डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

असहिष्णू शासन = राष्ट्राचे पतन : इतिहासातील सात धडे

आनंद करंदीकर यांनी विविध नियतकालिकांत लिहिलेल्या व काही अप्रसिद्ध अशा एकूण 30 लेखांचा संग्रह ‘वैचारिक घुसळण’ या नावाने पुढील महिन्यात साधना प्रकाशनाकडून येत आहे. राजकीय, शिक्षण व रोजगार, स्त्री-पुरुष समानता, धर्मचिकित्सा, चळवळी, विंदा करंदीकर आणि परिशिष्ट अशा सहा विभागात मिळून 30 लेख आहेत. या सर्व लेखांचे स्वरूप ललित-वैचारिक आहे. यातील दोन अप्रकाशित लेख साधनाच्या या व पुढील अंकात प्रसिद्ध करीत आहोत - संपादक
 

समाजात वेगवेगळ्या गटांत परस्परांविषयी असहिष्णुता असते. हे गट काळे आणि गोरे असे वांशिक असू शकतात. ख्रिस्ती आणि ज्यू, हिंदू आणि मुसलमान असे धार्मिक असू शकतात. ही असहिष्णुता एकाच धर्मातील शिया आणि सुन्नी अशा दोन पंथांत असू शकते. मराठी विरुद्ध मद्रासी किंवा आता मराठी विरुद्ध हिंदी अशा भाषक गटात असहिष्णुता असू शकते किंवा निर्माण केली जाऊ शकते. कधी ही असहिष्णुता सारस्वत विरुद्ध सीकेपी इतक्या लहान जातीय पातळीवरसुद्धा पाहायला मिळू शकते. ही असहिष्णुता म्हणजे धुमसणारा अंगार असतो. जळण घालून फुंकर मारली की आगीचा डोंब उसळतो. त्यात गरिबांचे नुकसान होते. असा विद्वेष समाजाला हानिकारक असतो. आणि अशा असहिष्णुतेला शासकीय पाठिंबा असतो किंवा असहिष्णुता शासनपुरस्कृत असते तेव्हा परिणाम फारच विपरीत होतो. स्वत:च्या देशाच्या नागरिकांविरुद्ध शासनपुरस्कृत असहिष्णुतेमुळे संपूर्ण राष्ट्र लयाला जाते; असा मोठा आणि स्पष्ट इतिहास आहे. उलटपक्षी, सहिष्णू शासनामुळे राष्ट्र भक्कम बनते असाही इतिहास आहे. या इतिहासाचे आकलन करून स्मरण करणे, त्यापासून धडा शिकणे राष्ट्ररक्षणासाठी आवश्यक आहे. त्यासाठी काळानुसार क्रमवारी लावलेली सात महत्त्वाची उदाहरणे थोडक्यात समजून घेऊ.

उदाहरण 1.

मौर्य साम्राज्य : चंद्रगुप्त मौर्यापासून सुरू झालेले मौर्य साम्राज्य भारतभर पसरलेले सामर्थ्यवान साम्राज्य होते. जग पादाक्रांत कारायला निघालेला अलेक्झांडर हे सामर्थ्य पाहून माघारी फिरला.  कलिंगच्या युद्धातील मनुष्यहानी बघून अशोकाला दु:ख झाले आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. सम्राट अशोकाच्या काळात हे साम्राज्य सामर्थ्याच्या आणि स्थैर्याच्या शिखरावर होते. पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण अशोकाच्या नातवाचा सेनापती होता. त्याने राजा सैन्याची सलामी घेत असताना त्याचा खून केला आणि स्वत:ला राजा म्हणून घोषित केले. ‘‘तुझी कीर्ती दिगंत व्हायची असेल तर तू बौद्धांचा नाश कर’’ असा सल्ला त्याला दरबारातील वैदिक ब्राह्मण सल्लागारांनी दिला. पुष्यमित्र शुंग तो सल्ला योग्य मानून कामाला लागला. त्याने स्वत: हल्लाबोल करून कुक्कुतर्मा आणि शकला येथील बौद्धमठ जमीनदोस्त केले. तेथील बौद्ध भिक्षूंना ठार मारले. त्याने बौद्ध भिक्षूंच्या  मुंडक्यासाठी सुवर्णमुद्रांची बक्षिसे जाहीर केली. त्याच्या राजवटीत बुद्धांच्या 500 धर्मशाळा नष्ट करण्यात आल्या. परिणाम काय झाला? बौद्ध धर्म त्यानंतर 1000 वर्षे भारतात टिकून राहिला, त्याचा पाडाव करण्यासाठी त्यानंतर 1000 वर्षांनी आद्य शंकराचार्यांना बुद्धधर्माविरुद्ध मोठी बौद्धिक आघाडी उघडावी लागली. पण आपल्याच देशातील अल्पसंख्याक नागरिकांवर पुष्यमित्र शुंगाने असहिष्णू हिंसक हल्ले केल्यावर जनता राजापासून दूर गेली. मौर्य साम्राज्य कोसळले. भारत देशाची फार मोठी हानी झाली.

उदाहरण 2.

अकबराचे साम्राज्य : अकबरच्या काळात त्याचे साम्राज्य तिप्पट झाले. बंगाल, राजपुताना, गुजरात आणि दख्खनमध्ये तर ते पसरलेच; पण अफगाणिस्थानमध्येही ते स्थिरावले. अकबराने सहिष्णुतेचा नवा आयाम उभा केला. त्याने जीझिया कर रद्द केला, राजपूत राजकन्येशी विवाह करून तिला महाराणी केले, दरबारात अनेक हिंदूंना मानाच्या आणि अधिकाराच्या जागा दिल्या, अनेक धर्मांतील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून ‘दीन-ए-इलाही’ स्थापन केला. तो स्वत: गोमांस खात नसे. जैनांचा आदर करायचा म्हणून काही दिवशी त्याने प्राणिहत्येवर बंदी घातली. त्याच्या जनानखान्यात सामील होणाऱ्या राजपूत स्त्रियांवर मुसलमान होण्याची सक्ती नव्हती. सक्तीने मुसलमान केलेल्या हिंदूंना त्याने परत हिंदू धर्माचा स्वीकार करण्यास परवानगी दिली. अकबर स्वत: दिवाळी साजरी करायचा आणि हातावर राखीही बांधून घ्यायचा. राज्य वाढवायचे तर राज्यातील सर्व जनतेला राज्य आपले वाटले पाहिजे याची अकबराला चांगली जाणीव होती. त्याला हिंदूंनी मोठी साथ दिली. अकबरानंतर जहांगीर आणि शहाजहान यांनी अकबरानं घालून दिलेली सहिष्णुतेची शासनव्यवस्था तशीच चालू ठेवली आणि अकबराइतकी पराक्रमी युद्धे न करताही त्यांचे साम्राज्य टिकून राहिले.

उदाहरण 3.

मोगल साम्राज्याचा अस्त : औरंगजेबाने सहिष्णुता झिडकारली. ‘‘तू करतो आहेस ते चूक आहे, त्यामुळे तुझे राज्य विनाश पावेल’’ हे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र पाठवून सांगितले. पण औरंगजेबाने हा सल्ला मानला नाही. औरंगजेबाने जीझिया कर पुन्हा लागू केला. हिंदूना देवळे बांधायला बंदी घातली. इतकेच नव्हे तर अकबराच्या नंतर बांधलेली देवळे नवी आहेत असे म्हणून ती पाडायला प्रोत्साहन दिले. हजारो मजूर लावून देवळे पाडण्यात आली आणि उपलब्ध झालेल्या मलब्याचा वापर मशिदी बांधण्यासाठी करण्यात आला. शिखांचे गुरू गोबिंदसिंग आणि त्यांच्या दोन मुलांची औरंगजेबाने हत्या केली. नागरिकांशी शासनाने कसा व्यवहार करावा हे त्याने मुसलमान धर्मगुरूंचा सल्ला घेऊन ठरवले. परिणाम म्हणून राजपुतान्यातील राजपूत, पंजाबमधील शीख आणि दख्खनचे मराठे त्याच्या राजवटीविरुद्ध उभे ठाकले. औरंगजेब जेव्हा मराठे आणि आदिलशाही, कुतुबशाही, निजाम यांचा पाडाव करण्यासाठी दक्षिणेत आला तेव्हा आपल्या सैन्याचा एक मोठा भाग त्याला राजपूत आणि शीख यांचा सामना करण्यासाठी उत्तरेत मागे ठेवावा लागला. औरंगजेबाची स्वत:ची राहणी साधी आणि निर्व्यसनी आहे, याचे आकर्षण जनतेला कमी वाटले; औरंगजेबाची असहिष्णुता जनतेने झिडकारली. वारशाने मिळालेले प्रचंड साम्राज्य लयास जाण्यास  औरंगजेबाची असहिष्णुता कारणीभूत ठरली.

उदाहरण 4.

शिवाजी महाराजांची दूरदृष्टी : शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ असे बिरुद लावण्यात आले, पण महाराजांनी गाई आणि ब्राह्मणांसाठी राज्य स्थापन केले नाही. ‘रयतेसाठीचे राज्य’ स्थापन केले. या राज्यात प्रयत्नपूर्वक सर्वांना सामावून घेतले. महाराजांनी मुसलमानांचा द्वेष केला नाही, अनेक मुसलमानांना त्यांनी आपल्या राज्यात महत्त्वाच्या जवाबदाऱ्या दिल्या. याची उत्तम, नेमकी आणि सविस्तर माहिती ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात कॉ. पानसरे यांनी दिली आहेच. राज्याभिषेक करायला नकार देणाऱ्या ब्राह्मणांना महाराज सहज हत्तीच्या पायाखाली चिरडू शकले असते. पण महाराजांनी तसे केले नाही. त्यांनी गागाभट्टाला बोलावून आणले. पण त्याचबरोबर ब्राह्मणांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि इतर पंथीयांना सामील करून घेण्यासाठी तांत्रिक पद्धतीने आपल्याला परत राज्याभिषेक करून घेतला. आपण स्थापन केलेले राज्य टिकून राहायचे असेल तर सर्वधर्म सहिष्णुता आवश्यक आहे याचे चांगले भान महाराजांना होते. महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रातील पुढील ओळी बघा, ‘‘वाईट अथवा चांगले असो, हे दोन्ही ईश्वराचे निर्मित आहेत, कोठे मसजिद आहे तेथे त्याचे स्मरण करून बांग देतात. कोठे देवालय आहे तेथे घंटा वाजवितात. त्यांस कोणाचे धर्मास विरोध करणे हे आपल्या धर्मापासून सुटणे व ईश्वराचे लिहिले रद्द करून त्याजवरी दोष ठेवणे आहे.’’ सुलतान अहमद गुजराथी हा असाच गैर चालीने वागला, तो लवकरच बुडाला. महाराजांची दूरदृष्टी वास्तविक ऐतिहासिक अनुभवावर उभी होती. म्हणून त्यांनी औरंगजेबाला अकबराचा चांगला आणि अहमद गुजराथीचा वाईट दाखला दिला. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी मराठा सत्तेचा लढा यशस्वीपणे दिला. त्यांच्या घातकी मृत्यूनंतर सामान्य मराठी सैनिक लढतच राहिला आणि नंतरच्या 100 वर्षांत मराठी सत्ता ही भारतातील सर्वांत मोठी आणि बलशाली सत्ता बनली; हे शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे, सर्व धर्म, पंथ आणि जाती सामावून घेऊन अंगीकारलेल्या सहिष्णुतेचे फळ आहे.

उदाहरण 5.

अमेरिकी संघराज्याची उभारणी : अमेरिकेची राष्ट्र उभारणी ही अनेक धर्मांच्या, अनेक वंशांच्या लोकांना सातत्याने सामावून घेऊन झाली आहे. अमेरिकी संघराज्याला खरे मोठे आव्हान अध्यक्ष लिंकन यांच्या कारकिर्दीत उभे राहिले. गुलामगिरी नष्ट करायला विरोध करीत दक्षिणेतील राज्यांनी संघराज्यातून फुटून निघाल्याची घोषणा केली आणि संघराज्याची एकी राखण्यासाठी लिंकननी सैन्य पाठवले. सुरू झालेल्या यादवी युद्धामध्ये काही लक्ष सैनिक बनलेले नागरिक मारले गेले. बंधमुक्त झालेले कृष्णवर्णीय हजारोंनी उत्तरेकडे निघाले. युद्ध उत्तरेने जिंकले. बंडखोर दक्षिणी लोकांना कठोर शासन केले पाहिजे, अशी उत्तरेतल्या अनेक नेत्यांची भूमिका होती. लिंकन यांनी धैर्याने आणि दूरदृष्टीने त्यांची ‘10 टक्के’ योजना जाहीर केली. राज्यातील फक्त 10 टक्के मतदारांनी जरी संघराज्याशी बांधिलकी मान्य केली तरी ‘झाले गेले विसरून जाऊ,’ अशी ही योजना होती. उत्तरेतल्या ‘सूड घेतलाच पाहिजे, कठोर शासन झालेच पाहिजे’ अशी भूमिका असणाऱ्या नेत्यांनी या योजनेविरुद्ध अमेरिकी काँग्रेसमध्ये ठराव पास केला. लिंकननी अध्यक्षीय अधिकारात तो ठराव धुडकावून लावला. आपल्या या सहिष्णू धोरणाचे वर्णन लिंकन यांनी ‘Charity towards all, malice towards none'  (सर्वांप्रति सद्‌भाव, कोणाचाही द्वेष नाही), असे केले. हे शब्द अमेरिकेच्या इतिहासात अजरामर झाले. आपले लक्षावधी सैनिक ज्यांच्याकडून हकनाक मारले गेले त्यांच्याबद्दल लिंकननी धैर्याने ही भूमिका घेतली हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अमेरिकी संघराज्य टिकून राहिले आणि आज ती जगातील सर्वांत बलवान महासत्ता आहे याचा पाया या सहिष्णुतेत आहे.

उदाहरण 6.

जर्मनीचे विभाजन : नाझींनी जर्मनीमध्ये ज्यूंच्या कत्तली केल्याचा इतिहास त्या मानाने अलीकडचा आहे. वंशश्रेष्ठत्व आणि समाजशुद्धी यांच्या नावाखाली त्यांनी जिप्सी आणि ज्यूंना संपूर्णत: नामशेष करण्याचा प्रयत्न केला. नाझींना कम्युनिस्टांनाही संपवायचे होते. असहिष्णू हिंसेचे भयानक दर्शन त्यांनी घडवले. परिणाम काय झाला? नाझींच्या ज्यू द्वेषामुळे अमेरिकेतील ज्यूंनी अमेरिकेला लवकरात लवकर युद्धात उतरवले- जे हिटलरला नको होते. कम्युनिस्टांना संपवण्याची घाई असल्याने हिटलरने रशियावर अकाली हल्ला केला. जर्मनी युद्ध हरली त्याची ही दोन प्रमुख कारणे आहेत. ती मुख्यत: कमालीच्या असहिष्णुतेतून निर्माण झाली. पण जर्मनीसाठी युद्धात हार झाली एवढेच विपरीत घडले नाही. देशाचे दोन तुकडे झाले. ज्या कम्युनिस्टांना संपवायला नाझी निघाले होते त्या कम्युनिस्टांचे राज्य निम्म्या जर्मनीवर प्रस्थापित झाले आणि ज्यूंचे एक नवे, प्रबळ राष्ट्र निर्माण झाले.

उदाहरण 7.

बांगलादेशची निर्मिती : असहिष्णुतेतून राष्ट्र लयाला जाण्याचे हे शेजारचे आणि अगदी अलीकडचे उदाहरण आहे. पंजाबातील जाट-मुसलमानांच्या नियंत्रणाखाली असलेल्या पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांना पूर्व पाकिस्तानातील बंगाली जनतेबद्दल कमालीचा तिरस्कार आणि नीचभाव होता. लोकशाही मार्गाने बंगालींना पाकिस्तानच्या संसदेत बहुमत मिळाले; पण बंगाली आपल्यावर सत्ता गाजवतील हे पाकिस्तानच्या लष्करशहांना सहन करणे अजिबात शक्य नव्हते. या फालतूं बंगाल्यांना एकदाच कायमचा धडा शिकवणे सहज शक्य आहे अशा गुर्मीत पाकिस्तानचे लष्करशहा होते. पूर्व बंगालमध्ये कारवाई करायचे ठरले तिचे नावच होते ‘ऑपरेशन सर्चलाइट’. म्हणजे ‘प्रकाशझोतात शोधा आणि ठार मारा.’ तीन लाख बंगाली मारा म्हणजे बाकी बंगाली सुतासारखे सरळ होतील, असे याह्याखाननी पाकिस्तानी लष्कराला सांगितले होते. पाकिस्तानी लष्कराने हा हुकूम अंमलबजावणीत आणण्याचा प्रयत्न केला. परिणाम म्हणून निम्मा पाकिस्तान पाकिस्तान राहिला नाही, तो स्वतंत्र देश बनला. याबद्दल पुढचा वाईट भाग असा की, पाकिस्तानचे लष्करशहा या इतिहासातून अजूनही काही योग्य शिकलेले नाहीत. असहिष्णू हिंसाचारातून आपण सिंध, बलुचिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील जनतेला नमते घेण्यास भाग पाडू शकू, अशा भ्रमात ते आहेत. त्यातून उरल्या सुरल्या पाकिस्तानचे राष्ट्र म्हणून अस्तित्व धोक्यात येत आहे असे पाकिस्तानमधील विचारवंतांचे मत आहे.

भारतातील सध्याची वाढती असहिष्णुता ही शासनपुरस्कृत आहे.  ज्यांना भारतात असुरक्षित वाटते त्यांना पाकिस्तानचा रस्ता दाखवणे, निवडणुकीत आमचा पक्ष हरला तर पाकिस्तानात आनंद साजरा केला जाईल, असे सांगणे, असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी सरकारी सन्मान परत करणाऱ्यांना विरोधकांचे हस्तक म्हणणे, तुझ्या घरात गोमांस आहे, असे म्हणून गुंडांच्या गर्दीने नागरिकाचा खून करणे, विरोधी विचारवंतांचे दिवसाढवळ्या खून करणे, विरोधी तरुणांवर राष्ट्रद्रोहाचा आरोप करता यावा म्हणून त्यांच्या भाषणाच्या खोट्या फिती तयार करणे; हे सगळे शासनपुरस्कृत आहे असे उघड दिसत नाही. पण या सगळ्यांमागे एक निश्चित विचारसरणी आहे. ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आक्रमक, हिंसक व असहिष्णू विचारसरणी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ही सरकारची विचारसरणी आहे. ही असहिष्णुता कधी शासनपुरस्कृत उघड संघटित हिंसा बनेल याचा नेम नाही. तसे झाले तर भारत देश, भारत राष्ट्र धोक्यात येईल. असे काही विपरीत घडत नाही ना, हे बघण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि सत्तेतील वरिष्ठ नेत्यांची तर आहेच, पण तुमची-आमचीही आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके