18 जून 2025 रोजी मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले. त्यांची डझनभर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि चोखंदळ वाचकांपर्यंत पोहोचलेली आहेत. मात्र त्यांनी साधना साप्ताहिकात पूर्वी कधी आणि काय लिहिले याचा आम्ही डिजिटल अर्काइव्हवर शोध घेतला. पाच-सात लेख सापडले, पण एक विशेष वैशिष्ट्यपूर्ण वाटला. तब्बल 43 वर्षांपूर्वी लिहिलेला. 10 फेब्रुवारी 1982 रोजी नरहर कुरुंदकर यांचे निधन झाले, त्यानंतर महिनाभराने तो साधनात प्रसिद्ध झालेला आहे. वस्तुतः कुरुंदकर आणि चितमपल्ली या दोघांचाही जन्म 1932 चा, म्हणजे ते समवयस्क. मात्र कुरुंदकर वयाच्या पन्नाशीत गेले, अर्थातच तेव्हा चितमपल्लीही पन्नाशीतच होते. पण हा लेख वाचला, तर लक्षात येते, चितमपल्ली यांच्यासाठी कुरुंदकर हे गुरुस्थानी होते. 'कुरुंदकरानी नेमके काय दिले' हे त्यांनी या लेखात अतिशय नेमकेपणाने सांगितले आहे. त्यामुळे, हा लेख पुनर्भेट म्हणून सादर करीत आहोत.
दिनांक 11 फेब्रुवारी 1982. त्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर चंद्रभागेच्या वाळवंटावर आलो. सावळ्या चंद्रप्रकाशात वाळवंटातल्या रेतीतून चालत होतो. नक्षत्राचं गूढ प्रतिबिंब पाण्यात डोकावत होतं. नदीचं शांत वाहतं पाणी. अंघोळ केली अन् परत मठाची वाट धरली. चालताना मनात म्हणत होतो. "माझी शैक्षणिक रजा सुरू झालीय, साहित्य संस्कृती मंडळाकडून पुरस्कार मिळालाय, आता लवकर नांदेडला जायचं. नरहर कुरुंदकरांना भेटायचं. सरांना भेटून किती वर्ष झालीत."
येताना नागपूरचे साहित्य प्रसार केंद्राचे श्री. राजाभाऊ कुलकर्णी भेटले. 'पक्षी जाय दिगंतरा' हा माझा ग्रंथ त्यांनी प्रकाशनासाठी घेतला होता. त्यांनी विचारलं, "या ग्रंथाला प्रस्तावना कोणी लिहील?"
माझ्या मनात सरांचं नाव होतं. मी म्हटलं, "कुणाची हवी?"
ते म्हणाले, "प्रा. नरहर कुरुंदकरांची!"
मी लगेच होकार दिला होता.
या आठवणीतच मी नदीकाठ चढून मठात आलो. ज्ञानेश्वरी पुढ्यात ठेवून वाचू लागलो. नंतर कुणीतरी 'तरुण भारत'चा अंक पुढं ठेवून गेला. पहिल्याच पानावर सरांचं छायाचित्र आणि त्यांच्या दुःखद निधनाची शोकवार्ता ! ज्ञानेश्वरी नीट बांधून पुनः पिशवीत ठेवली. जवळच खांबाला टेकून थंडगार फरशीवर बसलो. समोर नदीचं पात्र दिसत होतं. चंद्रभागा वाहत होती. माझ्या आयुष्यात मी एकदा दुःखी झालो ते बाबांच्या मृत्यूनंतर, अन् आता दुसऱ्यांदा ! मला नांदेडच्या गोदातीरावरील दिवस आठवले. मराठवाड्यात गोदावरीला गंगा म्हणतात. माझं घर गंगेच्या काठी होतं. दहा-बारा वर्षांपूर्वी सर होळीत राहत होते. अरुंद गल्ली बोळातून चालत तीन-चार वाडे ओलांडले की सरांचं घर यायचं. अंगणात पारिजातक. पायऱ्या चढून वर गेले की सोप्यात सतरंजीवर बसून सर लिहीत वाचीत असताना दिसायचे. पुढ्यात तक्क्या, टेकायला लोड. आता पुन्हा त्यांची मूर्ती उभी राहिली उंच, सडपातळ, सावळा रंग. सफेद धोतर, साधा शर्ट, गहिरे डोळे, रुंद कपाळ, विचारमग्न व किंचित हसरा चेहरा. अन् ही मूर्ती आता कापरासारखी वितळावी तशी नाहीशी झाली!
सर लौकिक व साहित्याच्या संसारातून अचानक निघून गेले. ते असं एकाकी निघून जातील असं आम्हाला स्वप्नातदेखील खरं वाटलं नसतं. पन्नाशीतला माणूस म्हणजे म्हातारा नव्हे. त्यांची प्रकृती निकोप होती. काही आजार असल्याचं ऐकिवातही नव्हतं. सदा प्रसन्न मुद्रा.
प्राचीन संगीतशास्त्रावर त्यांचं प्रेम होतं. राजा उदयनविषयी ते आम्हाला कितीतरी सांगायचे. संगीताचे सात सूर, त्यांची व्युत्पत्ती, तंतुवाद्ये, चर्मवाद्ये व अंगुष्टी यांविषयी तासन् तास बोलायचे. भरत मुनीच्या नाट्यशास्त्रावर त्या वेळी त्यांचं लेखन चालू होतं.
अन् या संगीताविषयी बोलायला जातानाच औरंगाबादला त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन श्री. अनंतराव भालेरावांसारख्या अनेक मित्रांच्या समोर ते व्यासपीठावर कोसळले आणि ते परत उठलेच नाहीत. त्यांच्या जीवनाचं संगीत व्यासपीठावर संपलं!
नांदेडमधील वास्तव्यात आम्ही वेळोवेळी त्यांच्या दारात उभं राहून विचारायचो, "सर, आत येऊ काय?"
औरंगाबादचे कथाकार मुकुंद कृष्णा गायकवाड बरोबर असायचे, सरांशी त्यांनी परिचय करून दिला होता.
आतून उत्तर यायचं, "नको."
गायकवाड डोके खाजवीत उभे राहायचे, मी हळूहळू पायऱ्या उतरू लागे.
तो पुन्हा आवाज येई, 'स्त्री' मासिकाकरता तातडीने लेख लिहितोय. थोड्या वेळाने या. म्हणजे निवांत बसू."
आम्ही जेवणं उरकून रात्री पुन्हा वाड्याची वाट धरत असू. सर लोडाला टेकून बाचीत बसलेले दिसायचे. त्यांचं असं अखंड वाचन, लेखन, मनन व चिंतन चालू असे. आम्हाला पाहून हसतमुखाने म्हणायचे, "या हो आत. बसा. लिहून झाला एकदाचा लेख."
मग साहित्यिक गप्पा चालू व्हायच्या. शरदबाबू, रवीन्द्रनाथ टागोर व चेकॉव्ह हे माझे अत्यंत आवडते लेखक.
त्यांनी विचारलं, "चितमपल्ली, तुम्ही टागोरांची 'नष्टनीड' ही कथा वाचली?"
"होय." मी.
ते पुढे सांगू लागले "रवीन्द्रनाथांचं नाव घेताच 'काबुलीवाला' ही गोष्ट समोर येते. हिंदू-मुसलमानांच्या ऐक्यावरील ती कथा म्हणून जगप्रसिद्ध झाली, पण त्यांची उत्कृष्ट कथा 'नष्टनीड' आहे. तसंच चेकॉव्हचं. तो रशियन साहित्यातला श्रेष्ठ कथाकार, पण त्यानं लिहिलेली डॉक्टराची कथा अद्वितीय आहे. मानवी मनाचे कंगोरे अतिशय हळुवारपणे कोरले आहेत. तशा ह्या दोन्ही कथा सारख्याच. मृणाल व तिचा दीर एकत्रित येतात. कळत-नकळत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. घडू नये ते घडत असते. कुठे चुकलं ते त्यांना कळतच नाही. जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अन् अपार व्यथेशिवाय जीवनात काही शिल्लक राहत नाही!
"तीच तन्हा डॉक्टर व त्याच्या प्रेयसीची. डॉक्टर आपल्या प्रेयसीला बागेत भेटायला बोलावतो. ती येण्याचं टाळते. तिला त्याचं महत्त्व वाटत नाही. अन् डॉक्टराच्या आयुष्याचं दुसरं पर्व. ती त्याला त्याच बागेत बोलावते. तो जात नाही. काय व कुठे चुकलं हेच त्यांना उमजत नाही. अन्ते आयुष्याची गोडी घालवून बसतात!"
रवीन्द्रनाथ व चेकॉव्हच्या गोष्टी मी अनेकदा वाचल्या होत्या. त्या कथांतील सहजसुंदर मर्म त्या दिवशी त्यांनी सांगितलं. एकदा ते शरदबाबूंविषयी म्हणाले, "शरदबाबूंच्या कथा-कादंबऱ्या शोकान्ती आहेत. विधवा व परित्यक्ता स्त्रीजीवनाचं त्यांनी चित्रण केलं आहे. पण त्यांनी त्यांच्या कथा-कादंबरीत त्यांचा विवाह लावून दिला नाही! त्यांना तसंच नियतीवर सोपवून दिलं. मीलन नाही. विरहाची व्यथा आहे."
रशियन कादंबरीकाराचा विषय निघाल्यावर ते म्हणाले, "रशियन कादंबरीचा व्याप फार मोठा असतो. शेकडो पात्रे असतात. हजारो पानांचं लेखन असतं. टॉलस्टॉयची 'अँना कॅरोनिया' घ्या किंवा मिखिल शोलोखव्हची 'अँँन्ड काइट क्लोज दि डॉन' घ्या. अनुभव घेणं व त्याला साहित्यिक लेखनाचं रूप देणं त्यांना जमलं आहे. ते जे आयुष्य जगले ते आम्हा मराठी लेखकांच्या कुणाच्या नशिबी आलं नाही. अंशतः आलं तरी ते समर्थपणे लिहिता आलं नाही!"
त्यांचं वाचन अफाट होतं, कधी मोपासा सॉमरसेट मॉम व जॉन गुंथरचा विषय निघे. पु. शि. रेगे यांच्या 'सावित्री विषयी बोलत, विश्राम बेडेकरांच्या 'रणांगणा 'विषयी सांगत, र. वा. दिघे, श्री. ना. पेंडसे व गोनीदयांच्याकादंबऱ्यांविषयीबोलत. चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या साहित्याविषयी चर्चा होई. गदिमा व व्यंकटेश माडगूळकरांच्या साहित्याची वैशिष्ट्ये सांगत. त्यांच्या बोलण्याचा अखंड ओघ चालू राही. आम्ही देहभान विसरून ते शांतपणे ऐकत असू. रात्रीचा दुसरा प्रहर संपून पहाट झालेली असे. सर घटका-दोन घटका पलंगावर पडून राहत.
कार्तिक महिन्याचे ते दिवस. वर निरभ्र आभाळात आकाशगंगेच्या उजळ प्रकाशात बगळ्यांच्या रांगा उडतानाचे सुंदर दृश्य दिसायचे. भक्तगण गात गात गंगेवर कार्तिक स्नानाला जाऊ लागलेले असत, आम्ही घरी न परतता ती भजनं ऐकत घाटावर जात असू. ती जागा फार सुंदर आहे. विस्तीर्ण घाट आहे. तिथून खाली नदीचं विशाल पात्र दिसे. गुलाबी थंडीला नुकतीच सुरुवात झालेली असे. नदीच्या पात्रावर लाटा उठत. नक्षत्रांचं सुंदर प्रतिबिंब पाहता पाहता आकाशगंगेत उडणाऱ्या बगळ्यांच्या रांगा नदीतीरावर उतरू लागत. सरांची आठवण अशी लख्ख आकाशगंगेसारखी मनात भरून आहे. नदी, आभाळ, नक्षत्र व पाखरांशी संबंधी नातं जोडणारी आहे.
त्या वेळी मी भारतातील पक्षी सृष्टीचा अभ्यास करीत होतो. तेवढ्यासाठी मी संस्कृत साहित्यसृष्टी धांडोळीत होतो. कधी कधी राम शेवाळकरांकडे गेलो की त्यांच्या संस्कृत पाठांतरानं व अमोघ बाणीनं मी मोहित होई. सरांच्या बोलण्यात बेदोपनिषदांपासून रामायण-महाभारतापर्यंत आणि चरक सुश्रुत, कौटिल्यापासून संस्कृत महाकाव्यांपर्यंतचे उल्लेख येत. मुळातून संस्कृतचं अध्ययन करावं असं या काळात वाटू लागलं.
नांदेडमधल्या यज्ञेश्वर कस्तुरेशास्त्री यांच्या संस्कृत पाठशाळेची वाट धरली. त्यांना भेटलो. एवढा मोठा प्रौढ विद्यार्थी (पस्तीस वर्षांचा), त्यातून बदनाम अशा बन खात्यातला. शास्त्रीबुवांना माझ्या संस्कृत अध्ययनातील हेतू ध्यानात येईना. शेवटी सरांना भेटून सारं विस्तारानं सांगितल्यावर मला पाठशाळेत प्रवेश मिळून लहान मुला-मुलींबरोबर बसून अध्ययन करण्याची परवानगी मिळाली! आकाशवृत्तीनं राहणाऱ्या एकनाथ महाराजांसारख्या गुरूजवळ मी संस्कृतच्या अध्ययनाला सुरुवात केली.
कविता आणि निसर्गशोभा यांचा संबंध कितीही जवळचा असला तरी ते प्रकरण जंगलखाते, सागवान लकडी, लाकूड चोरणारे चोर या कक्षेत सामावणारे नाही.
सर मला नेहमी म्हणायचे, "चितमपल्ली, जंगलखाते हे काही तुमचे खाते नव्हे!"
मराठीतले कादंबरीकार नाथमाधव व बंगालमधील प्रख्यात लेखक शरदबाबू हे दोघेही एके काळी जंगलखात्यातच नोकरीला होते, असा बादरायण संबंध काढून मी मनात समाधान मानी.
त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दिसेना. शेवटी सरांनी माझ्याविषयी दिलेल्या शिफारस दाखल्यासह त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्य वनसंरक्षक श्री. बाबासाहेब बूट यांना विनंती अर्ज केला. त्यांनी माझी बदली पुण्यातील वनसंशोधन केंद्रात केली. पुण्यातील वास्तव्यात मला अभ्यास व संशोधनासाठी अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली. वाईट अनुभवल्यावर चांगलं काय ते कळतं, तसं मला श्री.एम.डी. जोशी व मरवल्लीसाहेबांसारखी देवमाणसं अधिकारी म्हणून मिळाली. तिथं मी संस्कृत, जर्मन व रशियन भाषांचा अभ्यास केला. तेथील भांडारकर प्राच्य संशोधन संस्था व डेक्कन कॉलेजच्या ग्रंथालयात जाण्याची परवानगी मिळाली. पुण्यातील तीन वर्षांच्या वास्तव्यात मी ज्ञान-भिक्षुकी स्वीकारली. त्याचा पुढच्या आयुष्यात खूप उपयोग झाला.
पक्षीशास्त्रातील माझा अनुभव व संस्कृत वाङ्गयातील पक्ष्यांचे संदर्भ ऐकून सर म्हणायचे, "चितमपल्ली, तुम्ही पक्षीशास्त्रातले चालते-बोलते ज्ञानकोश आहात. पण कोश म्हणजे शास्त्र नव्हे, साहित्य नव्हे!"
त्यांना मी लावा पक्ष्याविषयी संदर्भासहित माहिती पाठवून दिली. तोच मजकूर वापरून त्यांनी लावा पक्ष्यावर एक सुंदर लेख लिहून पाठविला. त्यासोबतच्या पत्रात लिहिले होतेः "पुनर्लेखन केलेला लेख काळजीपूर्वक वाचा. अभ्यासा. लिहिण्याचा क्रम व मुद्दे लक्षात ठेवा." त्यानंतर काही महिन्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' (24 ऑक्टो. 1971) मध्ये 'पक्षीवेडा मारुती चितमपल्ली हा परिचय लेख लिहून महाराष्ट्रातील विचारवंतांचं व साहित्यिकांचं लक्ष माझ्याकडे वेधलं. त्यानंतर मी संस्कृत वाङ्गयातील 'पक्षी' ही लेखमालिका 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध केली. त्यातील नावीन्यपूर्ण माहिती व बारीकसारीक संदर्भामुळे साऱ्यांचं लक्ष वेधलं. सर कुणी पक्षीशास्त्रज्ञ नव्हते, पण त्यांनी मला पक्षीशास्त्रज्ञ म्हणून महाराष्ट्रापुढे आणलं. सूत्रबद्ध लेखन कसं करावं, तर्कशुद्ध विचार कसा मांडावा, नेमके महत्त्वाचे संदर्भ कसे टिपावेत, यांचं त्यांनी मार्गदर्शन केलं.
पक्षीशास्वावरील लेखनाकडून श्री. उमाकांत ठोमरे ह्या चतुरस्र संपादकानं मला पक्ष्यांवरील ललित लेखनाकडं वळवलं, ते नवीन लेखन महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरच्या वाचकांना आवडलं. पक्ष्यांना मानवी संदर्भ देऊन कसं लेखन करावं, याचं मार्गदर्शन 'सत्यकथा' च्या राम पटवर्धन यांनी केलं. त्यातूनच 'निरगू गोंड व चांदी कवडी' ('सत्यकथा' दिवाळी 78) हे लेखन प्रसिद्ध झालं. सत्यकथेतील तो लेख वाचून सरांनी लिहिलं, "लेख सुंदर वठला आहे. शैली घाटदार आहे तुम्हांला शून्यातून वर आलेला झाला!"
एकदा माझ्या हातून लेखनात झाल संपादकानं प्रतिष्ठेचा प्रश्न केला. पत्रव्यवहार चालू झाला. मी सरांकडे धाव घेतली. उत्तरात त्यांनी लिहिलं होतंः "खुलाशाविषयीचा कच्चा खर्डा सोबत लिहून पाठवला आहे. असा खुलासा कुणाकडूनही घेतला जात नाही, आता तुमची प्रतिष्ठित लेखकांत गणना होतेय, यापुढं असं करू नका. जबाबदारीनं वागा."
1975 मध्ये पुण्याहून विदर्भात जाण्यापूर्वी त्यांची भेट रा.ज.देशमुख यांच्या वाड्यात झाली. त्या वेळी मी 'मृगपक्षिशास्त्र' या संस्कृत ग्रंथावर टीका लिहीत होतो. सरांना ते दाखवले. त्यांनी ते वाचून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. नंतर तेथून चालत चालत गप्पागोष्टी करत शनिवारवाड्यावरून श्री.रा.चिं. ढेरे यांच्या घरी गेलो. श्री. ढेरे मला नावानं ओळखत होते. त्यांच्याशी माझा समक्ष परिचय करून दिला. जरूर लागेल तेव्हा मला मार्गदर्शन करण्याविषयी सरांनी त्यांना विनंती केली.
पुण्यातली ही शेवटची भेट! आमच्यात पत्रव्यवहार होता. त्यांची कार्डवर लिहिलेली पत्रं त्रोटक असत. नागपूरला येण्यापूर्वी त्यांचं पत्र यायचं, पण जंगलातून दौरा संपवून परत येईपर्यंत ते व्याख्यान देऊन नागपुरातून गेलेले असायचे. पक्षीशास्त्रज्ञ, ललित लेखक, कथाकार व कवी म्हणून सरांनी मला पुढं आणलं. जंगलात भटकताना पक्षी निरीक्षणापासून सुरुवात करून मी कुठचा कुठे पोहोचलो! जंगलात वाढत असलेल्या या रोपाचं वृक्षांत रूपांतर केलं. ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुमाऊलीविषयी लिहिलंय -
हे सारस्वताचे गोड।
तुम्हीच लाविले जी झाड।
तरी आता अवधानामृते वाढ।
सिंपोनि की जो ॥
मला सरांविषयी असंच म्हणावं लागेल, जंगलांत अहोरात्र भटकणाऱ्या ह्या वनवासी माणसाकडून साहित्यक्षेत्रात अल्प स्वल्प सेवा याचं श्रेय त्यांनाच द्यावं लागेल.
(साप्ताहिक साधना: 13 मार्च 1982)
Tags: environment nature forest maruti chitampalli weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
Datta Pandurang Sargar- 10 Jul 2025
असेच जुने लेख अपलोड करावेत खूप छान माहिती मिळाली चितमपल्ली यांचे हे निधन झाले आहे या दोन थोर माणसातील स्नेहबंध आणि एकमेकांना घडवण्याची जी वृत्ती आहे ती खरोखरच अद्वितीय अशीच आहे.
save