डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पदकांची शर्यत अमेरिका आणि चीन यांच्यात असेल असे आपण म्हटलेच होते. तशी ती झाली आणि अमेरिकेने पुन्हा पहिला क्रमांक मिळवला. 46 सुवर्ण, 29 रौप्य आणि 29 ब्राँझ अशी 104 पदकांची कमाई त्यांनी केली. चीनला अनुक्रमे 38, 27 आणि 22 अशी 87 पदके मिळाली. चीनने गेल्या वेळी बाजी मारली त्यात त्यांच्याच देशात ऑलिंपिक होण्याचा मोठा वाटा होता, हे आता ते दुसऱ्या क्रमांकावर गेल्याने स्पष्ट झाले आहे. असा फायदा यजमान देशाला होतोच. ब्रिटनने या वेळी 29 सुवर्णांसह 64 पदके मिळवून हीच बाब अधोरेखित केली. आता पुढच्या ऑलिंपिकमध्ये ब्राझील यंदाच्या 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 ब्राँझपदकांत किती सुधारणा करतो ते पाहायचे.

लंडन ऑलिंपिक संपले. आता प्रतीक्षा चार वर्षांनी ब्राझीलमधील रिओ द जानिरो येथे होणाऱ्या ऑलिंपिकची. आपल्या खेळाडूंनी मिळवलेल्या दोन रौप्य आणि चार ब्राँझ पदकांच्या खुशीत असताना, एकदम चार वर्षांनंतरची गोष्ट कशाला असा विचार अनेकांच्या मनात येईल. आणि नेमक्या याच विचाराने आपल्याला आजपर्यंत ग्रासलेले असल्यामुळे आधीपासून नियोजन हा प्रकारच दुर्मिळ असे. पण बीजिंगला एक सुवर्ण आणि दोन ब्राँझपदके मिळाल्याने आपल्या ध्यानात नियोजनाचे महत्त्व, काही प्रमाणात का असेना, आले आहे.

आता जुनीच गोष्ट सांगायची तर, याच लंडनमध्ये 1948 च्या ऑलिंपिकमध्ये खाशाबा जाधवांनी फ्लायवेट म्हणजे 52 कि. गटात सहावा क्रमांक मिळवला होता आणि परतल्यानंतर त्यांनी पुढच्या ऑलिंपिकमध्ये पदक मिळवायचेच या निश्चयाने तयारी केली होती. त्यामुळेच हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये त्यांना वरच्या गटात, 57 कि. खेळावे लागले तरी त्यांनी ब्राँझपदक मिळवले होते.

म्हणजेच आजवर संतुष्ट न राहता पुढचा विचार करणे चांगले. म्हणूनच कौतुक आणि सत्कार हवेतच, तरी त्यांतच खेळाडूंनी गुंतून पडू नये. निदान ज्यांची कारकीर्द आणखी बहरायची आहे, अशांनी तर नाहीच. योगायोग असा की खाशाबांचा कित्ता सुदेश कुमार (66 कि.गट) आणि योगेश्वर दत्त (60 कि. गट) या मल्लांनीच गिरवला. बीजिंगला सुदेशला ब्राँझपदक तर योगेश्वरला चौथा क्रमांक मिळाला होता.

तेव्हापासूनच या दोघांनी यापेक्षाही चांगली कामगिरी आपण करू शकतो, हे दाखविण्याचा ध्यास घेतला होता. आणि त्या जिद्दीने आणि तडफेनेच त्यांनी लंडनला खेळ केला. त्यासाठी चार वर्षांच्या तयारीची जोड होती हे खरेच. पण कितीही अभ्यास केला तरी ऐन परीक्षेच्या वेळी पेपर लिहिताना काही आठवलेच नाही तर कितीही हुशारी असली, तरी ती निरुपयोगीच ठरते. तसेच स्पर्धांसाठी तयारी कितीही केली, तरी प्रत्यक्ष सामन्यावेळी तिचा उपयोग व्हावयास पाहिजे हे महत्त्वाचे, हे ओळखल्यासारखे ते खेळले व त्याप्रमाणे त्यांनी डावपेचांचा उपयोग केला.

सुदेशकुमारला गेल्या वेळी रिपचेजमुळे (दुसऱ्या संधीमुळे) ब्राँझपदकाची संधी मिळाली होती. पण यावेळी त्याने तशी वेळच येऊ दिली नाही. अंतिम फेरीपर्यंत तो जिंकतच गेला. पण उपांत्य सामन्यानंतर त्याला अचानक उलट्या-जुलाबांचा त्रास झाला आणि अर्थातच त्याचा त्याच्यावर परिणाम झाला. त्याने कुस्ती केली नसती तरी चालले असते, पण त्याने कुस्ती केली. मन लावून केली. पण मनाची उभारी कायम असली, तरी शरीराची मर्यादा संपली होती. त्यामुळे त्याने उपान्त्य सामन्यात केलेला डाव वापरूनच जपानी मल्लाने त्याच्यावर मात केली. त्याला प्रत्युत्तर देण्यास वेळ नव्हता आणि तेवढी ताकदही उरली नव्हती. तरीही त्याने गेल्या वेळेपेक्षा कामगिरीत सुधारणा केली.

बीजिंगचे अपयश योगेश्वरला सतत जाचत होते आणि त्यामुळेच तो ऑलिंपिक पदक या ध्येयाने पछाडला होता. बाकी काही त्याला सुचत नसावे. पण असे पछाडलेपणच यशाच्या वाटेने नेते. जिद्द आणि जिगर म्हणजे काय याचे प्रात्यक्षिकच योगेश्वरने दाखवले. डोळ्याला इजा पोहोचल्यानंतरही त्याने त्याचा मनावर परिणाम होऊ दिला नाही, उलट तो अधिकच चवताळला. पदक जिंकायचे ही त्याची आकांक्षा इतकी तीव्र होती की, आता लढत त्याच्या हातून निसटते की काय अशी शंका येऊ लागली होती, तेव्हाच त्याने प्रतिस्पर्ध्याला लोळवले आणि नंतर पायानेच मिठी घालून स्वतः फिरक्या घेत त्याला असे फिरवले की जणू काही पीळच मारला. त्यामुळे कोरियाच्या जोंग य्योंग रीला चक्करच आली असणार. योगेश्वर तीस वर्षांचा आहे आणि या वेळी पदक नाही, तर कधीच नाही हे त्याने ओळखले होते आणि त्यातूनच ही यशाची वेल बहरली होती. योगेश्वरप्रमाणे महिला कुस्तीत सहभागी झालेल्या गीता फोगटला रिपचेजची संधी साधता आली नाही.

कुस्तीगीरांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत असतानाच आपले बॉक्सर मात्र अपेक्षापूर्ती करण्यात अपयशी ठरले. ज्यांच्याकडून किमान दोन पदकांची अपेक्षा केली जात होती, त्यांना एकही पदक मिळाले नाही. विजेंदर, विकासकृष्णन, जयभगवान, देवेंद्रो सिंग, मनोजकुमार, शिव थापा, सुमित संगवान यांच्यापैकी कुणीही उपान्त्य फेरी गाठू शकला नाही. अर्थातच पदकासाठी पात्र ठरला नाही. काही प्रमाणात याला पंचांचे पक्षपाती धोरण, तसेच भारताच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही ही कारणे आहेत, तरी त्यांची कामगिरी कमी पडली हे मान्यच करावे लागेल.

महिला बॉक्सिंगमध्ये मात्र मेरी कोमने पदक संपादन करून काही प्रमाणात थोडा दिलासा दिला. पण तीही आपल्या ब्राँझपदकावर संतुष्ट नाही. ती पुन्हा सुवर्णपदकासाठी तयारी करणार आहे आणि तिचा इतिहास पाहता आपले ध्येय गाठण्यासाठी ती प्रयत्नांत कसर ठेवणार नाही हे नक्की. एकोणतीस वर्षांची मेरी जुळ्या मुलांची आई आहे. सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरीने चांगला खेळ केला. पण ब्रिटनची निकोला ॲडम्स मेरीपेक्षा उंच आणि वयानेही कमी होती आणि उंचीचा फायदा तिने उठवला.

मेरीला ब्राँझवरच समाधान मानावे लागले. निकोलाने पुढे सुवर्ण मिळवून आपला दर्जा सिद्ध केला. योगायोगाची बाब अशी की जागतिक स्पर्धेतही तिनेच मेरीला हरवून विजेतेपद जिंकले होते. पण त्यामुळेच मेरीला ऑलिंपिक प्रवेशासाठी कोटा मिळाला होता. सात पुरुष आणि एक महिला या बॉक्सिंग संघाला एकाच पदकावर समाधान मानावे लागले. नेमबाजीत मात्र दोन पदके मिळाली. एक रौप्य आणि एक ब्राँझ. आधी फारसा गाजावाजा न झालेल्या आणि कोणतीही भरमसाठ विधाने न करणाऱ्या विजय कुमारने रॅपिड फायरमध्ये रौप्य पदक मिळवून सर्वांनाच सुखद आश्चर्याचा धक्का दिला. तर गगन नारंगला 10 मी. एअर रायफलमध्ये ब्राँझपदकावर संतुष्ट राहावे लागले.

गगन अन्य स्पर्धांत सातत्याने चांगली कामगिरी करतो, पण ऑलिंपिकमध्ये मात्र त्याला यश येत नव्हते. यंदा त्यात थोडी का होईना सुधारणा झाली आहे, हे महत्त्वाचे. जयदीप कर्मकारनेही 50 मी. रायफल प्रोन स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला. त्याचे ब्राँझपदक केवळ नऊ दशांश गुणाने हुकले. बाकी नेमबाजांनी मात्र निराशाच केली. अभिनव बिंद्रा गेल्या वेळचा सुवर्णपदक विजेता. पण त्या वेळी त्याच्यात जे झपाटलेपण होते ते यंदा नव्हते. बीजिंगआधी त्याचा सारा ध्यास, सारे परिश्रम केवळ सुवर्णपदकासाठीच होते. पण यंदा तसे नव्हते. तो पात्र ठरला होता आणि खेळला इतकेच म्हणायचे. ध्येयपूर्तीनंतर अनेकदा असे होते, हेही खरेच.

सायना नेहवालचे ध्येय ऑलिंपिक पदक हेच होते. आणि तिने ते स्पष्ट केले होते. त्यामुळे तिने तिचे ध्येय गाठले इतकेच नाही तर प्रशिक्षक गोपीचंद यांचेही स्वप्न पूर्ण केले. आपले स्वप्न सायनाने पुरे करावे, ही त्यांची इच्छा पूर्ण झाली. सायनाही मेरी कोमप्रमाणे पदकासाठी आसुसलेली होती. आता आपण पुढच्या वेळी यापुढे जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले.

ती बावीस वर्षांची असल्याने आणखी काही वर्षे खेळू शकते. तिची महत्त्वाची कामगिरी म्हणजे तिने चिनी गोटात आपला दरारा निर्माण केला. चीनचे खेळाडू हरू शकतात हे तिने कृतीने दाखवून दिले. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे फिटनेस आणि स्टॅमिना-तंदुरुस्ती आणि दमसास- यामध्येही आपण त्यांच्या तोडीस तोड आहोत, हे दाखवून दिले.

ज्वाला गत्ता आणि अश्विनी पोनप्पा यांना या वेळी बॅडमिंटनमध्ये उघड झालेल्या सौदेबाजीचा फटका बसून त्यांचे उपान्त्यपूर्व फेरीतील स्थान हुकले. तर पी.कश्यपने उपान्त्यपूर्व फेरी गाठून आपली चमक दाखवून दाद मिळवली.

हे झाले पदकविजेत्यांबाबत. आता थोडे इतर स्पर्धकांबाबत. ॲथलेटिक्समध्ये कृष्णा पुनिया आणि विकास गौडा यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला हे महत्त्वाचे. अर्थात त्यापुढे एकदम कामगिरीत सुधारणा करणे त्यांना शक्य झाले नाही. ऑलिंपिकमध्ये अशी सुधारणा होऊ शकते. विशेषतः फेकींच्या बाबतीत. उदा. अल ओर्टर या थाळीफेकीतील खेळाडूने लागोपाठ चार ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवले. दर वेळी त्याने ऑलिंपिक विक्रम केला. त्या त्या वेळच्या जागतिक विक्रम करणाऱ्यांना ऑलिंपिकमध्ये मात्र त्याच्याएवढी फेक करणे शक्य झाले नाही.

एक महत्त्वाची आणि चांगली बाब म्हणजे ॲथलेटिक्समधील काही खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी लंडनला नोंदवली व त्या दृष्टीने ते विजेतेच आहेत. कारण त्यांनी आपल्यापरीने सर्वोत्कृष्ट ते देण्याचा प्रयत्न केला. ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्यांकडून हीच अपेक्षा असते. त्यामुळे रोर्इंगमधील आपल्या स्पर्धकांनी केलेली कामगिरीही कौतुकास पात्र ठरते. सिंगल स्कल या प्रकारात स्वर्णसिंग याने उपान्त्य फेरी गाठली. त्या शर्यतीत त्याचा चौथा क्रमांक आला. तरीही प्रौढी न दाखवता त्याने ‘मला नौका चांगली मिळाली, इतर अनेकांना ती मिळाली नाही, त्यामुळे माझे काम सोपे झाले,’ असे प्रामाणिकपणे सांगितले हे महत्त्वाचे.

डबल स्कल्समध्येही संदीपकुमार आणि मनजीतसिंग यांनी उपान्त्य शर्यतीपर्यंत मजल मारली. या तिघांकडूनही कुणी फारशा चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवली नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर दडपण नव्हते, कदाचित त्यामुळेच त्यांची कामगिरी चांगली झाली.

टेनिसमध्येही फारशी प्रगती आपले खेळाडू करू शकले नाहीत. एकेरीतील खेळाडूंकडून अपेक्षा नव्हत्याच आणि फेडरेशनचा दुहेरीतील जोड्या जमवण्याचाच खेळ आधी रंगल्याने, तेही काही करतील असे वाटत नव्हते. तसेच झाले. मात्र यापुढे तरी असे प्रकार टाळायला हवेत. टेनिस फेडरेशनला ते जमणार नसले, तर ऑलिंपिक समितीने करायला हवे. अर्थात फेडरेशनच्या इच्छेनुसार जोड्या खेळल्या असत्या, तरी फार वेगळे चित्र दिसले असते असे म्हणवत नाही.

सर्वांत जास्त आणि काही प्रमाणात रास्तही अपेक्षा होत्या तिरंदाजांकडून. पण त्यांनी त्या अगदी फोल ठरवल्या. अपेक्षा होत्या, कारण नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेतील त्यांची चांगली कामगिरी. दीपिका कुमारीने तर अजिंक्यपदच मिळवले होते आणि तिच्याकडून पदकाची अपेक्षा कुणीही केली असतीच. सांघिक स्पर्धेतही भारतीय संघाला चांगली संधी होती. पण ऑलिंपिक स्पर्धा ज्या लॉर्डस्‌ या क्रिकेट मैदानावर झाल्या त्या स्पर्धांच्या वेळी लॉर्डस्‌वरील हवामान एकदम बदलले होते. पाऊस, जोरदार वारे, कडाक्याची थंडी अशा आपल्या खेळाडूंना अपरिचित बाबींनीच कहर केला आणि आपल्या खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली.

प्रश्न एकच आहे, इंग्लंडमधील लहरी हवा सर्वज्ञात आहे. त्यामुळे असे काही होईल असा अंदाज कुणालाच कसा आला नाही? ही नवलाची बाब आहे. त्यामुळेच अशा वातावरणात तिरंदाजी करण्याचा सराव कुणालाच नव्हता की काय, असा प्रश्न आहे. आपल्या देशात खरे म्हणजे सर्व प्रकारच्या हवामानाचे प्रदेश आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी सराव शिबिरे आयोजित करणे सहज शक्य आहे. आजवर नसेल, पण यापुढे तरी अशी काळजी घ्यायला हवी.

इतर देश स्पर्धा जेथे होणार तेथील परिस्थितीनुसार सराव ठिकाणे तयार करतात, तसेच शर्यतीचे मार्गही आखतात. यश हवे तर या बाबी कराव्याच लागणार. तिरंदाजीत जे झाले तेच हॉकीत असे म्हणता येणार नाही. तरी तसे ते म्हटले जात आहे, हे चूकच आहे. कारण हॉकीमध्ये गेल्या वेळी आपण मुळात ऑलिंपिकसाठी पात्रच ठरलो नव्हतो. ती अपयशाची परिसीमा मानली जायला हवी. या वेळी सुदैवाने आपण ती पात्रता गाठली. पण तेव्हाही काही हेवा वाटण्याजोगी कामगिरी केली नव्हती. त्यामुळेच त्यांचा शेवटचा क्रमांक आला यात फारसे वाईट वाटायचे कारण नाही.

वाईट याचे वाटते की, ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळाला, आता पुन्हा सुवर्णयुग येईल अशा सुखस्वप्नांतच सारेजण दंग झाले. त्यामुळे हॉकी संघटना आणि खेळाडू यांच्यात जागतिक साखळी स्पर्धा आयोजनामुळे झालेले वाद, चांगल्या खेळाडूंना वगळून आपला अहं शाबूत ठेवण्याचे संघटनेचे धोरण, खेळाडूंचे खचलेले मनोबलअशा बाबींचा विचारच कुणी केला नाही.

अर्थात त्या वगळलेल्या खेळाडूंचा समावेश असता तर, काही फार मोठी मजल मारली नसती तरी किमान एखादा विजय तरी हॉकीत नोंदवला गेला असताही. आपल्या खेळाडूंची कामगिरी गेल्या वेळेपेक्षा दुप्पट पदके मिळवणारी झाली. त्यातही प्रथमच दोन रौप्य पदके मिळाली, मात्र सुवर्ण नाही ही खंत आहे. कारण अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकामुळे बीजिंगमध्ये राष्ट्रगीत वाजले, पण लंडनला तो योग आला नाही याची हळहळ वाटते.

आता बाकी ऑलिंपिकबाबत थोडक्यात सांगायचे, तर हे ऑलिंपिक होते युसेन बोल्टचे. ‘जगातला सर्वांत वेगवान धावक’ तो ठरला होताच पण आता दुसऱ्यांदा त्याने तीच कमाल करून दाखवली आहे. आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच ॲथलीट आहे. 100 मी. शर्यतीत तर जमैकाचेच धावपटू पहिल्या तीन क्रमांकांवर होते. त्यामुळे रीले त्यांनी जागतिक विक्रमी वेळ देऊन जिंकली, ही काही आश्चर्याची बाब नव्हती.

बीजिंगला मायकेल फेल्प्सच्या आठ सुवर्णपदकांच्या कामगिरीच्या झळाळीत बोल्टचा तीन सुवर्णपदकांचा विक्रम फिका पडला होता. पण या वेळी पुन्हा तीच कामगिरी करून त्याने त्याला अधिकच उजाळा दिला. त्यामुळे फेल्प्सने चार सुवर्णपदकांसह सहा पदके कमावली आणि कुणाचीही नाही, एवढी वैयक्तिक 18 सुवर्णपदकांसह एकूण 22 पदके मिळवली ही कामगिरीही काहीशी झाकोळली.

एक तर त्यात फारसे नवल वा आश्चर्य कुणालाच वाटले नाही. तो किती सुवर्णपदके मिळवतो याबाबतच थोडी उत्सुकता. पण ती थोडीच होती. सवयीचे झाले तर यशही फारसे लक्ष वेधून घेत नाही. (भारत ओळीने हॉकी सुवर्णपदक मिळवत होता तेव्हा तरी कुणाला फार कौतुक होते त्या पदकांचे? आपले हॉकी प्रेम जागे झाले ते सातत्याने हार होऊ लागल्यावर आणि त्या वेळी सुवर्णपदकांच्या आठवणीने आपण खंत करत राहिलो.)

फेल्प्सएवढीच चार सुवर्णपदके जलतरणातच त्याच्याच देशाच्या मेस्सी फ्रँकलीनने कमावली आणि आता तिच्याबाबत अपेक्षा वाढून तिलाही लेडी फेल्प्स म्हटले जाऊ लागले आहे. बोल्टएवढीच चमक दाखवली केनियाच्या डेव्हिड रुडिशाने. त्याने 800 मी.ची शर्यत जागतिक विक्रमी वेळ नोंदवून जिंकली.

अमेरिकेच्या ॲशटन ईटनने डेकॅथलॉन ही धावणे, हर्डल्स, उड्या, फेकी अशा दहा स्पर्धा शर्यतींचा समावेश असलेली स्पर्धा जिंकली. त्याचे कौतुक तर खुद्द युसेन बोल्टनेच केले. हे दहाही प्रकार करून वर मोठे यश मिळवायचे ही अवघडच कामगिरी आहे, मानले बाबा तुला, असे बोल्टने म्हटले व आपल्यापेक्षा तोच श्रेष्ठ आहे असे सांगितले.

पदकांची शर्यत अमेरिका आणि चीन यांच्यात असेल असे आपण म्हटलेच होते. तशी ती झाली आणि अमेरिकेने पुन्हा पहिला क्रमांक मिळवला. 46 सुवर्ण, 29 रौप्य आणि 29 ब्राँझ अशी 104 पदकांची कमाई त्यांनी केली. चीनला अनुक्रमे 38, 27 आणि 22 अशी 87 पदके मिळाली. चीनने गेल्या वेळी बाजी मारली त्यात त्यांच्याच देशात ऑलिंपिक होण्याचा मोठा वाटा होता, हे आता ते दुसऱ्या क्रमांकावर गेल्याने स्पष्ट झाले आहे. असा फायदा यजमान देशाला होतोच. ब्रिटनने या वेळी 29 सुवर्णांसह 64 पदके मिळवून हीच बाब अधोरेखित केली. आता पुढच्या ऑलिंपिकमध्ये ब्राझील यंदाच्या 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 ब्राँझपदकांत किती सुधारणा करतो ते पाहायचे.

खरे तर आणखी बरेच काही आहे, पण जागेच्या मर्यादेत ते बसणे अवघड आहे. तेव्हा कुणाच्या आवडीच्या काही बाबी आल्या नसतील तर उदार मनाने त्यांनी ही अडचण समजून घ्यावी. शिवाय वाचकांनी बरेच काही वर्तमानपत्रांत वाचले असेल, आणि दूरचित्रवाणीवरही पाहिले असेल. तेव्हा आवरते घेतलेले बरे.

Tags: गगन नारंग विजय कुमार मेरी कोम सायना नेहवाल योगेश्वर दत्त सुदेश कुमार Gagan Narang Vijay Kumar Meri Kom Saina Nehwal Yogeshwar Dutt Sudesh Kumar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके