नैतिक धैर्य लढयातून निर्माण करता येते, परंतु लढा जर केवळ विध्वंसक ठरावयाचा नसेल तर त्याच्यामागे जीवनविषयक एक नवे तत्त्वज्ञान असावे लागते. हे तत्त्वज्ञान केवळ नैतिक प्रेरणेवर आधारलेले असून चालत नाही; विज्ञान व तंत्रविद्या यांच्या युद्धोत्तर काळात होत असलेल्या अभूतपूर्व प्रगतीमुळे अस्तित्वात येत असलेल्या जगात व्यक्तीस विधायक मार्गदर्शन करण्याची वैचारिक ताकद त्यात असली पाहिजे.
हिंदू मानसाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की, विचार आणि कृती यांच्यात कितीही मोठी विसंगती असली तरी ते अस्वस्थ होत नाही. प्राचीन संस्कृतीत शब्दास स्वतंत्र महत्व असावयाचे. योग्य मंत्र विधिपूर्वक उच्चारला की म्हणणाऱ्यांचे दोष धुऊन जाऊन मनाची टोचणी थांबत असे. आधुनिक ज्ञानाच्या विकासाबरोबर शब्दाचे हे देवी सामर्थ्य नाहीसे होऊन भाषा आणि तिच्यातून व्यक्त होणारे विचार हे मनुष्यनिर्मित संस्कृतीचे एक अंग आहेत हे स्पष्ट झाले. विचार आणि कृती यांमध्ये सुसंवादित्व नसले तर केवळ विचारास किंमत नाही, हे अधिकाधिक प्रमाणात मान्य होऊ लागले. तसेच विचाराचे ऐहिक प्रयोजन स्पष्ट झाल्यावर परंपरागत विचारांची आणि मनोवृत्तीची ऐहिक निकषांवर चिकित्सा सुरू झाली. यातूनच व्यक्तीचे बौद्धिक स्वातंत्र्य व तिची सर्जनशीलता यांची केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर समाजाच्या भौतिक व सांस्कृतिक विकासात असलेल्या महत्त्वाची जाणीव वाढू लागली. ही प्रक्रिया ज्या समाजात पुरेशी पुढे जाऊन परंपरागत विचार, संस्था, मूल्ये थोडक्यात मनुष्याचा जीवनविषयक दृष्टिकोन व सामाजिक व्यवहार-यांत मूलभूत बदल झाला ते आधुनिक झाले. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत त्यांची प्रगती झाली आणि इतर संस्कृतीतील लोकांस त्यांच्याबद्दल हेवा व आदर वाटू लागला. त्यांचे अनुकरण सुरू झाले..
एकांगी व सदोष विकास
परंतु हे अनुकरण अनेकदा अंध व म्हणून वरपांगी होते. पुढारलेल्या समाजाच्या भौतिक प्रगतीने दिपून जाऊन केवळ त्यांचा संस्थात्मक सांगाडा व तंत्रविद्या यांची सरळ सरळ उसनवारी एवढ्यापुरते ते मर्यादित राहिले. त्यांच्या संस्था व त्यांची तंत्रविद्या या एका विशिष्ट प्रकारच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीत विकास पावल्या होत्या, व निराळ्या पार्श्वभूमीत त्या जशाच्या तशा मूळ धरू शकणार नाहीत, हे पाश्चात्य समाजांच्या केवळ भौतिक सामर्थ्याने प्रभावित झालेल्या नेतृत्वाच्या लक्षात आले नाही. पाश्चात्य समाजाच्या विकासाच्या मुळात असलेली मनोरचना भारतीय परंपरेने चढवलेल्या मनोरचनेपेक्षा साफ वेगळी आहे या सत्याचा विसर पडला. म्हणून नवस्वतंत्र राष्ट्रांचा विकासकार्यक्रम सुरुवातीपासूनच एकांगी व सदोष राहिला. यातून वैफल्य आणि अगतिकतेची भावना निर्माण होणे अपरिहार्य होते.
युयुत्सू राजकारणाचे परिणाम
एकोणिसाव्या शतकात जवळ जवळ पंचाहत्तर वर्षे येथे चिकित्सक वृत्ती व विचारस्वातंत्र्य इत्यादी उदारमतवादी मूल्यांची जोपासना करू पाहणारा सुशिक्षित मध्यम वर्ग जीवनाच्या सर्व क्षेत्रांत हिंदू समाजाचे नेतृत्व करत राहिला. परंतु या शतकाच्या शेवटी शेवटी येथल्या राजकारणास एक युयुत्सू वळण लागले. युद्धात गुंतलेल्या समाजास विचारस्वातंत्र्य व चिकित्सक बुद्धीवर बंधने घालावी लागतात. त्यातही पुढचे नेतृत्व केवळ राजकीय स्वातंत्र्याच्या भावनेने प्रेरित झालेले नसून जर ते जीवनविषयक एका सर्वांगीण तत्त्वज्ञानास वाहिलेले असेल तर या बंधनांचे तात्विक समर्थनही करता येते. लोकमान्य टिळक यांच्या काळात सुरू झालेली बंधने स्वातंत्र्योत्तर काळातही कायम राहिली आहेत. मात्र टिळक युग, गांधी युग, आणि नेहरू युग- या तिन्ही युगांत त्यांचे स्वरूप वेगवेगळे राहिले एवढाच काय तो फरक.
अप्रतिहत परिवर्तनशीलता
परंतु अशी बंधने स्वेच्छेने लादून घेतली असली तरी एका विशिष्ट मर्यादिनंतर प्रगतीस मारक ठरत असतात. आधुनिक काळात तर है। सत्य विशेष महत्त्वाचे आहे. कारण, दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण होऊ लागलेल्या जगाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अप्रतिहत परिवर्तनशीलता हे होय. या जगात सर्जनशील विचारास सर्वात अधिक महत्त्व आहे. कारण भौतिक सामर्थ्य वाढवण्यास आवश्यक असलेले शुद्ध ज्ञान स्वतंत्र सर्जनशीलतेच्या अभावात निर्माण होऊ शकत नाही. इतरांनी निर्माण केलेले ज्ञान उपयोगात आणावयाचे असले तरी आपल्या परिस्थितीत ते कसे करता येईल हे नीट समजून घेण्यासाठीसुद्धा स्वतंत्र प्रज्ञेची आवश्यकता असते.
वैफल्याची भावना
स्वातंत्र्योत्तर काळातील तेवीस वर्षांच्या आपल्या अनुभवाचा आढावा घेतला तर वरील विवेचनाची यथार्थता दिसून येईल. आपल्या राष्ट्रीय जीवनाचे चार महत्त्वाचे प्रश्न- संरक्षणक्षमता, आर्थिक विकास, शिक्षण, आणि सामाजिक न्याय- घेऊन हे विशद करता येईल. या चारही क्षेत्रांत आपण अयशस्वी झालो आहोत अशी भावना आज अनेक ध्येयवादी व संवेदनक्षम नागरिकांच्या मनात वास करत आहे. याचा अर्थ असा नव्हे, की आपण काहीच प्रगती केलेली नाही. प्रगती झाली आहे. विकासही साधला गेला आहे, परंतु या विकासाचे स्वरूप आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळे राहिले आहे.
शांततामय मार्गाने विकास साधता यावा म्हणून आखलेले अलिप्ततेचे धोरण आपणास आक्रमणापासून वाचवू शकलेले नाही. एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सत्ता स्पर्धेत अलिप्ततेच्या नावाने आक्रमक गटास झुकते माप देऊन आपण स्वतःचे हसे करून घेतले आहे. लोकशाही समजवादाचा मूल्ये साध्य करण्याच्या उद्देशाने आलेले आर्थिक धोरण अन्नटंचाई, चलनवाढ, वाढती बेकारी, आणि शासनाच्या हातात सत्तेच्या अधिकाधिक केंद्रीकरणात परिणत झाले आहे.
असंतुष्ट विद्यार्थी जगत्
शिक्षणक्षेत्रातील आपले अपयश प्रकर्षांने दिसून येत आहे. कोठारी शिक्षण आयोगाचा अहवाल प्रसिद्ध होऊन चार वर्षे होऊन गेली आहेत; त्यावर बरीच साधकबाधक चर्चा झाली आहे; आणि केंद्र सरकार व राज्य सरकारे यांनी त्यातील जवळ जवळ सर्व सूचनांचा तत्त्वतः स्वीकारही केला आहे परंतु त्यांची अंमलबजावणी कोठल्याही राज्यात नेटाने सुरू झाल्याचे अजून ऐकिवात नाही. पूर्वीचेच अभ्यासक्रम, पूर्वीचीच एकतर्फी शिक्षणपद्धती व पूर्वीचीच तांत्रिक परीक्षापद्धती चालू आहेत. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्फूर्तिदायक कल्पनेचा सोईस्कर विसर पडलेला दिसत आहे. गरजू विद्याथ्यांकरिता शिक्षण आयोगाने सुचवलेली कर्जाऊ शिष्यवृत्त्यांची योजना अहवालातच राहिली आहे. मात्र विद्यार्थी असंतोषाचा उद्रेक अधिकाधिक असंस्कृत राजकीय स्वरूप धारण करू लागला आहे. परंतु त्याला प्रतिसाद म्हणून दुर्जनांचे परिदमन करून बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नाटकी उपाय अवलंबले जाऊ लागले आहेत. तसेच शिक्षण हा राष्ट्र उभारणीचा पाया आहे, शिक्षकांना शिक्षणकार्यात 'स्टेक'ची भावना दिली पाहिजे, व विद्यार्थ्यांना योग्य रीतीने 'मोटिवेट केले पाहिजे, या अर्थाची बडबड राष्ट्रपतीपासून फडतून राजकीय पुढाऱ्यापर्यंतचे सर्व लोक अव्याहतपणे चालू ठेवत आहेत. इतका निर्लज्ज आत्मसंतुष्टपणा आधुनिक राष्ट्रात पाहावयास मिळणार नाही.
हिंदूंचा सेक्युलॅरिझम
परंतु हिंदू मानसाचा दुटप्पीपणा आणि त्याची बौद्धिक दास्यवृत्ती यांची खरी जाणीव होते ती समाजसुधारणा आणि राजकारण या दोन क्षेत्रांत अस्पृश्यतेवर संविधानाने बंदी घातली आहे, हिंदू स्त्रियांना कायद्याने समान हक्क दिले आहेत, आणि समान नागरी संहिता निर्माण करण्याचा शासनास संविधानाने आदेश दिला आहे. प्रत्यक्षात अस्पृश्यता निवारणाचे कार्य अतिशय मंदगतीने चालले आहे. सुशिक्षित हिंदू पुरुषसुद्धा स्त्रियांनी वारसाहक्क वापरू नये अशी अपेक्षा करतात, एवढेच नव्हे तर हुंडाही मागतात. समान नागरी संहिता निर्माण करणे हे स्वतःस सेक्युलर म्हणवणाऱ्या कोठल्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात बसत नाही; आणि मुदतपूर्व निवडणुकांच्या काही महिने आधी केंद्र सरकारच्या मुस्लिम नोकरांस बंधनकारक असलेला एकपत्नित्वाचा नियम मागे घेण्यात येत आहे. सेक्युलॅरिझम आणि समाजवादाचे कंकण बांधलेले केंद्रीय मंत्री बिनदिक्कतपणे असे सांगू शकतात की, मुस्लिम लीग ही जातीय संघटना नव्हे!
राजकीय समाजवाद
राजकारणात याहूनही अधिक निराशाजनक चित्र दिसत आहे. लोकशाही समाजवादाच्या नावाने जीवनाच्या सर्व क्षेत्रांत शासन आपली पकड घट्ट करत आहे. काही राजकीय पुढारी, काही अधिकारी, आणि काही उद्योगपती यांचा एक नवीन वर्ग अस्तित्वात आला आहे. या वर्गाची भाषा समाजवादाची आहे, परंतु त्याची कृती इतकी नीतिभ्रष्ट आहे की, एकोणिसाव्या शतकातला पाश्चात्य भांडवलदार त्याच्या मानाने संत वाटावा. लोकशाही समाजवादाच्या मार्गाने वाटचाल करण्यास बद्धप्रतिज्ञ झालेले समाजवादी या नवीन वर्गाच्या भ्रष्टाचाराने कितीही अस्वस्थ झाले तरी शेवटी त्याचे पौरोहित्य करून गप्प राहिल्याशिवाय त्यांना गत्यंतर उरत नाही. कारण व्यापक प्रमाणावर राष्ट्रीयीकरण केल्याशिवाय समाजवाद आणता येत नाही अशी त्यांची ठाम समजूत आहे. इंग्लंड आणि स्कँडिनेव्हियन देश यांचा अनुभव किंवा कम्युनिस्ट राष्ट्रांचा उलट अनुभव त्यांना माहीत असून, त्यातून भारतीय संदर्भात योग्य निष्कर्ष काढावयास ते धजत नाहीत. जवळ जवळ चाळीस वर्षांपर्यंत, राष्ट्रीयीकरण म्हणजेच समाजवाद, ह्या समीकरणाच्या आधारावर पक्षउभारणी केल्यानंतर आता त्या विचाराच्या पकडीतून बाहेर पडणे त्यांना अशक्य वाटत आहे. म्हणजे असे की, इतर बाबतीत परंपरावादाच्या विरुद्ध भूमिका घेणारे विचारवंतसुद्धा पारंपरिक समाजवादाच्या आर्थिक सिद्धांताची गेल्या पन्नास वर्षांच्या अनुभवाच्या आधारे फेरतपासणी करण्याची नैतिक हिंमत दाखवू शकत नाही. ही झाली ध्येयवादी नेत्यांच्या बौद्धिक दास्याची गोष्ट. जे स्वतःस 'प्रॅक्टिकल' समजतात त्यांच्याठायी बौद्धिक दास्यापेक्षा दंभ आणि 'सिनिसिझम' अधिक प्रमाणात आढळतात. अशी माणसे सर्व क्षेत्रांत पाहावयास मिळतात. येथे एका प्रकारचेच उदाहरण देतो.
आपले 'चिरतरुण' पुढारी
हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्याच्या दृष्टीने, आणि विशेषतः तरुणांच्या वाढत्या असंतोषाच्या संदर्भात, वानप्रस्थाश्रमाच्या कल्पनेचे फार मोठे महत्त्व असले पाहिजे. प्रत्यक्षात मात्र याच्या उलट परिस्थिती पाहावयास मिळते. या देशातील वयोवृद्ध नेते सत्तेच्या बाबतीत ययातीचे आधुनिक अनुयायी असावेत असे वाटते. जॉन केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष झाले त्या वेळी त्यांचे वय त्रेचाळीस होते, निक्सन व एडवर्ड हीच यांचे वय त्यांच्या निवडणुकीच्या वेळी छप्पन्न होते.
विल्सन आणि जॉन्सनही साठीच्या अलीकडे होते. परंतु या देशात पंडित नेहरू पक्षापाताचा झटका आल्यानंतरही प्रधानमंत्रीपद सोडावयास तयार होऊ शकत नाहीत. नेहरू 'चिरतरुण' होते म्हणून त्यांच्याबद्दल अपवाद केला तरी सत्तरीच्या पलीकडे पोहोचलेले अनेक इतर चिरतरुण आपल्या राजकारणात महत्वाची स्थाने पटकावून बसलेले दिसतात; आणि हेच चित्र शिक्षणाच्या क्षेत्रात दिसत आहे. राजकारणात टिकण्यासाठी किमान अंगात काही धमक लागते. कुलगुरू होण्यासाठी फक्त योग्य मंत्र्यांची खुशामत करण्याची स्वमान हीनता किंवा जेथे निवडणूक असेल तेथे कोर्ट किवा सेनेट याच्या पुरेशा सदस्यांना आपल्या बाजूचे करून घेण्यास आवश्यक असलेली जात किंवा इतर तितकेच अशलाघ्य गुण लागतात. परंतु ही सर्व मंडळी राष्ट्राची निःस्वायं सेवा करण्याचा तरुणांना उपदेश करण्यात आपले कोठे तरी चुकत आहे असे मानावयास तयार नसते. मग तरुणांनी त्यांच्याबद्दल तुच्छतेची भावना बाळगली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय?
दंभ आणि बौद्धिक दास्याचे हे वातावरण नाहीसे केल्याशिवाय भारतीय समाजात कोठल्याही प्रकारचे मांगल्य आणता येणार नाही. परंतु त्याकरता दोन गोष्टींची गरज आहे. एक अशी की, सर्व पारंपरिक प्रमाणे- धर्मशास्त्रे, राजकीय विचारसरणी, वय किंवा स्थान यामुळे प्राप्त झालेला अधिकार आणि सर्व पारंपरिक मूल्ये यांना आधुनिक ज्ञान व मानवी मूल्ये यांच्या दुहेरी निकषावर तपासून घेतले पाहिजे. या कार्यासाठी फार वरच्या दर्जाच्या नैतिक धैर्याची आवश्यकता आहे.
प्रस्थापित नेतृत्वाकडून अशा धैर्याची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल. तरुणांस असे धेयं दाखवणे त्या मानाने सोपे असते. परंतु हा केवळ इतरांना भ्रष्ट किंवा कालबाह्य ठरवून आपण नैतिक दृष्टया श्रेष्ठ आहोत एवढे समजण्याचा प्रश्न नाही. इंडियन कमिटी फॉर कल्चरल फीडम या संस्थेने दोन वर्षांपूर्वी दिल्लीत करवून घेतलेल्या एका पाहणीत असे आढळून आले की, दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी आणि त्यांचे आई-वडील यांचा जीवनविषयक दृष्टिकोन आणि मूल्ये बहुतांश एकसारखीच होती. याचा अर्थ असा की, मागच्या पिढीवर टीका करत असताना तरुणांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, ही टीका त्यांना स्वतःलाही तितकीच लागू पडते. नाही तर त्यांचे दंड औरंगजेबाने शहाजहांनविरुद्ध केवळ सत्तेसाठी केलेल्या बंडासारखे ठरेल. तसे व्हावयाचे नसेल तर युद्धपूर्व काळात आणि आजसुद्धा आधुनिक समजले जाणारे सिद्धांत आणि मूल्ये यांची निष्ठुर चिकित्सा करण्याची त्यांना कुवत दाखवावी लागेल.
दंभ, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, जातीयवाद इत्यादी गोष्टीच्याविरुद्ध केवळ निदर्शने करून त्या नाहीशा करता येत नाहीत. या गोष्टी समाजहितास बाधक आहेत हे सर्वसामान्य नागरिकास समजते. परंतु आपली नापसंती परिणामकारकरीत्या व्यक्त करण्याऐवजी तो अनेकदा या गोष्टी करणाऱ्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या पापात सहभागी का होतो, याचे कारण समाजशास्त्राच्या दृष्टीने समजून घेतले पाहिजे. अन्यथा त्यावर यशस्वी उपाय शोधून काढता येणार नाही. सर्वसामान्य नागरिक अनिष्ट गोष्टींना मूक किंवा उघड संमती देतो याचे एक महत्वाचे कारण असे की, आधुनिक जगात वाटचाल करण्यास दुसरा मार्ग हुडकून काढण्याची बौद्धिक कुवत किंवा नैतिक धैर्य त्याच्यापाशी नसते. ही उणीव भरून काढण्याची जबाबदारी नवीन नेतृत्वाची होय.
नैतिक धैर्य लढयातून निर्माण करता येते, परंतु लढा जर केवळ विध्वंसक ठरावयाचा नसेल तर त्याच्यामागे जीवनविषयक एक नवे तत्त्वज्ञान असावे लागते. हे तत्त्वज्ञान केवळ नैतिक प्रेरणेवर आधारलेले असून चालत नाही; विज्ञान व तंत्रविद्या यांच्या युद्धोत्तर काळात होत असलेल्या अभूतपूर्व प्रगतीमुळे अस्तित्वात येत असलेल्या जगात व्यक्तीस विधायक मार्गदर्शन करण्याची वैचारिक ताकद त्यात असली पाहिजे.
असे तत्वज्ञान निर्माण करण्यास कणखर बौद्धिक शिस्तीची गरज असते. अशी शिस्त भारतातील एकोणिसाव्या शतकातल्या समाजसुधारकांच्या ठायी होती. भारतीय राजकारणात महात्मा गांधींच्या नेतृत्वाचा उदय झाल्यानंतर ही शिस्त नाहीशी झालेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झाले ते एवढेच की, आम्ही गांधीची नैतिक निष्ठाही फेकून दिली आणि गांधीच्या धर्मभावनेचे स्थान त्याहून अधिक भोंगळ, पारंपरिक, समाजवादी सिद्धांतावरील अंधश्रद्धेने घेतले. आज गरज आहे ती लोकशाही समाजवादी मूल्यांचा अधिकाधिक प्रमाणात आविष्कार घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्जनशील बौद्धिक शिस्तीची आणि कठोर नैतिक कृतीची. ध्येयवादी तरुणांच्याठायी नैतिक प्रेरणा पुरेशी असली तरी ती डोळसपणे कृतिशील होण्याकरता आवश्यक असलेली बौद्धिक शिस्त अजून दिसत नाही. हा दोष फक्त भारतीय तरुणांत दिसतो असेही नाही; उलट पुढारलेल्या जगात आज तरुणांच्या ज्या जहाल चळवळी चालल्या आहेत त्या सर्वांचा हा मोठा दोष आहे. परंतु त्या देशांना याची जी किंमत देणे सहज परवडू शकेल ती आपल्याला परवडण्यासारखी नाही. आपल्या तरुण चळवळीस एका दृष्टीने पाश्चात्यांपेक्षा मोठ्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे. म्हणून ज्या दिवशी आपल्या तरुणांच्या अंगी नैतिक धैर्य आणि बौद्धिक शिस्त या दोन्हींचा मिलाफ पाहावयास मिळेल त्या दिवशी भारतीय संस्कृती आणि पर्यायाने भारतीय समाजात खऱ्या अर्थाने क्रांतीची सुरुवात झाली असे म्हणावयास हरकत नाही.
Tags: दास्यमुक्ती विशेषांक 1970 भ्रष्टाचार संस्कृती सेक्युलॅरिझम हिंदू राजकारण तत्वज्ञान अ. भि. शहा Dasyamukti Special Issue 1970 Corruption Culture Secularism Hinduism Politics Philosophy A. B. Shah weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या