डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोरोनासारख्या प्रचंड महामारीवर (पँडेमिकवर) आधारलेल्या अनेक कलाकृती मला आठवल्या. इंगमार बर्गमनचा 1957 चा ‘दी सेव्हन्थ सील’ हा चित्रपट खूप ॲब्स्ट्रॅक्ट असला, तरीही सगळ्यांनी तो जरूर बघावा. अल्बटर्‌स पिक्टर या स्वीडिश चित्रकारानं स्टॉकहोममधल्या चर्चच्या एका भिंतीवर काढलेल्या चित्रापासून बर्गमननं स्फूर्ती घेतली होती. त्यातला मृत्यूशी बुद्धिबळाचा चाललेला जीवघेणा खेळ आठवतो. ही कलाकृतीही प्लेगच्या साथीवरच आधारित होती. याशिवाय डॅनियल डेफोची ‘ए जर्नल ऑफ दी प्लेग इयर’ (1722), जॅक लंडनची ‘दी स्कार्लेट प्लेग’ (1912), जॉर्ज स्टुअर्टची ‘अर्थ अबाइड्‌ज’ (1949) अशा पँडेमिकवर आधारलेल्या कमीत कमी दहा-बारा प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. आता त्यातल्या किती वाचून होतील, कोण जाणे!

सध्याचं वातावरण हे प्रचंड नैराश्याचं, भीतीचं, बेकारीचं व मोठ्या स्थलांतराचं आहे आणि एका साथीमुळे- म्हणजेच कोरोनाच्या विषाणूमुळे हे सगळं निर्माण झालं आहे. अशा वातावरणात मला मोठ्या तीन लेखकांची आणि त्यांच्या कादंबऱ्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाहीये. एक- अमेरिकन नोबेल लॉरेट जॉन स्टाईनबेक, दुसरा- फ्रेंच नोबेल लॉरेट अल्बर्ट कामू आणि तिसरा- पोर्तुगीज नोबेल लॉरेट होजे सारामागो.

जॉन स्टाईनबेक हा माझा अतिशय आवडता लेखक. त्यानं 1937 मध्ये महामंदीच्या काळावर आधारलेली ‘ऑफ माईस अँड मेन’ नावाची कादंबरी लिहिली होती. गंमत म्हणजे, त्याच्या या कादंबरीचा पहिला ड्राफ्ट त्याच्या कुत्र्यानं खाऊन टाकला होता. त्यामुळे त्याला तो ड्राफ्ट पुन्हा लिहावा लागला होता. त्या वेळी लेनी स्मॉल आणि जॉर्ज मिल्टन हे दोन विस्थापित शेतकरी कॅलिफोर्नियामध्ये नोकरी शोधायला निघालेले असतात. लेनी मतिमंद असतो आणि त्याला तलम-मऊ स्पर्शाचं आकर्षण असतं. त्याच्या याच आकर्षणामुळे तो संकटात सापडतो आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप होतो वगैरे... अशी ती गोष्ट विषण्ण वळणं घेत जाते. पण या सगळ्याची थीम म्हणजे बेकारी आणि त्यामुळे येणारा एकटेपणाही आहे. हे सगळं अतिशय चांगल्या प्रकारे स्टाईनबेकनं या कादंबरीमध्ये रंगवलेलं आहे. आज जगभर व भारतातही प्रचंड बेकारी आहे, त्यामुळे ही कादंबरी आपल्याला नक्कीच जवळची वाटेल. 


पण त्यापेक्षाही मला आज स्टाईनबेकची दुसरी कादंबरी आणखी जवळची वाटते. ती म्हणजे 1939 मध्ये त्यानं लिहिलेली ‘ग्रेप्स ऑफ राथ’. ही कादंबरी 1936 मध्ये ‘द हार्वेस्ट जिप्सीज’ या शीर्षकाखाली स्थलांतरावर स्टाईनबेकनंच लिहिलेल्या सात लेखांवर आधारलेली होती. ती एखाद्या डॉक्युमेंटरीसारखी होती. ती प्रचंड प्रसिद्ध झाली. 1939 च्या एप्रिल महिन्याच्या मध्यावर ती प्रकाशित झाली आणि एकाच महिन्यात तिच्या तब्बल 10,000 प्रती खपल्या. 1940 च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्याच्या 4 लाख 30 हजार प्रती खपल्या होत्या. म्हणजे आठवड्याला 10,000! पण आश्चर्य म्हणजे, इतक्या प्रचंड प्रसिद्ध असलेल्या या पुस्तकावर नंतर चक्क बंदी आली. त्यामागचं कारण मात्र विचित्रच होतं. ही कादंबरीसुद्धा अमेरिकेतील महामंदीच्या काळावरच आधारलेली होती. अमेरिकेतलं शेअर मार्केट 1929 मध्ये प्रचंड प्रमाणात कोसळलं आणि दुसरं महायुद्ध सुरू होईपर्यंत ही महामंदी चालू होती. या वेळी ओक्लाहोमा हे शहर दुष्काळ आणि चक्रीवादळ यामुळे गांजलेलं होतं. तिथले अनेक लोक देशोधडीला लागलेले होते आणि कामाच्या शोधार्थ तिथून निघाले होते. या कादंबरीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेला टॉम जोड आणि त्याचं कुटुंब या यात्रेत सामील झालं होतं. कॅलिफोर्नियामध्ये काही काम मिळेल, या आशेनं ही सगळी मंडळी मजल-दरमजल करत निघतात आणि त्यांना वेगवेगळे जथे कसे भेटतात, त्यांची प्रेमप्रकरणं, दारिद्य्र, बेकारी अशा सगळ्या भावनिक आणि आर्थिक संघर्षामध्येही ती मंडळी आशा कशी जागी ठेवतात, असं सगळं या कादंबरीत अतिशय सुंदरपणे रंगवलं आहे. यात आपल्याला स्थलांतराचं एक विषण्ण आणि भकास दृश्य बघायला मिळतं. या सगळ्या प्रवासात रोझ या टॉमच्या बहिणीला बाळ होतं आणि ते मृतावस्थेत असतं. जोडकुटुंब एका फार्महाऊसमध्ये आश्रयाला जातं. तिथे त्यांना एक मुलगा आणि त्याचे मरणासन्न, भुकेलेले वडील भेटतात. त्या म्हाताऱ्या वडिलांना टॉमची बहीण दररोज स्तनपान देते. तिचं मूल तर मेलेलं असतं, पण एका भुकेलेल्या मरणासन्न जीवाला वाचवायला ती हे करते- असं वर्णन या कादंबरीत आहे. इथे कादंबरी संपते. पण हे अश्लील आहे म्हणून यावर चक्क टीका झाली आणि म्हणून या सुरेख व वास्तववादी कादंबरीवर चक्क बंदी आणण्यात आली. काही वर्षांनी मात्र ही बंदी उठली आणि कादंबरी पुन्हा एकदा गाजली. तिला मोठा सन्मानही मिळाला. आज इंग्रजीतल्या प्रचंड गाजेलेल्या आणि उत्कृष्ट 100 पुस्तकांच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं. कादंबरीला अनेक पारितोषिकंही मिळाली, हा भाग वेगळा. पण मुख्य म्हणजे, आज भारतात स्थलांतरितांची जी काही भयानक दृश्यं आपण बघतोय, ती बघून मला ‘ग्रेप्स ऑफ राथ’ची आठवण झाली. ही कादंबरी जरूर वाचावी.

आज अशा परिस्थितीत आणखी एक कादंबरी मला आठवते. ती म्हणजे, खळबळ माजवणारी अल्बर्ट कामूची ‘दि प्लेग’ ही कांदबरी. ती 1947 मध्ये प्रकाशित झाली. अल्जेरियामधल्या ओरान नावाच्या शहरात अशाच तऱ्हेची एक साथ आलेली असते. या साथीनं प्रचंड धुमाकूळ घातलेला असतो. या कादंबरीत त्याचं वर्णन आहे. या वर्णनाला अर्थातच वेगवेगळे कंगोरे आहेत, ते या कादंबरीत अतिशय सुंदरपणे रंगवले आहेत. या कादंबरीचे 5 भाग आहेत. पहिल्या भागात हजारो उंदीर रस्त्यावर मरून पडतात. या  भागातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणजे 35 वर्षीय डॉ.बर्नाड रायॉक्स. रायॉक्सच्या इमारतीची देखभाल करणारा मायकेल नावाचा मनुष्य तापानं मरतो आणि त्यावरून डॉक्टर रायॉक्स तिथे प्लेगची साथ आल्याचा निष्कर्ष काढतो. रायॉक्स आणि त्याचा सहकारी डॉ.कॅस्टल इतर लोकांना तिथे साथ आल्याचं सांगत सुटतात. सुरुवातीला लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसत नाही; पण जेव्हा लोक भराभर मरायला लागतात, तेव्हा मात्र ते हादरतात. शहरातले 10 लाख लोक मरतील की काय, अशी भीती त्यांच्या मनामध्ये बसते आणि मग तर प्रचंडच गोंधळ माजायला सुरुवात होते. शहरामध्ये पोस्टर्स लागतात, हॉस्पिटल्समध्ये प्लेगसाठी वेगळा वॉर्ड उघडला जातो, त्यातल्या 80 लाख खाटा केवळ 3 दिवसांत भरतात, रुग्णांना ठेवायला चक्क घरं रिकामी करावी लागतात, मृतांची संख्याही वाढायला लागते... अशी तिथे परिस्थिती असते. त्यावर औषध येतं, पण तेही पुरेसं पडत नाही. त्यामुळे पूर्ण शहर सील होतं. कादंबरीच्या दुसऱ्या भागात घरांची दारंही सील केली जातात. त्यामुळे कुणीही येणं-जाणं बंद होतं. रेल्वे, पत्रव्यवहार पूर्णपणे ठप्प केले जातात. टेलिफोनचा वापरही अतिशय महत्त्वाच्या कारणापुरताच सीमित केला जातो. अतिशय महत्त्वाच्या कारणासाठी तारा (टेलिग्राफ) पाठवण्याची मुभा दिली जाते. थोडक्यात, शहरात पूर्णपणे लॉकडाऊन होतं. यात लोकांचं मनोधैर्य कसं खचतं, त्यांना डिप्रेशन कसं येतं, त्यांना प्रचंड मानसिक ताण कसे जाणवायला लागतात- याचं वर्णन आपल्याला प्लेग या कादंबरीमध्ये वाचायला मिळतं आणि आपण भारतातलं कुठलंसं वर्तमानपत्र तर वाचत नाही आहोत ना, असंही वाटायला लागतं. 

कादंबरीच्या तिसऱ्या भागात ऑगस्ट महिन्यात परिस्थिती आणखीनच बिघडते. लोक जेव्हा शहरातून पळून जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा सशस्त्र सैनिक त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना पळून जाताना अडवतात, तसंच त्यांना परत घरात ढकलून देतात. त्या वेळी प्रचंड हिंसा आणि लुटालूट होते. प्रेतयात्रा अतिशय भराभर उरकल्या जातात. कुणीही मेलं तरी लोकांना त्याच्याविषयी काहीच वाटेनासं होतं, तर दुसरीकडे भावनिक पातळीवर लोक प्रचंड एकाकी पडत जातात. कादंबरीच्या चौथ्या भागात प्लेगनं थैमान घातलेलं असतं. त्याच्याच तालावर शहर नाचत असतं. पाचव्या भागात मात्र प्लेगची साथ थांबते, असं दाखवलं आहे आणि जानेवारी महिन्यात शहराचे दरवाजे उघडले जाणार, या बातमीमुळेच लोक अतिशय जल्लोष करत असतात, नाचत असतात. सगळ्यात शेवटी मात्र रायॉक्सची बायको मरते. शहरातले सगळे दरवाजे उघडले जातात, लोक इतरांना भेटतात आणि प्रचंड आनंदित होतात. ही जरी एक कथा असली, तरी या कथेमधली जी वर्णनं आहेत- शहराची मोठ्या प्रमाणात लागलेली मानसिक विल्हेवाट, ताणतणाव, त्यातून येणारं डिप्रेशन, लोकांचे संबंध, त्यातून वाटणारा आशावाद, लोक आणि सरकार यांच्यातला संघर्ष, लॉकडाऊनमधल्या क्वारंटाईनमधली परिस्थिती याची इतकी भयाण आणि जिवंत वर्णनं केली आहेत- ती आजच्या परिस्थितीशी बरीचशी मिळती-जुळती आहेत. म्हणून मला या कादंबरीची आज आठवण होतेय. 

या सगळ्यापेक्षा मला आज जिची आठवण होते आहे, त्या कादंबरीचं नाव आहे ‘ब्लाइंडनेस’. ही मात्र मी वाचलेली नव्हती. माझा मित्र सतीश काळसेकर यानं सांगितल्यावर मी किंडलवर ती मागवली आणि वाचली. पोर्तुगीज नोबेल पारितोषिकविजेता होजे सारामागो नावाच्या एका मोठ्या लेखकानं ही कादंबरी लिहिली आहे. होजेचं निधन 2010 मध्ये झालं. त्याच्या ‘ब्लाइंडनेस’ आणि ‘सीइंग’ या कादंबऱ्या अचाट आहेत. सध्याच्या काळात वाचाव्यात, अशा या कादंबऱ्या आहेत. ‘ब्लाइंडनेस’मध्ये एका माणसाला अचानक आलेल्या आंधळेपणामुळे त्याची गाडी थांबते आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला असतो. एक माणूस त्याच्या मदतीला येतो. आंधळ्या झालेल्या माणसाला घरी पोहोचवायची जबाबदारी हा माणूस घेतो आणि त्या नेत्रहीन झालेल्या माणसाच्या गाडीनं तो त्याला त्याच्या घरी नेऊन पोहोचवतो. त्याच्या बायकोला जेव्हा आपल्या नवऱ्याची परिस्थिती लक्षात येते, तेव्हा ती त्याला डॉक्टरकडे न्यायचं ठरवते. पण आपल्याला लिफ्ट देणाऱ्या माणसानं आपली गाडी पळवून नेली आहे, हे त्यांच्या लक्षात येतं. मग टॅक्सीनं ते डॉक्टरकडे जातात. डॉक्टर त्याला तपासतो आणि ‘‘बाकी सगळं ठीक आहे; पण तू आता ‘व्हाईट सीकनेस’मुळे आंधळा झाला आहेस-’’ असं त्याला सांगतो. पण नंतर लक्षात येतं की, हा माणूस ज्यांच्या-ज्यांच्या संपर्कात आला आहे, त्या सगळ्यांना व्हाईट सीकनेस झाला आहे आणि ती सगळी मंडळी- अगदी त्याला लिफ्ट देणारा माणूसही आणि दवाखान्यातल्या वेटिंग रूममध्ये बसलेली मुलगीही- आंधळी झालेली असतात. कालांतराने डॉक्टरही आंधळा होतो. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्यांनाही हा आजार होतो. यामुळे आंधळं होण्याची साथ शहरभर पसरते. त्या डॉक्टरची बायको मात्र याच्यातून वाचते. अशी साथ आल्याचं तो डॉक्टरच पहिल्यांदा सरकारला सांगतो. सरकार मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण दवाखान्यात जेव्हा अनेक रुग्ण यायला लागतात आणि सगळेच रुग्ण आपण आंधळे झाल्याचं जेव्हा सांगायला लागतात, तेव्हा मात्र सरकारला जाग येते. ही मंडळी आणखी कुणाच्या संपर्कात आली की साथ पसरेल, म्हणून मग सरकार क्वारंटाईनची मोठ्या प्रमाणावर सोय करतं. तो डॉक्टरही क्वारंटाईनमध्ये जातो. त्याची सेवा करायला क्वारंटाईनमध्ये जाण्यासाठी त्याची बायको आपल्यालाही आंधळेपण आल्याचं नाटक करते. क्वारंटाईनमधली परिस्थिती मात्र अतिशय वाईट असते. तिथे लोकांना झोपायला जागा नसते, जिवंत माणसांबरोबरच मृत माणसंही बरेच दिवस ठेवलेली असतात. तिथे येणाऱ्या रेशनचाही भरवसा नसतो. ते कधी येतं, तर कधी येतही नाही. 

सशस्त्र सैनिक पहारा देत असतात, कोणी क्वारंटाईनमधून बाहेर आलं की त्याला पुन्हा आत ढकलत असतात. कुणी जर बाहेर फिरत असेल, तर त्याला मारहाण केली जाते. अन्न विकत घेण्यासाठी संपत्ती किंवा वस्तू विकण्याची वेळ लोकांवर येते. बलात्काराचं प्रमाण वाढतं. मग बायका बंड पुकारतात, पण मग नंतर स्वत:हूनच तयार व्हायला लागतात आणि तिथे बलात्काराची एक प्रचंड मोठी लाटच तयार होते. डॉक्टरची बायको मात्र त्याला विरोध करण्याकरता उभी राहते. ती याविरुद्ध एक चळवळ उभी करते. तिच्याकडे एक कात्री असते. काही पुरुष बायकांवर बलात्काराचा प्रयत्न करतात, तेव्हा ती त्यांच्यातल्या लीडरला मारते. पण इतर पुरुष तिला मारायला तिच्याकडे धाव घेतात. इतर महिला तिला वाचवण्यासाठी धावतात. या सगळ्या झटापटीत क्वारंटाईनच्या तंबूला आग लागते आणि तिथले लोक बाहेर पळून जातात. त्या लोकांना ती आपल्या घरी घेऊन जाते, कारण तिलाच फक्त दृष्टी असते. या काळात अनेक कुटुंबं एकमेकांपासून दूर असतात. त्यांना एकमेकांशी संपर्क साधता येत नाही. लोकांचं मानसिक धैर्य संपूर्ण संपलेलं असतं. उद्या काय होणार, या भीतीनं संपूर्ण समाज ग्रासलेला असतो. तरी ते सगळे एकमेकांना चिकटून असतात आणि एकमेकांना सतत धीर देत असतात. एकदा तिथलं अन्न संपतं आणि डॉक्टरची बायको सुपर मार्केटमध्ये काही शिल्लक आहे का ते बघायला जाते. पण तिथे तिला अन्न तर दिसत नाहीच, पण मेलेल्या माणसांचे ढिगारे दिसतात. ते सगळं बघून ती विषण्ण होते, मनानं खचते आणि आजारी पडते. डॉक्टर तिला शेवटी चर्चमध्ये नेतो. संपूर्ण चर्च आंधळ्या लोकांनी भरलेलं असतं. ती मंडळी फ्लॅटमध्ये परततात, तेव्हा डॉक्टरची बायको त्यांच्यासाठी काही तरी वाचायला लागते. त्या वेळी एका माणसाला आपली दृष्टी परतल्याचं लक्षात येतं. यानंतर हळूहळू सगळ्या लोकांची दृष्टी परतते. इथे ही कादंबरी संपते.


थोडक्यात, हे एपिडेमिक काही काळापुरतंच असतं. पण या काळात ज्या काही भयाण परिस्थितीला लोकांना सामोरं जावं लागतं, प्रचंड हालपेष्टा सहन कराव्या लागतात, जे मानसिक ताण-एकाकीपणा व यातून येणारं डिप्रेशन अनुभवायला मिळतं, पोलीस अन्‌ सैन्य यांची दडपशाही बघायला मिळते- या सगळ्या गोष्टींमधली भावनिक गुंतागुंत आणि तरीही त्यातूनही तग धरून असलेला आशावाद व एकी यांच्यामध्ये किती ताकद आहे, हे सगळं दाखवणारी ही कादंबरी आहे. ही अतिशय सुंदर कादंबरी सर्वांनी जरूर वाचावी.

याशिवाय अशाच प्रचंड महामारीवर (पँडेमिकवर) आधारलेल्या अनेक कलाकृती मला आठवल्या. इंगमार बर्गमनचा 1957 चा ‘दी सेव्हन्थ सील’ हा चित्रपट खूप ॲब्स्ट्रॅक्ट असला, तरीही सगळ्यांनी तो जरूर बघावा. अल्बटर्‌स पिक्टर या स्वीडिश चित्रकारानं स्टॉकहोममधल्या चर्चच्या एका भिंतीवर काढलेल्या चित्रापासून बर्गमननं स्फूर्ती घेतली होती. त्यातला मृत्यूशी बुद्धिबळाचा चाललेला जीवघेणा खेळ आठवतो. ही कलाकृतीही प्लेगच्या साथीवरच आधारित होती. 

या वेळी मला बोकॅशिओची 1353 मध्ये लिहिलेली ‘डेकॅमेरॉन’ आठवते. त्यात उत्तर इटलीमध्ये जेव्हा पँडेमिक सुरू होती, तेव्हा फ्लॉरेन्सच्या बाहेर टस्कन व्हिलामध्ये क्वारंटाईन झालेल्या 7 बायका आणि 3 पुरुष सतत 10 दिवस 100 विनोदी व उद्दीपित करणाऱ्या कथा सांगतात, अशी त्यामागची कल्पना आहे.

मेरी शेलीची ‘फ्रँकेनस्टाईन’ ही खूपच प्रसिद्ध कथा होती. तिचीच 1826 ची ‘दी लास्ट मॅन’ ही कथाही तितकीच चांगली असली, तरी ती एवढी गाजली नाही. ही कथाही पँडेमिकवरच आधारलेली होती. याशिवाय डॅनियल डेफोची ‘ए जर्नल ऑफ दी प्लेग इयर’ (1722), जॅक लंडनची ‘दी स्कार्लेट प्लेग’ (1912),  जॉर्ज स्टुअर्टची ‘अर्थ अबाइड्‌ज’ (1949) अशा पँडेमिकवर आधारलेल्या कमीत कमी दहा-बारा प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. आता त्यातल्या किती वाचून होतील, कोण जाणे! 

आज जगभर कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे- भारतातही हाहाकार माजला आहे, क्वारंटाईन आहे, लॉकडाऊन आहे, स्थलांतरं होताहेत आणि आपल्यावर जे प्रचंड मोठ्या प्रमाणात जे शारीरिक-मानसिक व आर्थिक आघात पडताहेत, हे सगळं बघून मला या कादंबऱ्या आठवल्या म्हणून हा सगळा उपद्‌व्याप.
 

Tags: corona&Novels अच्युतगोडबोले achyutgodbole weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अच्युत गोडबोले
achyut.godbole@gmail.com

तंत्रज्ञ, मराठीतील लेखक आणि वक्ते 


Comments

  1. Ratnadeep- 19 Jun 2020

    Very nice article.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके