डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मुस्लिम सत्यशोधक चळवळीची अर्धशतकी वाटचाल (भाग : 1)

चळवळीचे जनक मरहूम हमीद दलवाई यांनी 1970 च्या दशकापासून आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून हा प्रश्न देशासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शिवाय या बाबतीत इंडियन सेक्युलर सोसायटीचे अध्यक्ष प्रा.ए.बी. शहा आणि या चळवळीशी प्रत्यक्ष संबंध नसलेले परंतु तिच्याविषयी आस्था असलेले भाई वैद्य, ग.प्र. प्रधान, ना.ग.गोरे, बाबा आढाव यांसारख्या अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांचे सहकार्यही त्यांना मिळाले. परंतु या सर्वांविषयी योग्य तो आदर राखून बोलावेसे वाटते की, राजकारणाचे उपरोल्लिखित विविध पैलू विचारात न घेता किंवा वरवर दिसणाऱ्या या राजकारणामागे आणखी काही रहस्यमय गुंतागुंत आहे का, याचा विचार हमीद दलवाई व त्यांचे हितचिंतक यापैकी कुणीही केला नाही. 

दि.20 मार्च 1970 रोजी पुणे इथे मुस्लिम सत्यशोधक मंडळ या नावाच्या मुस्लिम समाजातील सुधारणावादी चळवळीची स्थापना झाली. या घटनेला गेल्या मार्चमध्ये पन्नास वर्षे झाली. त्यानिमित्ताने या चळवळीचे विविध अंगांनी मूल्यमापन करण्याच्या हा प्रयत्न आहे. 

1. इस्लामच्या चौदाशे वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास भारतीय मुसलमानांच्या प्रश्नांचे दोन घटक किंवा टप्पे असल्याचे आढळून येते. एक म्हणजे, शरियतच्या कायद्यातील अन्याय्य तरतुदी आणि त्यामुळे मुस्लिम महिलांवर होणारे अन्याय, तसेच स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय मुसलमानांचे धर्मवादी राजकारण, असे या विषयाचे दोन प्रमुख घटक मानता येतील. 

2. या दोन्ही घटकांचा भारतीय मुसलमानांच्या वर्तमानावर व भविष्यात दूरगामी परिणाम होत असल्यामुळे पुरोगामी चळवळीच्या विषयपत्रिकेवर दोन्ही घटकांना अग्रक्रमाने स्थान मिळणे क्रमप्राप्त होते आणि तसे ते मिळाल्यावरही भारतीय मुसलमानांच्या सामाजिक व कौटुंबिक जीवनात आणखी एक प्रभावशाली घटक सतत कार्यरत असतो. तो म्हणजे- सनातनी उलेमा (धर्मपंडित) आणि त्यांची दारुल उलुम (देवबंद), जमाते इस्लामी, जमाते हिंदसारखी तितकीच सनातनी धर्मपीठे. आजही या उलेमांचा व धर्मपीठांचा भारतीय मुसलमानांच्या आचार- विचारांवर जबरदस्त प्रभाव आहे. पण तो इस्लामी धर्म किंवा धर्मपरंपरांशी नसून पुरुषप्रधान संस्कृतीशी आहे. 

3. या विषयाला आणखी एक पैलू आहे. शरियतच्या कायद्यातील बदलामुळे किंवा त्याऐवजी नवा समन्यायी कायदा आणल्यामुळे सर्व प्रश्न सुटतात, असे नाही. अशा परिवर्तनाबरोबर समाजाची मानसिकताही बदलणे तितकेच आवश्यक असते. कारण सनातनी किंवा पारंपरिक समाजात माणसांची मते आणि बुद्धी दोन्ही गुलाम झालेली असतात. सामाजिक परिवर्तनाच्या कुठल्याही प्रयत्नांना त्यांचा विरोध असतो. तो डावलून सामाजिक सुधारणांचा प्रयत्न केल्यास ती त्यांना पचवता येत नाही. म्हणून समाजप्रबोधन आणि परिवर्तनाचा विचार करताना या वास्तवाचीही दखल घेणे तितकेच आवश्यक असते. 
4. काळाच्या संदर्भात मुस्लिम मानसिकतेचा विचार केल्यास त्याचे तीन टप्पे आपणास स्पष्ट दिसतात. ब्रिटिशांच्या राजवटीत म्हणजे 1858 ते 1947 या नव्वद वर्षांच्या कालखंडात ब्रिटिशांनी कूटनीतीचा वापर करून हिंदू आणि मुस्लिम हे दोन समाज एकत्र राहणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली. याचे पुरावे लंडनच्या इंडिया लायब्ररीत संशोधकांसाठी उपलब्ध आहेत. जागेअभावी त्या सर्वांची सविस्तर दखल घेणे शक्य नाही. पण त्यांच्या कूटनीतीची कल्पना यावी म्हणून त्यातील एका पत्राचा उल्लेख निश्चितच करता येईल. दि. 22 सप्टेंबर 1922 रोजी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड रिडिंग यांनी ब्रिटिश मंत्रिमंडळातील भारतीय मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, I have just sent you a telegram which will show you how near we have been to complete break between Hindus and Muslims. I have been giving the greatest attention to this possibility. (Facts are Facts - Untold Story of Partition, लेखक- खान वली खान, विकास प्रकाशन, दिल्ली) 

5. मुस्लिम मानसिकतेचा दुसरा टप्पा आढळतो तो स्वातंत्र्यानंतर निवडणुकांच्या राजकारणात. मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळावीत अशा तऱ्हेने काँग्रेस पक्षाने भारतीय मुसलमानांसंबंधीचे धोरण अवलंबिले होते. पुढील काळात याच रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. मुसलमानांचा अनुनय हा शब्दप्रयोगही याच काळात आणि याच कारणास्तव प्रचलित झाला. भारतीय मुसलमानांच्या धर्मवादी (Communal) राजकारणाचे रहस्यही याच पार्श्वभूमीत आहे. त्याचबरोबर याची प्रतिक्रिया म्हणून हिंदुत्ववादी प्रवृत्तीही प्रबळ होण्यास याच काळात सुरुवात झाली. 

6. भारतीय मुसलमानांच्या मानसिक आणि वैचारिक जडण-घडणीत सनातनी उलेमांची भूमिकाही निर्णायक ठरली आहे, हेही इथे लक्षात घेतले पाहिजे. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ ते मुस्लिम जनमानसावर प्रभुत्व गाजवीत आहेत. इतकेच नव्हे, तर भारत सरकारवरही त्यांचा असाच प्रभाव आहे. त्यामुळे मुसलमानांशी संबंधित कोणताही निर्णय घेताना त्यांनाच विेशासात घेतले जाते किंवा त्यांच्याबरोबर चर्चा केली जाते. भारतीय मुसलमानांचा प्रश्न असा व्यापक तर आहेच, पण त्याला अनेक पैलूही आहेत. या व्यापक पार्श्वभूमीचा आणि त्यातील विविध पैलूंचा किंवा घटकांचा एकत्रित विचार केल्याशिवाय या प्रश्नाचे तर्कशुद्ध किंवा वास्तवदर्शी उत्तर सापडू शकणार नाही. 

हमीद दलवार्इंनी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अवश्य केला, पण त्यांनी या विषयाचे व्यापक स्वरूप व विविध पैलू विचारात घेतले नाहीत. त्यांनी या प्रश्नाचे फक्त वर्तमानकालीन स्वरूपच विचारात घेऊन त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. हे विश्लेषण चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही; पण अपुरे झाले आहे, असे मात्र म्हणता येईल. Muslim Politics in India या त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात याविषयीचे संदर्भ आले आहेत. 

7. भारतीय मुसलमानांचे धर्मवादी राजकारण ही या नाण्याची एक बाजू झाली. मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील किंवा शरियतच्या कायद्यातील कालबाह्य तरतुदी- विशेषतः विवाह, घटस्फोट व पोटगी- यांच्याशी संबंधित बाबींमुळे मुस्लिम महिलांवर होणारे अन्याय ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे. म्हणूनच तिला सत्यशोधक चळवळीच्या अजेंड्यावर महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. या दोन्ही विषयांचा संबंध धर्म (इस्लाम) व धार्मिक परंपरांशी असल्यामुळे त्यातील कुठल्याही बदलाला एकीकडे सनातनी धर्मपंडित (उलेमा) आणि त्यांची धर्मपीठे, तर दुसरीकडे त्यांच्या प्रश्नाखाली असलेले सामान्य मुसलमान पोटतिडिकीने विरोध करत असतात. त्यामुळे मुस्लिम सत्यशोधक मंडळासारख्या परिवर्तनवादी चळवळीला सनातनी उलेमांशी संघर्ष करणे अपरिहार्य होऊन बसते. असा संघर्ष करायचा असेल, तर धर्म (इस्लाम) आणि धार्मिक परंपरांची चिकित्साही अटळ होऊन बसते. पण या बाबतीतही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोच. तो म्हणजे, धर्मचिकित्सेचा नेमका अर्थ कोणता? मुस्लिम सत्यशोधक चळवळीला समता, न्याय व मानवतावाद... अशा आधुनिक मूल्यांची बैठक असल्यामुळे धर्मपरंपरांकडे वळण्याची गरजच नाही... असा एक विचारप्रवाह चळवळीच्या सैद्धांतिक भूमिकेसंदर्भात अधूनमधून का होईना, पण चर्चेत येत राहिला आहे. 

पण एकूणातच प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळीचा थेट संबंध धर्म व धार्मिक परंपरांशी असल्यामुळे धर्मचिकित्सा अपरिहार्य असते. म्हणून तिची  व्यापक व्याख्या करणेही तितकेच आवश्यक असते. 

8. धर्मचिकित्सा म्हणजे धर्मपरंपरेतील कालबाह्य आणि हीन प्रवृतींचाच अभ्यास करणे नव्हे; कारण प्रत्येक पारंपरिक समाजाच्या इतिहासात केवळ हीन व अन्यायकारक प्रवृत्तीच निर्माण झालेल्या असतात, असे नव्हे. अशा प्रवृत्तींबरोबरच प्रत्येक समाज आपली अशी संस्कृतीही निर्माण करत असतो. काळाच्या ओघात त्या विकसितही होत असतात आणि समृद्धही होत असतात. सर्वच संस्कृतींना हा नियम लागू होतो, असेही म्हणता येणार नाही. किंबहुना, काही संस्कृतींचा प्रवास उलट दिशेने होत आला आहे, असेच म्हणावे लागेल. म्हणूनच धर्माची किंवा धार्मिक परंपरांची चिकित्सक समीक्षा करताना त्या-त्या समाजाच्या सांस्कृतिक संचिताचीही दखल घेणे तितकेच आवश्यक असते. कारण त्यामुळेच विविध संस्कृतीचा दर्जा अभ्यासकांना निश्चित करता येतो. तेव्हा संस्कृतींचा विचार करताना तिने समाजावर केलेले संस्कार किंवा त्याला लावलेले वळण याचे तारतम्य ठेवूनच धर्मचिकित्सा करणे परिवर्तनवादी चळवळीच्या दृष्टीने योग्य होईल. किंबहुना, ते त्यांच्यासाठी अपरिहार्य आहे, असे म्हणणे अधिक योग्य होईल. 

प्रा.अ.भि. शहा आणि नरहर कुरुंदकर हे दोघेही मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे हितचिंतक व मार्गदर्शक मानले जात होते. परंतु या दोघांनी इस्लामची केलेली चिकित्सा एकांगी, नकारात्मक आणि हिंदुत्ववादाच्या दिशेने जाणारी होती. वसंत पळशीकरांनी कुरुंदकरांच्या इस्लामी समीक्षेची चिकित्सा केली आहे, पण शहांच्या तत्सम विचारांची समीक्षा अजून तरी कुणी केलेली नाही. मात्र What Ails Our Muslims या त्यांच्या पुस्तिकेत पृष्ठ 13 वर त्यांनी असा उल्लेख केला आहे- (मराठी अनुवाद - भारतात इस्लामसमोर उभ्या असलेल्या आधुनिकीकरणाच्या आव्हानामुळे भारतीय मुसलमानांना त्यांच्या धार्मिक परंपरांचा विधायक अन्वयार्थ लावण्याची संधी प्राप्त झाली आहे.) 

इस्लामी परंपरांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने प्रा.शहा यांनी केलेला हा उल्लेख महत्त्वाचा आहे, कारण मुसलमानांच्या आचार-विचारांच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया गतिशील झाली असती; परंतु शहांच्या या सूचनेची दखल कुणीच घेतलीच नाही. 

इतिहासाचे विविध पैलू 

भारतीय मुसलमानांच्या हजार-दीड हजार वर्षांच्या इतिहासाचा वेध घेतला, तर या विषयाचे तीन विविध पैलू असल्याचे लक्षात येते. एक म्हणजे- स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लिम प्रश्नाचे स्वरूप व कारणे. दोन स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम मतांसाठी अनुनयाचे राजकारण. आणि तिसरा पैलू म्हणजे- इस्लामी धर्मपंडितांनी निर्माण केलेली मुसलमानांची मानसिकता. या तिन्ही पैलूंचा एकत्रित विचार केला की, मुस्लिम राजकारणाचे वस्तुदर्शी स्वरूपही आपल्या लक्षात येते. पर्यायाने या समस्येच्या सोडवणुकीसाठी सत्यशोधक चळवळीने स्वीकारलेल्या मार्गाची योग्यायोग्यताही तपासून पाहता येते. 

चळवळीचे जनक मरहूम हमीद दलवाई यांनी 1970 च्या दशकापासून आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून हा प्रश्न देशासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शिवाय या बाबतीत इंडियन सेक्युलर सोसायटीचे अध्यक्ष प्रा.ए.बी. शहा आणि या चळवळीशी प्रत्यक्ष संबंध नसलेले परंतु तिच्याविषयी आस्था असलेले भाई वैद्य, ग.प्र. प्रधान, ना.ग.गोरे, बाबा आढाव यांसारख्या अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांचे सहकार्यही त्यांना मिळाले. 

परंतु या सर्वांविषयी योग्य तो आदर राखून बोलावेसे वाटते की, राजकारणाचे उपरोल्लिखित विविध पैलू विचारात न घेता किंवा वरवर दिसणाऱ्या या राजकारणामागे आणखी काही रहस्यमय गुंतागुंत आहे का, याचा विचार हमीद दलवाई व त्यांचे हितचिंतक यापैकी कुणीही केला नाही. परिणामतः चळवळीला भरपूर प्रसिद्धी मिळाली, हमीदभाई भारतीय मुसलमानांच्या राजकारणाचे एकमेव अभ्यासक आहेत असे त्यांचे कौतुकही झाले; पण चळवळीला त्याप्रमाणात यश मिळाले नाही. अर्थात याच काळातील हमीदभार्इंचे आजारपण व त्यांचे अकाली निधन, याचेही भान ठेवले पाहिजे. 

परिवर्तनाची सुरुवात 

दलवाई तसे विचाराने समाजवादी, त्यामुळे पुण्यातील समाजवादी मंडळींचे त्यांच्याकडे लक्ष जाणे स्वाभाविक होते. दलवार्इंचे क्रांतिकारी विचार केवळ व्याख्याने किंवा वृत्तपत्रीय लेखनापुरतेच मर्यादित राहू नयेत, त्यातून काही तरी कायमस्वरूपी संस्थात्मक किंवा संघटनात्मक कार्य  निर्माण होणे मुस्लिम समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे- असा विचार पुण्यातील याच समाजवादी मंडळींच्या मनात घोळत होता. राष्ट्र सेवा दलातील काही सैनिक तसेच पुरोगामी विचारांचे काही तरुण यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून मुस्लिम सत्यशोधक मंडळ या मुस्लिम समाजातील पुरोगामी विचाराच्या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या नावावरून म.ज्योतिबा फुले व त्यांचे सामाजिक कार्य हीच त्या कार्याची प्रेरणा होती, हे लक्षात येते. पण म.ज्योतिबा फुलेंच्या कार्याची प्रेरणा महंमद पैगंबर होते, याकडे मात्र कुणाचेच लक्ष गेले नाही. म.फुलेंनी जेव्हा सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली, तेव्हा त्यासाठी त्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली होती. या पुस्तिकेच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर त्यांचा एक अखंड त्यांनी प्रसिद्ध केला आहे. 

सातव्या सदीची पैगंबरी खूण प्रमाण दाविती कुराणात। 
जगी स्त्री-पुरुष सत्यधर्मी असती जोति म्हणे॥ 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाल्यानंतर वर्षभरात म्हणजे 27-28 डिसेंबर 1971 रोजी पुणे येथे मंडळातर्फे पहिल्या मुस्लिम महिला परिषदचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत झालेल्या कार्यवाहीतून मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील अन्यायकारक तरतुदी, मुस्लिम महिलांवर होणारे अन्याय या गोष्टी निश्चितच चव्हाट्यावर आल्या. इतकेच नव्हे, तर 1975 मध्ये मंडळाने आयोजित केलेल्या घटस्फोटित महिला परिषदेमुळे मुस्लिम महिलांवरील अन्याय-अत्याचार अधिकच अधोरेखित झाले, यात शंका नाही. पण हे मान्य केले, तरी ते पुरेसे नव्हते. सत्यशोधक पुरोगामी चळवळीत सभा, परिषद, आंदोलने यांसारखे कृतिकार्यक्रम चळवळीचे महत्त्वाचे घटक असतात. पण त्यांचे स्वरूप साधनासारखे असते, ते साध्य नसते. ज्या कायद्यातील त्रुटींमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय होत असतात, तो कायदा आजच्या काळाशी सर्वार्थाने सुसंगत होईल अशा रीतीने त्यात परिवर्तन करणे आणि त्यासाठी सामान्य मुस्लिमांची मानसिकता बदलणे; ज्या परंपरेत मानवी बुद्धी गुलाम झालेली असते त्या पारंपरिक गुलामीतून मानवी बुद्धी मुक्त करणे, हे अशा चळवळींचे साध्य असते. 

प्रबोधन-परिवर्तन यांसारख्या चळवळीत आंदोलने परिषदांसारखे क्रियाशील कार्यक्रम आवश्यक असतात, तितकेच अभ्यासवर्ग-बौद्धिके यांसारखे माणसाला बौद्धिक दृष्ट्या प्रगल्भ करणारे कार्यक्रमही आवश्यक असतात. अशा बौद्धिक कार्यक्रमांमुळेच चळवळीची कक्षा रुंदावत जाते आणि तिचे कार्य कायमस्वरूपी होते. गेल्या पन्नास वर्षांत या दृष्टीने फारसे काही झालेले नाही. परिणामतः चळवळीशी संबंधित विषयाचा अभ्यास करण्याची सवयच कार्यकर्त्यांना लागली नाही. 

सर्वच पारंपरिक समाजाचे कुठले ना कुठले गट दुसऱ्या समाजगटावर अन्याय करतच असतात. शिवाय त्यांना धर्ममान्यता असल्यामुळे त्यात कसलाही बदल किंवा परिवर्तन अशक्य होऊन बसते. या नियमाला इस्लामचा मात्र अपवाद करावा लागेल. कारण इस्लामी धर्मशास्त्राने शरियत आणि न्यायशास्त्राला एक समाजशास्त्र मानून त्यांचा विकास केला. या विकासप्रक्रियेतूनच इस्लामी न्यायशास्त्राची चार साधने, चार संप्रदाय निर्माण झाले. इतकेच नव्हे, तर भविष्यात मुस्लिम समाजासमोर येणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या सोडविता याव्यात, म्हणून इस्लामी न्यायशास्त्रात इज्तेहादचा सिद्धांत सांगण्यात आला आहे. याचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर असे म्हणता येईल की, भविष्यकाळात समाजासमोर निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्यांवर मार्ग काढण्यास साह्यभूत होणारा सिद्धांत. वास्तविक हा सिद्धांत सर्वमावेशक व सार्वकालिक आहे. परंतु पंधराव्या शतकापासून प्रभावी होत गेलेल्या उलेमांच्या संघटनांनी तो कालबाह्य ठरवून बासनात बांधून त्या सिद्धांताचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत, असा त्याच्यावर शिक्का मारला (The doors of Ijtehad have been closed). वास्तविक मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील कुठल्याही बदलाला आपल्या साऱ्या शक्तिनिशी विरोध करणाऱ्या सनातनी उलेमांना इज्तेहादच्या सिद्धांताचे दरवाजे बंद करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न खणखणीतपणे विचारावयास हवा आहे. पण आजपर्यंत असा प्रश्न कुणीही विचारलेला नाही, त्यात मुस्लिम सत्यशोधक संघटनाही आली. 

वरील विवेचनाचा सारासार बुद्धीने विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की, मुस्लिम समाजाचे सनातनी धर्मपंडित काहीही म्हणत असले तरी इस्लामी न्यायशास्त्र किंवा कायदा त्याच्या जन्मापासून आजपर्यंत अपरिवर्तनीय अवस्थेत कधीच राहिला नाही. पंधराव्या शतकापर्यंत त्यात सतत परिवर्तन होत आले आहे, हे नाकारता न येणारे  वास्तव आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की, मुस्लिम समाजाचे नेते आपल्याच समाजाची दिशाभूल करत आहेत. 

म्हणूनच मुस्लिम सत्यशोधक मंडळाने इस्लामी न्यायशास्त्राच्या या चौदाशे वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास करूनच या विषयासंबंधीची आपली सैद्धांतिक किंवा वैचारिक भूमिका व आपला कृतिकार्यक्रम निश्चित करावयास हवा होता; पण हमीदभार्इंच्या हयातीत आणि त्यांच्या निधनानंतरही हे घडले नाही. कारण इस्लामच्या इतिहासाचा सर्वांगीण अभ्यास करण्याची गरज हमीद दलवाई किंवा त्यांच्या संघटनेतील सहकारी यापैकी कुणालाही भासली नाही. प्रा.ए.बी. शहा आणि नरहर कुरुंदकर यांनी इस्लामच्या अभ्यास केला होता, पण या उभयतांचा दृष्टिकोन नकारार्थी आणि पूर्वग्रहदूषित होता. त्यामुळे चळवळीच्या कार्याची दिशा सुरुवातीपासूनच चुकत गेली. 

मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील परिवर्तन हा चळवळीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील अग्रक्रमाचा विषय होता व तो योग्य होता. पण या कायद्यात काही त्रुटी आहेत, म्हणून त्याच्यात कालानुरूप किंवा गरजेनुसार बदल केले पाहिजेत, हा सत्यशोधक चळवळीचा उद्देशही योग्य असाच होता. त्यासाठी इस्लामी धर्मशास्त्राचा अभ्यास अपरिहार्य होता, त्याशिवाय त्या कायद्यातील त्रुटी व त्या दुरुस्त करण्याचे मार्ग आपण समजू शकणार नाहीत. काळाच्या ओघात बदलणाऱ्या परिस्थितीत कायदा अद्ययावत करू शकेल असा इज्तेहादचा सिद्धांत इस्लामी न्यायशास्त्रात देण्यात आला असताना तो बासनात बांधून का ठेवला, असा थेट प्रश्न या पुरोगामी चळवळीने सनातनी उलेमांना विचारायला हवा होता; पण असे धाडस आजपर्यंत कुणीच दाखवलेले नाही. 

यासंदर्भात आणखी एक मुद्दा विचारात घेणे आवश्यक आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून भारतातील उलेमा आणि त्यांची धर्मपीठे अधिकाधिक प्रभावी होत गेली. आज तर अशी परिस्थिती अशी आहे की, त्यांच्या परवानगीशिवाय भारतीय मुसलमानांचे पान हलत नाही. मुसलमानांच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवनावर उलेमाच अधिकार गाजवत असतात. अनेकदा त्यांनी प्रसिद्ध केलेले फतवे अयोग्य कारणास्तव व अयोग्य रीतीने जाहीर केलेले असतात. 

मुळात उलेमा आणि त्यांची दारुल-उलुम (देवबंद), जमात-ए-इस्लामी, जमात-ए-उलेमा-ए-हिंद, फिरंगी महाल, अहले हदीस यांसारख्या धर्मपीठांच्या प्रभावाखालीच भारतीय मुसलमान जगत असतात. अशा परिस्थितीत सामान्य मुसलमानांना या सनातनी उलेमांच्या प्रभावातून मुक्त करणे हेच प्रबोधन आणि परिवर्तनवादी चळवळीचे सर्वांत महत्त्वाचे धोरण असले पाहिजे. हे धोरण स्वीकारायचे असेल, तर इस्लामी धर्मपरंपरा वास्तवदर्शी आणि बुद्धिवादी दृष्टिकोनातून जाणून घेणे, हाच एक परिणामकारक मार्ग होता. या परिणामकारक मार्गाचा अवलंब करण्यापेक्षा मुस्लिम सत्यशोधक मंडळाने इस्लाम आणि इस्लामचे संस्थापक यांनाच आपल्या विरोधाचे लक्ष्य केले. त्यामुळे उलेमांप्रमाणेच सामान्य मुसलमानही या पुरोगामी चळवळीच्या विरोधात गेला. परिणामतः भारतीय मुसलमानांच्या आचार-विचारांवरील उलेमांची पक्कड अधिकच घट्ट झाली. 

(क्रमश:) 

भारत हे राष्ट्र आधुनिक व धर्मनिरपेक्ष व्हावे आणि राष्ट्रीय एकात्मता अधिकाधिक मजबूत व्हावी, हेच अंतिम ध्येय मानून कार्यरत राहिलेल्या हमीद दलवाई यांनी मुस्लिम समाजातील सुधारणांसाठी 1965 ते 77 या काळात अथक परिश्रम घेतले. केवळ 45 वर्षांचे आयुष्य वाट्याला आल्याने, तो झंझावात अकाली थांबला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वैचारिक व कृतिशील वारसा सांगत विविध स्तरांवर काही लोक आपापल्या क्षमतेनुसार, आकलनानुसार व उपलब्ध परिस्थितीत कार्यरत राहिले. त्यावर दृष्टिक्षेप टाकणारा ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळाची 50 वर्षे’ हा दीर्घ लेख, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी लिहिला होता, तो आम्ही फेब्रुवारी व मार्चमध्ये सलग पाच अंकांमधून प्रसिद्ध केला होता. मात्र मंडळाचे सुरुवातीच्या काळातील सचिव आणि हमीद दलवाई यांचे सहकारी राहिलेले अब्दुल कादर मुकादम यांनी, याच अर्धशतकी वाटचालीसंदर्भात काही वेगळी निरीक्षणे व निष्कर्ष सांगणारा दीर्घ लेख लिहिला आहे, तो आम्ही तीन भागांत (सलग तीन अंकांत) प्रसिद्ध करीत आहोत.

संपादक, साधना  

हेही वाचा :

मुस्लिम सत्यशोधक चळवळीची अर्धशतकी वाटचाल (भाग : 2) : अब्दुल कादर मुकादम  

Tags: मुस्लिम सत्यशोधक मंडळ हमीद दलवाई नरहर कुरुंदकर अ भि शहा अब्दुल कादर मुकादम muslim satyshodhak mandal muslim poltics in india amid dalwai a b shaha narhar kurundakar Abdul kadar mukadam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अब्दुल कादर मुकादम,  मुंबई
arumukadam@gmail.com

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी सचिव व ज्येष्ठ कार्यकर्ते 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात