डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘बायजा’ : एक अव्यापारी नियतकालिकाचा प्रयोग

कष्टकरी स्त्रीची मुक्ती हे अंतिम उद्दिष्ट मानल्यामुळे समाजातील सर्व प्रकारची विषमता नष्ट करून समतेवर आधारित समाजरचना प्रस्थापित करण्याच्या, सर्वकष सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा एक भाग या दृष्टीने स्त्रियांच्या लढ्याचा विचार करण्याची भूमिका प्रथमपासून ‘बायजा’ने स्वीकारली होती. समाजमानसातील घराच्या चार भिंतींच्या आत बंदिस्त केलेली' पारंपरिक स्त्री-प्रतिमा बदलण्याच्या दृष्टीने ‘बायजा’ने वाटचालीला सुरुवात केली. स्वतंत्र, प्रगल्भ आणि बिकसनशील व्यक्तिमत्त्वाची, स्वावलंबी, आत्मनिर्भर वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली, निर्णयक्षम, आत्मविश्वासपूर्ण, समाजाच्या सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होऊ शकणारी - अशी स्त्रीची नवी प्रतिमा समाजमानसात रुजविणे हे कार्य 'बायजा'ला करायचं आहे.

गेली 24 वर्षे ज्या ‘बायजा’ द्वैमासिकाचे संपादन मी करत आहे, त्याच्या नावातच ते प्रकाशित करण्यामागील आमची उद्दिष्टे अनुस्यूत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या (सन 1975) पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 1977 पासून ‘बायजा’ची सुरुवात झाली. 
पुण्या-मुंबईच्या अनेक कार्यकर्त्यांच्या सहभागाने ते सुरू झाले आणि कार्यकर्ते बदलत गेले तरी अनेक अडथळे-संकटे पार करीत ते आजतागायत तगून आहे. स्त्रियांच्या प्रश्नांचा आणि मुक्तिमार्गाचा वेध घेताना ग्रामीण-कष्टकरी-दलित स्त्री ‘बायजा’त केंद्रीभूत मानण्यात आली, मध्यमवर्गीय-उच्चवर्गीय स्त्रियांच्या समस्या पुढे आणण्यासाठी 'स्त्री', 'माहेर'सारखी नियतकालिके आधीच निघाली होती. पददलित स्त्रीच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ निर्माण करणे हा ‘बायजा’चा मुख्य उद्देश होता. जोडीला मध्यमवर्गीय स्त्रियांचे प्रश्न 'बायजा' घेत होती. प्रचलित प्रस्थापित भांडवलदारी वृत्तपत्रे स्त्री-मुक्तीच्या सखोल विचारांना आणि कार्यक्रमांना विशेषतः संघर्षात्मक कार्यक्रमांना आपल्या पत्रांत फारशी जागा देत नव्हती. तेव्हा स्त्री-मुक्ती चळवळीतील देशी-परदेशी आणि स्थानिक प्रयत्नांना प्रसिद्धी देण्यासाठी एक पुरोगामी माध्यम उपलब्ध करून देणे हाही ‘बायजा’चा एक उद्देश होता. कुटुंबातील आणि समाजाच्या सर्व क्षेत्रांतील स्त्रीच्या दुय्यमत्वाचे निरनिराळे पदर, आविष्कार उलगडून दाखविणे आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर विचारमंथन घडवून स्त्रियांच्या चळवळीची दिशा निश्चित होण्यास साहाय्यभूत होणे, यासाठी एक पक्ष निरपेक्ष व्यासपीठ निर्माण करणे हेही एक उद्दिष्ट होते.

वैचारिक भूमिका
कष्टकरी स्त्रीची मुक्ती हे अंतिम उद्दिष्ट मानल्यामुळे समाजातील सर्व प्रकारची विषमता नष्ट करून समतेवर आधारित समाजरचना प्रस्थापित करण्याच्या, सर्वंकष सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा एक भाग या दृष्टीने स्त्रियांच्या लढ्याचा विचार करण्याची भूमिका प्रथमपासून ‘बायजा’ने स्वीकारली होती. पुरुषप्रधानतेची मूल्ये मानणाऱ्या आपल्या समाजात स्त्रीकडे भोगवस्तू आणि पुरुषाची खाजगी मालमत्ता म्हणूनच बघितले जाते. स्त्रीचे स्वतंत्र मानवी व्यक्तिमत्त्व नाकारून वडील, भाऊ, नवरा, मुलगा, इत्यादींच्या संदर्भातच तिचे अस्तित्व मान्य केले जाते. कुटुंबातील आणि समाजातील निर्णयप्रक्रियेत तिला सहभाग नसतोच; पण तिच्या स्वतःसंबंधीचे निर्णयसुद्धा घेण्याचे स्वातंत्र्य वा संधी तिला नसते. ‘चूल आणि मूल’ हेच तिचे मुख्य कार्यक्षेत्र ठरवून चार भिंतींच्या आत तिचे व्यक्तिमत्त्व घडवले जाते आणि बंदिस्त केले जाते. परंपरेने कष्ट करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावणाऱ्या स्त्रीची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. उलट पुरुषप्रधानतेबरोबर आर्थिक आणि जातीय विषमतेच्या या बळी ठरतात, गेल्या पंचवीस वर्षांत या परिस्थितीत थोडाफार फरक पडला असला तरी मूलभूत प्रश्न तसेच आहेत. समाजमानसातील ‘घराच्या चार भिंतीच्या आत बंदिस्त केलेली पारंपरिक स्त्री-प्रतिमा बदलण्याच्या दृष्टीने ‘बायजा’ने वाटचालीला सुरुवात केली. स्वतंत्र, प्रगल्भ आणि विकसनशील व्यक्तिमत्त्वाची, स्वावलंबी, आत्मनिर्भर, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली, निर्णयक्षम, आत्मविश्वासपूर्ण, समाजाच्या सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होऊ शकणारी- अशी स्त्रीची नवी प्रतिमा समाजमानसात रुजविणे हे कार्य ‘बायजा’ला करायचे आहे.

पार्श्वभूमी
'बायजा' सुरू झाली त्या वेळेस 'बायजा'च्या स्वरूपाची फारच तुरळक नियतकालिके प्रकाशित होत होती. मुंबईहून निघणारी महिला आंदोलन पत्रिका आणि प्रेरक ललकारी आणि दिल्लीहून निघणारे मानुषी एवढीच. त्यांत 'बायजा' अग्रेसर होते. महिला वर्षापासून स्त्रियांच्या चळवळीला अनेक धुमारे फुटू लागले होते. नवनवीन कार्यकर्त्या आणि संघटना निर्माण झाल्या. प्रबोधनात्मक, रचनात्मक आणि संघर्षात्मक असे अनेक उपक्रम सुरू झाले. ‘बायजा’ने याची नोंद घ्यायला सुरुवात केली. साहजिकच कार्यकत्यांना ‘बायजा’चे आकर्षण वाटू लागले. वर्गणीदार मर्यादित राहिले तरी वाचक बरेच होते आणि ‘बायजा’चा बोलबाला खूपच झाला. ‘बायजा’तील लेखनावर चर्चाही घडू लागल्या. ‘बायजा’चा वाचकवर्ग मर्यादित राहण्याचे एक कारण म्हणजे ज्या स्त्रियांच्या प्रश्नांना ‘बायजा’त प्राधान्य देण्याचे ठरविले होते, त्या स्त्रियांना शिक्षणाअभावी वाचता येत नव्हते आणि ‘बायजा’ खरेदी करायला त्यांच्याजवळ पैसे नव्हते. चळवळीतील कार्यकर्त्यांमार्फतच त्यांच्यापर्यंत पोहोचणे अपरिहार्य होते. नव्याने कामाला लागलेल्या या स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांचा ‘बायजा’ वाढण्यात आणि सुरू राहण्यात मोठा वाटा आहे. आज स्त्रियांच्या समस्या आणि एकूण स्त्री हा विषय चलनी नाणे बनले आहे. 33% आरक्षणाला विरोध असला तरी ‘मतदार बँक’ म्हणून स्त्रियांकडे आस्थेने बघितले जाऊ लागले. वर्तमानपत्रांतील स्त्रियांवरील सदरांना आणि पुरवण्यांना उधाण आले. परंतु पारंपरिक-स्त्री प्रतिमा जतन करणारीच सदरे अधिक. स्त्री-प्रश्नांची मांडणी करताना कारणमीमांसा करून उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न अभावानेच आढळतो.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात्त आंतरराष्ट्रीय पातळीवर साधारण असे चित्र दिसत होते की, सोव्हिएत रशिया आणि इतर समाजवादी देशांतील स्त्रिया अमेरिका व इतर भांडवलशाही देशांतील स्त्रियांपेक्षा तुलनेने अधिक स्वतंत्र आणि विकसित झाल्या होत्या. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने राष्ट्रविकासात सहभागी होण्याची संधी मिळत होती. त्यांच्या कर्तबगारीचे, प्रगतीचे चित्रण ‘बायजा’त येत होते. भारतात समाजवाद आल्याशिवाय स्त्रियांचे, विशेषतः कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न पूर्णपणे सुटणार नाहीत, असा नकळत सूर होता. (अर्थात समाजवादी देशांतील स्त्रियाही पूर्णपणे स्वतंत्र नाहीत, त्यांना पुरुषांच्या बरोबरीने 100% समानता प्राप्त झाली नाही, याचे भान आम्हांला होतेच, म्हणून तुलनेने हा शब्दप्रयोग). पण त्या वेळेस स्त्री-मुक्ती, समाजवाद वगैरे शब्दांचे सामान्य लोकांना, विशेषतः स्त्रियांना वावडे असावे. तेव्हा ‘साम्यवादी’ असा ‘बायजा’वर छाप मारून अनेकांनी, अनेक पुरोगाम्यांनीसुद्धा त्याला दूर ठेवले. स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरचा भर अनेकांना रुचायचा नाही. कारण स्त्रीने तोलून धरलेली पारंपरिक कुटुंबपद्धती त्यांना सलामत राहायला हवी होती. आपल्याला स्वातंत्र्य मिळावे असे वाटले तरी कष्टकरी स्त्रियांचे स्वातंत्र्य, समानता, त्यांना अनेक स्त्रियांसाठी मानवत नाही. (अजूनही अनेकांना ती खुपतेच. विशेषतः दलित स्त्रियांबाबत!) पण आज काहीसे मान्य झालेय की आर्थिक स्वातंत्र्यामुळे स्त्रीच्या विकासाचे कवाड उघडले जाते. शिवाय महागाई व इतर कारणांमुळे अर्थार्जन करणे स्त्रियांना अपरिहार्यही झालेय. सुरुवातीच्या काळापासून जे प्रश्न, जे विषय ‘बायजा’ने हाताळले ते अलीकडे वर्तमानपत्रे, नियतकालिके हाताळू लागली आहेत; हे लक्षात घेण्याजोगे आहे. ह्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे काम त्या काळात ‘बायजा’ने केले असे म्हणावे लागते. एक पथ्य सतत ‘बायजा’ने पाळले ते म्हणजे प्रस्थापित भांडवलशाही समाजव्यवस्थेचा उदोउदो करणारे, तसेच जातिनिष्ठ, संस्कृतिनिष्ठ, धर्मनिष्ठ विचार मांडणारे लेखन आम्ही ‘बायजा’त कधीही प्रसिद्ध केले नाही. धोरण म्हणून, प्रसंगी वाईटपणा घेऊनही. 

लेखनातील विविधता
‘बायजा’ची सुरुवात विशेषांकांनी झाली असली तरी लवकरच असे लक्षात आले की, सामान्य स्त्रियांना वाचनाची सवय कमी, वेळही कमी; तेव्हा विविध विषयांवरील अंक त्यांना अधिक स्वागतार्ह वाटेल, दोन महिन्यांत हळूहळू अंक वाचून संपविणे शक्य आणि सोयीचे होईल. सुरुवातीला सामूहिक लेखन आणि संपादनपद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. आमचा 7/8 जणींचा गट होता. सर्वांनी लेखांचे विषय ठरविणे, त्या विषयांवर चर्चा करणे, एकेका विषयावरचा लेख चर्चेनुसार एकेका कार्यकर्तीने लिहून काढणे, टोपणनावाने लेख छापणे- अशी पद्धती स्वीकारण्यात आली. नंतर असे वाटू लागले, प्रत्येक लेखातील विचारांची जबाबदारी कोणीतरी स्वीकारली पाहिजे. तेव्हा इतरांच्या सूचना लक्षात घेऊन, स्वतःच्या नावावर लेखिकेने लेख द्यावा, असे ठरले. गेल्या 24 वर्षांत स्त्री-जीवनाला स्पर्श करणाऱ्या आणि स्त्री-मुक्ती चळवळीने हाती घेतलेल्या अनेक विषयांचा, प्रश्नांचा वेध ‘बायजा’त घेण्यात आला. तंबाखू-विडी कामगार, सफाई कामगार, शेतमजूर, कारखान्यांतील कामगार, मोलकरणी, परिचारिका, शिक्षिका, आदिवासी स्त्रिया, इत्यादी स्त्रियांनी त्यांच्या प्रश्नांवर चालविलेल्या आंदोलनाची ‘बायजा’ने वेळोवेळी दखल घेतली. मथुरा-तुकाराम बलात्कार केसमध्ये सुप्रीम कोर्टाने मथुराविरोधी जो निकाल दिला तो ग्राह्य नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या चार वकिलांनी सरन्यायाधीशांना वर्तमानपत्रांत ओपन लेटर (अनावृत्त पत्र) लिहून केसची पुनर्सुनावणी करण्याची मागणी केली. या इंग्लिश पत्राचे मराठी भाषांतर प्रथम ‘बायजा’ने छापले.

त्यामुळे त्या प्रकरणावर भारतभर जे आंदोलन उभे राहिले, त्याला महाराष्ट्रभर भकम पाठिंबा मिळाला आणि या केसची पुनर्सुनावणी व्हायला मदत झाली. मथुरेला न्याय नाहीच मिळाला. पण त्यामुळे बलात्कारविरोधी कायद्यातील त्रुटी लक्षात येऊन त्यात सुधारणा करण्यात आल्या. ‘बायजा’मध्ये अनेक बलात्कार प्रकरणे, स्त्रियांवरील अन्याय-अत्याचारांची प्रकरणे, शाहबानो पोटगी केस व इतर पोटगी प्रकरणे, शहानवाझ तलाक केस, मंजुश्री सारडा खून खटला, हुंडाबळी इत्यादींवर ‘बायजा’त आवर्जून लिहिण्यात आले. भारताचा स्वातंत्र्यलढा, बंगालमधील तेभागा चळवळ, चिपको आंदोलन, सरकारी-निमसरकारी कर्मचा-यांचा प्रदीर्घ संप, मुंबईचा गिरणी कामगार संप, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा, शेतमजुरांचे किमान वेतन लढे, रोजगार हमी योजनेवरील कामगारांचे लढे यांमधील स्त्रियांच्या सहभागाचा आढावा ‘बायजा’त घेण्यात आला. हुंडा-बलात्कार अत्याचारविरोधी आणि हुंडा-बलात्काराच्या कायद्यातील सुधारणांची मागणी करणा-या लढ्याची नोंद ‘बायजा’ने घेतली. स्त्रीबद्दल विकृत दृष्टिकोन फैलावणा-या चित्रपट, नाटक, जाहिराती, पोस्टर्स, सौंदर्यस्पर्धा, दूरचित्रवाणी कार्यक्रम इत्यादींच्या संदर्भात जागृती करण्याच्या दृष्टीने लेखन केलेच; पण त्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या मोर्चे, धरणे व इतर कार्यक्रमांची दखल ‘बायजा’ने घेतली. परिवर्तनवादी स्त्री-मुक्ती आंदोलन संपर्क समितीने (परिवर्तनवादी स्त्री-संघटनांचे एकजुटीचे व्यासपीठ) घेतले. विविध कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (8 मार्च) निमित्ताने चर्चासत्रे, परिषदा, शिबिरे यांचे अहवाल यांना दर वर्षी प्रसिद्धी देण्यात येते. स्त्रियांच्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर- आरोग्य, शिक्षण, साहित्य, विज्ञानधर्म, अंधश्रद्धा, बुवाबाजी, पिण्याचे पाणी, रोजगार, महागाई व रेशनव्यवस्था, घरांचा-झोपडपट्ट्यांचा प्रश्र, कुटुंबनियोजन यांवरील लिखाण ‘बायजा’त प्रसिद्ध करण्यात आले. समाजवादी आणि भांडवलशाही देशांतील स्त्रियांचे स्थान, मार्क्सवाद-गांधीवाद व इतर स्त्री-मुक्तीविषयक विचार, गर्भजलपरीक्षा, बाळंतपणाच्या सवलती, अपंगांचे प्रश्न, आर्थिक नियोजनातील स्थान, स्त्रियांचा राजकीय सहभाग आणि 33% आरक्षण, मोठ्या धरणांबद्दलचा वाद, पर्यावरणाचा -हास, त्याचा स्त्रियांवरील होणारा परिणाम व त्या संदर्भातील लढे, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे स्त्रियांवरचे परिणाम, राखीव जागा व दलितांचे इतर प्रश्न, शांतता व अण्वस्त्रविरोधी लढे, देशी-परदेशी चळवळी, जात-जमातवाद आणि राष्ट्रीय एकात्मता इत्यादींचा स्त्रियांच्या संदर्भात ऊहापोह ‘बायजा’त करण्यात आला.

‘बायजा’त प्रामुख्याने लेखांवर भर असला तरी नवीन मूल्ये समाजात रुजविण्याच्या दृष्टीने, तसेच लेखनसाहित्यात विविधता आणून कंटाळवाणेपणा टाळण्याच्या दृष्टीने कविता, कथा, छोट्या नाटिका, नाटक-चित्रपट-पुस्तक परीक्षणे, मुलाखती, परकीय भाषेतील साहित्याची भाषांतरे यांचाही समावेश करण्यात येतो. ‘बायजा’ने अनेक विशेषांक प्रकाशित केले. त्यामध्ये दारुबंदी, स्त्रीशिक्षा, स्त्रिया आणि रोजगार, दलित स्त्री, स्त्री आणि पुनरुत्पादन, धर्म आणि स्त्रिया, स्त्रिया आणि साहित्य, सावित्रीबाई फुले विशेषांक, बालिका विशेषांक, पर्यावरण विशेषांक, फुले-आंबेडकर विशेषांक इत्यादींचा समावेश आहे. 1994 पासून दरवर्षी दीपावली विशेषांकही काढत आहोत. स्त्रियांच्या प्रश्नांवर पुरोगामी वैचारिक भूमिका घेऊन केलेल्या लेखनातून आणि विचारमंथनातून महाराष्ट्रातीत गेल्या दोन-अडीच दशकांतील स्त्रियांच्या चळवळीचा आलेख ‘बायजा’त रेखाटण्यात आला. चळवळीला ‘पूरक’ भूमिका बजावण्यात ‘बायजा’ला काही अंशी यश आले, असे नम्रतापूर्वक नमूद करावेसे वाटते. ‘बायजा’ला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी (मोडक-नेने पुरस्कार, लातूरचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार यांचा अपवाद) एम.फिल, एम.एस.डब्ल्यू. पीएच.डी. करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना स्त्री-प्रश्नावर प्रबंध लिहायचा असेल तर संदर्भसाहित्य म्हणून ‘बायजा’चा वापर करणे अपरिहार्य आणि उपयुक्त ठरते, असा अनुभव आहे. एवढेच नव्हे तर ‘बायजा’ हा एका विद्यार्थिनीच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होऊ शकला, याचा आम्हांला अभिमान वाटतो.

‘बायजा’च्या मर्यादा
‘बायजा’ची विविध उद्दिष्टे लक्षात घेता ‘बायजा’चा वाचकवर्ग निश्चित करणे तसे अवघडच जाते. स्त्रियांच्या चळवळीतले कार्यकर्ते, सहानुभूतिदार, स्त्री-प्रश्नांवरील विचारवंत आणि सामान्य जनता (जागृतीसाठी) हा वाचकवर्ग धरला तरी त्यांच्यामध्ये ग्रामीण-शहरी, अल्पशिक्षित, अर्धशिक्षित, उच्चशिक्षित अशा विविध पातळ्या आढळतात. एकाच वेळी सर्व लेख सर्व वाचकांना पसंत पडण्याची शक्यता कमीच. अनेक वेळा तात्त्विक चर्चा करणारे लेख अवघड भाषेत लिहिले जातात आणि सोपे करायला गेले तर त्यांतील मुख्य आशयच हरवतो, असा अनुभव आहे. वैचारिक स्वरूपाचे लेख काही वेळा खूप लांबतात आणि अशा त-हेच्या वाचनाची सवय नसलेल्या काही वाचकांना ते बोजड, कंटाळवाणे वाटण्याचा संभव असतो. विचारप्रसार हे एक ‘बायजा’चे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याने काही लेखन प्रचारकी वाटणे, त्यात ‘तोच तोचपणा’ वाटणे संभवनीय आहे. या व इतर अनेक मर्यादांची आम्हांला जाणीव आहे. लेखन अधिक सुलभ करणे, नवनवीन लेखक शोधणे, चित्रे व रेखाटनांचा वापर करून ‘बायजा’चा ले-आउट सुधारणे, मुखपृष्ठ आकर्षक करणे ह्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात यावर आर्थिक मर्यादा पडतातच. ‘बायजा’ दोन महिन्यांतून एकदा निघत असल्यामुळे काही ताज्या घटना निसटूनही जातात.

मर्यादित वर्गणीदार संख्या ही महत्त्वाची उणीव आम्हांला जाणवते. मुळात पैसे खर्च करून पुस्तके विकत घेण्याची प्रवृत्ती कमी, त्यात महागाई; नवनवीन पुरोगामी नियतकालिकांचा (स्त्रियांवरच्याही) मोठ्या संख्येने उदय, दूरचित्रवाणी आणि इतर विलोभनीय साहित्याचे आक्रमण इत्यादींचा परिणाम या संख्येवर होतोच. वर्तमानपत्रांत वाचायला मिळणा-या स्त्रियांवरल्या मजकुरापलीकडे सामान्य स्त्रियांच्या समस्या समजावून घेणे आणि उपाय शोधणे, यांसाठी काही वाचन करण्याची आवश्यकता अनेकांना जाणवतच नाही. पुरोगामी म्हणवून घ्यायला तेवढे ज्ञान पुरेसे वाटते. या सर्व अडचणींवर मात करून, जाहिरातबाजी न करता, शांतपणे आपण स्वीकारलेले कार्य ‘बायजा’ गेली 24 वर्षे करत आहे. हे शक्य होत आहे, मोबदला न घेता शेकडो लेख आजपर्यंत लिहून दिलेल्या लेखकांमुळे; आणि नियतकालिकांशी संबंधित- (कंपोझ, छपाई सोडून) सर्व कामे- संपादकीय व कार्यालयीन मानधन न घेता करणारा कार्यकर्ता संच यांमुळे सध्याच्या काळात पैशाचा महिमा वाढतच चाललाय. तेव्हा किमान पैशात नियतकालिक चालविण्याचा हा प्रयोग कदाचित अनेकांना बालिशपणाचा अगर वेडगळपणाचा वाटेल. परंतु स्वातंत्र्यचळवळीत अनेकांनी असे योगदान केलेले आहे. तेव्हा असे योगदान करू इच्छिणा-यांच्या बळावर आणि ‘बायजा’च्या अनेक हितचिंतकांच्या शुभेच्छांवर अवलंबून परिवर्तनवादी स्त्री-मुक्ती विचारप्रवाहांचे व्यासपीठ म्हणून दोन तपे पूर्ण केलेल्या ‘बायजा’ची वाटचाल सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे.

‘बायजा’ सुरू करण्यामध्ये सुलभा ब्रह्मे, दिवंगत कुमुद पोरे, लीला भोसले, सौदामिनी राव, लता भिसे, निर्मला साठे, छाया दातार, इत्यादींचा पुढाकार होता. नंतरच्या काळात कल्पना जवळेकर, संध्या फडके, विनया देशपांडे, मुक्ता मनोहर, मेधा थत्ते, सरिता आव्हाड, शुभा शमीम, लतिका साळगावकर, लता जाधव, इत्यादींनी त्यासाठी बहुमोल सहकार्य केलेले आहे. सध्या सहसंपादक वसुधा जोशी (गेली 14 वर्षे), आशा राजवाडे, शशिकला कांबळे, माधवी मित्र, मंदा मोघे, अंजली दिग्रजकर यांचे संपादकीय आणि कार्यालयीन साहाय्य सुरू आहे. ‘बायजा’ ट्रस्टमध्ये (स्थापना 1985) अनेकांनी विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे, पाहत आहेत. त्यामध्ये नलिनी पंडित (अध्यक्ष), सौदामिनी राव (कार्यकारी विश्वस्त), दिवंगत कमल कामत आणि ज्योत्स्ना घारपुरे, लीला पाटील (गारगोटी), सुमन रानडे (औरंगाबाद), कुसुम रणदिवे, कुमुद पावडे (नागपूर), मालिनी तुळपुळे, सुलोचना वाणी, श्रुती यांचा समावेश आहे. ‘बायजा’साठी योगदान करणाऱ्या सर्वांची नावे देणे शक्य नाही. या सर्वांची ‘बायजा’ ऋणी आहे.
 

Tags: स्त्रीमित्र ‘बायजा’ मासिक friend of women ‘bayaja’ magazine weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके