डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ओबामांचे राजकीय व्यक्तिमत्त्व दाखवणारे पुस्तक

पुस्तकातून ओबामांचे राजकीय व्यक्तिमत्त्व जे पुढे येते, ते संमिश्र स्वरूपाचे आहे. बोलण्यातून, भाषणांमधून आपल्याला आदर्शवादी ओबामा दिसतात; मात्र प्रत्यक्ष राजकारणात व्यवहारी पद्धतीने वागावे लागते आणि आदर्शवाद येथे उपयोगाला येत नाही, ही जाणीव झाल्याचे ते नोंदवतात. तशी जाणीव करून देणाऱ्या राजकारणाचा अनुभव असणारे सहकारीदेखील त्यांना भेटले. विविध कायदे मान्य करून घेण्याच्या हकिगतींमुळे व्यवहारी ओबामा पुढे येतात. राजकारणात आदर्शवाद आणि व्यवहारवाद या दोन्हींची गरज असते, हे खरेच आहे. पण व्यवहारवाद आणि संधिसाधूपणा यांच्यातील सीमरेषा धूसर असते, याची जाणीव असणारे ओबामादेखील पुस्तकातून पुढे येतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे आपला पिंड आशावादी आहे, असे ओबामांनीच सांगितले आहे. पण त्यांनीच दिलेल्या तपशिलांचा आधार घेतला, तर आशावादाला फारशी जागा आहे, असे म्हणणे कठीण आहे.
 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे राजकीय आठवणीपर आत्मवृत्ताच्या पहिल्या खंडातील- ‘ए प्रॉमिस्ड्‌ लँड’मधील निवडक उतारे प्रकाशनापूर्वी विविध अमेरिकी माध्यमांमधून अलीकडेच झळकले. या प्रकाशनपूर्व प्रसिद्धीचा हवाला देत भारतीय माध्यमांनी त्याबद्दल बातम्या लिहिल्या आणि भारतात एकच खळबळ उडाली. त्याचे कारण अर्थातच होते काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्याबद्दलची ओबामांची टिपण्णी. मात्र या गदारोळात महात्मा गांधींची शिकवण जगाला आजदेखील मार्गदर्शक आहे हे ओबामा यांचे मत, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेला आदर आणि भारतीय जनता पक्ष मांडत असलेला राष्ट्रवाद समाजात दुही माजवणारा आहे, ही त्यांची मते दुर्लक्षितच राहीली. तसेच इंडोनिशियामध्ये बालपणी घालवलेल्या काही काळामध्ये त्यांचा रामायण आणि महाभारताशी परिचय झाला, हा उल्लेखदेखील नजरेआड झाला.

मात्र या पलीकडे ‘ए प्रॉमिस्ड्‌ लँड’मध्ये भारताची फारशी चर्चा नाही. मग 2011 मध्ये ओसामा बिन लादेन याला ठार मारण्याच्या हकिगतीपर्यंतच्या काळाबद्दलचे हे पुस्तक एखाद्या भारतीयाने का वाचावे? तर केवळ बौद्धिक कुतूहल शमवण्यासाठी म्हणून किंवा जागतिक घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी तर ते वाचावेच, पण त्याशिवाय अमेरिकेची राजकीय व्यवस्था कशी चालते याचे बारकावे जाणून घेण्यासाठीदेखील वाचावे.  

पण त्याआधी थोडेसे पुस्तकाच्या शीर्षकाविषयी. ‘प्रॉमिस्ड्‌ लँड’ ही संकल्पना ज्यू धार्मिक परंपरेतील आहे. इस्राईल अणि त्या देशाने ताब्यात ठेवलेला आपल्या सीमांलगतचे काही प्रदेश हा भूभाग ही तुमची हक्काची भूमी असेल, असे वचन ईश्वराने ज्यू धर्मीयांना दिले होते, असे ही परंपला मानते. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्याच्या विस्ताराच्या रेट्यामुळे ज्यू धर्मीयांनी आपले स्वातंत्र्य गमावले आणि विविध कारणांमुळे ज्यूंना आपल्या भूमीतून स्थलांतर करावे लागले. पण ईश्वराने आपल्याला दिलेल्या भूमीवर पुन्हा आपली सत्ता कधी ना कधी पुनर्स्थापित होईल, हे स्वप्न ज्यू धर्मीयांनी पाहिले आणि ते 1948 मध्ये प्रत्यक्षात आले. ‘प्रॉमिस्ड्‌ लँड’ची संकल्पना ख्रिश्चन परंपरेने मान्य केली आणि आफ्रिकेतून अमेरिकेत गुलाम म्हणून नेल्यानंतर ज्या कृष्णवर्णींयांचा ख्रिश्चन धर्माशी परिचय झाला, त्यांनीदेखील ही संकल्पना उचलली. ज्या भूमीत आपल्याला स्वातंत्र्य मिळेल आणि आपण मुक्तपणे जगू शकू, ती भूमी आपली ‘प्रॉमिस्ड्‌ लँड’ असेल- अशी कृष्णवर्णीयांची धारणा बनली. ही अशी ‘प्रॉमिस्ड्‌ लँड’ अमेरिका आहे, अशी धारणा बळावत गेली आणि तोच धागा उचलत ओबामा यांनी आपल्या पुस्तकाला तसे शीर्षक दिले आहे, हे पुस्तकाच्या आरंभी उद्‌धृत केलेल्या कृष्णवर्णीयांच्या एका धार्मिक गीतामुळे कळते. अमेरिका ही कृष्णवर्णीयांसाठी खरोखरीच ‘प्रॉमिस्ड्‌ लँड’ आहे का किंवा होईल काय, याबद्दल अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष काय म्हणतात, यासाठीदेखील हे पुस्तक वाचावे. 

प्रभावी वक्तृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या ओबामांच्या या पुस्तकाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे बालपणीच्या आणि तरुणपणीच्या हकिगतीने होते. आपली आई न डनहॅम आणि आजी-आजोबा माडेलिन ली पेन डनहॅम व स्टॅन्ले डनहॅम यांच्या संस्कारांमुळे आपल्यात कोणती मूल्ये रुजली आणि पुढील वाटचालीत या संस्कारांचा कसा उपयोग झाला, याची ती हकिगत आहे. कोलंबिया आणि हार्वर्ड येथील शिक्षण, वकिली व्यवसायात प्रवेश आणि 1992 मध्ये मिशेल रॉबिन्सन यांच्याशी विवाह याबद्दल यापुढे येते. त्यानंतर सुरू झाला तो ओबामांचा राजकीय प्रवास आणि इथे खऱ्या अर्थाने पुस्तकाला सुरुवात होते. 

काही काळ शिकागो शहरात तळ-पातळीवरचा कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेऊन ओबामा त्याच शहरात परत आले. विवाहानंतर विविध सामाजिक-राजकीय संघटनांच्या कार्यांत सक्रिय झाले. योगायोगाने त्यांना राजकीय संधी चालून आली. इलिनॉइस राज्याच्या विधी मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाची- सिनेटची- एक जागा रिकामी झाली. तोपर्यंत त्यांना राजकारणाचा आणि विशेषतः शिकागोसारख्या वांशिक विविधता आणि ताण-तणाव असलेल्या शहरातील राजकारणाचा मोठा अनुभव नव्हता. तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव म्हणून ते शिकागो शहरातील सिनेटच्या मतदारसंघातून निवडून आले. या प्रचाराचे जे तपशील ओबामा यांनी दिले आहेत, त्यावरून स्थानिक पातळीवरच्या अमेरिकेतील राजकारणाचे स्वरूप समजून घेता येते. इलिनॉइस सिनेटमधील अनुभवांबाबतीतील हकिगतीबद्दल असेच म्हणता येईल. एकूणच भावनिक मुद्दे तसेच धर्म-वंश यांसारखे घटक निवडणूक वर्तनावर प्रभाव टाकतात. मतदरांमधील उदासीनता आणि मुख्य म्हणजे अमेरिकेतील राज्य विधी मंडळांना आपापल्या मतदारसंघांच्या सीमारेषा निश्चित करण्याचा अधिकार असल्यामुळे, आपली सत्ता कायम राहावी यासाठी आपल्या सोईचे मतदारसंघ तयार करण्याची सत्ताधाऱ्यांची प्रवृत्ती याबद्दल माहिती मिळते. विधेयके मान्य करून घेण्यासाठी आमदारांकरवी करावी लागणारी देवाण-घेवाण, धोरण निर्मितीच्या प्रक्रियेवर संघटित आर्थिक हितसंबंधी गटांचा प्रभाव आदी बाबींचे जाता-जाता उल्लेख केले आहेत. (त्यांची अधिक माहिती द्यायला हवी होती, असे वाचताना वाटते.)

पुढे 2004 मध्ये ओबामा यांनी अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची- सिनेटची- निवडणूक लढवून राष्ट्रीय राजकारणात पदार्पण केले. या निवडणुकीचे आणि त्याच्या प्रचाराचे त्यांनी फारच मोजके वर्णन केले आहे. याचीदेखील अधिक माहिती द्यायला हवी होती, असे वाटते. राष्ट्रीय राजकारणातील पदार्पणाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व भूमिकांचा जाणकारांवर प्रभाव पडू लागला आणि भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. आपण निवडणूक लढवू इच्छितो, हे त्यांनी यथावकाश जाहीर केले आणि आपल्या भूमिका इतर स्पर्धकांपेक्षा कशा वेगळ्या आहेत, हे सांगत ते प्रचाराला लागले.

अमेरिकी राजकारणातील वैशिष्ट्य म्हणजे तेथील प्रायमरीज्‌ हा प्रकार. तेथील राजकीय व्यवस्थेत देशव्यापी महत्त्वाचे दोनच पक्ष- डेमॉक्रॅटिक आणि रिपब्लिकन. एखाद्याला राजकारणात फार पुढे जायचे असेल, तर दोन्हींपैकी एका पक्षाकडून उमेदवारी मिळवावी लागते. पक्षदेखील उमेदवार कोण असावा, यासाठी पक्षांतर्गत निवडणुका घेतात. त्यामुळे 2008 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओबामांना आधी डेमॉक्रॅटिक पक्षातील इतर स्पर्धकांना पराभूत करायला लागणार होते. त्यातील दोन प्रमुख होते माजी राष्ट्रध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी व न्यूयॉर्क राज्याच्या तत्कालीन सिनेटर हिलरी रॉडहॉम क्लिंटन आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष व तत्कालीन सिनेटर जोसेफ बायडेन. 

या प्रचारात ओबामांनी तसा निसटताच विजय मिळविला, पण इतरांपेक्षा काही भूमिका वेगळ्या मांडल्या. अशा एका भूमिकेचा ओबामा यांनी उल्लेख केलेला आहे. ती म्हणजे- ओसामा बिन लादेन पाकिस्तानात आहे अशी पक्की माहिती हाती आली आणि त्यास ताब्यात घेण्यास अथवा ठार मारण्यास पाकिस्तान सरकार अनुत्सुक असेल किंवा तितकी त्याची क्षमता नसेल, तर आपण अमेरिकी बळाचा वापर करून ही कामगिरी पार पाडू. याबद्दल त्यांच्यावर टीका बरीच झाली, कारण तोपर्यंत तालिबान आणि अल-कायदा यांच्या विरोधातील लढाईत पाकिस्तान हा बरोबरीचा व भरवशाचा साथीदार आहे, अशीच अमेरिकेतील उच्च राजकीय वर्तुळात धारणा होती. वस्तुस्थिती तशी नाही, हे माहीत असूनदेखील असे चित्र उभे केले जात होते. ओबामांनी या धारणांना छेद दिला आणि 2011 मध्ये हे खरे करून दाखविले. अमेरिकेतील आरोग्यव्यवस्था आणि वित्तीय व्यवस्था याबाबतदेखील त्यांनी अशाच वेगळ्या भूमिका घेतल्या.    

अमेरिकी राजकीय व्यवस्थेमध्ये सर्व पातळ्यांवरील पदांसाठी निवडणुका घेतल्या जातात. वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाणी आणि आता समाजमाध्यमांमधून प्रचार चालतो. त्याला अब्जावधी डॉलर्स लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी उभा करू शकणारीच व्यक्ती पुढे जाते. प्रचंड प्रमाणात लागणारा पैसा मिळविण्यासाठी मोठ्या रकमा देणाऱ्या देणगीदारांवर अवलंबून राहावे लागते. त्यातून वैध-अवैध मार्गाने देणग्या देणाऱ्यांचा प्रभाव वाढतो. ओबामांनी मोठ्या देणगीदारांना दूर लोटले नाही, पण मोठ्या संख्येने छोट्या रकमा गोळा करण्यावर भर दिला. त्यामुळे अनेकांचा राजकीय सहभाग वाढला. मोठ्या प्रमाणात छोट्या रकमा गोळा करून निवडणूक निधी उभा करणे, हे पैशांचा सुळसुळाट असलेल्या अमेरिकी (आणि भारतीयही) राजकाणातील विद्यमान प्रारूपाला पर्याय ठरू शकेल काय, या मुद्याची खरे म्हणजे सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे होती. तसा प्रयोग करून विजयी झालेल्या ओबामांनी याचा परामर्श घ्यायला पाहिजे होता, ही अपेक्षा करणे रास्तच आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजय ते पदग्रहणाच्या काळातील हकिगती रंजक आहेत. ओबामांना डेमॉक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित होण्याच्या सुमारास प्रथेप्रमाणे त्यांना सरकारी संरक्षण देण्यात आले. त्यांच्या संरक्षणयंत्रणेने आपापसातील सुरक्षेसंदर्भातील बातचितीसाठी ओबामांना 'Renegade'  हे सांकेतिक नाव दिले. 'Renegade' चा अर्थ तत्त्वच्युत किंवा आपल्या मूळ विचारांशी कोणत्या तरी लाभासाठी द्रोह करणारी व्यक्ती. सुरक्षायंत्रणेने काही तरी सांकेतिक नाव द्यायचे म्हणून या शब्दाची निवड केली असेल. पण आपल्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीचे वर्णन करणाऱ्या पुस्तकातील एका विभागाला ओबामांनी 'Renegade'  हेच नाव दिले. हे अनवधानाने झाले आहे, का ओबामा यातून काही सुचवू इच्छितात- हे सांगता येणार नाही. 

तसेच इतर प्रगत देशांच्या तुलनेत अमेरिकेच्या केंद्र सरकारमध्ये परीक्षा-मुलाखत इत्यादी प्रक्रिया पार पाडून सरकारी नोकरीत नियुक्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बऱ्याच वरिष्ठ प्रशासकीय पदांवर राष्ट्राध्यक्ष आपल्या पसंतीचे उमेदवार किंवा आपल्या पक्षाच्या समर्थकांची नेमणूक करतात. तसे करणे हा नव-निर्वाचित राष्ट्राध्यक्षांचा अधिकार आहे, असे मानले जाते. अर्थात सर्व वरिष्ठ आणि इतर महत्त्वाच्या पदांवरील नेमणुकांना सिनेटची मान्यता लागते आणि ती सौजन्याचा भाग म्हणून फारशी खळखळ न करता दिली जाते. त्या-त्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ संपला की, त्यांनी नियुक्त केलेली मंडळी त्या वेळी पदावर असतील तर त्यांचादेखील कार्यकाळ संपतो. नवे राष्ट्राध्यक्ष नव्या नेमणुका करतात. या अशा मोठ्या संख्येने नियुक्त्या करताना राष्ट्राध्यक्षांवर पक्ष, नेते, मित्र-सहकारी, देणगीदार अशांचा दबाव येतो. त्याची चर्चा पुस्तकात केलेली नाही.

मात्र काही रोचक वाटतील असे तपशील आहेत. उदा.ओबामांनी टीम गायथनर यांचा वित्तीय क्षेत्रातील अनुभव पाहता, देशाचे अर्थमंत्रिपद त्यांना दिले. त्या वेळी गायथनर यांनी पदाच्या जबाबदारीची व्याप्ती पाहता कुटुंबाला फार वेळ देता येणार नाही, या कारणांसाठी प्रारंभी चक्क नकार दिला. पुढे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली, हा भाग अलाहिदा. ओबामांनी राजकीय पक्षभेद बाजूला सारून मंत्रिमंडळातील नियुक्त्या केल्या. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता, मावळते संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्‌स यांना त्या पदावर कायम राहण्याची विनंती केली आणि त्यांनी ती स्वीकारली. तसेच रिपब्लिकन नेते रे ला हूड यांना वाहतूक मंत्रिपदी नेमले. या सगळ्यांचे भारतीय वाचकांना निश्चितच आश्चर्य वाटेल. पण पक्षभेदापलीकडे जाऊन देश चालविला पाहिजे, या ओबामांच्या भूमिकेशी हे सर्व सुसंगतच आहे.

याशिवाय आणखी एक तपशील रोचक आहे. सर्व सामान्य अमेरिकी नागरिक आपल्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहितात. त्यातील निवडक दहा पत्रे आपल्याला रोज वाचायला दिली पाहिजेत, असे आदेश ओबामांनी दिले. पत्रलेखकांच्या समस्यांबाबत सरकार काय करीत आहे याची माहिती ओबामांनी लिहिलेल्या उत्तरात एकीकडे दिली जात असे; तर लगोलग संबंधित विभागाला पत्रलेखकांशी संपर्क साधून अडचण कशी दूर करता येईल, हे पाहण्याचे आदेश दिले जात असत. याची काही उदाहरणे दिली असती, तर बरे झाले असते.  

पुस्तक वाचताना एक बाब खटकते. अमेरिकी समाज तसा अनौपचारिक. त्यामुळे व्यक्तींना संबोधण्यासाठी किंवा उल्लेख करण्यासाठी पहिल्या नावांचा (First names) वापर सर्रास होतो. तसा तो या पुस्तकातदेखील आहे. पण एकाच नावाच्या एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील, तर वाचताना गोंधळ उडतो. सूचीत शोध घ्यायचा झाला तर ती आकारविल्हे आडनावांप्रमाणे. त्यामुळे नेमका कोणाचा उल्लेख होत आहे, हे काही वेळा कळतच नाही.

ओबामांनी आपल्या धर्मश्रद्धांविषयी फारसे उल्लेख केले नाहीत. आपण धर्मश्रद्ध ख्रिश्चन आहोत असे उल्लेख ते करतात. आपण फारसे नियमित चर्चमध्ये जात नसू, असाही एके ठिकाणी उल्लेख आहे. पारलौकिक बाबींना किंवा अंधश्रद्धांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात थारा नसेल असे वाटत असतानाच, भाग्यकारक समजल्या जाणाऱ्या वस्तूंचा उल्लेख येतो. प्रचारादरम्यान चाहत्यांनी त्यांना-त्यांना भाग्यकारक वाटणाऱ्या त्यांच्या-त्यांच्या वस्तू ओबामांना भेट दिल्या. ते या चाहत्यांच्या श्रद्धेचे आणि ओबामांवरील निष्ठेचे द्योतक होते. त्यात गौतम बुद्धांची आणि हनुमानाची छोटी मूर्ती, छोटे दगड इत्यादी वस्तू होत्या. दररोज त्यातील पाच-सहा वस्तू ओबामा आपल्या खिशात टाकत असत. या सवयीचे ओबामा यांनी दिलेले स्पष्टीकरण मुळातूनच वाचण्यासारखे आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ही सवय कायम राहिली का, याचा उल्लेख नाही. 

प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या एका भाषणानंतर झालेल्या प्रश्नोत्तराची हकिगत रोचक आहे. त्यांनी दिलेल्या उत्तराला एका उदारमतवादी (म्हणजे आपल्या परिभाषेत डाव्या-पुरोगामी) मुक्त पत्रकाराने ठळक प्रसिद्धी दिली. ओबामा यांनी आपण दिलेल्या उत्तराला 2008 च्या प्रचारातील सर्वांत मोठी चूक संबोधले आहे. पण त्याबद्दलचे त्यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. त्यांच्या निरीक्षणाचा मथितार्थ असा की, अमेरिकेतील उदारमतवादी पत्रकार-स्तंभलेखक हे विरोधी राजकीय नेत्यांपेक्षा आपल्या समविचारी नेत्यांवर सडकून टीका करण्यासाठी अधिक चटकन तयार होतात. याचाच अर्थ, अमेरिकेतील उजवी मंडळी आपल्या समविचारी नेत्यांवर टीका करण्यास चटकन तयार होत नाहीत किंवा उत्सुक नसतात (या उल्लेखावरून आपल्याकडील स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या मंडळींमध्ये जरासे मतभेद झाले किंवा थोडी वेगळी भूमिका मांडली की, एकमेकांना छुपे संघी असल्याचा आरोप करण्याची जी स्पर्धा लागली आहे, त्याची आठवण होते).  

पुस्तकाच्या धोरणनिर्मितीच्या प्रक्रियेबाबत हकिगतींनी बरीच जागा व्यापली आहे. 2008 च्या वित्तीय संकटाला दिलेला प्रतिसाद, वैद्यकीय उपचारांसाठीच्या धोरणात्मक चौकटीची फेरमांडणी इत्यादी बाबी आणि त्यासंदर्भातील कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेचे तपशील अमेरिकी राजकीय व्यवस्थेवर बराच प्रकाश टाकतात. संसदीय शासनपद्धतीत संसदेतील बहुमताच्या जोरावर कायदे मान्य करून घेणे सरकारला सहज शक्य असते. तसे राष्ट्राध्यक्षीय पद्धतीत होत नाही, कारण त्यात संसद आणि राष्ट्राध्यक्ष यांच्यात संसदीय शासनपद्धीत असतो तसा थेट संबंध नसतो. त्यामुळे ओबामांना आपल्याला हव्या त्या कायद्यांना संसदेची मान्यता मिळविण्यासाठी संसदेतील स्वपक्षीय आणि विरोधकांची बऱ्यापैकी मनधरणी करावी लागली. प्रसंगी तडजोड करून टीकेचे धनीदेखील व्हावे लागले. या सर्व वाटाघाटींच्या आणि देवाण-घेवाणींच्या हकिगती रोचक आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भले जगात कोठेही ड्रोनकरवी हल्ल्याचे आदेश देऊ शकत असतील, पण एखाद्या अडेलतट्टू किंवा तत्त्वनिष्ठ खासदारापुढे त्यांचे काहीच चालत नाही. सत्तेच्या मर्यादा इथे स्पष्ट होतात.

अपेक्षेप्रमाणे पुस्तकात जागतिक राजकारणाची चर्चा आहे, विविध देशांच्या राजकीय नेत्यांबाबत त्यांची निरीक्षणे दिलेली आहेत. पश्चिम आशियातील शांतताप्रक्रिया, लिबियातील हस्तक्षेप, रशियाशी अण्वस्त्रांसंदर्भातील वाटाघाटी आणि इराणबाबतचे धोरण यांची बरीच चर्चा आहे. मात्र चीनबद्दलच्या धोरणाची अधिक विस्ताराने चर्चा व्हायला हवी होती, विशेषतः गेल्या वर्षभरातील विविध घडामोडी पाहता. चीन दौऱ्याच्या हकिगतीचे काही तपशील थक्क करणारे आहेत. भेटीला आलेल्या परदेशी शिष्टमंडळांवर पाळत ठेवली जाते आणि त्याबद्दल पाहुणेमंडळी सावधगिरी बाळगतात, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मात्र हॉटेलच्या खोलीत विसरलेली कागदपत्रे घेण्यासाठी व्यापारमंत्री गॅरी लॉक तेथे परत येतात, तेव्हा तेथे हॉटेलच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशिवाय आपल्या सामानाची आणि कागदपत्रांची झडती घेणारे लोक आढळतात. ‘तुम्ही काय करत आहात?’ असे लॉक यांना विचारतात. ही मंडळी काहीच न बोलता बाहेर पडतात. अमेरिकी यंत्रणेकढून याचा फार बाऊ केला जात नाही. यावरची ओबामांची टिपण्णी काय- तर आम्हीदेखील अशी हेरगिरी करतोच की! आणि शिवाय चीनशी आम्हाला व्यापार वाढवायचा आहे.  

सौदी अरेबियातील धार्मिक कट्टरता आणि बंदिस्त समाजव्यवस्था यांच्यावर टीकात्मक निरीक्षणे नोंदवताना या सगळ्याच्या बळकटीकरणाला असलेल्या अमेरिकेच्या पाठबळाबाबत ओबामा काहीच भाष्य करीत नाहीत, हे खटकते. पाकिस्तान-तालिबान-ओसामा बिन लादेन या संदर्भातील चर्चा वाचल्यावर ओबामा भाबडे आहेत की काय, असा प्रश्न पडतो. लादेनचे पाकिस्तानातील वास्तव्य व तालिबानच्या पाकिस्तानातील हालचाली याला केवळ पाकिस्तानच्या शासकीय यंत्रणेतील काही घटकांचा पाठिंबा होता आणि हे सर्व काही पाकिस्तानचे अधिकृत धोरण नव्हते, या ओबामांच्या विवेचनावर कोणाचाच विश्वास बसण्याची शक्यता नाही. बरे, त्यांनी हातचे राखून लिहिले आहे असे म्हणायचे, तर पद सोडल्यानंतर चार वर्षे उलटून गेल्यानंतर असे करण्याचे काहीच कारण नाही. एकूणच काय तर- जागतिक राजकारणातील अमेरिकेची भूमिका जगाच्या भल्यासाठीच आहे, अशी त्यांची धारणा आहे आणि त्याच्याशी संपूर्णतः सहमत होणे कठीण आहे. मात्र शांततेचा नोबेल पुरस्कार मिळण्याइतपत आपण काहीच केलेले नाही, ही ओबामांची कबुली लक्षणीय अशीच म्हणावी लागेल. 

ओबामांच्या विवेचनात अनेक मुद्दे अस्पष्ट राहतात किंवा त्यांची पुरेशी चर्चा केलेली नाही. अमेरिकेत कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णींयांमधील सद्‌भवनेचा अभाव आणि द्वेषाची भावना पूर्वीइतकी तीव्र नसली तरी नाहीशी झालेली नाही. ही दरी संपुष्टात आणणे हा आपल्या राजकारणाचा हेतू आहे आणि त्याबद्दल आपण आशावादी आहोत, असे ते सांगतात. पण त्यांनीच दिलेल्या तपशिलाचा आधार घेतला, तर ही दरी सांधण्यातील अडचणीच पुढे येतात. श्वेतवर्णींयांकडून आपल्या उमेदवारीला झालेल्या विरोधात किंवा आपल्या विरोधात झालेल्या मतदानाच्या मागे हा कृष्णवर्णीय माणूस आम्हाला नकोच- ही वांशिक द्वेषाची भावना होती, हे ओबामाच मान्य करतात. शिवाय या द्वेषाच्या अस्तित्वाची जाणीव इतकी खोलवर रुजलेली होती की, कृष्णवर्णीय माणूस आपला राष्ट्रध्यक्ष होत आहे या भीतीपोटी एखादा श्वेतवर्णीय माथेफिरू ओबामांची हत्या करील, अशी शंका काही कृष्णवर्णीय सहकाऱ्यांनी खुद्द ओबामांकडे नोंदविली. शिवाय ओबामा हे जन्माने अमेरिकी नागरिक नाहीत म्हणून ते राष्ट्राध्यक्ष होण्यास पात्रच नाहीत, या आक्षेपामागेदेखील वांशिक द्वेष हे एक मुख्य कारण होते, हेदेखील ओबामा मान्य करतात. त्यांच्या अनेक धोरणांना होणाऱ्या विरोधामागेदेखील हे एक कारण होते, असे ते नमूद करतात. 

त्यांच्या कारकिर्दीमुळे कृष्णवर्णींयांच्या परिस्थितीत काय आणि कितीसा फरक पडला, या स्वकीयांकडून घेतल्या गेलेल्या आक्षेपाबद्दल ओबामा फारसे काही म्हणत नाहीत. ते आफ्रिकेतून सक्तीने आयात केलेल्या गुलामांचे वंशज नसून सुशिक्षित कृष्णवर्णीय केनियन वडील व श्वेतवर्णीय आई यांचे अपत्य असल्यामुळे ते मिश्रवंशीय आहेत आणि खऱ्या अर्थाने आफ्रिकन-अमेरिकन नाहीत, या कुजबुजीबद्दलदेखील ते काही बोलत नाहीत. ओबामांचे पूर्ण नाव बराक हुस्सेन ओबामा. पुस्तकात काही ठिकाणी या पूर्ण नावाचा एखाद-दुसरा उल्लेख आहे. या नावामुळे ओबामा मुस्लिम आहेत, असा आरोप करणे विरोधकांना सोपे गेले. खुद्द ओबामा पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आपले नाव केवळ ‘बराक ओबामा’ असे देतात, तर सूचीत  ‘बराक एच. ओबामा’  असा उल्लेख आहे. आपल्या या काहीशा आगळ्या-वेगळ्या नावाच्या संक्षेपाबद्दल ओबामा काहीच उल्लेख करत नाहीत. 

पुस्तकातून ओबामांचे राजकीय व्यक्तिमत्त्व जे पुढे येते, ते संमिश्र स्वरूपाचे आहे. बोलण्यातून, भाषणांमधून आपल्याला आदर्शवादी ओबामा दिसतात; मात्र प्रत्यक्ष राजकारणात व्यवहारीपद्धतीने वागावे लागते आणि आदर्शवाद येथे उपयोगाला येत नाही, ही जाणीव झाल्याचे ते नोंदवतात. तशी जाणीव करून देणाऱ्या राजकारणाचा अनुभव असणारे सहकारीदेखील त्यांना भेटले. विविध कायदे मान्य करून घेण्याच्या हकिगतींमुळे व्यवहारी ओबामा पुढे येतात. राजकारणात आदर्शवाद आणि व्यवहारवाद या दोन्हींची गरज असते, हे खरेच आहे. पण व्यवहारवाद आणि संधिसाधूपणा यांच्यातील सीमरेषा धूसर असते, याची जाणीव असणारे ओबामादेखील पुस्तकातून पुढे येतात.
वर उल्लेख केल्याप्रमाणे आपला पिंड आशावादी आहे, असे ओबामांनीच सांगितले आहे. पण त्यांनीच दिलेल्या तपशिलांचा आधार घेतला, तर आशावादाला फारशी जागा आहे, असे म्हणणे कठीण आहे. हा आशावाद काही ठिकाणी भाबडा वाटतो. सर्वसामान्य अमेरिकी नागरिक आणि विशेषतः कृष्णवर्णीयांसाठी ‘प्रॉमिस्ड्‌ लँड’ ही नजरेच्या टप्प्यातदेखील नाही, असेच म्हणावे लागेल.

ताजा कलम -

राहुल गांधींबद्दल टिपण्णी केल्यामुळे ओबामांनी नरेंद्र मोदींबद्दल काय म्हटले आहे, याची अनेकांना उत्सुकता होती. मात्र पुस्तक 2011 पर्यंतच्या काळाबद्दल आहे, त्यामुळे मोदींचा त्यात उल्लेख नसणे स्वाभाविक आहे. पण 2015 मध्ये ‘टाइम’ या नियतकालिकांमध्ये ओबामांनी मोदी यांना Reformer-in-chief असे संबोधून कौतुकच केले होते. मात्र भाजपचा राष्ट्रवाद समाजात दुही निर्माण करणारा आहे, असे ‘ए प्रॉमिस्ड्‌ लँड’मध्ये विधान केले आहे. त्यामुळे त्यांचे मोदींबद्दल मत काय असेल, याची भक्त-समर्थक व विरोधक यांना उत्सुकता असेलच. परंतु त्यासाठी येऊ घातलेल्या दुसऱ्या खंडाची वाट पाहावी लागेल. 

ओबामा, बराक- ‘ए प्रॉमिस्ड्‌ लँड’, व्हायकिंग, 2020 
(केवळ भारतीय उपखंडात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या आवृत्तीची किंमत-रु. 1,999)  

Tags: आंतरराष्ट्रीय राजकारण राजकीय अमेरिकन राजकारण स्टॅन्ले डनहॅम माडेलिन ली पेन डनहॅम बराक ओबामा ए प्रॉमिस्ड्‌ लँड डॉ.मनमोहनसिंग weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अभय दातार,  नांदेड, महाराष्ट्र
abhaydatar@hotmail.com

राज्यशास्त्र विभाग, पीपल्स्‌ कॉलेज, नांदेड


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके