खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सर्वकष न्याय मिळण्याचा एक भाग म्हणून नाशिक येथे काळाराम मंदिरासमोर अस्पृश्यांना (दलितांना) मंदिर प्रवेश मिळवून देण्यासाठी आंदोलन केले होतेच. त्यांच्याच अनुयायांनी या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले याचा खेद होतो. बदलत्या काळाच्या संदर्भात अशा घटनांचे आपण मूल्यमापन केले पाहिजे.
प.पू. साने गुरुजींच्या गेल्या वर्षीच्या पुण्यतिथीनिमित्त (11 जून 1996 ) 'साधने’ च्या 8 जून 1996 च्या अंकातील 'करी मनोरंजन जो मुलांचे!' या लेखात मी साने गुरुजींच्या बालमानस चित्रणाचे समीक्षण एका वेगळ्या दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केला होता. साने गुरुजी हे काही केवळ बाल साहित्यकार नव्हते. 'साने गुरुजींना बाल वा्डमयात ढकलले गेले' (टीकास्वयंवर भालचंद्र नेमाडे, पृ. 116 ) परंतु त्यांच्या साहित्याचा आवाका त्याहूनही मोठा होता हे डॉ. नेमाडे यांनी त्यांच्या ‘देशीयता’ या वादाचे समर्थन करताना निरनिराळी उदाहरणे देऊन दाखवून दिले आहे. (टीका स्वयंवर). काहींनी 'बालसाहित्यकार' म्हणून गुरुजींच्या साहित्याची संभावना केली.
कादंबरीकार म्हणून त्यांची दखल घेण्यासही प्रा. फडके, प्रा. श्री. के. क्षीरसागर यांच्यासारख्या. बुजुर्ग टीकाकारांनी नकार दिला. पण नेमाडे, चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीत साने गुरुजींच्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या साहित्याचा सुद्धा उल्लेख करताना म्हणतात. मोठ्यांसाठी लिहिण्यापेक्षा लहान मुलांसाठी लिहिणे हे जास्त सुखदायक आहेच. ह्या बाबती तही मी पुन्हा साने गुरुजीना आदर्श मानतो.' (टीका स्वयंवर, पू. 277.) डॉ. नेमाडे यांनी साने गुरुजींच्या एकूणच साहित्याचे अस्सलपण आणि मराठी साहित्याला त्यांनी दिलेले योगदान याच्या वेगळेपणाचे विश्लेषण करण्याचा जो प्रयत्न केला आहे. त्याची दखल घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.
संपूर्ण क्रांतीचा ध्यास
साने गुरुजी हे नुसते बाल साहित्यिक नव्हते. ललित साहित्यिक, पत्रकार, प्रबोधनकार, कवी, कादंबरीकार ही त्यांची वरवरची रूपे होती. ते एक प्रामाणिक देशभक्त होतेच, पण ते विद्रोही, समतावादी आणि अखिल विश्वातील मानवजातीला शोषणमुक्त करण्याचे एक विशाल स्वप्न पाहणारे महापुरुष होते. 'भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या माथा हणू काठी’ या तुकाराम महाराजांच्या उक्तीला साजेसे वर्तन करणारे, संपूर्ण क्रांतीसाठी अंतर्बाह्य पेटलेले गृहस्य होते.
भावना, हळवे, खोटा आदर्शवाद उबवणारे लेखक अशी त्यांची प्रतिमा निर्माण करणाऱ्या तथाकथित महान समीक्षकांनी त्यांना ओळखलेच नव्हते असे म्हणावे लागते. साने गुरुजी यांचे मराठी माती व मराठी माणसाची वेदना यांच्याशी अतूट नाते होते, त्यामुळे सौंदर्यवादाच्या रोमँटिक कल्पना त्यांच्या मानगुटीवर बसल्या नव्हत्या. शिष्टशिष्टतेच्या किंवा सभ्यासभ्यतेच्या खोट्या कल्पनाही त्यांनी बागळल्या नाहीत. साहित्यिक हा मुळात जीवनाचे रूप विवस्त्रपणे पाहात असतो. तुकारामांच्या ‘भले तरी देऊ गांडीची (कासेची नव्हे) लंगोटी' हा अप्रतिम लयबद्ध चरण आपल्या एका कादंबरीत जसाच्या तसा टाकण्याएवढे शूरत्व परमपूज्य कै. पांडुरंगराव साने गुरुजी ह्यांच्या अंगी होते ( टीकास्वयंवर पू. 6 ) असेही प्रा. नेमाडे यांनी नमूद केले आहे. 8 जून 1996 च्या 'साधने’ तील 'करी मनोरंजन जो मुलांचे' या लेखात मी गुरुजींच्या एकारलेल्या व्यक्तित्व चित्रणाची नानासाहेब गोरे यांनी केलेली वाङ्मयीन चिकित्सा उद्धृत केली होती. (नारायणीय, पू. 139)
साने गुरुजींच्या जीवनाकडे पाहण्याच्या प्रेममय दृष्टीमुळे जीवनातील इतर भावनांचे आणि वास्तवाचे यथार्थ चित्रण ते करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या व्यक्तित्यदर्शनात दुर्भगपणा निर्माण होतो असे नाही. गुरुजी त्यांनीच निर्माण केलेल्या त्यांच्या मानस-व्यक्तिमत्त्वात त्यांच्याच विशिष्ट दृष्टिकोनातून परकायाप्रवेश करू पाहतात. त्यामुळे त्यांच्या पात्रांना लांबी-रुंदी-खोली यांची विशिष्ट परिमाणे लाभत नाहीत हे नानासाहेबांचे मत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खरेच आहे. आपला आशय आणि आपल्या भावना ललित साहित्याच्या माध्यमात व्यक्त करण्याची त्यांनी स्वीकारलेली विशिष्ट भाषाशैली त्यांच्या पात्रांना पूर्ण न्याय देण्याच्या कामी अडचण निर्माण करते हे खरे असले तरी जेव्हा समतेच्या, स्वातंत्र्याच्या, शोषणाच्या संदर्भात त्यांच्या भावना तीव्र होतात तेव्हा ती मृदुता नाहीशी होते. उदा. येथून तेथून सारा पेटू दे देश, उठू दे देश ॥ धृ॥ या कवितेत किंवा आता उठवू सारे रान । आता पेटवु सारे रान। शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण । ' किंवा 'बलसागर भारत होवो' या काव्यरचनेत आशयाला समर्थपणे व्यक्त करणारी भाषा ते वापरू शकतात.
'धडपडणारी मुले' निर्माण करणारा भावनाविष्कार
'क्रांती' या कादंबरीत गुरुजींच्या शोषणविरोधी आणि मानवतावादी अभिव्यक्तीचा उत्कट आविष्कार झालेला दिसतो. प्रा. क्षीरसागरांनी गुरुजींच्या या स्वाभाविक भावनाविष्कारावा 'मुद्दाम उबवलेली, ऊरबडवी बनविलेली गवाळी आणि कित्येक ठिकाणी अशुद्ध आहे' अशा उपहासात्मक उल्लेख केला आहे. क्षीरसागरांच्या या आक्षेपाला तिखट शब्दांत दिलेल्या प्रा. नेमाडे यांच्या उत्तराचा मी वर उल्लेख केला आहेच. क्षीरसागर पुढे म्हणतात, 'त्यांच्या पुस्तकात दुबळेपणा, पुराणपूजन, पाल्हाळ, भोळसरपणा, रडकेपणा भरलेला आहे. त्यांचे विपुल वाङ्मय म्हणजे ‘रडारड' (साने गुरुजींची जीवनगाथा, पू. 330 ) प्रा. फडके यांनी, त्यांचीच री ओढली आहे. 'श्यामची आई' या पुस्तकाच्या हजारो प्रती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचल्या आणि त्या संस्कारातून अनेक 'धडपडणारी मुले' निर्माण झाली, याचाही या प्राध्यापक यांना दुस्वासच वाटला आहे.
परंतु या टीकेचाही आपल्या एका मुलाखतीत परामर्श घेताना डॉ. नेमाडे म्हणतात, 'मला साने गुरुजी हाच एकमेव मोठा कादंबरीकार वाटला होता आणि अजूनही तसंच वाटतं.' त्यांच्या श्यामच्या लायकीचा नायक मराठीत दुसरा नाही. भटका, निराधार, सर्व सृष्टीची परिमाण लाभलेला असा नायक. साने गुरुजी हाच असा कादंबरीकार आहे की ज्यानं स्वतःच असं विश्व निर्माण केलं. त्यांना स्वतःची जीवनदृष्टीही होती. जी इतर कोणाजवळ दिसत नाही. समाजाच्या सर्व स्तरांना मराठी कादंबरीने खऱ्या अर्थानं स्पर्श केला तो एकटया साने गुरुजींच्याच. ह्या बाबतीत त्यांचा आवाकाही विलक्षण होता, (टीकास्वयंवर, पू. 267 ) अशा शब्दांत नेमाडे यांनी मराठी कादंबरीतील आणि साहित्यातील त्यांच्या योगदानाची चिकित्सा केली आहे. इतकेच नव्हे तर त्या काळात फडके-खांडेकर यांच्या कादंबऱ्या कितीही लोकप्रिय असल्या आणि मराठी समीक्षकांनी त्यांना मराठी कादंबरीचे 'मानदंड' मानले असले तरी ती जागा खरी साने गुरुजींचीच होती असंही त्यांनी सूचित केलं आहे. (टीकास्वयंवर, पृ. 166-67.)
डॉ. आंबेडकरांइतकीच समतेची तीव्र प्रेरणा
साने गुरुजी हे केवळ परंपरावादी, संस्कारवादी लेखक नव्हते. दलितांकडे पाहण्याची किंवा एकूणच तळागाळातील समाजाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी केवळ सहानुभूतीची समरसतेची नव्हती. दलितांना न्याय देण्यासाठी, त्यासाठी खंबीरपणे विद्रोह करण्याची त्यांची मनोप्रवृत्ती होती. त्यांचे समाजप्रबोधन केवळ ममता आणि कारुण्यातून नसून ते समतेसाठी होते. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इतक्याच साने गुरुजींच्या प्रेरणा तीव्र होत्या. हे ते उच्च वर्णीय असले तरी त्यांनी केलेल्या अथक सामाजिक, साहित्यिक, राजकीय व कामगार चळवळीतून दिसून येते. त्यांनी केलेले आत्मार्पण हे याबाबतचे टोकाचे उदाहरण असल्याचा उल्लेख या लेखात एका संदर्भात आला आहेच. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ तीन चार वर्षांतच काँग्रेसचे नेतृत्व आणि भारतीय पातळीवरील इतर नेत्यांना जनतेला दिलेल्या वचनांचा विसर पडला.
स्वातंत्र्य? कुणा स्वातंत्र्य? कशासाठी हे स्वातंत्र्य? असा प्रश्न संवेदनशील मनाला पडू लागल्यावर आत्मक्लेशांतून त्यांनी स्वतःला करून घेतलेले ते एक आत्मशासनच होते असे मला वाटते. साने गुरुजींनी 10 मे 1947 रोजी पंढरपूरला भीमेच्या वाळवंटात जो सत्याग्रह केला, त्याची 10 मे 1997 रोजी स्मृती जागवली गेली. केवळ साने गुरुजींची आता वृद्धत्वाकडे झुकलेली किंवा वृद्ध झालेली धडपडणारी मुले 'व नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रातील आणि विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर भक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित राहिल्या. समतेचा लढा पुढे नेण्याचा निश्चय जागवण्यात आला हे यावरून दिसून येते. याची फलश्रुती काय, असा प्रश्न विचारून मूळ हेतूचे गांभीर्य कोणी कमी करण्याचा प्रयत्न करू नये असे मला वाटते.
खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सर्वकष न्याय मिळण्याचा एक भाग म्हणून नाशिक येथे काळाराम मंदिरासमोर अस्पृश्यांना (दलितांना) मंदिर प्रवेश मिळवून देण्यासाठी आंदोलन केले होतेच. त्यांच्याच अनुयायांनी या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले याचा खेद होतो. बदलत्या काळाच्या संदर्भात अशा घटनांचे आपण मूल्यमापन केले पाहिजे. आज मंदिर प्रवेशाचे महत्त्व राहिले नाही. कारण कायद्यानेच तो हक्क सर्वांना मिळवून दिला आहे. पण त्या वेळी मंदिर प्रवेशाला आणि पाणवठ्याला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीच आज राखीव जागा, मंडल आयोग, महिला राखीव जागांचा प्रश्न यांना विरोध करीत आहेत. विरोधाचे विषय आणि स्वरूप बदलले तरी उच्च वर्णीयांचे जन्माधिष्ठित श्रेष्ठत्व, कर्मविपाक सिद्धान्ताचे आकर्षण आजही अबाधित आहे. 'सामरस्य', 'स्वाध्याय' इत्यादी विविध बुरखे पांघरून आजही 'ठेविले अनंते तैसेचि रहावे', 'प्रत्येकाने आपली पायरी जाणून राहिलेले बरे' इत्यादी विचार अध्यात्माच्या नावावर समाजात प्रच्छन्नपणे पसरविले जात आहेत.
व्यक्तिमत्त्वाला विद्रोहाची धार साने गुरुजी हे 'भारतीय संस्कृती’ चे श्रेष्ठपण मुक्तपणाने सांगत असले तरी त्यातील विषमतेचे समर्थन त्यांनी कधीही केलेले नाही. गीताई चे शब्दांकन त्यांनी केले तरी चातुर्वर्ण्याची भूमिका त्यांनी कधीही मान्य केली नव्हती. रोटी-बेटी संबंध, विधवाविवाह, आंतरजातीय विवाह या सगळ्या आधुनिक समाजाच्या संकल्पना त्यांना मान्य होत्या आणि त्यासाठी त्यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना उत्तेजन दिले. याबाबत आचार्य विनोबांच्याही पुढे त्यांनी मजल मारली होती. गुरू गोळवलकर किंवा पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याप्रमाणे भारतीय समाजव्यवस्थेतील आणि धर्मशास्त्रातील विषमतेचा पुरस्कार त्यांनी आपल्या साहित्यात कधीही केलेला नाही. समाज सुधारणेच्या बाबत आगरकर-फुल्यांइतकीच त्यांची मते आग्रही होती. साने गुरुजी स्वतः समृद्ध होते. ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवणारे होते पण विषमता मानणारा ईश्वर त्यांना मान्य नव्हता. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वालाच सहृदयता, कारुण्य, ममत्व यांबरोबरच विद्रोहाची एक धार होती. गुरुजी पुनरुज्जीवनवादी, समन्वयवादी नव्हते तर समतावादी, क्रांतिकारकच होते.
समाजाच्या परिवर्तनासाठी आत्मार्पणापर्यंत जाणारी व्यक्ती समन्वयवादी असणे शक्यच नाही. याबद्दल एक उदाहरण देता येईल. श्री. म. माटे हे हिंदुत्ववादी असूनही समाजसुधारक होते. त्यांच्याच शब्दांत, डिग्रेस्ड् क्लासेस साठी त्यांनी रात्रीचे प्रौढशिक्षण वर्ग चालविले. 'अस्पृष्टांचा प्रश्न’ सोडविण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ प्रबंध लिहिला. पण विठ्ठलमंदिराच्या प्रवेशाला त्यांचा विरोधच होता. अस्पृष्टांना त्यांच्या बैठकीच्या खोलीपर्यंतच प्रवेश देण्याची त्यांची मर्यादा होती. म्हणजेच सहानुभूती वाटली तरी खऱ्या अर्थाने समतेचे तत्त्व माटे यांना मान्य नव्हते. सावरकरवादी असूनही इतर सावरकरवाद्यांप्रमाणेच जातिभेदाच्या समूळ उच्चाटनाची कल्पना त्यांना मान्य नव्हती. म्हणूनच श्री. म. माटे आणि साने गुरुजी यांची तुलना होऊ शकत नाही.
साने गुरुजींचे कार्य आणि त्यांचे साहित्य यांचा विचार केवळ श्रद्धाभावनेने नव्हे पण वस्तुनिष्ठ स्वरूपात होणे आवश्यक आहे असे मला वाटते. मराठी कादंबरी, मराठी गद्य आणि इतर साहित्य प्रकार यांचा डॉ. नेमाडे यांनी त्यांच्या देशीवादाच्या सूत्रात पुनर्विचार केला आहे. देशीवाद आणि विश्वबंधुत्व हे परस्पर विसंगत सिद्धान्त नाहीत साने गुरुजींच्या लेखनाचा सच्चेपणा, माणूस म्हणून त्यांची समाजाकडे, साहित्याकडे पाहण्याची प्रामाणिक दृष्टी, विश्वबंधुत्वाशी साने गुरुजींनी नाते जोडण्याचा केलेला धीट प्रयत्न या साऱ्या विशेषांचे योगदान नव्या पिढीला जाणवून दिले पाहिजे. काहींच्या मते 'श्यामची आई' आता कालबाह्य झाली आहे. 21 व्या शतकाकडे जाणाऱ्या नव्या किशोर-कुमारींना ती भावणारी नाही. पण हे मत बरोबर नाही.
'साने गुरुजींनी 'श्यामची आई' (1935) पासून समाजाच्या सर्व स्तरांना स्पर्श करणाऱ्या बहुविध आशयसूत्रांच्या आणि आपल्या सांस्कृतिक तत्त्वांना उजाळा देणाऱ्या कथा-कादंबऱ्यांमधून मराठी देशी अनुबंध अप्रतिम जिव्हाळ्याने मांडून मराठी कादंवरीचे क्षेत्र विस्तारे.' (टीकास्वयंवर, पृ. 65) या नेमाड्यांच्या मतातच अधिक तथ्यांश आहे. गुरुजींच्या लेखनात मराठी मातीशी प्रामाणिक राहणाऱ्या, तळागाळातील, उपेक्षित, शोषित माणसासाठी धर्मनिरपेक्षतेने आणि परिवर्तनवादी दृष्टिकोनातून जागृती घडवून आणण्याची शक्ती होती. ही प्रेरणा म्हणजे शोषणमुक्त जातपातविहीन समाजरचना निर्माण करण्यासाठी स्फूर्ती देणारी समतावादी शक्तीच होती.
Tags: प्रा. फडके डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्री.म. माटे भालचंद्र नेमाडे साने गुरुजी अ. श्री.भडकमकर Prof. Fadake Dr. Babasaheb Ambedkar S.M. Mate Bhalchandra Nemade Sane Guruji A.S. Bhadakamkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या