डिजिटल अर्काईव्ह

आजच्या जगात याला आत्मविश्वासाचा अभाव म्हणतात. या (अव)गुणांमुळे महाराष्ट्राची अनेक क्षेत्रांत घसरण होत चालली आहे, हा माझा अत्यंत प्रामाणिक अनुभव आहे. शिवाय हा सातत्याने येणारा अनुभव आहे. आमच्या विदेश सचिवांनी माझे केलेले कौतुक मला सुखावून गेले खरे. पण त्यानंतर येणाऱ्या कटु अनुभवाची मला अजिबात कल्पना नव्हती. विदेश सचिव तोक्योतून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला माझ्या जपानी शाळेतून वर्ग संपल्यानंतर निरोप मिळाला. 'दूतावासातून 'उपमुख्य मिशन' यांचा फोन आला होता. त्यांनी वर्ग संपल्यानंतर दूतावासात भेटीस बोलावले आहे.' मला असे निरोप अधूनमधून येत असत. कधी एखादी मीटिंग असे; किंवा कधी भारतातून येणाऱ्या प्रतिनिधी मंडळाबरोबर कुठेतरी जाण्याची आवश्यकता असे. यावेळेस काय असावे, याचा विचार करीत मी भुयारी रेल्वेतून कुदानशिता या रेल्वे स्थानकात उतरलो. दूतावास तिथून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर. दूतावासात पोहोचलो.

याच दरम्यान आमचे विदेश सचिव श्री. व्यंकटेश्वरन सरकारी कामानिमित्त टोकियोला आले. अधिकाऱ्यांची एक मीटिंग दूतावासात आयोजित केली होती. मीटिंगच्या सुरुवातीला अनौपचारिक गप्पांत ते म्हणाले, 'काल मी झोपण्यापूर्वी हॉटेलमध्ये टीव्ही. पहात होतो. चॅनेल एक उघडला तर त्यावर एक भारतीय युवक भाषण देत होता. काय बोलत होता, कळलं नाही; पण अस्खलित जपानी बोलत होता व लोक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते.' 'सर, तो भाषण करणारा वक्ता दुसरा-तिसरा कुणी नसून आपले तरुण अधिकारी मुळे होते.' का कुणास ठाऊक, मला एकदम भीती वाटली. खरे तर अभिमान वाटायला हवा होता; पण सरकारी नोकरीत काहीही थोडे वेगळे व तेही चांगले काम केले तर मनातून कुठेतरी आजही मला भीती वाटते. तेव्हा तर मी एकदम कच्चा अधिकारी होतो. मी विदेश सचिवांची प्रतिक्रिया ऐकायला उत्सुक होतो. 'छान छान. मला तुमचा अभिमान वाटतो. कीप इट अप (हा उत्साह जिवंत ठेवा)' असे ते सहजतेने म्हणाले, तेव्हा मी निःश्वास सोडला. स्वतःविषयीचा आत्मविश्वास वाढण्याचा तो क्षण माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय मराठी संस्कृतीत एक उणीव मला नेहमी जाणवत आलीय; ती अशी, की आपण आपल्या सुसंस्काराच्या ओझ्यामुळे स्वतःचे सद्गुण (नम्रपणे तरीही) प्रभावीपणे बाहेरच्या प्रदेशात किंवा देशात लोकांसमोर सादर करीत नाही. 

आजच्या जगात याला आत्मविश्वासाचा अभाव म्हणतात. या (अव)गुणांमुळे महाराष्ट्राची अनेक क्षेत्रांत घसरण होत चालली आहे, हा माझा अत्यंत प्रामाणिक अनुभव आहे. शिवाय हा सातत्याने येणारा अनुभव आहे. आमच्या विदेश सचिवांनी माझे केलेले कौतुक मला सुखावून गेले खरे. पण त्यानंतर येणाऱ्या कटु अनुभवाची मला अजिबात कल्पना नव्हती. विदेश सचिव तोक्योतून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला माझ्या जपानी शाळेतून वर्ग संपल्यानंतर निरोप मिळाला. 'दूतावासातून 'उपमुख्य मिशन' यांचा फोन आला होता. त्यांनी वर्ग संपल्यानंतर दूतावासात भेटीस बोलावले आहे.' मला असे निरोप अधूनमधून येत असत. कधी एखादी मीटिंग असे; किंवा कधी भारतातून येणाऱ्या प्रतिनिधी मंडळाबरोबर कुठेतरी जाण्याची आवश्यकता असे. यावेळेस काय असावे, याचा विचार करीत मी भुयारी रेल्वेतून कुदानशिता या रेल्वे स्थानकात उतरलो. दूतावास तिथून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर. दूतावासात पोहोचलो. उपमुख्य मिशन 'एक दाक्षिणात्य अधिकारी' होते. मी त्यांच्या खोलीजवळ आलो. दरवाजा उघडाच होता, मला पाहताच त्यांनी चेहऱ्यानेच 'आत या' अशी खूण केली. मी सोफ्यावर बसलो. हातातला कागद काही मिनिटांनंतर त्यांनी बंद केला. चष्मा काढला.तो बंद करून टेबलाच्या एका बाजूला ठेवला. 

मला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. 'गुड आफ्टरनून सर,' मी म्हणालो. अर्धेकच्चे स्मित, अर्धेकच्चे अपराधीपण कारण नसताना माझ्या चेहऱ्यावर. 'अभ्यास कसा चाललाय?' तपास अधिकाऱ्याच्या तोऱ्यात. 'चांगला चाललाय सर. मला सगळ्यांत चांगले मार्क्स मिळालेत. याही त्रैमासिक परीक्षेत मला 92% पडलेत.' 'पण तुम्हांला या वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला कुणी सांगितले?' ते हळूहळू तापत होते. 'सर, तो माझ्या जपानी शाळेच्या भाषा उपक्रमाचा भाग होता,' मी माझा बचाव केला. 'पण तो कार्यक्रम सार्वजनिक होता त्यासाठी परवानगी घेणं आवश्यक होतं.' 'सॉरी सर, यापुढे मी लक्षात ठेवीन.' 'आणि हेही लक्षात ठेवा की दूतावासात तृतीय सचिवाचा संप्रदाय चालणार नाही. तुम्ही जाऊ शकता.' मी कसातरी त्यांच्या खोलीतून बाहेर पडलो. त्या स्पर्धेतल्या माझ्या यशाबाबत मी मुद्दामच कुणाकडे बोललो नव्हतो. विदेश सचिवांनी केलेल्या कौतुकानंतर सगळ्यांनाच ती गोष्ट कळली होती, काहींनी माझे अभिनंदनही केले होते. मला ती गोष्ट तिथेच संपली असती, तर चालले असते. पण दूतावासातील क्रमांक दोनच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने कौतुक तर 'राहोच; पण अपशब्द वापरण्यातलाच तो प्रकार होता. पण मी ते फारसे मनाला लावून न घ्यायचे ठरवले. काही दिवसांनी मला राजदूतांना भेटण्याचा योग आला. 

अनंतनारायण के.माधवन असे लांबलचक नाव असलेल्या या राजदूतांनी माझी पाठ थोपटली आणि हेही सांगितले की 'दिल्लीतील विदेश मंत्रालयाला मी लिखित स्वरूपात तुमच्या भाषा प्राविण्याबद्दल पत्र लिहिले आहे.' मी खूष झालो. क्षणभर वाटले की 'उपमुख्य मिशन' यांनी याबाबत माझी कानउघाडणी केल्याचे त्यांना सांगावे; पण मी ते टाळले. 'काही जणांना आपल्याविषयी अकारण हेवा किंवा द्वेष वाटत असेल तर त्यांना आपण टाळावे आणि माफ करावे', मी स्वतःलाच सांगितले. माझ्या भाषाशिक्षणात मला जाणवले ते है, की माझ्या शिक्षिका मला अत्यंत मन लावून व गंभीरपणे शिकवत होत्या. पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करून माझ्या आवश्यकतेनुसार,वेगानुसार शिकवण्याचा त्या प्रयत्न करीत. वर्गाच्या आत शिकविण्याइतकेच वर्गाबाहेरच्या जपानी विश्वात त्या वारंवार मला घेऊन जात असत. बँका, पोस्ट ऑफिस, कारखाने, कार्यालये, जपानी घरे, जपानी शाळा सगळे म्हणजे सगळे मला या काळात पहायला मिळाले. एकदा आमच्या शिक्षिका यामानाका मला म्हणाल्या, 'मुरेसान (जपानी भाषेत 'ळ' व 'ल' दोन्ही मूळाक्षरे नाहीत त्यामुळे मुळे चे मुरे होते. मुरे सान म्हणजे श्री.मुळे) तुम्हांला आम्ही जपानी स्नानगृह दाखवणार आहोत.' 'चला चला, मी तर तयार आहे' मी उत्सुकतेने म्हणालो, 'जपानी स्नानगृहांविषयी थोडंफार वाचलं होतं. अनुभव घ्यायची संधी मी का सोडावी?' 

'तिथं गेल्यानंतर विचित्र तर वाटणार नाही ना?' यामानाका सेन्सेइंनी विचारले. 
'मुळीच नाही. फक्त मला तिथला शिष्टाचार समजावून सांगा, म्हणजे माझ्या हातून काही भयानक चूक होणार नाही.' 
'ते शिष्टाचार तेथील लोक तुम्हांला समजावून सांगतील. तो काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही.' 
'पण सेन्सेइ, स्त्री-पुरुष एकत्र आंघोळ करतात असं ऐकलं ते खरं आहे का?' मी थोड्याशा उत्सुकतेने तसेच थोड्या भीतीने विचारले. सेन्सेइना हसू आलं. 'आज आपण जिथं जाऊ तिथं पुरुष आणि स्त्रियांची आंघोळीची वेगवेगळी सोय आहे. बाकी प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण उद्यासाठी आरक्षित ठेवू.'
  
'ठीक आहे' मी म्हणालो, काय काय घेऊन जावं लागेल तिथे?' 'काही नाही. तिथे सगळीच व्यवस्था असते. आपण सात वाजता आझाबू स्टेशनजवळून दहा मिनिटे अंतरावरच्या सार्वजनिक स्नानगृहाच्या स्वागतकक्षात भेटू.' संध्याकाळी सात वाजता स्नानगृहाच्या स्वागत कक्षात आम्ही भेटलो.तिथून आमची रवानगी पुरुष व स्त्री अशी वेगवेगळ्या भागात झाली. सर्वप्रथम कपडे बदलण्याची जागा, खरे तर ठेवण्याची जागा. बाकीचे कपडे लॉकरमध्ये ठेवले, मी अंडरवेअर घालून आत जाऊ लागलो. पण आत जाता जाताच एका जपानी माणसाने मला थांबवले. त्याचे म्हणणे फार सोपे होते. त्या जागेच्या पुढे कपडे घालून जायला बंदी आहे. कपड्यात अंडरवेअरचाही समावेश आहे. मला विचित्र वाटले. शिवाय इथूनच आपण परत जावे असेही वाटले. पण माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना, त्याबरोबरच स्नानगृह व जपानी संस्कृती यांचा अभ्यास महत्त्वाचा होता असेही वाटले. मी निसर्गावस्थेत पुढच्या विभागात आलो. या विभागात अनेक पाण्याचे नळ होते. त्याला शॉवरपाईप जोडलेली होती व असंख्य जपानी पुरुष (जवळ जवळ पंधरा-वीस) जमिनीवरच्या लाकडी पाटावर बसून साबण लावून आंघोळ करत होते. 'आधी इथे बसून आंघोळ करा व स्वच्छ व्हा,' त्या व्यवस्थापकाने मला सांगितले. बाकी सगळे जपानीही निसर्गावस्थेतच होते. 

मी थोडासा गोंधळलो होतो, हे खरे असले तरी माझ्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. मी खाली बसून छानपैकी आंघोळ केली. शॉवरमधल्या पाण्याचे तापमान कमी-जास्त करण्याची सोय होती. आंघोळ झाल्यानंतर व्यवस्थापकाने मला पुढच्या विभागात नेले. तिथे चक्क एक चार बाय चार मीटरचा छोट्या स्वीमिंग पूलसारखा पाण्याचा तलावच होता. त्यातून गरम पाण्याच्या वाफा येत होत्या. व्यवस्थापकाने माझ्या हातात एक दीड फुटी पांढरा टॉवेल दिला व मला आत जाऊन 'युक्कुरी तानोसिंदे कुदासाई' (अगदी आरामात आनंद घ्या) असे सांगून तो नाहीसा झाला. त्या छोट्या पाण्याच्या तलावाचे तापमान फारच उच्च होते. पहिल्यांदा पाय नंतर कंबर मग मानेपर्यंत असा मी पाण्यात गेलो. माझ्या अवतीभोवती साताठ जपानी पाण्यात उभे होते. त्यांचा पांढरा टॉवेल कमरेला नसून खांद्यावर किंवा डोक्यावर होता. मला बघून काहींनी मंद स्मित केले. काहींना मी विदेशी आहे याची कल्पना असल्याने त्यांनी नकळत माझ्यावर एक नजर टाकली. 'जगभर माणसं जवळजवळ सारखीच असतात तर', असा अभिप्राय त्यांच्या नजरेत होता. पण मला चमत्कारिक वाटावं असं तिथं काहीच नव्हतं. (किंवा सगळंच इतकं चमत्कारिक असूनही तसं असल्याचा भाव मात्र कुणाच्या चेहऱ्यावर नव्हता.) पाण्यात बसून ते काय करतात याचं मला कुतूहल होतं. पण सगळ्यांचा मुख्य कार्यक्रम त्या दोन अडीच मीटर पाण्यात आरामात बसणं हाच होता. 

आताशा मलाही त्या गरम पाण्याची सवय झाली होती. पाण्यातच बसण्यासाठी अधूनमधून दगडाची आसनं केलेली होती. मीही त्यातल्या एकावर बसलो. शरीर कसं छान हलकं वाटत होतं. मधूनच ते आपला टॉवेल गरम पाण्यात भिजवत मग खांद्यावर व डोक्यावर ठेवून हलका मसाज देत. मीही तसे केले. खांद्याला खूपच आराम वाटला, भीड चेपल्यानंतर मी शेजारच्या मध्यमवयीन जपानी माणसाबरोबर जपानी बोलायला सुरुवात केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर मी त्याला 'भिंतीपलीकडून हा स्त्रियांचा आवाज कसला येतोय?' 'तिथे महिलांचा विभाग आहे,' असे त्याने सांगितले व डोळे मिचकावून 'तिकडे जायचंय का?' विचारले, मी थोडासा ओशाळलो; पण त्याच्याशी गप्पा सुरूच राहिल्या. तोक्योच्या कुठल्या तरी खाजगी बँकेत तो काम करत होता. आठवड्यातून तीनदा तरी तो या सार्वजनिक स्नानगृहात येत होता. 'जोपर्यंत इथं येऊन तास दोन तास शरीर शिथिल करून या कढत पाण्यात शेकत नाही तोपर्यंत चैनच पडत नाही,' असे तो म्हणाला. त्याच्या घरात शॉवर, टब सगळं आहे, पण 'जो जपानी माणूस स्नानगृहात जात नाही त्याने आपल्या संस्कृतीचा त्याग केला आहे, असं समजायला हरकत नाही,' असेच त्याचे मत पडले. 'पण इथं नेमका कोणता आनंद मिळतो तुम्हांला?' मी विचारलं; तर तो उत्तरला, 'नेहमी येत रहा; म्हणजे आपोआप कळेल. 

काही आनंद फक्त अनुभवायचे असतात. त्यांचं वर्णन करता येत नाही.' त्याचे ते म्हणणे अगदी खरे निघाले. मी त्याचा सल्ला ऐकला आणि संपूर्ण जपानभर अशा कित्येक स्नानगृहांचा आनंद घेतला. जपानी माणसांनी स्नान या संकल्पनेचे कलेत रूपांतर केले आहे. जपानच्या वेगवेगळ्या प्रदेशांत अशी हजारो स्नानगृहे आनंदाची बरसात करताहेत. यांत खुल्या आकाशाखालच्या स्नानापासून, नैसर्गिक गरम पाण्यांच्या स्नानगृहांपर्यंत, सुंदर सृष्टीसौंदर्यासहित स्नानापासूनविविध प्रकारच्या औषधी गुण असलेल्या पाण्याच्या स्नानापर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. हा आनंद खरे तर शब्दांपलीकडचा आहे. काही स्नानगृहे प्रचंड आहेत, तर काही अगदी छोटी. मला यांतली पर्वतराजीत लपलेली पूर्णपणे नैसर्गिक गरम पाण्याची स्नानगृहे सगळ्यांत जास्त आवडली.तिथून दिसणारा निसर्ग अप्रतिम तर होताच, पण खुल्या आकाशात बसून थंडी, ऊन,बारा आणि अनेकदा हिमवर्षावाचा अनुभव घेत स्नान करणे आणि तासन्तास बसून राहणे यालाच स्वर्गसुख म्हणतात. हाकोनेच्या एका स्नानगृहातून मी भाऊंट फूजीचे बर्फाच्छादित शिखर पाहिले. तसेच त्या शिखराचे समोरच्या तलावातले मनोरम प्रतिबिंबही. बेप्पू या स्नानगृहांसाठी प्रसिद्ध दक्षिणेकडच्या शहरात मी लाल रंगाच्या नैसर्गिक पाण्यात आंघोळ केली. रात्रीच्या वेळेस चांदणे पसरले असताना हातात छोटा साकेचा प्याला घेऊन बसलेल्या जपानी माणसांसमवेत मी अनेकदा चंद्रदर्शन घेतले आहे. त्या वेळच्या संवादांत मला जपानी साहित्य, संस्कृती, लोककला, व्यवस्थापन, विकास, संगीत, भाषा, चालीरिती, व्यवसाय, इत्यादींचेच ज्ञान झाले असे नव्हे; तर एका समग्र जपानची त्याच्या भूत भविष्य वर्तमानासह एक गुरुकिल्ली मला सापडली. 

एकदा मी वर्गात आमच्या यामानाका सेन्सेइना विचारले. 'स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या स्नानगृहांची कल्पना कधी आली?' त्या हसल्या. म्हणाल्या, 'मुरेसान, एक ना एक दिवस तुम्ही हा प्रश्न विचारणार याची मला कल्पना होती.' 'माफ करा सेन्से, माझी प्रश्न विचारण्यात काही चूक झाली का?' 'इये, मुळीच नाही. खरं तर फक्त बुद्धिमान विद्यार्थीच हा प्रश्न विचारतात; म्हणून मला तसं वाटलं होतं.'त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित तसेच होते. 'मी विनोद म्हणून हा प्रश्न विचारत नाही. मला हे जाणून घ्यायचंय.' 'ऐका तर, अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे दुसऱ्या विश्वयुद्धापर्यंत अनेक ठिकाणी स्त्री-पुरुषांची स्नानगृहं एकत्र होती. युद्धानंतर अमेरिकन आले आणि त्यांना हा प्रकार आमच्या मागासलेपणाचं लक्षण वाटलं व स्त्री-पुरुषांची स्नानगृहं वेगळी असावीत, असं फर्मान निघालं. खेड्यापाड्यांतील आणि डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या लोकांना या गंभीर निर्णयाचं पालन कसं करावं हे समजलं नाही. काहींनी स्नानगृहाच्या मधोमध पुरुष व स्त्रियांना वेगळे करण्यासाठी फक्त एक दोरी बांधली.' सेन्सेइ जे सांगताहेत त्यातला विनोद कळला, तेव्हा मला हसू आवरेना. त्यानंतर एकदा मी नोजिरी या नगानो प्रांतातील प्रसिद्ध पर्यटक स्थळाला गेलो होतो. तिथे उंच पर्वतावर नैसर्गिक स्नानगृह आहे असे ऐकले म्हणून चालत चालत तिथे गेलो. 

तिथल्या त्या गरम पाण्याच्या झऱ्यात उतरलो, तर त्या छोट्याशा तलावात अधूनमधून ठेवलेल्या प्रचंड पत्थरांमागून महिलांचा आवाज येत होता. मी माझ्या जपानी मित्राकडे पाहिले.त्याने सांगितले, 'त्या दगडांच्या पलीकडे महिला विभाग आहे' यामानाका सेन्सेइनी सांगितल्याप्रमाणे इथे दोरी नव्हती, पण छोटे मोठे दगड होते. शहरात असो वा ग्रामीण भागात, नैसर्गिक असोत वा कृत्रिम, जपानी स्नानगृहांचा मूलभूत नियम एकच आहे, 'कोणतेही वस्त्र घालून आत येण्यास पूर्णपणे बंदी आहे.' एकदा वस्त्रे काढली की अहंभाव, गैरसमजुती, राग-लोभ, विचार-विकार एवढेच नव्हे तर श्लील अश्लीलता सगळेच गळून पडते. स्नानानंतर उरते ती शरीर व मनःशुद्धी. मला जपानी स्नानगृहे खूपच आवडली होती. पण माझ्याआधी भाषा शिकणाऱ्या एका भारतीय अधिकाऱ्याची गोष्ट फारच वेगळी होती.तो आपल्या अंडरवेअरसहीत स्नान करण्यासाठी निघाला. व्यवस्थापकाने त्याला आत जायला नकार दिला. बाचाबाची करून तो तिथून मागे परतला. 'आयुष्यात पुन्हा कधी जपानी स्नानगृहात जाणार नाही', असा आपला निश्चय त्याने शिक्षिकांना ऐकवला. माझ्या मते जपानी समाज समजावून घेण्याची संधी त्याने या स्नानगृहाबाहेरच बंद करून टाकली होती. पण मी त्याला तरी दोष कसा देऊ? प्रत्येक संस्कृतीच नव्हे; तर प्रत्येक माणूस एकमेवाद्वितीय असतो. ती जशीच्या तशी स्वीकारणे हा सगळ्यांत मोठा अभ्यास असतो, हे तर मला या स्नानगृहांनीच तर शिकवले होते.
(क्रमशः) 

Tags: पोस्ट ऑफिस भारत दूतावास जपान ज्ञानेश्वर मुळे Post Office India Embassy Japan Dnyaneshwar Mule weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ज्ञानेश्वर मुळे ( 75 लेख )
dmulay@hotmail.com

भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी, लेखक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी