डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुस्लिम सत्यशोधक चळवळीची अर्धशतकी वाटचाल (भाग : 3)

हमीदभाईंचे निधन 3 मे 1977 रोजी झाले. आजाराचे गांभीर्य पाहता, त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल अगोदरच लागली होती. तरीही आपल्या पश्चात या चळवळीची सूत्रे कुणाच्या हाती द्यायची किंवा तिच्या भावी वाटचालीची कशी व्यवस्था करायची, याविषयी त्यांनी काहीच विचार केलेला नव्हता किंवा ते जाणून- बुजून टाळले होते. चळवळीतील निर्णयप्रक्रियेत कार्यकर्त्यांना काहीच स्थान नव्हते, याचा उल्लेख मागे आलेलाच आहे. पण हमीदभाईंच्या निधनानंतरही या परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही. उलट, हमीदभाईंच्या हयातीत ज्या व्यक्तींचा या चळवळीवर प्रभाव होता, त्याच व्यक्ती या बदललेल्या परिस्थितीत अधिकच क्रियाशील झाल्या होत्या. या हालचालीमध्ये त्यांची भूमिका किंवा उद्दिष्टे समान होती, असे काही आढळले नाही.  

हमीदभाईंच्या निधनानंतर दोन-तीन महिन्यातच त्यांचे निकटचे स्नेही डॉ. अनिल अवचट यांचे ‘हमीद’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. ढोबळ अर्थाने ते हमीदभाईंचे चरित्र नव्हते. पण हमीदभाईंविषयीच्या त्यांच्या आठवणी व त्यातून त्यांना उमगलेला हमीद असे या पुस्तकाचे स्वरूप होते, असे म्हणता येईल. या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सत्यशोधक चळवळीची स्थापना झाली तेव्हापासून हमीदभाईंचे निधन होईपर्यंत म्हणजे 1970 ते 1977 पर्यंतच्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील मर्यादांविषयी कुणीही उघडपणे बोलत नव्हते. डॉ. अवचटांनी हमीदभाईंच्या व्यक्तिमत्त्वातील दोष आणि मर्यादा लोकांसमोर प्रथमच स्पष्टपणे मांडल्या. पुस्तकाच्या शेवटच्या भागात अवचटांनी हमीदभाईंच्या या विषयासंबंधीची काही निरीक्षणे नोंदवली आहेत. 

पृष्ठ 60 वर त्यांनी म्हटले आहे की, शेवटच्या तीन-चार वर्षांत हमीदच्या कार्याचा जोर ओसरत चालला होता. चिरेबंदी बांधणीचा मुस्लिम समाज हे त्याचे मोठे कारण असेल. तरीसुद्धा हे मान्य करावे लागेल की, हमीद व त्याच्या सहकाऱ्यांच्या काही मर्यादा याला जबाबदार आहेत. अवचट पुढे म्हणतात- हमीदच्या वैचारिक धक्क्यामुळे मुस्लिम तरुणांची एक लाट सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे आली. पण पुढे आजतागायत तेच चेहरे कायम राहिले, नवी माणसे येऊच शकली नाहीत. त्यामुळे या जुन्या मंडळींच्या मर्यादा ह्या चळवळीच्या मर्यादा बनल्या. त्यामुळे ही चळवळ मुस्लिम जनमानसात रुजू शकली नाही. हमीद स्वतःच या मुस्लिम समाजात रुजलेला नव्हता. आमच्यात जेवढा वेळ तो घालवायचा, त्याच्या सहस्रांशही त्याने मुस्लिम समाजात घालवला नाही. त्याचा बहुतांश वावर ‘एलिट’ समाजात होता. त्यामुळे मुस्लिम समाजाला हमीदविषयी ‘सेन्स ऑफ बिलॉगिंग’ कधीच आला नाही. (पान-60) 

हमीदभाई आणि अवचट यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, शिवाय त्यांना इतरांच्या तुलनेने त्यांचा प्रत्यक्ष सहवासही बऱ्यापैकी लाभत असे. त्यामुळे त्यांनी हमीदभाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे वरीलप्रमाणे केलेले विश्लेषण वास्तव झाले आहे. अवचट पुढे म्हणतात- हमीद एखाद्या कार्यकर्त्यांवर नाराज झाला की, महिनोन्‌महिने त्याच्याविषयी त्याच्यापाशी व इतरत्र बोलून त्याला नामोहरम करीत असे. हमीदविषयी प्रेम असायचे किंवा त्याच्या निरागस मनाची खात्री असायची म्हणून भांडणे व्हायची नाहीत. पण दैनंदिन कामातला या कार्यकर्त्यांचा उत्साहही जायचा. (पान-63) (प्रस्तुत लेखकाला याचा बराच अनुभव आलेला आहे) 

चळवळीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशीसुद्धा दलवाईंचे संबंध कशा प्रकारचे असत, याचाही अवचटांनी केलेला उल्लेख तसाच वस्तुदर्शी आहे. तथापि, त्यांचे व्यक्तिमत्त्व निरागस होते का? याविषयी शंका घेण्यास जागा आहे. कारण त्यांच्या या काहीशा स्वयंकेंद्री स्वभावामुळे काही कार्यकर्ते नुसतेच दुखावले असे नाहीत, तर त्यांचा आणि चळवळीचा संबंध नेहमीसाठी व कायमचा संपुष्टात आला. त्यांच्या स्वभावात आणखी एक दोष होता. आपले मतभेद मोकळेपणाने त्यांच्यासमोर बोलण्याची कुठल्याही कार्यकर्त्याची हिंमत होत नसे. झिडकारले जाईल, या चिंतेने तो प्रसंग आतल्या आत दडपून जायचा. ज्यांना ते असह्य झाले, ते संघटना सोडून निघून गेले. हमीदभाई आणि त्यांचे इतर सर्व कार्यकर्ते यांच्यात परस्परसहकार्याचे व विेशासाचे संबंध कधीच निर्माण झाले नाही. पर्यायाने चळवळीविषयी त्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण झाली नाही; उलट चळवळीसाठी आपल्या वापर केला जातोय, हीच भावना अधिक प्रबळ होती. 

अवचटांच्या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या पुस्तकाला विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना लाभली आहे. रुळलेल्या वाटेवर नेहमीच भेटणाऱ्या माणसांपेक्षा आडवाटेवरच्या पण सर्वसामान्यांना अपरिचित असलेल्या माणसांच्या मनाचा ठाव घेणे, त्यांच्यातील नातेसंबंध, त्यातील ताणतणाव हेरून त्याचे चित्रण करणे- ही अवचटांप्रमाणे तेंडुलकरांचीही खासियत होती. म्हणूनच ते हमीदभाईंसारख्या बहुपदरी व्यक्तिमत्त्वाचे यथायोग्य चित्रण करू शकले. 

हमीदभाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करताना तेंडुलकरांनी त्यांच्या इमेजचा उल्लेख केला आहे. यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारची इमेज आणि ती प्रत्यक्ष व्यक्ती यांच्यात खरोखरीचे नाते असेलच असे नाही. व्यक्तिशः मला वाटते की, हमीदभाईंचे व्यक्तिमत्त्व दुहेरी होते. एक म्हणजे सत्यशोधक चळवळीचे नेते म्हणून निर्माण झालेली प्रतिमा आणि अवचट म्हणतात त्याप्रमाणे ते ज्या एलिट समाजामध्ये वावरत असत, त्या समाजात असलेली त्यांची प्रतिमा (इमेज)- अशा दुहेरी व्यक्तिमत्त्वाच्या जडण-घडणीतून त्यांच्या दोन प्रतीच तयार झाल्या होत्या. म्हणून काही वेळा त्यांच्या वागण्या-बोलण्यात विसंगती आढळत असे. त्यामुळेच तेंडुलकरांनी त्याचे एखादे मोठे चरित्र लिहिण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. ते विश्वासार्ह व्हावे, म्हणून त्यांनी सूचना केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर लिहिले गेलेले बव्हंशी लेख आणि अग्रलेख अशा चरित्राची साधने ठरू नयेत इतकी ती जुजबी, पोकळ आणि आदर्शाच्या फॅक्टरीत तयार झाल्यासारखी अविेशसनीय आहेत. (संदर्भ- डॉ. अवचट यांच्या हमीद या पुस्तकाची प्रस्तावना) 

चुकलेला मार्ग 

जगातील सर्वच पारंपरिक समाज हे स्थितिप्रिय असतात. त्यामुळे त्या-त्या समाजात तेव्हा परिवर्तन घडवून आणण्यासाठी आधुनिक व पुरोगामी मूल्यावर आधारित चळवळीत सुरू झाल्या, तेव्हा त्यांचा स्थितिप्रिय समाजाशी संघर्ष अटळ झाला होता. 

भारतातले उदाहरण घ्यायचे झाले तर ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे देता येईल. हिंदू समाजातील सनातन गटाबरोबर त्यांना किती कठोर संघर्ष करावा लागला आणि किती संकटे झेलावी लागली, याचे प्रसंग सर्वश्रुत आहेत. 

मुस्लिम सत्यशोधक चळवळ स्थापन झाली, तेव्हा या समाजातील परंपरावादी मंडळींबरोबर असाच संघर्ष होणार, हे अपेक्षित होते. तथापि इतर समाज व मुस्लिम समाज यांच्या परंपरांमध्ये एक गुणात्मक असलेला फरक हमीदभाईंच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आला नाही. त्यामुळे त्यांनी इस्लाम धर्मशास्त्र आणि त्याचे तत्त्वज्ञान यांना लक्ष्य करून टीका करायला सुरुवात केली. त्यामुळे परंपरावादी उलेमाच नव्हे, तर सामान्य मुसलमानही दुखावला गेला. वास्तविक हिंदू, ख्रिश्चन आणि इतर धर्म व इस्लाम यांच्यामध्ये एक गुणात्मक फरक आहे. इतर धर्मांच्या बाबतीत अध्यात्मिक आणि भौतिक जीवनाच्या बाबी एकात्मक असल्यामुळे त्यांच्या परंपरेत कुठलाही बदल करण्यास धर्माचा हाच विरोध होता. त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळीला सहज साध्य यश मिळू शकले नाही. 

इस्लामच्या बाबतीत आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही बाबी एकमेकांहून वेगळ्या आहेत. हे वेगळेपण मौलाना आझाद यांनी त्यांच्या तर्जुमन अल्‌ कुराण या कुराणावरील भाष्याच्या पहिल्या खंडात सविस्तर विश्लेषण करून स्पष्ट केले आहे. दीन आणि मामलात अशी विभागणी केली असून दीन म्हणजे अंतिम सत्य (अल्लाह) हे अपरिवर्तनीय आहे, तर मामलात म्हणजेच दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व बाबी असा त्याचा अर्थ मौलाना आझाद यांनी दाखवून दिला आहे. तसेच बदलणाऱ्या परिस्थितीत समाजाचे नियमन व नियंत्रण करणारे घटक म्हणजेच शरियत (आचारसंहिता) आणि इस्लामी न्यायशास्त्र या परिस्थितीनुसार बदलल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. कुराणाचे या विषयाशी संबंधित संदर्भ विचारात घेतले, तर या बाबी परिवर्तनीय आहेत, हे लक्षात येते. 

इतकेच नव्हे तर, इस्लामच्या जन्मापूर्वी अनेक टोळ्यांमध्ये विखुरलेल्या अरब समाजाला जेव्हा कायदा नव्हता किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा नव्हती, तेव्हा प्रेषितांनी या समाजाला एक सुव्यवस्थित असा कायदा दिला. इतकेच नव्हे, तर काळाच्या प्रवाहात सामाजिक परिस्थिती सतत बदलत असल्यामुळे त्या परिस्थितीला योग्य असे परिवर्तन इस्लामी शरियतमध्ये व कायद्यात कसे घडवून आणता येईल, याचे मार्ग व इज्तिहादसारखे सिद्धांतही इस्लामी धर्मशास्त्रात दिलेले आहेत. परंतु पंधराव्या शतकानंतर उलेमा ही संस्था अधिकाधिक बळकट होत गेली आणि तिने संपूर्ण इस्लामी समाज आपल्या कह्यात ठेवायला सुरुवात केली. 

याचा परिणाम आक्रमक सनातनीपणात होऊन इस्लामी कायद्यात कसलाही बदल न करण्याची भूमिका या उलेमामंडळींनी सतत घेतली. त्याचे कारण इतकेच की, कायद्यावरील आपल्या प्रभुत्वामुळे संपूर्ण समाजाला आपल्या ताब्यात ठेवता येईल, असा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे इस्लामी न्यायशास्त्राला चार-पाच शतकांची विकासप्रक्रिया असूनही त्याची त्यांनी कधीही दखल घेतली नाही. म्हणूनच इस्लामी न्यायशास्त्राची चार साधने, चार संप्रदाय आणि इज्तिहादसारखा सर्वकालीन लवचिक सिद्धांतसुद्धा त्यांनी जाणून-बुजून दुर्लक्षित केला. मुस्लिम समाजातील पुरोगामी चळवळीने हा एक गुणात्मक फरक लक्षात घेणे अतिशय आवश्यक होते. कारण इस्लामी परंपरेतील हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन परिवर्तनाची चळवळ पुढे नेताना इस्लामी धर्मशास्त्र, परंपरा किंवा पैगंबर यांना लक्ष्य करण्याऐवजी या उलेमांना आणि त्यांच्या तशाच आक्रमक धर्मपीठांना लक्ष्य करणे (टार्गेट) अपरिहार्य ठरले असते व शक्यही झाले असते. पण त्यासाठी मागे नमूद केल्याप्रमाणे इस्लामचा बुद्धिवादी अभ्यास आवश्यक होता. त्यामुळे त्यांच्या सनातनी उलेमांना आव्हान देणे आणि त्यांच्यातील असंख्य विसंगती लोकांसमोर मांडणे शक्य झाले असते. 

जगातील सर्वच पारंपरिक समाज स्थितिप्रिय असतात. अशा समाजामध्ये काही कालबाह्य रूढी-परंपरा असतातच. त्यामुळे समाजातील काही गटांवर अन्याय- अत्याचार होत असतात. परंतु काळाच्या ओघात काही द्रष्ट्या सुधारकांना या अन्यायाची जाणीव होते आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे, असे त्यांना प्रकर्षाने वाटते. या जाणिवेतच समाजसुधारणेच्या चळवळीचे बीज असते, असे जगाच्या इतिहासावरून दिसते. या समाजसुधारणेच्या चळवळीत परस्परविरोधी दोन पक्ष असणे हेही ओघानेच आले. यातील पहिला पक्ष साहजिकच अशा सुधारणांना पोटतिडिकीने विरोध करणाऱ्या धर्ममार्तंडांचा किंवा धर्मवादी नेत्यांचा असतो, तर दुसरा पक्ष सामाजिक सुधारणावाद्यांचा असतो. या पक्षाला समाजातील कालबाह्य व अन्यायकारक तरतुदी नष्ट करून समता व न्याय या आधुनिक मूल्यांवर समाजनिर्मितीची आच असते. म्हणूनच समाजसुधारणेच्या अशा चळवळीत किंवा दोन्ही पक्षांत संघर्ष अटळ होऊन बसतो. 

पारंपरिक रूढी, परंपरा किंवा कायदेकानून हे दैवी किंवा ईश्वरीय असतात. त्यात बदल करण्याचा अधिकार कुणाही मानवाला नसतो, अशी या सनातनी विरोधकांची भूमिका असते. अर्थात हा विरोध धर्माच्या नावाने होत असला तरी, धर्माशी त्याचा काही संबंध नसतो; तो असतो पुरुषप्रधान संस्कृतीशी. कारण अशा समाजव्यवस्थेत या सनातनी धर्मपंडितांचे आणि सामान्य जनतेचेही (पुरुषाचे) हितसंबंध गुंतलेले असतात. परंतु प्रत्येक समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी व वर्तमानकालीन परिस्थिती भिन्न असल्यामुळे त्या-त्या परिस्थितीचा स्वतंत्र अभ्यास करूनच परिवर्तनवादी चळवळीची दिशा व स्वरूप निश्चित करणे आवश्यक असते. तसे झाले तरच चळवळ योग्य दिशेने जाऊ शकली, असे म्हणता येईल. 

पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजात सुरू झालेल्या मुस्लिम सत्यशोधक चळवळीला हा नियम लागू होतो. या संघटनेचे आद्यप्रवर्तक आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणारे त्यांचे हितचिंतक यांना अशा चळवळीची गरज निश्चितच जाणवली होती. परंतु पंधराशे वर्षांपूर्वी जन्मास आलेल्या धार्मिक आणि सामाजिक परंपरांचे पुरेसे आकलन त्यांना झालेले नव्हते किंवा त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असावे, असे म्हणावे लागेल. 

इस्लामच्या पंधराशे वर्षांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास केला, तर या चळवळीचा सैद्धांतिक व कृतिशील कार्यक्रम आणि त्यासाठी स्वीकारलेला मार्ग चुकला होता, असाच निष्कर्ष काढावा लागतो. 

कुरआनातील या विषयाशी संबंधित संदर्भ विचारात घेतले की, भौतिक बाबी परिवर्तनीय आहेत हेच स्पष्ट होते. या तरतुदींमुळे सातव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत इस्लामी आचारसंहिता (शरियत) आणि न्यायशास्त्र (फिकह) या दोन्ही समाजशास्त्रांचा विकास झाला, परंतु चौदाव्या शतकापासून सनातनी उलेमा व त्यांची तितकीच सनातनी धर्मपीठे यांनी या सर्व तरतुदी बंद करून टाकल्या. त्यामुळे इस्लामी न्यायशास्त्राची अंगभूत गतिशीलता नष्ट होऊन संपूर्ण समाजाला कुंठितावस्था प्राप्त झाली. या परिस्थितीला इस्लामी धर्मशास्त्र किंवा त्यांचे संस्थापक (पैगंबर) जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही; याला फक्त सनातनी उलेमा आणि त्यांची धर्मपीठे जबाबदार आहेत. या परिस्थितीशी इस्लामी धर्मशास्त्राचा काहीही संबंध नाही. वर म्हटल्याप्रमाणे तिचा संबंध पुरुषप्रधान संस्कृतीशी आहे. मुस्लिम पुरुषाला झुकते माप देणाऱ्या कायद्यातील कुठल्याही बदलाला असलेला विरोध बुरखापद्धती, कुटुंबनियोजन, महिलांना शिक्षणापासून परावृत्त ठेवणे अशा अनेक गोष्टींतून सनातनी उलेमांचा पुरुषप्रधान संस्कृतीविषयीचा आग्रह अस्पष्ट होतो. म्हणूनच परिवर्तनवादी चळवळीचा संघर्ष या सनातनी उलेमांच्या विरोधात व्हावयास हवा होता. पण तसे घडले नाही. म्हणूनच मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे उद्दिष्ट योग्य होते किंवा आहे, पण मार्ग चुकला- असे म्हणावे लागते. 

दुसरे पर्व 

हमीदभाईंचे निधन 3 मे 1977 रोजी झाले. आजाराचे गांभीर्य पाहता, त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल अगोदरच लागली होती. तरीही आपल्या पश्चात या चळवळीची सूत्रे कुणाच्या हाती द्यायची किंवा तिच्या भावी वाटचालीची कशी व्यवस्था करायची, याविषयी त्यांनी काहीच विचार केलेला नव्हता किंवा ते जाणून-बुजून टाळले होते. चळवळीतील निर्णयप्रक्रियेत कार्यकर्त्यांना काहीच स्थान नव्हते, याचा उल्लेख मागे आलेलाच आहे. पण हमीदभाईंच्या निधनानंतरही या परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही. उलट, हमीदभाईंच्या हयातीत ज्या व्यक्तींचा या चळवळीवर प्रभाव होता, त्याच व्यक्ती या बदललेल्या परिस्थितीत अधिकच क्रियाशील झाल्या होत्या. या हालचालीमध्ये त्यांची भूमिका किंवा उद्दिष्टे समान होती, असे काही आढळले नाही. पण त्या सगळ्या हालचालीतून जे काही घडले, ते चळवळीच्या प्रसारासाठी योग्य होते, असे आजवरच्या अनुभवावरून दिसत नाही. 

मुस्लिम सत्यशोधक चळवळीसारख्या समाजप्रबोधन व परिवर्तनाच्या संघटना या कामगार व शेतकरी- कास्तकारांच्या चळवळीसारख्या लोकचळवळी (मास मूव्हमेंट) होऊ शकत नाहीत. किंवा त्या केडर संघटनांसारख्या बंदिस्तही असू शकत नाही, हे मान्य केले तरी त्यांना काही किमान शिस्त किंवा नियमांचे बंधन पाळावे लागते. संघटनेची स्थापना झाली, तेव्हा हमीदभाई आणि त्यांचे तेव्हाचे निकटचे सहकारी यांना त्याची जाणीव होती. म्हणूनच 1973 मध्ये संघटनेची नियमावली-घटना तयार करण्यात आली व त्यानुसार संघटनेची नोंदणीही झाली; परंतु त्यातील नियम व तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी मात्र कधीच झाली नाही. अपवाद करायचा झाला तर विद्यमान अध्यक्षांचा करता येईल. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी संघटनेला काहीशी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, असे म्हणता येईल. पैशांचा हिशेब ठेवण्याबाबतीत त्यांना थोड्याफार प्रमाणात यशही आले. पण तरीही जुन्या परंपरा अजूनही चालू आहेत. 

सामाजिक प्रबोधन व परिवर्तन हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. साहजिकच त्यासाठी आवश्यक ती वैचारिक व सैद्धांतिक बैठकही आहे. काही मूल्यांची ही बांधिलकी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे. त्यासाठी घटनेत तरतूदही करण्यात आलेली आहे. या संघटनेचे सदस्य होण्यासाठी आवेदन पत्र/अर्ज सादर करावा लागतो आणि त्याचबरोबर संस्थेच्या ध्येय-धोरणाशी एकनिष्ठ राहण्याचे हमी देणारे लेखी प्रमाणपत्रही सादर करणे आवश्यक असते. या प्रतिज्ञापत्राचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. 

मी. . . 

प्रतिज्ञापूर्वक असे जाहीर करतो की, धर्म ही जीवनातील वैयक्तिक बाब आहे, असे मी मानतो. धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादावर माझा विश्वास असून मी कोणत्याही धार्मिक व धर्मवादी राजकीय संघटनेचा सभासद नाही आणि कोणत्याही धर्माला, धर्मवादी चळवळींना व जातीयवादाला मी उत्तेजन देणार नाही. मंडळाच्या ध्येय-धोरणाशी व उद्दिष्टांशी मी संपूर्णपणे सहमत आहे. 

दिनांक 

सही. . . 

घटनेत उपरोक्त प्रतिज्ञेची तरतूद करण्यात आलेली आहे. असे असतानासुद्धा तिची अंमलबजावणी मात्र काटेकोरपणे कधीच झाली नाही. 1977 नंतरच्या काळात हे विशेषत्वाने जाणवते. 

मंडळाच्या घटनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पृष्ठावर मंडळाची 10 उद्दिष्ट देण्यात आलेली आहे. पैकी दुसरे आणि तिसरे उद्दिष्टे मुस्लिम महिलांवर होणाऱ्या अन्यायाशी संबंधित आहे. उरलेले आठ विषय समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीशी संबंधित आहेत. पण गेल्या पन्नास वर्षांच्या काळात जे कृतिशील कार्यक्रम स्वीकारण्यात व पार पाडण्यात आले आहेत, त्यातील काही अपवाद वगळता इतर सर्व कार्यक्रम मुस्लिम व्यक्तिगत कायदा, त्यातील कालबाह्य तरतुदी, त्यामुळे मुस्लिम महिलांवर होणारे अन्याय व तत्संबंधी इतर विषय यांच्याशी संबंधित आहेत. 

1989 च्या मार्च 22 रोजी मंडळातर्फे ‘दोन दशकांची वाटचाल’ या नावाची एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. या पुस्तिकेत मंडळातर्फे 1990 पर्यंतच्या कालखंडात करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या यादीवरून वरील विधानाचा प्रत्ययही येऊ शकेल. याचा अर्थ, शरियतसंबंधित कार्यक्रम करू नयेत असा नाही. असे कार्यक्रम व्हायलाच पाहिजेत. पण मंडळाची घटना चळवळीची जी उद्दिष्टे दिलेली आहेत, त्यांचे व्यापक स्वरूप पाहता; मंडळाचे कार्यक्षेत्र मुस्लिम व्यक्तिगत कायद्याच्या छोट्याच्या वर्तुळात बंदिस्त करून ठेवणे कितपत योग्य होईल, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत जबाबदारीने काम करणारे कार्यकर्ते शोधून त्यांना चळवळीशी जोडून घेणे आवश्यक आहे. आजची मंडळाची कार्यकारिणी असे करायला तयार आहे का, या प्रश्नाच्या उत्तरावर चळवळीचे भवितव्य अवलंबून आहे. 

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, संघटनेची सदस्यसंख्या वाढविण्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या विविध भागांत शाखा सुरू करण्यासंबंधी कोणतेही विशेष प्रयत्न गेल्या अनेक वर्षांत करण्यात आलेले नाहीत. उलट, हमीदभाईंच्या हयातीत कार्यरत असलेल्या अनेक शाखा नंतरच्या काळात निष्क्रिय झाल्या आहेत. त्या पुन्हा क्रियाशील करता येतील, पण त्यासाठी तेथील स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून प्रयत्न करावे लागतील. गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांत तसे प्रयत्न झालेले नाहीत. 

काही वर्षांपूर्वी सांगली, मिरज येथे एकेक शाखा सुरू करण्यात आली होती. तिचे रीतसर उद्‌घाटनही झाले होते. पण नंतर स्थानिक कार्यकर्ते व केंद्रीय समितीचे पदाधिकारी यांच्यात काही मतभेद झाल्यामुळे केंद्रीय समितीने त्या शाखेची मान्यताच रद्द केली. या कार्यवाहीसाठी कुठली कार्यपद्धती वापरली गेली, हे कळले नाही. घटनेत यासंबंधी काही उल्लेख नाही. केंद्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी काही प्रयत्न केले असते, तर या कोंडीतून मार्ग काढता आला असता. पण तसे काही प्रयत्न झाले नाहीत. उलट केंद्रीय समिती आणि स्थानिक कार्यकर्ते यांचे परस्परसंबंध मात्र दुरावले. परिणामतः त्यांनी वेगळ्या नावाने स्वतंत्र संघटना स्थापन केली. आजमितीला त्यांच्याकडे शंभर तरुण कार्यकर्ते आहेत, असे मला सांगण्यात आले आहे. 

केंद्रीय समिती व नवी शाखा यांच्यातील वरीलप्रमाणे वाद निर्माण झाल्याने त्यासंदर्भात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. मुळात आज अस्तित्वात असलेल्या मंडळाच्या घटनेच्या क्रमांक 11 प्रमाणे नव्या शाखा काढता किंवा स्थापन करता येऊ शकतात. या कलमाच्या आधारे नवी शाखा सुरू करण्यास अडचण येणार नाही, असे प्रयत्न करणे आवश्यक असते. आज ज्यांच्या हाती चळवळीची सूत्रे आहेत, त्यांनी पुणे शहराच्या बाहेर पडून चळवळीच्या उद्दिष्टांशी सहमत होऊ शकतील अशा व्यक्तींचा शोध घेतला पाहिजे. यासाठी आपली स्वयंकेंद्रित वृत्ती सोडली पाहिजे. पुणेकर यासाठी तयार होतील का, हा लाख मोलाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तेच देऊ शकतील. शाखा सुरू करणे किंवा बरखास्त करणे याप्रमाणेच व्यक्तिगत सदस्यांच्या बाबतीतही हाच नियम लावला गेला पाहिजे. 

इथे एक उदाहरण देण्यासारखे आहे. दलवाईंच्या निधनानंतर काही महिन्यांतच एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला मंडळातून काढून टाकण्यात आले. या बाबतीत कुठल्याही कार्यपद्धतीचा अवलंब करता एक पत्र महाराष्ट्र सरकारमधील एक तत्कालीन कॅबिनेट मंत्री आणि प्रसारमाध्यमांना पाठवून दिले गेले. आश्चर्याची बाब म्हणजे- ज्या व्यक्तीने या पत्रावर सही केली होती, ती कार्यकारिणीची सदस्यही नव्हती. शिवाय त्या कार्यकर्त्याला या पत्राची प्रतही पाठवण्यात आली नव्हती, तसेच आपली बाजू मांडण्याची संधीही (नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाप्रमाणे) देण्यात आली नव्हती. आश्चर्याची बाब म्हणजे- मंडळाचे तत्कालीन हितचिंतक अ. भि. शहा, यदुनाथ थत्ते आणि इतर मंडळींनी याची चौकशी करून काही तरी मार्ग काढण्याचे प्रयत्न करणे अपेक्षित होते; परंतु तसे घडले नाही. एकूणात हा एकमेव प्रकार नव्हता, असे अनेक प्रकार घडलेले आहेत. मंडळाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेल्यांची यादी मोठी आहे. अशा बेशिस्त कार्यपद्धतीमुळे संघटना किंवा चळवळ व्यवस्थित रीत्या चालू शकत नाही. पर्यायाने संघटनेचे उद्दिष्टही साध्य होत नाही. 

हमीद दलवाई यांनी 22 मार्च 1970 रोजी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाला या वर्षीच्या मार्चमध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने मंडळाचे विद्यमान अध्यक्ष शमसुद्दिन तांबोळी यांचा दीर्घ लेख फेब्रुवारी व मार्चमधील सलग पाच अंकांमध्ये प्रसिद्ध केला होता, त्यात त्यांनी ‘मंडळाची भूमिका व अर्धशतकी वाटचाल’ यावर दृष्टिक्षेप टाकला होता. त्यानंतर, दलवाई यांचे शेवटच्या काळातील सहकारी व मंडळाचे काही काळ सचिव राहिलेले अब्दुल कादर मुकादम यांनी, मंडळाच्या भूमिका व वाटचाल याबाबत स्वत:ची वेगळी निरीक्षणे व वेगळे निष्कर्ष सांगणारा दीर्घ लेख पाठवला, तो एकूण तीन भागांत आम्ही प्रसिद्ध केला आहे. त्यांनी या दीर्घ लेखात दलवाई व मंडळ यांच्यासंदर्भात काही आक्षेप व अपेक्षा मांडल्या आहेत. त्याबाबत मंडळाचे म्हणणे काय आहे, हे थोडक्यात सांगणारा छोटा लेख विद्यमान अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी लिहिणार आहेत, तो आम्ही पुढील अंकात प्रसिद्ध करणार आहोत. ...संपादक    

हेही वाचा : 

मुस्लिम सत्यशोधक चळवळीची अर्धशतकी वाटचाल (भाग : 1)  : अब्दुल कादर मुकादम 

Tags: मुस्लीम सत्यशोधक मंडळ हमीद दलवाई अब्दुल कादर मुकादम अर्धशतकी वाटचाल शमसुद्दिन तांबोळी भारतीय मुसलमान muslim satyashodhak mandal hamid dalwai Indian muslims abdul kadar mukadam on muslim satyashodhak mandal Abdul kadar mukadam on hamid dalwai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अब्दुल कादर मुकादम,  मुंबई
arumukadam@gmail.com

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी सचिव व ज्येष्ठ कार्यकर्ते 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके