डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘प्रेरक ललकारी’ हा स्त्री-मुक्ती चळवळीचा आवाज आहे, दिशा आहे आणि 'टोन' आहे. गेल्या 25 वर्षांत महाराष्ट्रात, भारतात आणि एकूणच जगात स्त्री-चळवळीने एक स्वायत्त विचारप्रवाह म्हणून जागतिक पातळीवर जो ठसा उमटवला आहे त्याचे वास्तव दर्शन ‘प्रेरक ललकारी’मधून घडविण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

स्त्री-मुक्ती संघटनेची स्थापना आम्ही जरी 1975 साली केली असली, तरी संघटनेचे मुखपत्र काढावे असा विचारही त्या वेळी आमच्या मनाला शिवला नव्हता. स्त्री-मुक्ती चळवळीचा स्वायत्त प्रचार करण्यासाठी नियमित माध्यम कुठून तयार होणार? त्या वेळी वर्तमानपत्रांतून कार्यकर्त्यांचे लेख आले तरी आम्हांला प्रचाराची मोठी बाजी मारली असे वाटायचे. एकूणच सर्व डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची संख्या कमी. त्यात नियमित वाचन-लिखाण करणारे त्याहूनही कमी. पुन्हा कार्यकर्ते या ना त्या प्रकारे डाव्या पक्षांशी बांधिलकी मानणारे असायचे. डाव्या पक्षांमध्ये एक अलिखित दंडक असायचा. लेखन फक्त मान्यवर पुढारीपणाने, तेही पक्षाच्या मुखपत्रातून करायचे. इतर कुणी काही लिहिले तर त्यातील शब्दन्शब्द पुढारीपणाने पास करायचा आणि नंतरच छापायचा. मग ते पत्रक असो वा वृत्तपत्रातील लेख (साहित्यिक, कवी त्याला अपवाद). त्या वेळची आमची संघटना म्हणजेसुद्धा काही आखीव, रेखीव, कोरीव लेण्यासारखी नव्हती. स्त्रियांमध्ये काहीतरी काम करायच्या इच्छेने एकत्र आलेल्या तरुण मुली, एवढेच तिचे स्वरूप होते. स्त्री-मुक्तीविषयक मनात अंकुरलेल्या बीजांना आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने फुटवे फुटायला लागले होते. त्याचे व्यक्त स्वरूप म्हणजे स्त्री-मुक्ती संघटना. त्या वेळी विचारविनिमयासाठी एकत्र जमत असतानासुद्धा आमच्यापैकी ज्या पक्ष-सभासद होत्या, त्यांना सातत्याने पक्षाचे काय मत असेल याची चाचपणी करावी लागे. याच काळात डाव्या पक्षांची कार्यक्रमावर आधारित महागाईविरोधी कृती समितीही निर्माण झालेली होती.

सर्वसामान्य स्त्रियांचे दैनंदिन जीवनातील प्रश्न म्हणजे रेशन, रॉकेल, साखर, महागाई इत्यादी प्रश्नांना घेऊन अत्यंत लढाऊ अशी एकजुटीची फळी महिलांनी निर्माण केली होती. त्यात सामील असलेल्या राजकीय पक्षांचे तात्त्विक मतभेद यत्किंचितही मिटलेले नसताना महागाईच्या व्यापक प्रश्नावर एकत्र यायला महिलांनी त्यांना भाग पाडले होते. हे पक्ष प्रसंगा-प्रसंगाने ट्रेड युनियन पातळीवरही एकत्र येत असत. तात्त्विक आणि राजकीय भूमिकांसाठी आपापल्या पक्षाचे व्यासपीठ आणि व्यापक प्रश्नांसाठी संयुक्त कृती समित्यांचे व्यासपीठ- अशी त्या वेळची रचना असे. पक्षबाजी करायची नाही, असा संकेत असला तरी पक्षबाजी होतच नसे असे नाही. पण या संयुक्त कृती समित्या काळाच्या गरजेमुळे त्यातूनही टिकून राहत. अशा वातावरणात एकीकडे स्त्रियांमध्ये जायचे असेल तर सर्वांनी पक्ष-राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे, असे सर्वांनाच वाटत होते. त्यासाठी महागाईविरोधी कृती समिती पुरेशी वाटत नव्हती.

स्त्रियांच्या म्हणून ‘खास’ प्रश्नांना हात घालायचा होता. त्यासाठी एकत्रित वैचारिक भूमिका मांडणेही गरजेचे होते. तेव्हा पक्षात असलेल्या आणि पक्षात नसलेल्या सर्वच स्त्री कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी करण्यासाठी परिषद घ्यावयाचे ठरविले. विचारविनिमयाच्या बैठका सुरू झाल्या. कार्यकर्त्यांनी आपापली टिपणे तयार करून आणली. त्यावर तपशीलवार चर्चा झाल्या आणि परिषदेसाठी एक सविस्तर दस्तऐवज करायचे ठरले. त्या वेळी छाया दातार ही एकमेव सर्जनशील लेखिका परिषद संघटित करणा-या कार्यकर्त्यांमध्ये होती. व्यापक एकजुटीचा पाया ठेवून स्त्री-जीवनाच्या सर्व अंगांचा परामर्श घेणारे, सर्वसामान्य स्त्रीमध्ये नव्या जाणिवा निर्माण करणारे, तसेच कोणत्याही पक्षाच्या स्त्रीविषयक मूलभूत भूमिकांना छेद न जाता लसावि काढणारे लेखन आम्हांला करायचे होते. 1975 सालच्या परिषदेच्या निमित्ताने ‘स्त्री-विमुक्ती’ या पुस्तिकेचे लेखन करून छायाने ते प्रत्यक्ष कागदावर उतरवले. त्या वेळी आम्ही सर्वांनी मिळून जे केले त्याला संपादन म्हणता येणार नाही. ते एक प्रकारचे विचारमंथन होते आणि त्याची सर्जनशील शिल्पकार होती छाया. सांगायचा मुद्दा असा की, त्या वेळी पहिल्या प्रथम स्वायत्त स्त्री-चळवळीचे वैचारिक प्रतिपादन असे सामूहिक प्रयत्नांतून अस्तित्वात आले. हे व्यासपीठ विरघळून जाऊ नये, म्हणून महाराष्ट्रातील स्त्रियांची संघर्ष समिती तयार झाली. हे एवढ्यासाठी नमूद केले की उद्दिष्टे आणि वैचारिक स्पष्टता करत करत व्यासपीठ तयार होते. व्यासपीठ झाले की प्रचाराचे माध्यम म्हणून लेखन होते. त्या लेखनाचे संकलन करून सर्वांपर्यंत नेणे म्हणजे संपादन करणे, असा आमचा ढोबळ समज होता.

‘ललकारी’चा जन्म
त्यानुसार सर्वांत प्रथम ‘बायजा’ द्वैमासिक सुरू झाले. त्याच्या संपादक होत्या सौदामिनी राव आणि संपादन म्हणजे प्रामुख्याने संपर्क समितीतील सर्वमान्य भूमिकांना धरून संपादकीय लिहिणे, हे त्याचे स्वरूप होते. त्या वेळीही स्त्री-मुक्ती संघटना म्हणून आम्ही सातत्याने जमत असलो, आणि आमच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचतात की नाही याबद्दल संवेदनशील असलो तरी आमची पोच अतिशय अल्प होती. पुढे राष्ट्रीय सेवा योजनेने स्त्री-मुक्तीचे विचार मांडण्यासाठी त्यांचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि आमचा महाराष्ट्रभर संचार सुरू झाला. लोकसंपर्क वाढला.

स्त्री-मुक्तीचे विचार मांडताना अधिकाधिक बांधेसूदपणा येऊ लागला. त्यातूनच 1985 साली महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांमधून स्त्री-मुक्ती यात्रा झाली. त्याच्या पाठोपाठ वर्षभरातच दिल्ली, मध्य प्रदेशचे दौरे, विदर्भाची स्त्री-पुरुष समानता यात्रा पार पडली. यांतून जे संबंध तयार झाले, त्यामुळे सर्वसामान्य स्त्रिया आमच्याकडे प्रश्न घेऊन येऊ लागल्या. 

स्त्री-मुक्तीच्या प्रसाराबरोबरच प्रत्यक्ष ठोस प्रश्न हाताळण्याची जबाबदारी अंगावर पडू लागली. व्यापक पातळीवर संवाद साधण्यासारखे संचित आता आपल्याजवळ जमा झाले आहे असा विश्वास निर्माण झाला. तेव्हा कुठे आम्हांला आता आपणही एक नियतकालिक सुरू करावे असे वाटायला लागले. ‘प्रेरक ललकारी’विषयी लिहिताना हा सर्व इतिहास माझ्या डोळ्यांसमोरून सरकला. हा इतिहास सांगत बसले तर लोक म्हणतील नमनालाच घडाभर तेल कशाला? पण एकदम ‘प्रेरक ललकारी’ला हात घालणेही उचित वाटले नाही. कारण आमच्यापैकी कुणीही अनुभवी लेखक नव्हते. अनुभवी संपादक नव्हते. वैचारिक लेखन करायची कुणालाही सवय नव्हती. विश्वास फक्त एकाच गोष्टीबद्दल होता; तो म्हणजे ‘आपल्याकडे स्त्री-मुक्तीविषयी सांगण्यासारखे काहीतरी आहे आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांत यासंबंधी विचार करणारे, बदलाला उत्सुक असणारे पुंजके आहेत. त्यांची सांगड घालायची तर मुखपत्र हवे. तेही कसे, तर चळवळींमध्ये काम करणा-या सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेणारे.’ त्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली आणि खूप विचारविनिमय करून नियतकालिकाचे मार्गदर्शक सूत्र ठरविले. ‘ललकारी’ नाव निश्चित केले. परंतु त्या नावाने नोंद मिळाली नाही म्हणून ‘प्रेरक ललकारी’ नाव घेतले. आम्ही सर्वांनी मिळून निश्चित केलेली सूत्रे कोणती, ती इथे नमूद करायला हवीत. उद्दिष्ट व कार्यवाही हे नियतकालिक स्त्री-मुक्ती संघटनेने सुरू केले असले आणि मुखपत्र असले तरी विविध चळवळींचे संकलन करणे आणि सर्व प्रगत चळवळींना विचाराच्या देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ म्हणून भूमिका निभावणे, हे आमचे उद्दिष्ट असेल.

स्त्रीवादी विचार आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळींवरून मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. स्त्रियांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न केला जाईल. स्त्री-मुक्ती संघटना ज्याप्रमाणे पक्षनिरपेक्ष काम करते आणि कोणत्याही राजकीय पक्षांची घटक नाही, त्याचप्रमाणे हे मासिक पक्षनिरपेक्ष असेल, पण त्याचा स्वतःचा राजकीय समज त्यातून व्यक्त करण्याचा सतत प्रयत्न केला जाईल. प्रगत विचारांतील विविध छटांची वाचकांना ओळख करून देण्याचाही प्रयत्न केला जाईल; या सर्वांबरोबर एक अलिखित बंधन होते, ते म्हणजे कोणत्याही प्रकारच्या धर्मांध, विकृत विचारसरणीला, वर्णाश्रमाधिष्ठित उच्चनीचतेला या मासिकात स्थान नव्हते आणि नाही. भारतीय संविधानाला जेणेकरून धक्का पोहोचेल असे लेखन या मासिकातून होणे नाही.

सवंग लोकप्रियता मिळवायची नाही आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार सोडायचा नाही. साधारणपणे ही आमची व्यापक वैचारिक भूमिका राहिली आहे. ‘प्रेरक ललकारी’ हे स्त्री-मुक्ती चळवळीचे मासिक आहे. चळवळ म्हणजे बदलाचा सामूहिक खटाटोप. मग त्यात व्यक्ती गौण, तरीही एकच एक संपादक नेमून त्याच्या हाती सर्व सूत्रे देणे हे चळवळीला मानवले नसते. तेव्हा आम्ही रीतसर संपादक मंडळ केले. संपादक मंडळाने सर्व मजकूर डोळ्यांखालून घालून निवड करावी; संपादकीयाचा विषय ठरवावा आणि मग त्याची अंमलबजावणी मुख्य संपादकाने करावी, अशी आमची रचना होती. सुरुवात इतक्या उत्साहाने झाली होती की पहिल्या तीन-चार महिन्यांत 2000 वर्गणीदार नोंदवले गेले. पुढील 13 वर्षांच्या काळात ही संख्या सर्वसाधारणपणे टिकली. अगदी अलीकडे शिक्षणप्रसाराच्या विविध योजना कार्यान्वित झाल्यामुळे ही संख्या आता 4000/4500 च्या घरात गेली आहे. सुरुवातीच्या चर्चांमध्ये जाहिराती घ्याव्यात की नाही, यावरही बराच ऊहापोह होत असे. आता तो प्रश्न मागे पडला असून केवळ खर्चाची तोंडमिळवणी करण्याइतपत जाहिराती मिळवायला कोणी नाही म्हणत नाही इतकेच. आणखी एक बंधन आहे, ते म्हणजे संघटनेच्या उद्दिष्टांना छेद देणारी जाहिरात छापायची नाही. गेल्या 13/14 वर्षांत संपादक मंडळातील कार्यकर्ते आवश्यकतेनुसार बदलत गेले. क्वचित असेही प्रसंग आले की ज्या योगे संपादकीयातील मांडणीबाबत व्यापक चर्चा झाल्या. कधी नापसंती व्यक्त केली गेली. परंतु अटीतटीच्या मतभेदाचे प्रसंग आले नाहीत त्या अर्थी ‘प्रेरक ललकारी’चे संपादक मंडळ आणि कार्यकर्त्यांचा संच एका लयीत राहिले.

अनुभवाने दिलेले शहाणपण
वर म्हटल्याप्रमाणे संपादकीय कामाचा अनुभव शून्य. कल्पना वारेमाप, त्यांतली मुख्य कल्पना म्हणजे छापून येणाऱ्या सर्व मजकुराशी संपादकाची सहमती असणे! लवकरच आम्हांला त्यातली चूक कळून आली आणि आम्ही मासिकावर चक्क लिहायला सुरुवात केली की ‘या मासिकात छापलेली मते संघटनेची अधिकृत मते असतीलच असे नाही’. एक व्यापक व्यासपीठ बनवणे हे आमचे उद्दिष्ट होते, त्याला धरून आम्ही विविध संघटनांचे अहवाल, भूमिका, लेख, पत्रके इत्यादी छापू लागलो. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून पत्रे येऊ लागली. मजकुरावर विचक्षक टिप्पणी होऊ लागली, लोक आपणहून लेख, कथा-कविता पाठवू लागले. स्त्री-मुक्ती संघटनेच्या स्त्रियांच्या प्रश्नांवरील भूमिकांना समाजातील सर्व थरांतून वाचकवर्ग मिळाला. महिला मंडळातून सामूहिक वाचन होऊ लागले. 'निरक्षरांचे अक्षरलेणे' म्हणून आम्ही एक सदर सुरू केले होते.

बुलडाण्याच्या डॉ. इंदुमती लहाने यांनी ते चालविले. त्याचे आता पुस्तक झाले आहे. प्रतिमा इंगोले आणि स्व. वीरा शर्मा यांनी ‘ललकारी’त लिहिलेले कथांचेही कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. संघटनेच्या वैचारिक भूमिकांच्या लेखांचा मात्र आम्ही अजूनही एक संग्रह संपादित करून छापू शकलेलो नाही. असो, आणखी एक सुंदर सदर आम्ही जवळजवळ सात वर्षे सातत्याने चालविले. ते म्हणजे ‘इतिहासाचे पान’. स्त्रियांसंबंधी भूमिकांचे दस्तऐवज शोधून हा मजकूर निवडला जाई. कितीतरी कार्यकर्त्यांनी त्याचे संकलन करून मदत केली आहे. ‘ललकारी’ चालविणे हा सामूहिक प्रयत्न राहिला पाहिजे; संघटित प्रयत्न राहिला पाहिजे, अशी आमची सतत धडपड राहिली आहे आणि आजही कार्यकर्ते विविध प्रकारच्या उपक्रमांत-उद्योगांत आणि कार्यक्रमांत व्यग्र असले तरी ‘ललकारी’चे काम पूर्ण करतातच. ‘प्रेरक ललकारी’ने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून नवीन लेखक निर्माण केले. नव्या लेखकांची शंभर-दीडशेची यादी सहज करता येईल. याचे मर्म असे की लेखक मिळाले की संपादकाला रकाने भरून काढावे लागत नाहीत, काम उरते ते संपादनाचे, संपादकीयाचे आणि मांडणीचे. त्यातही शिल्पा शिरवडकरने इतकी प्रगती केली आहे की कित्येक वेळा संपादनाची आणि मांडणीचीही जबाबदारी तिच्यावर टाकताना आम्हांला मुळीच संकोच वाटत नाही.

गेल्या चौदा वर्षांत आम्ही आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने 14 विशेषांक वाचकांना वर्गणीच्या दरात दिले आहेत. खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी दोनदा वर्गणी वाढवून 14 वर्षांत 20 रुपयांची 40 रुपयांवर केली. पण वर्गणी वाढवण्याचा विषय निघाला की कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा येतो. गरीब वाचक वर्गापर्यंत अंक जाणार नाही याची खंत वाटायला लागते. मग वर्गणी वाढविण्याचा विषय बाजूला पडतो. अंकाची गुणवत्ता वाढवण्याविषयी चर्चा सुररू होते. सुरुवातीच्या काळात अंक अतिशय क्लिष्ट वाटायचा, बोजड शब्दांचा लिखाणात मारा असायचा. आता ते बऱ्याच अंशी बदलले आहे आणि वाचकांना ते आवडते आहे असे दिसते. ‘ललकारी’च्या परिणामांबद्दल काय म्हणावे? गेल्या 20 वर्षांत स्त्री-मुक्ती संघटनेने स्त्रियांसंबंधी कितीतरी पुस्तके काढली. लिहून घेतली. सांगण्यासारखे काही होते म्हणून कार्यकर्तेच लेखक बनले आणि लेखक कार्यकर्ते बनले. कामाची व्याप्ती प्रचंड वाढली.

आज मी असे म्हणू शकते की 'प्रेरक ललकारी' हा स्त्री-मुक्ती चळवळीचा आवाज आहे. दिशा आहे आणि 'टोन' आहे. गेल्या वर्षात महाराष्ट्रात, भारतात आणि एकूणच जगात स्त्रीचळवळीने एक स्वायत्त विचारप्रवाह म्हणून जागतिक पातळीवर जो ठसा उमटवला आहे त्याचे वास्तव दर्शन ‘प्रेरक ललकारी’मधून घडविण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यश मोजायचे तर अंशात मोजावे लागेल आणि अपयश टनांत. बदल घडतो आहे हे नक्की. पण अजून इतका बदल झालेला नाही की आचरण आमूलाग्र बदलेल, समाजाची वैचारिक, आर्थिक, भावनिक जडणघडण अजूनही पुरुषाप्रधानतेची आहे आणि त्याला कोंदण देणारी आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चौकटही पुरुषप्रधानतेची आहे, त्यामुळे अजून आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे अशी घंटा मनात सतत वाजत असते. जो परिणाम दिसतो तो अपेक्षित परिणाम असला तरी पुरेसा वाटत नाही हेच खरे!
 

Tags: स्त्री-मुक्ती चळवळ स्त्रीविषयक पुस्तक परीक्षण feminine movement feminine book review weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके