डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ऑलिंपिक पाहण्याची गंमत वाढवायची असली, तर एक प्रयोग करा. म्हणजे कोणतीही स्पर्धा, शर्यत, सामना सुरू होण्याआधी आपला खेळाडू वा संघ कोणता ते ठरवा. अर्थात भारताचे खेळाडू मोजक्याच बारा विभागांत आणि हॉकी या एकाच सांघिक स्पर्धेत आहेत, तिथे तुम्ही निवड करालच. पण जिथे भारताचे खेळाडू वा संघ नसेल, तिथं एखादा संघ आपला म्हणून निवडला की आपोआपच आपण त्या सामन्याशी वेगळ्याच नात्यानं जोडले जातो. मग आपल्या खेळाडूंना उत्तेजन देणं, त्यांच्या कामगिरीला दाद देणं वगैरे गोष्टी आपोआपच होतात. अर्थात आपला ठरवलेला संघ समजा हरला तर पुढच्या फेरीत पुन्हा दोनांतला एक संघ आपला म्हणून दत्तक घेता येतो. त्यामुळं अंतिम सामन्यापर्यंत ही रंगत कायम ठेवता येते.

वाचकांच्या हातात हा अंक येईल तेव्हा लंडन ऑलिंपिक सुरू झाले असेल. उद्‌घाटन समारंभ हा तर सर्वांच्याच आवडीचा कार्यक्रम आणि दूरदर्शनही तो अगदी पूर्ण दाखवतं. कारण अर्थातच त्यातून मस्त मनोरंजन होतं. यात चूक काहीच नाही कारण आपल्याकडं दूरचित्रवाणीचा उपयोग मुख्यतः याच कारणासाठी केला जातो ना! पण आता खास खेळांसाठी वेगवेगळ्या वाहिन्या उपलब्ध असल्यानं बहुतेक ऑलिंपिक म्हणजे त्यातील सर्व स्पर्धा आणि शर्यती पाहता येऊ शकतात. अर्थात ज्यांना शक्य असेल त्यांनी ते अवश्य पाहावं. खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहते यांना हे सांगावं लागणार नाही. पण सर्वसामान्य प्रेक्षकांनीही, आपल्याला त्यातलं काय कळतंय, असं न म्हणता ऑलिंपिक पाहावं असं आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण एक तर आपल्याला त्यातलं काय कळतंय, असं वाटणं कसं चूक आहे, हे उमगेल. कारण पाहताना अरेच्चा, हे तर छानच आहे की, उगाचंच आपण टाळत होतो, असं वाटण्याची वेळ त्यांच्यावर येईल. 

कारण साधं आहे. अनेक वर्षे सातत्यानं सराव करणाऱ्या खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याचं हे एक व्यासपीठच असतं आणि आपल्याला दाद आणि अर्थातच यश मिळायलाच हवं, या दृष्टीनंच सर्व खेळाडू प्रयत्न करतात. खेळाडूच नाही तर संयोजकही हे आयोजन म्हणजे एक आव्हानच समजतात आणि अधिकारी, पंच, साहाय्यक सारेजणच आपल्याकडून काही त्रुटी राहू नये म्हणून झटत असतात. प्रेक्षक स्वतःलाही कसे विसरून या स्पर्धा, शर्यतींचा आस्वाद घेतात तेही पाहणं हा एक अनुभवच असतो. आणि त्यांच्याप्रमाणंच तो अनुभव सर्वांनी घ्यावा म्हणून हे आग्रहाचं सांगणं... ऑलिंपिक बघा, न विसरता पाहाच.

पूर्वीची गोष्ट वेगळी होती. भारताच्या हॉकी संघानं लागोपाठ सहा ऑलिंपिक सुवर्णपदकं मिळवली, पण त्या काळात दूरचित्रवाणी नव्हती आणि नभोवाणीही मर्यादित भागांपुरती होती. शिवाय त्या वेळी अशा खेळांच्या स्पर्धांना फारसं स्थान दिलं जात नसे. पण कालांतरानं दूरचित्रवाणी माध्यम उपलब्ध झालं, आणि थोड्या उशिरानं का होईना, सामने, स्पर्धा, शर्यती पाहता येऊ लागल्या. पण दुर्दैवानं तोवर भारतीय हॉकीची घसरण झाली होती आणि एखादा मिल्खासिंग वगळला तर ऑलिंपिकमध्ये रस घ्यावा, असं सर्वसामान्य लोकांना वाटतच नव्हतं. खेळाडू ऑलिंपिकला जात आणि हात हलवत परत येत. अर्थातच ऑलिंपिकचा फारसा गाजावाजा होत नव्हता. हे चित्र बदललं ते प्रथम 1964 चं टोकियो ऑलिंपिक थेट चित्रपट बनूनच आलं तेव्हा आणि चित्रपटगृहांमध्ये त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला, प्रेक्षकांच्याच आग्रहावरून हॉकी सामन्याचं सविस्तर चित्रण नंतर समाविष्ट केलं गेलं आणि त्यामुळं भारताच्या ऑलिंपिक हॉकी सुवर्णपदकाचा क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. 

दुर्दैवानं त्यानंतर भारताच्या हॉकीची अधोगती सुरू झाली आणि बाकी स्पर्धा, सामने आणि शर्यतींत पदक वगैरेची शक्यता नसल्यानं पुन्हा खेळांबाबतचा उत्साह थंडावला. अपवाद क्रिकेट, पण तो अपवाद होता त्याची पद्धशीरपणे जोपासली गेलेली आवड आणि प्रसिद्धी यामुळं. पण नंतर दूरदर्शनच्या रूपानं चित्रवाणी देशाच्या अनेक भागांत आल्यानंतर हे चित्र बघता बघता पालटलं. अनेक सामने, स्पर्धा, शर्यतींचं थेट प्रक्षेपण होऊ लागल्यावर प्रेक्षक त्यात गुंगून जाऊ लागले. माँट्रिअल ऑलिंपिकपासून आपल्याला दूरदर्शनच्या कृपेनं ऑलिंपिकमधील निवडक का असेना पाहायला मिळू लागलं. त्यामुळं अर्थातच गोडी लागू लागली. प्रेक्षक नादिया कोँसीच्या आकर्षणानं जिम्नॅस्टिक्स आवडीनं पाहू लागले, फुटबॉलसारख्या खेळात भारत किती कमी पडतो हे त्यांना सहज कळू लागलं. 

खेळाडूंना तर आता चित्रफिती उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळं त्यांना आपलं कौशल्य वाढवण्याची संधी मिळू लागली. अशा चित्रफितींचा परिणाम प्रेक्षकांवरही होत असे. परिणामी थोड्या प्रमाणात का असेना, भारतात आता खेळाडूंची दखल घेतली जाऊ लागली. एकच एक क्रिकेट हे चित्र थोडंसं का होईना बदललं. आणि कुवेत युद्धानंतर विविध वाहिन्या उपलब्ध झाल्यामुळं तर मोठाच फरक झाला. अन्य खेळांतही बघण्याजोगं बरंच काही असतं हे प्रेक्षकांना कळलं. 

इथं एक बाब सांगायला हवी. तो वाहिन्यांचा परिणाम म्हणा वा योगायोग. पण ऑलिंपिकचा प्रेक्षकवर्ग वाढला हे निश्चित. आणि ॲटलांटा ऑलिंपिकमध्ये लिअँडर पेसनं टेनिस एकेरीत ब्राँझपदक मिळवलं. खाशाबा जाधव यांच्या 1952 मधल्या कुस्तीतील ब्राँझ पदकानंतरचं हे पहिलंच वैयक्तिक पदक होतं... आणि नंतर 2000 मध्ये सिडनीला करणम्‌ मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये ब्राँझ पदक मिळवलं. पाठोपाठ 2004 मध्ये ॲथेन्सला तर राज्यवर्धन राठोडनं एक पाऊल पुढं टाकलं आणि देशाला पहिलंच वैयक्तिक रौप्यपदक मिळवून दिलं. (तशी भारताच्या नावावर दोन वैयक्तिक रौप्यपदकं आहेत, कारण 1900 सालच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत नॉर्मन प्रिटचार्ड हा भारताचा खेळाडू दुसरा आला होता अशी नोंद आहे. ते पहिलं रौप्य पदक. पण तसं पाहता तो काही भारतीय नव्हता. तो भारतात नोकरीसाठी आलेला होता आणि त्या वेळच्या प्रथेनुसार त्यानं भारतातूनच प्रवेशिका पाठवल्यानं त्याला भारताचा खेळाडू म्हणूनच प्रवेश मिळाला होता.) ...आणि गेल्या (2008 च्या) बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारतानं प्रथमच तीन वैयक्तिक पदकं मिळवली. अभिनव बिंद्रानं देशाचं पहिलंवहिलं सुवर्ण पदक मिळवलं आणि त्याला विजेंदरनं बॉक्सिंग आणि सुशीलकुमारनं कुस्तीत ब्राँझ पदक मिळवून साथ दिली. याचा परिणाम खूपच चांगला झाला. 

आधीच्या दिल्लीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि नंतरचं बीजिंग ऑलिंपिक पाठोपाठ झाल्यानं प्रथमच थोड्या कालावधीत दोन दर्जेदार स्पर्धा पाहण्यास मिळाल्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यात भारतानं चांगली कामगिरी केल्यानं खेळांबाबतची एकूण भावनाच बदलली. या क्षेत्रातही भवितव्य आहे, आपण यात करिअर करू शकतो ही भावना निर्माण झाल्यानं आणि अर्थातच भरघोस बक्षिसं मिळत असल्यानं खेळाडू अधिक जिद्दीनं प्रयत्न करू लागले. पालक आपल्या मुलांना आवर्जून खेळांसाठी पाठवू लागले. अगदी अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, रशिया वा युरोपीय देशांप्रमाणं नसेल, पण भारतात या क्षेत्राला थोडंफार महत्त्व प्राप्त झालं. आता लंडनला आपल्या खेळाडूंची कमाई यापेक्षाही अधिक पदकांची असेल, अशी रास्त अपेक्षा बाळगायला हरकत नाही. आणि त्यामुळंच आता क्रिकेटेतर खेळांचंही दर्शन दूरचित्रवाणीवर घेण्यात प्रेक्षकांना रस निर्माण झाला आहे.

लंडन ऑलिंपिक प्रक्षेपणाकडं सर्वजण नजर लावून बसले आहेत, हे अतिशय चांगलं आहे. कारण असे प्रेक्षक निर्माण झाले की त्याच्यातूनच आपल्या खेळाडूंचे चाहते निर्माण होऊन त्यांना जोरदार पाठिंबा मिळू लागेल. खेळाडूंना हे एक प्रकारचं टॉनिकच असतं आणि काहींच्या मते असे प्रेक्षक मनापासून- मग ते मायदेशातूनच का असेना- खेळाडूंच्या पाठीशी असले, की त्याचा फायदा खेळाडूंना मिळतोच मिळतो. कदाचित त्यांच्या पाठिंब्याच्या आठवणीनंच खेळाडूंना स्फूर्ती मिळत असेल. 

ऑलिंपिकची ज्यांना संधी मिळाली नाही, पण त्यासाठी तयारी करायची असेल आणि प्रत्येक खेळाडूची तशी इच्छा असायलाच हवी, तर त्या खेळाडूंनी ऑलिंपिक पाहायलाच पाहिजे. आपल्या खेळाच्या स्पर्धा पूर्णपणे ध्यान देऊन पाहिल्या की त्यांना आपण काय करतो आणि विजेते काय करतात हे पाहायला मिळेल, आपल्यातील त्रुटी उमगतील, काही नवी तंत्रं शिकता येतील आणि त्यांचं अनुकरण केलं तर आपलीही कामगिरी सुधारेल अशी आशा निर्माण होईल.नियमांचं पालन, खेळाची शिस्त, खेळाडूंची वागणूक आणि त्यांची विजय आणि पराजय स्वीकारण्याची रीत याकडेही लक्ष देता येईल. खेळाडू स्वतःची कामगिरी सुधारावी म्हणून स्वतःलाच उत्तेजन कसं देतात ते पाहता येईल. शूटिंगमध्ये नेमबाज, तिरंदाज प्रयत्नाआधी मनाची एकाग्रता व्हावी म्हणून काय करतात, कोणाची मदत घेतात वा एकटे राहणेच पसंत करतात या आणि अशाच अन्य अनेक बारीक सारीक गोष्टी खेळाडूंना शिकता येतील. 

सांघिक स्पर्धांत खेळणाऱ्यांना तर प्रत्यक्ष हालचाली करण्यापासून डावपेच, आणि बदलत्या परिस्थितीत ते कसे बदलले जातात ते पाहायचीही संधी आहे. आणि त्यांतून बरंच काही शिकता येण्याजोगं आहे. एकाच संघातील खेळाडूंची एक-दुसऱ्याबरोबर वागणूक कशी असते, एखाद्याची चूक झाली, तरी बाकीचे खेळाडू त्याला सांभाळून घेतात का दुर्लक्ष करतात, त्याचा परिणाम काय होतो अशा गोष्टींतून आपोआपच प्रगतीसाठी आवश्यक ज्ञान मिळत जाईल. जिम्नॅस्टिक्समधील तसंच तालबद्ध जलतरणातील खेळाडूंचा डौल, लय आणि सहज हालचालींना किती महत्त्व असतं ते कळेल आणि काहीवेळा थोडीशी चूक झाली, तरी त्यातून कसं साकारायचं हेही कळेल. तुम्ही सुरुवात करण्यासाठी कसे येता येथपासूनच गुण देण्याची प्रक्रिया सुरू होत असते, हे उमगेल आणि त्यामुळेच सुरुवात आणि शेवट योग्य प्रकारेच का करायचा याचं महत्त्वही ध्यानात येईल.

सूर मारण्याच्या, डायव्हिंग स्पर्धेतील खेळाडूंना 10 मीटर्सचा फलाट, एक वा तीन मीटर स्प्रिंगबोर्डवरून उडी घेतल्यानंतर पाण्यात पोहोचेपर्यंतच्या अगदी मोजक्या सेकंदांत किती गिरक्या आणि फिरक्या घेता येतात हे पाहिलं की अचंबित व्हायला होतं. त्यासाठी  किती मेहनत ते घेत असतील याची कल्पना करणंही अवघड जातं. या प्रकारात चीनला फारसं आव्हानच नाही, हे ऐकून आश्चर्य वाटतं पण त्यांचं कौशल्य पाहिलं की ते वाटेनासं होतं. पळणे, चालणे, जलतरण यांतील लहानमोठ्या आणि विविध प्रकारच्या शर्यती आणि अडथळ्यांचा समावेश असलेल्या हर्डल्स वा स्टिपलचेससारख्या शर्यतींतून तर अनेक गोष्टी शिकायला मिळतात. स्पर्धेची आखणी कशी करतात, वेग कधी वाढवतात, कधी वेग मुद्दाम कमी-जास्तही कसा केला जातो असे डावपेचांचे भागही महत्त्वाचे असतात. 

मोठ्या अंतरांच्या शर्यतींत एकाच देशाचे खेळाडू असतील, तर ते एकमेकांना साहाय्यभूत कशा प्रकारे होतात ते पाहण्यासाठी केनियाच्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित करायला हवं. जो आपला सर्वांत चांगला खेळाडू आहे, त्याला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल हे पाहिलं जातं. तसंच प्रतिस्पर्ध्यांचं लक्ष विचलित कसं होईल याकडेही लक्ष पुरवलं जातं. प्रशिक्षकांनाही अनेक बाबींकडं बारकाईनं पाहावं लागेल. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील भावबंध, खेळाडूला जाणून घेण्याची प्रशिक्षकाची कुवत, त्याला अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रवृत्त कसं करायचं, त्याची मनोवृत्ती प्रसन्न कशी राहील आणि ध्येयावरून त्याचं लक्ष जराही हलणार नाही याकडं कसं ध्यान दिलं जातं, हे पाहण्याजोगं असतं. स्पर्धा चालू असेतोवर आपला आनंद वा निराशा प्रकट न करण्याचं काम प्रशिक्षकाला करावं लागतं. कारण त्याचा खेळाडूवर परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः जिम्नॅस्टिक्स वा सूर मारण्याच्या स्पर्धांत हे जाणवतं. अखेरच्या क्षणापर्यंत खेळाडूला प्रोत्साहन कसं दिलं जातं आणि खेळाडू प्रशिक्षकाच्या सूचना कशा मनापासून ऐकतात ते बॅडमिंटन, टेनिस आणि टेबलटेनिससारख्या स्पर्धांत समजतं.

बाहेरूनही खाणाखुणा कशा केल्या जातात ते बघण्याजोगं असतं. धावण्याच्या वा पोहण्याच्या शर्यतीच्या वेळीही अशा युक्त्या योजल्या जातात. त्यासाठी काही खुणा ठरवण्यात येतात. प्रत्येक खेळाडू हा एक वेगळा, स्वतंत्र माणूस आहे हे कळतं. सर्वजण सारख्याच पद्धतीनं कोणतीही गोष्ट करत नाहीत. कारण त्यांच्या शरीराची रचना वेगळी असते. कुणाचं सामर्थ्य कशात आहे, हे प्रशिक्षकानं पाहायला हवं. हुसेन बोल्टसारखा खेळाडू त्याच्या लांब पायांचा फायदा कसा उठवतो, किंवा मायकल जॉन्सन न वाकताही त्याच्या खास शैलीत धावून विक्रम कसे नोंदवायचा, त्याला कुणी ती प्रथमदर्शनी चुकीची वाटणारी शैली बदलायलाही सांगितलं तरी त्यानं आणि त्याच्या प्रशिक्षकानं त्यांना दाद कशी दिली नाही, एडविन मोझेस नावाप्रमाणंच अगदी हुशारीनं शर्यतीची आखणी कशी करायचा, हे प्रशिक्षकांनी सतत डोळ्यापुढं ठेवलं पाहिजे. 

ऑलिंपिकचं ब्रीदच मुळी अधिक उंच, अधिक वेगानं आणि अधिक मजबूत हे आहे. त्यामुळंच ऑलिंपिक म्हटलं की आपोआपच काहीतरी खास, भव्य, उदात्त असं काहीसं वाटू लागतं. नेहमीपेक्षा वेगळं आणि तरीही खूप मोलाचं असं काहीतरी. त्यामुळंच प्रत्येक खेळाडूला जसं ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी असं वाटतं, त्याप्रमाणंच खऱ्या क्रीडाप्रेमींनाही एकदा तरी ऑलिंपिक बघावं असं वाटतं. अर्थात ते जगभरातल्या फक्त काही हजारांनाच शक्य असतं.

पण आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं अगदी घरबसल्या आणि आरामात ऑलिंपिक पाहता येतं. चित्रफिती, सीडी, डीव्हीडीच्या साहाय्यानं पुन्हा पुन्हा पाहता येतं आणि खेळाडूंसाठी तर हे वरदानच आहे, कारण ज्यांना कारकीर्द पुढं चालू ठेवायची आहे, त्यांना आपल्याच कामगिरीचं विश्लेषण करणं शक्य होतं. कुठे चुकलो ते कळतं आणि अर्थातच सुधारण्याची संधी मिळते. प्रतिस्पर्ध्यांच्या बलवान तसेच कमकुवत बाबींची माहिती होते. हे सारं प्रशिक्षक आणि खेळाडू यांनी एकत्र पाहिलं तर त्यांचा खेळ व कामगिरी सुधारण्यास नक्कीच मदत होते.

ऑलिंपिक पाहण्याची गंमत वाढवायची असली, तर एक प्रयोग करा. म्हणजे कोणतीही स्पर्धा, शर्यत, सामना सुरू होण्याआधी आपला खेळाडू वा संघ कोणता ते ठरवा. अर्थात भारताचे खेळाडू मोजक्याच बारा विभागांत आणि हॉकी या एकाच सांघिक स्पर्धेत आहेत, तिथे तुम्ही निवड करालच. पण जिथे भारताचे खेळाडू वा संघ नसेल, तिथं एखादा संघ आपला म्हणून निवडला की आपोआपच आपण त्या सामन्याशी वेगळ्याच नात्यानं जोडले जातो. मग आपल्या खेळाडूंना उत्तेजन देणं, त्यांच्या कामगिरीला दाद देणं वगैरे गोष्टी आपोआपच होतात. अर्थात आपला ठरवलेला संघ समजा हरला तर पुढच्या फेरीत पुन्हा दोनांतला एक संघ आपला म्हणून दत्तक घेता येतो. त्यामुळं अंतिम सामन्यापर्यंत ही रंगत कायम ठेवता येते. 

न्यूझीलंडच्या एका चाहत्यानं याबाबत छान उत्तर दिलं होतं. तू कोणाला पाठिंबा देतोस, असं विचारल्यावर त्यानं म्हटलं होतं- ‘प्रथम न्यूझीलंडला आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणाऱ्या कुणालाही.’  न्यूझीलंड ऑस्ट्रेलियातील वैर त्यानं असं प्रकट केलं होतं. पण आपल्या उपखंडाची बाब वेगळीच आहे. प्रथम आपण आपल्या देशाला, नंतर शेजाऱ्यांना, नंतर आशियाई देशांना पाठिंबा देत असतो आणि यापैकी कुणीच नसेल तर मग ‘साहेबा’विरुद्ध खेळणाऱ्या कुणालाही! खरं ना? 

तर आता ऑलिंपिक बघायचं तर आहेच, ते मनापासून पाहा. त्याचा आनंद, मौज लुटा, जय पराजयाची अनुभूती घ्या आणि बघा रोजच्या आयुष्यातही तुम्हाला कसं वेगळं ताजंतवानं वाटू लागतंय ते. तुम्हांला कळणारही नाही तुम्ही क्रीडाप्रेमी कधी बनलात ते.  म्हणून म्हणायचं, आधी ऑलिंपिक बघा, मग (कुणी सांगितलं नाही तरी) बघतच राहाल! 

Tags: अंतिम सामना संघ कामगिरी खेळाडू ऑलिंपिक क्रीडाप्रेमी final match team performance athletes olympics sports enthusiast weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके