डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ऑलिंपिक : अपेक्षेनुसार संमिश्र सुरुवात

अगदी स्पर्धेच्या वेळेपर्यंत काम चालू असल्याबद्दल राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी भारतावर टीका करणाऱ्यांच्या देशातही तसाच प्रसंग अनुभवायला लागावा, ही बाब विचित्रच म्हणायची. दुसरी गोष्ट म्हणजे पैशासाठी पुरस्कर्ते शोधायचे यात वावगे काही नाही. त्यांनी तिकिटांची मागणी करण्यातही काही चूक नाही. नव्हे तो त्यांचा हक्कच आहे, असेही मान्य करता येईल. पण यातील वाईट बाब या ऑलिंपिकमध्ये आढळली. म्हणजे असे की, या पुरस्कर्त्यांना बरीच तिकिटे दिल्यानंतर आयोजकांना सामान्य, खऱ्याखुऱ्या जाणकार प्रेक्षकांसाठी फारच थोडी तिकिटे उपलब्ध करून देता आली, हे आपण समजू शकतो. पण हे समजत नाही की, आपण घेतलेली तिकिटे कोणी वापरणार नाही हे पुरस्कर्त्यांना कसे कळले नाही? की मुद्दामच त्यांनी ही चाल केली?  

लंडन ऑलिंपिक हा आता चर्चेचा विषय असणार आहे. ऑलिंपिक सुरू होऊन तीन दिवसच झाले असले, तरी आता त्यात अधिकाधिक रंगत येऊ लागणार आहे. हा लेख लिहीत असतानाच्या घटनांवर नजर टाकली तर भारतीय खेळाडूंची कामगिरी अपेक्षेनुसारच होत असल्याचे आढळून येते. म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण पदकाच्या अपेक्षा बाळगल्या आहेत, ते बऱ्याच प्रमाणात आगेकूच करीत आहेत आणि काही जण खरोखरच वारी करून परतणार आहेत.

निराशा केली ती प्रामुख्याने बॅडमिंटनमध्ये मिश्र स्पर्धेतील ज्वाला गुट्टा आणि द्विजू या जोडीने. मोठ्या स्पर्धांचा त्यांना चांगला अनुभव आहे तरीही त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. लागोपाठ दोन सामने हरल्याने त्यांचे आव्हान आता संपल्यातच जमा आहे.

थोड्या प्रमाणात तिरंदाजांनीही सांघिक स्पर्धेत अंतिम फेरी न गाठल्याने हळहळ वाटते, कारण निदान महिला संघ तरी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. अर्थात भारताच्या या संघातही दोन खेळाडू अव्वल दर्जाच्या आहेत आणि तिसरी त्या मानाने कमी पडली आणि बाँबयला देवी, दीपिका कुमारी या दोघींच्या चांगल्या कामगिरीनंतरही चेक्रोवोलू स्वुरोची कामगिरी एकदमच कमी प्रतीची झाली. अखेरच्या प्रयत्नात तिने दहापैकी पाचच गुण मिळवले, त्यामुळे भारतीय संघाला एक गुण कमी पडला.

टेबल टेनिसमध्ये सौम्यजित घोषने पहिली फेरी पार केली आणि तो नंतरच्या फेरीत पराभूत झाला. बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंग, जय भगवान तसेच बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि कश्यप यांनी आगेकूच केली आहे. वल्हवण्याच्या नौकांच्या स्कल प्रकारात स्वर्णसिंग विर्कने उपान्त्यपूर्व फेरी गाठून चांगली कामगिरी नोंदवून अपेक्षा वाढवल्या आहेत. नेमबाजीत 10 मी.च्या पिस्तोल प्रकारातील पुरुष-महिलांचे आव्हान संपले आहे. आता सारे लक्ष अर्थातच अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग यांच्यावर केंद्रित झाले आहे.

टेनिसच्या जोड्यांचे सामनेही आता सुरू होत आहेत. (हा अंक वाचकांच्या हातात येईपर्यंत या सर्वच स्पर्धांचे अंतिम निकाल हाती आलेले असतील, कारण ती वेळ ऑलिंपिकची सांगता होण्याची असेल.) त्यामुळे आता एकूण स्पर्धेकडे पाहायचे. बीजिंगमध्ये चीनने सर्वाधिक, म्हणजे 51 सुवर्णपदके मिळवून अमेरिकेला मागे टाकले होते. त्या वेळी अमेरिकेला एकूण 110 पदके मिळाली, त्यावरच समाधान मानावे लागले. पण त्यांच्या सुवर्णपदकांची संख्या चीनपेक्षा खूपच कमी होती.

मायदेशात ऑलिंपिक भरविल्याचा फायदा चीनने पुरेपूर उठवला होता हे खरेच, पण ऑलिंपिकमध्ये 1984 मध्ये प्रथमच सहभागी झाल्यापासून चीनच्या सुवर्णपदकांची संख्या दर वेळी वाढतच गेली आहेः

1984 लॉस एंजेलिसः 15,

 1988 सोलः 5 (हा एकमेव अपवाद),

 1992 बार्सिलोनाः 16,

1996 ॲटलांटाः 16,

2000 सिडनीः 28,

 2004 ॲथेन्सः 32,

 आणि 2008 बीजिंगः 51.

म्हणजे एकविसाव्या शतकातील त्यांच्या कामगिरीतील सुधारणा थक्क करणारी आहे.

आता यंदा स्पर्धा चीनबाहेर होत असल्याने त्यांची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेवरील आघाडी ते यंदाही कायम राखतात का हा उत्सुकतेचा प्रश्न आहे. निदान सुरुवातीला तरी चीनने जणू बीजिंगपासूनच पुढे कामगिरी केल्यासारखे वाटावे अशी परिस्थिती आहे. कारण त्यांनी 6 सुवर्णपदकांसह एकूण 11 पदके संपादन केली आहेत. त्यामुळेच बीजिंगमधील यश हे काही अनपेक्षित नव्हते हेच जणू सिद्ध करण्यासाठी ते लंडनला आले असावेत असे वाटते. अमेरिकेची कमाई तीन सुवर्णपदकांसह 8 पदकांची आहे. त्यांचा प्रयत्न पुन्हा एकदा आपले ऑलिंपिकमधील वर्चस्व सिद्ध करून दाखवण्याचा असेल.

कारण सोविएत युनियनच्या विघटनानंतर त्यांना तसा कडवा प्रतिस्पर्धी आता पुन्हा एकदा लाभला आहे. तिसऱ्या क्रमांकावर इटली असून त्यांनी 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 ब्राँझ अशी सात पदके मिळवली आहेत. आश्चर्याची बाब अशी की, यजमानांना अद्याप खातेही खोलता आलेले नाही.

एक नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे चीनने जलतरण स्पर्धेत सुरुवातीलाच अनपेक्षितपणे दोन सुवर्णपदके मिळवली आहेत. महिलांची 400 मी. वैयक्तिक मिडले शर्यत शिवेन ली हिने विक्रमी वेळ नोंदवून जिंकली (4 मि.28.43 से.) तर त्यांच्याच सुन यांग यानेही 400 मी. फ्रीस्टाइल शर्यतीचे सुवर्णपदक मिळवताना 3मि.40.14 से. वेळ नोंदवून ऑस्ट्रेलियाच्या इयान थॉर्पचा विक्रम मागे टाकला.

ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारा चीनचा तो पहिलाच पुरुष जलतरणपटू आहे. म्हणजे येथून पुढे तलावावरील सर्वांनाच चीनच्या स्पर्धकांकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. चीनच्या दृष्टीने ही सुवर्णपदके म्हणजे बोनसच असेल. अर्थात डायव्हिंगमध्ये त्यांची बऱ्याच प्रमाणात मक्तेदारी आहेच.

अमेरिकेचा विक्रमवीर जलतरणपटू मायकेल फेल्प्स याला 400 मी. वैयक्तिक मिडले शर्यत लागोपाठ तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये जिंकायची होती. पण त्याचा नेहमीचा प्रतिस्पर्धी आणि त्याच्याच संघातला रायन लॉश्तेने तीमध्ये विजय मिळवला. फेल्प्सला आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवता आली नाही आणि त्यामुळे रायनचे या शर्यतीत सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न साकार झाले.

रायनने नोंदलेली वेळ 4 मि. 5.18 से. होती. फेल्प्सचा विक्रम मात्र कायम राहिला. तो 4 मि. 3.84 से.चा आहे. पण यावेळी त्याने 4 मि. 9.28 से. अशी वेळ नोंदवली व त्यामुळेच त्याला पहिल्या तीन क्रमांकांतही स्थान मिळवता आले नाही, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण ज्या पातळीवर अनेकदा एक दशांश वा एक शतांश सेकंदाचा फरकही महाग पडू शकतो, तेथे हा फरक प्रचंडच समजायला हवा. त्यामुळेच त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

अर्थात अजूनही त्याच्या सहा शर्यती बाकी आहेत. त्यामुळे आपल्या एकूण सुवर्णपदकांची संख्या तो 14 वरून किती पुढे नेतो याकडेच सर्वांचे लक्ष असेल. त्याने आणखी कोणतीही तीन पदके मिळवली तरी तो एकूण 18 पदके मिळवण्याचा जिमनॅस्ट लारिसा लॅटिनीनाचा विक्रम मागे टाकू शकेल. तिने 1956 मेलबर्न, 1960 रो आणि 1964 टोकियो अशा तीन ऑलिंपिक्समध्ये 9 सुवर्ण, पाच रौप्य आणि चार ब्राँझ पदके मिळवली होती.

फेल्प्सने आजवर 14 सुवर्ण 1 रौप्य आणि 1 ब्राँझपदक मिळवले आहे. ती सर्व बीजिंग ऑलिंपिकमधील त्याची कमाई आहे. खेळांबाहेरील कारणांनी भारत गाजतो असे अनेकदा घडले आहे, म्हणजे स्पर्धेच्या ठिकाणीच चाचणी घेऊन संघाची निवड करण्याचा प्रकार सोलला, महिला धावपटूंच्या बाबतीत 4 द 400 मी. रीले संघाबाबत झाला होता.

गेल्या वेळी पथकप्रमुखांना आपल्या पहिल्यावहिल्या वैयक्तिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचेच नाव नीट माहीत नव्हते. तसाच एक प्रकार सध्या चर्चेत आहे. मानाच्या समजल्या जाणाऱ्या उद्‌घाटनाच्या आधीच्या संचलनाचे वेळी भारतीय ध्वजधारकाच्या शेजारूनच एक निळी जीन आणि लाल टॉपमधील महिला चालली होती.

गणवेशातील पथकावर आणि एकूणच साऱ्या दिमाखदार सोहळ्यावर त्यामुळे डाग पडल्यासारखेच वाटत होते. याबाबत आयोजकांकडे तक्रार करण्यात आली, हे योग्यच आहे. पण संचलनास सुरुवात होण्याआधीच ही बाब कुणाच्याच लक्षात आली नसेल, हे कसे शक्य आहे? मग त्याबाबत कुणीच काही हरकत कशी घेतली नाही? तिच्या तिथे येण्याबाबत कुणाला काही शंकाही आली नसेल, तर ती धोक्याची गोष्टच म्हणायला हवी.

आपल्या खेळाडूंची सुरक्षेबाबत एवढी बेफिकिरी का असावी, असाही वेगळाच प्रश्न पडतो. नेमके भारतीय पथकाच्या बाबतीतच हे कसे होते? आणि दुर्दैवाने ती महिला नुसती भारतीयच नाही तर थेट भारतातूनच बंगलोर येथून आलेली असावी आणि तिला असा अगोचरपणा करावासा का वाटावा, हा खरे तर मानसशास्त्रज्ञांनी अभ्यासण्याजोगा प्रश्न आहे.

कोणत्याही प्रथांची चाड न ठेवण्याची ही वृत्ती, नियम न पाळण्याच्या वृत्तीएवढीच घातक आहे. आपल्या देशाला मान खाली घालायला लावणारे हे कृत्य. आता काहीही समर्थन करण्यात आले, तरी ते योग्य ठरणारच नाही. दुसरी बाब अशी की, ऑलिंपिक स्टेडियममध्ये प्रत्यक्ष राणीच्या उपस्थितीतही अशी ढिसाळ व्यवस्था असेल, तर ऑलिंपिक नीटपणे होऊ न देण्याच्या अतिरेक्यांच्या धमक्या मिळाल्यावर यजमानांनी काय उपाययोजना केली आहे असा प्रश्न पडतो.

अगदी स्पर्धेच्या वेळेपर्यंत काम चालू असल्याबद्दल राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी भारतावर टीका करणाऱ्यांच्या देशातही तसाच प्रसंग अनुभवायला लागावा, ही बाब विचित्रच म्हणायची. दुसरी गोष्ट म्हणजे पैशासाठी पुरस्कर्ते शोधायचे यात वावगे काही नाही. त्यांनी तिकिटांची मागणी करण्यातही काही चूक नाही. नव्हे तो त्यांचा हक्कच आहे, असेही मान्य करता येईल. पण यातील वाईट बाब या ऑलिंपिकमध्ये आढळली.

म्हणजे असे की, या पुरस्कर्त्यांना बरीच तिकिटे दिल्यानंतर आयोजकांना सामान्य, खऱ्याखुऱ्या जाणकार प्रेक्षकांसाठी फारच थोडी तिकिटे उपलब्ध करून देता आली, हे आपण समजू शकतो. पण हे समजत नाही की, आपण घेतलेली तिकिटे कोणी वापरणार नाही हे पुरस्कर्त्यांना कसे कळले नाही? की मुद्दामच त्यांनी ही चाल केली? याबाबतही चौकशी व्हायला हवी. अशा दर्जेदार स्पर्धांसाठी प्रेक्षागृह रिकामे पाहावे लागावे, यासारखे दुर्दैव नाही. रिकाम्या खुर्चा पाहून तिकिटे ज्यांना मिळाली नाहीत, संपली आहेत, असे सांगितले गेले त्या प्रेक्षकांनी किती शिव्याशाप दिले असतील याची कल्पनाही करता येत नाही.

आता म्हणे यावर उपाय म्हणून सैनिक आणि विद्यार्थ्यांना रिकाम्या आसनांवर बसता येणार आहे, काही ठिकाणी तशी सुरुवातही झाली आहे. पण हेही आधीच केले असते, तर यजमानांना खाली मान घालावी लागली नसती. आपली प्रायोजक शरणता बोलून दाखवावी लागली नसती. शेवटी काय की आपण आपल्या देशात ज्या बाबींना नावे ठेवली, त्याच गोष्टी या ऑलिंपिकमध्येही आढळत आहेत. तेही खरेच म्हणा. कारण हे ऑलिंपिक साहेबांच्या देशात होत आहे. आणि ...आपण तर साऱ्या गोष्टी साहेबाकडूनच शिकलो आहोत ना!

Tags: सुवर्णपदक जलतरण टेनिस नेमबाजी ऑलिंपिक Gold Medal Swimming Tennis Shooting Olympics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके