डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

जिभेतील दोषाने त्यांच्या हातांना वाकबगार केले आहे!

पैशापेक्षा आयुष्यात दुसरे आनंद आहेत, निष्ठेने आणि न थकता प्रयत्न केले तर आज ना उद्या यश हे हमखास जवळ येईल, माणुसकी हाच मानसिकतेचा पाया असला तर आपल्या भोवतालचं सर्व जग आपलंसं करता येतं. उत्तमाचा वेध घ्यायला नेहमी देशी परदेशीच जावं लागतं असं नाही; मुख्य म्हणजे आपल्या व्यवसायाचा धंदा करू नये - हे संदेश ‘आणि दोन हात’ या पुस्तकात डॉक्टरांच्या अनुभवांद्वारे वारंवार आलेले आहेत, यातून शिकता आलं, घेण्यासारखं घेता आलं तर वाचकांचं उन्नयन व्हायला नक्कीच साहाय्य होईल. या पुस्तकाचं यश केवळ व्यावसायिक क्षेत्राशी निगडित नाही तर ते मनुष्यस्वभावातल्या उदात्ततेला, मंगलतेला साद घालणारं आहे.

जिभेतील दोषाने त्यांच्या हातांना वाकबगार केले आहे!
 
डॉ. वि. ना. श्रीखंडे, एक नामांकित, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शल्यविशारद! अहोरात्र व्यावसायिक कामात बुडालेले. त्या कामाच्या व्यापात, कधी एखाद्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवतात, कधी एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान स्वीकारायला प्रवासाला जातात, तर कधी भाषणमालेसाठी प्रबंध लिहीत असतात. त्यांच्या या व्यस्त जीवनक्रमात डॉक्टरांना (आम्हा मित्रमंडळींच्या किशोरला) सावकाशीनं भेटायचं तर आपण त्यांचं पेशंट म्हणूनच गेलं पाहिजे असं वाटतं. डॉक्टर कधी एका जागी बसलेले पाहिले की समजावं त्यांची कोणत्या तरी परिषदेत वाचायच्या प्रबंधाची तयारी चालू आहे. अशा निरनिराळ्या कामांत व्यग्र असणाऱ्या डॉक्टर श्रीखंडेंनी आपलं आत्मवृत्त लिहिलं आणि त्यांच्या या पहिल्याच पुस्तकाला अनेक पारितोषिकं मिळून त्यांचा सन्मान झाला. आता तर महाराष्ट्र फाउंडेशनचं पारितोषिक मिळून त्यांच्या या पुस्तकाची कीर्ती सातासमुद्रापलीकडे पोचली आहे. वास्तविक, त्यांच्या या क्षेत्रातल्या दीर्घ प्रवासात त्यांना आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध करावेत, एका वेगळ्या जगाचं दर्शन वाचकांना घडवावं असा अनेकजण त्यांना आग्रह करत होते. ‘‘शस्त्रक्रिया करताना सफाईदार काम करणारे माझे हात लिहायला लागले की एकदम जड होतात. परंतु माझ्या अनुभवातून समाजाला खूप सांगता येईल म्हणून लिहिलं पाहिजेच, हा विचार सतावत होता.’’ या जाणिवेतून ते लिहायला लागले आणि अनेक अंगांनी संपन्न असलेली त्यांची यशोगाथा जणू एकटाकी लिहिली असावी अशी, ओघवती, साध्या, अनलंकृत भाषेत अवतरली. ‘दोन हातांचं’ डॉ. श्रीखंडे यांच्या व्यक्तिगत जीवनात किती वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे हे त्यांच्या जवळच्या सहवासातील मंडळींना चांगलं माहीत आहे. एखादा अवयव अधू असला तर दुसरा अवयव ते अधूपण भरून काढतो म्हणतात, तसं त्यांच्या बाबतीत झालं आहे. जडावलेल्या जिभेतील दोषाने त्यांच्या हातांना अधिक वाकबगार, तरल केले आहे.

लहानपणी त्यांनी साधा भोवरा फिरवला, तरी इतर मुलांपेक्षा त्यांच्या तळव्यावर तो अधिक काळ गरगरायचा. कॅरम खेळायला एकदा स्ट्रायकरने डाव फोडला की त्यांच्या रंगाच्या गोट्या क्वीनसह एकापाठोपाठ बोर्डावरून नाहीशा व्हायच्या. नदीच्या पाण्यावर चपटे दगड पाण्यालगत अशा समांतर पद्धतीने ते टाकायचे की उसळी घेत जाणाऱ्या त्या दगडानं उमटणाऱ्या भाकऱ्या कुठल्या कुठे दूरवर जात. त्यांनी रेखाटलेली चित्रं पाहून ‘तू उत्तम चित्रकार होशील’ असा त्यांच्या चित्रकलेच्या शिक्षकानं आशीर्वाद दिला होता. या पुस्तकातला सर्वांत मनोज्ञ भाग आहे तो डॉक्टरांच्या संस्कारक्षम काळाचा. जिभेतल्या दोषामुळे वाणी अडखळे, बरोबरीच्या मुलांशी बोलायला संकोच वाटे, कधी शिकलेसवरलेले लोकही कुचेष्टा करत, सहज चेष्टेने त्यांच्या वैगुण्याबद्दल बोलून जात, ते लहान बालकाच्या जिव्हारी लागे. पण घरी, अत्यंत सुसंस्कृत आईवडिलांच्या निवाऱ्यात त्यांना या वैगुण्याची जाणीव करून दिली जात नसे. अत्यंत हुशार असलेल्या त्यांच्या मोठ्या भावाच्या बरोबरीने त्यांना वागणूक मिळे. आपल्या बाळाच्या कमतरतेची जाणीव असलेले आई- वडीलच नव्हे तर घरात बरोबर वाढत असलेला भाऊही त्यांच्यात आढळणाऱ्या गुणांचं कौतुक करीत असे. डॉक्टरांनी कुठलेही लागेबांधे नसलेली मुंबई हे आपलं कार्यक्षेत्र निश्चित केलं आणि अथक प्रयत्नांनी, अंत:स्थ प्रेरणेनं आणि शल्यक्रियेतल्या नैपुण्यानं आपलं बस्तान तिथं बसवलं. आंतरदेशीयच नाही तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते डॉक्टर झाले. त्यांच्या या दीर्घ प्रवासात त्यांना आलेले अनुभव त्यांनी ‘‘...आणि दोन हात’’ या पुस्तकात 

शब्दबद्ध केले. कुशल हात मिळून, व्यवसायातली अनैतिकता लांब ठेवून त्यांनी सच्चेपणाचा मार्ग सोडला नाही. कारण त्यांचं समाधान कामात होतं, त्यातून मिळणाऱ्या पैशात नव्हतं. एक यशस्वी सर्जन आणि चांगला माणूस म्हणून ज्यांच्या हयातीतच त्यांच्याबद्दल दंतकथा पसरायला लागतात अशा भाग्यवंतांपैकी डॉक्टर श्रीखंडे! राष्ट्रपतींपासून सामान्यातला सामान्य रुग्ण असला तरी त्याची व्यथा सारखीच असते, हे जाणणारं त्यांचं सुसंस्कारित मन या पुस्तकात जागोजागी दिसतं. एका वॉर्डबॉयनं त्यांच्या जखम शिवण्यातल्या कौशल्याचं केलेलं कौतुक त्यांना स्वत:तला आत्मविश्वास वाढीस लागावा इतक्या मोलाचं वाटतं. कुणीही डॉक्टर शस्त्रक्रिया करत असताना थिएटरमध्ये वॉर्डबॉय, नर्स, थिएटर सिस्टर यांचा मेळ मदत करायला सज्ज असतो. अशा अनेक डॉक्टरांच्या शस्त्रक्रिया करतानाच्या पद्धती ही सर्व मंडळी पाहात असतात. डॉ. श्रीखंड्यांच्या उमेदवारीच्या, सुरुवातीच्या दिवसांतही त्यांचं नैपुण्य, रुग्णाच्या शरीराबद्दल त्यांना वाटणारा आदर, त्यामुळे कमीत कमी छेद घेण्याची, वाजवीपेक्षा जराही अधिक रक्तस्त्राव होऊ न देण्यासाठी धीमेपणानं, सांभाळून शस्त्र वापरण्याची सहृदय जाणीव ही सर्व मंडळी बघत असत. त्यामुळे, एका थिएटर सिस्टरनं मोठे मोठे डॉक्टर आजूबाजूला असूनही तिच्या वडिलांची शस्त्रक्रिया डॉ. श्रीखंडेंकडून करवून घेतली. ही घटना त्यांना शस्त्रक्रियेतलं पारितोषिक असावं इतकी लक्षणीय वाटते. जिद्दीने झगडताना झालेल्या सकारात्मक वृत्तीमुळे त्यांना व्यवसायातल्या अनैतिक बाजूचं कधीही आकर्षण वाटलं नाही, की लवकर पैसा मिळवण्यासाठी कुठचेही गैर मार्ग घेण्याची गरज वाटली नाही.

तसे मार्ग न घेता, शांत, स्थिर वृत्तीने आणि अंगच्या नैपुण्याने आलेल्या आत्मविश्वासाने यश यायला वेळ लागला तरी ते नक्की मिळणारच हा ठाम विश्वास खरा ठरला. त्यांचं स्वत:चं हॉस्पिटल झालं. अनेक ठिकाणांहून ‘श्रीखंडे क्लिनिक’मध्ये कार्यानुभव घ्यायला विद्यार्थी यायला लागले. डॉ. श्रीखंडे नावाचा सर्वत्र गौरवानं उल्लेख व्हायला लागला. स्वत: विद्यार्थ्यांच्या लीनतेने, डॉक्टर अधूनमधून परदेशी जाऊन, नव्या कौशल्यां ुळे तिथल्या शल्यशास्त्रात होणाऱ्या शास्त्रीय प्रगतीचा वेध घेऊन आपलं नैपुण्य कसदार, धारदार करत राहिले. उत्तमाचा वेध घेणारी मोकळी मनोवृत्ती विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांतून काही नवे मार्ग दिसतायत का याचा शोध घेत राहिली. ‘डॉक्टर श्रीखंडे कल्चर’ या विद्यार्थ्यांद्वारे गावोगाव गेलं. रुग्ण आणि डॉक्टर यांचे बिघडलेले संबंध ही त्यांना चिंतेची बाब वाटते. डॉक्टरांनी माणुसकीचा उत्तम आदर्श रोजच्या वर्तनातून दाखवला पाहिजे, हे बाळकडू आपल्या स्वत:च्या वागण्यातून ते विद्यार्थ्यांना आणि पर्यायाने आपल्या सहवासात येणाऱ्या सर्वांनाच देत असतात. आयुष्यात कुठेतरी कमतरता असली, अडचणी आल्या तरच त्यांच्याशी झगडताना आपले पाय जमिनीवरून सुटत नाहीत. आपल्या अडखळणाऱ्या जिभेनेच आपले पाय जमिनीवर ठेवले आहेत ही त्यांची धारणा त्यांच्यातल्या सुसंस्कृत, सकारात्मक दृष्टीची द्योतक आहे. जिभेत असणारा अधूपणा त्यांच्या हातात इतरांहून अधिक संवेदना देऊन शरीरानं भरून काढला आणि त्याचा डॉक्टरांनी उत्तम उपयोग केला हे तर खरंच, पण आपल्या मन:शक्तीने, निर्धाराने आणि अथक प्रयत्नांनी त्यांनी आपल्या जिभेच्या अधूपणावरही मात केली. मित्रमंडळीतही गप्पा मारताना चाचरणाऱ्या जिभेवर आपल्या इच्छाशक्तीने त्यांनी ताबा मिळवला. बोलण्यात प्रयत्नांनी सफाई आणली. विद्यार्थ्यांना शिकवताना, परिषदांतून भाषणं करताना त्यांच्या अनुभवांची सकस उदाहरणं ते देतात. हे अनुभव व्यक्त करताना केलेल्या अचूक शब्दप्रयोगांनी आणि मुख्य म्हणजे स्वरांचे 

पैशापेक्षा आयुष्यात दुसरे आनंद आहेत, निष्ठेने आणि न थकता प्रयत्न केले तर आज ना उद्या यश हे हमखास जवळ येईल, माणुसकी हाच मानसिकतेचा पाया असला तर आपल्या भोवतालचं सर्व जग आपलंसं करता येतं. उत्तमाचा वेध घ्यायला नेहमी देशी परदेशीच जावं लागतं असं नाही; मुख्य म्हणजे आपल्या व्यवसायाचा धंदा करू नये - हे संदेश ‘आणि दोन हात’ या पुस्तकात डॉक्टरांच्या अनुभवांद्वारे वारंवार आलेले आहेत, यातून शिकता आलं, घेण्यासारखं घेता आलं तर वाचकांचं उन्नयन व्हायला नक्कीच साहाय्य होईल. या पुस्तकाचं यश केवळ व्यावसायिक क्षेत्राशी निगडित नाही तर ते मनुष्यस्वभावातल्या उदात्ततेला, मंगलतेला साद घालणारं आहे.

चढउतार सांभाळत आवाजावर आणि जिभेवर ठेवलेल्या हुकमतीने एक चांगला वक्ता म्हणूनही त्यांनी कीर्ती मिळवली. ही तपश्चर्या करणं आणि साध्य होणं सोपं नाही. पण असलेल्या व्यंगाचा आपल्या उन्नतीसाठी उपयोग करून घेण्याचा फार मोठा संदेश त्यांनी आपल्या उदाहरणातून दिला. या पुस्तकात एका सर्जनचे अनुभव दिले आहेत. ते त्यांच्या रुग्णांशी, कार्यक्षेत्राशी निगडित असावेत हे सहजच आहे. मानवी मनोव्यापार बघता येणं, त्याचं चित्रण करणं आणि त्यावर भाष्य करण्याची ताकद असणं याला वेगळं सामर्थ्य लागतं. ते डॉक्टरांच्यात आहे. त्यांचा हा विषय उत्तम साहित्याचा विषय झाला आहे. डॉक्टरांच्या या पुस्तकात एका विश्वात्मक सत्याचं दर्शन होत आहे. डॉक्टरच्या आणि रोग्यांच्या मनात होणारी द्वंद्वं, आंदोलनं, यशाचा आनंद आणि अपयशाची निराशा ही एका घटनेशी किंवा एका माणसाशी निगडित न राहता त्याला सार्वत्रिकता आली आहे. त्यामुळे एकूण समाजालाच यातून खूप शिकण्यासारखं आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलाचं व्यंग त्याला कमीपणा येईल अशा तऱ्हेनं कधीही उघडं करू नये, उलट त्याच्या गुणांचं कौतुक करून त्याचा आत्मविश्वास वाढवावा, त्यातून एक जीव वाया जाण्यापासून वाचतो; पैशापेक्षा आयुष्यात दुसरे आनंद आहेत, निष्ठेने आणि न थकता प्रयत्न केले तर आज ना उद्या यश हे हमखास जवळ येईल, माणुसकी हाच मानसिकतेचा पाया असला तर आपल्या भोवतालचं सर्व जग आपलंसं करता येतं.

उत्तमाचा वेध घ्यायला नेहमी देशी परदेशीच जावं लागतं असं नाही; मुख्य म्हणजे आपल्या व्यवसायाचा धंदा करू नये - हे संदेश ‘आणि दोन हात’ या पुस्तकात डॉक्टरांच्या अनुभवांद्वारे वारंवार आलेले आहेत, यातून शिकता आलं, घेण्यासारखं घेता आलं तर वाचकांचं उन्नयन व्हायला नक्कीच साहाय्य होईल. या पुस्तकाचं यश केवळ व्यावसायिक क्षेत्राशी निगडित नाही तर ते मनुष्यस्वभावातल्या उदात्ततेला, मंगलतेला साद घालणारं आहे. त्याला अशी अनेक पारितोषिकं मिळावीत ही सदिच्छा व्यक्त करताना अगदी अलीकडे आलेला एक अनुभव सांगावा वाटतो. व्यवसायातल्या ताण-तणावांनी आणि अविश्रांत मेहनतीनं डॉक्टरांच्या हृदयाने काही वर्षांपूर्वी तक्रार करायला सुरुवात केली. बायपास, अँजिओप्लास्टी यांसारखे उपाय झाले, त्यामुळे काही वर्षं चांगली गेली. आता त्यांच्या हृदयाची झडप बदलण्याचं ऑपरेशन करायची वेळ आली. कोणत्याही दृष्टीनं हे गंभीर होतं. जिवाला धोका होण्याची मोठी शक्यता होती. सर्व - अगदी सर्वजण त्यांना ते न करण्याचा सल्ला देत होते. पण शस्त्रक्रियेला पर्याय म्हणजे निवृत्तीचं संथ जीवन जगायचं आणि मस्तकावर केसानं टांगलेल्या तलवारीची अनिश्चित भीती, धाकधूक सहन करत उरलेलं आयुष्य कंठायचं.

स्वत: डॉक्टर असल्यानं इतरांनाही न जाणवलेले धोके त्यांना कळले होते, पण अधू अवयवावर मात केलेल्या डॉक्टरांना अधू जीवन जगायचं नव्हतं. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरवर पूर्ण विश्वास असला तर कितीही गंभीर शस्त्रक्रियेतून रुग्ण कसा बाहेर पडतो हे त्यांनी अनेकदा स्वत: पाहिलं होतं. आज डॉक्टर स्वत: रुग्ण होते. त्यांच्यावर त्यांच्या रुग्णांनी ठेवलेल्या विश्वासाप्रमाणे त्यांनी आपल्या डॉक्टरवर विश्वास टाकला, आपला जीव त्यांच्या स्वाधीन करण्याचं ठरवलं, त्यामुळे आदल्या दिवसापर्यंत आमच्यासारख्या मित्रमंडळींना आपण होऊन बोलावून घेऊन आमच्याशी ते नेहमीप्रमाणे गप्पा करत होते. शस्त्रक्रियेची वेळ आली. डॉक्टरांच्या मनात नीरव शांतता होती. त्यांनी आई-वडिलांचं स्मरण केलं. जगातल्या उदात्त, धीरगंभीर वृत्ती त्यांनी आपल्या हृदयात सामावून घेतल्या. त्यानंतर निश्चयाने, मंगलत्वावरच्या विश्वासानं एखाद्या मंदिरात शिरावे तसे ते ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. त्या जीवघेण्या दिव्यातून डॉक्टर सुखरूप पार झाले, त्याला आता तीन आठवडे झाले. येत्या संक्रांतीच्या दिवशी ते लोकांच्यात मिसळायला बाहेर पडणार आहेत. डॉक्टरांची थोरली लेक नीना हिचा डॉक्टर आनंद नांदेशी विवाह झाला, त्याप्रसंगी मी मंगलाष्टकं केली होती. त्यांतल्या चार ओळी राहून राहून मनात घोळतायत : ‘‘सुजन, जनक तवं किशोर, बाळे, शल्यशास्त्री गाजला; श्रद्धा गुरुजनीं, निष्ठा ज्ञानी अहर्निश कष्टला उदात्त या पेशाचा त्याने धंदा नच केला असंख्य रुग्णांना तो साक्षात्‌ परमेश्वर भासला॥’’ आज, डॉक्टर श्रीखंडे आपल्याकडे श्रद्धेने येणाऱ्या असंख्य रुग्णांना रोगमुक्त करायला सुदृढ तब्येतीनं परतले आहेत. त्यांना निरामय दीर्घायुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा... 
 

Tags: डॉ. वि. ना. श्रीखंडे आणि दोन हात साहित्य महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके