डिजिटल अर्काईव्ह

एखादी गाय कोणी कसायाकडे वा कत्तलखान्यात घेऊन जात आहेत अशा केवळ संशयावरून गोप्रेमींचे माथे भडकते. पण आता याबाबत त्यांचे रक्त थंड पडले काय, की या दोन राज्यांत सत्तेवरील लोकांना दुखावले तर आपल्यावर कारवाई होईल किंवा आपली कुमक बंद पडेल अशी भीती त्यांना वाटते आहे? पण त्यांनी केवळ संशयावरून माणसं मारलेल्यांच्या संख्येच्या अनेक पट मेलेल्या गोमातांची संख्या असताना ते काहीच प्रतिक्रिया का देत नाहीत? का त्यांना वरिष्ठांकडून तसा आदेश देण्यात आलेला आहे? आमच्या राज्यात सर्व काही चांगल्याप्रकारे चालले आहे, असे या राज्याच्या सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच सांगण्यात येते.

साधारण आठ दिवसांपूर्वी, म्हणजे 26 ऑगस्टला इंडियन एक्स्प्रेस (पुणे) मध्ये एक बातमी होती. ती वाचताच दचकायला झाले. ती होती रेल्वे मार्गांवर मरणाऱ्या जनावरांबाबत. त्यांमध्ये देशी गायींचे प्रमाण खूपच जास्त आहे. हे मृत्यू गाडीच्या इंजिनाची धडक बसल्याने वा गाडीखाली सापडून झालेले असतात. अधूनमधून अशा अपघाताने गाडीला उशीर झाल्याची बातमी आपण वाचतो. पण जास्त माहिती आपल्याला नसते, या बातमीमुळे ती मिळाली. गेल्या दोन वर्षांत अशा मृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 2015-16 या वर्षातील 2,183 वरून ते यंदाच्या आर्थिक वर्षाच्या म्हणजे मार्च अखेरपर्यंत 10,382 पर्यंत म्हणजे 362 टक्क्यांनी हे प्रमाण वाढले आहे. या एप्रिलपासून इंजिनची धडक बसून एकूण 6,900 जनावरे दगावली आहेत. गतसालापेक्षा हे प्रमाण 112 टक्क्यांनी जास्त आहे.

आाश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या दोन राज्यांत गोभक्त आणि त्यांनी गोप्रेमापोटी केलेल्या मनुष्य हत्यांचे प्रमाण मोठे आहे, त्या मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशाचा यात मोठा वाटा आहे. अशा अपघातांत मरणाऱ्या गायींचे प्रमाण या दोन राज्यांत प्रत्येकी 18 टक्क्यांवर आहे. म्हणजे देशातील एकतृतीयांश गायी या दोन राज्यांत मरण पावत आहेत. याच दोन राज्यांत तीन वा चार महिन्यांनीच निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच प्रश्न पडतो की, ते सारे गोभक्त गेले कुठे? कारण यांबाबत आजवर तरी कुठे काही प्रतिक्रिया, वाद, निषेधमोर्चे, आरोप आणि प्रत्यारोप असे काहीच घडलेले नाही. बरे या बातमीत दिलेली आकडेवारी रेल्वे खात्याकडून मिळालेली आहे. उत्तर मध्य रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे यांनी पुरवलेली ही आकडेवारी आहे.

एखादी गाय कोणी कसायाकडे वा कत्तलखान्यात घेऊन जात आहेत अशा केवळ संशयावरून गोप्रेमींचे माथे भडकते. पण आता याबाबत त्यांचे रक्त थंड पडले काय, की या दोन राज्यांत सत्तेवरील लोकांना दुखावले तर आपल्यावर कारवाई होईल किंवा आपली कुमक बंद पडेल अशी भीती त्यांना वाटते आहे? पण त्यांनी केवळ संशयावरून माणसं मारलेल्यांच्या संख्येच्या अनेक पट मेलेल्या गोमातांची संख्या असताना ते काहीच प्रतिक्रिया का देत नाहीत? का त्यांना वरिष्ठांकडून तसा आदेश देण्यात आलेला आहे? आमच्या राज्यात सर्व काही चांगल्याप्रकारे चालले आहे, असे या राज्याच्या सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच सांगण्यात येते. प्रत्यक्षात अनेक बाबी उजेडात आल्या तरी त्यावर चर्चा होऊ दिली जात नाही, काहीही चौकशी न करता सर्वांना क्लीनचीट देण्यात येते. अशीच एक गंभीर बातमी काही महिन्यांपूर्वी आली होती. कसायाकडे नेण्यात येणाऱ्या गुरांना अडवून त्यांना हत्येपासून वाचवण्यात यश आल्यावर, त्या सुटका करण्यात आलेल्या गायींची व्यवस्था करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पांजरपोळातील दोनशेवर गायी गैरव्यवस्थेने, उपासमारीने मेल्याची ती बातमी होती. पण ना त्याबाबत सरकारने काही पावले उचलली, ना गोरक्षकांनी कोणावर हल्ला चढवला. कारण अर्थातच तो पांजरपोळ त्यांच्याच लोकांचा होता आणि मोठा गाजावाजा करून त्याला प्रसिद्धी देण्यात आली होती. आपण किती मोठे काम या गोमातांसाठी करतो आहोत हे दाखवण्याचा तो एक प्रयत्न/जुमलाच होता. कारण नंतर त्याबाबत एक अक्षरही कुठे प्रसिद्ध होऊ दिले गेलेले नाही.

उत्तर मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात एप्रिलपासून 1300 गुरे दगावली आहेत. गतसालाच्या 349 या आकडेवारीपेक्षा यंदा 271 टक्के वाढ झाली आहे. रेल्वेमार्गावर मरणाऱ्या गायींबाबत बोलताना प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन ऑफ पंजाबचे अध्यक्ष दलजितसिंग म्हणतात, ‘रेल्वेमार्ग आणि रस्त्यांवर अपघातात होणारे जनावरांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्या मृत जनावरांत बहुतेक गायींचाच समावेश आहे. या गायी दूध देण्याचे बंद झाल्यानंतर कुठेही भटकत असतात. त्या बहुतेक देशी जातीच्याच असतात. येणाऱ्या वर्षांत हा प्रश्न अधिकच व्यापक बनणार आहे. ही गोहत्याच नाही काय?’

दुभती जनावरे भाकड झाल्यावर त्यांना चरण्यासाठी सोडून देण्यात येते, रेल्वेमार्ग सफाईच्या कामगारांनी कितीही प्रयत्न केले तरी, अशा गायी रेल्वेमार्गावर येणे बंद होत नाहीत, ते तरी कुठे कुठे पुरे पडणार? कारण मार्गाच्या बाजूला कुंपणच नसते. आणि अशा मार्गांची लांबीही प्रचंड आहे. या गुरांवर कुणाचीही देखरेख नसते आणि त्यानेच हा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचाही याला दुजोरा आहे. अनेकदा अशा धडकांनंतर इंजिनेही नादुरुस्त होतात. आणि रेल्वेचे नुकसान होते, प्रवाशांचाही खोळंबा होतो. असे असेल तर गोहत्याबंदीने साधले काय? असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना अशी गुरे विकून मिळणाऱ्या काही हजार रुपयांवर पाणी सोडावे लागले. उलट ती पोसण्यासाठी पदरमोड करावी लागते आणि ती करण्याची ऐपत अनेकांची नसते. ती गुरे खरेदी करणारे बेकार झाले, हलाखीच्या स्थितीतील लोकांना कमी किंमतीत मिळणारे मांस बंद झाले, कातडी कमावणाऱ्यांचे काम बंद झाले आणि कातड्याशी संबंधित उद्योगांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावे लागले. अर्थात यात कोण कोणत्या जातीधर्माचे हा विचार करण्याचे कारण नाही, कारण नुकसान कुणाचेही झाले तरी ते नुकसानच असते! ते होऊ नये यासाठी उत्तर शोधून काढावे लागते. पण तसे करताना कुणीच दिसत नाही, हीच दुर्दैवाची बाब आहे. तरीही आम्ही गो-माता पूजक, गोप्रेमी आणि गोभक्त आहोत.

Tags: इंडियन एक्सप्रेस गोरक्षक गोहत्या यु पी गोरक्षक UP gorakshak Indian Express gorakshak gohatya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी