डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कुपोषणाने होणारे बालमृत्यू- शासनाची निष्क्रियता

आदिवासी भागातील बालमृत्यू कुपोषणाने होत नसून जंतूंच्या रोगांमुळे होतात हे शासनाचे म्हणणे ही हातचलाखी आहे. शास्त्रीयदृष्टया हे उत्तर चूक आहे. जागतिक आरोग्यसंघटनेच्या 1998 च्या आकडेवारीनुसार जगभरात झालेल्या बालमृत्यूंपैकी 50 टक्के मुले कुपोषित होती असे म्हटले आहे.

कुपोषणाने होणारे बालमृत्यू- शासनाची निष्क्रियता

आदिवासी भागातील बालमृत्यूंचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात गेले वर्षभर उचलण्यात आला. आरोग्यखात्याच्या ‘सबकुछ ठीकठाक है’ या आकडेवारीवरून वेगळे चित्र ‘सर्च’ च्या अभ्यासातून गोळा झालेल्या बालमृत्यूच्या आकडेवारून दिसत असून बालमृत्यू दर प्रत्यक्षात बराच जास्त आहे. आरोग्य खात्याची नियमित आकडेवारी भ्रामक असून परिस्थिती फार वाईट असल्याचे व त्यासाठी व्यापक योजना सुरू करण्याची गरज असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी श्री. नितीन गद्रे यांनी दिला.

‘गडचिरोली’ जिल्ह्यातील बालकांचे मृत्यू हे कुपोषणाने झालेले नसून, ताप, न्युमोनिया आणि जन्मजात कमी वजन असणे इत्यादी कारणांमुळे झालेले असल्याचे शासनाचे निवेदन खोटे आहे. कुपोषणाने मृत्यू झाले तर ती जबाबदारी आमची नाही ही सरकारची भूमिका अन्याय्य आहे. आमच्या प्रतिजैविकाच्या ‘अँटिबायोटिक्स’ युगात मुलांचा न्युमोनियाने किंवा तापाने मृत्यू होणे ही जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे. गावागावात आरोग्यसेवा पोहोचली तर न्युमोनियामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण 80 टक्क्यांनी कमी करता येते हे सिद्ध झाले आहे. कमी वजनाचे जन्म हे भयानक कुपोषण आहे. 

आंगणवाडीमार्फत पोषक आहारांची योजना राबविली जाते. ही योजना 1600 पैकी 600 आदिवासी गावांमध्ये राबविली जात नाही. तेथील महिला शिपायांना गेल्या वर्षभरात वेतन व आहार मिळालेला नाही. त्यामुळे त्या नीट काम करीत नाहीत. इतरत्र असलेल्या अंगणवाड्यांमध्येही आहार नियमितपणे पोहोचत नाही.

गडचिरोली जिल्ह्यात केवळ बालमृत्यूच नव्हे तर मलेरियाची अंतिभयंकर साथ सुरू झाली आहे. जिल्हा रुग्णालयात सिझेरियनची शस्त्रक्रिया होत नसल्याने अनेक स्त्रिया मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच 350 किलोमीटर लांबीच्या या जिल्ह्यातील कोणत्याच शासकीय रुग्णालयात बधिरीकरण तज्ज्ञ नाही. कुपोषणाचा प्रश्न एटापल्ली भागापुरताच मयादित नाही. तर थानोरा, कुरखेडा, कोची, मुलचेरा, सिरोचा, अहेरी तालुकेदेखील कुपोषण व बालमृत्युग्रस्त आहेत. 

आदिवासी भागातील बालमृत्यू कुपोषणाने होत नसून जंतूंच्या रोगांमुळे होतात हे शासनाचे म्हणणे ही हातचलाखी आहे. शास्त्रीयदृष्टया हे उत्तर चूक आहे. जागतिक आरोग्यसंघटनेच्या 1998 च्या आकडेवारीनुसार जगभरात झालेल्या बालमृत्यूंपैकी 50 टक्के मुले कुपोषित होती असे म्हटले आहे. कुपोषित मुलेच जंतुदोषांना लवकर बळी पडतात. पोषण व आरोग्याच्या गळक्या योजनांऐवजी आदिवासी गावामध्ये व्यापक आरोग्यशिक्षण व गावोगावी आरोग्यसेवा यावी. तसे झाल्यास तीन वर्षात बालमृत्यूचा दर निम्म्याने कमी करता येईल. यासाठी शासन व स्वयंसेवी संस्था यांचे सयुक्तिक कार्य अपेक्षित आहे.


(‘सर्च’, गडचिरोली.)

Tags: राणी बंग अभय बंग आदिवासी गडचिरोली rani bang abhay bang tribal gadchiroli weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके