डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मिळून साऱ्याजणी : एक गोधडी

'मिळून साऱ्याजणी'च्या रक्तात पत्रकारिता आणि कार्यकर्तेपणाची जी एक गुंफण आहे, त्यातच मासिकाचं सामर्थ्य आहे आणि मर्यादाही आहेत. हे मासिक स्त्री-पुरुष समतेच्या चळवळीची दृढ बांधिलकी मानतं. पण ते चळवळीचं मुखपत्र नाही. त्यामुळेच काही कार्यकर्त्या मैत्रिणींचा आक्षेप असतो की त्यांना 'साऱ्याजणी'तून काहीच मिळत नाही! याउलट केवळ चळवळीच्या मुखपत्राची भूमिका न करण्याचा निर्णय घेऊनसुद्धा काहींना हे मासिक अतिबंडखोर वाटतं!

1989 च्या ऑगस्ट महिन्यात 'मिळून साऱ्याजणी'चा पहिला अंक प्रकाशित झाला, त्या वेळी माझ्याजवळ ‘स्त्री’ मासिकामधल्या संपादकीय कामाचा जवळपास वीस वर्षांचा अनुभव होता. ‘स्त्री’ मध्ये काम करताना मला वाढण्याची, विकसित होण्याची, स्वातंत्र्य उपभोगत काम शिकण्याची आणि करण्याची अतिशय मोलाची संधी मिळाली. स्त्रीकडे बघण्याचा प्रगतिशील दृष्टिकोन ठेवून वाचकांचं मन घडवणारं हे एक महत्त्वाचं मासिक होतं. या पार्श्वभूमीवर, 'स्त्री'च्या नव्या व्यवस्थापनाशी आपले मतभेद होणार याची खात्री पटल्यामुळे, ‘स्त्री’मधल्या संपादकपदाचा राजीनामा देऊन मी 1986 साली बाहेर पडले. 'स्त्री'मधून बाहेर पडले तरी पत्रकारिता आणि स्त्री-प्रश्नांबाबतची आस्था यांच्यापासून दूर जाण्याचा विचारही माझ्या मनात डोकावला नाही. उलट अधिक स्वतंत्रपणाची जबाबदारी घेऊन पत्रकारिता आणि 'नारी समता मंच' या माझ्या संघटनेचं प्रत्यक्ष काम, यांचा गोफ विणतच नवीन मासिक सुरू करण्याचा मी निश्चय केला.

या वेळी मासिकाबाबतची उद्दिष्टं आणि अपेक्षा माझ्या मनात स्पष्ट होत्या. सर्वप्रथम विचार मनात आला तो आजवरच्या ‘स्त्री’मधल्या अनुभवांच्या पलीकडे थोडंतरी पाऊल टाकण्याचा, म्हणूनच शहरी आणि ग्रामीण जीवनात देवघेव आणि समज वाढवणारा एक पूल ‘साऱ्याजणी’च्या रूपाने उभारावा हे एक नक्की ठरवले. दुसरा उद्देश होता, स्त्री-चळवळीच्या परिघाबाहेरच्या स्त्री-पुरुषांपर्यंत स्त्री-पुरुष समतेचा विचार पोचवायचा. तिसरा उद्देश होता हे मासिक केवळ साहित्यिक म्हणून आकाराला येण्याऐवजी त्याचं सामाजिक स्वरूप आपल्याला आणि वाचकांनाही स्पष्ट असावं, या सर्व उद्देशांच्या मुळाशी असलेला पायाभूत विचार होता. या पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात स्त्रीला, स्त्री-प्रश्नांना पुरेशी ‘जागा’ नाही, अवकाश' नाही. यासाठी आपणच आपल्या साऱ्यांसाठी एक स्वतःचा ‘अवकाश’ या मासिकाच्या रूपाने प्रत्यक्षात आणावा; या उद्दिष्टांसहित सुरू केलेल्या मासिकाला ‘बालमृत्यू’ येण्याची मोठीच शक्यता असताना हे मासिक चक्क या ऑगस्ट 2001 मध्ये बारा वर्षांचा टप्पा पूर्ण करणार आहे, हे एक सुखद आश्चर्यच आहे. आत्ममग्नता आणि व्यक्तीचं अणुभवन (ऑटोमायझेशन) ही सुखवस्तू समाजाची काळाबरोबर दिसणारी स्वभाववैशिष्ट्यं अधिकाधिक ठळक होताना दिसत आहेत. आपल्यापलीकडे इतरांचा विचार करण्यासाठीचं मन सहजासहजी भेटत नाही.

अशा वेळी ‘स्वतःशीच नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक’ असं बिरुद मुखपृष्ठावर सातत्यानं घेऊन वावरणाऱ्या मासिकाला इतकी वर्षं एकही पाऊल न अडखळता, चालता आलं हेच एक नवल आहे! ‘मिळून साऱ्याजणी’ अतिशय भरभराटीला आलं असल्याचा आमचा दावा नाहीच. पण ते सुरुवातीच्या वर्षापेक्षा निश्चितच बऱ्या अवस्थेत आहे. याचं कारण काय असावं असा मी विचार करते तेव्हा मला बरीच कारणं दिसतात. एक तर, मासिकाच्या उद्दिष्टांचं जे प्रतिबिंब मासिकात सापडतं त्याला वाचकांनी दिलेली दाद! वाचक नसते, वर्गणीदार नसते, देणगीदार नसते तर एक प्रकारचा विचार आणि त्यातून येणारी अस्वस्थता जन्माला घालत दरमहा घराघरांत येणारं हे मासिक कसं उभं राहू शकलं असतं? मासिकाच्या मुखपृष्ठावर केवळ सुंदर स्त्रीचा चेहरा इतक्या वर्षांत एकदाही न देणारं हे मासिक 'उत्कृष्ट, वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठं देतं, असा आवर्जून उल्लेख वारंवार कसा झाला असता? असे अनेक प्रतिसाद पत्रांतून, भेटींतून, कृतीतून सोबत करत असल्यामुळेच हे मासिक आज उभं आहे. चालतं आहे. म्हणूनच समाजात सजग, विकासासाठी उत्सुक, असा वाचक नाहीच असं मी कधीच म्हणणार नाही. फक्त हीही एक अल्पसंख्य जमात आहे आणि तिचं होताहोईतो 'अल्पसंख्यपण' कमी करण्याच्या धडपडीत 'साऱ्याजणी' आहेत, असं म्हणता येईल. कोणत्याही कामाची सुरुवात करताना, जेव्हा उद्दिष्टं ठरवली जातात तेव्हा ती अधिकाधिक पुरी करण्याचा प्रयत्न असतोच.

पण अनेकदा ही उद्दिष्टं मला क्षितिजासारखी वाटतात. ती दिसत असतात आणि त्यांच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नांतच ती विस्तारत जातात. त्यामुळे दिशा सापडलेली असते. ध्येय समोर दिसत असतं आणि तरीसुद्धा वाट न संपणारीच असते; जशी अस्वस्थ माणसं कधीच निःप्रश्न नसतात! हे मासिक सुरू झाल्यापासून प्रत्येक अंकात मी दोन ‘संपादकीय’ लिहीत होते. एक ‘संवाद’ शहरी मध्यमवर्गीय वाचकासाठी. दुसरा 'मैतरणी गं मैतरणी' ग्रामीण मैत्रिणींसाठी आणि त्यांच्याविषयी. निरक्षरता आणि गरिबी यांमुळे 'साऱ्याजणी' विकत घेऊन वाचलं जाण्याची 'चैन' माझ्या या ग्रामीण मैतरणींना परवडणारी नाही, याचं भान मला होतंच. तरीही ग्रामीण भागात काम करणाऱ्या संघटनांच्या मदतीने 'साऱ्याजणी' काही प्रमाणात खेड्यांत पोचतं. मात्र 'संवाद' ज्यांच्यासाठी लिहिला जात होता, त्या शहरी, सुशिक्षित मैत्रिणी हळूहळू आवडीनं, उत्सुकतेनं आणि अग्रक्रमानं ‘संवाद’ च्या आदी ‘मैतरणी’ वाचायला लागल्या. हा अनुभव सुखद होता! शहरी आणि ग्रामीण जीवन जोडणाऱ्या या पुलावर दुतर्फा ये-जा होती, तर फारच आनंद झाला असता! पण निदान शहरी वाचक त्यांच्यासाठीच्या ‘संवादा’ पलीकडे, ग्रामीण जीवनासाठीच्या आणि त्यांच्या संबंधीच्या संपादकीयाकडे ओढला गेला, इतपत प्रवासही उमेद देणाराच होता. हे सारं भूतकाळात जमा झाल्यासारखं लिहिण्याचं कारण एवढंच की 98 सालापासून ग्रामीण जीवनासंबंधीची आठ पानांची एक स्वतंत्र पुरवणीच अंकातून द्यायला आम्ही सुरुवात केली. त्यामुळे केवळ ‘मैतरणी गं मैतरणी’मधून त्या जगाशी होणारा संवाद किंवा दर्शन, यापलीकडची, या पुरवणीनं वाचकांना, लेखकांना संधी दिली. यामुळे गेली 3 वर्षं मी ‘मैतरणी’च्या संपादकीयाची जागा, स्वतःसाठी न ठेवता पुरवणीसाठीच मोकळी केली आहे. ‘झुंजूमुंजू’ साठी ग्रामीण जीवनासंबंधीच्या कथा, कविता, अनुभव, कायद्याच्या माहितीचे सदर- या प्रकारचा निवडक मजकूर देणारी पुरवणी हा ‘साऱ्याजणी’ चा एक अविभाज्य भागच बनला. ही मूळ उद्दिष्टांच्या संदर्भातली एक आनंदाची बाब म्हणून नोंदवावीशी वाटते. स्त्री-पुरुष समतेबाबतचं वास्तव काय आणि उद्दिष्ट काय हे विविध स्वरूपांत म्हणजे कथा, कविता, लेख इत्यादी स्वरूपांत वाचकांना पोचवण्याचं काम 'साऱ्याजणी'तून सातत्यानं आणि सजगपणे चालू आहे.

याला मिळणारा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया बोलक्या आहेत. आपल्या घरच्या आणि भवतीच्या पुरुषांनीही हे मासिक वाचावं असं अनेक स्त्रियांना वाटतं. याउलट 'असले मासिक नको रे बाबा,' असं (न वाचताच) काही जण म्हणतात हेही खरं! याबरोबरच या अंकात अनेक पत्रलेखक, लेखक, चित्रकार, कार्यक्रमांचे पाहुणे हे पुरुष असतात. काही तर जोडपीच या मासिकाची वर्गणीदार-वाचक आहेत. काही देणगीदार पुरुष आहेत. यामुळे संख्या फार मोठी नसली तरी तरुणांपासून वृद्ध पुरुषांपर्यंतचे वाचक ‘मिळून साऱ्याजणी’ ची सोबत करतात, याचे एक समाधान तर आहेच. याखेरीज खास करून, पुरुषप्रधान व्यवस्थेचे (स्त्रियांपेक्षा अर्थातच कमी प्रमाणात) पुरुषही बळी आहेत. याचं भान बाळगून आम्ही पुरुषांना काही विषयांवर लिहिण्याचं जाणीवपूर्वक आवाहन केलं. उदा. पुरुषांच्या घरकामातल्या त्यांच्या सहभागाबाबतचे अनुभव, बायको मिळवती असो वा नसो, तिच्यासाठी खास स्वतंत्र पैशाची तरतूद घरात आहे का, एका वर्षापर्यंतच्या बाळाच्या संगोपनाचे पुरुषांचे अनुभव, बाप-लेकीच्या नात्या, तुझा रंग तरी कसा, ‘बघून’ लग्न ठरवणं या वस्तुस्थितीनुसार मुली बघतानाचे अनुभव, लग्नानंतर वधूने वराच्या घरी राहायला जाण्याऐवजी वराने वधूच्या घरी राहण्याची प्रथा सुरू करायची ठरवली तर.... यांसारख्या विषयांचा समावेश करून आम्ही पुरुषांचा सहभाग मिळवू शकलो. पुरुषांच्या या प्रतिसादातून अनुभवाला आलेली संवेदनशीलता आणि समजदारीही फार सुखावणारी बाब ठरली आहे. म्हणूनच ‘साऱ्याजणी’मधला ‘साऱ्याजणां’ चा हा सहभाग प्रयत्नपूर्वक सुरू राहील याची जबाबदारी आम्हांला सजगपणे सांभाळायची आहे. या मासिकाचं स्वरूप केवळ साहित्यिक नाही, किंबहुना ते सामाजिकच आहे, याची साक्ष अंकातल्या लेखक-लेखिकांच्या नावापासून ते मजकुरापर्यंत सगळीकडे व्यापून राहिली आहे. म्हणूनच एकीकडे गौरी देशपांडे, आशा बगे, विजया राजाध्यक्ष, सानिया, सुमेध वाडावाला, यशवंत सुमंत, अम्लान दत्त, वसंत सरवटे, इंद्रजीत भालेराव यांच्यासारख्या नामवंतांपासून ते काहीही कुठेही नाव न झालेल्या मोठ्या शहरांतल्या किंवा छोट्या खेड्यांतल्या वाचक लेखकांची बोलकी पत्रे, कविता, लेखक ‘साऱ्याजणी’ त दिसतात. 

कधीकधी आजवर नामवंत नसलेल्यांचं लेखन, नामवंतांच्या पंक्तीत शोभावं एवढं सकसपणे हाती येतं. तर कधीकधी, कधीतरी कसदार होऊन नाव कमावण्याच्या सुप्त सामर्थ्याची चाहूल देणारं साहित्यही आम्ही प्रसिद्ध करतो. साहित्यिक मापदंड लावता येत नसूनही एकेकदा अशा अनघड लेखनात दडलेला प्रकाश संपादकाला साद घालतो असा माझा अनुभव आहे. ‘साऱ्याजणी’ मधले लेखनासाठीचे विषयही एरवी केवळ साहित्यिक प्रकारच्या मासिकात सामावणार नाहीत असे असू शकतात. पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, अण्वस्त्र विरोध, जनआरोग्य संसद, धर्मनिरपेक्षता, विवेकावरचा विश्वास इत्यादी संदर्भातल्या चळवळी, परिषदा, घटना, उपक्रम हे सारं मिळून ‘साऱ्याजणी’ च्या पानापानांत सहजपणे वाढलं जातं आणि त्याला दाद देणारी पत्रं आमचा उत्साह वाढवत असतात. ‘मिळून साऱ्याजणी’ च्या रक्तात पत्रकारिता आणि कार्यकर्तेपणाची जी एक गुंफण आहे, त्यातच मासिकाचं सामर्थ्य आहे आणि मर्यादाही आहेत. हे मासिक स्त्री-पुरुष समतेच्या चळवळीची दृढ बांधिलकी मानतं, पण ते चळवळीचं मुखपत्र नाही. त्यामुळेच काही कार्यकर्त्या मैत्रिणींचा आक्षेप असतो की त्यांना ‘साऱ्याजणी’तून काहीच मिळत नाही! याउलट केवळ चळवळीच्या मुखपत्राची भूमिका न करण्याचा निर्णय घेऊनसुद्धा काहींना हे मासिक अतिबंडखोर वाटतं! याखेरीज या मासिकातून होणाऱ्या संवादातून काही वाचक मोठ्या मानसिक आजारातून, अपघातातून किंवा अन्य आजारांतून निर्माण झालेल्या विकल अवस्थेतून, पुन्हा धीरानं उभं राहण्याचं बळ मिळाल्याचं पत्र पाठवून, भेटून कळवतात. अशा पत्रांनी आमच्या मनाची उभारी वाढते तर खरीच, पण कधीकधी आमचे जमिनीवरचे पाय सुटू नयेत अशी व्यवस्थाही काही वाचक करून ठेवतात. धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात एकदा सरस्वती-पूजनाचा विषय ‘संवादा’त घेतल्यानंतर आणि एकदा, अश्विनी फाटकच्या पुण्यात घडलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर लिहिलेल्या ‘संवादा’नंतर माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मासिकाला घटस्फोट दिल्याच्या दुःखद घटनाही माझ्या मनात नोंदलेल्या आहेत. म्हणूनच माणूसपणाच्या शोधात, माणूसपणाच्या जोपासनेसाठी वाचकांशी संवाद करत, त्यांच्या बरोबर त्यांच्या मतभेदांबाबतही चर्चा करत, त्यांच्या मनाची कवाडं किलकिली करण्याचा हा मासिकाचा प्रयत्न ही बहुतेक वेळा तारेवरची कसरतच ठरते. तरीसुद्धा अनेक लेखक जेव्हा काही विषयावरचं लेखन प्रसिद्ध करताना, ‘‘यासाठी दुसरी जागा आहेच कुठे!’’ असं म्हणत ‘साऱ्याजणी’ कडे येतात तेव्हा ते क्षण अतिशय आनंदाचे असतात. पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात स्त्रियांच्या प्रश्नांना महत्त्वाची जागा, दर्जा दिला जात नाही, हे पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमधलं स्पष्ट वास्तव आहे. 

घराघरांत, समाजात सर्वत्र स्त्रिया असूनही स्त्रियांचे प्रश्न हे पुरुषांना, ना आपले प्रश्न वाटतात, ना सामाजिक प्रश्न वाटतात; याची प्रचिती या दर्शनातून पुढे येते. अशा वेळी ‘मिळून साऱ्याजणी’च्या रूपानं अगदी छोट्या स्वरूपात, एक छोटासा अवकाश दिसू लागला आहे, एवढंच मी म्हणू शकते. स्त्री-प्रश्न हा दुबळ्या दडपलेल्यांचाच प्रश्न आहे. संख्येनं स्त्रिया पुरुषांच्या जवळपास बरोबरीनं असल्या, तरी दलितेतरांसारखीच स्त्रियांची अवस्था आहे. म्हणूनच केवळ 'अल्पसंख्य' या विशेषणाच्या पलीकडे जाऊन सर्व क्षेत्रांतल्या शोषित आणि अन्यायग्रस्तांच्या बरोबर आपले हात हातांत असायला हवेत याचं भान 'साऱ्याजणी'ला आहे. आपलं उद्दिष्ट ठरवताना, ते क्षितिजासारखं रुंदावत, विस्तारत जातं याची जाणीव या वाटचालीत आम्हांला होते आहे. तरीसुद्धा विचार आणि आचारात काही बोटांचे अंतर राहतच आहे, हेही आम्हांला समजतं आहे. त्याची कारणं आर्थिक आणि व्यावहारिकही आहेत. त्यांचे निराकरण करणं हेही एक आव्हानच आमच्यापुढे आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ मधला कार्यकर्त्यांचा अंतःप्रवाहही नेहमी एका दिशेने प्रयत्नशील आहे. बिनउत्तरंडीची म्हणजेच समतेची समाजव्यवस्था आपण आणू बघतो आहोत. त्याचा जमेल तेवढा प्रयोग ‘सान्याजणी’च्या कार्यालयीन व्यवहारात साकारायची धडपड आम्ही करतो. कामात, निर्णयात सामूहिकता आणि पारदर्शकता असावी, यासाठीची जाणीव विचार आणि वर्तन यांमधून राखण्यासाठी कार्यालयातील संबंधित सर्वांना सहभागी करून घेतो. काही चांगलं घडलं तर त्याच्या श्रेयात सर्वांचा वाटा असेल आणि काही चुकलं, वाईट घडलं तर त्यातही आपण ‘साऱ्याजणी, सारेजण’ वाटेकरी असू, अशी आमची भावना आहे. आपलं घर आणि कामाचं ठिकाण ही सामाजिक बदलामधली महत्त्वाची साधनं आणि माध्यम आहेत, याचा विसर पडू नये यासाठी आम्ही सजग आणि डोळस राहू इच्छितो. आमच्यामधलं आणि आमच्याभोवतीचं वास्तव जे आहे ते समजून घेत वाटचाल करताना चढउतार आहेत, खाचगळगे आहेतच; तरीपण दूरवरचं रुंदावणारं क्षितिज खुणावत आहे हे खरं आहे! तिथपर्यंत पोचण्यासाठी छापील शब्दांचं माध्यम अपुरं ठरणार, याची जाणीवही आहे. म्हणून त्यापलीकडे जाण्यासाठी, हात लांब करत, पावलं टाकण्यासाठी, सखीमंडळ, तरुणांसाठीचं व्यासपीठ 'साथसाथ', ‘अक्षरस्पर्श’सारखं वाचकांना बोलतं करणारं ग्रंथालय, वाचक मेळावे यांची आम्ही मदत घेतो. शेवटी अधिकाधिक माणसांपर्यंत पोचणं आणि काही पोचवणं हेच तर उद्दिष्ट! 

लेखाच्या शेवटापर्यंत येत असतानाच, अमेरिकेतील स्त्रिया गोधडी कशी बनवतात, या संबंधीचा एक इंग्रजी चित्रपट मला टी.व्ही.वर बघायला मिळाला. ‘मिळून साऱ्याजणी’च्या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावरही गोघडीच होती! गोधडी तयार करताना चित्रपटात अमेरिकेतील काळ्या आणि गोऱ्या स्त्रिया एकत्रच काम करत होत्या. त्यांच्या गोधडीत केवळ कापडाचे विविध आकारांचे तुकडेच एकत्र जोडलेले नव्हते. त्यांच्या व्यक्तिगत जीवनकहाण्यांचे संदर्भ काही प्रतीकांतून, काही प्रसंगचित्रांतून या गोधडीवर अजरामर झाले होते. आपल्याकडे गावागावांत अशाच स्त्रिया एखादीच्या ओसरीवर बसून, आपापली सुखदुःखं बोलत गोधड्या करतात. मला असं जाणवलं की जगभरातल्या ‘साऱ्याजणी’ अशाच बोलत्या, आठवत्या होत गोधड्या बनवतात! त्यामुळेच त्यांच्यातील ऊब जणू एक जिवंत स्पर्शच देते. ‘साऱ्याजणी’चं पहिलं मुखपृष्ठ आणि गेल्या बारा वर्षांची वाटचाल मला या चित्रपटामुळे आणखीनच उबदार करून गेली.
 

Tags: स्त्री-प्रश्नांसाठी व्यासपीठ स्त्री-पुरुष समता मिळून साऱ्याजणी platform for feminine problem 'milun saryajani' gender equality weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विद्या बाळ
saryajani@gmail.com

 मराठी लेखक, संपादक, सामाजिक कार्यकर्त्या 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके