याच्या विचारात होतो, पण तो मला जाऊ देत नव्हता. मी त्याला शिवी दिली. त्याने माझ्यापेक्षाही वाईट शिवी दिली. नुसती शिवीच दिली नाही तर मला दोन-तीन झापडाही मारल्या. मी त्याला चावलो. तेव्हा त्याने दांडूने माझ्या पाठीवर फटका मारला. मग मी रडू लागलो. माझ्या या अस्त्राचा तो मुकाबला करू शकला नाही. तो पळून गेला. मी लगेचच डोळे पुसले. त्याने मारलेल्या फटक्याच्या वेदना मी विसरलो आणि हसत हसत घरी गेलो. एका अधिकाऱ्याच्या मुलाने खालच्या जातीच्या मुलाकडून मार खाल्ला ही गोष्ट त्या वेळीही मला अपमानजनक वाटली होती, पण मी घरी त्याबद्दल कुणाजवळ तक्रार केली नाही.
2
त्याच काळात माझ्या वडिलांची तिथून बदली झाली. नव्या गावी जायचे या कल्पनेने मी इतका आनंदलो होतो की, आपण इथल्या मित्रांपासून दूर जाणार याचे दुःखही मला फारसे झाले नाही. वडील दुःखी झाले होते. कारण ही अधिकाराची जागा पैसे मिळवून देणारी होती. आईदेखील दुःखी होती. कारण इथे प्रत्येक गोष्ट स्वस्त होती आणि गल्लीतल्या स्त्रियांशी तिचे घरच्यासारखे संबंध प्रस्थापित झालेले होते, पण माझा आनंद गगनात मावत नव्हता.
मी मित्रांना मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत होतो. 'नव्या गावी आकाशाला भिडणाऱ्या उंच उंच इमारती आहेत. तिथे इंग्रजी शाळेत कुणी मास्तरांनी एखाद्या विद्यार्थ्याला मारले तर जेलमध्ये टाकले जाते...' असे काहीबाही मी त्यांना सांगत होतो. त्यांचे विस्फारलेले डोळे आणि आश्चर्यचकित मुद्राच त्यांच्या दृष्टीने मी किती मोठा झालो आहे हे सांगत होत्या. त्या बिचाऱ्यांना माझा हेवा वाटत होता. ते मनातल्या मनात जणू म्हणत होते, 'तू मोठ्या शहरात चालला आहेस. आम्हाला मात्र याच खेड्यात खितपत पडावे लागणार आहे.'
वीस वर्षे उलटली. मी इंजिनियरिंगची डिग्री मिळवली. मग मी त्या जिल्ह्याचा दौरा करीत एकदा त्या खेडेगावी पोहोचलो. तिथे मी डाकबंगल्यावर थांबलो. त्या ठिकाणी आल्यावर मला लहानपणच्या अनेक गोष्टी आठवल्या. मी हातात काठी घेतली आणि बाहेर पडलो. लहानपणी मी जिथे जिथे खेळत होतो, त्या जागा पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो. त्या ठिकाणांची फक्त नावेच मला ओळखीची वाटत होती. त्या शिवाय काहीच ओळखीचे वाटत नव्हते. जिथे पडकी घरे होती तिथे आता पक्की घरे उभी होती. जिथे वडाचे जुने झाड होते तिथे आता सुंदर बाग झालेली होती. त्या ठिकाणाचा कायापालटच झालेला होता. जर त्या ठिकाणांची नावे मला आठवत नसती तर मी त्या जागा शोधूही शकलो नसतो. लहानपणीच्या आठवणींमुळे मला त्या काळातील मित्रांना भेटायची इच्छा झाली; पण ते जगच बदललेले होते. खरे म्हणजे मला माझ्या आठवणीतले गावच पाहायचे होते, पण गावाचे हे बदललेले रूप बघून मला रडू येईल की, काय असे वाटू लागले.
एका मोकळ्या जागी मी दोन-तीन मुलांना विटी-दांडू खेळताना बघितले. क्षणभरासाठी माझा मलाच विसर पडला. मी मोठा अधिकारी आहे हेही विसरलो.
पुढे होऊन मी एका मुलाला विचारले, "का रे बाळा, इथे गया नावाचा कुणी माणूस राहतो का?"
त्याच्यातील एक मुलगा खेळता खेळता थांबला आणि त्याने शंकित स्वरात विचारले, "कोण गया? तो गया चांभार?"
मी उगीचच म्हणालो, "हो, हो, तोच. गया नावाचा कुणीतरी माणूस आहे तर. तो तोच असणार!"
"हो तो आहे."
"जरा त्याला बोलावून आणशील?"
मुलगा धावत गेला. थोड्या वेळाने एक काळासावळा माणूस त्याच्या बरोबर येताना दिसला. मी गयाला दुरूनच ओळखले. मी त्याला पुढे होऊन मिठीच मारणार होतो, पण क्षणभर विचार करून मी स्वतःला आवरले.
"काय गया... मला ओळखलेस?"
गयाने मला वाकून नमस्कार केला. "हो मालक, न ओळखायला काय झाले? तुम्ही ठीक आहात ना?"
"एकदम मजेत. तू तुझ्याबद्दल सांग."
"मी डेप्युटी साहेबांचा शिपाई आहे." तो म्हणाला.
"मतई, मोहन, दुर्गा हे सगळे कुठे असतात ? त्यांची काही खबर ?"
"मतई तर मेला. दुर्गा आणि मोहन पोस्टमन झाले आहेत. तुम्ही?"
"मी या जिल्ह्याचा इंजिनियर आहे."
"सरकार, तुम्ही पहिल्यापासूनच हुशार आहात."
"आता कधी विटी-दांडू खेळतोस?" असे मी विचारले.
गयाने माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.
"आता विटी-दांडू कसे खेळणार सरकार. आता पोटाच्या मागे धावताना सुट्टीही मिळत नाही." तो म्हणाला.
"चल, आज तू आणि मी खेळू. तुझा डाव माझ्यावर आहेच. आज तू खेळ. तुझा डाव द्यायला मी तयार आहे." मी आग्रहाने म्हणालो.
गया मोठ्या मुश्किलीने तयार झाला. तो कवडीमोलाचा शिपाई. मी मोठा ऑफिसर. त्याची आणि माझी बरोबरी होऊच शकत नव्हती. त्यामुळे तो गडबडला. अर्थात मीही गडबडलो होतो. कारण आम्ही दोघे खेळायला लागलो तर लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली असती. आणि मग आम्हाला खेळण्यातला आनंद मिळालाच नसता; पण खेळल्याशिवाय तर मला राहावत नव्हते. शेवटी आम्ही दोघांनी गावापासून दूर जाऊन एकांतात खेळावे असे ठरले. तिथे बघणारे कुणी नसेल, त्यामुळे लहानपणातील खेळाचा आनंद खूप चाखता येईल असे वाटले. मी गयाला घेऊन डाकबंगल्यावर गेलो. नंतर त्याला गाडीत घेऊन गावापासून दूरच्या मैदानात गेलो. सोबत एक कुऱ्हाडदेखील घेतली होती. मी गंभीर होतो; पण गया त्या सगळ्या घटनेकडे चेष्टेच्या भावनेने बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता किंवा आनंद दिसत नव्हता. कदाचित आम्हा दोघांमध्ये जे सामाजिक अंतर होते त्यामुळे तो विचारात पडलेला असावा.
मी विचारले, "गया, खरे सांग, तुला कधी माझी आठवण आली होती?"
गया गडबडून म्हणाला, "मी तुमची आठवण काढावी इतकी माझी लायकी तरी आहे का? तुमच्याबरोबर काही काळ खेळता येणे नशिबात होते म्हणून खेळलो. नाहीतर मी कुठे आणि तुम्ही कुठे?"
मी उदास होऊन म्हणालो, "पण मला तुझी नेहमी आठवण येत असे. तू दांडू माझ्या पाठीवर जोरात मारला होतास ते मला अजून आठवते आहे."
गया पश्चात्तापदग्ध स्वरात म्हणाला, "बालिशपणा होता सरकार. त्याची आठवणही देऊ नका."
"वा! ती माझ्या लहानपणीची मधुर आठवण आहे. तू मारलेल्या त्या फटक्यात जे प्रेम होते ते मानसन्मानातही नसते किंवा पैशातही नसते. ती घटना माझ्या मनात घर करून राहिलेली आहे."
इतक्या वेळात आम्ही गावापासून तीन मैल दूर आलो होतो. चारही बाजूला शांतता होती. पश्चिमेला लांबवर भीम तलाव पसरलेला होता. लहान असताना इथे येऊन आम्ही कमळे तोडत असू आणि त्यांचे घोस बनवून कानात अडकवत असू. आता संध्याकाळ होत होती. मी पटकन एका झाडावर चढलो आणि एक फांदी तोडली. कुऱ्हाडीने चटकन त्याचा विटी-दांडू बनवला.
खेळ सुरू झाला. मी गलीवर विटी ठेवली आणि कोलली. विटी गयाच्या समोरून निघून गेली. हाताने मासे पकडण्याचा जसा प्रयत्न असतो आणि तो अयशस्वी होतो, तसा काहीसा प्रयत्न गयाने केला. विटी त्याच्या मागे जाऊन पडली... लहानपणी विटी ज्याच्या हातात आपोआप जात होती तोच हा गया का? असे मला वाटले. विटी त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला कुठेही उडालेली असली तरी तो ती झडप घालून पकडत असे. जणू तो विटीवर वशीकरण मंत्र टाकत असे. विटी नवी असो किंवा जुनी, छोटी असो किंवा मोठी, टोकदार असो की बोथट; पण ती त्याच्या हातात सापडतच असे. त्याच्या हातात जणू चुंबक होता. तो विटीला आपल्याकडे खेचून घेत असे. पण आता विटीला त्याच्याबद्दल प्रेम वाटेनासे झाले आहे असे दिसत होते.
मग मी त्याला पिदवायला सुरुवात केली. खरे तर मला खेळाचा सराव राहिलेला नव्हता. त्यामुळे मी कितीतरी चुका करीत होतो. म्हणून मी बेइमानीचाच आश्रय घेतला होता. बाद असूनही मी डाव माझ्याकडेच ठेवला होता. खरे म्हणजे मी बाद झाल्यावर नियमानुसार गयाला 'खेळायला' द्यायला हवे होते. पण विटीला टोलवताना जर
हलका टोला बसला तर ती जवळच पडत असे. तेव्हा मी ती झटपट उचलून पुन्हा टोला मारीत असे. मी खोटे खेळतो आहे हे गया बघत होता, पण काहीच बोलत नव्हता. जणू तो खेळाचे सगळे नियम विसरला होता. लहानपणी त्याचा नेम किती अचूक होता, विटी त्याने फेकली की, सरळ येऊन दांडूला लागत असे; पण आज ती दांडूला लागतच नव्हती. कधी ती उजवीकडे पडे तर कधी डावीकडे, कधी पुढे तर कधी मागे.
त्याला अर्धा तास पिदवल्यानंतर विटी एकदा दांडूला लागली. विटी जवळून गेली पण दांडूला लागलीच नाही, असा कांगावा मी केला.
तेव्हा गयाने कोणताही विरोध केला नाही.
"नसेल लागली." तो शांतपणे म्हणाला.
"दांडूला लागली असती तर मी खोटे कशाला बोललो असतो ?" मी म्हणालो.
"नाही सरकार, तुम्ही कशाला बेइमानी कराल?" गया म्हणाला. खरे तर लहानपणी असे खोटे बोलायची माझी हिंमत नव्हती. हाच गया तेव्हा माझ्या बोकांडी बसला असता. पण आज मी त्याला किती सहज धोका देत होतो. 'गाढव आहे लेकाचा. सगळे नियम विसरला आहे.' असे मी समजत होतो.
आणि तेवढ्यात विटी दांडूला लागली. बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या जोरात येऊन लागली. या वेळी खोटे बोलण्याचे धाडस मला होणे शक्यच नव्हते; पण 'आणखी एकदा खोटे बोलून पाहायला काय हरकत आहे. मानले तर ठीकच आहे, नाहीतर त्याला डाव द्यावाच लागणार आहे. अर्थात, अंधार झाल्याचा बहाणा करून गळा सोडवता येऊ शकेल. मग डाव द्यायला पुन्हा कोण इथे येणार आहे?' असा विचार माझ्या मनात घोळत होता.
पण गया आनंदाने ओरडला. "लागली, विटी लागली. टण् असा आवाज झाला."
मी आश्चर्यचकित झाल्यासारखे करून म्हटले,
"तू लागलेली पाहिलीस? मी तर नाही बघितली."
"पण टण् असा आवाज आला सरकार !"
"विटेला वगैरे लागली नसेल कशावरून?"
हे वाक्य माझ्या तोंडून कसे निघून गेले ते माझे मलाच समजले नाही. हे सत्य नाकारणे म्हणजे रात्रीला दिवस म्हणण्यासारखे होते. कारण आम्ही दोघांनीही विटी दांडूला लागताना पाहिली होती. तरीही गयाने माझे म्हणणे मान्य केले.
“हो, विटी एखाद्या विटेला लागली असणार. दांडूला लागली असती तर इतका मोठा आवाज झाला नसता.” तो म्हणाला.
मी पुन्हा खेळायला सुरुवात केली; पण इतकी बेइमानी केल्यावर मला गयाची दया आली. त्यामुळे तिसऱ्या वेळी विटी दांडूला लागली तेव्हा मी उदारपणे त्याला डाव देण्याचे ठरवले.
पण गया म्हणाला, "आता अंधार झालाय सरकार. आपण उद्या खेळूयात."
मी विचार केला, उद्या त्याला जास्त वेळ मिळेल, तेव्हा तो किती वेळ मला पिदवेल याचा काही नेम नाही. त्यामुळे या वेळेसच ही भानगड मिटवलेली बरी.
"नाही नाही, अजून खूप प्रकाश आहे. तू तुझा डाव घेऊन टाक." मी म्हणालो.
"पण सरकार विटी दिसणार नाही."
"काही हरकत नाही."
मग गयाने डावाला सुरुवात केली, पण त्याला सराव राहिलेला नव्हता. त्याने दोन-तीन वेळा विटी टोलवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी असफल झाला. एका मिनिटात त्याचा डाव आटोपला. त्याला मी तासभर पिदवले होते; पण तो मात्र एका मिनिटातच बाद झाला होता.
तेव्हा मी उदारपणे म्हटले, "एक डाव अजून खेळ. तू पहिल्याच वेळी बाद झालायस."
"नको भैया, आता अंधार झालाय."
"तुझे खेळणे सुटलेय... आता कधीच खेळत नाहीस का?"
"खेळायला वेळ कुठे मिळतोय सरकार?" गया म्हणाला.
आम्ही गाडीत येऊन बसलो. दिवेलागणीला मुक्कामावर पोहोचलो. गया घरी जाता जाता म्हणाला, "उद्या विटी-दांडूचा खेळ गावात होईल. तुम्ही याल ? तुम्हाला वेळ असेल तेव्हा सगळ्यांना बोलवूयात."
मी संध्याकाळची वेळ दिली आणि दुसऱ्या दिवशी खेळ बघायला गेलो. दहा-बारा लोकांचे टोळके होते. त्यात माझे बालपणीचे अनेक मित्र होते. काही तरुणांना मात्र मी ओळखत नव्हतो. खेळ सुरू झाला. मी गाडीवर बसून त्यांचा खेळ पाहत होतो. आजचा गयाचा खेळ बघून, त्याचे नैपुण्य बघून मी आश्चर्यचकित झालो. तो टोला मारीत असे, त्या वेळी विटी आकाशात उंच जात असे. कालच्यासारखा तो गडबडत नव्हता की गोंधळत नव्हता. लहानपणी जे कौशल्य त्याच्या खेळात होते ते आता खूपच सुधारले होते. काल त्याने मला पिदवले असते तर मी रडलोच असतो. त्याच्या दांडूचा टोला बसताच विटी दोनशे गज लांब जात होती.
गयाच्या विरुद्ध खेळणाऱ्या एका तरुणाने गडबड करायचा प्रयत्न केला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने विटी झेलली होती. गयाचे म्हणणे होते की, विटी जमिनीवर टप्पा पडून उडाली आहे. यावरून दोघांमध्ये मारामारी व्हायची वेळ आली. पण गयाचा रागाने लाल झालेला चेहरा बघून तो तरुण दबला. जर त्याने माघार घेतली नसती तर जरूर मारपीट झाली असती. मी त्या खेळात सहभागी झालेलो नव्हतो, पण लहानपणी खेळताना जसा आनंद मिळत होता, तसाच आनंद मला यांचा खेळ पाहूनही झाला होता. लहानपणी आम्ही सगळे काही विसरून खेळात दंग होऊन जात असू. पण आता माझ्या लक्षात आले की, काल गयाने माझ्याबरोबर खेळण्याचे नाटक केले होते. त्याला माझी दया आलेली असावी. मी खोटे खेळलो, पण त्याने जराही राग व्यक्त केला नाही. कारण तो खेळत नव्हताच. तो मला खेळवत होता. माझा मान राखत होता. मला पिदवून तो माझा घाम काढू इच्छित नव्हता. कारण मी आता साहेब झालो आहे. ही ऑफिसरकी त्याच्या आणि माझ्यामध्ये भिंतीसारखी उभी होती... माझ्या मनात विचार आला... तो माझ्याशी नम्रपणे वागेल, आपली मर्यादा सांभाळून वागेल, पण मी त्याची मैत्री पुन्हा मिळवू शकणार नाही. लहानपणी मी त्याच्या बरोबरीचाच होतो. तेव्हा आमच्यात कोणताच भेद नव्हता; पण हे अधिकाराचे पद मिळाल्यामुळे मी फक्त त्याच्या दयेलाच पात्र ठरलेलो आहे. तो मला आपला प्रतिस्पर्धी समजतच नाही. म्हणजे तो मोठा झालाय आणि मी त्याच्यापुढे खूप छोटा झालोय.
अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
'गुल्ली-डण्डा' या नावाने ही हिंदी कथा 'हंस' या मासिकात, फेब्रुवारी 1933 मध्ये प्रकाशित झाली. नंतर तिचा उर्दू अनुवाद 'गिल्ली-डंडा' या नावाने आला.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या