डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कालचाच कॉम्रेड आज सिव्हिल ड्रेसवर आलेला होता. दुसरं कुणीच नव्हतं. लुंगी घातलेला आणि गुंड्या तुटलेला मळकट शर्ट अडकवलेला. त्याच्या चेहऱ्यावर आज वेगळंच हास्य दिसत होतं. ‘‘तुमको क्या लग रहा था? हम आप को छोड देंगे, या और कुछ?’’ असं म्हणून तो त्याच्याच धुंदीत हसला. त्याच्या समोरच्याच बाजेवर आम्ही बसलो. ‘‘हम इन्सानियत पर विश्वास रखनेवाले है। हमे पूरा विश्वास है की, आप हमे छोड देंगे।’’ असं आम्ही त्याला म्हटलं. तो पुन्हा हसला आणि ‘‘हाँ, सही है। पार्टीने आपको छोडने का निर्णय लिया है।’’ असं म्हणाला. ते ऐकून आम्ही तिघेही जाम खूश झालो. आमच्या चेहऱ्यावरच्या रेषा एका क्षणात पालटल्या.

तेव्हा मी इयत्ता सातवीत शिकत होतो. आमची रेल्वेगाडी घनदाट झाडींमधून कोलकात्याच्या दिशेने चालली होती. निमित्त होते स्काऊट-गाईडच्या राष्ट्रीय शिबिराचे. झारखंड, छत्तीसगढच्या दाट जंगलामध्ये गाडीने प्रवेश करताच सरांनी आम्हाला आमच्या बोगीची दारं- खिडक्या बंद करण्यास सांगितलं. ‘हा सारा नक्षलप्रभावित प्रदेश आहे’, असं काहीसं ते म्हणाले. नक्षलप्रभावित प्रदेश म्हणजे नक्की कसला प्रदेश, हे समजण्याचं ते आमचं वय नव्हतं. पण सरांनी दारं-खिडक्या का बंद करायला लावल्या, असा प्रश्न कित्येक दिवस मनात घोळत राहिला होता. 

पुढे अकरावी-बारावीला असतानाही वर्तमानपत्रामध्ये नक्षलवादाबाबतच्या आलेल्या बातम्या अधूनमधून नजरेखालून जायच्या. पण त्यावर जास्त विचार न करता त्या नजरेआड करायचो. एक-दोनदा आई- वडिलांना विचारलं, पण त्यांनाही त्याबद्दल जास्त काही माहिती नव्हती. नंतर पदवीच्या शिक्षणासाठी पुण्याला आल्यावर राज्यशास्त्र विषयाच्या एका सर्टिफिकेट कोर्ससाठी एक प्रोजेक्ट करण्याच्या निमित्ताने नक्षलवादाचा प्रश्न जवळून अभ्यासण्याचा योग आला. Naxalism : An internal threat to Indian Security असे मला दिलेल्या विषयाचे नाव होते. यादरम्यान बरीच पुस्तकं माझ्या डोळ्यांखालून गेली. त्यामध्ये बेला भाटिया यांचे लेख विशेष मोलाचे ठरले. देवेंद्र गावंडे यांचे ‘नक्षलवादाचे आव्हान’, विलास मनोहर यांचे ‘एका नक्षलवाद्याचा जन्म’, राहूल पंडिता यांचे ‘हॅलो बस्तर’ इत्यादी पुस्तके वाचून हळूहळू नक्षलवादी चळवळीची ओळख मला होत गेली. 

दहशतवादी आणि नक्षलवादी पूर्णपणे भिन्न असून, नक्षलवाद म्हणजे भूमिहीनांनी जमीनदारांच्या विरोधात सुरू केलेला सशस्त्र लढा आहे हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर वर्तमानपत्रांमधील नक्षलवादासंबंधीच्या बातम्यांकडे सोइस्कररित्या दुर्लक्ष न करता, मी त्या बारकाईने वाचू लागलो. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटांमध्ये कधी सीआरपीएफचे जवान शहीद झाल्याच्या, तर कधी पोलिसांबरोबरच्या चकमकीत नक्षलवादी ठार झाल्याच्या बातम्या नित्याच्याच झाल्या होत्या. रोजच किती तरी ठार होत असल्याने, आणि रोजच कोणी तरी शहीद होत असल्याने त्यातील गंभीरता म्हणावी तेवढ्या प्रमाणात जंगलापासून कोसोदूर असलेल्या माझ्यासारख्याला जाणवण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण तरीही एक गोष्ट मात्र राहून-राहून नेहमीच खटकायची. ती म्हणजे, आपल्या भूमीवरची... आपलीच माणसं.... आपल्याच माणसांच्या, आपल्याच बांधवांच्या विरोधात हातांत बंदुका घेऊन का बरं लढतात? 

बरेच प्रश्न डोक्यामध्ये यायचे, पण त्यांची उत्तरंच सापडत नसायची. कदाचित त्यांना उत्तरच नसावीत, असंही कधी कधी वाटायचं. पण प्रश्न म्हटला की, त्याला उत्तर हे असणारच ना? असा विचार मनात आला म्हणून एक प्रवास करायचा ठरवला- गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या चार जिल्ह्यांचा. बाबा आमटेंचा सोमनाथ प्रकल्प व आनंदवन, डॉ. अभय बंग यांचे शोधग्राम, प्रकाश आमटे यांचे हेमलकसा, महात्मा गांधींचा वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम आणि विनोबाजींचा पवनार आश्रम हे सारं सायकलवरून प्रवास करून पाहायचं, असं आम्ही ठरवलं. दिवाळीची सुट्टी त्यासाठी वापरण्याचं नक्की करून विकास, श्रीकृष्ण आणि मी बाकीच्या तयारीला लागलो. 

साधारण 900 किलोमीटरचे अंतर आम्ही सायकलवरून फिरणार होतो. एवढे मोठे अंतर सायकलवरून कापण्याचा तसा हा आमचा पहिलाच प्रयत्न. पण एकदा ठरवलं की ठरवलं. बघता- बघता आमचे कॉलेजचे पेपर संपले अन्‌ आम्ही बॅगा वगैरे भरून एसटीच्या टपावर सायकली टाकून नागपुरात पोचलो. दिनांक 21 नोव्हेंबर 2014 या ऐन दिवाळीच्या दिवशी आम्ही सायकल यात्रेला सुरुवात केली. प्रवासामध्ये कुठेही हॉटेल/लॉजवर राहायचे नाही व शक्यतो स्वत:चे जेवण स्वत:च बनवायचे, असा आम्ही नियम केला होता. वाटेमध्ये जिथे अंधार होईल तिथेच (जवळच्या गावामध्ये) जशी सोय होईल तसं राहायचं. मंदिर वगैरे असेल, तर तिथेच रात्र काढायची. भरपूर माणसांना भेटून जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधायचा. वेगवेगळ्या भागांतील माणसांना भेटून माणूस म्हणून जगायला शिकण्याचा प्रयत्न करायचा, माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, असं आम्ही ठरवलं होतं. वाटेत कुठे सायकल पंक्चर झाली, तर पंक्चर काढायचे साहित्य आम्ही घेतले होते. 

सायकलच्या चाकाबरोबर प्रदेश बदलत होता, माणसे बदलत होती. त्यांची भाषा, त्यांचे राहणीमान बदलत होते. आम्हाला बरेच काही शिकायला मिळत होते. नागपूरनंतर उमरेडच्या आसपास दुपारच्या वेळी एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो होतो. तेव्हा तिथल्या मेश्रामकाकांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी कसा लढा दिला, ते आम्हाला सांगितले. आंदोलनादरम्यान पोलीस फायरिंगमध्ये त्यांच्या दंडाला एक गोळीही लागली होती. आमच्यासाठी त्यांनी खास लेमन टी बनवला होता. आम्ही जिथं जाऊ तिथं माणसं आमच्या अवतीभवती जमायची. त्यांच्याशी आमचं बरंच बोलणं व्हायचं. 

भेंडाळा नावाच्या गावामधील मुक्काम आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीची खोलीच आमच्या ताब्यात दिली होती. दिवाळीच्या त्या दिवशी भेंडाळा गावानं आम्हाला खूप प्रेम दिलं. तिथल्या सरपंचबार्इंनी स्वत:च्या हाताने जेवण करून वाढलं. कुळमेथेकाकांनी सकाळच्या नाश्त्याला त्यांच्या घरी बोलावलं. श्यामसुंदर बनसोडेकाकांनी आम्हाला दिवाळीचा फराळ आग्रहाने खायला लावला. कि.लो. म्हणजे किशोर लोखंडे याने आम्हाला सारा गाव फिरून दाखवला. आमच्या गावाला शासनाचा ‘आदर्श गाव पुरस्कार’ दोन वेळा मिळालाय, हे सांगताना त्याची छाती दीड फूट पुढे येत होती. संवादाने माणसे जोडली जातात, हे तेव्हा आम्ही अनुभवत होतो. 

पुढे सोमनाथ प्रकल्पाला भेट देऊन गडचिरोलीमार्गे शोधग्रामला रवाना झालो. वाटेत बोदली नावाच्या गावामध्ये एक मुक्काम पडला. गावाच्या मालकीच्या एका छोट्याशा सभागृहात आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तिथल्या एका काकांनी आम्हाला खूप आग्रह करून त्यांच्या घरी जेवायला बोलावलं. एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या घरामध्ये शिवाजीमहाराज, जोतिबा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी असे फोटो क्रमाने लागले होते. गडचिरोली- जो जिल्हा नक्षलवादामुळे नेहमीच चर्चेत असतो, तिथे या महापुरुषांचे फोटो एकत्र पहायला मिळतील, असं कधी वाटलंच नव्हतं. शोधग्रामनंतर पुस्तोलामार्गे एका दाट जंगलातील वाटेने हेमलकसाच्या दिशेने चाललो होतो. 

मध्यंतरी अचानक अंधार पडला, तो अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलामध्ये वसलेल्या मोरावाही या छोट्याशा गावामध्ये. गाव कसलं, जेमतेम 20-25 आदिवासी पाड्यांची छोटीशी वस्तीच ती. आता इथून पुढे मंदिर नावाची वास्तू क्वचितच कुठे तरी. आदिवासी देव-देवता या जंगलामध्ये उघड्यावरतीच वसलेले असल्याने, त्यांना झाडांशिवाय इतर कशाचाच आडोसा लागत नाही. त्यामुळे आमची राहायची पंचाईत होऊन बसली होती. इथं ना ग्रामपंचायत होती, ना मंदिर. शाळेची एक इमारत होती, पण शिक्षक येत नसल्याने ती  वर्षानुवर्षे बंदच असल्यासारखी दिसत होती. शाळेच्या आवारात कमरेएवढा झाडपाला वाढला होता. आता इथे राहायचे कुठे, हा मोठाच प्रश्न पडला होता. भरीस भर म्हणून की काय, तिथल्या कुणाला आमची भाषाही नीट समजत नव्हती. बहुतेक लोक माडिया भाषा बोलणारे होते. 

सगळ्या गावातून चकरा मारून झाल्यावर शेवटी आम्ही एका किराणा मालाच्या छोट्या लाकडी टपरीवर येऊन थांबलो. आंध्रातल्या कुण्या एका व्यापाऱ्याचं ते छोटेखानी दुकान होतं. तिथे एक पोपट होता. तो ‘हॅलो... हॅलो’ बोलायचा. आम्ही त्याच्याबरोबर खेळत असतानाच माचू नावाचा एक मुलगा आम्हाला भेटला. माचूला मराठी येत होतं. तो बाहेर कुठे तरी आश्रमशाळेत नववीत शिकत होता. त्याने आमच्या राहण्याची सोय केली. तो आम्हाला त्याच्या घरीच घेऊन गेला. आदिवासी पाड्यामध्ये मुक्काम करायचा हा आमचा पहिलाच प्रसंग. पाडा छोटा असला तरी स्वच्छ आणि रंगरंगोटी केलेला. कडेने लाकडाचे सुंदर कुंपण. आपल्या मुक्कामाचे ओझे त्यांच्यावर पडू द्यायचे नाही, असा विचार करून आम्ही स्वत:च्याच शिध्यातून जेवण करण्याचं ठरवलं. 

पण तेवढ्यात अंधारातून माचूच्या बहिणीने माचूला आवाज दिला- ‘‘यांना आपल्या हातचं जेवण चालेल का? यांचं जेवण बनवू का?’’ असं ती माडिया भाषेतून माचूला विचारत होती. दरवाजाबाहेर उभ्या राहिलेल्या तिचा चेहरा बाहेरच्या काळोखात झाकून गेला होता. पण तिचा तो प्रश्न आमच्या मनाला चांगलाच लागला. त्या दिवशी आम्ही बहिणीच्या हातचा पिठलं-भात पोटभर खाल्ला. त्या जेवणात प्रेम होतं, माया होती, आपुलकी होती. असाच एक मुक्काम कांदोली नावाच्या गावातही झाला. कांदोलीतही वीज, रस्ता नाही. नदी ओलांडण्यासाठी पूल नाही. ग्रामपंचायतीची इमारत आहे, पण तिथे तलाठी नाही आणि ग्रामपंचायत सदस्यही नाहीत. गावात शाळा आहे, पण मास्तर 40 किलोमीटर दूर  एटापल्ली या तालुक्याच्या ठिकाणी राहतात. रस्त्याच्या गैरसोईमुळे त्यांचे अनियमित येणे नेहमीचेच आहे. शासनाच्या एस.एस.सी. कोडनुसार शिक्षकांनी त्यांची नेमणूक असलेल्या शाळेपासून पाच किलोमीटरच्या क्षेत्रफळातच राहायचे असते. पण हा निर्णय इथेच काय, अन्यत्र कुठेही कार्यान्वित झालेला दिसत नाही. 

इन्स्पेक्शनची तर इकडे भानगडच नाही. ‘सरकार नावाची गोष्ट फक्त निवडणुकीच्या काळात मतदानाच्या निमित्ताने निदर्शनास पडते, एरवी आमच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसतो,’ असं तीस किलोमीटरची पायपीट करून बारावीपर्यंत (हेमलकसाच्या लोकबिरादरीत) शिकलेले आणि पुढे बी.एड्‌.चे शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगार असणारे गिसू मडावी आम्हाला सांगत होते. त्या वेळी निवडणुकांचाच काळ सुरू होता. मी कराडचा आहे, हे समजल्यावर गिसू सरांनी ‘पृथ्वीराज चव्हाण निवडून आले का?’ असं खूप आपुलकीनं विचारलं. ‘चांगला माणूस आहे तो. निवडून यायला पाहिजे’, असं ते म्हणाले. 

पुढे कांदोलीनंतर पूल नसलेली नदी ओलांडून आम्ही हेमलकसात पोचलो. तिथं मुद्दामहून लोकबिरादरी प्रकल्पाच्या वसतिगृहातच राहिलो. त्यामुळे तिथं शिकणाऱ्या मुलांशी चांगला संवाद झाला. ही पोरं खूप आतील भागातून येऊन इथं शिक्षण घेतात. माडिया ही मातृभाषा असणाऱ्या या मुलांची मराठी अणि इंग्रजी शिकताना किती ससेहोलपट होते, त्यांचं त्यांनाच माहीत. पण त्यातूनही परिस्थितीला तोंड देत ही मुलं मॅट्रिक होतात. काही जण बारावीपर्यंत जातात. क्वचितच कुणी पदवीचे शिक्षण पूर्ण करतो. कितीही शिकलं तरी बाहेरच्या समाजाकडून बरोबरीची वागणूक मिळत नाही, असं ते सांगत होते. 

‘‘पुण्या-मुंबईहून काही माणसं लोकबिरादरी प्रकल्पाला भेट द्यायला इथं येतात. त्यातील बरेच लोक दुरूनच एकमेकांना ‘ही आदिवासींची मुलं बरं का... यांना मराठी वगैरे येत नाही...’ असं आमच्याकडे बोट दाखवून कुजबुजतात. पण त्यातलं कुणीच आमच्याजवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न करत नाही.’’ अशी तक्रार वसतिगृहात राहणारा आणि नववीत शिकणारा रामपुरो करत होता. ‘‘मागे एकदा कॉलेजच्या मुलांचा ग्रुप मुंबईहून इथं आला होता. आम्ही त्यांना आदिवासी संस्कृतीबद्दल बरीच माहिती सांगितली. पण मुंबईला गेल्यावर त्यांनी कोणत्या तरी वर्तमानपत्रात एक लेख लिहिला. त्यात ‘आम्ही खूप विचित्र आणि सगळ्यांपेक्षा वेगळी दिसणारी माणसं पाहिली’ असं काहीसं लिहिलं होतं.’’ असं वसतिगृहातील एक मुलगा सांगत होता. ‘‘आम्हाला तेव्हा खूप वाईट वाटलं. आम्ही दिसायला जरी वेगळे असलो तरी माणसंच आहोत’’ असं तो पुन:पुन्हा सांगत होता. 

हेमलकसानंतर आलापल्लीमार्गे आम्ही आनंदवनात पोचलो. ‘‘कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनसारखं एखादं सेपरेट गाव उभारावं लागतं, आपला समाज त्यांना स्वत:मध्ये मिसळून घेत नाही, हीच मुळात खूप मोठी शोकांतिका आहे’’ असं विकास आमटे यांनी सांगितलं. स्वावलंबी खेडं कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आनंदवन. इथल्या माणसांनीही आम्हाला चांगलाच जीव लावला. पुढे आम्ही गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये गांधींचा सहवास खरोखरच अनुभवता आला. तेथील डॉ. श्रीराम जाधव यांनी आम्हाला आश्रमाच्या जडण-घडणीची माहिती सांगितली. आमच्या सायकलप्रवासाचे खूप कौतुकही केले. ‘‘खरा भारत जाणून घ्यायचा असेल, तर अशीच भटकंती करायला हवी. गांधीजी 1915 मध्ये भारतात आले, तेव्हा गोखले यांनी त्यांना ‘प्रथम भारत जाणून घ्या’ असा सल्ला दिला होता. गांधीजी तेव्हा बरेच दिवस भारताच्या कोनाकोपऱ्यात फिरले. त्यांनी प्रथम हा देश जाणून घेतला, इथला माणूस समजून घेतला आणि मग स्वातंत्र्यलढ्यात उतरले.’’ असं जाधव सर आम्हाला म्हणाले. 

सेवाग्रामहून थोड्याच अंतरावर असलेल्या विनोबाजींच्या पवनार आश्रमाला भेट देऊन आम्ही पुन्हा एस.टी.च्या टपावर सायकली टाकून पुण्याला माघारी आलो. दरम्यान कांदोली गावानंतरची पूल नसलेली नदी ओलांडताना भेटलेल्या एटापल्लीच्या सरपंचांचं ते वाक्य मनाला सारखं डिवचत होत- ‘‘इथे सगळं ठीक आहे. तुम्हाला खरा दुर्ग आणि अविकसित प्रदेश पाहायचा असेल तर तुम्ही कधीतरी भामरागडच्या पुढे जाऊन पाहा. तिथले आदिवासी आजही मुख्य प्रवाहापासून खूप दूर आहेत. त्यांचं जीवन पूर्णपणे आयसोलेटेड आहे.’’ तेव्हा आम्हाला हे कळत नव्हतं की यापेक्षा आणखीन दुर्ग आणि अविकसित प्रदेश कोणता असू शकतो. कारण कांदोली, मोरावाहीसारख्या गावांमध्ये आम्ही जे पाहिलं होतं ते आमच्या दृष्टीने अविकसित आणि मागासलेपणाचं होतं. इथे वीजेची सोय नव्हती. शाळा असूनही  नसल्यासारख्या होत्या. रस्त्यांची कनेक्टीव्हिटी नव्हती. ग्रामपंचायतीच्या इमारती होत्या, पण त्यांना सरपंच तलाठी असं कोणीच नव्हतं. यापलीकडे आणखीन काय अविकसितपण असणार आहे, असं आम्हाला वाटत होतं. 

पण एटापल्लीच्या सरपंचांचं ते बोलणं ऐकल्यानंतर भामरागडच्या पुढे काय स्थिती आहे, ते जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे एस.टी.मधून पुण्याला येतानाच आम्ही पुढचा दौरा भामरागडपासून सुरू करायचा निर्णय मनाशी पक्का केला होता. 

2

गडचिरोलीच्या दौऱ्यानंतर एक गोष्ट आमच्या चांगली लक्षात आली होती ती म्हणजे हा प्रदेश कितीही दुर्गम, अविकसित आणि मागास असला तरीही इथली माणसं ‘माणूस म्हणून’ खूप पुढे गेलेली आहेत. शहरांमधील काँक्रिटच्या जंगलात राहणाऱ्या माणसांपेक्षा घनदाट झाडीच्या जंगलांमध्ये निसर्गाशी एकरूप होऊन राहणाऱ्या माडिया, गोंड आदिवासींमध्ये माणुसकी नावाचा प्रकार खूप जास्त प्रमाणात आहे. त्यांना जरी आपली भाषा येत नसली आणि आपल्याला त्यांची भाषा कळत नसली तरी माणुसकीची भाषा मात्र त्यांना नक्की येते. त्या प्रवासादरम्यान बऱ्याच लोकांशी संवाद झाला, बरीच माणसे जोडली गेली. त्यातील काही गावे मला माझ्या गावाइतकीच जवळची वाटू लागली. एवढे आम्ही त्या भागाशी जोडले गेलो. 

पाहता पाहता 2014 चे वर्ष संपून 2015 सुरू झाले. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळी सुट्टी सायकल भटकंतीला वापरायची असं आमचं नियोजन होतं. पण परीक्षांच्या अनियमिततेमुळे तो प्लॅन प्रत्यक्षात उतरायला 2015 चा डिसेंबर उजाडला. या वर्षी निवडलेला मार्ग जरा आडवळणाचाच होता. म्हटलं तर तसा धोक्याचाच. पण एकदा ठरवलं की ठरवलं. आता बदल नाही. शेवटी आपल्याच देशातून फिरतोय. आपण आपल्याच माणसांशी, आपल्याच बांधवांशी संवाद साधायला चाललोय. मग त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? असं आम्ही एकमेकांना व स्वत:ला बजावत होतो. सोबत मागच्या वर्षीचा अनुभव होताच. म्हणजे इथला माडिया प्रेमळ आहे, जीव लावणारा आहे, एवढा विश्वास आम्हाला वाटत होता आणि तो विश्वास भामरागडच्या दिशेने पाऊल टाकण्यास पुरेसा होता. 

22 डिसेंबरची तारीख या प्रवासासाठी नक्की केली. बाकीच्या सामानाची आवराआवर करून, गुगल मॅपच्या सहाय्याने स्वत:च्या हाताने एक नकाशाही तयार केला. ‘भामरागड- बेद्रे- कुटरू- बिजापूर- बासागुडा- चिंतलनार- दोरनापाल- सुकमा- दंतेवाडा- मलकानगिरी- बालीमेला डॅम- विशाखापट्टणम्‌’ असा तो मॅप होता. म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा आणि तेलंगणा अशा चार राज्यांमधून आम्ही सायकलप्रवास करणार होतो. गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी ‘माणूस म्हणून जगायला शिकण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी’ अशीच थीम आम्ही निवडली. मागच्या अनुभवावरून आम्हाला हे समजलं होतं की, अशा प्रवासामधून माणूस माणसाला जोडत जातो आणि कळत-नकळत इंडियापासून काळाच्या ओघात दूर गेलेल्या भारताला जोडण्यास आपला हातभार लागतो. 

बरेच जण विचारतात, ‘सायकलच का?’ तर त्याचं कारण असं की सायकलने आपण कुठूनही प्रवास करू शकतो, शिवाय खर्चही कमी येतो. आम्ही ज्या भागात गेलो होतो किंवा जाणार होतो त्या ठिकाणी एकतर रस्ते नाहीत, नद्यांवर पूलही नाहीत. पेट्रोलपंप नावाचा प्रकारही क्वचितच कोठेतरी. त्यामुळे अशा ठिकाणी सायकलच योग्य. शिवाय सायकल ही प्रत्येकाला जवळची असते. माणसं सायकलमुळे खूप सहजरीत्या कनेक्ट होतात. त्यांच्यामध्ये आणि आपल्यात दुरावा राहत नाही. पण अनोळखी भागात सायकलवरून फिरायचे तर तेथील काही जाणकार व्यक्तींशी थोडे बोलले पाहिजे, म्हणून मग आम्ही काही व्यक्तींबरोबर आमचा प्लॅन डिस्कस केला. सगळ्यांकडून हिरवा सिग्नल भेटल्यानंतर एस.टी.चा चार दिवसांचा पास काढून आम्ही तिघे 24 डिसेंबरला भामरागडला पोचलो. 

भामरागडच्या लालसू नरोटी यांच्याबरोबर आमचे आधी फोनवर बोलणे झालेच होते. त्यांनी आमच्यासोबत स्वत: बेद्रेपर्यंत यायचे कबूल केले होते. 24 तारखेच्या रात्री हेमलकसा गावाच्या गोटूलमध्ये राहून, दुसऱ्या दिवशी आम्ही लोकबिरादरीत जाऊन प्रकाश आमटेंची भेट घेतली. त्यांनाही आमचा हुरूप पाहून छान वाटलं. सायकलींवर मोठाल्या बॅगा दोरीने बांधून आमचा सायकल प्रवास किर्रर्र झाडींमधून आणि डांबर नसलेल्या रस्त्यांवरून छोट्या छोट्या आदिवासी पाड्यांना मागे टाकत छत्तीसगढच्या दिशेने सुरू झाला. कच्च्या रस्त्यांमुळे बसणाऱ्या गचक्यांमुळे कॅरेजवरून घसरणाऱ्या  बॅगांचा तोल सांभाळत आम्ही सायकली हळूहळू चालवत होतो. दोडराजपासून उजव्या बाजूला वळल्यानंतर पेनगुंडा नावाचे गाव लागले. मुख्य रस्त्यापासून थोडे आतल्या बाजूला असणाऱ्या या गावात यायला आम्ही किती तरी वेळ गुडघाभर वाढलेल्या झाडाझुडपांतून जाणाऱ्या पाऊलवाटेने सायकली रेटत होतो. आमच्या सायकलींची चाकं थांबली ती पांढऱ्या मातीने स्वच्छ सारवलेल्या सुरेश महाकाच्या पाड्याजवळ. 

सुरेश आमच्यासोबत पुण्याला कॉलेजला आहे. आम्ही त्याच्या भागात जाणार आहोत, असं त्याला समजल्यावर त्यानं आवर्जून आम्हाला त्याच्या घरी जायला सांगितलं होतं. सामानाच्या ओझ्यानं दबलेल्या सायकली लाकडी कुंपणाला टेकवून आम्ही फाटकामधून आत गेलो तो लालसूदादा आणि चिन्नूदादा दुचाकीवरून तिथे अगोदरच पोचले होते. सुरेशची आई आणि दोन बहिणीही आमची वाट पाहत होत्या. आम्ही जाताच सुरेशच्या वडिलांनी आमच्यासाठी लगबगीने दोन बाजा टाकल्या. इकडचं-तिकडचं थोडं बोलणं झालं. ‘‘सुरेश चांगला अभ्यास करतो, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आम्ही आहोत त्याच्याबरोबर तिकडे.’’ असं आम्ही त्याच्या आई-वडिलांना सांगत होतो. पण त्यांना मराठी येत नसल्यामुळे आश्रमशाळेत जाणाऱ्या सुरेशच्या छोट्या बहिणीने आम्ही काय बोलतोय ते त्यांना माडिया भाषेतून सांगितलं. 

सुरेश हा पेनगुंडा गावातला पदवीचं शिक्षण घेणारा पहिलाच मुलगा. आजवर इथं एवढं कुणी शिकलंच नाही. भामरागडपासून पुढे कुठेच मोबाईलला नेटवर्क येत नसल्यामुळे सुरेशचं त्याच्या घरच्यांशी महिना-महिना बोलणं होत नाही. घरातले कधी भामरागडला बाजारात गेले, तर तेच तिकडून त्याला फोन करतात. सुरेशची मोठी बहीण जेमतेम सातवी- आठवी शिकलेली आहे. लोकबिरादरीमध्ये काही दिवस कामाला असताना तिनं थोडंफार दवाखान्याचं काम शिकून घेतलं आहे. आता ती पेनगुंडामध्येच छोटासा दवाखाना चालवते. लहान मुलांचं वजन किती आहे ते पाहणं, स्त्रियांच्या अडी-अडचणींवर इलाज करणं अशी कामे ती करते. आसपासची माणसे छोट्या-मोठ्या इलाजासाठी सुरेशच्या घरी येतात. अशा भागात प्राथमिक उपचाराची सोय होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. 

आता दुपारचं ऊन वाढलं होतं. संध्याकाळच्या मुक्कामाला नेलगुंडाला पोचायचं होतं. पुन्हा मजल-दर मजल करत आम्ही सायकली हाकायला सुरुवात केली. अधूनमधून तिघांपैकी कोणाची ना कोणाची बॅग कॅरेजवरून निसटून पडायची, मग पुन्हा ती दोरीने घट्ट बांधून आम्ही पॅडल मारत राहायचो. काळोख पसरत असताना सातच्या सुमारास नेलगुंडा गावात पोचलो. आज आम्ही ज्या पाड्यामध्ये राहणार होतो, तो साधू वड्डे या आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवाद्याचा होता. साधू 13-14 वयाचा असतानाच चळवळीत सामील झाला होता. तो नेमबाजीत तरबेज असल्याने ‘अर्जुन’ या नावाने ओळखला जाई. त्याने मधल्या काळात जखमींवर उपचार कसा करायचा, हे शिकून घेतले होते. एके दिवशी पोलिसांबरोबरच्या चकमकीत त्याच्या पायाला गोळी लागली. आता चळवळीत राहून तो जास्त काही करू शकणार नाही म्हणून पार्टीने त्याला आत्मसमर्पण करण्यास परवानगी दिली. सध्या तो नागपुरात राहून उरलेलं शिक्षण पूर्ण करतोय. 

आम्ही नेलगुंडा गावात पोचलो, तेव्हा अख्खा गाव अंधारात बुडून गेल्यासारखा वाटत होता. लालसूदादांनी दाखवलेल्या बॅटरीच्या उजेडाच्या साह्याने आम्ही सायकली लाकडी कुंपणाच्या आतमध्ये ठेवल्या. पाड्याच्या दारासमोरच एक शेकोटी पेटलेली होती. छातीच्या बरगड्या दिसणारा आणि तरीही कणखर भासणारा एक जण थोड्या वेळाने तेथे आला. शेकोटीच्या तांबूस प्रकाशामध्ये त्याचा चेहरा चमकत होता. ते साधूचे वडील होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण हास्य होते. ते माडिया भाषेमध्ये हातवारे करून ‘बॅगा इथे ठेवा’ असं काहीसं सांगत होते. आता थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. त्या अंधारात आम्ही कसेबसे बॅगेमधले स्वेटर चाचपडत बाहेर काढले आणि शेकोटीभोवती येऊन बसलो. 

गोठवून टाकणाऱ्या त्या संध्याकाळी शेकोटीशेजारी बसून लालसूदादांशी आमचं बरंच बोलणं झालं. आदिवासी सण, संस्कृती, पंडुम, गोटूल याविषयी लालसूदादांनी आम्हाला बरीच माहिती सांगितली. इथला आदिवासी खूपच निरागस आणि भोळा आहे. इथं आजही सगळे एकमेकांमध्ये मिसळून राहतात. शेतातील पीक असेल किंवा जंगलात केलेली एखादी शिकार असेल, तर सगळ्यांचं एकमेकांमध्ये समान वाटप केलं जातं. इथला माडिया आजमध्ये जगतो, तो उद्याची काळजी करत नाही. तो रोजचं रोज पोट भरून खातो आणि आनंदी राहतो. पेट्यांमध्ये भरून साठवणूक करायला तो अजून तरी शिकलेला नाही. 

त्या रात्री जेवणात कोंबडीची भाजी होती. सोबतीला भात होता. दिवसभर सायकल चालवून दमलेलो आम्ही त्या दिवशी ढेकर येईपर्यंत जेवलो. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून पुढच्या प्रवासासाठी सायकलींवर स्वार झालो. वाटेत एका ठिकाणी पाणी प्यायला थांबलेलो असताना, तोंडाला स्कार्फ गुंडाळलेले दोघे जण सायकलवरून भरधाव जाताना दिसले. त्यात एक मुलगी होती. ‘‘सायकली रस्त्यात मधोमध का लावलेत? कडेला लावता नाही का येत?’’ असं ती मोठ्यानं ओरडली. तिच्या त्या बेधडक आणि करारी बोलण्याचं आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. आमच्या बोलण्याची ढब ऐकून ‘‘तुम्ही इथे का फिरून राहिले? तुम्ही इथले तर दिसत नाही आहात?’’ असं तिनं दाबात विचारलं. पण आम्ही काही बोलण्याच्या आतच ते दोघेही त्याच वेगाने झाडीमधून जाणाऱ्या पाऊलवाटेने सुसाट गेले. ते दोघं कोण होते? ती मुलगी एवढी तडफदार कसं बोलत होती? तिच्यात तो बाणा आला कुठून? असे नाना प्रश्न मनामध्ये येत होते. तिचा तो स्कार्फने झाकलेला चेहरा डोळ्यांसमोर पुन:पुन्हा येत राहिला. 

थोडं पुढं गेल्यावर कावंडेच्या आसपास एके ठिकाणी हाडांचा सापळा दिसणारी अन्‌ पोट टम्म फुगून बाहेर आलेली काही चिमुकली मुलं हातामध्ये ताट घेऊन एका रांगेमध्ये उभी असलेली दिसली. ती नक्कीच अंगणवाडी असावी व त्यांना खाऊ-वाटप सुरू असावे, असं वाटून आम्ही सायकलींना ब्रेक लावला. जवळ जाऊन पाहिले तर सुकडी वाटप चालले होते. सगळे आमच्याकडे बावरून पाहत होते. आम्ही काय बोलतोय, ते समजत नसल्याने आमची चांगलीच पंचाईत झाली होती. लहान मुलं आमच्यापासून जरा दूरवरच उभी राहत होती. थोड्या वेळाने तिथे गावातील काही माणसं जमा झाली. त्यातल्या काहींना हिंदी येत होतं. आम्ही त्यांना आमच्याबद्दल माहिती सांगितली. हिंदी येणारा मग बाकीच्या सर्वांना ‘आम्ही काय बोलतोय’ ते माडियामधून सांगायचा, तेव्हा जमलेल्या साऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटायचं. कोणी कुजबूज करत आमच्याकडे एकटक पाहायचं, तर कुणी अलगदपणे हसायचं. 

वाटेत एखाद्या शाळेला भेट वगैरे दिली तर त्या मुलांना देण्यासाठी चॉकलेट आणली होती, ती आम्ही बॅगेतून काढली. प्रत्येकाला चॉकलेट दिलं, तरीसुद्धा ही मुलं आमच्यापासून चार हात लांबच थांबत होती. सगळे जण सुकडी खाण्यासाठी गोलाकार बसले. त्यांच्याबरोबर आम्हीपण अंगणवाडीच्या पटांगणात जरा वेळ बसलो. निघायच्या वेळी आम्ही ‘टाटा’ केल्यावर त्यातल्या एक-दोन चिमुकल्यांनी आमच्याकडे पाहून तोंडावर लाजरं हास्य आणून हातवारे केले. बाकीचे मात्र आमच्याकडे नुसतेच पाहात राहिले. 

कावंडे गावानंतर आम्हाला इंद्रावती नदी पार करायची होती. इंद्रावतीचं पात्र जवळजवळ 1,100 मीटर रुंद होतं. त्या पांढऱ्या रेतीतून बॅगांची ओझी चढवलेल्या सायकली पुढे सरकता सरकत नव्हत्या. डिसेंबर असल्यामुळे एरवी दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रावतीचं पात्र निम्म्यापर्यंत रिकामचं होतं. पांढऱ्या रेतीच्या त्या पात्रामधून चालताना वाळवंटातून चालत असल्यासारखं वाटत होतं. उन्हानं तापलेली वाळू चटके देत होती. वाळूधे वीतभर खोल रुतलेली सायकलीची चाकं कशी तरी ओढत आम्ही नदीच्या तीरापर्यंत येऊन पोचलो. तीरावरून दिसणारं इंद्रावतीचं विस्तृत पात्र तिच्या विशालतेचं दर्शन देत होतं. नदी पार करण्यासाठी तिथे पाच-सहा लाकडी डोंगल ठेवलेले दिसत होते. पण ते वल्हवायला कोणीच नावाडी नव्हता. आम्ही डोंगलमध्ये बसून तो वल्हवायचा खूप प्रयत्न केला, पण आमच्याच्याने ते काही होत नव्हतं. आम्ही डोंगलमध्ये तिथल्या तिथेच फिरत होतो. नदीच्या त्या काठावर आम्ही येण्याची वाट पाहत बसलेले लालसू आणि चिन्नूदादा आमच्या करामती बघत होते. शेवटी चिन्नूदादा एका डोंगलमधून इकडच्या तीरावर आले. तीनही सायकली आणि साऱ्या बॅगा डोंगलमध्ये ठेवून आम्ही इंद्रावती नदी कशीबशी पार केली. 

3

दुपारच्या जेवणाची सोय बेद्रेमध्ये लालसूंच्या नातेवाइकांकडे झाली होती. जेवण उरकल्यानंतर लालसूदादांनी आमचा निरोप घेतला. ‘‘पुढला प्रवास शिस्तीने करा. काही अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधा.’’ असेही त्यांनी सांगितले. पुढला मुक्काम कुटरूमध्ये करायचा, असा विचार करून आम्ही सायकली ताणू लागलो. बघता-बघता अंधार पडायला लागला होता, पण कुटरू काही येता येत नव्हतं. त्यात भर म्हणून की काय, कृष्णाचा मोबाईल आम्ही मगाशी जिथे पाणी प्यायला थांबलेलो होतो तिथं विसरून आलो होतो. मग मी पुन्हा आठ किलोमीटर माघारी गेलो. विकास आणि कृष्णा बंदेपारा नावाच्या गावातच माझी वाट पाहत थांबले. हे एक चांगले झाले की, मोबाईल मिळाला. पण मी वापस येईपर्यंत पार अंधार पडला होता. धानाची पोती वाहून नेणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या लाइटच्या उजेडात मी कुथून कुथून सायकल पळवत होतो. एकदा का हा ट्रॅक्टर माझ्या पुढे गेला तर, मला भयाण काळोखातूनच रस्ता शोधावा लागणार होता. त्या भरधाव वेगाने धावणाऱ्या व मोठा आवाज करणाऱ्या ट्रॅक्टरसमोर आपला निभाव लागत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी मीच दमून सायकलीला ब्रेक लावला आणि ट्रॅक्टरचालकाला मदतीचा हात केला. 

ट्रॉलीमधल्या धान्याच्या पोत्यांवर मी कशीबशी सायकल चढवली. कागद कात्रीने कापावा तसा हा ट्रॅक्टर जंगलामधील शांतता चिरत (किर्रर्र झाडीमधून जाणाऱ्या त्या दगडमातीच्या रस्त्याने) हवेमध्ये धुरळा उडवत  कुटरूच्या दिशेने चालला होता. वाऱ्याची मंद झुळूक माझा थकवा दूर करत होती, तर आकाशातल्या लुकलुकणाऱ्या चांदण्या मन प्रसन्न करून जात होत्या. मी मात्र ते दोघे रस्त्याच्या कडेला कोठे दिसतायत का, ते पाहत होतो. बंदेपारा गावाजवळ विकास माझी वाट पाहत उभा असलेला दिसला. कुठे राहण्याची व्यवस्था होतेय का, ते पाहायला श्रीकृष्ण गेला होता. आम्ही ट्रॉलीमधून सायकल खाली उतरवली आणि धानाच्या पोत्यांनी गच्च भरलेल्या त्या ट्रॅक्टरच्या उडणाऱ्या धुरळ्याकडे दोन मिनिटं पाहत बसलो. ट्रॅक्टर गेल्यानंतर थोडं इकडे-तिकडे वळून पाहिलं, तर हा गावसुद्धा नेलगुंडासारखाच काळोखात बुडून गेल्यासारखा वाटत होता. भयाण शांतता असणाऱ्या सुनसान रस्त्यावर आम्ही उभे होतो.

तेवढ्यात कृष्णाने दुरून कुठून तरी आम्हाला आवाज दिला. चांदण्यांच्या प्रकाशात अंधाराला बाजूला सारत मी आणि विकास आवाजाच्या दिशेने पावलं टाकत एका पाड्यापाशी येऊन थांबलो. कुंपणाच्या आतमध्ये व्हरांड्यात कृष्णा बॅगमधल्या सामानाची काही तरी काढ-घाल करताना दिसत होता. लाकडी फाटकापाशी हातामध्ये बॅटरी घेऊन एक जण उभा होता. ‘आईए... अंदर आईए’ असं तो आम्हाला म्हणत होता. साधारणत: 17-18 वयाचा, चेहऱ्यावर स्मित हास्य असणारा सुरेशसिंग बाहेर कुठे आश्रमशाळेत आठवीत शिकत होता. आम्ही फाटकामधून आतमध्ये येताच त्यानं पाण्याचं एक वाडगं आमच्या हातात दिलं. ‘हात-मुँह धो लो’ असं म्हणत तो कृष्णाला घेऊन एका खोलीमध्ये गेला. बॅगा वगैरे चांदण्यांच्या प्रकाशात ठेवून आम्हीपण त्या अंधाऱ्या खोलीत गेलो. सुरेशने एका कोपऱ्यातून कंदील काढला अन्‌ काड्यापेटीने तो पेटवला. आता कुठे त्या खोलीतली बाज आम्हाला दिसली. इकडची माणसं अंधार पडायच्या आतच संध्याकाळचं जेवण उरकून घेतात. त्यामुळे आता आमच्याकरता पुन्हा चूल पेटवावी लागणार होती. 

‘‘आम्ही आमचं जेवणं बनवतो, त्यासाठीचा शिधाही आहे आमच्याकडे’’ असं सुरेशला सांगण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण तो काही केल्या ऐकेना. ‘ऐसा नहीं चलेगा... आप अभी हमारे मेहमान हो’ असं तो म्हणू लागला. आमचा शिधाही घ्यायला तो तयार नव्हता, मग आमच्याकडचा शिधा त्याच्या हातात जबरदस्तीने कोंबला. त्या रात्रीचं जेवण आम्ही चांदण्यांच्या प्रकाशात, शेकोटीच्या उबेला बसूनच केलं. सुरेशच्या हातची बैंगनची भाजी चवीला जाम मस्त लागत होती. कुणी तरी घरी आल्याचं त्याला खूप अप्रूप वाटत होतं. भात आणि बैंगनची भाजी तो किती आग्रहाने वाढत होता. जेवण झाल्यानंतर शेकोटीभोवती बसून आम्ही त्या रात्री बऱ्याच गप्पाही मारल्या. ‘अगर अंग्रेज होते तो क्या हमारे इधर बिजली होती?’ असा सुरेशच्या भावाने (वालेसिंग) निरागसपणे विचारलेला प्रश्न स्वातंत्र्यानंतरच्या 68 वर्षांवर मोठ्ठं प्रश्नचिन्ह उमटवून गेला. त्याच्या प्रश्नाचं उत्तर शेकोटीच्या त्या लालबुंद निखाऱ्यांमध्ये मी बराच वेळ शोधत होतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही सायकलीवर बॅगा चढवल्या. घनदाट झाडींमधून आमच्या सायकलीची चाकं कुटरूच्या दिशेने धावू लागली. रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या कागदावर लाल अक्षरांमध्ये लिहिलेली नक्षलवाद्यांची पत्रकं दिसू लागली होती. ‘ब्राह्मणीय रमणसिंह सरकार का धिक्कार... पूंजीपतीयों की दलाल पुलीस’ असं काहीसं त्यावर लिहिलं होतं. जवळजवळ कुटरूपर्यंत अशी पत्रकं झाडांवर लटकलेली दिसत होती. त्या दिवशी कुटरूचा बाजार होता. बरेच लोक हातामध्ये लाकडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू घेऊन चालले होते. कोणाच्या हातात टोपल्या होत्या, तर कुणाच्या हातात झाडू. या वस्तू बाजारात विकण्यासाठी ते घेऊन चालले होते. 

कुटरूच्या वेशीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. येणाऱ्या-जाणाऱ्याची कसून तपासणी केली जात होती. के. मधुकर यांचं नाव सांगितल्यावर आम्हाला पुढे सोडण्यात आलं. के.मधुकर म्हणजे इथला सलवा जुडूमचा मोठा नेता. आम्ही कुटरूमध्ये त्यांचीही भेट घ्यायचे ठरवले होते. पत्ता विचारत-विचारत एका शाळेपर्यंत येऊन पोचलो. के. मधुकर यांचं ऑफिस शाळेच्या आवारातच होतं. चहा-पाणी झाल्यावर त्यांनी आमची चौकशी केली. (गरीब आदिवासीच्या पाड्यात जशी आपुलकी भेटते तेवढी इथे भेटली नाही. उलट त्यांच्या बॉडीगार्ड्‌सनी आमची उलटतपासणीच जास्त केली. त्यांचा फोटो काढण्यासही मनाई केली.) नंतर तिथल्या शाळेतल्या चिमुकल्यांशी काही वेळ गप्पा मारल्या. आमच्याकडील चॉकलेटस्‌ त्यांना वाटली. त्या मुलांनी आमच्यासाठी एक छानसं गाणंही म्हटलं. कुटरूमध्ये सायकलींचं थोडंफार रिपेअरिंग करून आम्ही पुढल्या प्रवासाला लागलो. 

नैमेडमार्गे संध्याकाळी 7.30च्या दरम्यान बिजापूरला पोचलो. नैमेड ते बिजापूर हा डांबरी रस्ता असल्याने आम्ही रात्रीच्या अंधारातही सायकल चालवली. काळ्याकुट्ट अंधारामधून लाइट बंद ठेवून बऱ्याच दुचाक्या एकापाठोपाठ एक चाललेल्या आम्ही पाहत होतो. पहिल्यांदा हे सारे असे लाइट बंद करून का म्हणून चाललेत, हेच समजत नव्हतं. बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं की, ते सारे सीआरपीएफचे जवान आहेत. लाइटस्‌ सुरू ठेवून गाड्या चालवल्या तर दुरून कोणालाही हा ताफा सहज नजरेस पडेल. दूर झाडीमध्ये कोणी निशाणा लावून बसले असेल, तर लाइटमुळे त्यांचं काम फारच सोपं होईल. ‘अवघडच आहे राव इथं सगळं’, असे मनातल्या मनात म्हणून आम्ही अंधाराला मागे टाकत विजेच्या प्रकाशझोतात लखलखणाऱ्या बिजापूरला येऊन पोचलो. 

खूप दिवसांनंतर आम्ही दिव्यांचा प्रकाश पाहिला. गाड्यांची रेलचेल आणि माणसांचा गोंगाट पाहिला. रात्रीच्या मुक्कामासाठी एखादं मंदिर शोधणं भाग होतं. महादेवाचं एक मंदिर आम्हाला सापडलंही. तिथल्या पुजाऱ्यांना विचारून तिथे एक रात्र झोपण्याची सोय झाली. जेवण मात्र बाहेर हॉटेलमध्येच करावं लागलं. त्या रात्री मोठ्या उंदराने आम्हाला नीट झोपू दिलं नाही. रात्रभर त्याचं विचित्र आवाज काढणं आणि इकडून-तिकडे धावणं सुरू होतं. सकाळ झाली तेव्हा बॅगा वगैरे आवरून आम्ही मंदिरातून बाहेर पडलो. जवळच एके ठिकाणी डोसा- उत्तप्पाचा पोटभर नाश्ता केला. बिजापूरमध्ये जर्मनीच्या दोन मुली भेटल्या. त्या दोघी पेशाने डॉक्टर होत्या. उन्हामुळे त्यांचे चेहरे टोमॅटोसारखे लालबुंद झाले होते. दोन वर्षं इथं काम करण्याच्या इराद्याने त्या बिजापूरला आल्या होत्या. बघता-बघता आम्ही बिजापूरला मागे टाकून बासागुडाला जाणाऱ्या दाट झाडीच्या पहाडी रस्त्याला लागलो. इथं टप्प्याटप्प्याला रस्त्यांची कामं चालली होती. 

पाच-पाच किलोमीटर अंतरावर सीआरपीएफचे कॅम्प होते. प्रत्येक ठिकाणी आमची कसून चौकशी व्हायची. ओळखपत्र वगैरे तपासलं जायचं आणि मगच पुढे सोडण्यात यायचं. त्यातले कोणी महाराष्ट्रातील असेल, तर चार शब्द जास्त बोलायचे. ‘‘कुठून आलात? पुढला प्रवास शिस्तीने करा. बासागुडाच्या पुढे दादालोक तुम्हाला अडवतील... तुमची विचारपूस करतील... पण काही अडचण नाही. तुम्ही विद्यार्थी आहात... तुमचे कॉलेजचे ओळखपत्र पाहून तुम्हाला पुढे जाऊ देतील’’ असं ते सांगायचे. मग आमचा हुरूप वाढायचा. 

जसजसं दुपारचं उन वाढू लागलं, तसतसा थकवा जाणवू लागला. मध्यंतरी एका गावामध्ये आम्ही एका शाळेला भेट दिली. तिथल्या सरांनी शाळेबद्दलची बरीच माहिती सांगितली. शाळेचा पट जेमतेम 25-30 होता. संपूर्ण शाळेमध्ये फक्त एकच शिक्षक होते. बाकी सगळे रजा न टाकता गैरहजर होते. काही कारणांमुळे माध्यान्ह भोजन आठवडाभर बंदच होते. विद्यार्थ्यांच्या पहिली सत्र परीक्षेच्या काही उत्तरपत्रिकाही त्या सरांनी आम्हाला दाखवल्या. आश्रमशाळांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारी शाळांमध्ये जास्त पटसंख्या भरत नाही, असं ते सांगत होते. दुपारच्या त्या उन्हामध्ये सायकली चालवणे खूप कठीण जात होते, परंतु थांबून चालणार नव्हते. संध्याकाळपर्यंत बासागुडाला पोचणं गरजेचं होतं. पोटात सकाळपासून काहीच नसल्याने सारं असह्य झालेलं होतं. आम्ही ओढूनताणून सायकली रेटत होतो. 

शेवटी सीआरपीएफचा एक कॅम्प लागला. इथं एखादी चूल पाहून पट्‌कन जेवणं करून घ्यावीत, असा विचार करून आम्ही त्यांच्याकडे विचारणा केली. पण इथे चूल वगैरे नव्हती. तेवढ्यात त्यातला एक जवान म्हणाला, ‘‘रुको, मैं अंदर कुछ है क्या, देख कर आता हूँ।’ तो कॅम्पमध्ये गेला आणि काही चपात्या व एका वाडग्यात कशाची तरी पातळ भाजी घेऊन आला. एका लाकडावर बसून आम्ही ते भराभर खाल्लं. बॅगेतली शेंगदाण्याची चटणी तोंडी लावायला घेतली. जेवण झाल्यावर लगेचच पुढच्या प्रवासाला लागलो. संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आम्ही बासागुडामध्ये पोचलो. हे गाव नकाशामध्ये जरी मोठ्या अक्षरांत लिहिले असले, तरी प्रत्यक्षात मात्र खूपच छोटे आहे. 

‘आता राहायचे कुठे?’ हा आमच्यासमोरचा सर्वांत मोठा प्रश्न होता. नदीच्या शेजारी एका उंचवट्यावर एक छोटं मंदिर दिसत होतं. पण ते खूपच लहान होते, बासागुडामध्ये आल्यापासून लहान मुलांचा गोतावळा आमच्या आजूबाजूला गोळा व्हायला लागला होता. त्यातल्या एका मुलाला विचारलं, ‘‘मंदिरात राहायचं असेल तर कुणाशी बोलायला लागेल.’’ तो आम्हाला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका झोपडीपाशी घेऊन गेला. त्या आजीबार्इंशी तो गोंडीमधून काही तरी कुजबुजला. ‘‘आप मंदिर मे रह सकते हो... लेकिन वो बहुत छोटा है। उससे अच्छा है की आप स्कूल में रहे। मैं  आपको मास्तरजी से मिलवाता हूँ। आप उनसे बात कर लो।’’ असं तो म्हणाला. मग आम्ही त्याच्या पाठोपाठ मास्तरांच्या घराकडे गेलो. 

सगळी मुलं मोठमोठ्याने ‘सरऽऽ सरऽऽ’ अशा हाका मारत होती. पण सर काही बाहेर येत नव्हते. शेवटी काही मुले मागच्या दरवाजातून घरात घुसली आणि सरांना आवाज देऊन बाहेर घेऊन आली. आम्ही आमच्या सायकल दौऱ्याविषयी सरांना सांगितलं. त्यांनी शाळेच्या वसतिगृहात राहण्यास परवानगी दिली. इथली मुलं आमच्यामध्ये चांगलीच मिसळून गेली होती. आम्ही सायकलवरच्या बॅगा उतरवून वसतिगृहात जाऊन हात-पाय धुऊन येतोय तोपर्यंत या मुलांनी आमच्या तिन्ही सायकली पसार केल्या. साऱ्या गावभर डबल सीट, ट्रिपल सीट घेऊन ही मुलं सायकली मिरवत होती. 

आमची बाकीची आवराआवर झाल्यावर मला थोडासा ताप असल्याने दवाखान्यात जाण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा हीच मुलं आम्हाला सीआरपीएफ कॅम्पमधील दवाखान्यात घेऊन गेली. तिथं नागालँडचे एक डॉक्टर होते. त्यांनी माझी थोडीफार तपासणी केली आणि काही गोळ्या-औषधं दिली. रक्त तपासल्यानंतर पुढचा प्रवास करायला काहीच हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर सायकलचा वाकलेला टायर सरळ करण्यासाठी आम्ही नदीपलीकडच्या रिपेअरिंगच्या दुकानाकडे गेलो, पूल ओलांडून पलीकडे गेलो तर चौकात माणसांची खूप गर्दी जमली होती. सायकलचे दुकानही बंद होते. सारे कोंबडा-फाईटमध्ये मग्न होते. सगळ्यांचं लक्ष त्या कोंबड्यांच्या झुंजीवर होतं. सायकल रिपेअरिंग करणारासुद्धा ‘कल सुबह आओ’ असं म्हणून त्या गर्दीमध्ये गायब झाला होता. 

हा सारा गोंगाट पाहून रस्त्यावरून पेट्रोलिंग करत चाललेल्या सीआरपीएफच्या एका साहेबाने ‘यहाँ क्या चल रहा है? देखो तो जरा।’ असा एका जवानाला इशारा केला. त्या साहेबाची नजर माझ्यावर जाताच त्यानं नजरेनंच  खुणवून मला जवळ बोलावून घेतलं. त्यांनी काही विचारायच्या आत मीच आमच्या सायकल यात्रेविषयी त्यांना सांगितलं. ‘कल सुबह मुझे मिलकर जाना’ असं सांगून तो सीआरपीएफचा ताफा तसाच पुढे गेला. मी कोंबड्यांची झुंज संपेपर्यंत तिथेच थांबलो. पूल ओलांडून शाळेच्या आवारात गेलो, तेव्हा अंधार पडलेला होता. माझ्याबरोबर मघापासून फिरणारी ती मुलं ‘हम सुबह जल्दी आयेंगे’ असं म्हणून घरी गेली. विकास आणि श्रीकृष्ण बॅगांमध्ये सामानाची काढ-घाल करत होते. काही मुलांनी गरम पाणी तापवलं. जवळच एका हापशावर जाऊन चंद्राच्या प्रकाशात आणि लुकलुकणाऱ्या चांदण्यांच्या उजेडात आम्ही कशाबशा अंघोळी केल्या. 

रात्रीचं जेवणही खूप छान होतं. वसतिगृहातील मुलं आणि आम्ही सारे एकत्रच पंगत करून जेवायला बसलो. आम्ही घरून आणलेले बुंदीचे लाडू त्यांना खूप आवडले. त्या रात्री वसतिगृहातील मुलांनी बनवलेले जेवण आम्ही पोटभर जेवलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही आवराआवर केली. बासागुडामधून बाहेर पडायला सकाळचे साडेनऊ वाजले. आता इथून पुढचा रस्ता तसा बेताचाच होता. थोडे दूर जातो न जातो तोच सीआरपीएफचा एक कॅम्प लागला. बहुतेक तो सारखागुडाचा कॅम्प असावा. इथे येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणी केली जात होती. आमच्या सायकली आणि बॅगा पाहून त्यांनी बॅगा उघडून दाखवायला सांगितल्या. बॅगेमध्ये काय काय सामान आहे याची नीट तपासणी करण्यात आली. आमची ओळखपत्रे चेक केली. ‘‘आप को कहाँ जाना है? आप इस रास्ते से क्यों जा रहे हो... वहाँ से दंतेवाडा, गिदम के रास्ते से आपको जाना चाहिए था। आप को पता भी है, ये कितना डेंजरस इलाका है।’’ असं चेकिंग पॉइंटवरचा तो धिप्पाड ऑफिसर आम्हाला म्हणाला. पण नियोजनानुसार तर आम्ही याच रस्त्याने जायचे ठरवले होते. 

आम्ही ऐकत नाही हे पाहिल्यावर ‘‘रास्ते पर बीच बीच में माइन्स लगे हुए है। आपकी साइकिल उस पर से गयी तो चुटकी में आप सभी खतम हो जाओगे।’’ असं तो आम्हाला सांगू लागला. तरीही आम्ही ऐकत नाही असं दिसल्यावर तिथल्या एका जवानानं मला बोलावून घेतलं. तो मला सांगू लागला, ‘‘यहाँ अंदर जंगल में बहुत जंगली लोग रहते है। उन्हे हमारी भाषा भी नहीं आती । वे लोग जंगली भाषा बोलते है और कुछ भी खाते है।’’ तेवढ्यात दुसरा म्हणाला, ‘‘उन लोगो ने आपको मार डाला तो आपकी डेड बॉडी कहाँ जमीन में गाड देंगे पता भी नहीं चलेगा। बेहतर होगा की आप दंतेवाडा, गिदम के रास्ते से जाओ। यहाँ से मत जाओ।’’ 

तिथं रस्त्याचं काम चाललेलं होतं. रोड कन्स्ट्रक्शनमधल्यापैकी एक जण महाराष्ट्रातल्या लातूरचा होता. त्याला मराठी चांगलं येत होतं. ‘‘आपला सामानाचा टेम्पो इथून नैमेडला जातो... मी तुम्हाला त्यात बसवून देईन... तुम्ही तिथून दंतेवाडा, गिदममार्गे जा... इथून जायचं काही डोक्यात आणू नका’’ असं तोही सांगू लागला. पण आमची आता माघारी वळायची तयारी नव्हती. आपल्याच देशात आहोत, पुढेही आपलेच बांधव राहतात... आपला उद्देश चांगला आहे... आणि ही माणसं जे काही सांगत आहेत, त्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच आपण इथवर आलो आहोत; मग थोड्यासाठी उगाचच माघार का बरं घ्यायची? 

2016 या नववर्षाची सुरुवात दोन-तीन दिवसांनीच होणार होती. अगोदर ठरवलेल्या निर्णयामधून आम्हाला माघार घ्यायची नव्हती. एखादी गोष्ट नाही केली म्हणून पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा, ती गोष्ट करून पश्चात्ताप करणं कधीही चांगलं. आणि पुढे नक्षलवादी असले तरी ते कारण नसताना आम्हाला कशाला बरं काय करतील? शेवटी नक्षलवादी म्हणजे माणसंच ना, त्यांच्याशी संवाद साधता येईलच की! आमचा असा धांगडधिंगा सुरू असताना अचानक मुख्य साहेब बाहेर आले. त्यांनी आमचे ओळखपत्र पुन्हा एकदा नीट निरखून पाहिले. आणि ‘ठीक है। आप जा सकते हो।’ असं आम्हाला सांगितलं. 

‘आप जा सकते हो’ हे शब्द ऐकू येताच प्रचंड आनंद झाला. घोडा उधळावा तशा आमच्या सायकली उधळत होत्या. निर्मळ स्वभावाचा आणि निरागस मनाचा बस्तरमधला आदिवासी समजून घेण्यासाठी आता आम्ही स्वैर झालो होतो. किर्रऽर्र झाडींमधून जाणाऱ्या निमुळत्या पाऊलवाटेने आम्ही तिघे, माहीत नसलेल्या वाटा धुंडाळत जंगलामध्ये आत-आत चाललो होतो... फक्त माणुसकीच्या भरवशावर आणि माणुसकीच्याच शोधात! 

त्या दुपारी आम्ही सायकली तशा बऱ्याच वेगाने दामटत होतो. अंधार पडायच्या आत जागरगोंडला  पोहोचणे, हा उद्देश. किर्रर्र झाडीतून जाणाऱ्या त्या रस्त्यावर भयाण शांतता होती. डांबर नावाचा प्रकार कुठे अस्तित्वातच नव्हता. मातीचा कच्चा रस्ता होता, तोही थोड्या-थोड्या अंतरावर पाच-सहा फुटांचे खोल खड्डे खणलेला. त्यामुळे रस्त्याऐवजी शेजारच्या झाडाझुडपांतून आम्हाला आमची वाट शोधावी लागत होती. पँटीमध्ये आणि बुटांमध्ये जंगलातली ती कुसळं शिरून टोचत होती. त्यावर उपाय म्हणून आम्ही पायांना वर्तमानपत्रे गुंडाळली होती. दम लागत होता, घाम येत होता, पण... पण त्याला आमच्याकडे इलाज नव्हता. मागे बांधलेल्या मोठाल्या बॅगांसहित तोल सांभाळत, खड्डे चुकवत झाडाझुडपांतून सायकली पळवण्याचा आमचा खेळ सुरूच होता. 

आम्ही जसजसे पुढे जात होतो, तसतशी प्रत्येक पॅडल मारताना मनामध्ये भीती दाटून येत होती. आता एवढ्यात पायाखाली भूसुरुंग फुटेल आणि आपल्या चिंधड्याचिंधड्या उडतील, असं उगाचच वाटत होतं. मागच्याच सी.आर.पी.एफ. कॅम्पवरती आम्हाला तशी शक्यता सांगण्यातही आली होती. पण आपण आपल्याच देशात आहोत, इथे राहणारेही आपलेच भारतीय बांधव आहेत... आपण चांगल्या उद्देशाने आलो आहोत, ‘माणूस म्हणून जगायला शिकण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी’ आलो आहोत... माणसाला माणूस जोडण्यासाठी आलो आहोत, भारतीयत्वाची अन्‌ बंधुत्वाची भावना वाढवण्यास आलो आहोत... काळाच्या ओघात इंडियापासून दुरावलेल्या भारताला जोडण्यास आलो आहोत, त्यामुळे आपणाला काही होणार नाही- अशी आमची धारणा होती. 

‘‘अधेमधे नक्षलवादी तुम्हाला अडवतील. तुमच्याकडे संशयाने पाहतील. पण तुम्ही विद्यार्थी आहात; तुच्याकडील कॉलेजची ओळखपत्रे पाहिल्यानंतर ते तुम्हाला विचारपूस करून सोडून देतील.’’ असं एका सीआरपीएफ कॅम्पवर एक जवानच आम्हाला म्हणाला होता, तेही आठवत होतं. ‘‘उनकी दुश्मनी तो हमसे है, वो आप को क्यूँ कुछ करेंगें?’ असंही तो म्हणाला होता. आपला देश आणि आपली माणसं जाणून घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आम्हा तिघांचा माणुसकीवर विश्वास असल्याने, उद्या कसलीही परिस्थिती उद्‌भवली तरी आपण मात्र पुढच्याशी माणुसकीने वागायचं, असं आम्ही मनाशी पक्कं केलं होतं. 

भामरागडपासून आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये आम्ही बऱ्याच गावांतील लोकांशी संवाद साधत आलो होतो. बऱ्याच अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना आमच्याजवळील चॉकलेट्‌स देऊन त्यांचं गोंडस-निरागस हसणं पाहून आलो होतो. आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांची मोठमोठाली स्वप्नं पाहून आलो होतो. आदिवासींसाठी झटणाऱ्या अन्‌ गोंडी भाषेबद्दल अभिमान बाळगणाऱ्या लालसू वकिलांसारख्या सच्च्या कार्यकर्त्याला भेटून आलो होतो. वैद्यकीय सेवेत स्वत:ला वाहून घेणाऱ्या प्रकाश आमटेंसारख्या डॉक्टरांना भेटून आलो होतो. दर चार-पाच किलोमीटरवर असणाऱ्या सीआरपीएफ कॅम्पमधील जवानांना ‘जय हिंद’ करून सॅल्यूट ठोकून आलो होतो. त्यामुळे मनामध्ये जी थोडीफार भीती मधून-मधून येत होती, ती क्षणार्धात नाहीशी व्हायची, अन्‌ आम्ही त्याच आवेशाने पुढे जायचो. 

सायकलच्या फिरणाऱ्या चाकांबरोबर प्रदेश बदलत होता. प्रत्येक पॅडलसोबत वेगळी माणसं, वेगळा प्रदेश, वेगळी संस्कृती, वेगळी भाषा पाहायला मिळत होती. त्यामुळे अंगामध्ये एक वेगळाच जोश संचारत होता. नद्या- ओढे आले की, पूल नसल्याने बऱ्याचदा पाण्यातून सायकली कशाबश्या काढाव्या लागायच्या. कधी पाण्यातून, कधी रेतीतून, कधी खडकातून, कधी शेतातून, तर कधी झुडपांतून आमच्या सायकलींची चाके फिरत होती. पण आमची नजर मात्र सतत समोरचा वेध घेत होती. दुपारची दोन-अडीचची वेळ असेल ती. आम्ही एका छोट्याशा गावात पोहोचलो होतो. मोजकेच आदिवासी पाडे दिसत होते. तिथल्या एका हातपंपावर आम्ही पाणी भरून घेतलं. आजूबाजूची माणसं आमच्याकडे बावरून पाहत होती. त्यातल्या एकाने आमची विचारपूस केली अन्‌ आम्हाला थोडं आतल्या बाजूला घेऊन गेला. बघता- बघता गर्दी वाढत गेली. आम्हाला एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली उभं करण्यात आलं. पंचवीस-तीस जणांचा घोळका आमच्याभोवती जमा झाला. सगळे गोंडीमध्ये एकमेकांशी कुजबुजत होते. त्यातील काही जणानांच आमच्यासारखी मोडकी-तोडकी हिंदी येत होती. 

खांद्यावर रेडिओ अडकवलेल्या त्यातील एकाने आम्हाला ‘‘पुलिसने तुम्हे बासागुडा के आगे कैसे आने दिया? उन्होंने तुम्हे रोका नहीं क्या?’’ असे विचारले. कदाचित तो त्यांच्यातला म्होरक्या असावा. पण तोच आमच्याशी थोडंफार शांततेनं बोलत होता, बाकीचे सारे आमच्याकडे संशयानेच पाहत होते. थोड्या वेळाने आमचे खिसे चेक केले गेले. श्रीकृष्णाच्या खिशामध्ये नकाशा होता. ‘नकाशा तर फक्त पोलिसांकडे किंवा दादालोकांकडेच असतो; यांच्याकडे हा  नकाशा कसा काय?’ असं वाटून, आम्ही पोलिसांचे खबरे असल्याचा संशय त्यांना आला. कृष्णाच्या खिशामध्ये नकाशा पाहिल्याबरोबरच बनियनवर असणारा त्यांच्यातील एक जण खूपच ॲग्रेसिव्ह झाला. ‘‘तुम क्या करते हो? क्या पढते हो?’’ असं विचारू लागला. ‘‘हम ग्रॅज्युएट है’’ असं आम्ही सांगितलं. ‘‘तुम्हे पता है, मै कितना पढा हूँ? मै बारहवी तक पढा हूँ । तुमसे आगे जादा पढा हूँ।’’ असं म्हणत तो आमच्याशी आणखीनच मोठ्या आवाजात बोलू लागला. 

आम्हाला आता काय करावं, सुचत नव्हतं. पण मघाच्या त्या रेडिओवाल्याने त्याला अडवलं. तो त्याला खूप ओरडला- ‘‘बात करनी है तो ठीकसे कर’’ असं त्यानं त्याला सांगितलं. तोपर्यंत काही जण कोणत्या तरी झाडाच्या सालीपासून बनवलेला काथ्या घेऊन आले होते. एक-दोघांनी पुढे येऊन त्या काथ्याने आमचे हात बांधले. नंतर आम्हाला आणखी थोडं आतमध्ये नेण्यात आलं. आम्हा तिघांना वेगळं, एकमेकांपासून दूर बसवलं गेलं. आमच्या बॅगा आमच्या पुढ्यात आणून ठेवण्यात आल्या. पाणी मागितल्यावर त्यांच्यातीलच एखादा गडबडीने जाऊन पाणी घेऊन यायचा. आमचे हात बांधलेले असल्याने त्यालाच आम्हाला पाणी पाजावे लागायचे. 

आता तिथं निमुळत्या तोंडाचा, सावळ्या रंगाचा आणि साधारणत: तीस-पस्तीस वयाचा एक जण आला. फाटलेला बनियन अन्‌ लुंगी घातलेला. त्याला कदाचित जरा जास्त हिंदी येत असावी. त्याने आमच्या प्रत्येकाची सेपरेट चौकशी केली. हातामध्ये धारदार विळा धरलेल्या त्याने ‘तु इधर क्यूँ आये हो? कहाँ के रहनेवाले हो? आगे कहा जाना है? क्या पढते हो?’’ वगैरे वगैरे प्रश्न विचारले. आम्ही आपलं आमच्यापरीने त्यांना सगळं व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केला. तो काही तरी लिहून घेत होता. बहुतेक हाच दादालोकांना वरती आमच्याबद्दल रिपोर्टिंग करायला जाणार असावा. आमच्या तिघांचे जबाब एकसारखे येतात का, हेही त्याने चेक केले. नंतर आमच्या सॅकमधील सर्व सामानाची नीट तपासणी करण्यात आली. 

कोणी एखादा बॅगेतील सामानाला हात लावू लागला, तर दुसरा लगेच त्याला ओरडायचा. कोणी एखादी वस्तू घेतली असेल, तर दुसरा त्याला ती परत जागच्या जागी ठेवायला सांगायचा. ‘‘बस्तर का नाम खराब हो जायेगा -’’ असं त्याला म्हणायचा. त्यांची इमानदारी पाहून आम्हाला आश्चर्य वाटत होतं. बॅगेतील एखादी खायची वस्तू किंवा कॅडबरी आम्ही त्यांना देऊ लागलो, तर ‘आपको वह आगे लगेगी’ असं म्हणून ते ती वस्तू घेणं टाळायचे. आमची व्यवस्थित तपासणी झाल्यानंतर आम्हा तिघांना पुन्हा एकाच ठिकाणी आणण्यात आलं. ‘‘आपको दो दिन रुकना पडेगा, दादालोग आ कर आपकी पूँछताँछ करेंगे। तब तक आपके खाने की और सोने की व्यवस्था हम करेंगे। आप डरना मत, आपको कुछ भी नही होगा। जाँच करके आपको छोड दिया जाएगा।’’ असं त्यांचा मुखिया आम्हाला म्हणाला. 

आम्ही सुरुवातीला ठामपणे नकार दिला, पण त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. आता आम्हाला आणखीनच आतल्या बाजूला नेण्यात येत होते. शेताच्या बांधा- बांधावरून जाताना दूरवर आदिवासी पाडे दिसत होते. काही पाड्यांच्या वऱ्हाड्यांत काळवंडलेल्या चेहऱ्याची माणसं, उघड्या छाताडाची पोरं अन्‌ फाटकं लुगडं छातीवर लपेटलेल्या काही महिला उभा होत्या. आमचे हात दोरीने बांधले असल्याने आमच्याकडे सारेच बावरून प्रश्नार्थक नजरेनं पाहत होते. वाटेत एका झोपडीमध्ये केस मोकळे सोडलेली एक महिला विचित्रपणे अंग हलवताना दिसत होती. 

समोर बरेच लोक बसलेले होते. सारे जण गोंडीमधून काही तरी मंत्र पुटपुटत होते. (इथे जवळ कुठे दवाखान्याची सुविधा नसल्यामुळे कोणी आजारी वगैरे असेल, तर ते तांत्रिक-मांत्रिकाकडेच जातात. बुवाबाजीमुळे जरी आजार बरा होत नसला तरी, बिचाऱ्या आदिवासीला त्यातून मानसिक आधार मात्र नक्की मिळतो. आई-बाप मरणाच्या दारात उभे असताना जवळ कुठे दवाखाना नसल्यामुळे दीडदमडीच्या गरीब आदिवासीला डॉक्टरकडे जाणे शक्य नसले, तरी गावातल्या मांत्रिकाकडे जाणे मात्र त्याच्या हातात असते. बुवाबाजीतून काहीही निष्पन्न होणार नाही हे माहिती असूनही हातातील एकमेव पर्याय ते स्वत:च्या मनाची समजूत काढण्यासाठी वापरून पाहतात.) 

आम्ही त्या अंधश्रद्धेवर काहीही भाष्य न करता तसेच पुढे चालत होतो. आमच्या आजूबाजूची माणसं चालता-चालता आपापसात काही तरी कुजबुज करत होती; पण ते गोंडीमधून काय बोलतायत, हे आम्हाला समजत नव्हते. मग आम्ही गोंडीतील काही शब्द शिकण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘‘आपके यहा पेड को क्या बोलते है? मुर्गी को क्या बोलते है? खेती को, गांव को क्या बोलते है?’’ असा एकावर एक प्रश्नांचा सपाटाच आम्ही लावला. त्यांनाही त्यांची भाषा सांगायला चांगलं वाटत होतं. असं करत करत आम्ही गाववाल्यांना थोडंफार फ्रेंडली करायला सुरुवात केली होती. वातावरण जरासं नरम झालं होतं. मघाशी रागारागाने बोलणारे आता जरा ढील देऊन बोलू लागले होते. बराच वेळ झाला, आम्ही चालत होतो. इथं काही जण आमच्या बॅगा वाहत होते, तर काही जण आमच्या सायकली. आम्ही मात्र मोकळेच चालत होतो. 

पुढे भाताचे एक खळे लागले. त्याच्या मधोमध लाकडाचा एक छोटासा खांब होता. आजूबाजूला वाळलेला चारा पसरला होता. भोवताली चिंचेची अन्‌ तेंदूची झाडं होती. दुपारची वेळ असल्याने उन्हाचा कडाका बराच होता. आबूझमाड पहाडाच्या प्रदेशात प्रवेश करताना त्यांच्यातील एकाने कुठून तरी निळ्या रंगाचे बारदान आणून लगबगीने भाताच्या खळीच्या मधोमध अंथरले. त्यावर आमचे सामान आणि आम्हाला बसवण्यात आले. बाकीच्यांनी आमच्या आजूबाजूलाच अंग टाकले होते. सर्व जण प्रकृतीने तसे किडमिडेच होते, पण त्यांच्यामधील काटकपणा मात्र लगेचच जाणवत होता. बऱ्याच जणांना आमच्या सायकलींचं कुतूहल वाटत होतं. ‘‘ये सायकल कितने की है? किधर से लाई है?’’ असं मधूनच कोणी तरी विचारायचं. एखाद-दुसरा उठून सायकलचे ब्रेक, पॅडल, मडगार्ड वाकून-वाकून पाहायचा. श्रीकृष्णच्या एकवीस फिरविलच्या सायकलचं तर त्यांना खूपच नवल होतं. दोघा-तिघांनी हौसेनं आमच्या सायकली फिरवूनही पाहिल्या. सायकल चालवताना ते गालातल्या गालात मस्त हसायचे. इथे सायकली तशा क्वचितच कोणाकडे तरी. बहुधा सर्व जण कुठे दूरच्या गावाला जायचे झाले, तर पायीच जातात. 

मागे एका ठिकाणी आम्ही हौसेने पोलिसांबरोबर फोटोही काढले होते. उगाच कोणी ते पाहिले तर भलतेच काहीतरी घडायचे, म्हणून आम्ही ते मेमरीकार्ड तोडून टाकण्याचं ठरवलं. घरून आईने कळ्याचे लाडू बनवून दिले होते. ‘‘हमारे इधर के लड्डू खा के देखो कैसे लगते है’’ असं म्हणून आम्ही त्यांना लाडू वाटले. तेंदुपत्त्याचे द्रोण तयार करून सगळ्यांनी लाडवाचा चुरा त्यामध्ये घेतला. चवीला गोड लागणारा हा पदार्थ त्यांना खूपच आवडला. त्या मधल्या वेळेत मी कृष्णाला मेमरीकार्ड तोडून टाकण्यासाठी खुणावले. कृष्णानेही ते चपळाईने बॅगेतल्या बॅगेतच तोडलं. 

आम्हाला आता पुढे काय होणार आहे, ते माहीत नव्हतं. आम्ही थोडा वेळ तसेच त्या बारदानावर आडवे झालो. त्या वेळी आकाशातून एक विमान जाताना दिसत होते. साऱ्यांप्रमाणे आम्हीपण त्या विमानाकडे अधाशाप्रमाणे एकटक पाहत राहिलो. ते पाहून किडमिडीत प्रकृतीच्या अन्‌ सावळ्या रंगाच्या त्यांच्यातील एकाने आम्हाला खूप कुतूहलाने विचारलं, ‘‘आपके यहाँ से भी ऐसा विमान जाता है क्या?’ ‘‘हमारे इधर से हर रोज जाता है । आप को पता है क्या, की ये कहाँ से आया है और कहाँ जा रहा है? इसमें इन्सान बैठता है ना? आप कभी बैठे हो क्या?’’ आम्ही त्याच्या या निरागस प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सूर्याकडे पाहून दिशेचा अंदाज घेऊ लागलो. 

तोच चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या समोरच्याने पुन्हा प्रश्न केला, ‘‘आपके यहाँ भी सूरज इसी दिशा से उगता है क्या?’’ मग आम्ही त्यांना रात्र व दिवस कसा होतो, पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते आणि जगात सगळीकडे सूर्य एकाच दिशेला कसा उगवतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला. ते विमान विशाखापट्टणम्‌ किंवा चेन्नईहून मुंबई किंवा दिल्लीला जात असावे, असा तर्क लावला. पण त्यातल्या कोणालाही यातली कोणतीच गावे ओळखीची नव्हती. (इथली माणसे अजूनही विमानाला देवदूत समजतात. माणूस मेल्यानंतर त्याच्या थडग्यावरती लाकडी विमाने लावतात. आम्ही महाराष्ट्रात म्हणजे कुठे राहतो, हे सांगायला आम्हाला त्यांना ‘हम समुंदर के पास रहते है। हमारे गाँव से समुंदर सौ किमी दूर है। असं सांगावं लागायचं. त्यांना फक्त महाराष्ट्र म्हटलं तर एकच माहिती होती की, तिथली - चंद्रपूर, गडचिरोली - माणसं तेंदुपत्ता तोडायला इथे येतात अन्‌ त्यांना आंध्रही माहीत होतं, कारण इथली माणसं सीझननुसार मिरच्या तोडायला आंध्रमध्ये जातात. 

इथे प्रत्येकाला साधारणत: पाच-सहा एकर शेती आहे. पण सिंचनाची कसलीच व्यवस्था नसल्यामुळे सगळं ढगातून पडणाऱ्या पाण्यावरच अवलंबून. तसे इथे प्रामुख्याने धानाचेच पीक घेतले जाते. आम्ही तिथे होतो तेव्हा लोकांचं धान काढणं चालू होतं. बऱ्यापैकी लोक आपलं धान सरकारलाच विकतात. मग गव्हर्न्मेंट ते स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरिबांपर्यंत पोहोचवते.) बघता-बघता अंधार पडायला आला होता. हवेतला गारठा वाढला होता. जवळच एक मोठी शेकोटी पेटवण्यात आली. आम्ही सगळेच शेकोटीच्या भोवतीने गोलाकार बसलो. दुपारी बांधलेले हात कधीच सोडले गेले होते. शेकोटीच्या उबेमध्ये थोडे बरे वाटत होते. शेकोटीला गोंडी भाषेत ‘कीस्स’ असे म्हणतात, हे तिथल्या एका मुलाने आम्हाला सांगितले. त्यानेच मघाशी आम्हाला आमच्या डायरीच्या पानावर थोडीशी गोंडी शिकवण्याचा प्रयत्न केला होता. तो बाहेर आश्रमशाळेत शिकायला असल्याने त्याला थोडी समज होती. पण नंतर त्याने डायरीतले ते पान काढून घेतले. ‘‘वह लोग आयेंगे तो डाटेंगे। वे आ जाने के बाद मैं ये आपको दे दूँगा।’’ असं तो म्हणाला. 

आता जवळजवळ काळोखच पसरला होता. तिथे आमच्यापासून काही अंतरावरच विस्तव पेटवून कोणी तरी भात शिजायला ठेवला होता. नंतर आमच्यासाठी जर्मलच्या ताटांचा बंदोबस्त करण्यात आला. भातावर कसलीशी भाजी अन्‌ सोबतीला माशाचे कालवण होते. त्यांच्यातील एक जण सर्वांना वाढण्याचे काम करत होता. मग मीही त्याला थोडं वाढू लागलो. सगळ्यांना वाढून झाल्यावर ‘आप सभीका खाना होने के बाद मैं खा लूंगा।’ असं म्हणणाऱ्या त्या वाढणाऱ्याला पण आम्ही आमच्याबरोबर जेवायला बसवलं. सारे गावकरीच होते. सर्वांनी स्वत:ला तेंदुपत्त्याच्या पानांवरच वाढून घेतलं होतं, आम्हाला मात्र जर्मलची ताटं. मग आम्हीपण ताट बाजूला सारून पानांमध्ये जेवण केलं. भाजी कशाची आहे ते अंधारात दिसत नव्हतं, पण भूक लागल्याने आम्ही ती पोटात ढकलत होतो. वाढणारा माणूस खूप प्रेमाने वाढायचा. त्यामुळे पोट भरलं असलं तरी जरासुद्धा खरकटं टाकता येत नव्हतं. 

भाताचं जजमेंट येत नसल्याने आमच्यातल्या कोणाचं ना कोणाचं थोडंसं तरी खरकटं राहायचंच. आम्ही जबरदस्तीनं पानातलं संपवण्याचा प्रयत्न करतोय असं दिसल्यावर तेच आम्हाला ‘जात नसेल तर राहू दे’ असं म्हणायचे. शेकोटीभोवती बसून त्याच उजेडात जेवण करत असल्याने थंडी काही वाजत नव्हती. जेवता- जेवता श्रीकृष्णने समोरच्याला ‘यहाँ शादी कैसी होती है?’ असं विचारलं. विशेष म्हणजे, लग्नाच्या वेळी मुलाच्या वडिलांना इथे मुलीच्या वडिलांना हुंडा द्यावा लागतो. त्यामध्ये ‘दोन डुकरं, चार कोंबड्या, एक पिशवी धान’ असं असतं. मुलीचा होकार असेल, तरच लग्न ठरवलं जातं. स्त्रीभ्रूणहत्येचा प्रकार काय असतो हे तर इथल्या गोंड आदिवासींना माहीतच नाही. मग आम्ही त्यांना आमच्याकडची परिस्थिती सांगितली. ‘‘हमारे इधर कुछ बडे बडे अमीर लोग, पढे-लिखे लोग भी लडकी हुई तो उसे पेट में ही मार देते है। लडका हुआ तो ठीक है, लडकी हुई तो उन्हे अच्छा नहीं लगता।’ हे ऐकून ते अवाक्‌ झाले. त्यातला एक छाताड पुढे करून म्हणाला, ‘‘हमारे इधर ऐसा नहीं होता। मुझे तीन लडकियाँ है। तिनोंभी आश्रमशाला में पढती है।’ आम्हाला हे ऐकून बरं वाटलं. ‘उन्हे बहुत पढाओ’ असं आम्ही त्याला सांगितलं. 

आता आमचे डोळे तारवटले होते. ‘‘असंच उघड्या आकाशात झोपलो, तर सकाळी अंगावर दव पडून आपण पार भिजून जाऊ. झाडाखाली झोपल्यावर सारं दव पानांवर पडतं आणि त्यामुळे आपण भिजत नाही.’’ हे आम्हाला एकानं सांगितलं. त्या भाताच्या खळ्यापासून चार पावलं दूरवर एक चिंचेचं झाड होतं. झाडाखाली बराच वाळलेला चारा होता. त्या रात्री आम्ही तसेच गवताच्या चाऱ्यावर बारदान टाकून झोपी गेलो. आमच्या आजूबाजूला बरेच जण कलंडले होते. ‘पेशाब को जाते समय हमे बता कर जाना। और रात को कही भागने की कोशिश मत करना।’ असं त्यांनी आधीच बजावलं होतं. आमच्या सायकली कोणत्या तरी पाड्यात ठेवण्यात आल्या होत्या. ‘रात को पुलिस आयी तो आपको हमारे साथ भागना पडेगा’ असं त्यांनी झोपतानाच सांगितलं. पण पोलीस यायच्या आधी आम्हाला बातमी येते, असंही ते म्हणाले होते. 

त्या रात्री आजूबाजूचे सगळे बऱ्याच उशिरापर्यंत गोंडी भाषेत काही तरी कुजबुज करत होते. ते आमच्याविषयीच बोलत आहेत, याची जाणीव आम्हाला होती. तशा अवस्थेत काळ्याकुट्ट आभाळाकडे पाहत आम्ही झोपण्याचा प्रयत्न करत होतो. सकाळ झाली तेव्हा सूर्यप्रकाश डोळ्यांवर पडला होता. रात्रीची शेकोटी पुन्हा पेटवण्यात आली होती. शेजारच्या तेंदुपत्त्याच्या झाडाच्या काड्यांनीच आम्ही त्या दिवशी दात घासले. हातपंपावर जाऊन हात-पाय धुतले. तेव्हा ‘‘आप शहरी लोगों को सुबह चाय नाश्ता लगता है । हम तो सिर्फ दो बार खाना खाते है।’’ असं म्हणून आमच्यासाठी चहा बनवण्याची तयारी चालली होती. आम्ही नको-नको म्हणत होतो, तरी गाववाल्यांनी आमच्यासाठी साखर व चहापत्तीची जुळवाजुळव केली. एका पाड्याबाहेरील चुलीवर पातेलं ठेवलं गेलं. 

‘‘हमे चाय बनाना नहीं आता, आपके पसंद से आपको जैसा चाहिए वैसा चाय आप खुदही बना लो।’ असं म्हणून त्यांनी आम्हाला पाण्यामुळे चिकट झालेली साखर आणि चहापत्तीचं एक छोटंसं पाकीट दिलं. मागे नौमेडच्या इथे आम्ही दुधाची पिशवी आणि कॉफीचा एक पुडा घेतला होता. ते सगळंच पातेल्यात मिक्स करून पाड्यातल्या लोकांसहित दहा-बारा जणांचा चहा आम्हीच हाताने बनवला. जर्मलचे ग्लास तीन-चारच होते. त्यामुळे आम्ही एकाचा झाल्यावर दुसऱ्याने असा आलटून-पालटून चहा प्यायला. पाड्यातल्या महिलांना पण आमच्या हातचा चहा आवडला होता. सगळ्यात शेवटी आम्ही चहा प्यायला. आमच्या बॅगा बाजेवरच होत्या. कोंबड्या आणि बदकं हळूच येऊन आमच्या बॅगेवर अधूनमधून टोची मारायचे. मग तिथलं एखादं कुणी तरी मोठ्यानं कसलासा आवाज काढून त्यांना हुसकवायचं. आता जेवणाची तयारी सुरू झाली होती. 

चुलीजवळ बसलेली आणि आश्रमशाळेचा मळकट ड्रेस घातलेली ती  मुलगी अजून आठवते. ‘‘हमारे पास चावल वगैरा सब कुछ है। क्यूँ ना हम उसकाही खाना बनाए?’’ ‘‘हमारी वजह से आप को परेशानी ना हो।’’ असं आम्ही म्हणल्यावर ‘‘नहीं दादा, हमारे पास भी धान है ना। हम सब मिलकर यही खायेंगे ना।’’ असं किती निरागसतेनं म्हणाली होती ती. ‘माणसाला सुंदर दिसण्यासाठी त्याचं सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर आणि निरागस मन’ हे आता खरोखरच मनाला पटलं होतं. अन्‌ त्यावर जर निर्मल हास्य असेल तर, जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही. तिची ती निरागसता पाहून क्षणभर मला माझ्या बहिणीचीच आठवण येऊन गेली. कालप्रमाणे आजही आम्ही पानावर भात घेऊनच जेवलो. सोबतीला दोन-तीन केळीही होती. 

काल ज्यांनी आमचे हात बांधले होते, त्यांनीच आज स्वत:च्या परसातली केळी आणून दिल्याने आम्हाला त्यांचं नवल वाटत होतं. उन्हाचा तडाखा आता वाढला होता. (वरून गवताचं छप्पर अन्‌ बाजूने मोकळ्या असणाऱ्या एका झोपडीत असणाऱ्या खांबावर एक मोठ्ठा आणि निमुळत्या आकाराचा वाळलेला भोपळा अडकवला होता. त्याचा वापर आदिवासी बाटलीसारखा करतात. उन्हाळ्यात त्यातलं पाणी थंड राहतं. तिथंच वरती मक्याची काही कणसं वाळायला घातली होती. वरच्या फळ्यांवर एक धनुष्यही ठेवलेलं दिसत होतं. इथं शिकारीसाठी धनुष्य-बाणच वापरतात.) दूरवर शेताच्या बांधा-बांधाने बरेच लोक हातामध्ये एक-दोन कोंबडे घेऊन एकापाठोपाठ एक असे कुणीकडे तरी जात असल्याचे दिसत होते. त्या दिवशी कुठे तरी कोंबडा बाजार होता. कोंबडा बाजार म्हणजे जशा आपणाकडे बैलांच्या शर्यती असतात तशा इकडे कोंबड्यांच्या झुंजी. कोंबड्यांच्या पायांना सुरे बांधले जातात आणि खास त्यासाठी बनवलेल्या अन्‌ लाकडी कंपाऊंड असणाऱ्या मैदानात त्यांच्या झुंजी लावल्या जातात. बघणारे लोक कोंबड्यांवर पैसे पण लावतात. ज्याचा कोंबडा फाईट जिंकेल, त्याला हरलेला कोंबडा बक्षीस म्हणून मिळतो. जर कोंबडा जिंकला तर संध्याकाळच्याला भाताबरोबर कोंबड्याची भाजी खायला मिळते अन्‌ हरला तर हातचा कोंबडाही जातो. 

लहानलहान पोरंसुद्धा गळ्यात रुमाल बांधून, मळका अन्‌ चुरगाळलेला एखादा शर्ट अडकवून आणि एका हातात धनुष्य तर दुसऱ्यात कोंबडा घेऊन ऐटीत चालत निघाली होती. त्यांच्या चालण्यात एक वेगळीच ढब होती. आमच्या राखणीला असणारा शाही हातात कोंबडा पकडून पुढे गेलेल्या गाववाल्यांना हाका मारत त्यांच्या मागे गडबडीने धावत गेला. जाता-जाता ‘‘आप इधरीही ठहरना। इधर उधर जाना मत। भागना मत। दादा लोग आज आ जायेंगे।’’ असं सांगून गेला. ‘‘आप चिंता मत करो, हम कही नहीं भागेंगे। आप फाईट जितकर आना। फिर हम रात को कोंबडी की सब्जी खायेंगे’ असं आम्ही त्याला म्हटलं. मग शाहीने मस्त मान डोलवली अन्‌ तो त्याच्याच धुंदीत गाववाल्यांमागे धावत जाऊन त्या झाडींमध्ये दिसेनासा झाला. 

आता उन्हाचा जोर वाढला होता. पोटभर जेवण केल्याने आम्हालाही तंद्री आली होती. जाता-जाता शाही आमच्यासाठी तीन बाजांची सोय करून गेला होता. गळ्यातला टॉवेल तोंडावर टाकून आम्ही झोपण्याचा प्रयत्न करत होतो. झोप लागत नव्हती, पण विचारांच्या तंद्रीमध्ये वेळ मात्र भराभरा चालला होता. आज ते लोक येणार होते. ते कधी येतील, कसे असतील, काय विचारतील, आपल्याशी कसे वागतील... याच विचारांमध्ये आमची दुपार चालली होती. 

संध्याकाळचे चार वाजले असतील, तोच समोर बसलेला माणूस आम्हाला हातवारे करून उठवू लागला. ‘‘उठोऽ उठोऽऽ दादा लोग आ रहे है।’’ आम्ही ताड्‌दिशी उठून बसलो. इकडे-तिकडे माना हलवून पाहू लागलो. आदिवासी पाड्याच्या एका बोळीतून गर्द हिरव्या काळपट रंगाचा गणवेश परिधान केलेले काही जण आपापसांत बोलत आमच्याच दिशेने येताना दिसत होते. बघता-बघता ते आमच्या झोपडीसमोर आले. त्यातले काही जण वाकून आमच्याकडे बावरून बघत होते. त्यांच्यामध्ये काही महिलाही होत्या. काय करावं, ते आम्हाला समजत नव्हतं. ते सारे आमच्याकडे पाहून आपापसांत गोंडीमध्ये काही तरी कुजबुजत होते. त्यांच्या पाठीवर कसल्याशा बॅगा अन्‌ बंदुकाही अडकवलेल्या होत्या. त्यांच्यातला एक जण त्याच्या रुबाबावरून अन्‌ तीक्ष्ण नजरेतून म्होरक्या असल्याचं जाणवत होतं. तो आमच्यावर नजर फिरवून कसलासा अंदाज घेत होता. शेवटी आम्हीच हसत-हसत ‘‘आइए, आइए... बैठिए । बहुत देर कर दी... हमे तो लगा था की आप सुबह ही आओगे’’ असं दबक्या आवाजामध्ये म्हणत त्याला आत बोलावलं. 

केस विस्कटलेला, गव्हाळ रंगाचा, गोलाकार  चेहऱ्याचा आणि साधारण शरीरयष्टीचा तो आमच्यासमोरच्या बाजेवर बसला होता. आयुष्यात पहिल्यांदाच नक्षलवादी नावाची व्यक्ती आम्ही पाहत होतो. काही क्षण गेले तरी समोरच्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा काही केल्या बदलत नव्हत्या. तो आमच्याकडे एकटक पाहत होता, आम्ही त्याच्या बोलण्याची वाट पाहत होतो. कारण तो काही बोलला तर आम्हालाही त्याच्याशी बोलता येणार होतं. असं त्याच्या नुसत्या एकटक बघण्यातून त्याच्या मनातलं काहीच समजत नव्हतं. ‘‘आप के पास मोबाईल वगैरा है क्या?’’ असं त्यानं शांत आवाजात आम्हाला विचारलं. ‘‘रेकॉर्डिंग वगैरा कुछ मत करना’’ असं त्यानं ठणकावून सांगितलं. माझ्या खिशातला मोबाईल मी त्याच्याकडे दिला. त्याने तो मोबाईल हातात घेऊन थोडेफार इकडे-तिकडे केले अन्‌ शेजारी ठेवून दिला. मग आमची विचारपूस सुरू केली. ‘‘तुम इधर से ही क्यूँ आए? आगे कहाँ तक जाना है? कहाँ से आए हो? किस लिए आए हो? क्या पढते हो?’’ वगैरे वगैरे. पुन्हा तेच प्रश्न. आम्ही आमचा सगळा प्रकार त्याला सांगितला. 

समोरच्याच्या चेहऱ्यावरील रेषा आता कुठे थोड्या सैल झाल्या होत्या. ‘‘आप को डर नहीं लगता क्या? पुलिस यहाँ से आठ-दस किमी पे हैं और आप यहाँ ऐसे ही घुमते हो?’’ असं आम्ही म्हटल्यावर तो त्याच्याच धुंदीत हसला. नंतर बाहेर जाऊन त्याने गाववाल्यांशी काही तरी चर्चा केली, अन्‌ आम्हाला पुढील गावात हलवण्यात येणार असल्याची माहिती दिली. ‘‘मेरे उपर का... यहाँ का कमांडर आप को मिलेगा। वही आपकी पूछताछ करेगा और फिर आप को छोड दिया जाएगा। चिंता मत करो, वहाँ आपको कुछ नहीं होगा। दो दिन में ही आप को छोड देंगें।’’ असं म्हणून तो तिथून निघून गेला. जाता-जाता त्यानं आम्हाला गाववाल्यांसोबत फोटो काढण्याची परवानगीही दिली. आम्ही पटापट बॅगा आवरून सायकलींना बांधल्या.  पाड्यातील सर्वांना आमच्याकडील कॅडबऱ्या दिल्या अन्‌ गाववाल्यांसोबत एक फोटो काढून आम्ही पुढील प्रवासासाठी सायकलींची चाकं वळवली. 

मघाशी राखणीला असणारा एक जण आणि गावातला आणखी कुणी तरी असे दोघं आम्हाला पुढच्या गावात सोडणार होते. सकाळी कोंबडी बाजाराला गेलेला शाही फाईट जिंकला की हरला, ते समजलेच नाही. पण इथल्या या अशा तणावपूर्ण अस्वस्थ वातावरणात त्यांच्यासाठी मुर्गी बाजाराच काय ती करमणुकीची गोष्ट होती. सकाळी काखेमध्ये कोंबडा घेऊन जाताना शाहीच्या चेहऱ्यावरचा उत्साह किती ओसंडून वाहत होता! तणावाखाली जगणाऱ्या आणि स्वत:चेच अधिकार गमावून बसलेल्या त्या बिचाऱ्याला प्राण्यांच्या अधिकारांची जाणीव असण्याचा प्रश्नच उद्‌भवत नव्हता. शिकारीवर जगणाऱ्या शाहीसारख्या गोंडी, कोया आदिवासींना निसर्गाचा एकच नियम माहीत आहे- ‘जंगल आहे म्हणून ते आहेत आणि ते आहेत म्हणून जंगल आहे.’ 

आता आम्ही त्या पाऊलवाटा तुडवत घनदाट झाडींमधून चाललो होतो. ‘दो घंटे लगेंगे’ असं ते दोघं मघाशी म्हणालेच होते. बराच वेळ झाला तरी आम्ही चालत होतो, पण गाव येत नव्हते. वाटेमध्ये जुरू भेटला. त्यानेच काल आम्हाला थोडीफार गोंडी शिकवण्याचा प्रयत्न केला होता. किरकोळ शरीरयष्टीचा अन्‌ लांबट चेहऱ्याचा सुरेश कोण्या एका आश्रमशाळेत सहावीसातवीत शिकत होता. इथल्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी होती. हसण्यात अन्‌ बोलण्यात एक वेगळंच सौंदर्य होतं, काटकपणा होता. जीवनात असंख्य वेदना असल्या तरी चेहऱ्यावर आनंद होता. पण तणावाच्या छाया काही ते लपवू शकत नव्हते. ‘खुद का खयाल रखो और बहोत पढाई करना’ असं सुरेशला म्हणून आम्ही त्याचा निरोप घेतला. कधी शेताच्या बांधा-बांधाने तर कधी दाट झाडीमधून आमची पायपीट चालू होती. असे करत आम्ही कोणत्या तरी गावाच्या वेशीवर आलो होतो. 

एका उंच दगडापाशी आम्हाला उभे करून आमच्यासोबतचे ते दोघे पुढे कुणाला तरी बोलवायला गेले. आम्ही त्या दगडांवर मांड्या टेकल्या. त्याच वेळी कृष्णाला एका बॅगेत विकासचे यू.पी.एस.सी.च्या क्लासचे ओळखपत्र सापडले. उगाचच कुणाला वेगळा काही तरी संशय यायला नको म्हणून आम्ही ते हळूच लायटरने कसेबसे जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. अर्धवट जळालेल्या त्या प्लॅस्टिकच्या कागदाचे बारीक तुकडे करून आम्ही ते लांबवर लघवीला गेलो तेव्हा टाकून दिले. ‘आपण ते जाळताना कुणी पाहिले नसेल ना? नाही तर आम्ही काही तरी जाळले म्हणून त्यांचा संशय विनाकारण आणखीनच बळावणार!’ असा आम्ही विचार करत असतानाच दुरून गावातून काही जण येताना दिसले. आम्ही थोडेसे सावरून बसलो. 

आता इथवर आमच्यासोबत आलेले दोघे परत जाणार होते अन्‌ सायकलवरचा एक उंच, कुरळ्या केसांचा मुलगा आम्हाला पुढल्या गावात घेऊन जाणार होता. आम्ही त्या गावाच्या दिशेने चालत होतो. गावातून चालताना माणसांचा खूपच गोंगाट ऐकू येत होता. आज जो मुर्गी बाजार होता, तो इथेच जवळ कुठे तरी भरला होता. त्याचाच हा आवाज होता. थोडं पुढं गेल्यावर एका मोठ्या झाडाखाली आम्ही थांबलो. सायकलवरचा तो उंच मुलगा आम्हाला, ‘‘आप इधरही ठहरो। मैं उधर जा कर थोडीही देर में आता हूँ।’ असं म्हणून त्याच वाटेने समोरच्या झाडीमध्ये दिसेनासा झाला. तिथल्या काही जणांनी लगबगीने आमच्यासाठी एक बाज टाकली आणि ते जवळच्याच एका वाळलेल्या ताडीच्या पानावर बसले. त्यांना हिंदी येत नव्हती आणि आम्हाला गोंडी. बराच वेळ आम्ही असेच बसून होतो. मी त्यांच्या जवळच जमिनीवर कलंडलो होतो. विकास बाजेवर अंग टाकून झोपला होता अन्‌ श्रीकृष्ण त्याच्याशेजारी निपचित पडला होता. त्या दिवशी आभाळ खूप निरभ्र होतं. निळ्याभोर आकाशाकडे पाहत आम्ही वेळ घालवत होतो. 

मगाशी येणारा बाजाराचा गोंगाट आता शांत झाला होता. हवेतील गारठा वाढला होता. बघता-बघता अंधार पडायला सुरुवात झाली. मगाशीच कुठे तरी शेकोटीला गोंडी भाषेत ‘कीस्स’ असं म्हणतात, ते आम्ही शिकलो होतो. ‘कीस्स... कीस्स’ असं म्हणून आम्ही त्यांना थोडीफार ॲक्शन करून शेकोटी पेटवायला सांगितली. संध्याकाळचे सहा वाजले होते. शेकोटी पेटलेली दिसली की, शेकोटीच्या उबेला मग बरेच गावकरी जमा व्हायचे. आमच्यापासून जरा दूर-दूरच उभं राहायचे. आपापसांत गोंडीमधून काही तरी कुजबुज करत आमच्या तोंडाकडे बावरून प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहायचे. मग आम्हीच ‘आओ ना आओ... यहाँ बैठो’ असं म्हणून त्यांना जवळ बोलावण्याचा प्रयत्न करायचो. ते बाजेवर बसत नसतील, तर आम्हीच त्यांच्याबरोबर खाली बसायचो. त्यातल्या एखाद्याला तोडकी-मोडकी हिंदी येत असेल, तर तो आमच्याशी बोलायचा. तीच ती विचारपूस करायचा- ‘किधर से आए हो? आगे कहाँ जाना है? स्टुडंट हो क्या?’ आम्हीही पुन्हा तीच उत्तरं द्यायचो. 

थोड्या वेळाने तिथे सावळ्या रंगाचा, व्यवस्थित कपडे घातलेला आणि स्टाईलमध्ये केसांचा भांग पाडलेला एक जण आला. अंधारात त्याचा चेहरा ठीकसा दिसत नव्हता. साधारणत: आमच्याएवढेच वय असणाऱ्या त्याला बऱ्यापैकी हिंदी येत होती. पहिल्या-पहिल्यांदा तो आमच्याशी खूपच तुटक बोलत होता. पण शेकोटीभोवती बसून त्यानं त्याची कहाणी आम्हाला हळूहळू सांगितली. तो बोलत असताना त्याचा चेहरा शेकोटीच्या तांबूस उजेडात झळाळत होता. आम्ही त्याचे हावभाव टिपण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानं त्याचं नाव कोर्सो हुंगा असं सांगितलं. बस्तरसारख्या तणावग्रस्त आणि दुर्ग भागात जिथे लाइट नाही, रस्ते नाहीत, पाणी- दवाखाने यातलं काहीच नाही- अशा ठिकाणी राहणारा हुंगा ‘मुझे आगे जा कर डॉक्टर बनना है’ असं म्हणत होता. ‘हमारे इधर डॉक्टर की बहुत जरूरत है। यहाँ एक भी डॉक्टर नही आता।’ असं आम्हाला सांगत होता. हे ऐकून आम्ही त्याच्याकडे पाहतच राहिलो. 

हुंगा आज 12 वी पास होऊन पदवीला असला असता, पण 2005 मध्ये सलवा जुडूमच्या लोकांनी त्याची शाळा पाडली. त्या वेळी अख्खा गाव आगीमध्ये भस्मसात होताना त्याने स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला होता. त्याचा पाडा टेकडीवर असल्याने तो तेवढा वाचला होता. होत्याचं नव्हतं होतानाचा गाववाल्यांचा आक्रोश त्याने त्याच्या कानांनी ऐकला होता. पण इतकं होऊनही जळालेली पुस्तके धुरकटलेल्या हातांमध्ये घेऊन त्याने शिक्षणाची जिद्द सोडली नव्हती. त्याच्याबरोबरची बाकीची पोरं उद्‌ध्वस्त झालेला गाव पाहून अस्वस्थ मनानं वेगळ्याच मार्गाला लागली असणार, यात शंका नाही; पण हुंगा मात्र त्याला अपवाद होता. दोन-अडीच वर्षांची गॅप पडूनही त्यानं शिक्षणाबरोबरची नाळ तोडली नव्हती. जगदलपूरच्या कोणत्या तरी शाळेत त्याला मेरिटवर ॲडमिशन मिळाली होती. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणारा हुंगा आत्ता नववीत शिकत होता. 

वयाने थोडासा मोठा वाटणारा, किडमिडीत प्रकृतीचा, पण तरीही काटक दिसणारा हुंगा खेळातही तरबेज होता. पंधराच दिवसांनी त्याची पंजाबमध्ये तायक्वांदोची मॅच होती. मॅचच्या निमित्ताने तो त्याच्या स्टेटच्या बाहेर पहिल्यांदाच जाणार होता. ‘हम रेलगाडी से जानेवाले है’ असं तो आम्हाला सांगत होता. तो नुकताच दोन दिवसांच्या ख्रिसमसच्या सुट्टीमुळे घरी आलेला होता. जगदलपूरहून घरी येताना चिंतलनारपासून गावापर्यंत 30- 35 किमी त्याला पायीच यावे लागते. एकदा शाळेला गेल्यावर सहा-सहा महिने घरच्यांशी कसलाच संपर्क होत नाही. इथे ना कोणाकडे मोबाईल आहेत, ना पत्र पाठवायला पोस्ट ऑफिसची सोय. 

हुंगा हळूहळू आमचा चांगलाच मित्र बनला. इथे तोच एक होता, जो आम्हाला समजू शकत होता. तो गोष्टी सांगण्यातही भलताच पटाईत होता. त्याच्या तायक्वांदोच्या मागच्या एका मॅचचं वर्णन जेव्हा तो आम्हाला सांगत होता, तेव्हा ते ऐकताना डोळ्यांसमोर त्या सामन्याचं दृश्यच उभं राहत होतं. ‘‘मैं जब मॅच जीतता हूँ, तब मेरे सर को बहोत खुशी होती है। उन्हे मुझ से बहोत उम्मीद है।’ असं तो आम्हाला सारखं-सारखं सांगत होता. ‘‘मॅच के वक्त सब के मम्मी-पप्पा उनके बच्चोंकी मॅच देखने के लिए आते है। लेकिन मेरा उधर कोई भी नहीं होता । मेरे माँ-बाप को तो मैं क्या पढता हूँ ये भी ठीकसे पता नहीं है।’ असं केविलवाणे तोंड करून तो सांगत होता. ‘‘लेकिन मेरे सर मुझे हमेशा कहते है कि बाकी के बच्चोंके माँ-बाप अमीर है, पैसेवाले है, उनके पास अच्छे कपडे है, अच्छे शूज है, मगर उनके पास तुम्हारे जैसा सपना नहीं है। तुम्हारे पास तुम्हारा सपना है और वो तुम्हे सच कर के दिखाना है।’’ हुंगा सांगत होता आणि आम्ही ऐकत होतो. त्याची कहाणी भारावून टाकणारी होती, प्रेरणा देणारी होती. 

आता बराच उशीर झाला होता. कालप्रमाणे आजही शेकोटीभोवती गोलाकार बसून आम्ही जेवणं केली. आजपण भातावर छोट्या-छोट्या मछलीचं कालवण आणि इमलीची भाजी होती. श्रीकृष्ण शाकाहारी असल्याने त्याच्यासाठी आणखीन कसल्या तरी पातळ भाजीची सोय करण्यात आली होती. जेवण झाल्यावर हुंगा आम्हाला शेजारच्याच भिंती नसलेल्या एका झोपडीत घेऊन गेला. तिथे जवळूनच नदी वाहत असल्याने हवेत चांगलाच गारठा होता. 

झोपडीच्या मधोमध शेकोटी पेटवल्यावर जरा बरं वाटायला लागलं. झोपण्यासाठी पाठ टेकवणार तेवढ्यात तिथं जंगली मुंग्यांची वळवळ जाणवली. काळ्या मुंग्यांनी तो कोपरा भरून गेला होता. कृष्णाला मगाशी झाडाखाली तसलीच मुंगी चावल्याने त्याने त्या मुंग्यांचा धसकाच घेतला होता. हुंगाने एक वाळलेले ताडीचे पान पेटवून त्या मुंग्यांवर टाकून दिलं, तशा साऱ्या मुंग्या तिथून पसार झाल्या. तरीही काहींची वळवळ सुरूच होती. श्रीकृष्ण त्या वेचून-वेचून बाजूला टाकत होता. 

आता आम्ही निवांत आडवे झालो होतो. थंडी प्रचंड होती. जवळच पेटती शेकोटी असल्याने जरा बरं वाटत होतं. आणखीन आठ- नऊ जण आमच्या आजूबाजूला कलंडले होते. पण कालसारखी आपापसांत जास्त कुजबुज आज नव्हती. वातावरण थोडं ढिलं वाटत होतं. सकाळ झाली तेव्हा पक्ष्यांचा खूप किलबिलाट ऐकू येत होता. आम्ही त्या दिवशी नदीतच हात-पाय धुऊन आलो. नंतर गावातून एक चक्कर मारली. सकाळी दहाच्या दरम्यान आम्ही एका झाडाखाली बसलेलो असताना कोणी तरी सायकलवरून आमच्याकडे आलं. अंगामध्ये मळकट ढगळा शर्ट अडकवलेला आणि खाली लुंगी घातलेला तो आमच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आला होता. ‘आम्ही विद्यार्थी आहोत, तर मग आमच्या बॅगांमध्ये पुस्तकं कशी नाहीत?’ असा प्रश्न त्याला पडलेला होता. 

तो आमच्याकडे थोड्या संशयानेच बघत होता. जेवताना अधूनमधून आमच्या हाताच्या बाह्यांकडे पाहणाऱ्या त्याला श्रीकृष्णचे पीळदार शरीर पाहून तो नक्की पोलीसच असावा, असं वाटत होतं. हे सारं तो हुंगाशी गोंडीमधून बोलत होता. दुपारी दोन वाजता तो गेला, तेव्हा हुंगानं आम्हाला सारं सांगितलं. आम्ही आत्ता-आत्तापर्यंत असं समजत होतो की, हे लोक आता आपल्याला सोडून देतील, कारण दोन दिवस केव्हाच झाले होते. पण ‘‘मुझे नहीं लगता की ये लोक आपको जल्दी छोडेंगे। अगर छोडना होता तो आपको उस साइड को ले के जाते, लेकिन ये तो और भी अंदर ले कर जाने वाले है।’’ असं हुंगानं सांगिल्यावर आम्ही जरा दचकलोच. 

‘‘यहाँ का जो लीडर है वो बहुत खतरनाक है... उसके सामने ठीकसे बात करना... कुछ गलती हुई तो न जाने कुछ भी हो सकता है।’’ असंही तो म्हणाला. मगाशी गावातून चक्कर मारताना हुंगाचा स्वभाव अन्‌ त्याचं मत आम्ही न्याहाळलं होतं. ‘अजून किती दिवस हे असं अंधारात राहायचं?’ अशीच त्याची भावना होती. आम्ही त्याला थोडं विश्वासात घेतलं अन्‌ विकासच्या डायऱ्या त्याच्याकडून बाहेर पाठवून दिल्या. त्या डायऱ्या पाहून उगाच कुणाला आम्ही पत्रकार वगैरे आहोत की काय, असं वाटायला नको म्हणून आम्हाला ते करणं भागच होतं. 

‘‘शाम चार बजे कोई संदेशा आयेगा और फिर यहाँ से आपको दुसरे गाव ले के जायेगा’’ असं मगाचा सायकलवाला जाता-जाता सांगून गेला होता. आमच्याकडे आता दोनच तास होते. हे दोन तास भयानक तणावामध्ये गेले. आता काय होईल? आपण इथं येऊन चूकच केली की काय, असं वाटत होतं. आम्हाला काही झालं तर आमचा माणुसकीवरचा विश्वास उडणार होता, अन्‌ पुन्हा तो बसण्यासाठी कदाचित आम्ही इथे असणार नव्हतो. पण आता भिऊन चालणार नव्हतं. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवूनच आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती. ‘काय होईल ते होईल- आपण आपल्यापरीने माणुसकीने राहायचं. पण त्या अगोदर कुणाला विनाकारण आपणावर संशय येईल अशी एकही गोष्ट जवळ ठेवायची नाही, संशयास्पद एकही हालचाल करायची नाही’ असं आम्ही ठरवलं. जवळचे मोबाईल फोन पूर्णपणे रीसेट केले. कागदावर लिहिलेले काही मोबाईल नंबर जाळून टाकले. जाळलेल्या कागदाची राख शेकोटीच्या राखेत मिसळली. मागे तोडलेले मेमरीकार्ड त्या नदीमध्ये पाण्याच्या खाली मातीत पुरून टाकले. आता आमच्याकडे संशयास्पद असं काहीच नव्हतं. 

कोमेजल्यासारखी तोंडं घेऊन आम्ही त्या भिंती नसलेल्या झोपडीत बसून होतो. मोबाईलचं चार्जिंग संपवण्यासाठी त्यावर गाणी लावलेली होती. ‘छोड आये हम वो गलियाँ’ हे गाणं तर आम्ही फील केलं. त्या गाण्याच्या ऱ्हिदमवर आमच्या हृदयाचे ठोके धडधडत होते. आम्ही तिघेही तोंडावर पुन्हा नेहमीचा हलकेपणा आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्या भयानक तणावातून बाहेर येऊन पुन्हा एकदा हसी-मजाकमध्ये रमण्याचा प्रयत्न करत होतो. हळूहळू मोबाईलची बॅटरी लो होत गेली, ते गाणंही अचानक बंद झालं; पण त्या गाण्याच्या तालावर धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके मात्र चालूच होते. धक्‌... धक्‌... असा तो आवाज आम्हालाच ऐकू येत होता. आम्ही आता पुढल्या परिस्थितीला सामोरे जायला तयार झालो होतो. 

दूरवरून दोन सायकली येताना दिसत होत्या. बघता- बघता त्या सायकलींची चाकं आमच्या झोपडीसमोर येऊन थांबली. आम्ही बॅगा सायकलीला बांधून तयारच होतो. काहीही झालं तरी चेहऱ्यावरचं हसू आम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं. कारण चेहऱ्यावर स्मितहास्य असणं इथं फारच महत्त्वाचं होतं. आम्हाला न्यायला आलेल्या दोघांपैकी एकाचं वय साधारणत: 25 ते 30 होतं, तर दुसरा 40 ते 50 वयाचा होता. दोघंही जाम ताडी प्यायलेले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेला तो दुसरा तर हातात सतत चाकू घेऊनच असायचा. ‘‘हम को पता चला है की, आपके पास नक्शा मिला है?’’ असं तो सावळ्या चेहऱ्याचा अन्‌ उभ्या नाकाचा उंचेला मुलगा मला म्हणाला. ‘‘इधर से क्यूँ आये? किस ने भेजा है?’’ तोवर दुसऱ्याने त्याच्याच धुंदीत विचारायला सुरुवात केली. त्यांना कितीही शांततेने सांगितलं तरीही तेच ते प्रश्न पुन:पुन्हा विचारत होते. 

‘तुम्ही पोलिसांचे खबरेच आहात अन्‌ आता आमच्या हातात आयते सापडला आहात...  आता पाहा आम्ही काय करतो’ अशाच आविर्भावात त्यांचं सगळं सुरू होतं. पण हुंगा आमच्यासोबत होता म्हणून जरा आधार वाटत होता. खूप विनवणी करून आम्ही पुढल्या गावापर्यंत त्याला सोबत यायला लावलं होतं. थोडंसं अंतर कापल्यानंतर एका उंचवट्याच्या ठिकाणी आम्हाला थांबवण्यात आलं. लांबलांबवर एखाद-दुसरा आदिवासी पाडा नजरेला पडत होता. इथं कोणी तरी आम्हाला भेटणार होतं. आम्ही अगोदरच तणावामध्ये होतो. हुंगाने मगाशी ज्या लीडरबद्दल सांगितलं, तो हाच की काय, असं मनातल्या मनात वाटत होतं. लांबवर एका उंचवट्यावर झाडाखाली बाज टाकलेली दिसत होती. ‘‘थोडी देर में वहाँ पर एक आदमी आ के बैठेगा, तुमे से किसी एक को उस से जा कर मिलना है।’’ असं आम्हाला सांगण्यात आलं. ते दृश्यच एकदम फिल्मी होतं. मी हातामध्ये नकाशा आणि तिघांची ओळखपत्रे घेऊन त्या बाजेच्या दिशेने गेलो. तो सावळ्या रंगाचा, उंचेला मुलगा आमच्यातली एक सायकल घेऊन माझ्यासोबत आला. ‘आता काय होईल? कसा दिसत असेल हा लीडर? रागीट असेल की सौम्य?’ असा विचार करत मी तिथपर्यंत पोचलो. 

थोड्या वेळानंतर एक साधारण उंचीचा आणि काळपट वर्णाचा एक जण त्या बाजेवर येऊन बसला. अतिशय किरकोळ प्रकृतीचा अन्‌ कुरळ्या केसांचा हा माणूस मला पुन्हा तेच ते जुने प्रश्न विचारू लागला. मी त्याला आमच्याकडील नकाशा दाखवला. इंटरनेटवरून नकाशा कसा काढला जातो, तेही सांगितलं. पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. माझी सगळी कथा सांगून झाल्यावर त्याने तोच पहिला प्रश्न पुन्हा विचारला, ‘‘किसने भेजा है? इधर से ही क्यूँ आये? आप स्टुडंट हो तो आपके पास ये नक्शा कैसे?’’ आता मात्र याला कसं सांगावं, हे मला कळेना. सगळंच अवघड होऊन बसलं होतं. मी आपला नम्रपणे वागण्याचा प्रयत्न करत होतो. तोच अचानक सर्वांचा गोंडीमध्ये आरडाओरडा सुरू झाला. माझ्या मागच्या बाजूला असणाऱ्या कुणावर तरी सगळे जण खेकसत होते. 

मला काही कळेना, यांना अचानक काय झालं? मी तर खूपच शांततेने बोलत होतो. मागे वळून पाहिले तर, त्यांच्यातला एक मुलगा आमची सायकल फिरवू पाहत होता आणि बाकीचे त्याच्या अंगावर धावून जात त्याला सायकलला हात लावण्यास मज्जाव करत होते. मला काहीही सुचत नव्हतं. हे नक्की काय चाललंय, हे कळायला मार्गच नव्हता. तिकडे विकास आणि श्रीकृष्णला पण हा अचानक झालेला गोंधळ पाहून धडकी भरली होती. त्यांच्या मनात वेगळ्याच विचारांचे वारे वाहत होते. हा सारा सायकलींसाठी चाललेला गोंधळ आहे, हे ध्यानात आल्यावर मी त्यांना शांत केलं. ‘‘उसको सायकल घुमाने दो।’’ असं म्हणत मी त्याला सायकलवर चक्कर मारायला दिली. तो मुलगा सायकल चालवायला मिळाल्याने जाम खूश झाला. ‘‘आप हमारे मेहमान हो और अगर आपके सायकल को कुछ हो गया तो हमारा नाम खराब हो जाएगा।’’ असं त्या मुखियाचं बोलणं ऐकून मी सुन्न झालो. 

त्यानंतर ‘‘हमें आपका सामान चेक करना है’’ असं म्हणून तो मला आणखीन पुढे घेऊन गेला. मधेच थांबवून मला आमच्या साऱ्या बॅगा घेऊन यायला सांगितल्या. बॅगांमधील एक-एक वस्तू मी त्यांना काढून दाखवत होतो. कानावर कसल्या तरी पानाची बिडी अडवकलेला आणि संपूर्णपणे ताडीच्या नशेत बुडालेला एक जण मला आमच्याजवळील लायटर मागू लागला. पण ते पाहून बाकीचे सारे त्याच्यावर ओरडले. ‘बस्तर का नाम खराब हो जाएगा’ असं म्हणून त्याच्या हातातील लायटर हिसकावून घेऊन मला वापस देऊ लागले. तेवढ्यात कालचाच कुरळ्या केसांचा एक मुलगा सायकलवरून आला. तो गोंडीमधून त्या लोकांशी काही तरी बोलला आणि आम्हाला ‘आप सामान पॅक कर लो, आप को और आगे जाना है’ असं म्हणाला. बहुतेक या इथल्या मुखियाला आमची पूछताछ करायची काहीच ॲथॉरिटी नव्हती. सायकलींवर सामान टाकून आम्ही पुन्हा पुढच्या गावाकडे चाललो. 

हुंगा आमचा निरोप घेऊन इथूनच माघारी जाणार होता. त्याला दुसऱ्याच दिवशी शाळेला निघायचे होते. त्याची दोन दिवसांची सुट्टीही आमच्याबरोबर गेली होती. तो मागेच आम्हाला म्हणाला होता की- ‘‘मुझे स्कूल से घर आते वक्त कोई रोक के रखता है, तो मुझे बहुत गुस्सा आता है। पर आते समय मुझे बीच मे चिंतलनार के यहाँ आश्रमशाला में एक दिन रुकना पडता है, तो मैं रातभर सो नहीं पाता । दिन होते ही मैं पैदल हि गाव चला आता हूँ।’’ 

हुंगाला आमचे दु:ख समजत होते, पण त्याच्या हातात  काहीच नव्हते. त्याला त्याच्या तायक्वादोंच्या मॅचसाठी शुभेच्छा देऊन आम्ही पुढील वाट धरली. वाटेत एका हातपंपावर बाटल्यांमध्ये पाणी भरून घेतले. नंतर एक ओढा लागला. आता नदी-नाल्यांमधून सायकली तशाच रेटण्याची आम्हाला सवय झाली होती. थोडे पुढे गेल्यावर एका आदिवासी पाड्यासमोरील चिंचेच्या झाडाखाली आम्ही थांबलो. अंधार जवळजवळ पडलाच होता. आमच्यासाठी तिथं उघड्यावर लगबगीने बाजा टाकण्यात आल्या. शेकोटी पेटवण्यात आली. आजूबाजूला दहा- बारा वर्षांची बरीच चिमुकली उघडी छाताडं घेऊन शेकोटीच्या उबेला बसली होती. त्यांच्यातल्या काहींनी बारक्या काटक्यांची त्यांची स्वत:चीच छोटीशी शेकोटी पेटवली होती. ते दृश्य खूपच विहंगम होतं. एका बाजूला साऱ्या पोरांची छाताडं उघडीच होती. त्यांची पोटं कुपोषणानं पुढं आलेली होती. त्वचा काळवंडलेली होती. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या चेहऱ्यावरची झळाळी त्या तांबुस प्रकाशात झळाळत होती. 

चिमुकल्यांचं बरं असतं, ते कशातही आनंद शोधत असतात. ते हवे तेव्हा मनमोकळे ढसाढसा रडू शकतात आणि हवे तेव्हा दिलखुलासपणे हसू शकतात. त्यांना कुठेही, कसेही ठेवले तरी ते त्यांच्या दुनियेत स्वतंत्र असतात. आकाशातल्या पाखरांसारखे ते त्यांच्याच विश्वात भरारी घेत असतात. यांचंही असंच होतं. विस्तवाशी खेळण्यातच त्यांचं बालपण चाललं होतं. जन्मच अंधारात झाल्याने त्यांना प्रकाश ठाऊक नव्हता आणि आईच्या बेंबीशी जोडली गेलेली नाळ त्यांच्या आईने त्याच अंधारात दगडाने ठेचून तोडल्याने डॉक्टर काय प्रकार असतो, हे त्यांना ठाऊक नव्हतं. जिथे आई-बापाला स्वत:ची लाज लपवण्यासाठी ठीकसा कपडा नाही, तिथे या चिमुकल्यांची शरीरं झाकण्याचा प्रश्नच उद्‌भवत नव्हता. त्यांना त्यांच्या गावाशिवाय बाहेरचं जगही माहीत नव्हतं. त्यामुळे रस्ता असला काय आणि नसला काय- त्यांचं कसलंच काही बिघडत नव्हतं. 

किती बरं असतं ना, जोपर्यंत आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात. जेव्हा माहिती नसलेल्या गोष्टींची माहिती होते आणि त्याबद्दलचं कुतूहल वाढत जातं, तेव्हा या मानवी मनाची अवस्था खूपच दयनीय बनते. अस्वस्थता वाढत जाते. योग्य वयात पुस्तकं हातात पडली तर ठीक, नाही तर याच अस्वस्थतेचं रूपांतर लालबुंद निखाऱ्यात होऊन हेच कोमल हात परिस्थितीला आणखीनच चिघळायला हातभार लावतात. 

आमच्यासमोरच्या बाजेवर आम्हाला घेऊन आलेले ते दोघेही बसले होते. अधूनमधून पुन्हा तेच ते प्रश्न ताडीच्या नशेत विचारत होते. इथे सगळे जण मांड्यांवर सारखे खाजवत होते. कोणाकडे बॅटरी असेल, तर तो मांड्यांवर तिचा उजेड पाडून तिथे ओरखडे उठेपर्यंत खराखरा खाजवायचा. आम्हाला घेऊन आलेल्या सुरेशच्या हातावरपण मोठमोठाले पुरळ उठले होते. बॅटरीच्या उजेडात पुरळ उठलेली त्वचा लालबुंद झालेली दिसत होती. त्या अंधारामध्ये हाता-पायांवर बॅटरीचा उजेड पाडून सारे जणच तोंड आक्रसून जोरजोराने मांड्या खाजवत होते. सगळ्यांनाच सुरेशप्रमाणे मोठमोठाले पुरळ उठले होते. बॅटरीच्या उजेडात ते आणखीनच विचित्र दिसायचे. ते दृश्य आमच्यासाठी प्रचंड भयानक होतं. 

‘‘आप डॉक्टर वगैरा को क्यूँ नहीं दिखाते?’’ असं आम्ही त्यांना विचारलं. इथं सुरेशलाच फक्त हिंदी येत होतं. ‘‘यहाँ पर डॉक्टर ही नहीं आता।’’ असं तो आम्हाला सांगू लागला. ‘‘उधर चिंतलनार में एक डॉक्टर है, लेकिन इतनी दूर कौन जायेगा? हम गए थे एक बार, लेकिन वो थोडीसी चेकअप करके कोई दवाँई देता है। वो दवाँई खाने के बाद थोडे दिन अच्छा लगता है, लेकिन फिर खुजली शुरू। अब कितनी बार डॉक्टर के पास जाने का? उसकी दवाँई का कुछ असर ही नहीं पडता।’’ समोरचं दृश्य आम्हाला सहनच होत नव्हतं. आमच्याकडे कैलासजीवनची बाटली होती. बॅटरीच्या साह्याने ते मलम आम्ही बॅगेतून शोधून काढले. त्याला पहिल्यांदा हे सांगितलं, ‘‘हम डॉक्टर नहीं है । इस मलम से आपकी खुजली ठीक भी नहीं होगी, लेकिन इस से थोडा थंडा लगेगा। ये लगाके देखते है। अच्छा लगा तो कल भी लगायेंगे।’’ असं म्हणून मी त्याला माझ्या हाताने मलम लावले. 

त्याच्या हाताच्या बोटांमध्ये खूप जखमा झाल्या होत्या. मलम लावताना त्या जखमांचा खडबडीतपणा मला स्पष्टपणे जाणवत होता. चिघळलेल्या जखमा स्वच्छ करायला आमच्याकहे काही साहित्यही नव्हते. मलम बोटावर घेऊन मी तसेच त्याच्या जखमांवर लावत होतो. या साऱ्या जखमा पुरळ खाजवून झालेल्या होत्या. आमच्या हातात मलम होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर वेदना, एवढंच आत्ता आम्हाला दिसत होतं. संसर्गाने आपल्यालाही अशी खुजली होईल, असा विचार करायला त्या परिस्थितीत वेळच नाही मिळाला. त्याला मलम मात्र मी खूपच प्रेमाने लावलं, हे नक्की. (दुसऱ्या दिवशी सुरेश आमच्याकडे  आला, तेव्हा त्याचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला होता.) 

सुरेशला मलम लावून झाल्यानंतर आणखी दहा जणांचे हात पुढे झाले. सगळे जण ‘‘मुझे भी दवाँ लगाओ । मुझे भी बहोत खुजली होती है’’ असं केविलवाणे तोंड करून म्हणत होते. आशेने आमच्याकडे पाहत होते. माझ्या हातात पुरेसे मलमही नव्हते. बॅगेमध्ये दुसरं असं कोणतं औषधही नव्हतं. आता आम्हाला आमचीच कीव आली होती. आम्हाला आमचाच प्रचंड राग आला होता. वाटत होतं की, आपण डॉक्टर असतो तर किती बरं झालं असतं! शहरांमध्ये चौकाचौकात डॉक्टर आणि इथे मात्र ही अशी अवस्था. त्यांचे आमच्याकडे आशेने पसरलेले हात पाहून आमचे हृदय पिळवटून निघाले होते. त्या काळोख्या रात्री डोक्यात वीज कडाडल्यासारखं होत होतं. ‘हे असं का?’ या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. इथं आम्ही जे पाहत होतो, ते विचित्र होतं. भयानक होतं, कल्पनेच्या पलीकडचं होतं. सारंच मलम आजच्या आज संपवून चालणार नव्हतं. त्याचा काही परिणाम तरी होतोय का, ते पाहून उद्या बाकीच्यांना मलम लावावं, असा विचार करून आम्ही ते कसेबसे बॅगेमध्ये ठेऊन दिले. 

तेवढ्यात त्यातला एक जण ‘आपके पास कपडा है क्या, कपडा?’ असं विचारत आमच्याकडे आला. अंधारात त्याचे डोळेच काय ते ठीकसे दिसत होते. आम्ही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. कारण मागेच एका ठिकाणी आमच्याकडे असणारे जादाचे एक-दोन कपडे तिथल्या पोरांना आम्ही देऊ केले होते. मी माझा स्वेटरही तिथं एकाला दिला होता. काही कपडे उरले होते, ते पुढे कुठे तरी लागतील म्हणून ठेवले होते. आम्ही आमच्या बॅगा पाड्यामध्ये एका खोलीत ठेवायला गेलो, तर तो आमच्या पाठी-पाठीच आला. पुन:पुन्हा कपड्यांसाठी विनवणी करू लागला. रात्री आम्ही झोपलेलो असताना तो हळूच आमच्या बॅगांमधून कपडे घेऊ शकत होता, कारण आम्ही बॅगा ठेवलेला पाडा त्याचाच होता. पण तसला विचार मनातही न आणता तो आम्हाला कपड्यांसाठी विनंती करत होता. आशेने आमच्याकडे पाहणाऱ्या त्याच्या डोळ्यांमध्ये पाहून कृष्णाने बॅगेतला एक शर्ट काढून त्याला दिला. ही अशी दृश्यं पाहून मनाची अवस्था छिन्नविछिन्न होत होती. 

बॅगेतून कोणतीही वस्तू काढली तरी इथला प्रत्येक जण आम्हाला ‘ये कितने का? वो कितने का?’ असंच विचारायचा. बावरून आमच्याकडे पाहणारे ते चेहरे आमच्या कपड्यांकडे बोट करून ‘ये कितने के है?’ असं विचारायचे. आमच्या चपला हातात घेऊन त्यांच्याकडे निरखून पाहायचे. कोणाच्या तरी हातामध्ये बॅटरी असायची. तो पुढे होऊन आमच्या घड्याळावर उजेड पाडायचा. ते चाचपून पाहायचा आणि पुन्हा ‘ये कितने को लाये हो?’ असं विचारायचा. आम्ही बॅगेतून काही काढायला गेलो, तर सगळे त्या बॅगेकडे खूप उत्सुकतेने पाहायचे. त्या अंधारामुळे त्यांचं उघडं शरीर झाकलं गेलं होतं. अधूनमधून शेकोटीच्या उजेडात काहींच्या अंगावरची जेमतेम कापडं दिसायची. कोणी बनियनवर असायचं, तर कोणी नुसत्या हाफ चड्डीवर. 

बारकी पोरं मात्र उघडीच होती. पोट पुढं आलेली आणि छातीच्या बरगड्या दिसणारी ही चिमुकली आमच्यापासून जरा दूरच थांबायची. एखादा विचित्र प्राणी पाहत असल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणून आमच्याकडे एकटक बावरून पाहायची. त्यांना फक्त गोंडीच येत असल्याने आमचा त्यांच्याशी संवाद होत नव्हता. त्यांना थोडं जवळ करण्याचा प्रयत्न केला, तर ते गालातल्या गालात हसायचे आणि आमच्यापासून आणखी चार पावलं दूर जाऊन थांबायचे. आम्ही शेकोटीला खेटूनच बसलो होतो. आजूबाजूला भयानक काळोख होता. आम्ही शांत आणि सुन्न होऊन त्या शेकोटीच्या निखाऱ्यांकडे पाहत होतो. त्या लालबुंद निखाऱ्यांमध्ये ऊबही होती आणि चटकेही होते. पण मनामध्ये पसरलेला काळोख दूर करण्याचे सामर्थ्य मात्र त्यांच्यात नव्हते. 

थोडा वेळ असाच गेला. नंतर काही महिला आमच्यासाठी जेवणाचे पदार्थ घेऊन आल्या. एका बाजेवर ते सारं ठेवून त्या दूरवर जाऊन उभ्या राहिल्या. त्या गोंडीमध्ये काही तरी कुजबुजत होत्या, पण आम्हाला ते काहीच समजत नव्हतं. आजच्या जेवणात चार-पाच प्रकारच्या आदिवासी भाज्या होत्या. भातावर मछलीचं कालवणही होतंच. आमच्यापैकी श्रीकृष्ण हा पूर्णपणे शाकाहारी होता. त्याच्या ताटात चुकून मछलीचं कालवण आलं होतं. ‘‘ये मांसाहार नहीं करता। ये मछली, सुअर, मुर्गी, अंडा कुछ भी नहीं खाता।’’ असं आम्ही त्यांना सांगितलं. पहिल्यांदा आम्ही काय म्हणतोय, हेच त्यांना कळलं नाही. पण जेव्हा कृष्णा शाकाहारी असल्याचं त्यांना कळलं, तेव्हा त्यांना त्याच्या ताटात मछली वाढल्याचं खूपच वाईट वाटलं. 

त्यांच्यातल्या एकानं लगबगीने दुसऱ्या पानामध्ये त्याला भात वाढला. एक जण पळत-पळत गेला आणि कुठून तरी भाताबरोबर खाण्यासाठी आणखीन एक प्रकारचं कालवण घेऊन आला. कृष्णा मछली खात नाही हे जेव्हा तिथल्या चिमुकल्यांना कळलं, तेव्हा ते सारे गोंडीमध्ये काही तरी कुजबुज करत मोठमोठ्याने हसायला लागले. मासे हा त्यांच्या आवडीचा आणि नित्याचाच पदार्थ. मछली न खाणारा माणूस त्यांनी कधी पाहिलाच नव्हता जणू! समोर वाढलेल्या भाज्या कशाच्या आहेत, ते अंधारात नीट दिसत नव्हतं. इथं इमलीची भाजी तशी नेहमीचीच होती. एक तुरट भाजी होती. गुलाबी रंगाच्या छोट्या फुलांपासून ती बनवतात. बाकीच्या भाज्यांचं काहीच कळत नव्हतं. पण त्यातल्या काही चवीला चांगल्या होत्या. 

मी मछलीचं कालवण भातावर घेतलं होतं. जवळ नदी असल्यानं छोट्या छोट्या मछलीचं कालवण इथली माणसं खूप आवडीने खातात. आम्ही अचानक आल्याने आजचे आमचे जेवण सगळ्यांच्या घरातून थोडे-थोडे आले होते. इथली माणसं संध्याकाळी उजेडाचीच जेवणं उरकून लवकर झोपी जातात. भांडी घासायचा जास्त ताप नसतो, कारण जवळजवळ साऱ्याच गोष्टी पानांपासूनच बनवलेल्या असतात. जेवणासाठी तेंदूच्या मोठ्या पानांचे द्रोण रोजच्या रोज बनवले जातात. भात शिजवायला किंवा कालवण बनवायला जर्मलची डिचकी वापरतात. शक्यतो सारा स्वयंपाक पाड्याच्या बाहेर उघड्यावरील चुलीवर करतात. विशेष म्हणजे, इथं जेवताना कोणी मांडी घालून बसत नाही. सारे जण दोन पाय आखडून तसेच, उभ्या-उभ्या जेवण करतात. पानामध्ये भाताचा डोंगर वाढून घेऊन त्यावर कसलीशी भाजी असली म्हणजे झालं. जेवणानंतर पानांचे द्रोण तसेच बाजूला टाकून द्यायचे. पाळलेल्या कोंबड्या, डुकरं ते खाऊन टाकतात. 

आम्ही जेवत होतो. सारे जण आजूबाजूला गोलाकार उभे राहून आमच्याकडे पाहत होते. अधूनमधून गोंडी भाषेत काही तरी कुजबुजत होते. जेवताना आम्हाला पानातलं दिसावं यासाठी काही जण आमच्यावर बॅटऱ्यांचा उजेड पाडत होते, तर कुणी मधूनच आग्रहाने काही तरी वाढायचा प्रयत्न करत होते. यांना आपल्या हातचं जेवण चालत असेल ना? हे जेवताना लाजत तर नाहीत ना? यांना आपल्या आदिवासी भाज्या आवडल्या असतील का?... असं त्यांना वाटत होतं. लांबवर उभ्या राहिलेल्या त्या महिलांकडे हातवारे करून आम्ही ‘जेवण बढिया आहे, हमको बहुत पसंद आया’ असं म्हटलं. त्यांना कळावं यासाठी ‘नेक्क नाला’ (शुक्रिया) हे मागे कुठे तरी शिकलेलं गोंडीतील वाक्यही उच्चारलं. 

आम्ही गोंडीतील एखादा शब्द उच्चारला तर त्यांना खूप भारी वाटायचं. पण आमचं व गोंडीचं ट्युनिंग जुळत नसल्याने त्यांना आमचं हसूही यायचं. खरं तर त्या भाज्या आणि पानातला तो भात काही केल्या सरत नव्हता. उगाच कसा तरी आम्ही तो खायचा प्रयत्न करत होतो. कारण आजूबाजूचे सगळे आमच्याकडे पाहत होते. गाववाल्यांनी आमच्यासाठी वेगवेगळ्या भाज्या खूप प्रेमाने बनवून आणल्या होत्या. आम्ही ठीकसे जेवण केले नाही, तर त्यांना वाईट वाटेल म्हणून आम्ही तो भात पाण्याचे घोट घेत-घेत कसा तरी पोटामध्ये सरकवत होतो. आता आमची जेवणं झाली होती. पुन्हा एकदा ‘खाना बहुत अच्छा था।’ असं त्यांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. 

इथं आश्रमशाळेत शिकणारा जोगा नावाचा एक सहावीतला मुलगा सोडला, तर कुणालाच नीट हिंदी येत नव्हती. पण आमच्या हावभावांवरून त्यांना थोडंफार आम्ही काय बोलतोय याचा अंदाज यायचा. आम्हाला इथवर घेऊन आलेला सुरेश केव्हाच ‘‘मैं कल सुबह आऊंगा’’ असं सांगून कुठे तरी गेला होता. आता लवकर झोपावं म्हणून आम्ही बाकीची आवराआवर करायला लागलो. थंडी खूप वाजत होती. आम्ही बॅगेतले स्वेटर्स काढले. पायांमध्ये सॉक्स घातले. हातात हँडग्लोव्हज चढवले. डोक्यात कानटोपी घातली. गरम कपड्यांमध्ये आता जरा उबदार वाटत होतं. आम्ही घातलेल्या स्वेटरकडे तिथले सगळे जण निरखून पाहत होते. एखाद-दुसरा जवळ येऊन त्या स्वेटरवरून हात फिरवून पाहायचा. कोणी हातातल्या हॅन्डग्लोव्हजकडे बोट करून ‘ये क्या है? इससे क्या होता है?’ असं विचारायचा. आम्ही आपले थंडीने पार गारठून गेलो होतो आणि हे सारे असेच अंगावर काहीही कपडा न घेता आमच्याकडे पाहत होते. पुन:पुन्हा तेच प्रश्न विचारत होते. ‘ये क्या है? वो क्या है? कितने का है?’ 

एकाला मी माझं जर्किन घालायला दिलं. पहिल्यांदा ते कसं घालायचं, तेच त्याला कळत नव्हतं. पण नंतर जर्किन घालून तो ऐटीत इकडून तिकडे चालायला लागला. बाकीची सगळी चिमुकली त्याच्याकडे बघून गोंडीतून काही तरी कुजबुज करत हसत होती. त्यांना त्याच्याकडे पाहून मजा वाटत होती. पण तो मात्र जर्किन घालून मस्त ऐट मारत होता. आम्हाला हे समजत नव्हतं की, ही माणसं असल्या कडाक्याच्या थंडीत अशी उघडी छाताडं घेऊन कशी दिवस काढतात? मागेच एका गावामध्ये जादाचा एक स्वेटर आम्ही तिथल्या एकाला देऊ केला होता. मी थंडीने कुडकुडतोय हे पाहून जर्किन घालून ऐट मारणाऱ्याने ते जर्किन काढून पुन्हा माझ्याकडे दिले. ‘‘हमे सब को आदत हो गई है इस ठंड की।’’ असं तो म्हणाला. आपल्यासमोर ही माणसं थंडीनं एवढी कुडकुडतायत आणि आपण काहीच करू शकत नाहीये, याचं खूप वाईट वाटत होतं. 

‘‘चलो, अब सो जाते है’’ असं म्हणून आम्ही झोपण्याच्या तयारीला लागलो. आमच्या तिघांसाठी तीन बाजा टाकण्यात आल्या होत्या. बाजा एकमेकांना खेटून लावून आम्ही त्या त्रिकोणाकृती ठेवल्या. मधोमध शेकोटी पेटत होती. शेकोटीमध्ये आणखीन काही लाकडं आणून टाकल्यावर शेकोटीने चांगलाच पेट घेतला. इथं शेकोटीचीच काय ती ऊब होती. शेकोटीपासून थोडं दूर गेलं तरी जीव गारठून जायचा. आज आमच्यासोबत झोपायला जोगा होता. त्यानं कुठून तरी एक बाज आणली होती अन्‌ आमच्यापासून थोड्या अंतरावर तो कलंडला होता. त्याच्या सोबतीला आणखीन पाच-सहा जण होते. सरासरी 14-15 वयाचे असतील. ते सारे तसेच जमिनीवर पालथे झाले होते. त्यांनीही त्यांच्या इथं दुसरी शेकोटी पेटवली होती. आज दिवसभर बरंच चालणं झाल्यामुळे झोप कधी लागली, ते कळलेच नाही. 

बाज शेकोटीला पार खेटून लावल्याने झोपताना जरा ऊब लागत होती. रात्री मधेच अचानक जाग आली. आम्ही थंडीने कुडकुडत होतो. तिन्ही बाजांच्या मधोमध पेटवलेली ती शेकोटी विझून गेल्यामुळे थंडीचा कडाका वाढला होता. अंधारात शेकोटीतले लाल निखारे तेवढे दिसत होते. निम्मी-अर्धवट जळालेली लाकडं एकमेकांवर नीट ठेवून मी ती फुंकर मारून पेटविण्याचा प्रयत्न करू लागलो, पण गारठलेली ती लाकडं काही केल्या पेट घेत नव्हती. थंडी एवढी होती की, हाताची बोटंही गोठून गेल्यासारखी व्हायची. आमच्यापासून दहा पावलांवर असणाऱ्या जोगाच्या इथल्या शेकोटीत थोडीशी आग दिसत होती. मी आमच्यातलं एक लाकूड घेऊन कसाबसा जोगाजवळच्या शेकोटीकडे कुडकुडत गेलो. या आगीत हातातल्या लाकडाला पेटविण्याचा प्रयत्न करू लागलो. 

तेवढ्यात एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मी आवाजाच्या दिशेने पाहिले. तिथून थोड्या दूरवर एका पाड्याच्या बाहेर एक महिला उभी होती. तिच्या हातामध्ये आठ-नऊ महिन्यांचं बाळ होतं. अंगावर एकही कपडा नसलेल्या आपल्या पिल्लाला छातीशी कवटाळून ती महिला त्या शेकोटीला खेटून उभी राहिली होती. ते बाळ रडत होतं आणि ती बाई त्याला हातामध्ये घेऊन शेकोटीच्या उबेला थांबली होती. त्या दोघांनाही शेकोटीचीच काय ती ऊब लागत होती. बाळ रडायला लागलं तर त्याची आई त्याला शेकोटीच्या अगदी जवळ धरून उभं राहायची. 

आणखीन टीचभर जरी पुढे सरकलं तर सारं शरीर आगीनं पोळून निघेल एवढेच अंतर थंडीने कुडकुडणाऱ्या त्यांच्यात आणि ऊब देणाऱ्या त्या लालबुंद निखाऱ्यांच्या शेकोटीमध्ये उरायचं. त्या आगीची धग लागली की बाळाचं रडणं कमी व्हायचं, मग त्याची आई हळुवारपणे त्या ज्वाळांपासून दोन पावलं मागं सरकायची. त्या मातेनं तिच्या पोटच्या गोळ्याला एवढं कवटाळून आपल्या बाहूंमध्ये घट्ट पकडलेलं होतं, की, जणू ती त्याचं कवचच बनली होती. जसं कांगारू आपल्या पिल्लांना घेतं ना, अगदी तस्संच. हा प्रसंग काळीज फाडून टाकणारा होता. आई म्हणजे नक्की काय असतं, ते आज कळलं होतं. अंगावर कपडा नसलेल्या आपल्या तान्ह्या बाळाला शेकोटीची ऊब लागावी आणि त्याला नीट झोपता यावं यासाठी त्या आईचा विस्तवाशी संघर्ष सुरू होता. 

माझ्या हातातलं लाकूड आता पेटलं होतं. त्याच्या साह्याने मी आमच्या इथली शेकोटी पुन्हा पेटवली. शेकोटीने चांगलाच पेट घेतला होता. आता थंडी जाणवत नव्हती. पुन्हा एकदा उबदार वाटायला सुरुवात झाली होती. मी माझी बाज आणखी थोडीशी शेकोटीजवळ ओढली. अंगावरचं व्यवस्थित घेऊन मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण ते दृश्य काही केल्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. आपल्याही अंगावरचं सगळं या शेकोटीत टाकून द्यावं, असं वाटत होतं. झोप उडवणारं आणि विचार गोठवून टाकणारं ते दृश्य स्वत:च्या अंगावरच्या कपड्यांची लाज वाटावी असंच होतं. 

झोपता-झोपता मी सहज घड्याळात पाहिले. रात्रीचे सव्वा-बारा वाजले होते. आज 31 डिसेंबर होता. जगभर नववर्षाचा जल्लोष चालला होता. पंधरा मिनिटांपूर्वीच आम्ही सर्वांनी नव्या वर्षात पदार्पण केलं होतं. जगभर सर्वत्र जश्न मनवला जात होता. लाखो रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी होत होती. संबंध आकाश फटाक्यांच्या रोषणाईने झळाळून निघालं होतं. बघेल तिकडे झगमगाट पसरला होता. मोठमोठाल्या शहरांमधील लोक थर्टीफर्स्टच्या पाटर्यांमध्ये दंग होते. कोणी डिस्कोच्या तालावर नाचत होते, तर कोणी दारूच्या नशेत डुलत होते. आमची तरुणाई डान्स क्लबमध्ये ड्रग्जच्या नशेत बेधुंद झाली होती, हुक्का पार्लरच्या धुरकांड्यांमध्ये हरवली होती. कुणालाच कशाचं देणं-घेणं नव्हतं. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात आज काही तरी नवं सुरू झालं होतं. 

सारे जण कुठे ना कुठे एकत्र जमून एकमेकांना ‘हॅपी न्यू इयर’ म्हणत होते. प्रत्येक जण नव्या वर्षात पदार्पण करून जुन्या गोष्टींना बाय-बाय करून पुढे चालले होते. डेव्हलप्ड बनत चालले होते, शायनिंग बनत चालले होते. मॉडर्न बनत चालले होते. भारतातून इंडिया बनत चालले होते. आम्ही मात्र आकाशाकडे पाहत झोपण्याचा प्रयत्न करत होतो.  डोक्यात वेगवेगळ्या विचारांची चक्रं फिरत होती... 

इथं प्रत्येक दिवस सारखाच असतो. इथं पिढ्यान्‌पिढ्या, शतकानुशतके लोक असंच जगत आलेले आहेत. त्यांच्यासाठी आजपर्यंत कधीच कोणतं नवं वर्ष आलेलं नाही. जे आहे ते रोजचंच. इथं कुठे जल्लोष नव्हता, फटाक्यांची आतषबाजी नव्हती. रोषणाई नव्हती, झगमगाट नव्हता. ना इथे कुठे थर्टीफर्स्टची पार्टी होती, ना डान्स क्लब, ना हुक्का पार्लर. आकाश पूर्णपणे निरभ्र आणि शांत होतं. सर्वत्र भयाण काळोख होता. त्या काळोखातही चंद्र आमच्याकडे लपून-लपून पाहत होता. चांदण्या चमचम करत होत्या. वाऱ्याची एखादी झुळूक येऊन झाडाची पानं अलगद हलत होती. या निरभ्र काळोख्या आकाशाकडे पाहून असं वाटत होतं की, जणू विस्तीर्ण पसरलेल्या त्या नभांनं आम्हाला त्याच्या कुशीत कवटाळून घेतलंय. साऱ्या चांदण्या आमच्यासमोर उतरून कसलंसं नृत्य करत आहेत. चमचमाट करून सर्वत्र रोषणाई पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला नव्या वर्षाची चाहूल देत आहेत. 

इथली माणसं निसर्गाच्या खूप जवळ राहतात. निसर्गाशी एकरूप होऊन राहतात. जणू ती निसर्गाचाच एक भाग असतात. त्यांची संपूर्ण जीवनशैली ही निसर्गावरतीच अवलंबून आहे. इथं वेळ आणि तारखेचं गणित जणू लागूच होत नाही. सारं दिवस आणि रात्रीमध्येच मोजलं जातं. आज 31 डिसेंबर आहे, सर्वत्र नव्या वर्षाचा जल्लोष सुरू असेल हे आमच्याही लक्षात नव्हते. आकाशात त्या रात्री चंद्राची एक छोटीशी कोर दिसत होती. अमावास्येला अजून सात-आठ दिवस बाकी आहेत, एवढेच त्यावरून समजत होते. शेकोटीने आता चांगलाच पेट घेतला होता. दर दीड-दोन तासांनी उठून विझलेली शेकोटी पुन्हा फुंकर मारून पेटवण्याचा आमचा खेळ रात्रभर चालू होता. 

इथं रात्र झाली की प्रत्येक जण दुसऱ्या दिवसाच्या पहाटेची वाट पाहतो. आम्हीही तेच करत होतो. कधी एकदा दिवस उजाडतोय आणि सूर्याची ती तांबूस किरणं आपल्या अंगावर पडून या जीवघेण्या थंडीपासून आपली मुक्तता होतेय, असं वाटत होतं. आमच्यापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या त्या पाड्याबाहेर उभी असलेली ती महिलाही रात्रभर जागीच होती. तिचं तान्हं बाळ थंडीनं कुडकुडून रडत होतं आणि ती त्याला बाहूंमध्ये घेऊन शेकोटीच्या उबेला रात्रभर थांबली होती. 

हळूहळू दिवस उजाडला. काळोख बाजूला फेकला गेला. अंधाऱ्या प्रतीक्षेनंतर सूर्याच्या तांबूस किरणांनी आम्हाला आधार दिला. झोपडीच्या दोन खांबांना कापड बांधून पाळण्यात त्या बाळाला झोपवून ती महिला आता बाकीच्या कामाला लागली होती. आम्हाला पण सूर्यप्रकाशात जरा बरं वाटत होतं. समोरची शेकोटी पेटलेलीच होती. जोगा आणि त्याच्यासोबतची ती बाकीची पोरं शेकोटीजवळ बसून कुडकुडणाऱ्या नजरेने आमच्याकडे पाहत होती. निसर्गाचं एक सत्य मात्र आज समजलं होतं. प्रत्येक रात्रीनंतर दिवस उजाडणारच असतो; गरज असते ती फक्त क्रियाशील शांततेनं प्रतीक्षा करण्याची. 

तांबूस सूर्यप्रकाशात झगमगून निघण्यासाठी काळोख्या रात्रीचा सामना करावाच लागतो. दिवस-रात्रीचा, अंधार-प्रकाशाचा हा खेळ अनंत काळापासून चालत आलेला आहे. अंधारानंतर प्रकाश आणि प्रकाशानंतर अंधार हा निसर्गाचाच नियम आहे. आपल्या हातात फक्त एवढेच असते की, त्या भयाण काळोखातही थोडासा प्रकाश देणारी एखादी मिणमिणणारी छोटीशी पणती शोधणे आणि पोळून काढणाऱ्या त्या प्रकाशात तीक्ष्ण किरणांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कुठल्या तरी वृक्षाची छाया शोधणे. आयुष्य म्हटल्यावर सुख आलं, दु:ख आलं आणि त्याचबरोबर अस्तित्वासाठी संघर्षही आलाच. पण म्हणून एखादी टोकाची भूमिका घेण्यापेक्षा शांततेने समोरील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणेच शहाणपणाचे आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक पिढीला प्रत्येक समाजाला, प्रत्येक सिव्हिलायझेशनला प्रचंड समस्यांना आणि बदलांना सामोरे जावे लागत असते. संघर्ष तर वर्षानुवर्षे, पिढ्यान्‌पिढ्या सुरूच असतो. म्हणून तो शक्य तेवढ्या शांततेच्या मार्गाने होणेही तितकेच गरजेचे आहे. 

आता बऱ्यापैकी उजाडलं होतं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. काल आम्हाला इथं घेऊन आलेला सुरेश दूरवरून येताना दिसत होता. कुरळ्या केसांचा, साधारण उंचीचा आणि 25-30 वर्षे वयाचा सुरेश झोपेतून तसाच उठून आमच्याच दिशेने येत होता. अंगावर चादर लपेटलेला तो आमच्याजवळ आल्यावर आम्ही थोडं सावरून बसलो. काल तो ताडीच्या नशेत होता आणि पोलिसांचे खबरे असल्याचा खूपच संशय आमच्यावर घेत होता. आज त्याची वागणूक जरा बरी होती. काल त्याच्या हातावरील पुरळांना मलम लावण्याचा परिणाम असावा कदाचित. ‘‘रात को ठीक से नींद लगी ना?’’ असं त्याने आम्हाला हसत-हसत विचारलं. 

त्याच्या शर्टच्या खिशामध्ये एक कोरा कागद होता. आमच्याजवळचा नकाशा आम्हीच काढलाय, हे मानायला तो तयार नव्हता. ‘‘आपको इसकी ट्रेनिंग दी गई है। पुलिस ने यह नक्शा आपको बनाकर दिया है।’’ असंच तो म्हणायचा. ‘इंटरनेटवरून जगातला कुठलाही नकाशा काढता येतो. आम्हीही हा नकाशा गुगल मॅपच्या साह्याने बनवला आहे,’ असं आम्ही त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण हे सारं त्याच्या समजण्याच्या बाहेरचं होतं. स्वत:ची खात्री पटवून घेण्यासाठी तो आज एक कोरा कागद घेऊन आला होता. ‘‘वैसेही नक्शा इस कागज पर बनाकर दिखाओ’’ असं म्हणून त्यानं त्याच्या खिशातला कोरा कागद माझ्याकडे दिला. 

आता अगोदरसारखाच जसाच्या तसा नकाशा काढणे अवघड होते. थोडंफार इकडे-तिकडे होणार होतं. मी त्याला तसं सांगितलंही. पण आता तो माझी परीक्षाच घ्यायला बसला होता. त्याला अगोदरसारखा नकाशा काढून दाखवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. मी पेन घेतले आणि त्या कागदाचं थोडंफार जजमेंट घेऊन नकाशा काढण्याचा प्रयत्न करू लागलो. तरी एक बरं झालं की, त्यानं आम्हाला मूळ नकाशात पाहून दुसरा नकाशा बनवायला परवानगी दिली. मी त्याला म्हटले, ‘‘अरे सुरेश, ऐसा पहले नक्शा देख कर कोई भी नक्शा बना सकता है। तुम्हे परीक्षा लेनी थी, तो तुने मुझे यहाँ पर इंटरनेट देना चाहिये था।’’ पण त्याला ना इंटरनेट माहीत होते ना, गुगल मॅप. मी कसा तरी हळूहळू नकाशा काढायचा प्रयत्न करत होतो. त्यात भर म्हणून थंडीमुळे हाताची बोटं कुडकुडत होती. बघता-बघता मी तो नकाशा पूर्ण केला. त्यातल्या रेघोट्या थोड्याफार इकडे-तिकडे झाल्या होत्या, पण ठीक होत्या. अगोदरच्या नकाशाशी हा नकाशा जुळत होता. आता त्याला खात्री पटली की, नकाशा आम्हीच बनवलाय; कोणी पोलिसांनी वगैरे नाही. 

नंतर जवळच्याच कोणत्या तरी झाडाच्या काटक्या तोडून त्याने आम्हाला दिल्या. त्या दिवशी आम्ही त्यानेच दात घासले. हातपंप तिथेच चार पावलांवर होता. आम्ही चूळ भरत असतानाच किडमिड्या प्रकृतीचा एक जण सायकलवरून गडबडीने आमच्याच दिशेने येताना दिसत होता. आमच्यापाशी येऊन तो सुरेशच्या कानात गोंडी भाषेत काही तरी कुजबुजला. आम्हाला काहीच कळेना. मग सुरेश म्हणाला, ‘‘वो वहाँ पर दादा लोग आये है। उधर पास में ही कही पाडा में बैठे है। आपको उधरही बुलाया है।’’ आम्हाला ते ऐकून बरं वाटलं. ‘चला, आज काही तरी होईल. आज आपल्याला सोडून देतील’ असं आम्हाला वाटत होतं. बॅगांसहित जायचं आहे, असं सुरेशने सांगितल्याने बॅगा सायकलीवर टाकून बोलवायला आलेल्या माणसाच्या पाठोपाठ आमची वारी चालली. एक ओढा ओलांडल्यानंतर दूरवर एका आदिवासी पाड्याकडे बोट करून ‘‘वो उधर दादा लोग बैठे है।’’ असं त्या किडमिडीत प्रकृतीच्या सावळ्या माणसानं आम्हाला सांगितलं. 

बघता-बघता आम्ही त्या आदिवासी पाड्याजवळ पोचलो. तिथे बाहेरच दोन बाजा टाकलेल्या दिसत होत्या. त्यातल्या एका बाजेवर गर्द हिरवा गणवेश परिधान केलेला, सावळ्या रंगाचा आणि उंच शरीरयष्टीचा एक जण बसला होता. काळे बूट घातलेला तो दिसायला काटक होता. त्याची नजर तीक्ष्ण होती. आम्ही आलो तरीही त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काहीच बदलले नव्हते. त्याने आम्हाला त्याच्या समोरच्या बाजेवर बसण्याची खूण केली. आम्ही तिघेही त्या बाजेवर कसे तरी दाटीवाटीत बसलो. मागच्या गावात ज्याने आमची चौकशी केली होती, तोही त्या लीडरशेजारी आमच्यासमोरच्या बाजेवर बसला होता. हिरव्या गणवेशातल्या त्या लीडरने आम्हाला पुन्हा तेच प्रश्न विचारले... ‘आप इधर क्यूँ आये? इसी रास्ते से क्यूँ आये? क्या करते हो? क्या पढते हो?’ वगैरे वगैरे. 

आम्ही खूप शांतपणे आणि हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होतो. ‘‘हम विद्यार्थी है। हम हर साल इस तरह सायकल यात्रा को निकलते है। हमे हमारा देश देखना है। जानना है। हमारे लोगों को जानना है। सब चीजे पुस्तकों मे पढने को नही मिलती है, ऐसे घुमने से बहुत लोगों से बातचित भी होती है। अलग अलग संस्कृती... भाषा देखने को मिलती है।’’ असं आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण साऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा जशाच्या तशा होत्या. आम्ही त्यांना काय बोलतोय हे ठीकसं समजत होतं की नाही, काय माहिती! 

आता समोरच्या लीडरने त्यांच्यातल्याच एकाला आमची सगळी माहिती लिहून घ्यायला सांगितली. एकेक करत त्याने आम्हाला आमचे नाव, आम्ही काय शिकतो ते विषय, कॉलेजचे नाव आणि पत्ता विचारला. त्यांना आम्ही सायकलस्वारच आहोत याची खात्री पटावी म्हणून मी बॅगेतला कॅमेरा काढून त्यांना पहिल्यापासूनचे सगळे फोटो दाखवायला सुरुवात केली. कॅमेऱ्याचं त्यांनाही खूप कौतुक होतं. फोटो जसजसे पलटत होते तसतसं आम्ही त्यांना भामरागडपासून इथपर्यंतचा सायकल प्रवास कसा कसा आणि कुठून झाला, ते सांगत होतो. महाराष्ट्रातील माडिया लोकांच्या संस्कृतीबद्दलही आम्ही त्यांना सांगितलं. वाटेत येताना महाराष्ट्र-छत्तीसगड बॉर्डरवर इंद्रावती नदी लागली. त्या नदीचे पात्र अकराशे मीटर रुंद असूनही तिच्यावर पूल नाही. आम्ही ती नदी इतरांप्रमाणे डोंगलच्या साह्यानेच पार केली. लोकांची भरपूर वर्दळ असून आणि आदिवासींसाठी तो पूल होणे गरजेचे असूनही तो झालेला नसल्याचे आम्ही त्यांना सांगितले. 

आमचे पाण्यातून सायकल काढतानाचे, अंगणवाडीतल्या चिमुकल्या सोबतींचे, आदिवासी पाड्यांसमोर उभे राहून गाववाल्यांबरोबर काढलेले असे वेगवेगळे फोटो पाहून त्यांनाही बरं वाटत होतं. त्यांच्या चेहऱ्यावरच्या आक्रसलेल्या रेषा आता जरा सैल झाल्या होत्या. आम्ही जे सांगत होतो, ते सगळे जण कुतूहलाने ऐकत होते. ‘‘आपके यहाँ खेती में क्या उगता है? आपके यहाँ लोग खाने में क्या खाते है?’’ असं त्यातल्या एका गणवेशवाल्याने आम्हाला उत्सुकतेने विचारले. ‘‘इथल्या लोकांच्या तुलनेत आमच्या इकडे भात तसा कमीच खातात. शेतात गहू, ज्वारी भरपूर येत असल्यामुळे त्याच्या चपात्या (रोटी) जेवणासाठी प्रामुख्याने असतात.’’ असं आम्ही त्यांना सांगू लागलो. 

‘‘लेकिन अभी हमारे इधर किसानों की परिस्थिती बहुत बिकट है। इस साल बारिश कम होने के कारण खेती में कुछ भी ठीक से नहीं उग पाया है। हमारे यहाँ महाराष्ट्र मे बहुत किसानो ने अपने घर में ही खुद को फाँसी पर चढा के आत्महत्या की है। सरकारने उनको जो कर्जा दिया था, वो चुका न पाने की वजह से वे आत्महत्या कर रहे है। लेकिन हमारे इधर कोई आप जैसे बंदुक लेकर नहीं लढता । हमारे इधर के लोक शांती से आंदोलन करते है, उपोषण करते है, फिर सरकार को उनकी बात सुननी ही पडती है।’’ 

आता बराच वेळ झाला होता. ‘‘आपको दो दिन में छोड देंगे । हमारे उपर के कमिटी तक आपकी रिपोर्टिंग जायेगी और फिर उनसे बातचित कर के आप को छोड दिया जायेगा।’’ असं सांगून ते तिथून हलण्याची तयारी करू लागले. आता पुन्हा दोन दिवस म्हटल्यावर आम्हाला काही सुचायचे बंद झाले. ‘‘हमे तो विशाखापट्टणम्‌ तक जाना है। ऑलरेडी हमे यहाँ तीन दिन हो चुके है। हमारा वहाँ कॉलेज शुरू हो जाएगा...’’ असं आम्ही त्यांना सांगू लागलो. ‘‘आप फिकर मत करो, आप को जल्द ही छोड देंगे। कल हो सके तो कल ही छोड देंगे। लेकिन जादा तर दो दिन लगेंगे।’’ असं तो लीडर आम्हाला म्हणाला. आमच्याकडे प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही आमच्या सायकली घेऊन आलो होतो तिथेच पुन्हा गेलो. 

मगाशी त्यांना भेटायला जाताना मनात आलेल्या सगळ्या आशा फोल ठरल्या होत्या. आता आणखी दोन दिवस थांबणं तसं जीवावरच आलं होतं. आमच्यासाठी त्या बाजा तिथं तशाच होत्या. आम्ही आता बाजांवर आडवे झालो होतो. खूप निराश वाटत होतं. पण एक गोष्ट मात्र झाली होती. आम्ही दादा लोकांबरोबर त्यांच्या समोर बसून काही तरी बातचित करून आल्यानं इथल्या लोकांमध्ये आमची इमेज वाढली होती. आम्ही त्या दुपारी कसं तरी जेवण केलं आणि पुन्हा तसेच बाजेवर आडवे झालो. विकासचा चेहरा तर पारच पडला होता. वेळ जाता जात नव्हता. आजूबाजूला आमच्याशी गप्पा मारायलाही आज कुणीच नव्हते. 

तेवढ्यात काल आम्हाला इथं घेऊन आलेला सुरेशच्या सोबतचा तो 40- 50 वर्षे वयाचा माणूस दुरून येताना दिसला. आत्ताही तो ताडीच्या नशेते डुलत-डुलतच येत होता. आमच्याजवळ येऊन तो माझ्या बाजेवर बसला. त्याच्या हातात कालचा तो सुरा होताच. ताडीच्या नशेत तो पुन्हा तेच ते प्रश्न विचारत होता. ‘किसने भेजा है? इधर क्यूँ आये?’ आणि पुन्हा त्याच गोष्टी सांगत होता. ‘चिंता मत करो, छोड देंगे... कल... कल आपको छोड देंगे।’ त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि त्याच्या सांगण्यानुसार माना डोलवायला आमचा मूड नव्हता. पण त्याला काहीच रिस्पॉन्स दिला नाही तर तो आणखीनच चिडचिड करायचा. त्याच्या हातात चाकू असल्याने आम्हालाही जरा शांततेनं घ्यावं लागत होतं. 

शेवटी त्याला कंटाळून मी माझ्या बाजेवरून उठलो आणि तिथं आजूबाजूला पडलेल्या मऊ लाकडाच्या छोट्या- छोट्या काड्या जमा करू लागलो. माझी आजी लहानपणी मला अशा काड्यांची खेळण्यातली बैलगाडी करून द्यायची. आपणही या काटक्यांपासून एखादी छोटीशी सायकल बनवू, असा विचार करून मी बऱ्याच काड्या गोळा केल्या. तिथल्या एका आदिवासी पाड्यातल्या मुलाकडून मी एक चाकूही आणला. आता बाजेवर बसून मी त्या चाकूने बारक्या लाकडी काटक्यांना आकार देत होतो. माझ्याही हातामधे चाकू पाहून तो ताडी प्यायलेला माणूस आणखीनच चिडला. ‘‘ये क्या कर रहे हो? वो लकडी फेक दोऽ’’ असं म्हणून माझ्याकडे रागारागाने पाहू लागला. मी आपला चाकूने त्या लाकडाला कसलासा आकार देण्याचा प्रयत्न करत होतो. 

आज लाकडाची छोटीशी सायकल बनवायचीच, असं मी ठरवलं होतं. त्यानुसार माझं काम सुरू होतं. कारण या निमित्ताने वेळ कसा तरी चालला होता. पण मी त्याचं ऐकत नाही, हे पाहून ताडी प्यालेल्या त्या माणसाने माझ्या हातातला चाकू काढून घेतला आणि मी गोळा केलेली सगळी लाकडं दूरवर फेकून दिली. मला त्याचा प्रचंड राग आला. या परिसरात सगळीकडे ताडीबंदी जाहीर करायला पाहिजे, असं क्षणभर वाटून गेलं. हे सगळं तो नव्हे, तर त्याची ताडी करत होती. मला माझ्या गावाकडची आठवण झाली. दारू प्यायल्यावर सारे असेच वागतात. इथे पण ती समस्या होतीच. 

नंतर दुपारी दोनच्या दरम्यान तो एकदाचा गेला. तो गेल्यावर आम्हाला बरी झोप लागली. बघता-बघता संध्याकाळ कधी झाली, ते कळलंच नाही. हवेतला गारठा आता वाढला होता. आम्ही बाजा एकमेकांना चिकटवून त्रिकोणाकृती ठेवल्या होत्या आणि कालच्याप्रमाणे आजही मधोमध शेकोटी पेटवली होती. हळूहळू शेकोटीभोवती बारक्या मुलांची गर्दी जमू लागली. आज इथली चिमुकली आमच्यात थोडीफार मिसळत होती. कालच्यापेक्षा आज ती फ्रेंडली वाटत होती. त्या रात्री आम्ही सगळे एकत्रच जेवलो. जेवणं उरकल्यानंतर सारे जण शेकोटीभोवती गोलाकार बसलो होतो. कोणी आमच्याशेजारी बाजेवर बसलं होतं, तर कुणी तसंच तिथल्या झाडाला टेकून उभं होतं. जी पोरं अगोदर आमच्यापासून दहा-दहा हात लांब उभी राहून आमच्याकडे बावरून पाहायची, तीच आता आमच्यात चांगलीच मिसळून गेली होती. हसी-मजाक करत होती. आम्ही त्यांना अधूनमधून शेळीचा, मांजरांचा, कुत्र्याचा आवाज काढून दाखवायचो. विकास तोंड वाकडं करून दाखवायचा. आमच्या अशा कृत्यांवर ती पोट धरून हसायची. त्यांच्यातल्या एक-दोघांना सोडले तर कुणालाच व्यवस्थित हिंदी येत नव्हती आणि आमच्यापैकी कुणाला गोंडी येत नव्हती. पण तरीही आमचा संवाद चालू होता. प्रेमाने वागायला कुठे कुठली भाषा बोलायला लागते! 

आमची नावं मात्र त्यांच्या काही केल्या लक्षात राहत नव्हती. पण विकासचं नाव त्यांच्या डिक्शनरीमधे अगोदरपासूनच फिक्स होतं. अविकसित भागातील माणसांसाठी विकास हा शब्द खूप जवळचा असतो. जो- तो इथे येऊन विकासाची भाषा बोलत असला आणि जरी विकास झाला नसला तरीही ‘विकास’ हा शब्द मात्र इथल्या गोंडी, कोया आदिवासींना चांगलाच ओळखीचा झालाय, हे नक्की. माझं आणि श्रीकृष्णाचं नाव मात्र त्यांच्या ध्यानात राहत नव्हतं आणि त्यांची हुंगा, गोंगलू, जोगा अशी नावं आमच्या लक्षात राहत नव्हती. 

इथे लोकांच्या नावांची खूप मजा आहे. घडलेल्या प्रसंगांवरून किंवा त्यांच्यासंबंधी एखाद्या गोष्टीवरून मुलांची नावं ठेवली जातात. जसं की- एखाद्या मुलाचा जन्म शुक्रवारी झाला तर त्याचं नाव शुक्का असं ठेवलं जातं. विशेष म्हणजे या भागात इंदिरा गांधींचं नाव खूप फेमस आहे. एखादी मुलगी जर जास्त पुढं-पुढं करायला लागली किंवा मोठमोठाल्या गोष्टी बोलायला लागली तर, लोक तिला ‘इंदिरा गांधी लागून गेलीस काय?’ असे टोमणे मारतात. इथल्या आदिवासींच्या मुलांची नावं कोर्सा, लालसू, जोगा, हुंगा अशीच असतात. त्यातील काही नावांना गोंडीमधून, माडियामधून काही तरी अर्थही असतो. 

इथला आदिवासी त्याच्या उघड्या छाताडाच्या पोराला शाळेत नाव नोंदवण्यासाठी घेऊन जातो, तेव्हा मात्र शाळेतला मास्तर त्याचं नाव काही तरी वेगळंच लिहून ठेवतो. त्याची जन्मतारीख ठरविण्याचं भाग्यही शाळेतल्या मास्तरांनाच लाभतं. कारण कोणाचा जन्म कोणत्या दिवशी झाला याची नोंद बिचाऱ्या आदिवासीकडे नसते. शुक्का असं नाव असेल तर शाळेच्या दाखल्यावर त्याचं नाव शुक्काराम असं लावण्यात येतं. एखाद्याचं नाव पूर्णपणे बदलून त्याला महेंद्र, शिवा अशी देवांची नावं दिली जातात. मागे आम्ही पाहिलं- कुटरूच्या जवळ बहुतांश लोकांच्या नावापुढे सिंग हा शब्द जोडण्यात आला आहे. जोगा असं नाव असेल तर मतदान कार्डावरती त्याचं नाव जोगासिंग असं झालेलं दिसतं. हा सिंग शब्द नावापुढे जोडण्यामागे नक्की काय उद्देश आहे, ते काही समजलेच नाही. 

आणखी एक गंमत अशी की- इथल्या आदिवासीला हेही कधीच माहिती नसतं की, तो हिंदू आहे. जेव्हा एखादा मुलगा शाळेत थोडाफार जायला लागतो, लिहायला-बोलायला शिकतो आणि नंतर ज्या दिवशी त्याच्या हातात त्याचा दाखला येतो तेव्हा तो त्याच्यावर वाचतो, त्याची जात हिंदू-गोंड अशी लिहिलेली असते. मग त्या दिवशी या बिचाऱ्याला तो हिंदू असल्याचा शोध लागतो. हिंदू धर्माबद्दल त्याला काहीच माहिती नसते. त्याला त्याच्या आदिवासी देवतांची नावं माहिती असतात. त्याची निसर्गावर श्रद्धा असते. इथला आदिवासी प्रामुख्याने निसर्गाची पूजा करत आला आहे. झाडांमध्ये आणि प्राण्यांमध्ये देवाला शोधत आला आहे. पण आज त्याला शोध लागतो की, ‘अरे, आपण तर हिंदू आहोत आणि आपला देव दगड-धोंड्यांमध्ये आहे!’ तो बिचारा अस्वस्थ होतो. हा अचानक कसा काय बदल झाला? ‘आपल्याला इतकी वर्षे कसे काय माहीत नाही झालं की, आपण हिंदू आहोत?’ असं त्याला वाटायला लागतं. 

काही जण अनिष्ट प्रथांना आणि तुच्छ वागणुकीला कंटाळलेले असतात. आपली आदिवासी जात अतिशय खालच्या स्तरातील व अस्पृश्य आहे, असं त्यांना उगाचच वाटायला लागलेलं असतं. मग अशांना कधी तरी कोणी फादरबाबा भेटतो. त्याच्या सांगण्यावरून ते चर्चमध्ये जायला लागतात. शांतीचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताबद्दल रोज शिकारीला जाणाऱ्या बिचाऱ्या आदिवासीला काहीच माहिती नसते. पण चर्च नावाचा काही तरी प्रकार असतो आणि तिथे प्रेअरला गेल्यावर भरपूर खायला आणि अंगावर कपडाही मिळतो. एवढंच त्यांना माहिती असतं. 

‘तुह्या धर्म कोणचा?’ ह्या चित्रपटाप्रमाणे आदिवासींच्या देव्हाऱ्यात मग हिंदू देव-देवतांबरोबर, कार्ल मार्क्सबरोबर येशू ख्रिस्ताच्या फोटोचीही वर्णी लागते. कोर्सा, जोगा, गोंगलू अशी जुनाट नावं बदलून जॉन, रॉबिन, थॉस, एलिझाबेथ अशी मॉडर्न नावं येतात. बदलली गेलेली ही नावे फक्त मतदान कार्डावरतीच राहतात, प्रत्यक्षात मात्र जुन्या नावांनीच एकमेकाला हाका मारल्या जातात. असा हा आदिवासींच्या संस्कृतीचा खेळखंडोबा सध्या सुरू आहे. आणि तो बिचारा तिथल्या भयाण काळोखात सुन्न होऊन बसला आहे- जणू त्यानं त्याचं अस्तित्वच हरवलं आहे. जणू तो असूनही नसल्यासारखा आहे! 

तसं म्हटलं तर, आदिवासींची संस्कृती ही सगळ्यांपेक्षा संपूर्णपणे भिन्न आहे. युनिक आहे, ग्रेट आहे. ती इतर कोणत्याच धर्माशी साधर्म्य साधणारी नाही. ज्यांचा इथं आदिपासून वास आहे, ते आदिवासी. इथं एकीची भावना खूप आहे. इथले लोक एकमेकांमध्ये मिळून-मिसळून राहतात. जे काही असेल ते मिळून-मिसळून करतात. आदिवासींमध्ये महिलांनाही पुरुषांसमान मानलं जातं, हे महत्त्वाचं आहे. इथं लग्नाच्या वेळी हुंडा वगैरे घेतला जात नाही. स्त्रीभ्रूणहत्या हा शब्द तर इथं कोणाच्या डिक्शनरीमध्येही नाही. जे आहे त्यावर समाधानी राहून इथले लोक आनंदात जगतात. स्वभावाने अतिशय प्रेमळ असणाऱ्या इथल्या माणसांमध्ये लोभीपणाची वृत्ती अजिबातच नसते. 

गडचिरोलीमधील माडिया समाजामधे माणसाचा मृत्यू झाल्यानंतर लोक जश्न साजरा करतात. गाय कापून त्याची मेजवानी करतात. ‘कोणाचा जन्म झाला तर तो काही तरी भोगायला आलाय आणि मृत्यू झाला तर त्याची यातून सुटका झाली’, असं समजतात. माणूस मेल्यावर त्याच्या थडग्यावरती त्याच्या आवडीची वस्तू कायमस्वरूपी फिट करून ठेवतात. आम्ही मागे गडचिरोलीत काही थडग्यांवरती सायकली, ताट-वाट्या, दारूची बाटली, एवढंच काय एका थडग्यावर तर चक्क टीव्ही फिट केलेला पाहिलाय! माडिया समाजातील ही गोष्ट थेट हडप्पा संस्कृतीशी साधर्म्य साधणारी आहे. आजही हे लोक खूप श्रद्धेनं त्यांची संस्कृती जपून आहेत. 

इथले लोक त्यांची लेकरं कुपोषणाने मरत असतानाही आणि गावामध्ये घरटी 15-20 गाई असतानाही गाईचं दूध काढत नाहीत. ते निसर्गानं तिच्या वासरांसाठी बनवलं आहे;. मग ते आपण कसं बरं काढायचं, असा साधा विचार ते करतात. इथं प्रत्येक गावामध्ये एक गोटूल असतं. गोटूल म्हणजे गावाच्या मालकीची इमारत. गावात कोणताही एखादा कार्यक्रम असेल तर तो गोटूलमध्येच पार पाडतो. कोणाची काही समस्या असेल, भांडण-तंटे असतील; तर तेही गोटूलमध्ये बसूनच मिटवले जातात. गोटूलला गोंडी आणि माडिया समाजामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. डिसेंबर- जानेवारी महिन्यांध्ये पंडूम हा आदिवासी सण येतो. जेव्हा शेतातली पिके काढायला आलेली असतात, तेव्हा त्या अगोदर त्यांचं पंडूम करण्यात येतं. या वेळी गावातले सगळे लोक जमून शिकारीला जातात. हरणांची, रानडुकरांची, चितळांची शिकार करून गावाजवळून एका ठिकाणी साऱ्या गावाचं एकत्र जेवण बनवतात. याच दरम्यान आदिवासींमध्ये मातीने पाडा सारवण्याचेही काम केले जाते. सारवलेल्या भिंतींवर पांढऱ्या रंगाने नक्षीदार आकृत्या काढल्या जातात. यामध्ये फुलझाडांच्या आणि प्राणिमात्रांच्याच आकृत्या प्रामुख्याने असतात. 

अशी ही गोंड, माडिया आदिवासींची संस्कृती आहे. इतर जाती- धर्मांपेक्षा भिन्न आणि निसर्गाच्या जवळ जाणारी. इथला आदिवासी निसर्गाशी पूर्णपणे एकरूप होऊनच जगत आलेला आहे. कदाचित त्याच्यामध्ये अजून माणूस नावाचा निसर्गत: असणारा घटक जिवंत आहे. माणुसकी शिल्लक आहे. 

आता आमच्या समोरच्या शेकोटीने चांगलाच भडका घेतला होता. शेकोटीच्या तांबड्या प्रकाशात साऱ्या चिमुकल्यांची तोंडं झळाळत होती. आज आम्हीही त्यांच्यामध्ये मिसळून लहान होऊन गेलो होतो. आता इथं चांगलाच गोंगाट चालला होता. तेवढ्यात त्यातला एक जण कुठून तरी मक्याची कणसं घेऊन आला. उन्हात वाळवलेल्या त्या कणसांना लालसर रंग चढला होता. आम्ही सगळ्यांनी मिळून मक्याचे दाणे सोलून ते एका पानावर जमा केले. नंतर जोगाने कुठून तरी एक अर्धे फुटलेले मडके आणले. शेकोटीतली लाकडं थोडी इकडं- तिकडं हलवून त्यानं तो मडक्याचा तुकडा त्या शेकोटीवर ठेवला. खालून आग सुरूच होती. 

बघता-बघता मडकं चांगलंच तापलं. गोंगलूने त्यात मक्याचे मूठभर दाणे टाकले. खराट्याच्या काड्यांनी तो ते भाजू लागला. थोड्याच वेळात मक्याचे ते दाणे फुलून त्याचे छान पॉपकॉर्न बनायला सुरुवात झाली. काही जणांनी तोपर्यंत कोणत्या तरी झाडाची मोठाली पानं तोडून आणली होती. आम्ही सर्वांनी ते पॉपकॉर्न आपापल्या पानांमध्ये घेतले. तशा अंधारात, शेकोटीवर भाजलेल्या त्या मक्याची चव काही निराळीच होती! सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहत आपापल्या पानांतील मका आवडीने खात होते. आम्हाला मका भाजून देताना त्यांनाही खूप भारी वाटायचं. 

बस्तरच्या जंगलामध्ये जिथे लाइट नाही, रस्ता नाही; तिथे आम्ही शेकोटीच्या उजेडात तिथल्या पोरांनी आमच्यासाठी बनवलेले पॉपकॉर्न खात होतो. बऱ्याच दिवसांनी जिभेला वेगळी चव चाखायला मिळाली होती. इथली आदिवासी माणसं खरंचंच खूप प्रेळ आहेत. आम्ही त्या रात्री भरपूर मका खाल्ला. आता या पोरांना आपल्याकडचंही काही तरी द्यावं, असा विचार करून आम्ही बॅगेतले शेंगदाणे काढले. शेंगदाणे तसे त्यांच्यासाठी नवीनच होते. गोंगलू आता त्याच मगाच्या फुटक्या मडक्यात शेंगदाणे भाजू लागला. शेंगदाणे भाजण्याचं जजमेंट गोंगलूला नीटसं येत नव्हतं. मक्याच्या तुलनेत शेंगदाणे भाजायला वेळ लागला. थोडे-थोडे करत आम्ही जवळचे सगळेच शेंगदाणे छान खरपूस भाजले. पॉपकॉर्न खाल्लेल्या पानांवरच आता सगळे भाजके शेंगदाणे खायला लागले. 

‘‘ये हमारे खेत का है। हमारे गाँव का।’’ असं आम्ही त्यांना सांगितलं. पाड्यातल्या महिलांना आणि माणसांनाही भाजलेले शेंगदाणे फारच आवडले. लहान लहान पोरं तर शेंगदाण्यावर जाम खूश झाली होती. आज त्यांचीही मस्त मेजवानी झाली. आजचं जेवणही आम्ही सगळ्यांनी एकत्रच केलं. भातामध्ये शेंगदाणे मिसळून आम्ही जेवणं उरकली आणि पुन्हा शेकोटीभोवती बसलो. विकास त्याच्याच धुंदीमध्ये गाणं गुणगुणत होता. ‘‘किती सांगायचंय सांगायचंयऽ ऽ किती सांगायचंय मलाऽ ऽ’’ या गाण्याच्या ओळी त्या मुलांना भिन्न होत्या. 

विकास म्हणत असलेल्या गाण्यातला एखादा शब्द उच्चारून मुलं त्याचा विनोद करून उगाचच हसत होती. ते पाहून मग त्यांना आणखी हसवण्यासाठी आमचा श्रीकृष्णही गाणी म्हणू लागला - ‘संदेसे आते है, हमे तडपाते है...’’ वेगवेगळी गाणी म्हणून विकास आणि कृष्णाने त्या मुलांना खूप हसवलं. मीही मधूनच शेळीचा, कुत्र्याचा आवाज काढून त्यांना हसवत होतो. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे गीतसुद्धा आम्ही तिथे गायलो. आज खूपच भारी वाटत होतं. आम्ही आज खूश होतो. इथल्या लहान मुलांध्ये मिसळून गेलो होतो. ती हसायची, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक यायची. 

लहान मुलं दिलखुलास असतात. त्यांच्याच विश्वामध्ये रमणारी असतात. खोड्या करणारी असली तरी निरागस मनाची असतात. पण ही सगळी पोरं दिवसभर कुठेच दिसायची नाहीत. रात्र झाली की, आमच्यापाशी येत, यांच्यापैकी एक-दोघे बाहेर कुठे तरी आश्रमशाळेत सहावी-सातवीत शिकायला होते. बाकीचे सगळे इथंच असतात. त्यांना बाहेरच्या बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. यातलं कुणी कुणी पार्टीच्या शाळेतही जातं. पण या दादा लोकांच्या शाळेत काय शिकवतात, काय माहिती? पोलीस आले की मात्र उघड्यावर भरणाऱ्या या शाळेतील सगळ्यांना झाडींमध्ये पसार व्हावं लागतं. 

इथल्या मुलांचे शिक्षणाचे खूप हाल होतात. ‘सर्व शिक्षा अभियान’ जणू इथे लागूच होत नाही. या भागासाठीच्या ज्या आश्रमशाळा आहेत, त्या या इलाक्याच्या बाहेरील गावांमध्ये बांधण्यात आल्या आहेत. ज्याला शिकायची इच्छा आहे, त्याला 20-30 किलोमीटर पायपीट सहन करून चिंतलनार किंवा बासागुडला जावे लागते. सरकारची आश्रमशाळेची व्यवस्था मात्र छान आहे. शाळा कुठे का असेना, पण बऱ्यापैकी सोई-सुविधांनी युक्त आहे. मागे आम्ही बासागुडामध्ये एका आश्रमशाळेत मुक्काम केला होता. शिक्षकांची आणि बाकीच्या स्टाफची तशी थोडीशी बोंबाबोंबच आहे, पण या भागाच्या मानाने बाकीच्या व्यवस्था बऱ्यापैकी आहेत. सरकारने नेलेला आचारी कामावर न येताच पगार घेतो आणि ही शिकायला आलेली पोरं स्वत:च सर्वांचा स्वयंपाक आलटून-पालटून करतात. पण त्यांना त्याचं काही वाटत नाही. कारण गावाकडच्यापेक्षा इथं जरा ठीक खायला-प्यायला मिळतं. बाकीच्या सुविधा मिळतात. महत्त्वाचं म्हणजे लाइटच्या प्रकाशातली ऊब त्यांना इथं मिळते. वर्षातून दोन वेळा सरकारकडून कपडे मिळतात. वह्या-पुस्तकांचा खर्चही सरकारच करतं. 

शाळेत येऊन त्यांना बाहेरच्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. जग समजून घेता येतं. आपला गाव कुठं आहे याची जाणीवही त्यांना होते. पण कोणी एखादा शिकलाच, तर तो जास्तीत जास्त दहावी किंवा बारावीपर्यंत. त्यानंतर घराची जबाबदारी पडल्याने पुढे शिकणे होत नाही. मुलींची आकडेवारी मुलांच्या तुलनेने कमीच आहे. क्वचित कुणी तरी एखादा बारावीच्या पुढे शिकण्याचा प्रयत्न करतो. खूप कष्टाने, अनेक समस्यांचा सामना करत पदवीचे शिक्षण पूर्ण करतो. पण एवढं शिकूनही नोकरी मिळेलच याची खात्री नसते. कुठे शिक्षकाची किंवा चपराशाची नोकरी मिळालीच, तर तिथे पर्मनंट होण्यासाठी लाच मागितली जाते. लाच द्यायला पैसा नसल्याने तोंडचा घास जातो. 

इथल्या मुलांना दुसरा पर्याय असतो तो पोलीस भरतीचा. पण पोलिसांत गेलं तर स्वत:चा गाव कायमसाठीच सोडावा लागतो. गाववाल्यांना तर असं वाटतं की, शाळा शिकून कुठं काय होणार आहे? कितीही शिकलं तरी पुन्हा आपल्याच गावात यायचं आहे. एवढी डुकरं, कोंबड्या, बदकं, गाई आपणाकडे असताना आणि पुरेशी शेती असताना आपल्या पोरांना बाहेर नोकरीला जायची काय गरज आहे? पण तरीही जे जागरूक आहेत, ते आपल्या मुलांना आश्रमशाळेत पाठवतात. आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आकडा हळूहळू वाढतोय, ही समाधानाची गोष्ट आहे. 

मागे आम्ही बिजापूरच्या थोडंसं पुढे नुकनपाल येथील एका सरकारी शाळेला भेट दिली. तेव्हा शाळेत फक्त एकच शिक्षक होते. मुलांचा तर पत्ताच नव्हता. ते सर कुठले तरी पेपर तपासत बसले होते. त्यांच्याशी आमचं बरंच बोलणं झालं. शाळेचा पट 17-18 होता. त्यांनी आम्हाला मुलांनी लिहिलेले पेपर्सही पाहायला दिले होते. ‘झाडांपासून आपल्याला काय मिळते?’ (लाकूड) आणि ‘पाण्याचा उपयोग कशासाठी होतो?’ (पिण्यासाठी) या अशा प्रश्नांशिवाय मुलांनी काहीच सोडवले नव्हते. सगळ्या पेपर्सध्ये रनिंग लिपीमधील अक्षर मात्र सारखेच दिसत होते. शॉर्टकटमध्ये पासिंगपुरती उत्तरे लिहून त्यांना पुढल्या इयत्तेत ढकलण्याचा तो प्रयत्न होता. 

छत्तीसगडमध्ये इतिहास, भूगोल हे विषय दहावीपर्यंत शिकवलेच जात नाहीत. यामागचं कारण मात्र आम्हाला समजले नाही. प्राथमिक स्तरापासूनच शाळेमध्ये संस्कृत हा विषय शिकवला जातो. पण इथल्या इंडिजीनियस आदिवासींची गोंडी भाषा शिकवली जात नाही. इथं शाळेत शिकणाऱ्या कोणत्याही मुलाला आपण जर ‘तुझी मातृभाषा कुठली आहे?’ असं विचारलं, तर तो ‘हिंदी’ असंच उत्तर देतो. मग नंतर त्यालाच ‘तुझ्या आईला हिंदी येते का?’ असं विचारलं तर तो ‘नाही’ अशी मान हलवतो. ‘हमारे घर में सब गोंडीही बोलते है।’ असं तो म्हणतो. गोंडी भाषेचा समावेश आठव्या अनुसूचीत नसल्याने संविधानानुसार प्रत्येकाला आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार असूनही इथे कुणालाच गोंडी भाषेतून शिक्षण घेता येत नाही. 

इथले बहुसंख्य लोक गोंडी बोलतात. गोंडी ही बोलीभाषा असून तिला स्क्रिप्ट नाही. थोड्या-थोड्या अंतरानंतर तिचं ट्युनिंगही बदलत जातं. वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी गोंडी बोलली जाते. भामरागडच्या लालसू वकिलांसारखे काही शिकलेले लोक आता एकत्र येऊन गोंडी भाषेचं स्टॅंडर्डायझेशन करून तिचा समावेश संविधानाच्या आठव्या अनुसूचीत होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

काहींचं असं म्हणणं आहे की, 1956 मध्ये जेव्हा राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनची स्थापना करण्यात आली होती तेव्हाच (मराठी भाषा बोलणाऱ्यांसाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य बनले; कन्नड बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक बनले आणि बंगाली बोलणाऱ्यांसाठी बंगाल बनले, त्याप्रमाणे) गोंडी भाषा बोलणाऱ्यांसाठी गोंडवाना नावाचं राज्य बनायला हवं होतं. पण भाषावर प्रांतरचनेच्या वेळी तसं झालं नाही. गोंडी भाषा बोलणारा काही भाग महाराष्ट्राला जोडला गेला, काही छत्तीसगडला, तर काही ओडिशाला. इथल्या जमिनीत खूप खनिजसंपत्ती असल्यामुळे आणि इथली माणसं खूपच मागास व गरीब असल्यामुळेच त्यांचा गैरफायदा घेत त्या वेळी गोंडवाना हे वेगळं राज्य बनवण्यास टाळाटाळ करण्यात आली; पण निदान आता तरी गोंडी भाषेचा गंभीरतेने विचार करून तिच्या संवर्धनासाठी काही प्रयत्न करायला पाहिजेत. इथल्या मुलांचा मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा सांविधानिक अधिकार बहाल केला पाहिजे. याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल आणि इथल्या गोंड, कोया, माडिया आदिवासींच्या मुलांचा शाळेमध्ये जाण्याकडे कल वाढेल. 

नुकनपालच्या शाळेतील एका शिक्षकाला आम्ही ‘‘आपको इलेक्शन के दौरान मतदान बूथ की भी ड्यूटी होती होगी ना?’’ असं विचारलं, तेव्हा ते म्हणाले, ‘‘इथं एवढं कोणी मतदानच करत नाही. मतदान केंद्रे खूप लांब-लांब असल्याने आदिवासी त्या भानगडीतच पडत नाहीत. इलेक्शनच्या काळात इथली परिस्थिती तणावपूर्ण बनत असली तरी प्रत्यक्षात इथं सर्वत्र शुकशुकाट असतो. कोणीही इथं प्रचार करायला येत नाही.’’ बासागुडामधील आश्रमशाळेच्या सरांना आम्ही ‘सरकारी सर्व्हेची जबाबदारी तुमच्यावर येते, तेव्हा तुम्ही काय करता?’ असं विचारलं होतं. तेव्हा ते म्हणाले, ‘‘कोणत्याही सर्व्हेच्या वेळी आम्हाला खूप पायी फिरावं लागतं. आम्ही इथले आदिवासी पाडे न्‌ पाडे पालथे घालतो. पण कुठलाही सरकारी सर्व्हे करण्याअगोदर आम्हाला दादा लोकांची परवानगी काढावी लागते. 

आम्ही 2011 च्या जनगणनेच्या वेळीही जंगलात खूप पायपीट केली. आजही अबुजमाडातील बरीच गावे अशी आहेत की, ज्यांचा कसलाच सर्व्हे झालेला नाही. काही लोकांकडे रेशनकार्ड, आधारकार्ड- एवढंच काय, आपण भारताचे नागरिक असल्याचं कसलंच ओळखपत्र नाही. इथले बरेच आदिवासी अजूनही सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित आहेत. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी नसल्याने कोणताच सरकारी अधिकारी दुर्ग भागात काम करायला तयार होत नाही. सरकारी डॉक्टर कुठेच दृष्टीस पडत नाहीत.’’ खरंच, हे आपल्याला कधीच माहिती नसते की, आपल्या भारतात असाही काही भाग आहे- जिथे आज स्वातंत्र्यानंतरच्या 69 वर्षांनीसुद्धा लाइट नाही, रस्ते नाहीत, शाळा-दवाखाने असं काहीच नाही. शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था नाही. पेसा कायदा ज्या भागासाठी आणलाय, तिथे अजून ग्रामपंचायतच नाही. सरकार म्हणावं अशी कुठलीच व्यवस्था नाही. हे सगळं अस्वस्थ करणारं, भयानक आहे. 

यासाठी फक्त सरकारलाच कारणीभूत धरणं योग्य नाही. या तणावपूर्ण परिस्थितीला असंख्य गोष्टी कारणीभूत आहे. इथला समाज बाहेरच्या समाजापासून दुरावलेला आहे. खरी गरज आहे ती इथल्या गरजा समजावून घेण्याची आणि त्यांना माणसांसारखी वागणूक देण्याची. त्यांच्याशी संवादाचा एक पूल बांधून माणूस माणसाला जोडण्याची. आता बराच उशीर झाला होता. सर्वांचेच डोळे तारवटले होते. मक्याच्या कणसांचे पॉपकॉर्न आणि जेवणाबरोबर भाजलेले शेंगदाणे खाल्ल्याने आज पोट गच्च झालं होतं. आम्ही आता तसेच बाजेवर कलंडलो होतो. आजूबाजूची सगळी लहान मुलं शेकोटीला खेटून बसली होती. आम्ही आता झोपायला लागलोय, हे पाहिल्यावर मात्र त्यांनी त्यांचा मोर्चा आमच्यापासून थोड्या दूरवर असणाऱ्या जोगाच्या बाजेकडे हलवला. तिथेच दुसरी शेकोटी पेटवून सगळे तसेच आडवे झाले. 

आम्ही कालप्रमाणे आजही काळ्याकुट्ट आभाळाकडे पाहत झोपण्याचा प्रयत्न करत होतो. आकाशामध्ये चंद्राची कोर दिसत होती. चांदण्यांचा चमचमाट सुरू होता. पण डोळ्यांसमोर पसरलेला भयाण काळोख मात्र काही केल्या नजरेसमोरून हटत नव्हता. प्रत्येक रात्रीप्रमाणे आजही तांबूस सूर्यप्रकाश घेऊन येणाऱ्या पहाटेची चातकासारखी वाट पाहत आम्ही थंडीने कुडकुडत झोपलो. 

सकाळ झाली तेव्हा कुरळ्या केसांचा, आम्हाला इथं घेऊन आलेला सुरेश आमच्यासमोरच उभा होता. आज त्याने त्याच्या खांद्यावर रेडिओ अडकवला होता. हातामध्ये कसलंसं छोटंसं पुस्तक होतं. कालपासून आम्ही त्याला सारखं-सारखं ‘इसको गोंडी में क्या बोलते है? उसको गोंडी में क्या बोलते है?’ असं विचारत होतो. त्यामुळे त्याने आज आमच्यासाठी गोंडी भाषेची एक अंकलिपी आणली होती. त्यानं ती हसत-हसत माझ्या हातात दिली आणि ‘पढो जितनी गोंडी पढनी है उतनी’ असं म्हणाला. आम्ही ती जुनाट झालेली आणि थोडीशी फाटलेली अंकलिपी हातात घेऊन उत्सुकतेनं चाळायला लागलो. 

लाकडाला गोंडीमध्ये ‘कटिया’ असं म्हणतात. गावाला ‘नार’ असं म्हणतात. शेताला ‘बेडा’, शेकोटीला ‘कीस्स’, तर शुक्रिया म्हणण्यासाठी ‘नेक्क नाला’ असं म्हणतात. आम्ही काही शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. आमचं गोंडीचं उच्चारण नीट जुळत नसल्याने सुरेश आमच्याकडे पाहून हसत होता. काल पोलिसांचे खबरे असल्याचा संशय घेऊन अगोदरसारखा नकाशा काढून घेणारा सुरेश आज आम्हाला गोंडी शिकण्यासाठी अंकलिपी घेऊन आल्यानं आम्हाला त्याचं नवल वाटत होतं. खरं तर या भागात काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनीही गोंडी भाषा शिकायला पाहिजे. 

आदिवासींशी आपण त्यांच्याच भाषेमधे बोलू शकत असलो, तर त्यांच्या आणखीनच जवळ जातो. त्यांचाही आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. इथं आज जी कम्युनिकेशन गॅप तयार झाली आहे, त्याला आदिवासींना हिंदी न येणे आणि सरकारी अधिकाऱ्यांना गोंडी न येणे याच गोष्टी कारणीभूत आहेत. आता सुरेशही आमच्यासमोरच्या बाजेवर बसला होता. विस्कटलेल्या केसांचा आणि मळके कपडे घातलेला सुरेश मधूनच खांद्यावर अडकवलेल्या रेडिओचं गोलाकार बटण हळुवारपणे फिरवायचा. फ्रिक्वेन्सी मॅच झाली की रेडिओचा खरखर असा आवाज यायचा. मग सुरेश ते बटण पुन्हा मागे-पुढे करायचा. आता थोडासा स्पष्ट आवाज येऊ लागला. 

त्या वेळी ऑल इंडिया रेडिओवर सकाळी 8.15 च्या मॉर्निंग न्यूज सुरू होत्या. न्यूजमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जात होत्या, त्यांचा या भागाशी काहीच संबंध नाही, असं उगाचच वाटत होतं. त्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तान भेटीची न्यूज होती. मधूनच इसिस, तालिबान्यांबद्दलही काही तरी सांगितलं गेलं. काही आंतरराष्ट्रीय न्यूजही सांगण्यात आल्या. मधूनच रेडिओ खरखर करायचा, मग सुरेश त्यावर एक थापड मारायचा. रेडिओ कानाजवळ धरून इकडून तिकडे फिरवायचा. पुरेशी रेंज मिळाली आणि फ्रिक्वेन्सी जुळली की, रेडिओचा आवाज पुन्हा सुरू व्हायचा. असं करत आम्ही कशा तरी न्यूज ऐकत होतो. त्या इंग्रजीमधून चालल्या होत्या. सुरेशला इंग्रजी येत नसल्याने त्याला त्या समजत नव्हत्या. नंतर त्याच बातम्यांचे हिंदीतून प्रसारण झाले. 

पण त्या बातम्यांमध्ये यांच्या समस्यांबद्दल काहीच नव्हते. एक तर या बातम्या हिंदी-इंग्रजीतून असल्यामुळे गोंडी भाषा बोलणाऱ्या इथल्या सर्वसामान्यांना त्या समजत नव्हत्या. त्यातील नावे घेतलेली माणसे, ठिकाणे यांना माहीत नव्हती आणि हिंदी येत असणाऱ्या एखाद्याला त्या समजत असल्या तरी त्या त्याच्या काहीच कामाच्या नव्हत्या. त्यांच्याविषयी कोणीच काही बोलत नव्हते. ‘मीडिया प्रत्येकाच्या मातृभाषेतून उपलब्ध असणे गरजेचे आहे.’ हे सीजी नेट स्वराच्या लालसू वकिलांनी केलेले विधान आता योग्य वाटू लागले होते. 

शिक्षितांबरोबर अशिक्षितांनाही प्रसारमाध्यमांचा उपयोग झाला पाहिजे. प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत असे आपण म्हणतो; तर मग इथल्या गोंड, माडिया आदिवासींना ती का लागू होत नाहीत? इथल्या इंडिजीनियस लोकांच्या प्रश्नांना उचलून धरण्यासाठी आणि इथल्या स्थानिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी का म्हणून कोणतीच प्रसारमाध्यमं पुढाकार घेत नाहीत? इथल्याच लोकांच्या सहभागाने त्यांच्याच मातृभाषेतून एखादा मीडिया सुरू होण्याची गरज आहे. पण सीजी नेट स्वरा वगळता अशा कोणत्याही प्रकारचा मीडिया इथे कार्यरत नसल्यामुळे बाहेर काय चाललंय ते इथल्या माणसांना कळत नाही आणि इथं काय चाललंय ते बाहेरच्यांना कळत नाही. तरीही इथे कुणाकुणाला आम आदमी पार्टी माहिती आहे. केजरीवालांचे फॅन्स इथेही आहेत. 

तसा विचार केला तर ‘पत्रकार’ हा शब्दच मुळात चुकीचा आहे. ज्याला पत्र वाचता येतं किंवा लिहिता येतं, तो म्हणजे पत्रकार. याचा अर्थ पत्रकार ही गोष्ट फक्त शिक्षित वर्गालाच लागू पडते. मग ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, त्यांचं काय? आणि म्हणून पत्रकार हा शब्द बदलून तिथे ‘बोलकार’ हा शब्द वापरायला पाहिजे. आपापल्या मातृभाषेतून बोलण्यासाठी कोणत्याच शैक्षणिक पात्रतेची अट लागत नाही. जेव्हा अशा प्रकारचा मीडिया अस्तित्वात येईल, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ ठरू शकेल, असं मत सीजी नेट स्वरा या मोबाईल मीडियासाठी काम करणाऱ्या भामरागडच्या लालसू नरोटींचं होतं. 

सी.जी.नेट स्वरा (सेंट्रल गोंडवाना नेटवर्क) ही महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र आणि ओडिशा या राज्यांच्या सीमावर्ती भागामधील गोंडवाना परिसरात मोबाईल मीडिया चालवणारी हिमांशू चौधरी यांची संस्था आहे. मोबाईलमधील एका ॲपच्या साह्याने सीजी नेटचे त्या-त्या भागातील साथी तेथील लोकांच्या समस्या त्यांच्याच मातृभाषेत रेकॉर्ड करतात आणि ती ध्वनी-क्लिप इंटरनेटच्या माध्यमातून सीजी नेटच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोचवतात. स्थानिक भाषेत रेकॉर्ड केलेल्या ध्वनिमुद्रणाचे रायपूर येथील मुख्य ऑफिसमध्ये हिंदी आणि इंग्रजीतही भाषांतर केले जाते. त्यानंतर बस्तर, मलकानगिरी, गडचिरोलीच्या जंगलामध्ये राहणाऱ्या आणि दहशतीत जगणाऱ्या गोंडी, माडिया आदिवासींचा आवाज सर्व भारतभर पोचवला जातो. 

एखाद्या गावात कुठे हातपंपामध्ये काही बिघाड झाला असेल किंवा कुठे कुणाला नरेगाचे वेतन मिळाले नसेल किंवा स्वस्त धान्य दुकानाबाबत लोकांच्या काही तक्रारी असतील, तर सीजी नेटचा त्या भागातील साथी त्या ठिकाणी जातो. संबंधित गाववाल्यांना त्यांच्या समस्येबद्दल विचारून त्यांचा आवाज आपल्या मोबाईल ॲपमध्ये सेव्ह करून घेतो आणि त्याचबरोबर ‘इस गाव में ऐसी एक समस्या है! बराबर निवेदन दे कर भी सरकारी व्यवस्था इसमे ध्यान नहीं दे रही है। मैं आप का सीजी नेट साथी, सीजी नेट सुननेवाले आप सभी साथीयों को यह निवेदन करता हूँ की, आप स्वयं यहाँ के तहसीलदार से दूरध्वनीसे संपर्क करे और यहाँ के लोगों की समस्या का निराकरण करने के लिए उन्हे विनंती करे। यहा के तहसीलदार का नाम ------ है और उनका दूरध्वनी क्रमांक ------ है। धन्यवाद।’ असं रेकॉर्डिंग करून तो ते ध्वनिमुद्रण मोबाइलला रेंज असणाऱ्या ठिकाणी जाऊन इंटरनेटच्या साह्याने भारतभर प्रसारित करतो. 

याचा परिणाम असा होतो की- कुणी दिल्लीहून, कुणी बेंगळुरूहून तर कुणी कोलकातावरून त्या तहसीलदाराला फोन करून हातपंप बसवण्याची विनंती करतात. कधी कधी एखादा फोन चक्क अमेरिका, जर्मनीहूनही येतो. दिल्ली, मुंबईहून फोन आलेला पाहून सरकारी व्यवस्था लगेच कामाला लागते. सीजी नेट स्वराच्या माध्यमातून गाववाल्यांचा प्रश्न सुटतो. महत्त्वाचे म्हणजे, गाववाल्यांना यातून एक गोष्ट समजते की, सरकारला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आपण त्या दाखवून दिल्या, तर सरकार त्याची पूर्तता तत्परतेने करते. प्रत्येक वेळी हातात शस्त्र घेऊन लढण्याची गरज नसते. 

आता सकाळचे नऊ-दहा वाजले होते. आमच्याकरता जेवण बनवण्याची तयारी चालली होती. सुरेशने जवळच एका चुलीवर भात शिजत ठेवला होता. आज तो कुठून तरी घेवड्याच्या शेंगा घेऊन आला होता. इथं आल्यापासून पूर्वी माहिती नसलेल्या आदिवासी भाज्यांशिवाय दुसऱ्या कोणत्याच भाज्या खायला मिळाल्या नव्हत्या. ते सर्व खायचे तेच आम्हालाही असायचं. आम्हाला त्या भाज्या आणि भात नीट जात नाही, असं वाटूनच तो आज घेवडा घेऊन आला होता. आम्ही बाजेवर बसूनच घेवडा निवडला. सुरेशने भाताची डिचकी चुलीवरून बाजूला काढून त्या जागी दुसरं एक भांडं ठेवलं. 

विशेष म्हणजे, आज भाजीत घालायला तेलही आणलं होतं. तेंदूच्या एका पानातून तेल घेऊन जोगा आला होता. त्यानं पानाची अशी घडी केली होती की, त्यातून थोडंही तेल सांडत नव्हतं. कुणी तरी कुटून केलेला मसाला आणि दोन-तीन सुक्या मिरच्याही घेऊन आलं होतं. (तसं म्हटलं तर तेल, मसाला इथं रोजच्या जेवणात कुणी वापरत नाही. घरात लागणाऱ्या इतर गोष्टीही चिंतलनारच्या आठवडी बाजारातून खरेदी करून आणाव्या लागतात.) बघता-बघता घेवड्याची भाजी तयार झाली. पातेल्यावर काही तरी झाकण ठेवून आम्ही ती आणखीन जरा शिजू दिली. 

आज खूप दिवसांनी तेल आणि मसाला घालून बनवलेली भाजी खायला मिळणार होती. तोंडाला पाणी सुटले होते. सुरेशने स्वत:च्या हाताने भाजी बनवली होती. काल-परवा जो सुरेश हातात चाकू धरून आपल्याला इथं घेऊन आला, त्यानं आज आपल्याला एवढा जीव का लावावा, हे समजत नव्हतं. समोरचा माणूस कसा का असेना; पण आपण त्याच्याशी प्रेमाने आणि माणुसकीने वागलो तर, तोही आपल्याशी माणुसकीनेच वागतो, एवढं आता आम्हाला चांगलं कळलं होतं. 

आमच्यापासून चार पावलांवर एक कुत्र्याचं पिल्लू चुलीच्या उबेला बसलं होतं. मधूनच ते पिल्लू जमिनीवर मान टाकून आमच्याकडे एकटक पाहत होतं. आम्ही त्याला यू-यू केलं तरी ते कसलाच रिस्पॉन्स देत नव्हतं. मात्र हुंगाने त्याला ‘कुतूकुतू ऽऽ कुतूऽऽ’ अशी हाक मारताच ते त्याच्याकडे धावत गेलं. इथं कोंबड्यांना ‘कुड्‌ कुड्‌... कुड्‌ ऽऽ’ असंच बोलावलं जातं आणि मांजराला ‘मिनीऽऽ मिनीऽऽ’ असं. आम्हाला ते वेगळं होतं. पाळीव प्राण्यांना सगळीकडे एकसारख्याच आवाजाने बोलावलं जातं हा आमचा समज इथे दूर झाला. आदिवासींमध्ये ज्या त्या प्राण्याला त्याच्याप्रमाणे आवाज काढून बोलावलं जातं. 
आता भाजी चांगलीच शिजली होती. आम्ही सर्वांनी पानांमध्ये भात वाटून घेतला. त्यावर घेवड्याची भाजी घेतली. बाजेवरचा रेडिओ तसाच सुरू होता. मगाचंच ‘आज फिर जिने की तमन्ना है’ हे गाणं संपलं होतं. आता तेलुगू गाणी ऐकू येत होती. रेडिओ एवढा खरखरत होता की, नीट आवाजही यायचा नाही. मग आम्ही तो सरळ बंदच करून ठेवला. आजचं जेवणं चवीला वेगळं होतं. आम्ही जेवणं करून तसेच बाजेवर कलंडलो. दुपारची वेळ असल्यामुळे थोडासा थकवाही आला होता. काल दुपारी त्या ताडी प्यालेल्यानं खूप दमवल्याने आम्ही आज सुरेशला ताकीदच देऊन ठेवली होती की, जोपर्यंत आम्ही इथं आहोत तोपर्यंत तू तरी निदान ताडी प्यायची नाहीस. त्यावर तो दिलखुलास हसला होता. जेवण आटपून सुरेश कुठे तरी चालला होता, पण आम्ही त्याला मुद्दामच थांबवून घेतलं. आमच्याशी इथं बोलायला कुणीच नसल्याने तोही आमच्याजवळ थोडा वेळ बसला. 

विकासला एका बाजेवर खूप निराश चेहरा करून बसलेला पाहून, ‘‘ये क्या बीमार है क्या?’’ असे सुरेशने विचारले. ‘‘नहीं... नही उसको घर की बहुत याद आ रही है। बहुत दिन हुए... हमारी घरवालों से बातचित नहीं हुई। यहा तो नेटवर्क भी नहीं आता।’’ असं मी सांगितल्यावर सुरेशलाही वाईट वाटलं. ‘आपके घरम में कौन कौन है? तुम्हे बहेन है क्या? भाई है क्या? वो तुसे छोटे है या बडे? क्या करते है?’ असे नाना प्रश्न तो विचारू लागला. त्यानं आम्हाला त्याच्या घरच्यांबद्दलही सांगितलं. 

सुरेशचं नुकतंच लग्न झालेलं होतं. त्याच्या बाळालापण हातापायाच्या खुजलीचा खूप त्रास व्हायचा. आश्रमशाळेत शिकणाऱ्या त्याच्या लहान भावाला पण खूप पुरळ उठले होते. ‘‘मेरा छोटा भाई होशियार है। मैं उसे बहुत पढाने वाला हूँ।’’ असं तो आम्हाला छाताड पुढं करून सांगत होता. आम्ही तिघेही बाजांवरती आडवे होऊन त्याचं ऐकत होतो. आता आधीसारख्या गप्पा मारणं जिवावर आलं होतं. सुरेश मात्र एकटाच आमच्याकडे एकटक पाहत आम्हाला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचेही तोंड केविलवाणे झाले होते. 

तो थोडा वेळ बसला आणि नंतर ‘घराच्या विटा बनवायच्या आहेत’ असं सांगून निघून गेला. आम्ही मात्र बाजेवर पडून होतो. उठून सुरेशला निरोप देण्याचे अवसानही आता उरले नव्हते. वेळ जाता जात नव्हता. विकास तर खूप निराशाजनक चेहरा करून बाजेवर पालथा झोपला होता. हातात एक काठी घेऊन खालच्या मातीत उगीचच कसलीशी आकृती तो गिरगिटायचा. मधूनच नजर एका ठिकाणी रोखून तासन्‌ तास बसायचा. कृष्णाचं त्यामानाने बरं होतं. गळ्यावर एखाद्यानं सुरा ठेवला तरी त्यावर काही तरी विनोद करून, कुणाची तरी नक्कल करून उगीचच हसण्याची सवय त्याला होती. 

आज आम्हाला यांनी थांबवून ठेवून चार रात्री झाल्या होत्या. अजून किती दिवस काढायला लागतील, ते ठाऊक नव्हतं. असं सायकलवरून फिरून ‘इंडियाच्या आतमधील भारत समजून घेण्यासाठी’ आम्ही एक-एक दिवस कसा सेव्ह केला होता, ते आमचं आम्हाला माहिती होतं. दि.12 जानेवारीपर्यंत युवादिनाला विशाखापट्टणम्‌ला पोचण्याचा आमचा प्लॅन होता. पण आता सगळं नियोजन फिसकटल्यासारखं वाटत होतं. तरीही निदान मलकानगिरीपर्यंत जायचंच, असं आम्ही पक्कं केलं. बालिमेला डॅमचं स्वप्न मात्र स्वप्नच राहणार होतं. 

दिवस- दिवसभर नुसतं बसून राहणं जमत नव्हतं. कधी एकदा सायकली हातात येतायत आणि दिवसाला पन्नास-साठ किलोमीटर अंतर कापून आम्ही नवा प्रदेश पाहतोय, नव्या माणसांना भेटतोय, असं वाटतं होतं. ओडिशाच्या कोंढ, कोया आदिवासींची संस्कृती समजून घेण्यासाठी मन खूप उत्सुक झालं होतं. बालिमेला डॅम परिसरातील लोकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी आम्ही आतूर झालो होतो. असं बाजेवर निपचित पडून राहणं मनाला पटणारं नव्हतं. सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याला कुणी तरी अडवून ठेवल्यासारखी आमची अवस्था झाली होती. आम्ही तर फक्त चार दिवस झाले एका जागी बसून होतो. आम्हाला थोडीफार स्वायत्तता होती. कंटाळा आला तर, बाजेवरून उठून इकडं-तिकडं फिरता येत होतं. चार भिंतींमध्ये बंदिस्त नव्हतो. कुणी बांधून ठेवले नव्हते. आम्ही उघड्या वातावरणात होतो. मोकळ्या हवेचा आस्वाद घेत होतो. असं असूनही आमचा संयम सुटत चालला होता. सहनशक्ती विरत चालली होती. अशा वेळी नेल्सन मंडेलांची आठवण यायची. या माणसाने आयुष्यातली 27 वर्षे तुरुंगातल्या दहा बाय दहा फुटांच्या छोट्याशा खोलीत कशी काढली असतील, कुणास ठाऊक! त्या तुलनेत आमचं फारच बरं होतं. आम्हाला तर फक्त पोलिसांचे खबरे असल्याचा संशय घेऊन चार-पाच दिवस चौकशीसाठी थांबवून ठेवण्यात आलं होतं. वेळेत जेवणही मिळत होतं. बाकी काही त्रास नव्हता. 

पण एका गोष्टीचा मात्र नक्की ताण आला होता. तो म्हणजे आम्हाला हे माहिती नव्हतं की, आपल्याला इथं अजून किती दिवस राहावं लागणार आहे?. त्यामुळे वेळ कसा तरी घालवून मानसिक दृष्ट्या शांत व सक्षम राहणं गरजेचं होतं. ‘लाइफ ऑफ पाय’ या हॉलिवूडच्या चित्रपटामधील पायला तर समुद्रामध्ये वाघाबरोबर एकाच बोटीत कित्येक दिवस काढावे लागले होते. जिवंत राहण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला होता. बोटीतल्या या अस्वस्थ दिवसांमध्ये त्याने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून वेळ कसाबसा घालवला होता. त्या ‘पाय’ची परिस्थिती आणि आमची स्थिती यामध्ये तुलनाच होत नसली, तरी अशा प्रसंगी एक-एक मिनिट एकेका तासाप्रमाणे वाटू लागतो. त्यावर मात करण्यासाठी स्वत:ला कशामधे तरी गुंतवून ठेवून वेळ घालवणे खूप गरजेचे असते. वेळ जाऊ शकला, तरच आपली मानसिक अवस्था ठीक राहते, हे आता आम्हाला कळाले होते. 

आज आमच्यावर देखरेख ठेवण्यासाठीही कोणी नव्हतं. सगळे आपापल्या कामांमध्ये दंग होते. कृष्णा अधूनमधून म्हणायचा की, आपण इथं काही तरी काम करायला पाहिजे. असं नुसतं बसून अन्न खाण्यात अर्थ नाही. कामामध्ये रमून वेळही जाईल, असं वाटून आम्ही आजूबाजूची स्वच्छता करण्याचा विचार करत होतो. पण इथं कुठे घाण नव्हतीच, तर मग आम्ही स्वच्छता कशाची करणार! ‘स्वच्छ भारत अभियान’ आदिवासींच्या संस्कृतीमध्येच आहे. त्यांना स्वच्छतेचे धडे दुसऱ्याने शिकवण्याची गरज नाही. आदिवासी पाड्यांध्ये खूप टापटीप असते. मातीच्या भिंती वेळोवेळी सारवल्या जातात. स्वयंपाकाची जागाही एकदम नीटनेटकी असते. इथं कोणी प्लॅस्टिकचा वापर करत नसल्याने आजूबाजूला कुठेच कचरा दिसत नव्हता. 

इथलं सगळं निसर्गाच्या चक्रानुसार चालतं. जमिनीत जे उगवतं, ते धान्य अन्न म्हणून माणसं खातात. जेवणासाठी वापरलेली तेंदुपत्त्याची उष्टी पानं बाजूला टाकून दिल्यानंतर त्यातलं खरकटं कोंबड्या व बदके खातात. माणूस दूरवर उघड्यावरच शौचास बसतात. नंतर माणसाची विष्ठा डुकरे खातात आणि डुकरांना पुन्हा माणसं खातात. असं हे चक्र. इथं कसल्याही प्रकारचं प्रदूषण नाही. हवा एकदम स्वच्छ आहे. आकाश नेहमी निरभ्र दिसतं. आम्ही संध्याकाळ होण्याची वाट पाहत बाजेवर पडून होतो. त्या दुपारी सगळा गाव सुनसान वाटत होता. बरेच लोक कालच चिंतलनारच्या आठवडी बाजाराला गेले होते. संध्याकाळी आमच्याबरोबर असणारी ती कालची पोरं आत्ता दिवसाची कुठं बरं गेली असतील, याचाच विचार आम्ही करत होतो. 

तेवढ्यात दुरून एक माणूस येताना दिसला. आमच्या दिशेने येणारा तो आमच्याशी काहीच न बोलता सरळ पुढे झाडीमध्ये लाकूड तोडणाऱ्या एकाकडे गेला. आपल्याचसाठीचा काही तरी संदेश दिसतोय, अशी आम्हाला थोडीशी आशा वाटत होती. तो माणूस दुसऱ्याच्या कानात काही तरी पुटपुटला आणि नंतर दोघेही आमच्याकडे आले. धीर-गंभीर आवाजात त्यातला एक जण म्हणाला,   ‘‘वहाँ दादा लोग आए है, तुम्हे उधरही बुलाया है।’’ हे ऐकून आम्ही भलतेच खूश झालो. बॅगा वगैरे सायकलवर टाकून आम्ही कालच्याप्रमाणे पुन्हा त्याच दिशेला निघालो. 

वाटेत काल माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवलेल्या त्या आजी भेटल्या. त्यांना नमस्कार करण्यासाठी मी त्यांच्यासमोर वाकलो, तेव्हा त्यांनी मला उभं केलं आणि माझ्या हातात हात देऊन तोंडावरच्या सुरकुत्यांसहित त्या खूप जोशामध्ये ‘लाल सलाम’ असं म्हणाल्या. त्यांची ती धमक पाहून आम्ही त्यांच्याकडे बघतच राहिलो. आता आम्ही जड मनाने तिथल्या सगळ्यांचा निरोप घेऊन बोलवायला आलेल्या माणसाच्या पाठोपाठ चाललो होतो. आधीप्रमाणे आम्ही खूप आशेने चाललो होतो, असे नाही. पण निदान काही तरी हालचाल होतीय याचाच आम्हाला जास्त आनंद होता. 

कुठे तरी ऐकलेलं एक वाक्य मला नेहमी आठवत होतं, 'Hope is a good thing, may be the best of all things.' बघता-बघता आम्ही त्या पाड्याजवळ पोचलो. कालचाच कॉम्रेड आज सिव्हिल ड्रेसवर आलेला होता. दुसरं कुणीच नव्हतं. लुंगी घातलेला आणि गुंड्या तुटलेला मळकट शर्ट अडकवलेला त्याच्या चेहऱ्यावर आज वेगळंच हास्य दिसत होतं. ‘‘तुमको क्या लग रहा था? हम आप को छोड देंगे, या और कुछ?’’ असं म्हणून तो त्याच्याच धुंदीत हसला. त्याच्या समोरच्याच बाजेवर आम्ही बसलो. ‘‘हम इन्सानियत पर विश्वास रखनेवाले है। हमे पूरा विश्वास है की, आप हमे छोड देंगे।’’ असं आम्ही त्याला म्हटलं. तो पुन्हा हसला आणि ‘‘हाँ, सही है। पार्टीने आपको छोडने का निर्णय लिया है।’’ असं म्हणाला. 

ते ऐकून आम्ही तिघेही जाम खूश झालो. आमच्या चेहऱ्यावरच्या रेषा एका क्षणात पालटल्या. ‘‘अब आगे कहाँ कहाँ जानेवाले हो?’’ असे त्याने विचारले. ‘‘उधर बालिमेला, मलकानगिरी भी जरूर जाना।’’ ‘‘तुम्हारा जुनून देख कर हमे अच्छा लगा।’’ असं तो म्हणाला. ‘‘अब देखते है कहाँ तक जा सकते है। लेकिन ओडिशा तो जरूर जायेंगे। आप लोगो ने हमे बेवजा रोक कर रखा.... नहीं तो हम अभी सुकमा पहुंच गए होते।’’ असं आम्ही त्याला म्हटलं. गळ्यात अडकवलेला टॉवेल आता मी बॅगेत भरला. 

सामानाची आवराआवर करून तिघांच्याही बॅगा आम्ही सायकलींना बांधल्या. चाकांमध्ये पंपाने हवा भरून घेतली. पाण्याच्या बाटल्यांमध्ये पुरेसे पाणी भरून घेतले. आता आम्ही घनदाट झाडींमधून सायकली सुसाट ताणायला रेडी झालो होतो. आमच्यासोबत रस्ता दाखवायला कुरळ्या केसांचा एक उंच मुलगा चिंतलनारपर्यंत येणार होता. ‘‘आप आज यही पर रुको. अभी शाम के चार बजे है। आप अभी जाओगे तो बीच में ही अंधेरा हो जायेगा।’’ असं तो कॉम्रेड आम्हाला म्हणत होता. पण इथं थांबून उगीच काही तरी समस्या ओढवून घेण्यापेक्षा इथून काढता पाय घेतलेलाच बरा, असा विचार करून आम्ही सायकलींना पॅडल मारला. 

मागे त्या झोपडीमध्ये ताडीच्या नशेमध्ये बेधुंद झालेला तो म्हातारा आणि कंबरेला लंगोटी बांधून एका कोपऱ्यात लाकडं फोडत घामाने भिजलेला आदिवासी तेवढा राहिला. निमुळत्या चेहऱ्याचा आणि सावळ्या रंगाचा तो कॉम्रेड आमच्याबरोबर काही अंतर आला. त्याची ॲटलासची सायकल खूप खडखड करत होती. आज त्याच्या पायांध्ये बूट नव्हते. हातामध्ये बंदूक नव्हती, पण नजर मात्र तशीच भेदक होती. थोडं पुढे गेल्यानंतर एका उंचवट्याच्या ठिकाणी आम्ही थांबलो. ‘‘आप को आपके घरवालों से बात करनी हो तो वो वहा पर मोबाईल का नेटवर्क आता है।’’ असं दूरवरच्या एका टेकडीकडे बोट करून तो आम्हाला म्हणाला, ‘‘नहीं... नहीं... हम चिंतलनार से कॉल कर लेंगे’’ असं सांगून आम्ही त्याला चिंतलनारचा रूट विचारून घेतला. आता त्याचा निरोप घेण्याची वेळ आली होती. 

‘‘खुद का खयाल रखना’’ असं म्हणण्याशिवाय आमच्याकडे त्याच्यासाठी दुसरे कोणतेच शब्द नव्हते. एक तर हा पोलिसांना गोळ्या घालणार होता, नाही तर पोलीस याला गोळ्या घालणार होते. याशिवाय त्याच्या जीवनात दुसरं काहीच नव्हतं. बघता-बघता तो त्या ॲटलासच्या सायकलवरून समोरच्या किर्रऽ झाडींमध्ये दिसेनासा झाला. त्याची आकृती लहानलहान होत जाताना आम्ही दुरून पाहत राहिलो. त्यानं दूरवरून पुन्हा एकदा आम्हाला हात केला आणि त्या घनदाट झाडींमध्ये दिसेनासा झाला. आम्ही पण आता आमचा रस्ता धरला. सायकलींच्या चक्रांबरोबर विचारांची चक्रंही खूप वेगाने फिरायला लागली. त्या कॉम्रेडचं मगाचं वाक्य पुन: पुन्हा आठवत होतं, ‘चिंतलनार से पुलीस का इलाका शुरू होता है।’ मागे बासागुडाच्या इथे पोलीसही असंच म्हणाले होते की, ‘इधर से आगे उनका इलाका शुरू होता है।’ 

आमच्याच देशामध्ये, आपल्याच माणसांमध्ये ‘ये उनका इलाका’, ‘ये इनका इलाका’ ही भाषा कुठून आली? हा डिव्हाइड कुठून आला, ते समजत नव्हतं. याच भागात काही वर्षांपूर्वी सीआरपीएफचे 72 जवान मारले गेले होते अन्‌ 72 महिलांचं कुंकू पुसलं गेलं होतं. त्याहून अधिक म्हणजे, चिमुकली बापाविना पोरकी झाली होती. त्या जवानांचा यामध्ये काय दोष होता? हे असं का? हाच प्रश्न मनाला खूप भेडसावत होता. आपलीच माणसं आपल्याच माणसांच्या विरोधात हातामध्ये बंदुका घेऊन का लढतात, ते समजत नव्हतं. 

आम्ही थोडं पुढे गेलो तोच, आमच्या शकिराचा पाय मुरगळला. शकिरा हे कृष्णाच्या सायकलीचं नाव होतं. त्याची सायकल परदेशी बनावटीची अन्‌ भारीतली असल्याने आम्ही तिला शकिरा म्हणायचो. माझी सायकल साधीच असली तरी चालताना ठुमके मारत चालत असल्याने तिचं नाव माधुरी दीक्षित ठेवलं होतं आणि विकासची सायकल रेंजरची असली तरी थोडी जुनी असल्याने तिचं नाव स्मिता पाटील ठेवलं होतं. वाटेत एक ओढा क्रॉस करताना कृष्णाच्या सायकलचा गियरच तुटला. आता आम्हाला पुढला 25-30 किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागणार होता. थोडं पुढे गेलो, तोच अंधार पडला. आमच्याबरोबर आलेल्या त्या कुरळ्या केसांच्या मुलानं तिथंच एका गावात आमची रात्रीची झोपण्याची सोय केली. 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही पुन्हा पायपीट सुरू केली. कधी एकदा चिंतलनार येतंय आणि सायकल रिपेअर करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागतोय, असं झालं होतं. आमच्याबरोबरचा मुलगा अचानक वाटेत थांबला आणि मोठमोठाली पावलं टाकत शेताच्या बांधा-बांधाने एका झाडाच्या दिशेने जाऊ लागला. काय चाललंय ते आम्हाला काहीच कळेना. एक तर इथं आम्हाला उशीर झालाय आणि हा असा का करतोय, असं आम्ही मनातल्या मनात म्हटलं. त्याला ऐत्तल प्यायची तलफ झाली होती. ऐत्तल हे झाडापासून मिळणारं जंगलातलं पेय आहे. इथं मोहाची दारू, सेल्फी, ताडी ही पेयेसुद्धा बरेच लोक पितात. आत्ता तो मुलगा ज्या झाडाकडे निघाला होता, ते या ऐत्तलचेच होते. 

दिसायला नारळीच्या झाडाप्रमाणे दिसणारे हे झाड उंचीला कमी होते. त्याच्या खोडावर विळ्याचे एक-दोन घाव मारून तिथं एक मडकं लावण्यात आलं होतं. आठवडाभरानंतर, त्यात थेंब-थेंब करत बरंच द्रव साठलं होतं. अर्ध्याच्या वर भरलेलं ऐत्तलचं मडकं पाहून आता तिथे आणखीन दोन-तीन माणसं जमा झाली होती. एक जण सरसर करत त्या झाडावर चढला आणि त्यानं प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये मडक्यातलं पेय सावकाश भरलं. नारळाच्या झाडाला जशी जाळीसारखी साल असते, तशीच यालाही होती. ती जाळी कॅनच्या बुचात अडकवून सगळ्यांनी ते पेय गाळून पानांवर घेतलं. पानं तशीच तोंडाला लावून सगळे जण आवडीने ते पीत होते. 

हे पेय नक्की कसं लागतं याची उत्सुकता आम्हालाही होतीच. मग श्रीकृष्ण आणि मी एका पानामध्ये ऐत्तल घेऊन ते पिऊन पाहिले. पांढरट दिसणारं ते पेय चवीला लिम्का, कोका- कोलासारखं लागत होतं. मला ते फारच आवडल्याने मी ते आणखीन थोडंसं पानावर घेऊन पुन्हा प्यायलं. याची चव खूपच भारी होती. पण उगीच हे झेपलं नाही तर, त्याची नशा नको तेव्हा चढायची, असा विचार करून मी स्वत:ला कसं तरी कंट्रोल केलं. आम्ही पुन्हा मोठमोठाल्या ढांगा टाकत चिंतलनारचा रस्ता धरला. मधल्या एका गावात आमच्यासोबत तिथपर्यंत आलेला कुरळ्या केसांचा उंच मुलगा बदलला गेला आणि त्यानं तिथून 14-15 वयाची दोन पोरं आम्हाला जोडून दिली. आम्ही जिवावर आल्यासारखं चालत होतो. 

काही केल्या अंतर संपत नव्हतं. ती पोरं पण पार थकून गेली होती. कॅडबऱ्या देऊन आम्ही त्यांना कसं तरी पुढे नेत होतो. जंगलातल्या त्या पाऊलवाटा आम्हाला समजण्यासारख्या नसल्यामुळे त्यांना बरोबर नेणं आम्हाला भागच होतं. आत्तापर्यंत वाटेत दोन-तीन वेळा लोकांनी आमची विचारणा केली होती. बरोबर असलेली पोरं त्यांना गोंडीतून काही तरी सांगायची आणि मगच आम्हाला पुढे सोडण्यात यायचे. मागे एका उंचवट्यावर झाडाखाली बाज टाकून आमची तपासणी करणारा तो सावळ्या रंगाचा किडमिडीत लुंगीवालाही आज वाटेत एका ठिकाणी भेटला. ‘‘हो गयी क्या छुट्टी?’’ असं ऐटीत त्यानं आम्हाला विचारलं. 

आता आम्ही बरंच अंतर कापलं होतं. चिंतलनार इथून पाच-सहा किलोमीटर राहिलं होतं. सोबतची ती दोन पोरं ‘ये रस्ता सिधा चिंतलनार जाता है, हम यहाँ से आगे नहीं आ सकते’ असं म्हणून परतीचा रस्ता धरणार होती. त्या दोघांपैकी एक जण बाहेर आश्रमशाळेत शिकायला होता, तर दुसरा असाच होता. दोघांनीही गुंड्या तुटलेले मळकट कपडे आणि हाफ चड्‌ड्या घातल्या होत्या. त्यांची तोंडं पार काळवंडून गेलेली होती. डोळ्यांमध्ये चमक असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर ताण होता. दोघंही लंगोटीयार दिसत होते. एकाच सायकलवर डबलसीट बसून ते आल्या वाटेने त्या किर्रऽ झाडींमध्ये पसार झाले. आम्ही बराच वेळ त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे पाहत राहिलो. ते ज्या वाटेने चालले होते, ती वाट त्यांना पुन्हा त्याच भयाण काळोखात घेऊन चालली होती. 

मजल-दर मजल करत आम्ही चिंतलनारच्या सीआरपीएफ कॅम्पवर पोचलो. ‘काही भयंकर माणसांनी आमचं अपहरण केलं होतं, ते इथं आल्यावर आम्हाला समजलं. सगळे जण आम्हाला इकडं-तिकडं बसवून आमच्याबरोबर फोटो काढण्यात मग्न होते. नंतर आमच्यासाठी सो कॉल्ड रेस्क्यू ऑपरेशन करून आम्हाला दुसरीकडे कुठे तरी हलवण्यात आलं. हेलिकॉप्टरच्या त्या काचांमधून खाली छोटे-छोटे आदिवासी पाडे दिसत होते. मागं एका गावामध्ये किडमिडीत प्रकृतीच्या आणि सावळ्या रंगाच्या शाहीने आकाशातून जाणारं विमान पाहून आम्हाला खूप कुतूहलाने प्रश्न विचारला होता, ‘‘ये कहाँ से कहाँ जा रहा है? इस में आदमी बैठता है क्या? आप कभी बैठे हो क्या?’’ हे विचारताना त्याचा सुरकुत्या पडलेला चेहरा त्या उन्हात घामाने चकाकत होता. आज मात्र त्याच्यामुळेच आम्ही हॅलिकॉप्टरमध्ये बसलो होतो. 

‘आत्ताही खालचे कित्येक चेहरे आपल्या हॅलिकॉप्टरकडे उत्सुकतेने माना वर करून पाहत असतील’ असं आम्हाला उगाचच वाटत होतं. आम्ही उंच आकाशामध्ये होतो, तर ते जमिनीवर. आमच्यातली दरी हॅलिकॉप्टरच्या वेगाबरोबर वाढतच होती. मनामध्ये असंख्य प्रश्न घिरट्या घेत होते, पण त्यांची उत्तरं मात्र काही केल्या सापडत नव्हती. कदाचित त्यांना उत्तरंच नसावीत, असंही वाटत होतं. मला आठवलं, बंदेपारा नावाच्या गावामध्ये आम्ही रात्रीचे शेकोटीला बसलेलो असताना समोर बसलेल्या त्या शाळकरी मुलाने ‘अगर अंग्रेज होते, तो क्या हमारे इधर आज बिजली होती?’ असा केविलवाणा प्रश्न विचारला होता, तेव्हा शेकोटीच्या तांबूस प्रकाशात झळाळण्याऱ्या त्याच्या नजरेला नजर देऊन आम्ही काहीच उत्तर देऊ शकलो नाही. कोणत्या तरी नाटकामधील सुरुवातीच्या काही ओळी मला तेव्हा आठवल्या. ‘‘हमारे देश को आजादी आधी रात को मिली थी... सबेरा अभी तक हुआ नहीं.’’ आता हा सबेरा कधी होणार आहे ते माहिती नाही; पण तो होणार, हे नक्की. उष:काल होता होता काळरात्र झाली असे आपण अनेक वेळा म्हणत असतो, पण निसर्गाच्या नियमानुसार काळोख्या रात्रीनंतर पहाट येतेच, गरज असते ती क्रियाशील शांततेने प्रतीक्षा करण्याची. 

Tags: सफर : माणूसकीची सी जी नेट स्वरा बाबा आमटे हेमलकसा प्रकाश आमटे गोंडवाना गोंडी नक्षलवाद साधना प्रकाशन तीन मुलांचे चार दिवस anand van prakash amate baba amte hemalkasa marathi books sadhana prakashan sadhana books tin mulanche char diwas shrikrishna shevale shrikrishna shewale vikas walake adarsh patil आदर्श पाटील श्रीकृष्ण शेवाळे विकास वाळके weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आदर्श पाटील
adarshazad2018@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके