डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पहिले युवा साहित्य-नाट्य संमेलन अध्यक्षीय भाषण

(पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषद व राष्ट्र सेवादल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या युवा साहित्य-नाट्य सेंलनात 24 डिसेंबर 2011 रोजी केलेले अध्यक्षीय भाषण.)

जवळपास एका शतकानंतरसुध्दा  डोस्टोव्हस्की,  हेमिंग्वे,  स्टाईनबेक  अशांसारखे अनेक लेखक जगामधले सर्वोत्तम लेखक मानले जाण्याचं कारणच  त्यांचं जीवनाला भिडणं हे होतं. स्पॅनिश  यादवी युद्धामध्ये हेमिंग्वे प्रत्यक्ष बंदूक घेऊन  लढला. 1930 सालच्या महामंदीचे  स्टाईनबेकनं अनुभवलेले चटके त्याच्या ‘ग्रेप्स ऑफ राथ’ या कादंबरीतून आपल्यालाही बसले. मृत्युदंडाची शिक्षा  झालेली असताना शेवटच्या क्षणी ती रध्द झाल्यामुळे डोस्टोव्हस्कीनं जवळपास  मृत्यूच बघितला होता. अशी अनेक  उदाहरणं पाश्चिमात्य, हिन्दी आणि मराठी साहित्यातलीसुध्दा सांगता येतील. त्यांचं  साहित्य कालबाह्य ठरलं नाही. कारण एक तर मुळात ते खूपच संवेदनशील आणि प्रतिभावान होते हे जितकं खरं तितकंच  त्यांनी जीवन खूप जवळून अनुभवलं तरी  होतं किंवा निदान वाचनानं किंवा  निरीक्षणानं त्याच्या कक्षा रुंदावल्या होत्या  हेही तितकंच खरं होतं.

नमस्कार,

मराठी साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी यांचा मला फोन आला आणि त्यांचं  बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. 23, 24, 25 डिसेंबर 2011 या  कालावधीत पार पडत असलेल्या पहिल्या ‘युवा साहित्य-नाट्य सेंलनाचं’ अध्यक्षपद मी स्वीकारावं असा तो फोन होता. खरंतर मराठी साहित्याच्या क्षेत्रात  मी स्वतःला फार मोठा लेखक मानत नाही. पण मराठी ही ज्ञानभाषा कशी बनवता  येईल यावर माझा सतत विचार चालू असतो. मी स्वतःला एक इंटिग्रेटर समजतो.  कुठलाही अवघड विषय घेऊन त्यावर भरपूर आणि विविध अंगांनी वाचन करून  तो मुळापासून प्रथम स्वतः शिकून मग तो सर्वांना समजेल अशा सोप्या,  रंजक  पद्धतीनं मांडायला मला खूप आवडतं. खरं म्हणजे मला त्यातून शिकायला मिळतं  आणि आनंद मिळतो आणि म्हणून मी हे सगळं करतो.

विज्ञानावरचं  ‘किमयागार’,  तंत्रज्ञानावरची ‘संगणकयुग’ आणि ‘नॅनोदय’,  व्यवस्थापनावरचं ‘बोर्डरूम’, संगीतावरचं ‘नादवेध’,  अर्थशास्त्रावरचं  ‘अर्थात’,  गुलामगिरीवरचं ‘गुलाम’  आणि माझं आगामी मानसशास्त्रावरचं पुस्तक ‘मनात’  अशा  पुस्तकांच्याद्वारे इंग्रजीत आत्तापर्यंत उपलब्ध असलेलं ज्ञान मराठीत आणण्याचा  मी माझ्याकडून एक छोटेखानी प्रयत्न केला इतकंच. पण या लौकिकार्थानं साहित्यकृती नाहीत याची मला पुरेपूर जाणीव आहे. याचं कारण साहित्यामध्ये  उत्स्फूर्तता,  सर्जनशीलता आणि नवनिर्मिती या गोष्टी असल्याच पाहिजेत असं  मला वाटतं. आणि म्हणून मी स्वतःला साहित्यकार मानत नाही.

पण आजच्या  युवकांची स्पंदनं ज्ञानशाखांवर विकसित झालेली असल्यामुळेच कदाचित, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राष्ट्र सेवादल यांच्या वतीनं आयोजित पहिल्या युवा साहित्य-नाट्य सेंलनाचं अधक्षपद मला मिळालं असावं असं मला वाटतं आणि तो मी माझा बहुमानच समजतो. आज युवांसाठी संपन्न होत असलेलं  साहित्य-नाट्य सेंलन आयोजित केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद आणि  राष्ट्र सेवादल यांचं अभिनंदन!

हे युवा साहित्य-नाट्य सेंलन आहे याला खूप महत्त्व आहे. याचं कारण  उद्याच्या जगाचं चित्र आजचा तरुणच रेखाटणार आहे. तरुणाईविषयी सुरेश भट  म्हणतात, आम्ही जिवंत राहू,  आम्हीच ते उद्याचे आकाश रंग पाहू  आणि भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर उद्याची भारताची आर्थिक  प्रगती तरुणांमुळेच शक्य होणार आहे. याचं कारण भारत हा जगात तरुणांची   संख्या सगळ्यांत जास्त असलेला देश आहे. भारतातले 24 कोटी  म्हणजे लोकसंख्येच्या 35 टक्के लोक 10-19 वयाच्या दरम्यानचे आहेत. 2020 साली भारताचं सरासरी आर्युान 29 असेल,   चीनचं 37 असेल तर तेच प्रमाण युरोप आणि जपानमध्ये 45  असेल. म्हणजे बाकीच्या जगाला तेव्हा वृद्धत्वाची समस्या  भेडसावत असेल.

2020 पर्यंत अमेरिकेला 1.7 कोटी,  चीनला 1 कोटी,  जपानला 90 लाख (काम करू शकणाऱ्या) तरुण लोकांचा  तुटवडा भासेल आणि त्याच वेळी भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात  सक्षम तरुणवर्ग असल्यामुळे त्याचा आपल्याला आर्थिक फायदा  होण्याची बरीच शक्यता आहे. याला ‘डेमोग्रॅफिक डिव्हिडंड’ असं  म्हटलं जातं.

साहित्य हा समाजाचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्यात  समाजाचं प्रतिबिंब असतं-निदान असलं तरी पाहिजे, असं म्हटलं  जातं. त्यामुळे साहित्याविषयी बोलण्यापूर्वी सध्या भारतातली  सामाजिक,  आर्थिक परिस्थिती कशी आहे हे समजावून घेण्याची  गरज आहे. भारतातल्या गरिबीविषयी मतभेद असले तरी  सर्वसाधारणपणे निम्मी जनता दारिद्र्यात राहते आणि एक चतुर्थांश  लोक तर जनावरांसारखंच जिणं जगतात याबद्दल कुणाचंच दुमतत  नसावं. पुरेसं स्वच्छ पाणी न मिळणाऱ्या जगातल्या सर्व माणसांपैकी एक तृतीयांश म्हणजे 65 कोटी लोक भारतात आहेत. अजूनही  भारतात निम्म्या लोकांना वीज आणि पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत  नाही. पाण्याच्या एका हंड्यासाठी लाखो स्त्रियांना कित्येक मैल  अंतर चालावं लागतं. 90 टक्के लोकांना शौचालयाची सुविधा  नाही. ‘ह्यून डेव्हलपमेंट इंडेक्स (एचडीआय)’ मध्ये 175  देशांधे आपला नंबर खालच्या 25-30 देशांध्ये लागतो.

अजून  भारतातली 50 टक्के मुलं कुपोषित आहेत. भारतातल्या 50 टक्के स्त्रियांना आणि 70 टक्के मुलांना ॲनिमिया आहे. जिथे शिक्षण आणि आरोग्य यांच्यावर राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रत्येकी 8 ते 10 टक्के पुढची अनेक वर्षं खर्च करण्याची गरज आहे तिथे आपण शिक्षणावर  फक्त 2.9 टक्के खर्च करत आलेलो आहोत आणि आरोग्यावर तर एक टक्क्याहून कमी! आपल्याकडे दर 50000 लोकांमागे एक  आरोग्यकेंद्र पाहिजे ते दर 2,30000 लोकांच्या मागे आहे. म्हणजे  गरजेच्या एकपंचमांश आहे. आपल्या नॉलेज इकॉनॉमीच्या आयटी  सुपरपॉवर असलेल्या देशामध्ये 2 टक्के लोकांकडे कम्प्यूटर आहे,  8  टक्के लोक इंटरनेट वापरतात,  20 टक्के लोक वर्तानपत्र वाचतात आणि 40-50 टक्के लोकांना सहीदेखील करता येत नाही!  शिक्षणव्यवस्था अशी आहे की,  आठवीतल्या बऱ्याच मुलांना  चौथीतली गणितंही सोडवता येत नाहीत.  

जागतिकीकरणामुळे भारताची काहीच प्रगती झाली नाही असं  मुळीच नाही. आर्थिक वाढीचा दर वाढला पण सामान माणसांच्या  गरजेसाठी लागणाऱ्या साध्या,  स्वस्त, टिकाऊ आणि प्रदूषणमुक्त  वस्तू तयार करण्याच्याऐवजी खूप ऊर्जा खाणारी,  प्रचंड  यांत्रिकीकरणामुळे बेकारी निर्माण करणारी आणि आरोग्याला आणि  पर्यावरणाला हानिकारक अशी अनेक शीतपेयं,  फास्टफूड,  सौंदर्यप्रसाधनं,  मोटारगाड्या, अनेक चैनीचा वस्तू आणि  युद्धसामग्री अशाच चंगळवादी किंवा युद्धखोर गोष्टींवरती जास्त खर्च व्हायला लागला यालाच आपण आर्थिक वाढ म्हणायला  लागलो. या तीन दशकांत सर्व जगभर गरीब-श्रीमंत दरी प्रचंड  वाढली. या सगळ्या उत्पादन प्रक्रियेत अर्थातच फक्त शिकलेल्या,  अगोदरच सुस्थितीत असलेल्या 20-30 टक्के लोकांचाच फायदा  झाला. त्यामुळे मध्यमवर्ग आणि विशेषकरून उच्च मध्यमवर्ग यांची  संख्या वाढली. त्या अर्थानं थोडीफार सुबत्ता घरंगळत खाली  आली. आणि याच वर्गातल्या लोकांचं सर्व माध्यमांध्ये वर्चस्व  असल्यामुळे माध्यमांधूनसुध्दा भारत कसा सुधारतोय,  गरिबी कशी दूर होतेय, भारत कसा महासत्ता बनण्याकडे वाटचाल करतोय अशा  तऱ्हेचंच चित्र बऱ्याच वेळेला सर्वांसमोर रंगवलं गेलं. पण या  नवउदारमतवादी अर्थव्यवस्थेनं सर्व गरिबी झटपट दूर होईल असं  एकेकाळी जे चित्र रंगवण्यात आलं होतं,  त्यात नक्कीच गफलत  झालेली आहे.

खरं तर जागतिकीकरण हवंच. पुन्हा आपल्याला स्वयंपूर्ण  खेड्याकडे जाणं अशक्यही आहे आणि ते अयोग्यसुद्धा आहे.  आंतरराष्ट्रीय व्यापारसुद्धा हवाच,  पण तो फक्त एका विशिष्ट  वर्गालाच फायदेशीर असणारा असू नये. थोडक्यात,  जागतिकीकरणाला मानवी चेहरा हवा. पण हा मानवी चेहरा कुठल्याही दानावर किंवा दयेवर अवलंबून न राहता हक्कांवर  आधारित राहिला पाहिजे,  हे आजच्या तरुणांनी लक्षात घेतलं  पाहिजे. उदाहरणार्थ,  प्रचंड गरीब-श्रीमंत दरी निर्माण करायची  आणि त्यानंतर मुद्दामहून कमी दाखवलेल्या दारिद्र्यरेषेखाली  असलेल्या लोकांना स्वस्त अन्न द्यायचं,  यापेक्षा सर्वांना रोजगार  कसा मिळेल हे सर्वप्रथम बघितलं पाहिजे.

भारतामध्ये अधिकृत  आकडेवारीनुसार दर दहांपैकी एक माणूस बेकार आहे. शिवाय एक तर लाज वाटते म्हणून किंवा नोंद करून फायदा होत नाही या  कारणांमुळे यापेक्षाही अनेक पटींनी जास्त लोक त्यांची नावं  एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नोंदवतच नाहीत. तसंच तितक्याच किंवा  जास्त लोकांना फक्त दिवसातला थोडाच वेळ काम मिळतं. म्हणजे  बेकार आणि अर्धबेकार मिळून भारतातली संख्या ही एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के पेक्षा अनेक पटींनी मोठी आहे. शेतीत तर  ती अचाटच आहे. फेरीवाले, वडापाव विकणारे,  निरोपे आणि  तत्सम स्वयंरोजगारित पण दारिद्र्यरेषेच्या काठावर राहणाऱ्या  लोकांची संख्यासुद्धा तितकीच मोठी आहे. या सगळ्यात कळीचा  मुद्दा रोजगाराचा आणि चांगल्या अर्थपूर्ण रोजगाराचा आहे. जर  समृध्दी समाजाच्या अगदी खालच्या थरापर्यंत खऱ्या अर्थानं  पोहोचायला हवी असेल (ट्रिकलडाऊन) तर संपूर्ण आणि अर्थपूर्ण  रोजगार हेच त्याला उत्तर आहे. कारण त्यामुळेच खऱ्या अर्थानं पैसा  सगळ्यांच्या हातात खेळू लागेल आणि कोणाच्या तरी दानावर  दिवस पुढे ढकलण्यापेक्षा स्वकष्टानं मिळवलेल्या पैशामुळे  लोकांचा आत्मसन्मानही वाढेल.

पण तिथेच खरा प्रश्न आहे.  आजच्या ‘जॉबलेस ग्रोथ’मध्ये ते होत नाहीये. जेव्हा आर्थिक  वाढीचा दर 7 टक्के होता तेव्हा रोजगारवाढीचा दर 1.3 टक्के होता!  म्हणजे जागतिकीकरण हवं,  पण त्याचं स्वरूप आणि रचना  बदलली पाहिजे. ‘जागतिकीकरण आता जणू देवानंच दिलंय,  आपण ते कसं बदलू शकणार?  आपल्याकडे ते स्वीकारून फक्त  आपल्यातच त्याला साजेसे बदल करायला हवेत म्हणण्याऐवजी रोजगार,  पर्यावरणरूप,  शिक्षण,  आरोग्य यांना प्राधान देणारी पर्यायी  विकासनीती शक्य आहे हे आता तरुणांनी ठामपणे मांडण्याची वेळ  आली आहे. नोबेल पारितोषिक विजेता जोसेफ स्टिग्लिड्‌झ यानं  त्याच्या ‘मेकिंग ग्लोबलायझेशन वर्क’  यात या सगळ्यांचं चांगलं  विवेचन केलंय.

थोडक्यात,  जागतिकीकरणाला खऱ्या अर्थानं  मानवी चेहरा दिल्यास आपला आर्थिक वाढीचा दर भले का 8  टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर येवो,  पण आपण पुढच्या 20-30 वर्षांत  एक सक्षम,  सुशिक्षित, सुदृढ आणि सकारात्मक असा भारत निर्माण करू आणि असं झालं तर महासत्ता होण्यापेक्षा ते जास्त ग्रेट असेल!  पण आजच्या नवउदारमतवादी अर्थव्यवस्थेत हे होणं अवघड आहे.  त्यामुळे आजच्या तरुणांनी अशा तऱ्हेचा समाज निर्माण  करण्याकरता हट्ट आणि आग्रह धरला पाहिजे आणि वेळ पडली तर  त्यासाठी चळवळीही केल्या पाहिजेत. आत्तापर्यंतच्या जगातल्या  सगळ्या मोठ्या परिवर्तनांध्ये साहित्यिकांचा खूप मोठा सहभाग  होता. मग ती फ्रेंच राज्यक्रांती असो किंवा रशियन राज्यक्रांती असो वा भारताचा स्वातंत्र्यलढा असो. आजूबाजूच्या या भीषण  परिस्थितीवर साहित्य निर्माण करण्याची कोणी सक्ती जरी केली  नाही तरी अशा परिस्थितीत कुठलाही संवेदनशील साहित्यिक  ‘माझा या परिस्थितीशी काय संबंध?  मी बरा आणि माझं लिखाण  बरं’  असं म्हणूच शकणार नाही हेही तितकंच खरं! म्हणजे कुठल्याही  संवेदनशील साहित्यिकाच्या लिखाणात आपोआपच या  परिस्थितीचं प्रतिबिंब डोकावेल आणि तसं ते डोकावायला हवं.  

गेल्या 20 वर्षांत नुसतीच गरीब-श्रीमंत दरी आणि बेकारी  वाढली असं नाही,  तर खूप मोठ्या प्रमाणावर खोटी कारणं देऊन  लादलेली युद्धं वाढली. हिंसाचार आणि उद्‌ध्वस्तता वाढली.  दहशतवादानं, जगाला घट्ट विळखा घातला आणि खाजगीकरण  जोरात वाढल्यानं आता भ्रष्टाचार कमी होईल असं वाटलं होतं,  पण तो प्रचंडच वाढला आणि जगभर वाढला. याचबरोबर सर्व जगाची  सांस्कृतिक घसरण खूपच झाली. ही परिस्थिती एवढी भयानक आहे  की सगळे चॅनेल्स सासू-सून यांच्या मालिका, कुठल्यातरी बाबांची  प्रवचनं,  गुदगुल्या केल्याशिवाय हसू येणंच शक्य नाही अशा  विनोदाच्या स्पर्धा,  गाण्याच्या भेंड्या,  मोटारींच्या शर्यती,  उच्चवर्गीय संस्कृतीचं प्रदर्शन करणारे ‘बिग बॉस’ सारखे रिॲलिटी  शोज, वहिनींच्या फुगड्या,  अत्यंत हिडीस कपडे घालून केलेल्या  नाचाच्या स्पर्धा,  राशीभविष्य आणि कुठल्यातरी कालपरवाच आलेल्या अभिनेत्यांच्या मुलाखती अशा तऱ्हेच्या गोष्टी  दाखवण्यात गुंग होत्या आणि आहेत ही खरी शरमेची गोष्ट आहे.  संस्कृतीचं एवढं थिल्लरीकरण,  अधोगती आणि दिवाळखोरी  कधीच बघायला मिळाली नव्हती!

या चॅनेल्सवरती शैक्षणिक आणि  कुठलेही गंभीर चर्चेचे प्रश्न तर सोडाच पण कुठलेही शास्त्रज्ञ, गणिततज्ज्ञ,  शास्त्रीय गायक-वादक,  चित्रकार,  शिल्पकार,  कवी, लेखक, नर्तक-नर्तिका यांचे इंटरव्ह्यूज जितक्या वेळा येतात त्याच्या  शंभरपटीनं इंटरव्ह्यूज हे कुठल्यातरी सीरियलमध्ये काम करणाऱ्या नटनट्यांचे येतात आणि तेच आपल्या आयुष्यातले आदर्श होऊन  बसतात. कुठल्याही सीरियलमध्ये जवळपास एकही खरं वाटावं  असं खेड्यातलं दृश्य नसतं किंवा कारखान्यातले कामगार दाखवले जात नाहीत. एवढंच काय साध्या मध्यमवर्गाचंही चित्रण नसतं.  फक्त सगळी श्रीमंत मंडळी प्रचंड भरजरी कपड्यांधे एकत्र जमून  कुठल्यातरी ‘परिवाराविषयी’  बोलत असतात. इतर काहीच  बघायला मिळत नाही म्हणून,  कित्येक मध्यमवर्गीय लोक तेच बघत  बसतात आणि वाईट भाग हा की त्याचं कित्येकदा अनुकरणही करत  बसतात.

दूरदर्शनवर ‘डिस्कव्हरी’  किंवा ‘नॅशनल जिओग्रॅफिक’ असे चॅनेल्स सोडले तर विज्ञानासाठी एकही चॅनेल नसतो.  ‘किमयागार’  या माझ्या पुस्तकामधली काही वाक्यं उद्‌धृत केल्याशिवाय मला राहवत नाही... गेल्या 20 वर्षांत विज्ञान आणि  तंत्रज्ञानाच्या प्रगतीपेक्षाही धर्मांधपणा आणि अंधश्रद्धा यांची वाढ जास्त मोठी झाली. एकीकडे इंजिनियर व्हायचं,  आधुनिक विज्ञान शिकायचं आणि प्रमोशन मिळवण्यासाठी शिर्डीला जायचं. सगळी  संतमंडळी सांगून थकली की फक्त माणुसकी ही महत्त्वाची. पण आपण सगळी सुशिक्षित मंडळी दर वर्षी कोट्यवधी रुपये आणि  अब्जावधी दिवस मूर्तिपूजा करण्यात,  देवळं बांधण्यात आणि त्या  देवळांच्या नावाखाली प्रेाऐवजी द्वेष, राजकारण आणि हिंसा  पसरवण्यात;  देव ही खाजगी, वैयक्तिक श्रद्धेची बाब न मानता ती  रस्त्यावर आणून दंगली पसरवण्यात;  देवाला पेढे,  पैसा वगैरेंची लाच देण्यात; काळा पैसा पचावा म्हणून देवाची स्तुती करण्यात,  त्याच देवाला समुद्रात बुडवून प्रदूषण वाढवण्यात आणि सगळ्यांना  अंधश्रद्धेच्या काळ्या सागरात बुडवून टाकण्यात खर्च करत असतो.  

इथे पैसे देऊन देवदर्शनही ‘फास्ट ट्रॅक’मधे मिळतं! शिकलेले,  सवरलेले लोक बाबांच्या,  साधूंच्या नादी लागतात (हे साधू- बाबा-गुरू मात्र विज्ञान-तंत्रज्ञानावर चालणाऱ्या टेलिव्हिजन,  मायक्रोफोन,  मोटारकार,  विमान वगैरेंचा भरपूर वापर करत हे ‘मटेरियल जग’ आपल्याला मात्र नाकारायला शिकवतात! आपल्याला मग गणपती दूध प्याल्याचे भास होतात. मग  प्रयोगशाळेतल्या उपकरणांची दसऱ्याला पूजा होते,  कम्प्युटरसमोर  नारळ फोडण्यात येतात,  मुहूर्त बघून शास्त्रज्ञ प्रयोग चालू करतात, विज्ञानाच्या पेपरच्या अगोदर विद्यार्थी  देवळात जाऊन येतात,  विज्ञानसंशोधन  केंद्रांध्ये सत्यनारायणाच्या पूजा होतात, शिकलेले लोकही वास्तू आणि फेंगशुर्इंच्या  मागे लागतात. अनेक इंजिनियर्स,  डॉक्टर्स,  शास्त्रज्ञ साईबाबा किंवा तत्सम कुणा गुरूंच्या  मागे लागतात!

ॲस्ट्रॉनॉमीपेक्षा  ॲस्ट्रॉलॉजीवर जास्त लोक विेशास ठेवतात.  सगळं ‘नॉर्मल’ असतानाही ज्योतिषाप्रमाणे  जन्माची वेळ येणासाठी लोक मग सीझेरियन  ऑपरेशन करून घेतात (त्यातही मुलगी होणार असेल तर गर्भपात कित्येकदा  अगोदरच केलेला असतो!),  राजकारणी  निवडणुकांचा फ़ॉर्म भरताना आणि  चित्रपटनिर्माते चित्रपट सुरू करण्याअगोदर  न्यूरॉलॉजीचा आदेश पाळतात आणि हेच  आपले आजचे आदर्श असल्यानं मग इतरांचं काय विचारता?  कुणाची विश्व निर्माण करणाऱ्या एखाद्या शक्तीवर वैयक्तिक श्रद्धा  असली तर ती एक खाजगी बाब असते. त्याला कुणाचाच आक्षेप  नसावा. पण अध्यात्माचा हा हिडीस सार्वजनिक बाजार आपल्या  आयुष्याचा एक मोठा,  अविभाज्य भाग बनलाय ही मात्र एक  भयानक गोष्ट आहे!

तर आपण आज अशा जगात राहतो आहोत. आता कोणी  म्हणेल की,  या सगळ्याचा साहित्याशी काय संबंध?  आणि इथेच खरी गोम आहे. मला असं वाटतं की याचा साहित्याशी खूप घनिष्ट संबंध आहे. कारण साहित्य हे शेवटी समाजाचं प्रतिबिंब असतं,  निदान असायला तरी हवं. ‘कलेसाठी कला की समाजासाठी कला’ या संदर्भात पूर्वी एक वाद खदखदत होता. ‘कलेसाठी कला’ असं  म्हणणारे ना. सी. फडके आणि ‘समाजासाठी कला’ असं म्हणणारे  वि. स. खांडेकर यांच्यात यावरूनच तर खडाजंगी झाली होती. मला  स्वतःला मात्र कुठल्याही कलेची निर्मिती कुठलीतरी विचारसरणी  समोर ठेवून बळजबरीनं होऊ शकते असं वाटत नाही आणि तशी ती  झालीच तर ती उत्कृष्ट कला असण्याची शक्यता फारच कमी असेल  असं वाटतं. अशा तऱ्हेचं लिखाण हे उत्कृष्ट प्रचारसाहित्य होऊ  शकतं,  पण सर्वोत्तम साहित्यकृती नव्हे. तांत्रिक गोष्टी मुद्दामहून  कष्ट करून कुठल्यातरी उद्देशानं बनवता येतात. पण कलेची निर्मिती मात्र झपाटल्यासारखी,  निर्हेतुक,  सर्जनशीलतेतूनच होत असते  आणि ती तशीच व्हायला हवी. कलाकाराच्या आत्मानंदासाठीच  उत्स्फूर्तपणेच चांगल्या दर्जाची कला निर्माण होऊ शकते,  यावर  माझा दृढ विश्वास आहे.

कम्युनिस्ट राज्यांमध्ये कला ही फक्त  कम्युनिस्ट राजवटीचा प्रचार करण्याकरता असावी असा हट्ट मार्क्स  आणि लेनिन यांनी जरी धरला नसला तरी नंतरच्या कम्युनिस्ट राजवटींमधे तो अट्टाहास सतत दिसून आला. मॅक्झिम गॉर्कीसारख्या  प्रसिद्ध लेखकालासुध्दा बंधनात राहूनच लिखाण करावं लागलं.  डॉ. झिवॅगो ही सुप्रसिद्ध कादंबरी लिहिणाऱ्या पास्तरनॅक या रशियन  लेखकाला,  मिळालेलं नोबेल पारितोषिक राज्यकर्त्यांच्या  दडपणामुळे नाकारावं लागलं तर सोल्झेनित्सिन या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाला रशियातल्या छळछावण्यांबद्दल  लिहून ते जगासमोर आणल्याबद्दल 1974 मध्ये रशियातून हद्दपार  व्हावं लागलं ‘कलेसाठी कला’ हे खरं असलं आणि कुठलंही साहित्य हे  बळजबरीनं कुठल्यातरी विचारसरणीसाठी निर्माण करता येत नसलं  तरी एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, कुठलाही लेखक पोकळीत तरंगत नसतो. त्याच्या जाणिवा,  त्याचे  अनुभव आणि त्याचं वाचन या गोष्टी त्याच्या आजूबाजूचा समाज,  तो स्वतः कुठल्या वर्गातून येतो,  त्याच्यावर होणारे संस्कार अशा  सगळ्यांवर ठरतं.

एकूण साहित्याचं किंवा कोणत्याही कलेचं  नियमाबरहुकूम उत्पादन करून घेता येत नाही. पण हे खरं असलं तरी  लेखक किंवा कुठलाही कलाकार यांचा पहिला संबंध जीवनाशी,  त्यातल्या विविध समस्यांशी,  त्यातल्या संघर्षांशी आणि अनेकविध  अनुभवांशी असतो. माणसाच्या जीवनातल्या सत्त्व,  सौंदर्य,  संघर्ष  या सर्व गोष्टी समृद्ध आणि चांगल्या साहित्यातून मांडल्या जातात  आणि यामुळे जरी कुठलंही लेखन प्रचारात्मक दृष्टीतून केलेलं नसलं  तरीही त्या लेखकाचे अनुभव आणि त्याचा एकूणच जागतिक दृष्टिकोन त्याच्या लेखनाला आकार देत असतात.  मला असं वाटतं की सर्व कलांध्ये साहित्य एका बाबतीत  सर्वश्रेष्ठ आहे. याचं कारण आपल्याला साहित्य एकाच वेळेला इतिहास आणि भूगोल या दोन्हीमधे खोलवर डुबकी मारू देतं.

पूर्वीच्या काळी माणूस कसा राहत होता,  त्याची सुखदुःखं काय  होती हे त्या त्या वेळेच्या साहित्यावरून आपल्याला समजतं. हे  झालं इतिहासाचं डायमेन्शन. तसंच एकाच वेळी भारतातल्या किंवा अमेरिकेतल्या किंवा ब्राझीलमधल्या किंवा जर्मनीतल्या माणसांच्या  आयुष्याची चित्रणंसुद्धा आपल्याला त्या त्या ठिकाणच्या  साहित्यातून बघायला मिळतात. हे झालं भूगोलाचं डायमेन्शन. या अर्थानं साहित्यामुळेच आपल्याला एका तऱ्हेनं सर्व जगातल्या विविध भौगोलिक भागांत रहाणाऱ्या अनेकांची प्राचीन काळापासून  ते आत्तापर्यंतची आयुष्यं जगण्याचाच आनंद मिळतो. हा एवढा  इतिहास आणि भूगोल यांना ओलांडणारा विस्तृत अनुभव आणि  आनंद दुसरी कुठलीच कला देऊ शकत नाही. यामुळेच काही तत्त्वज्ञ साहित्याला सर्वोच्च कला मानतात.

चांगल्या साहित्यासाठी समाजातल्या अनेक थरांधल्या  जीवनाविषयी जवळून माहिती पाहिजे आणि त्याच्याशी भिडलं  पाहिजे. नाही तर ते साहित्य म्हणून खूपच मर्यादित राहील. आणि  इथेच एक मला मोठा प्रश्न पडतो. तो म्हणजे,  साहित्य जरी  बळजबरीनं एखाद्या विचारसरणीसाठी तयार होत नसेल तरी आजूबाजूचं 50-60 टक्के लोकांचं भयाण वास्तव हे कित्येक  साहित्यिकांना दिसत कसं नाही?  म्हणजे सक्ती नसली तरी  आपणहूनच आपल्याकडलं 60 टक्के साहित्य हे 60 टक्के जनतेच्या  सुख-दुःखाशी भिडणारं आणि उरलेलं 40 टक्के साहित्य हे वरच्या 40 टक्के लोकांच्या  सुख-दुःखांशी भिडणारं असं खरं तर पाहिजे.  पण होतंय उलटंच. काही अपवाद सोडल्यास बहुतांशी सगळं  साहित्य हे मध्यमवर्गानं मध्यमवर्गासाठीच लिहिलेलं असतं.  जगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जगातल्या सर्वांत खालच्या थरातल्या 70 टक्के लोकांच्या जीवनातल्या संघर्षाविषयीच्या  पुस्तकांची संख्या जेते 2 टक्के आहे आणि उरलेल्या 30 टक्के  मध्यम आणि श्रीमंत वर्गासाठी मात्र 98 टक्के पुस्तकं लिहिली  जातात. याचमुळे ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी या साहित्याला  ‘साडेतीन टक्क्यांचं साहित्य’  म्हटलं होतं.

असं होण्याची अनेक कारणं आहेत. मुख्यत्वे प्रकाशन व्यवस्थेतलं  अर्थकारणच असं आहे की, लोकांच्या मागणीप्रमाणे त्यांना पुस्तकं  छापावी लागतात. आजकाल सुशिक्षित मध्यम वर्गाध्ये लोकांना खाद्यपदार्थ,  स्वयंपाक,  प्रवासवर्णनं,  गुंतवणुकीचे मार्ग,  यशस्वी होण्याचे मार्ग,  व्यक्तिमत्त्व विकास, करिअर,  अध्यात्म अशा सगळ्या गोष्टींमध्ये रस असल्यामुळे किंवा माध्यमांनी तो रस आणखीनच जास्त निर्माण केल्यामुळे अशीच पुस्तकं जास्त खपतात आणि म्हणून  त्यांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे प्रकाशित  पुस्तकात कथा,  कविता आणि कादंबरी यांचं प्रमाण खूपच घटत  चाललंय. कवितांची पुस्तकं काढायला तर फारसं कोणी धजावतच  नाही. अशा परिस्थितीत खेड्यापाड्यांतून आलेल्या अनोळखी  साहित्यिकांकडे कोण बघणार?  कित्येक प्रकाशकांकडे नवीन पुस्तक  छापायचं की नाही हे ठरवण्यासाठी त्याचं पहिलं वाचन करायचं म्हटलं  तरी कित्येक वर्ष लोटतात. त्यामुळे अशा लेखकांना चांगल्या  प्रकाशकांकडून पुस्तक प्रकाशित करणं जवळपास अशक्यप्राय होऊन  बसतं.

दुसरा प्रकाशनाचा मार्ग म्हणजे इंटरनेटचा. पण जिथे कम्प्युटरच  वापरणाऱ्यांची संख्या भारतामध्ये 2 टक्के आहे,  इंटरनेट वापरणाऱ्यांची  संख्या 8 टक्के आहे आणि अर्थातच हे सगळे लोक बहुतांशी मध्यम  किंवा उच्च वर्गातले आहेत,  तर अशा परिस्थितीत इंटरनेटवरून  साहित्य प्रकाशित करणं आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवणं हे निदान आजमितीला तरी बहुतांशी तळागाळातल्या लेखकांना शक्य नाही. म्हणून अशा दुर्लक्षित राहिलेल्या पण प्रतिभावंत साहित्यिकांना शोधून  काढणं,  त्यांना व्यासपीठ निर्माण करून देणं आणि प्रोत्साहन देणं याची  आज नितांत गरज आहे. नाही तर लाखो शेक्सपिअर,  केशवसुत किंवा  मर्ढेकर आयुष्यभर कुठेतरी गुरं हाकत किंवा कपबशा विसळत  बसतील! हे काम युवा साहित्य-नाट्य सेंलन करत राहील अशी मी  आशा बाळगतो आणि म्हणूनच असं युवा साहित्य-नाट्य सेंलन भरवल्याबद्दल आयोजकांचं पुनश्च अभिनंदन!  

मात्र चांगलं साहित्य निर्माण करण्याकरता जीवनाला भिडलं  पाहिजे आणि त्यातल्या सर्व थरांतल्या लोकांच्या सुख-दुःखाचा  प्रत्यक्ष अनुभव साहित्यिकाने घेतला पाहिजे किंवा निदान  त्याविषयीचं वाचन आणि खोलवर निरीक्षण तरी केलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी जे करत नाहीत त्यांचं साहित्य अर्थातच मर्यादित राहतं  आणि काहीच काळात कालबाह्य होतं. जवळपास एका  शतकानंतरसुद्धा डोस्टोव्हस्की, हेमिंग्वे,  स्टाईनबेक अशांसारखे  अनेक लेखक जगामधले सर्वोत्तम लेखक मानले जाण्याचं कारणच  त्यांचं जीवनाला भिडणं हे होतं. स्पॅनिश यादवी युध्दामध्ये हेमिंग्वे  प्रत्यक्ष बंदूक घेऊन लढला. 1930 सालच्या महामंदीचे  स्टाईनबेकनं अनुभवलेले चटके त्याच्या ‘ग्रेप्स ऑफ राथ’ या कादंबरीतून आपल्यालाही बसले. मृत्युदंडाची शिक्षा झालेली  असताना शेवटच्या क्षणी ती रध्द झाल्यामुळे डोस्टोव्हस्कीनं जवळपास मृत्यूच बघितला होता. अशी अनेक उदाहरणं  पाश्चिमात्य,  हिन्दी आणि मराठी साहित्यातलीसुद्धा सांगता येतील. त्यांचं साहित्य कालबाह्य ठरलं नाही. कारण एक तर मुळात ते खूपच  संवेदनशील आणि प्रतिभावान होते हे जितकं खरं तितकंच त्यांनी  जीवन खूप जवळून अनुभवलं तरी होतं किंवा निदान वाचनानं किंवा  निरीक्षणानं त्याच्या कक्षा रुंदावल्या होत्या हेही तितकंच खरं होतं.

या दोन तऱ्हांनी आपल्या जाणिवांच्या कक्षा रुंदावण्याबाबत एक  ऐकलेली गोष्ट मला आठवते. एकदा कोणीतरी ना. सी. फडके यांना  ‘तुम्ही फक्त प्रेावरच लिहिता, अण्णाभाऊ साठे बघा,  कामगारांच्या वेगवेगळ्या अनुभवविश्वाबद्दल लिहितात’  असं म्हटलं. त्या वेळी फडक्यांनासुद्धा कामगार विश्वाविषयी अनुभव  घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी लगेच डांग्यांना गाठून आपली  इच्छा सांगितली. त्याच सुमारास कामगारांचा एक मोर्चा  मंत्रालयावर जाऊन थडकणार होता. डांग्यांनी लगेच फडक्यांना  त्याचा अनुभव घेऊन त्यावर लिहायला सांगितलं. फडक्यांनी लगेच  टॅक्सी बुक करून मोर्चा चालू असताना टॅक्सीतून जोषात चाललेला  तो मोर्चा न्याहाळणं सुरू केलं. ते त्या वेळी मनातल्या मनात त्या मोर्चाविषयीची टिपणं काढत होते. तो मोर्चा बघत असताना  अचानक त्यांची नजर एका ट्रककडे गेली. त्या ट्रकच्या बॉनेटवर  अण्णाभाऊ साठे देहभान विसरून जोरजोरात घोषणा देत होते,  तल्लीन होऊन पोवाडे म्हणत होते. थोडक्यात,  मोर्चा तोच,  वास्तव  तेच पण त्याकडे बघण्याचा आणि ते अनुभवण्याच्या दोन वेगळ्या तऱ्हा होत्या. पद्धती वेगवेगळ्या असल्या तरीही निदान दोघांनी  कामगारमोर्चाचा अनुभव तरी घेतला होता.  

केशवसुत,  मर्ढेकर,  करंदीकर,  कुसुाग्रज,  सुर्वे अशा कवींच्या  कवितांची नाळ समाजातला वास्तवाशी जोडलेली होती.  केशवसुतांची लहानपणी शिकलेली ‘नवा शिपाई’ ही कविता  आजही तरुणांसाठी लागू आहे.  ब्राह्मण नाही,  हिंदुहि नाही,  न मी एक पंथाचा  तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सूख  कूपातील मी नच मंडूक,  मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे  नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे  धर्मनिरपेक्षता,  ‘थिंकिंग बिग’  आणि मानवतावाद यांचं यापेक्षा  सुंदर उदाहरण कुठलं असेल?  ‘पिपात मेले ओल्या उंदीर’  असं काव्य लिहिणारे आणि युध्दावर कठोर टीका करणारे मर्ढेकरही वास्तवाला आणि जीवनाला भिडले होते. म्हणूनच त्यांचं काव्य  अजरामर झालं. चंगळवादाच्या अती आहारी जाऊन संवेदनशील  माणसाला स्वतःच्या रूपाबद्दलच संभ्र पडावा अशी आज स्थिती  आहे असं व्यक्त करताना विंदा करंदीकर म्हणतात... देशी विदेशी वस्तूंनी भरली घराची दालने  मजलाच ना जागा उरे,  हे सोंग माझे कोठले नारायण सुर्वे भाकरीत आपला चंद्र शोधताना म्हणतात,  भरल्या पोटी अगा जर पाहतो चंद्र,  आम्हीही कोणाची याद केली असती  अशी मराठी साहित्यात अनेक उदाहरणं आहेत.

दलित साहित्याला सुरुवातीला अतिशय खडतर मार्गानं जावं  लागलं. ‘हे साहित्यच नाही’ अशी त्याची उपेक्षा केली गेली.  आपल्यातल्या मध्यमवर्गीय वृत्तीची गंत बघा, जेव्हा दया पवारांचं  ‘बलुतं’ आलं तेव्हाही सुरुवातीला अनेकांनी ते वाचून नाकं मुरडली  होती. पण त्यानंतर एक गत घडली. पु. ल. देशपांडे यांनी ‘बलुतं’ वाचलं आणि त्याने ते भारावून गेले. त्यांनी ‘बलुतं’ला ‘दुःखानं  गदगदलेलं झाड’ असं म्हटलं. ते असंही म्हणाले,  ‘आम्ही दूरदूरची  दुःखं पाहिली,  पण माझ्या हाकेच्या अंतरावर जे एक जग आहे ते मी बघितलंच नव्हतं. मला या जगाचा पत्ताच नव्हता. ‘बलुतं’नं मला हे जग दाखवलं.’  पु. ल. देशपांडेंच्या या भावस्पर्शी प्रतिक्रियेनंतर  मध्यमवर्गानं ‘बलुतं’  उचलून धरलं आणि आठवड्याभरातच ‘बलुतं’च्या 1000 प्रती विकल्या गेल्या!  

नंतरच्या पिढीतले त्यांचे वारसदार म्हणून लक्ष्मण माने,  दया पवार,  नामदेव ढसाळ,  अरुण कांबळे,  अरुण कोलटकर,  दिलीप चित्रे,  प्रकाश संत,  वसंत आबाजी डहाके, भालचंद्र नेमाडे,  सतीश काळसेकर,  विश्वास पाटील,  उत्तम कांबळे अशा अनेकांनी आपली  जबाबदारी समर्थपणे पेलली.  त्यानंतरही आलेली पिढी म्हणजे रंगनाथ पठारे, राजन गवस,  राजन खान,  मिलिंद बोकील,  सदानंद देशमुख,  जयंत पवार- यांनी  आपल्या लिखाणातून वाचकांना सतत सजग केलं.

शफाअत  खानचं ‘शोभायात्रा’ असो वा संजय पवारचं ‘कोण म्हणतं टक्का  दिला’ असो,  या नाट्य-साहित्यातून वाचक अंतर्मुख झाला.  ‘बेरड’सारखं साहित्य भीमराव गस्तीसारख्या कार्यकर्त्यांच्या  अनुभवातून जन्मलं.  लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून कमल देसाई,  गौरी देशपांडे,  अरुणा ढेरे,  सानिया,  नीरजा,  प्रज्ञा दया पवार,  उर्मिला पवार,  मेघना पेठे,  कविता महाजन आणि यशोधरा गायकवाडपर्यंतच्या  लेखिकांनी चौकटीच्या बाहेर जाऊन एक स्वतंत्र वाट शोधली आणि  साहित्यात एक नवा पायंडा पाडला. गिरीश जोशी, प्रशांत दळवी,  मनस्विनी लता रविंद्र हे नव्या दमाचे नाटककार समाजाचं वास्तव  दाखवत दोन पावलं पुढे नेण्याचं काम करत आहेत.  अनेक तरुण साहित्यिक आपले पाय आज साहित्याच्या भूमीत रोवू  पाहताहेत.

कोकणातल्या सावंतवाडीचा ‘चाळेगत’  कादंबरीचा  लेखक प्रवीण दशरथ बांदेकर याची लेखणी सशक्तपणे कोकणचं  वास्तववादी दर्शन या कादंबरीतून करते आहे. बालाजी मदन इंगळे या  तरुणानं ‘झिम पोरी झिम’  या कादंबरीतून ग्रामीण भागातल्या स्त्रीचं  चित्र चितारलं आहे. तसंच नांदेडच्या मनोज बोरगावकर याचा ‘कोरा  कागद निळी शाई’  नावाचा उत्कृष्ट काव्यसंग्रह आहे.  मराठवाड्यातला परभणीचा केशव खटिंग,  संतोष नारायणकर,  मुखेडचा दीपक अंगेवार,  जालन्याचा विजय आव्हाड, अकोल्याचा किशोर बळी,  औरंगाबादचा अभय दाणी,  प्रणव प्रियांका प्रकाश,  उत्पल चंदावार हेही नव्या दमाचे कवी आणि गझलकार आहेत.  याशिवाय कोकणातले अनिल धाकू कांबळी,  अजय कांडर आणि  वीरधवल परब, विदर्भातले इसादास भडके,  लोकनाथ यशवंत आणि  अशोक पवार,  पश्चिम महाराष्ट्रातले धम्मपाल रत्नाकर आणि रफिक सूरज,  मराठवाड्यातला एकनाथ आव्हाड  अशांसारख्या अनेकांनी  उत्तमोत्तम लेखन करून नवे रस्ते शोधले आहेत.

विद्यापीठाचं तोंडही न बघितलेले यांतले काही तरुण आहेत.  यांतले काही पोस्टर्स रंगवताहेत तर काहीजण शेतावर राबताहेत.  त्यांच्या कष्टमय जगण्यातही त्यांच्यातला आशावाद अजून जिवंत आहे. म्हणूनच मुखेडचा दीपक अंगेवार म्हणतो,  लाख दुःखे भोवताली,  दुःख आपुले मग बघू येऊ दे हृदयात त्यांना,  कोण कुठले मग बघू केशवसुतांच्या उन्नत,  उदात्त विचारांचं तण अजूनही या मातीत जिवंत आहे हेच यावरून दिसतं.  सगळेच फोनवर बोलतायत,  सगळीच गर्दी एकटी आहे अशी  खंत व्यक्त करणाऱ्या औरंगाबादच्या वैभव देशमुख याला हे शहर  कसं अस्वस्थ करत ते पहा... प्रे करणाऱ्या पण लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीसारखं हे शहर... सारं दिलं पण रुजू दिली नाहीत घराची मुळं या जमिनीत  एकदा ठेच लागली अचानक,  तर गावाच्या मातीचा वास आला रक्तातून  वाटलं धावत सुटावं सुसाट सारे सिग्नल तोडत गावाच्या रस्त्यानं  पण कुठं घराच्या मुळाची जागाच हरवली गावातून  आणि इथे रुजण्याच्या प्रयत्नात तर मूळच हरवत चाललंय घर  प्रे करणाऱ्या पण लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीसारखं हे शहर...

अशा वेगवान जीवनात आपण कसे हरवून जात आहोत याचं एक बोलकं उदाहरण नुकत्याच एका वाचलेल्या कवितेतल्या  ओळींमधून व्यक्त झालंय. त्या कवितेत वेगवान शहरीकरणात काय  काय घडू शकतं याविषयी सांगताना कवी म्हणतो,  पाळणाघरातून  आपलं मूल परत नेताना चुकून दुसऱ्याचंच मूल ती आई घरी घेऊन  जाते असं पाळणाघराची संचालिका दुसऱ्या दिवशी तिला सांगते.  ती हेही सांगते की असं झाल्यानं काही बिघडलं नाही,  कारण जिचं  मूल चुकून नेलं गेलं तिच्याही ते लक्षात आलेलंच नाहीये. या  गतीच्या चक्रात मनही यंत्रवत होतंय असं वाटणारी भावना कवीनं  अचूकपणे टिपलीय.  आज प्रकाशक काव्यसंग्रह काढण्याबाबत उदासीन दिसत असतानाही हे तरुण कवी मित्र तितक्याच सशक्तपणे आपल्याला  त्यांच्या काव्यातून वास्तवाचा जिवंत अनुभव देत आहेत आणि  मनाची तडफड,  उद्विग्नता मोजक्या शब्दांत मांडताहेत. अशा  युवकांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. अन्यथा आजच्या  प्रकाशनाच्या अर्थकारणामुळे असे शेकडो लेखक अव्यक्त राहतील  आणि तसं झालं तर नवा सुर्वे आपल्याकडे निर्माण होईल कसा?

आपण त्यांच्यातला आणि समाजामधला पूलच तर तोडत नाही  आहोत ना असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय रहाणार नाही.  आजच्या तरुणांध्ये ‘सोशल नेटवर्किंग’ हा खूपच लोकप्रिय  प्रकार आहे. फक्त टि्वटर या ‘सोशल नेटवर्किंग’ची सुविधा  पुरवणाऱ्या वेबसाईटच्या सभासदांध्ये 2009 साली तब्बल 1382 टक्के एवढी प्रचंड वाढ झाली! सर्व जगामधल्या गेल्या दोन  वर्षांतल्या स्थित्यंतरामध्ये आणि चळवळींमध्ये सोशल  नेटवर्किंगचा खूप मोठा सहभाग आहे. अमेरिकेत सुरू असलेली  आणि आता 85 देशांत पसरलेली ‘ऑक्युपाय वॉलस्ट्रीट मूव्हमेंट’  असो किंवा युरोपमधल्या सरकारी कल्याणकारी खर्चकपाती- विरुद्धच्या चळवळी असोत,  हुकूमशाहीविरुध्दची अनेक देशांत पसरलेली ‘अरब स्प्रिंग’  चळवळ असो किंवा आपल्याकडली  भ्रष्टाचाराविरुध्दची अण्णा हजारेंची चळवळ असो,  या सगळ्यांध्ये तरुणांनी खूप मोठ्या संख्येनं सोशल नेटवर्किंगचा  वापर करून या चळवळी उत्स्फूर्तपणे उभ्या केल्या. या चळवळींतली उद्दिष्टं किंवा त्यांचे मार्ग बरोबर का चूक हा वेगळा  मुद्दा. तसंच यांतल्या बराचशा चळवळींना ठोस वैचारिक बैठक  आणि नेतृत्व नसल्यामुळे त्यांना अराजकतेचा वास येत होता हाही  भाग वेगळा. पण असं असलं तरी यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते,  ती म्हणजे आजचा तरुण जागा होतोय.

आता तो आपलं म्हणणं  स्पष्टपणे आणि ठामपणे मांडायला लागलाय आणि मुख्य म्हणजे त्याचा जागतिक राजकारणावर मोठा परिणाम घडून येतोय.  भारतात इंटरनेट आणि सोशल मीडिया वापरणाऱ्यांचं प्रमाण  भराभर वाढतंय. डिसेंबर 2011 अखेर 12 कोटी म्हणजे  लोकसंख्येचा 10 टक्के भारतीय लोक ऑनलाईन असतील. हे  प्रमाण वाढत जाऊन 2020 पर्यंत भारत हा सर्वाधिक इंटरनेट युजर्सचा देश बनेल असा एक अंदाज आहे. भारतात इंटरनेट  वापरणाऱ्या लोकांपैकी 27 टक्के लोक तरुण आहेत. नुकत्याच  केलेल्या पाहणीत 18 वर्षांखालील मुलांध्ये इंटरनेट वापरण्याचं  प्रमाण वाढतंय असं दिसून आलं. पण ही पिढी फक्त चॅटिंग,  फोटोंची देवाणघेवाण यासाठीच त्याचा वापर जास्त करते. इंटरनेट  वापरणाऱ्यांचं प्रमाण ग्रामीण,  निमशहरी भागातही वाढतंय ही  चांगली गोष्ट आहे. तिथे इंग्रजी येणारे लोक कमी असल्यामुळे  भारतीय भाषांत इंटरनेटवर साहित्य,  सुविधा उपलब्ध होण्याची गरज  आहे. युनिकोडच्या सुविधेुळे आता हेही शक्य होत आहे.  शहरातली 64 टक्के तर ग्रामीण भागातली 27 टक्के मुलंच  शिक्षणासाठी इंटरनेट वापरतात. बाकी सर्वजण चॅटिंग आणि तत्सम  गोष्टींसाठीच सोशल नेटवर्किंग वापरतात.

हे चॅटिंग,  एकमेकांशी  त्या निमित्तानं संपर्क साधणं हे उत्तमच आहे. पण तरीही ‘सोशल नेटवर्किंग’च्या तंत्रज्ञानाच्या ताकदीचा वापर योग्य मार्गाने करणं ही तरुणांची एक मोठीच जबाबदारी आहे. साहित्याच्या बाबतीत इंटरनेटचे बरेच फायदे आहेत. ॲमेझॉन,  फ्लिपकार्ट,  बुकगंगा अशा वेबसाईट्‌वरून ऑनलाईन पुस्तकं खरेदी  करणं शक्य होतं. त्यावर निरनिराळे ई-बुक रीडर्स असल्यामुळे  पुस्तकं ऑनलाईन वाचताही येतात. इंटरनेटच्या तंत्रज्ञानामुळे  लिहिणं आणि वाचणं खूपच सोपं झालंय. शिवाय इंटरनेटुळे लिहिलेलं साहित्य आपण आपल्या मित्रांना,  आप्तांना आणि  वाचकांना वाचायला देणं- थोडक्यात त्याचं वितरण करणं- खूपच  सोयिस्कर आणि स्वस्त झालंय. या नव्या तंत्रामुळे आपणच आता लेखक आणि प्रकाशक असे दोन्ही बनू शकतो,  या विचारानं अनेक  लेखक पुढे येऊ शकतील. त्यासाठी कम्प्युटर स्वस्त होऊन  सगळ्यांना परवडावे तर लागतीलच,  पण कम्प्युटर शिक्षणाचा  प्रसारही झाला पाहिजे.  

इंटरनेटवर तरुणांच्या लिखाणाचा एक प्रकार म्हणजे ब्लॉगवर्ग.  मराठीतही अनेकजणं ब्लॉग्ज लिहितात. या ब्लॉग्जवर कविता,  ललित लेखन,  कथा,  चित्रपट समीक्षा, संगीतावरचे लेख,  छायाचित्रांसह प्रवासवर्णनं अशा गोष्टी मोठ्या प्रमाणावर  आढळतात. ‘लिहिणं ही समस्या नाहीये तर तुम्हाला जे पटतं ते  लिहिणं ही समस्या आहे’  असं रॉबर्ट लुईस स्टीव्हनसनचं वाक्य  आहे. त्याप्रमाने स्वत:ला पटणारी वेगळी वाट शोधून  चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारे युवाही आहेत. त्यामुळेच तर  ऊर्जा, प्रदूषण, पर्यावरण,  माहितीचा अधिकार,  आजच्या ग्रामीण  भागातल्या समस्या आणि आजचं वास्तव यांसारखे वेगळे विषयही  काही तरुणांनी आपल्या ब्लॉग्जमधून हाताळलेले दिसतात. पत्रकारितेच्या बाबत तर ज्या पत्रकारांना संधी मिळत नाही,  व्यासपीठ नाही असे पत्रकार ताज्या आणि ज्वलंत प्रश्नांवर खास पत्रकारांसाठी खुल्या असलेल्या ब्लॉग्जवर कुठूनही लिहू शकतात.  अर्थात हे प्रमाण खूपच कमी असलं तरी त्याचा प्रसार आणि प्रचार  करायला हवा.  पण आपण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे. कुठल्याही तंत्रज्ञानामुळे साहित्याचा वाङ्‌यीन दर्जा वाढत नाही.

एखादी  कविता किंवा कथा बोरू,  टाक,  फाउंटन पेन,  बॉल पेन,  पेन्सिल  किंवा कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यापैकी कशाचाही वापर करून  निर्माण केली असली तरी त्या लेखनाचा दर्जा त्या कवितेतल्या किंवा कथेतल्या आशयावरच अवलंबून असतो. ते लिखाण  जीवनाला किती भिडतंय यावरच त्याची साहित्यिक मूल्यं ठरतात.  ते लिहिताना वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे नव्हेत. त्यामुळे सकस,  सामाजिक भान असलेलं आणि सुंदर साहित्य निर्माण व्हायला हवं  असेल तर मानवतावादी मूल्य,  समानता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता,  एकमेकांबद्दल आत्मानुभव (एम्पथी),  पर्यावरणाचे प्रश्न,  पर्यायी विकासनीती या सगळ्यांविषयी विचार करणारा आणि ते अंमलात  आणणारा तरुणवर्ग निर्माण व्हायला हवा. तरुणांधला सळसळता  उत्साह,  कौशल्यं यांना वाट मिळायला हवी. समृध्दी  न्याय आणि  समता असलेलं जग निर्माण व्हायला हवं. तसं झालं तरच त्याचं प्रतिबिंब साहित्यातही उमटेल.

विज्ञाननिष्ठ,  सामाजिक भान  असणारे सजग आणि निर्भय युवा असतील तर त्याचा साहित्यावरही चांगलाच परिणाम दिसू शकेल.  खरं तर यौवन म्हणजे सळसळता उत्साह, जागेपणी स्वप्न  पाहाणं आणि ती साकार करण्यासाठी धडपडणं. त्यानं आणि तिनं  प्रेमात पडणं,  धाडस,  मनःपूर्वकता,  गगनाला गवसणी घालण्याची  आकांक्षा बाळगणं असं सगळं. पण त्याचबरोबर आज युवांना  आयुष्यात जीवघेणी स्पर्धा, संघर्ष,  ताण,  अस्थिरता यांना सामोरं  जावं लागतं आहे.  साहित्य समाजमनाचा आरसा असून त्याची धुरा आजच्या  युवांनीच सशक्तपणे खांद्यावर घ्यायला हवी. माध्यम कुठलंही असो  साहित्यानं समाज बदलाची ताकद युवा साहित्यात निर्माण झाली तर  खऱ्या अर्थानं युवा साहित्य-नाट्य सेंलनाचा हेतू साध्य झाला असं म्हणता येईल! धनवाद!

Tags: विज्ञान अर्थात किमयागार अच्युत गोडबोले मिलिंद जोशी मराठी साहित्य परिषद vidnyan arthat kimyagar achyut godbole milind joshi Marathi sahitya parish weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अच्युत गोडबोले
achyut.godbole@gmail.com

तंत्रज्ञ, मराठीतील लेखक आणि वक्ते 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके