डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या पुस्तकात कृष्णन यांनी सातत्याने एक मुद्दा मांडला आहे आणि तो म्हणजे आपल्याला चीनबद्दल पुरेशी माहिती नाही आणि आपल्या देशात पाश्चात्त्य देशांचा तुलनेमध्ये चीनचा अभ्यास होत नाही. मोजक्याच भारतीय वृत्तसंस्था आणि वर्तमानपत्रांचे चीन प्रतिनिधी आहेत तर दूरचित्रवाणी वाहिन्यांचे कोणीच नाही. कोणे एके काळी कोलकाता शहरात चिनी वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय होती. पाश्चात्त्य जगाकडे होणाऱ्या स्थलांतरामुळे ती रोडावत आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांत सांस्कृतिक दूताची भूमिका बजावू शकेल असे कोणी आपल्याकडे उपलब्ध नाही, हे ते वाचकांना सांगतात. या सगळ्यांमुळे या अज्ञानात भरच पडते. हे अज्ञान आपल्याला परवडण्यासारखे नाही आणि आपण त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. हे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे असे म्हटले तरी चालेल. 

गेल्या एक-दोन वर्षांत चीनसंदर्भात अनेक घडामोडींनी जगाचे आणि अर्थात भारतीयांचे लक्ष वेधून घेतले. भारत-चीन सीमावाद पुन्हा उफाळून आला आणि चीनशी असलेल्या आपल्या संबंधांची चर्चा जोमाने सुरू झाली. शिवाय कोविड-19 या विषाणूच्या प्रसाराला चीनमधून सुरुवात झाली, या साथीची त्या देशाने यशस्वीरीत्या हाताळणी केले असे वाटत आहे आणि या सगळ्यांचा त्यावर फारसा आर्थिक परिणाम झालेला दिसत तरी नाही. अलीकडेच चीनच्या सत्ताधारी साम्यवादी पक्षाने आपली शताब्दी साजरी करीत आपला देश अधिक बलशाली करायचा निर्धार बोलून दाखविला. चीनचा आंतरराष्ट्रीय राजकारणातील आणि त्यातदेखील दक्षिण आशियाच्या राजकारणाचा वाढता सहभाग, त्याची आर्थिक घोडदौड आदींमुळे चीनबद्दलच्या कुतूहलाला उधाण आले.

भारतीयांना आणि त्यातदेखील इंग्रजी वाचणाऱ्या मंडळींना हे कुतूहल शमवायचे असेल तर मुख्यतः पाश्चात्त्य जगतातील लेखकांच्या लिखाणावर विसंबून राहावे लागते. त्यातही अमेरिका, इंग्लंड किंवा फार फार तर ऑस्ट्रेलियातील लेखकांची पुस्तके आपल्याला सहज उपलब्ध होतात. जपान, रशिया, दक्षिण कोरिया आदी चीनच्या शेजारील देशांमधील मंडळीची चीनविषयक भूमिका काय आहे हे आपल्याला माहीत नसते. भारतीयांनी स्वानुभावावर आधारित किंवा विशेष अभ्यास करून लिहिलेली पुस्तके तर अल्पच आहेत.

या पार्श्वभूमीवर अनुभवी पत्रकार अनंथ कृष्णन यांचे हे पुस्तक महत्त्वाचे आहे. ते एका दशकापेक्षा अधिक काळ बीजिंगमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. प्रारंभी ‘इंडिया टुडे’चे ते प्रतिनिधी होते, तर सध्या ते ‘द हिंदू’चे चीनमधील प्रतिनिधी आहेत. त्यांच्या या अनुभवाचे हे पुस्तक फलित आहे. पत्रकार या नात्याने त्यांना चीनमध्ये बरेच फिरता आले. एका बाजूला विविध प्रदेशांतील विविध लोकांशी झालेल्या संवादातून तर त्याला इतिहास-राजकारणाच्या बारकाव्याची जोड देत पुस्तक आपल्याला चीनचे दर्शन देते.

पुस्तकातील सर्वांत महत्त्वाचा विभाग हा अर्थातच चीनचे राजकारण आणि अर्थव्यवस्थेची तसेच भारत-चीन साम्यवादाच्या इतिहास-वर्तमानाची चर्चा करणारा होय. गेल्या काही वर्षांत चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग.  त्यांनी तुंग शाओपिंग यांनी घालून दिलेली सामूहिक नेतृत्वाची चौकट मोडीत काढून स्वतःच्या हातांत सत्ता केंद्रित केलेली आहे. एकपक्षीय राजवटीचे रूपांतर आता एका व्यक्तीच्या राजवटीत झाले आहे, ही या संदर्भातील कृष्णन यांची टिप्पणी मार्मिक आहे. जिनपिंग यांच्या सत्तेतील वाटचालीच्या प्रवासाचे तपशील रोचक आहेत. चिनी साम्यवादी पक्षाच्या महासचिवपदी येता येता त्यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहीम हाती घेतली. त्यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे वाचून आपल्याकडील वाचकांना आश्चर्य निश्चित वाटेल. पक्षाची लष्करावरील पकड अधिक पक्की केली. अर्थात हा सगळा उद्योग आपली सत्ता अधिक पक्की करण्यासाठी होता हे उघडच आहे.

पण एकाहाती सत्ता असण्याचे तोटेदेखील असतात. माओ यांच्या हातात अशाच प्रकारे सत्ता एकटवल्यानंतर चीनमध्येच काय काय घडले हे काही अज्ञात नाही. त्यामुळे जिनपिंग यांच्या हातांत सर्व सूत्रे एकटविल्याचे चीनवर आणि अर्थातच चीनच्या साम्यवादी पक्षावर काय परिणाम होतील, या बाबत कृष्णन यांनी काहीतरी भाष्य करायला हवे होते, पण पुस्तकात ते नाही.

चीनची गेल्या काही दशकांतील आर्थिक आणि भौतिक प्रगती स्तिमित करणारी आहे. त्याचे श्रेय चीनच्या नेतृत्वाला दिलेच पाहिजे. या संदर्भात परकीय गुंतवणुकदारांचे स्वागत आणि औद्योगीकरणाला प्रोत्साहन या धोरणाचा स्वीकार आणि अंमलबजावणी करण्याच्या आधी चीनने शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली, ही कृष्णन यांची नोंद महत्त्वाची आहे. महासत्ता, विश्वगुरू होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या आपल्या देशात काय परिस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

पण आर्थिक प्रगतीचा वेग वाढवता आला नाही, तरी तो किमानपक्षी कायम ठेवणे हे आज चीनसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. शिवाय या भौतिक प्रगतीच्या नादात समाजात एक प्रकारचे नैतिक पोकळी जाणवत आहे, असे कृष्णन यांना भेटलेल्या काहींनी सांगितले. या दोन आव्हानांना कसे सामोरे जायचे हा चीनच्या सत्ताधारी मंडळींसमोरचा प्रश्न आहे. या आव्हानांचा सामना करण्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना किती यश मिळेल; यावर त्यांचे सत्तेवरील राहणे अवलंबून आहे; हे कृष्णन यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. जिनपिंग यांच्या अलीकडच्या वक्तव्यांमधून कृष्णन यांनी काही निष्कर्ष मांडले आहेत. त्यांच्या मते या सगळ्यांवर चिनी राष्ट्रवादाचा जागर आणि उद्‌घोष हा उपाय स्वीकारला जाईल. चीनच्या साम्यवादी पक्षाच्या शताब्दीनिमित्त जिनपिंग यांनी नुकत्याच केलेल्या भाषणातून हे सूचित केलेले दिसते. त्यामुळे या पुढील काळात चीनचा जगापुढे पाहण्याचा दृष्टिकोन हा राष्ट्रवादावर आधारित असेल असेच दिसते. पण मग या सगळ्यांत आंतरराष्ट्रीय वादावर आधारित मार्क्सवादाचे काय स्थान असेल हा प्रश्न पडतो. त्यावर कृष्णन काहीच टिप्पणी करीत नाहीत.

भारत-चीन सीमावाद हा तसा इतिहासातील म्हणजेच इंग्रजी राजवटीतील निर्णय-धोरणांचा परिणाम आहे. 1962 च्या युद्धाने त्यातील गुंतागुंत वाढली. त्याची विस्तृत चर्चा पुस्तकात आहे. 1989-1990 च्या दशकांपासून भारत-चीनदरम्यान या संदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. त्याचे तपशील वाचनीय आहेत. या वादावर संभाव्य तोडगा काय असू शकतो, याबद्दलचे कृष्णन यांचे मत महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते व्यापक अर्थाने आज रोजी सीमेवर जी परिस्थिती आहे तीच कायम ठेवणे हा या प्रश्नाचा एका अर्थाने कायमस्वरूपी तोडगा ठरेल. म्हणजेच अक्साई चीनच्या फाळणीस भारताने मान्यता द्यायच्या बदल्यात चीनने अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग आहे, यास मान्यता द्यायची असाच काहीसा तोडगा चीनने 1960 मध्ये सुचविल्याची या विषयाच्या जाणकारांना माहिती आहे. त्या वेळी चीनवर विश्वास ठेवता येईल का तसेच चीनच्या मागण्या मान्य केल्या तर भविष्यात चीन अधिकच्या मागण्या करणार नाही का, या शंकांमुळे असा तोडगा फेटाळण्यात आला होता. या शंका आजदेखील कायम आहेत. मात्र त्याबद्दल कृष्णन काही मत व्यक्त करीत नाहीत.

पुस्तकातील दोन नोंदी रोचक आहेत. पहिली म्हणजे काही दशकांपूर्वीच्या तुलनेत आज तरुण पिढीला अधिक स्वातंत्र्य आहे. वैयक्तिक जीवनात काय करायचे, व्यवसाय कोणता निवडायचा इत्यादींच्या संदर्भातील मर्यादा कमी झाल्या आहेत, पण एक बंधन कायम आहे. ते पाळल्यासच या विस्तारित स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. हे बंधन म्हणजे राजकारणापासून दूर राहा. दुसरी नोंद चीनच्या लष्करासंदर्भातील आहे. चीनचे लष्कर हे चिनी राज्यसंस्थेचे नसून चीनच्या साम्यवादी पक्षाचे लष्कर आहे. त्यामुळे ते चीनच्या राज्यसंस्थेशी नव्हे, तर पक्षाशी एकनिष्ठ आहे. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे भविष्यात जर चीनच्या साम्यवादी पक्षाच्या सत्तेवरील मक्तेदारीला आव्हान मिळाले तर लष्कर काय करेल, याचे उत्तर उघड आहे. या निष्ठा कायम राहाव्यात यासाठी जिनपिंग यांचे प्रयत्न अर्थातच चालू आहेत. 

तसेच शिनजांग यांनी तिबेट आणि हाँगकाँग या चीनच्या सीमाभागातील घटना-घडामोडींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. तेथील ताणतणाव, चीन सरकारचे धोरण आणि स्थानिकांचा प्रतिकार-प्रतिसाद-प्रतिक्रिया यांचे तपशिलातून बरेच काही उमगते. पुस्तकात शेवटी विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या 6 चिनी नागरिकांचा परिचय दिला आहे. त्यातील एक आहेत चीनच्या दक्षिण किनारपट्टीवरील एका शहरातील सं3ग्रहालयाच्या संचालिका. या शहराचा भारताशी प्राचीन आणि मध्ययुगात मोठ्या प्रमाणात व्यापार चाले आणि तेथे भारतीय व्यापाऱ्याची मोठी वस्ती होती, हे तेथे सापडलेल्या मंदिरांच्या व हिंदू देवदेवतांच्या मूर्तींच्या अवशेषांवरून कळते. दुसरे एक आहेत पीकिंग विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक. तिबेटमधील विविध मठांमध्ये विखुरलेल्या संस्कृत हस्तलिखितांचा अभ्यास हा त्यांचा अध्ययनाचा खास विषय. चीनमधील संस्कृत, प्राकृत, पाली आदी भाषांचा अभ्यास वाढविण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना भारतीय विद्यापीठांच्या तुलनेत पाश्चात्त्य संस्थांचा अधिक प्रतिसाद मिळतो, अशी खंत ते व्यक्त करतात. तिसरे आहेत गुरुदेव रवींद्रनाथांच्या काव्याचे अनुवादक. या अनुवादाचा प्रचंड खप झाला. पण सरकारी अवकृपेमुळे प्रकाशकांनी त्याच्या प्रती परत मागविल्या. तर चौथी आहे आमिर खान यांची चाहती आणि पाचवी आहे क्रिकेटमध्ये करिअर करू इच्छिणारी तरुण मुलगी. यामुळे पुस्तकाला एक जिवंतपणा येतो. तसेच सामान्य चिनी नागरिकांमध्ये भारताबाबत बरीच आस्था आहे असे वाटत राहते. 

समारोप काहीसा असामाधानकारक आहे. कोविड-19 ने घातलेला धुमाकूळ हा चिनी साम्यवादी पक्षाच्या सत्तेवरील पोलादी पकडीला गेल्या काही वर्षांत मिळालेले मोठे आव्हान होय. या धुमाकुळामुळे देशाचा कारभार आपणच योग्य पद्धतीने चालवू शकतो आणि आपण नसलो तर गोंधळ माजेल हा पक्षाचा दावा प्रश्नांकित झाला आहे. साहजिकच आता पुढे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. चीनसारख्या मोठ्या सत्तेचे भविष्य वर्तविणे  सोपे नसले तरी कृष्णन यांनी आपला स्वतःचा अंदाज तरी व्यक्त करायला हवा होता. त्याऐवजी अमेरिकेतील ज्येष्ठ चीन अभ्यासक प्रा. डेव्हिड शॅमबॉ यांनी व्यक्त केलेल्या चार शक्यता नोंदवून थांबतात.

या अनुषंगाने पुस्तकाबद्दल एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. यात विस्तृत भाष्यांचा अभाव जाणवतो किंवा तसे करण्याचे हेतुतः टाळले आहे असे वाटते. तपशील-निरीक्षणे-अनुभवांची रेलचेल आहे, ते पुस्तकाचे बलस्थान आहेच. पण त्यात विविध मुद्द्यांची विस्ताराने चर्चा केली असते तर बरे झाले असते. चीनसारखा अवाढव्य देश समजून घेण्यासाठी दशकभराचा अनुभव पुरेसा नाही ही आपली जी धारणा कृष्णन यांनी प्रस्तावनेत नोंदविली आहे कदाचित त्यामुळेदेखील हे असे झाले असेल.

या पुस्तकात कृष्णन यांनी सातत्याने एक मुद्दा मांडला आहे आणि तो म्हणजे आपल्याला चीनबद्दल पुरेशी माहिती नाही आणि आपल्या देशात पाश्चात्त्य देशांच्या तुलनेमध्ये चीनचा अभ्यास होत नाही. मोजक्याच भारतीय वृत्तसंस्था आणि वर्तमानपत्रांचे चीन प्रतिनिधी आहेत तर दूरचित्रवाणी वाहिन्यांचे कोणीच नाही. कोणे एके काळी कोलकाता शहरात चिनी वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय होती. पाश्चात्त्य जगाकडे होणाऱ्या स्थलांतरामुळे ती रोडावत आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांत सांस्कृतिक दूताची भूमिका बजावू शकेल असे कोणी आपल्याकडे उपलब्ध नाही, हे ते वाचकांना सांगतात. या सगळ्यांमुळे या अज्ञानात भरच पडते. हे अज्ञान आपल्याला परवडण्यासारखे नाही आणि आपण त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. हे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे असे म्हटले तरी चालेल. अशा पुस्तकांची संख्या वाढत राहण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित होते हेही नसे थोडके.

इंडियाज चायना चॅलेंज, अ जर्नी थ्रु चायनाज राइज अँड व्हॉट इट मीन्स फॉर इंडिया

लेखक : अनंथ कृष्णन

हार्पर कॉलिन्स 2020, किंमत : रु. 599

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अभय दातार,  नांदेड, महाराष्ट्र
abhaydatar@hotmail.com

राज्यशास्त्र विभाग, पीपल्स्‌ कॉलेज, नांदेड


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके