डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कोरोनाग्रस्तांवर नियंत्रण मिळवण्यात आज जर्मनीलाही यश आलं आहे. या देशात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केलं गेलं. मुळातच आरोग्ययंत्रणा खूपच चांगली असल्यानं त्याचे परिणाम त्यांना चांगले मिळत राहिले. त्यामुळेच कोरोनाच्या बाबतीत इथला मृत्युदर खूप कमी आहे. जगातला दुसरा सुरक्षित (सेफेस्ट) देश म्हणून आज जर्मनीचा उल्लेख केला जातोय, हे विशेष! कोरोना रोखण्यात यशस्वी असलेल्या जगातल्या देशांची क्रमवारी बघितली तर इस्त्रायल, जर्मनी, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, चीन, न्यूूझिलंड, तैवान, सिंगापूर, जपान आणि नंतर हाँगकाँग अशी ती लावावी लागेल. जर्मनी खालोखाल डेन्मार्क, ऑस्ट्रिया, पोलंड व चेकोस्लोव्हाकिया या देशांनीही कोरोनाला रोखण्यात यश मिळवलं आहे आणि त्यांचं जनजीवन हळूहळू सुरळीत, देखील झालेलं आहे. डेन्मार्कनं तर लॉकडाऊन हटवून आता तिथल्या शाळा-कॉलेजेस सुरू झाली आहेत. इंग्लंडमध्ये मात्र कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाबत अमेरिका हा सगळ्यात वाईट देश म्हणावा लागेल.
 

कोरोनाचं संकट दुसऱ्या महायुद्धानंतरचं सगळ्यात भीषण अरिष्ट आहे. राजकारण, अर्थकारण, समाजजीवन, शिक्षण, कला, क्रीडा आणि मानसिक आरोग्य अशा सगळ्यांवरच याचा इतका प्रचंड परिणाम होणार आहे की; जेव्हा आपण यातून पूर्णपणे बाहेर पडू, त्या वेळी हे जग कदाचित आपल्याला ओळखूदेखील येणार नाही. म्हणूनच, आता बी.सी. म्हणजेच ‘बिफोर ख्राईस्ट’ जसं म्हणत, तसं आता ‘बिफोर कोरोना’ आणि ‘आफ्टर कोरोना’ अशीच जगाच्या इतिहासाची विभागणी आपल्याला कदाचित करावी लागेल. या उलथापालथीविषयी आपण नंतर बोलूच. पण एखाद्याला प्रश्न पडेल- कोरोनानं सगळ्या जगात धुमाकूळ घातला आहे, पण भारतात त्याचं एवढं विदारक चित्र का दिसत नाहीये?

भारतात हे चित्र कमी दिसण्याची अनेक कारणं असू शकतात. आशावादी मंडळींच्या मते, आपल्याकडे बीसीजीची लस अनेकांनी घेतल्यामुळे आपली या विषाणूसाठीची रोगप्रतिकारकशक्ती जास्त आहे; तर काहींच्या मते, आपल्याकडल्या वाढत्या तापमानाचा हा परिणाम आहे. या कल्पनांना अजून तरी सबळ वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही. पण एक मात्र कारण असू शकतं ते म्हणजे, भारतातून चीन इथे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येची तुलना करता, युरोप/अमेरिकेतून चीनकडे किंवा चीनकडून युरोप/अमेरिकेकडे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या अनेक पट जास्त आहे. त्यामुळे आपल्याकडे याचा प्रादुर्भाव तेवढा जास्त प्रमाणात झाला नसावा. अर्थात, काहींचं म्हणणं- आपल्याकडे टेस्टिंगच खूप होत नसल्यामुळे आज जे चित्र दिसतंय, ते फसवं आहे. काहीच दिवसांत आपल्याला यातून खरं काय आहे ते कळेल. पण आपण तैवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि जर्मनी अशा देशांच्या मानानं योग्य पावलं लवकर उचलली नाहीत, हेही तितकंच खरं आहे. याअगोदर कोरोनाच्या टेस्ट्‌सविषयी बोललं पाहिजे. काही बोलण्याअगोदर आपण हे स्पष्ट केलं पाहिजे की- एकूणच टेस्ट्‌स, त्यांचे प्रकार, त्यांची उपयुक्तता, त्यांची विश्वासार्हता, आपण पाहिजे तेवढ्या टेस्ट्‌स करतो आहोत की नाही, फक्त हॉटस्पॉट्‌समधल्यांवर करावी की सर्वत्र, की फक्त ज्यांना लक्षणं दिसताहेत त्यांच्यावरच करावी की सगळ्यांवर- अशा सगळ्या गोष्टींबाबत तज्ज्ञांमध्ये वाद-चर्चा अजूनही सुरू आहे. पण ढोबळमानानं जे चित्र दिसतंय ते असं :

कोरोनाच्या टेस्ट्‌सचे अनेक प्रकार आहेत. पण यातले दोन मुख्य प्रकार म्हणजे, आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट आणि अँटिबॉडीज टेस्ट. यातल्या पीसीआर टेस्टमध्ये घशातून काही प्रमाणात स्राव (स्वाब) घेतला जातो आणि त्यात विषाणू आहेत की नाही याची तपासणी केली जाते. याचे निष्कर्ष मिळायला 6 तासांचा अवधी लागतो. शिवाय ही टेस्ट सगळ्या ठिकाणी करण्याची सोय उपलब्ध नाही. ती ठरावीक केंद्रांमध्येच होते. प्रत्येक टेस्टचा नमुना त्या त्या केंद्राकडे पाठवणं खूपच खर्चिक आणि गैरसोईचं असल्यामुळे एका ठिकाणी असे बरेच नमुने जमा झाले की, मग ते एकत्र करून त्या जवळच्या केंद्राकडे पाठवले जातात. त्यामुळे त्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. 

कोरोनाची ही टेस्ट खर्चिक आहे. प्रत्येक टेस्टमागे यासाठी 4500 रुपये खर्च येऊ शकतो. सुप्रीम कोर्टानं फक्त आयुष्यमान योजनेत असलेल्या आणि गरीब असलेल्यांनाच त्या मोफत असतील, असा निकाल दिला. आता गरीब कोण यात मतभेद आहेतच. आपल्याकडली 67% कुटुंबं दरमहा 10 हजार रुपयांच्या खाली, तर 82% कुटुंबं ही दरमहा 20 हजार रुपयांच्या खाली जगतात. एवढ्या पैशांत कुटुंबातल्या सरासरी 5 लोकांसाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, प्रवास, वीज, पाणी, करमणूक, सणवार, लग्नसमारंभ आणि इतर सगळ्या गोष्टी जवळपास अशक्य असतात किंवा पुरवता येऊ शकतात. त्यामुळे 5 लोकांच्या कुटुंबातल्या प्रत्येकानं ही टेस्ट करायची म्हटलं तर त्यासाठी 5 x 4500=22500 रुपये लागतील. हे बहुतांशी लोकांना परवडणार नाही. एवढंच कशाला-पण फक्त नवरा-बायकोला किंवा आई-वडिलांना मिळून 9 हजार रुपये द्यायचे झाले, तरी कित्येक महिन्यांची किंवा एका वर्षाची बचत त्यात निघून जाईल. त्यामुळे या सगळ्यांना तरी निदान ही टेस्ट मोफत केली पाहिजे. 

त्यात आणखी एक प्रश्न म्हणजे, अनेक लोक लक्षणं दिसत असली तरी टेस्ट करायला पुढे येत नाहीयेत, असा अनुभव आहे. जर टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली, तर विलगीकरणामुळे आपला रोजगार जाईल, अशी भीती त्यांना वाटते- हे त्याचं कारण आहे. कारण आज भारतात कोट्यवधी लोकांचं पोट हातावर आहे. यामुळे टेस्ट न झालेले, पण विषाणू शरीरात असलेले हजारो लोक इतर लाखो लोकांमध्ये हा रोग पसरवू शकतील आणि हाच धोका टाळण्यासाठी त्यांना टेस्ट करण्यासाठी उद्युक्त करण्याची गरज आहे. यासाठी जर एखाद्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्याला विलगीकरण करावं लागलं, तर टेस्ट व विलगीकरण यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानासाठी आणि इतर खर्चासाठी सरकारनं त्याला 1 लाख रुपये देऊ असं सांगितलं, तर बरेच लोक टेस्ट करून घेतील. आपल्याकडल्या केसेस वाढून जरी 1 लाख झाल्या, तरी यासाठी होणारा खर्च 1 लाख X 1 लाख रू.= 1000 कोटी रुपये होईल. म्हणजे ही रक्कम काहीच नाही. सरकारनं जी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांची कोरोनासाठी रक्कम जाहीर केली आहे, त्यापैकी हा खर्च खूपच कमी असेल. पण यामुळे अनेक जण या टेस्ट्‌स करायला तयार होतील, आणि त्यामुळे पुढच्या लाखो लोकांना संसर्गापासून वाचवता येईल. अर्थातच, यात खूप गुंतागुंती आहेत. हा युक्तिवाद आणि ही आकडेवारी ही केवळ उदाहरणासाठी घेतली आहे. एकूण काय, तर अनेकांना टेस्ट्‌स करण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे, हे महत्त्वाचं.

पण मग प्रश्न पडतो की, इतक्या कोट्यवधी लोकांच्या अशा टेस्ट्‌स करायला किती वेळ आणि किती पैसा लागेल? यावर एक उपाय म्हणजे पूल टेस्टिंग! जेव्हा टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता कमी असते, तेव्हा ही टेस्ट जास्त उपयोगी ठरते. यामध्ये अनेक लोकांच्या घशातल्या स्रावांचे किंवा रक्ताचे नमुने एकत्र करून टेस्ट करतात. ही टेस्ट जर निगेटिव्ह आली, तर त्या सगळ्या लोकांना लागण झालेली नाही, असा निष्कर्ष काढता येतो. पण जर ती पॉझिटिव्ह आली तर मग त्या सगळ्या लोकांपैकी प्रत्येकाची टेस्ट स्वतंत्रपणे घ्यावी लागते. 

यामध्ये आणखी एक गोची आहे. ही पीसीआर टेस्ट त्या क्षणाला त्या व्यक्तीला लागण झाली आहे की नाही याविषयी सांगते. पण त्या व्यक्तीच्या भूतकाळाविषयी किंवा भविष्यकाळाविषयी काहीच भाष्य करत नाही. म्हणजे जर एखाद्याची ही टेस्ट निगेटिव्ह आली, पण त्यानंतर पाचच मिनिटांनी त्यानं कोरोनाची लागण झालेल्या माणसाशी हस्तांदोलन करून तोच हात आपल्या नाकापाशी नेला, तर त्यालाही कोरोनाची लागण होऊ शकते. 

आज आपल्याकडे भूतकाळाविषयी आणि भविष्याविषयी भाष्य करणारी टेस्टदेखील उपलब्ध आहे. तिलाच अँटिबॉडीज टेस्ट असं म्हणतात. आपल्या शरीरात जेव्हा विषाणूंचा हल्ला होतो, तेव्हा त्या विषाणूंना प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरात अँटिबॉडीज नावाची प्रोटिन्स तयार होतात. कित्येक वेळेला जेव्हा ती व्यक्ती तरुण असते आणि तिची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, तेव्हा या अँटिबॉडीज त्या विषाणूला पूर्णपणे नष्ट करतात आणि ती व्यक्ती रोगमुक्त होते. जर त्या विषाणूची वाढ फारशी होण्याआधीच ते नष्ट झाले, तर त्या व्यक्तीला सर्दी, खोकला आणि ताप अशी कुठलीही लक्षणं दिसण्याअगोदरच ती व्यक्ती- तिनं तोपर्यंत इतरांना हा विषाणू संसर्गामुळे दिला असला, तरी- स्वत: रोगमुक्त झालेली असते. म्हणूनच हजारो लोकांना आपल्याला हा संसर्ग झाला होता याची कल्पनाही येत नाही. पण या सगळ्या प्रक्रियेत त्यांच्या शरीरात मात्र अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. त्या ॲटिबॉडीज या त्या व्यक्तीच्या रक्ताच्या प्लाझ्मामध्ये असतात. 

ही टेस्ट या शरीरातल्या नेमक्या अँटिबॉडीज तपासण्याचं काम करते. त्या अँटिबॉडीज शरीरात सापडल्या, तर बऱ्याच केसेसमध्ये त्या विषाणूंचा त्या व्यक्तीवर हल्ला झाला होता किंवा झाला आहे याची खात्री त्या तपासणीवरून दिसून येते. पण या टेस्टमध्ये काही गुण दोषही आहेत. यातला एक दोष असा आहे की, ही टेस्ट बऱ्यापैकी विश्वासार्ह असली, तरी ती पूर्णपणे विश्वासार्ह नसते. दुसरी गोष्ट म्हणजे, विषाणूची लागण झाल्यावर त्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज तयार व्हायला 8-9 दिवस लागतात. म्हणून नेमक्या याच दिवसांत जर त्याची ही अँटिबॉडीज टेस्ट घेतली, तर ती निगेटिव्ह येते. त्याला ‘फॉल्स निगेटिव्ह’ असं म्हणतात. याचं कारण त्या व्यक्तीला खरं तर त्या विषाणूची लागण प्रत्यक्षात झालेली असते आणि तरीही ही टेस्ट निगेटिव्ह येते. 

पण मग ही टेस्ट करायची तरी कशाला? तर, याची अनेक कारणं आहेत. एक तर ही टेस्ट खूप स्वस्त आहे. म्हणजे पीसीआर टेस्टला 4500 रुपये पडतात, तर अँटिबॉडीज टेस्टला फक्त 800 रुपये लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे, या टेस्टचा उपयोग देशातले किंवा शहरातले हॉटस्पॉट्‌स शोधायला मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, मुंबईतली एखादी जागा (समजा- धारावी) किंवा पुण्यातली एखादी जागा (समजा-भवानी पेठ) इथे या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याची शंका जरी आपल्याला आली, तर त्या भागातल्या अक्षरशः शेकडो/हजारो लोकांच्या अँटिबॉडीज टेस्ट्‌स घेता येतील. त्यानंतर त्यात काही ‘फॉल्स निगेटिव्ह’ केसेसही येतील, पण टेस्ट केलेल्यांचा आकडा खूप मोठा असल्यामुळे त्या भागात खरंच तो विषाणू पसरला असेल, तर संख्याशास्त्राच्या नियमाप्रमाणे अनेक पॉझिटिव्ह केसेसही सापडतील. मग या पॉझिटिव्ह केसेस आणि इतरही ज्यांना सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास अशी लक्षणं दिसतात अशा लोकांची (जरी अँटिबॉडीज टेस्ट निगेटिव्ह आलेली असली तरीही) पीसीआर टेस्ट घेऊन विलगी-करण,क्वारन्टाईन आणि उपचार या गोष्टी त्यातल्या पीसीआर पॉझिटिव्ह रुग्णांवर करता येतात. जगात अनेक देशांत अशा आक्रमक तऱ्हेनंच कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं. अर्थात यात इतरही अनेक कारणं होती. पण या सगळ्यांमुळे त्यातल्या कित्येक देशांना तर पूर्णपणे लॉकडाऊन करण्याची गरजही भासली नाही. 

पण या टेस्टचे वर्तमानातले सोडूनही अनेक फायदे आहेत. एक म्हणजे भूतकाळाविषयी आणि भविष्यकाळाविषयीही. या टेस्टचा एक फायदा म्हणजे त्या व्यक्तीनं कोरोनाविरुद्ध यशस्वीपणे लढा देऊन त्यातून तो बाहेर पडला आहे का हे कळू शकतं. थोडक्यात, त्याचा भूतकाळ यामुळे कळतो. या अँटिबॉडीज शरीरात किती काळ टिकू शकतात याविषयी आज खात्रीलायकरीत्या जरी सांगता येत नसलं, तरी नजीकच्या काळात तरी त्या व्यक्तीला त्या विषाणूची लागण पुन्हा होण्याची शक्यता खूपच कमी असते, असं लक्षात आलं आहे. 

या टेस्टचा भविष्यातही उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर त्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज आढळल्या आणि ती व्यक्ती या रोगातून यशस्वीपणे लढा देऊन बाहेर आली असेल, तर तिला घरातून बाहेर फिरायला चक्क मोेकळीक दिली जाऊ शकते. याचं कारण, ती व्यक्ती जरी खोकली तरी कोणाला लागण देऊ शकत नाही, आणि त्या व्यक्तीलाही कोणापासून लागण होऊ शकत नाही. याचा फायदा अर्थव्यवस्था चालू करण्यासाठी होऊ शकतो का, याविषयी चर्चा सुरू आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कारखान्यात 1000 लोक काम करत असतील आणि त्यामध्ये 250 लोक असे यशस्वीपणे लढा देऊन त्यातून बाहेर पडले असतील, तर त्यांना परवानगी देऊन आपण 25% उत्पादन सुरू करू शकतो. खरं तर हे वाटतं तितकं सोपं नाही. याचं कारण त्यात खूप नियोजन करणं गरजेचं आहे. शिवाय यांच्यापैकी कोणी येता-जाता कुठल्याही वस्तूला स्पर्श केल्यामुळे त्याच्या हातावर विषाणू आला, तर त्याला स्वतःला लागण होणार नाही; हे जरी खरं असलं तरी त्याचा हात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला लागला, तर त्या व्यक्तीला मात्र लागण होऊ शकते. म्हणजे घरी आल्यावर साबणानं हात धुणं, प्रवासात उगाच कुठे जास्त हात न लावणं हे सगळं अशा ‘रोगमुक्त’ लोकांनाही पाळावंच लागेल. आणि इथेच खूप प्रश्न निर्माण होऊ शकतात. अर्थात, अजून या सगळ्याविषयी चर्चाच चालू आहे आणि अजून पक्का निष्कर्ष बाहेर आलेला नाही. तो आल्यानंतरच आपल्याला ठोस निर्णय घेता येतील. 

भारतामध्ये 20 एप्रिल 2020 पर्यंत कोरोनाग्रस्तांच्या 17615 केसेस आढळून आल्या आहेत. कोरोनामुळे 559 लोकांचा मृत्यू झाला असून यातले 211 रुग्ण महाराष्ट्रातले होते. तसंच कोरोनाबाधितांपैकी 2854 रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. भारतातल्या 737 जिल्हांपैकी 377 जिल्हे कोरानानं प्रभावित झालेले आहेत. महाराष्ट्रात 3651च्या पुढे कोविड-19 ग्रस्त रुग्ण आहेत.

जगाचा विचार केला, तर तारखेच्या आकडेवारीप्रमाणे 24 लाख 7 हजार 339 लोक कोरोनानं ग्रस्त असल्याचं आढळून आलं. त्यापैकी 1 लाख 65 हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे, तर 6 लाख 25 हजार लोक यातून बरेही झाले आहेत. जगात अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली आणि फ्रान्स अशा अनेक देशांत कोरोनानं मृत्यूचं तांडवच घातलं आहे. जगात कित्येक ठिकाणी तो अजून झपाट्यानं वाढतोय, तर काही ठिकाणी तो स्थिरावलाय. (फ्लॅटनिंग दी कर्व्ह) सिंगापूर, तैवान, आइसलँड, दक्षिण कोरिया, चीन आणि जर्मनी असे काही देश त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्याच्या मार्गावर आहेत. ते त्यांनी कसं मिळवलं, ते पाहायला पाहिजे. 

चीनच्या शेजारी असलेल्या तैवान या देशाची लोकसंख्या फक्त 2.5 कोटी असून तिथे 400 देखील कोरोनाग्रस्त नाहीत. त्यांनी लॉकडाऊन किेंवा व्यापक टेस्टिंगऐवजी चीनमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्क्रीनिंग सुरू केलं. तसंच त्या व्यक्तींना क्वारन्टाईन केलं गेलं. तैवाननं 6 फेब्रुवारीपासून चीनमधून येणारी विमानसेवाही बंद केली. अनेक वस्तूंची निर्यात बंद करून आपलं स्वतःचं उत्पादन सुरू केलं. नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांनी कुठल्या परिसरात जावं आणि कुठे जाऊ नये याच्या सूचना दिल्या. पुरेसे मास्क उपलब्ध करून दिले. एका दिवसांत एक कोटी मास्क आपण बनवू शकतो, असं तिथल्या राष्ट्रपतींनी जाहीर केलं. ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. तैवानच्या वेबसाईटवर विश्वास, पारदर्शी कारभार व तंत्रज्ञान यांचा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे आणि याच गोष्टींचा वापर करून कोरोनावर त्यांनी नियंत्रण मिळवलं आहे. 

दक्षिण कोरियानंदेखील लॉकडाऊन न करता कोरोनाग्रस्तांवर नियंत्रण मिळवलं. इतर देशांमधून त्यांच्याकडे जे पर्यटक आले, त्यांना आपल्या स्मार्ट फोनमध्ये एक ॲप टाकण्यासाठी सरकारनं भाग पाडलं. त्यांच्यात कुठली लक्षणं दिसताहेत, हे या ॲपमध्ये फीड केलं गेलं. तसंच या पर्यटकांचा प्रवास जिथे जिथे होतो आहे, त्यांचं लोकेशन हे ॲप दाखवत होतं आणि या ॲपद्वारे सरकारला कोरोनाग्रस्त बाधितांच्या हालचालींविषयी माहितीही सहजपणे कळली. सरकारनं लोकांना या ॲपद्वारे त्यांनी कुठल्या भागात जाऊ नये आणि कुठल्या भागात खबरदारी घ्यावी, याबाबतचे संकेत दिले. मास मेसेजेसचाही उपयोग कोरियानं या काळात केला. तसंच कोरियानं कोरोनाबाधितांची माहिती गुप्त ठेवली. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांच्याबद्दल न कळल्यामुळे लोकांनी कोरोनाबाधितांना वाळीत टाकणं व त्यांची उपेक्षा करणं, हे घडलं नाही.

कोरोनाग्रस्तांवर नियंत्रण मिळवण्यात आज जर्मनीलाही यश आलं आहे. या देशात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केलं गेलं. मुळातच आरोग्ययंत्रणा खूपच चांगली असल्यानं त्याचे परिणाम त्यांना चांगले मिळत राहिले. त्यामुळेच कोरोनाच्या बाबतीत इथला मृत्युदर खूप कमी आहे. जगातला दुसरा सुरक्षित (सेफेस्ट) देश म्हणून आज जर्मनीचा उल्लेख केला जातोय, हे विशेष! कोरोना रोखण्यात यशस्वी असलेल्या जगातल्या देशांची क्रमवारी बघितली तर इस्त्रायल, जर्मनी, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, चीन, न्यूूझिलंड, तैवान, सिंगापूर, जपान आणि नंतर हाँगकाँग अशी ती लावावी लागेल. जर्मनी खालोखाल डेन्मार्क, ऑस्ट्रिया, पोलंड व चेकोस्लोव्हाकिया या देशांनीही कोरोनाला रोखण्यात यश मिळवलं आहे आणि त्यांचं जनजीवन हळूहळू सुरळीत, देखील झालेलं आहे. डेन्मार्कनं तर लॉकडाऊन हटवून आता तिथल्या शाळा-कॉलेजेस सुरू झाली आहेत. 

इंग्लंडमध्ये मात्र कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाबत अमेरिका हा सगळ्यात वाईट देश म्हणावा लागेल. कारण इथे 20 एप्रिलपर्यंत 764265 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांच्या केसेस समोर आल्या असून त्यापैकी 40 हजारांहून लोक मृत्यू पावले आहेत. अजूनही तिथे केसेसचं प्रमाण वाढतंच आहे. इंग्लंड व अमेरिका यांनी स्पेन, फ्रान्स व इटली या देशांप्रमाणेच सुरुवातीला निष्काळजीपणा दाखवला आणि टेस्टिंग पाहिजे तेवढं केलं नाही. त्यामुळे या सगळ्या देशांमध्ये हाहाकार माजला, तिथे हजारो लोक मरण पावले. 

भारताच्या बाबतीत देशातली सगळ्यात पहिली कोरोनाची केस केरळमध्ये सापडली. एक 33 वर्षांचा तरुण दुबईहून केरळमध्ये परतला. त्याला विमानतळावरच थंडी वाजून हुडहुडी भरली होती. त्याला तिथूनच सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्याची कोरोनाची टेस्ट केली गेली. या तरुणाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याला त्याच्या गावी पोहोचवण्यात आलं, पण त्याला क्वारन्टाईन म्हणजेच एका झोपडीत सात दिवस वेगळं ठेवण्यात आलं. तो बरा होण्यात संपूर्ण गावानं खूपच चांगलं सहकार्य केलं. कोरोनाचा प्रसार रोखण्यात केरळनं जिल्हापातळीवर खूप परिणाम-कारकरीत्या काम केलं. केरळचा कोरोनाग्रस्तांचा आकडा गेले अनेक दिवस 300 ते 400 यामध्येच रोखला गेला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच आरोग्यसेवक व राजकीय नेते यांच्या टीम्स गावागावांत पोहोचल्या आणि त्यांनी कोरोनाबाबत जनजागृृती केली. केरळमध्ये आरोग्याबाबत कुठलंही संकट आलं तर तिथल्या आरोग्यसेवक/आरोग्यसेविकांना तीन दिवसांत प्रशिक्षित केलं जातं. कोरोनाच्या बाबतीतही केरळनं तेच केलं. एका आरोग्यसेवक /आरोग्यसेविकेकडे 1000 लोकांची, तिथल्या प्रत्येक नर्सवर 10000 लोकांची, तिथल्या हेल्थ इन्स्पेक्टरकडे 15000 लोकांची जबाबदारी सोपवली गेली. सुरुवातीपासूनच घराघरांतून जनजागृती, प्रशिक्षण, विलगीकरण आणि टेस्टिंग हे सगळं केल्यामुळे केरळनं अल्पावधीतच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळवलं. फक्त संकट आल्यावरच केरळमध्ये सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही, तर नेहमीच सार्वजनिक आरोग्य चांगलं कसं राहील,याबद्दल केरळ दक्ष राहिलेलं आहे! केरळमधला एक गमतीचा भाग म्हणजे- इथल्या पोलिसांनी कोरोनाची काळजी घेण्यासाठी हात कसे धुवावेत यावर चक्क एक नृत्य बसवलं असून, ते हे नृत्य करतच हात धुण्याचं प्रशिक्षण लोकांसमोर देतात. हे दृश्य बघायला खूपच विलक्षण वाटतंय.

राजस्थानमधल्या भिलवाडा इथे सुरुवातीला कोरोनाचा उद्रेक झाला; तेव्हा देशातलं सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्तांचं ठिकाण म्हणून भिलवाडा ओळखलं जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र भिलवाड्यातल्या प्रशासनानं खूप नियोजनपद्धतीनं परिस्थिती हाताळली. भिलवाड्यामध्ये सुरुवातीच्या काळात कोरोनाचे 21 रुग्ण आढळले. भिलवाडा प्रशासनानं अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः संचारबंदी त्वरित लागू केली. आरोग्य विभागानं शहरी विभागासाठी 332 आरोग्यसेवकांच्या टीम्स तयार केल्या. घरोघरी जाऊन त्यांनी 20 लाखांपेक्षा जास्त लोकांचं स्क्रीनिंग केलं. या गोष्टी काटेकोरपणे पाळल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात भिलवाडा प्रशासनाला यश मिळवता आलं. त्यामुळेच कोरोनाला रोखणारा देशातला पहिला जिल्हा म्हणून भिलवाड्याचं नाव घ्यावं लागेल. 

कोरोनाबाबत दक्षता बाळगणारं भारतातलं सिक्कीम खरं तर खूप छोटंसं राज्य आहे. कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी विदेशातले सगळे पर्यटक येणं ताबडतोब बंद केलं. तसंच भारतातल्या इतर राज्यांतून येणाऱ्या लोकांनाही प्रवेश बंद केला. परिणामी, आज सिक्कीममध्ये कोरोनाचा संसर्ग झालेली एकही व्यक्ती नाही. आज गोव्यामध्येही कोरोनाचा एकही रुग्ण नाहीये. हीच गोष्ट भारताच्या इतर राज्यांतही घडून आली असती, तर अधिक हॉटस्पॉट्‌स निर्माणच झाले नसते. (जपान, सिंगापूर, भिलवाडा या ठिकाणी थोडंफार शिथीलीकरण करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळ शिथीलीकरण जपून करणं आवश्यक आहे.) 

या विषाणूंचा खेळ केव्हा संपेल? याच्या तीन शक्यता आहेत. पहिली म्हणजे, यावर लस निघणं. खरं म्हणजे, एखादी लस निघायला कित्येकदा 10 किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षं लागू शकतात. पण कोरोनामुळे सगळी अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि सांस्कृतिक जीवन उद्‌ध्वस्त होण्याची शक्यता दिसत असल्यामुळे आज या लसीसाठी जगातले सगळ्यात बुद्धिमान असे हजारो संशोधक अहोरात्र काम करताहेत. अर्थात, या लसीला ‘मार्केट’ अवाढव्य असल्यामुळे अनेक औषधी कपंन्यांचा यावर मोठा ‘डोळा’ आहेच. आत्तापर्यंत 70 एक लसी तयार झाल्याची आणि त्यातल्या 3 ते 5 वर ट्रायल्स सुरू झाल्याची बातमी 16 एप्रिलच्या सीएनएन चॅनेलवर सांगण्यात आली. तरीही यशस्वीपणे लस निघणं, तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि वितरण होणं यासाठी 12-18 महिने लागतीलच, असं तज्ज्ञ म्हणताहेत. 

दुसरी शक्यता म्हणजे, यावर उपाय किंवा औषध निघणं. एखादं औषध घेतल्यामुळे या रोगाची तीव्रता कमी होऊन मृत्यूची शक्यता आणि प्रमाण हे मोठ्या प्रमाणात घटलं तरीही लोकांना खूप मोठा दिलासा मिळू शकतो. यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. फ्लू, मलेरिया, टीबी आणि एचआयव्ही या रोगांविरुद्ध जी औषधं आज दिली जातात ती किंवा त्यांचं मिश्रण कोरोनावर उपयोगी पडतंय की नाही, याविषयी बरीच चर्चा सुरू आहे, आणि प्रत्यक्ष रुग्णांवर त्यांचा वापर करणंही सुरू आहे. ही औषधं अजून सिद्ध झालेली नाहीत. पण कोरोनावर इतर कुठलीच औषधं नसल्यामुळे यांचा वापर अमेरिकेसकट सगळीकडे सुरू आहे. म्हणूनच अमेरिकेनं भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाची मागणी केली आणि ती पूर्ण केली नाही तर बदला घेण्याची धमकीही दिली. भारतानं ही औषधं निर्यात करण्याचा निर्णय लगेच घेतला. 

याशिवाय सध्या प्लाझ्मा थेरेपीचाही विचार सुरू झालाय. भारतानंही याला प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिलीय. अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्यानं कोरोनाशी यशस्वीपणे झुंज देऊन त्यावर मात केली आहे, त्याच्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये अँटिबॉडीज सापडतात. अशा माणसाला जर इतर कुठला विकार नसेल, तर बरं झाल्यानंतर ठरावीक दिवसांनी तो आपलं प्लाझ्मादान करू शकतो. हा प्लाझ्मा मग कोरोनाबाधित रुग्णाच्या शरीरात घातला, तर त्या अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातही तयार होऊन तो रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते, असा अनेकांचा दावा आहे. अर्थात, यावरही बराच वाद-चर्चा सुरू आहे. ‘हा उपाय करायला हरकत नाही, पण तो निर्विवादपणे सिद्ध झालेला नाही आणि मधुमेह किंवा कर्करोग झालेल्या रुग्णांना त्याचा फारसा फायदा होत नाही’ असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

तिसरी शक्यता म्हणजे, ‘हर्ड इम्युनिटी’. जेव्हा लागण झालेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटते, तेव्हा तो विषाणू लागण करण्यासाठी नवं गिऱ्हाईक शोधतच असतो. त्यामुळे इतरांना लागण होण्याचा दर सुरुवातीला खूप मोठा असतो. पण कल्पना करा की, बऱ्याच काळानंतर जेव्हा 75 ते 80% रुग्ण हे यशस्वीपणे लढा देऊन अँटिबॉडीज तयार झाल्यामुळे रोगमुक्त झाले असतील आणि अशा वेळी एखादा कोरोनाबाधित रुग्ण त्या गटात आला, तर त्याला नवं ‘गिऱ्हाईक’ शोधायला त्रास पडतो. म्हणजे नवं गिऱ्हाईक मिळण्याची शक्यता हळूहळू कमी-कमी होत जाते. अशा वेळी ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झाली आहे, असं म्हटलं जातं आणि लोकांच्या हालचालींवरची बंधनं शिथिल करता येतात. 

थोडक्यात, सारांश हा की, लस निघून यातून पूर्णपणे बाहेर पडायला 18 ते 24 महिने तर औषध/उपाय/हर्ड इम्युनिटी यासाठी कमीत कमी 6 ते 8 महिने लागतील. पण या सगळ्या काळात आपलं जग मात्र पूर्णपणे बदललेलं असेल आणि या सगळ्यांचा राजकारण, अर्थकारण, समाजकारण, संस्कृती, कला, क्रीडा, करमणूक, पर्यटन, शिक्षण व मानसिक आरोग्य अशा सगळ्या गोष्टींवर प्रचंड परिणाम होणार आहेत. हे जग आपल्याला ओळखूच येणार नाही. ते जग कसं असेल, ते पुढच्या भागात!

हेही वाचा : कोरोनाचं विश्व (उत्तरार्ध)

Tags: कोरोनाचं विश्व दीपा देशमुख अच्युत गोडबोले कोविड 19 कोरोना कोरोना विषाणू आणि जग corona virus and world deepa deshmukh achyut godbole weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अच्युत गोडबोले, दीपा देशमुख
achyutgodbole@gmail.com | ​​​​​​​adipaa@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके