डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

2003 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रधान अर्थतज्ज्ञ म्हणून राजन यांची नियुक्ती झाली, तेव्हा वयाच्या चाळिशीच्या उंबरठ्यावर त्या पदी विराजमान होणारे ते तेथवरचे सर्वांत तरुण अर्थतज्ज्ञ होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तव्यवहारांचा आणि देशोदेशींच्या वित्तीय व्यवस्थापनाचा प्रदीर्घ व्यासंग गाठीशी असलेल्या डॉ. राजन यांनी ‘सब्‌प्राइम’ कर्जांच्या अमेरिकी अरिष्टाचा सारा प्रवास जवळून न्याहाळला. केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यादरम्यान गेली सुमारे चार-साडेचार वर्षे धुसत असलेला धोरणात्मक विसंवाद आणि त्यापायी भारतीय अर्थव्यवस्थेला सोसावे लागत असलेले चटकेही राजन यांनी जवळून अनुभवलेले आहेत.

‘व्यासंगी, अत्यंत बुद्धिमान, विचारी, विलक्षण शालीन, जमिनीवर पाय असलेला, उदार...’, विशेषणांची ही रांग अशीच वाढवता येईल. ही कोणा आदर्श व्यक्तिमत्त्वाची कोणत्या तरी पुराणात सांगितलेली लक्षणे नव्हेत. ही विशेषणे बहाल केली जातात ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना. राजन यांचे विद्यार्थी, त्यांचे सहकारी, सहसंशोधक यांनी त्यांच्या नजरेतून टिपलेले राजन उपरोक्त विशेषणांनी युक्त आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी राजन यांची नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या मित्रांधून उमटलेली प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाची होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञपद भूषविलेल्या राजन यांच्यासारख्या प्रगल्भ अर्थवेत्त्याचा समावेश गुंतागुंतीची आव्हाने पुढ्यात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे सुकाणू पेलणाऱ्या धोरणकर्त्यांच्या चमूत व्हावा, याबद्दल त्यांच्या काही सहाध्यायांना व सहसंशोधकांना मनापासून समाधान वाटलेले आहे. तर, अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्पष्टवक्तेपणा यांचा संयोग व्यक्तिमत्त्वात असलेल्या राजन यांचे राजकीय धुरिणांबरोबर कितपत सुरळीत जमेल, यांबद्दल त्यांचे अनेक मित्र साशंकच आहेत. त्यामुळे संशोधन-अध्यापनाचे निवांत क्षेत्र सोडून राजकीय अर्थव्यवहाराच्या दैनंदिन झकाझकीत राजन उगाचच उतरत आहेत, अशी आस्थेवाईक खंत बाळगणारेही कमी नाहीत.

आपल्याला आवडणारा टेनिसचा खेळ प्रचंड विजिगिषु वृत्तीने खेळणारे राजन बौद्धिक लढायाही तितक्याच हिरीरीने खेळतात. ‘अमेरिकी सब्‌प्राइम कर्जयुगाचे शिल्पकार’ असा पुढे ज्यांचा दुर्लौकिक झाला, त्या ॲलन ग्रीनस्पॅन यांच्या सन्मानार्थ 2005 साली आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चासत्रातच, ग्रीनस्पॅन यांच्या अदूरदर्शी आणि अनिष्ट धोरणांचे अत्यंत व्यापक व भयकारी आर्थिक परिणाम अत्यंत द्रष्टेपणाने मांडून राजन यांनी उदंड खळबळ माजवून दिली होती.

राजन यांनी 2005 मध्ये रेखाटलेले ते संभाव्य भविष्यचित्र तीन वर्षांनी जागतिक अर्थपटलावर उमटले. 2008च्या सप्टेंबर महिन्यात उद्‌भवलेल्या वित्तीय अरिष्टाचे विश्लेषण-विवेचन आता चौफेर होत असले तरी त्या संकटाची स्पष्ट पूर्वसूचना जागतिक समुदायाला देणाऱ्या मोजक्या अर्थतज्ज्ञांत राजन यांची गणना होते.

या वित्तीय संकटावर करावयाच्या उपाययोजनेबाबतही, नंतर, राजन यांचे झमकले ते आघाडीचे अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांच्याशी. वित्तीय संकटाचे ढग निवारण्यासाठी केन्सप्रणीत सरकारी खर्चप्रधान उपायमालिकेला राजन यांचा विरोध आहे. सरकार, बँका, राजकीय नेते, सर्वसामान्य अमेरिकी ग्राहक, अर्थतज्ज्ञ व अर्थप्रशासक यांनी स्वत:वर या सगळ्या उलथापालथीची जबाबदारी घेत काटकसरीचा अवलंब करणारी धोरणे राबवून अर्थव्यवस्था रुळांवर आणावी, या  धोरणात्मक पर्यायाचा पाठपुरावा राजन करतात.

आता, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अध्वर्यूपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वीही वाद- विसंवादाचा धुरळा उडालाच! रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे राजन यांच्या हाती 5 सप्टेंबर 2013 रोजी रीतसर सुपूर्द होण्याआधीच जवळपास तीन आठवडे सरकारने ‘विशेष अधिकारी’ म्हणून त्यांची नेमणूक रिझर्व्ह बँकेत केली. ‘केंद्र सरकारच्या या अभूतपूर्व कृतीमुळे गव्हर्नरपदाच्या सर्वोच्चतेचे अवमूल्यन झालेले आहे’, अशी टीका राजन यांच्या नियुक्तीबाबत खुद्द रिझर्व्ह बँकेतून त्याचप्रमाणे देशाच्या बँकिंग क्षेत्रातील जाणत्या धुरिणांच्या वर्तुळातून झाली. तर, भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी डॉ. रघुराम राजन यांच्यासारख्या ‘परदेशी’ व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली जाण्याच्या वैधतेबाबतच शंका उपस्थित केली

 वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, या सगळ्याबद्दल राजन यांनी भारदस्त मौन बाळगलेले आहे. मुळात अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रिकल शाखेचे पदवीधर असल्याने सूत्रबद्ध आणि तर्कशुद्ध, पद्धतशीर विचारशक्ती हा राजन यांचा स्थायिभाव आहे. अहमदाबाद येथून व्यवस्थापनशास्त्राची पदवी घेऊन अमेरिकेत गेल्यावर बँकिंगमध्ये डॉक्टरेक्ट करून राजन अर्थशास्त्रीय अध्यापन-संशोधनाच्या क्षेत्रात सक्रिय बनले.

2003 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रधान अर्थतज्ज्ञ म्हणून राजन यांची नियुक्ती झाली, तेव्हा वयाच्या चाळिशीच्या उंबरठ्यावर त्या पदी विराजमान होणारे ते तेथवरचे सर्वांत तरुण अर्थतज्ज्ञ होते. त्या पदावरून 2006 मध्ये शिकागो विद्यापीठाच्या ‘बूथ स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये प्राध्यापक म्हणून राजन रुजू झाले. आपल्या देशातील वित्तीय क्षेत्रात घडवून आणावयाच्या सुधारणांबाबत केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजन 2007-08 या काळात कार्यरत होते. भारतीय अर्थकारणाशी राजन यांचा अर्थप्रशासक या नात्याने थेट संबंध प्रस्थापित झाला तो तेव्हापासून.

त्यानंतर पंतप्रधानांचे अर्थसल्लागार म्हणून गेल्या वर्षीपर्यंत राजन कार्यरत होते. केंद्र सरकारच्या अर्थंत्रालयात मुख्य अर्थसल्लागार या पदावर राजन यांची नेमणूक झाली ती गेल्या वर्षीच. त्यानंतर आता त्यांच्या हाती सूत्रे आहेत ती देशाच्या मध्यवर्ती बँकेची. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तव्यवहारांचा आणि देशोदेशींच्या वित्तीय व्यवस्थापनाचा प्रदीर्घ व्यासंग गाठीशी असलेल्या डॉ. राजन यांनी ‘सब्‌प्राइम’ कर्जांच्या अमेरिकी अरिष्टाचा सारा प्रवास जवळून न्याहाळला. केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यादरम्यान गेली सुमारे चार-साडेचार वर्षे धुसत असलेला धोरणात्मक विसंवाद आणि त्यापायी भारतीय अर्थव्यवस्थेला सोसावे लागत असलेले चटकेही राजन यांनी जवळून अनुभवलेले आहेत.

त्यामुळे सध्याचे राजकीय नेतृत्व आणि डॉ. राजन यांचे सूर धोरणात्मक पातळीवर, कितपत जुळतील यांबाबत उत्सुकतेपेक्षाही शंकाच अधिक आहे. त्यातच येत्या काळात निवडणुका आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीपेक्षाही पक्षीय हिताचे भविष्य जोपासण्याच्या प्रचलित प्रवृत्तीमुळे ऱ्हस्वदृष्टीच्या राजकीय व्यूहरचनेची अर्थकारणावर कुरघोडी होत असल्याचे आपण पाहतो आहोत. डॉ. रघुराम राजन यांच्या व्यक्तिमत्त्वातील अर्थसंशोधकाची कसोटी पाहणारा येता कालखंड त्यांच्याकडून अपेक्षित असलेली व्यावसायिक अर्थप्रशासकाची भूमिका मूलभूत अर्थशास्त्रीय तर्कावर मात न करता बजावू देण्यास त्यांना किती मोकळीक देतो, हा अतिशय संवेदनशील मुद्दा ठरतो. नेमक्या याच मुद्यावर डॉ. राजन आणि राजकीय व्यवस्था यांच्यात युद्ध जुंपले, तर नवल वाटू नये.

इथे मुख्य प्रश्न येणार आहे तो राजकीय व्यवस्थेध्ये सध्या नांदणाऱ्या अर्थकारणविषयक मानसिकतेचा. अमेरिकी ‘सब्‌प्राइम’ कर्जांच्या संकटाबाबत डॉ.राजन यांनी त्यांच्या अलीकडील बहुचर्चित ग्रंथात मांडलेल्या विचारमंथनाद्वारे राजकीय व्यवस्था, सरकार आणि बाजारपेठ यांच्यादरम्यानच्या नात्यांबाबत त्यांच्या वैचारिक भूमिकेचा चांगल्यापैकी अंदाज येतो.

अर्थकारणाला आज ना उद्या भोवणाऱ्या आर्थिक वा वित्तीय संकटांची मुळे तत्कालीन राजकीय व्यवस्थमध्ये रुजलेली असतात, असे राजन यांचे निखालस प्रतिपादन आहे. अर्थव्यवस्थेध्ये नांदणाऱ्या बहुस्तरीय विषमतेचा दबाव राजकीय नेतृत्वावर वाढायला लागतो आणि त्यातूनच दीर्घकालीन अनिष्ट अशा धोरणांचा उगम होतो, असे राजन यांचे विश्लेषण सांगते. ही विषमता हटवण्यासाठी सर्वसामान्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्याऐवजी त्यांच्या ताटात सवंग उपभोगाचे वाढप वाढण्यात येते आणि त्याचीच परिणती मूलभूत आर्थिक अरिष्टांध्ये होते, हे राजन स्पष्टपणे मांडतात. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या याच मानसिकतेधून प्रसवणाऱ्या धोरणांची चलती आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा काटेरी मुगुट मस्तकावर धारण करणारे राजन यांच्याबाबत उमेद वाटावी की कणव, याचा निर्णय काय करावा?

Tags: अभय टिळक काटेरी मुगुटाचा धनी लास्ट पेज 5 Abhaya Tilak Kateri Mugutacha Dhani Last Page 5 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अभय टिळक,  पुणे, महाराष्ट्र
agtilak@gmail.com

अर्थतज्ज्ञ


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके