डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सलग तीन वेळा राजापूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले विख्यात संसदपटू बॅ. नाथ पै यांना केवळ 48 वर्षांचे आयुष्य लाभले. काही महिन्यांपूर्वी, अदिती पै यांनी लिहिलेले Nath Pai हे इंग्रजी पुस्तक आले. त्याचा मराठी अनुवाद अनंत घोटगाळकर यांनी केला आहे. नाथ पै यांच्या 50 व्या स्मृतिदिनी कालच्या 17 जानेवारीला हे मराठी पुस्तक प्रकाशित झाले आहे. कमालीचे वाचनीय म्हणावे अशा त्या पुस्तकातील हे पहिले प्रकरण आहे. 
(दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक : शैलेंद्र पै, मुंबई) 
 

बांद्य्रातील आपल्या फ्लॅटमध्ये श्याम पैंचे सगळे कुटुंब गाढ झोपेत होते. रात्रीची नीरव शांतता भेदत दरवाजाची बेल कर्रर्र वाजली. श्याम कुशीवर वळले. डोळे उघडले त्यांनी. पण त्यांना वाटले भासच झालाय आपल्याला. डोळे मिटून ते परत झोपू लागणार तोच पुन्हा एकदा बेलचा अधिकच कर्कश आवाज ऐकू आला. आता मात्र हे स्वप्न नक्कीच नव्हते. बेडजवळच्या घड्याळाची धीमी टिकटिक नीट ऐकू येत होती. अंधारात रेडियमचे आकडे आणि दोन्ही काटे हिरवेगार चमकत होते. तीन वाजून वीस मिनिटे झाली होती. श्यामच्या पत्नी कल्पनाही या आवाजाने उठल्या आणि ते दोघेही दरवाजाकडे वळले. बेल वाजतच होती. आलेल्याला जणू धीर निघत नव्हता. कडी काढण्यापूर्वी श्यामनी पीप होल मधून पाहिले. बाहेर त्यांचे मामेभाऊ दादा म्हणजे विष्णू नामदेव आडारकर (V. N) आणि अत्यंत घनिष्ठ कौटुंबिक मित्र गजानन बाणावलीकर उभे होते. दोघांचेही चेहरे गंभीर आणि पडलेले दिसत होते. एक शब्द न बोलता श्यामनी त्यांना आत घेतले. त्यांची खाली वळलेली नजर आणि गंभीर चेहरे पाहून श्यामनी काय ओळखायचे ते ओळखले. सतत वाटत होती तीच भीती खरी ठरली होती. दादांच्या तोंडातून शब्द फुटण्यापूर्वीच हात थरथरू लागले त्यांचे. दुःखाने दादांचा गळा दाटून आला होता.

शेवटी धीर एकवटून त्यांच्या तोंडातून कसेबसे शब्द फुटले, नाथ गेला रे. शैलेंद्र आणि मीना ही श्यामची मुलेही पटकन बाहेरच्या खोलीत आली होती. ती निमूट सारे पहात होती. त्यांची आई आतल्या आत हुंदके दाबत पदराने डोळे पुसत होती. त्यांच्या बाबांनी मात्र हंबरडाच फोडला होता. त्यांना सावरणे कठीण होते तरी दादा आणि बाणावलीकर त्यांना हाताने थोपटत धीर धर, धीर धर, मन घट्ट केले पाहिजे आता तुला असे पुनःपुन्हा विनवीत होते. वेळ दवडून चालणार नव्हते. ताबडतोब बेळगावला निघणे भाग होते. काही वेळापूर्वी तिथेच नाथने शेवटचा श्वास घेतला होता. 

रात्र सरत आली होती. तिकडे दूर दिल्ली विमानतळावर आनंद आणि दिलीप या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन नाथची पत्नी क्रिस्टल मुंबईला जाणाऱ्या इंडियन एअर लाइन्सच्या विमानाची वाट पहात होती. रात्री 12.50 ला तो फोन आला तेव्हा 20, तुघलक क्रिसेंट या आपल्या निवासस्थानात तीही गाढ झोपेत होती. सारखी धास्ती वाटत होती तीच बातमी बेळगावहून आलेल्या त्या फोनने तिच्या कानावर आदळवली होती. नाथ आता या जगात उरला नव्हता. डॉक्टरांचे निकराचे प्रयत्न वाया गेले होते. आता तिला बेळगावला जायची तयारी करायची होती. फोनचा रिसिव्हर खाली ठेवताना ती गळून गेली होती. तिला वाटले तिचा प्रिय नाथ गेल्याची बातमी देणारा हा आवाज तिने कुठल्या तरी महाभयंकर स्वप्नातच ऐकलाय. आता जाग येईल आणि कळून चुकेल की हे एक दुःस्वप्नच होते. पण हे वाटणे काही खरे नव्हते. त्यानंतर रात्रभर फोन खणखणत राहिला, कुटुंबीय, मित्रपरिवार सांत्वन करत राहिले. यातून तिला जाण येत गेली की तिचा नाथ खरोखरच या जगात राहिला नव्हता. आता तिलाच कंबर कसायला हवी होती. मुंबईला जाणारे पहिले विमान पहाटेला होते. नागरी उड्डाणमंत्री आणि नाथचे मित्र असलेल्या करणसिंग यांनी तातडीने या विमानाच्या तिकीटाची व्यवस्था केलेली होती. रात्रभर जागीच असलेली क्रिस्टल थोडेफार दिसू लागताच बंगल्यापुढच्या बागेत गेली आणि गुलाबाची काही फुले खुडून घेऊन लगोलग परत आली. बाहेर पडण्यापूर्वी ती सारी सुगंधी फुले तिने नीट बॅगेत ठेवली. मुलांसह ती विमानतळावर आली तेव्हा दाट हिवाळी धुक्याने रस्त्यावरचे दिवे धुरकटले होते. मनातली खळबळ क्रिस्टलने बाहेर दिसू दिली नाही. ती सोशिक आणि शांत राहिली. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासाठी खास तयार ठेवलेल्या विमानातून त्यांना मुंबईहून बेळगाव गाठायचे होते. 

वेंगुर्ल्याच्या पोस्टात काम करणारा एक पोरगेलासा तरुण गावच्या मुख्य बाजारपेठेतील पंढरीनाथ उर्फ अना महाले यांच्या घराकडे धावत धावत आला आणि घराचा लाकडी दरवाजा आकांताने ठोठावू लागला. धान्य आणि किराणा मालाचे व्यापारी अण्णा महाले हे प्रजासमाजवादी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. सकाळचे साडेचार वाजले होते. पोस्ट ऑफिसात त्यांच्या नावे एक ट्रंक कॉल आला होता. महालेंनी पटापट चपला पायात सरकावल्या, टॉर्च हातात घेतली आणि लगबगीने ते घरासमोरच्या छोट्या रस्त्यावर आले. फोन बेळगावहून आला होता. पलीकडून आवाज आला, नाथ पै गेले. महालेंना काही सुचेचना. ते थिजल्यासारखे झाले. मात्र आपण नुकतेच जे शब्द ऐकले त्याचा नेमका अर्थ जाणवताच त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. आजच सायंकाळी गावातल्या रामेश्वराच्या देवळात आयोजित केलेल्या नाथांच्या सभेच्या तयारीसाठी ते गेले काही दिवस राबराब राबले होते. या सभेच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नाथांचे निकटचे सहकारी बबन डिसोझा यांनी आदल्या दिवशीच त्यांच्याशी चर्चा केली होती. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. पहिली आणि शेवटची प्रचार सभा आपल्या जन्मगावी वेंगुर्ल्यालाच घ्यायची हा प्रघात नाथ नेहमी पाळत असत. त्याक्षणी एक भयाण जाण एखाद्या तीक्ष्ण तीरासारखी महालेंच्या मेंदूत शिरली. आज संध्याकाळची सभा आता होणारच नव्हती. नाथ पै नव्हतेच या जगात. बाजारातल्या आपल्या दुकानात गावकऱ्यांशी आणि खेडुतांशी गप्पा मारत बसायला ते यापुढे कधीच येणार नव्हते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसों आसंस रे? अशी मोठमोठ्याने विचारपूस करणारा तो प्रेमळ परिचित आवाज आता पुन्हा कधीच त्यांच्या कानावर पडणार नव्हता. बेळगावच्या रस्त्यावरील आंबोली घाटातील वळणावर गाडी हळूहळू पुढे चालली होती. महालेंनी एक दीर्घ निःश्वास सोडला. पूर्वेला सूर्य उगवू लागला होता, पण कोंकणचा सुपुत्र मात्र कायमचा अस्ताला गेलेला होता. 

कवी मंगेश पाडगांवकर विमानतळावर जायला टॅक्सीत बसले. हिवाळ्यात थोडा उशीराच उगवणारा सूर्य अजून उगवलेला नव्हता. टॅक्सीचा ड्रायव्हर पुण्याच्या रेल्वे स्टेशनातून पेपर घेऊनच आला होता. म्हणाला, काय तरी खराब वार्ता आहे बघा साहेब. कुणी मोठा माणूस गेलेला दिसतोय. ड्रायव्हरने गाडीतले दिवे लावले तेव्हा त्या वर्तमानपत्राचा ठळक मथळा पाडगांवकरांच्या नजरेस पडला, नाथ पै यांचे आकस्मिक निधन. ते हादरूनच गेले. भराभरा त्यांनी सविस्तर बातमी वाचली. प्रचंड सभेनंतर आलेला हृदयविकाराचा झटका.. महान संसदपटू, असामान्य वक्ता, जनतेच्या हक्कांचा खंदा पुरस्कर्ता. अशा गौरवपर शब्दांतून त्यांचे व्यक्तित्व निःसंशय छान चितारले होते. पण नाथ पैंना जवळून ओळखणाऱ्या प्रत्येकाला अगदी पदोपदी जाणवणारे त्यांचे अलौकिक मोठेपण काही अशा शब्दांतून पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नव्हते. पाडगांवकरांनी शांतपणे पेपर बाजूला ठेवला. असंख्य प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागले. नाथ हे कला, कविता, आणि साहित्य यांचे भोक्ते होते. किती तरी वेळा त्या दोघांनी आपल्या आवडत्या लेखकांबद्दल, कवींबद्दल चर्चा करत रात्री घालवल्या होत्या. कितिकांच्या आवडत्या ओळी कितीदा तरी एकमेकांना ऐकवल्या होत्या. पाडगांवकरांना आठवले. नाथ प्रेमाने आणि आदराने त्यांना कविराज म्हणत. केवळ एका कवीबद्दलचा नव्हे एकूणच काव्याबद्दलचा त्यांचा आदर या शब्दातून व्यक्त होई. त्यांना आणखी आठवले. पुरते वर्षसुद्धा झालं नसेल त्या गोष्टीला. पाडगांवकर आकाशवाणीत नोकरी करत. त्यासंबंधीचे त्यांचे काही गाऱ्हाणे त्यांना मंत्र्यांच्या कानावर घालायचे होते. इंद्रकुमार गुजराल त्यावेळी माहिती आणि नभोवाणी खात्याचे मंत्री होते. नाथ पैंनी तात्काळ त्यांना फोन केला. म्हणाले, ‘इंदर, भेटीची वेळ द्या पाडगांवकरांना. मोठे कवी आहेत ते. आणखी पन्नास-साठ वर्षांनी तुमचे माझे नाव लोक कदाचित विसरून गेलेले असतील, पण हे कवी आणि लेखक लोक मात्र आपल्या कलाकृतींद्वारे लोकांच्या स्मृतीत अमर असतील.’ अशा साहित्यप्रेमी नाथ पैंनी प्रेमाने मारलेली कविराज अशी हाक यापुढे आता कधीच त्यांच्या कानावर पडणार नव्हती.

दाट धुक्यांतून सूर्य वर येईपर्यंत नाथ पैंच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरली होती. प्रख्यात समाजवादी आणि सर्वांच्या आदराला पात्र ठरलेला नामवंत संसदपटू उठल्या उठल्या देशभर लोक वाचत होते. अख्खे बेळगाव शोकसागरात बुडाले होते. पैंच्या बेळगावातील घरासमोर दुःखमग्न जनसागर लोटला होता. दगडी भिंतींचे हे जुने सुबक घर टिळकवाडीतील गुरुवार पेठेत होते. नाथांचे थोरले भाऊ रामचंद्र, त्यांची पत्नी निर्मला व कन्या नंदिनी येथे राहात. अकराच महिन्यांपूर्वी नाथ यांच्या आईचे निधन झाले होते. त्याही इथेच रहात. लोकांना बातमी कळू लागली तसतशी अंत्यदर्शनासाठी माणसांची रीघ लागली. काही आक्रोश करत होते, काही आपले हुंदके कसेबसे दाबत होते. सर्वत्र माणसेच माणसे दिसत होती. काही लोक लहान लहान घोळके करून खालमानेने आपापसात कुजबुजत होते. काही मोठमोठ्याने हंबरडे फोडत आक्रोश करत होते. आपल्या लाडक्या नेत्याच्या अकाली आणि आकस्मिक जाण्याचे दुःख लोक तऱ्हेतऱ्हेने प्रकट करत होते.

आत घरात बाहेरच्या एका ऐसपैस खोलीत क्रिस्टल सगळ्या कुटुंबियांसोबत बसली होती. सारेजण नाथचे हे शेवटचे दर्शन डोळ्यात साठवून ठेवत होते. या साऱ्यांच्या मागे भिंतीवर नजर वेधून घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मोठे रंगीत चित्र होते. क्रिस्टलने जवळच्यांच्या कानात काही सांगितले. अगदी काही क्षण तिला आपल्या मुलांसह नाथबरोबर एकटे राहायचे होते. सारे नातेवाईक बाहेर जाऊन उभे राहिले. क्रिस्टल आपल्या नाथशेजारी बसली. गुलाबाचा गुच्छ तिने नाथच्या देहाशेजारी ठेवला. दिल्लीहून निघण्यापूर्वीच घाईघाईने ही फुले तिने बागेतून खुडून आणली होती. नाथला फुले फार आवडत आणि त्याच्या आवडत्या टवटवीत सुगंधी फुलांनीच त्याला निरोप देण्याची तिची इच्छा होती. त्याच्या कपाळावर तिने ओठ टेकवले. ती सावकाश उठली आणि जाऊ लागली. ‘नाथ, आता तू माझा नाहीस. आता तू तुझ्या लोकांचा, तुझ्या पक्षाचा आहेस,’ ती म्हणाली आणि मग तिने बाहेर उभ्या असलेल्या सर्वांना आत यायला खुणावले. 

दिल्लीतील प्रजा समाजवादी पक्षाच्या मध्यवर्ती कचेरीत भयाण शांतता पसरली होती. पक्षाचे कार्यकर्ते, अनुयायी, पाठीराखे, चाहते आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांनी परिसरात गर्दी केली होती. सकाळी वर्तमानपत्रात वाचलेल्या अविश्वसनीय बातमीची जणू त्यांना खातरजमा करून घ्यायची होती. होय, खरीच होती ती बातमी. बाहेरच्या फलकावर स्पष्टच लिहिले होते की, संध्याकाळी साडेचार वाजता शोकसभा आहे. झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. नाथ पै गेले यात आता शंकेला जागा नव्हती. 

एरवी शांत असणाऱ्या बेळगावात दुपार होईतो जनसागर उसळला होता. नाथ पैंचा प्रचंड मित्रपरिवार, सहकारी, चाहते इतकेच काय विरोधकही अंत्ययात्रेला उपस्थित राहण्यासाठी जमले होते. बेळगावचे रस्ते माणसांनी गजबजले होते. कित्येकांनी घरांच्या छतावर, उघड्या गच्चीत गर्दी केली होती. सर्वांना आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप द्यायचा होता. प्रसपचे अध्यक्ष नानासाहेब गोरे, गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर, सहकारी मधु दंडवते तातडीने बेळगावात दाखल झाले होते. फुलांनी सजवलेल्या एका ट्रकवर नाथ पैंचे पार्थिव ठेवण्यात आले आणि संध्याकाळी पाच वाजता स्मशानभूमीच्या दिशेने अंतिम यात्रा सुरू झाली. आपल्या भूमीच्या परमप्रिय आणि जनमान्य सुपुत्राला अंतिम मानवंदना देण्यासाठी जमलेल्या हजारो लोकांच्या गर्दीसह अंत्ययात्रा हळूहळू पुढे सरकत होती. शोकाकुल आणि भावविव्हळ कंठातून नाथ पै अमर रहे च्या घोषणा उमटत होत्या. इतक्या लवकर हे असं झालंच कसं हाच प्रश्न लोकांना पडला होता.. विश्वासच बसत नव्हता त्यांचा. काल अगदी कालच तर गावातल्या युनियन जिमखान्यावरच्या महाप्रचंड मेळाव्यात त्यांची अमोघ वाणी कानावर पडली होती. पुढच्याच महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची नुकतीच तर त्यांनी तयारी सुरू केली होती. आक्रीत- आक्रीतच घडलं होतं. 

पण कदाचित नाथ पैंना मात्र आपला अंत:काळ जवळ आल्याची खूण फार पूर्वीच पटली होती. तीन वर्षांपूर्वीच आपले पक्ष सहकारी डॉ. जी.जी.पारिख यांना त्यांनी एक भावपूर्ण पत्र लिहिलं होतं. युनेस्कोच्या मानवाधिकार समितीचे सदस्य या नात्याने नाथ जिनिव्हातील एका परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गेले असता त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. आपल्या या आजारपणाचे वर्णन त्यांनी आपल्याला खच्ची करू पाहणारा ‘दुष्ट वैरी’ असे केले होते आणि त्या पत्रात पुढे लिहिले होते, ‘मी या गोष्टीची मुळीच फिकीर करत नाही. लक्षच देत नाही मी त्याच्याकडे. हा वैरी कधीच माझा पराभव करू शकणार नाही. एकदाच काय ती त्याला माझ्यावर कायमची मात करता येईल... पण खूप करायचेय मला अजून. मृत्यू मला वाकुल्या दाखवतो त्या प्रत्येक वेळी मला प्रेरणा देत कार्यप्रवृत्त करणाऱ्या लोकांचाच विचार माझ्या मनात येतो.’ मृत्यूचा विचार येताच आपली मातृभूमी, आपली माणसे, आई, पत्नी आणि आनंद आणि दिलीप ही आपली दोन मुले यांच्याविषयीच्या चिंतेचे काहूर त्यांच्या मनात उठे. अँड्र्‌यू मार्व्हेल या कवीच्या कवितेतील एका ओळीने त्यांनी या पत्राचा शेवट केला होता- 
At my ear I always hear time's winged chariot drawing near.
काळरथाचे चक्र खडखडे सदैव माझ्या कानाशी!

परंतु हळूहळू जवळ येऊन ग्रासू पाहणारा काळाचा हा उडता रथ नाथ पैंचे काम कधीच थांबवू शकला नाही. उलट त्यामुळेच आपले निहित ध्येय वेळेत गाठण्यासाठी ते अधिकच जोमाने काम करू लागले. डॉक्टरांचा सल्ला आणि कुटुंबीयांच्या विनवण्या यांना मुळीच न जुमानता कष्ट उपसतच राहिले. त्यांच्या कामाचे वेळापत्रक जीवघेणे असे. आपल्या ढासळत्या प्रकृतीकडे लक्ष देऊन जरा आस्ते कदम जावे असे मित्र, सहकारी आणि कुटुंबीय त्यांना सुचवत. उत्तरादाखल ते त्यांना महाभारतातील श्लोक ऐकवत आणि म्हणत की कर्म करत असता मृत्यू येणे हाच या जगाचा निरोप घेण्याचा सर्वात श्रेयस्कर मार्ग होय. 

सतरा तारखेला संध्याकाळी सभा संपल्यावर नाथ पै अतिशय थकलेले व निस्तेज दिसत होते. ते पाहून त्यांचे डॉक्टर मित्र अनंतराव याळगींनी त्यांना रात्री बेळगावात आपल्याच घरी झोपण्याचा आग्रह केला. न जाणो नाथांना रात्री अपरात्री वैद्यकीय मदतीची गरज लागेल. म्हणून डॉ.याळगी त्यांच्याबरोबर एकाच खोलीत झोपले. मध्यरात्री अठरा तारीख सुरू होते न होते तोच नाथांनी घाबऱ्या घाबऱ्या याळगींना हाक मारली. तुम्हाला उठवायचे जिवावर येतेय माझ्या, पण खरंच मला अगदीच कसंसच व्हायला लागलंय. याळगींनी त्यांच्या हृदयावर हात दाबून पाहिले. ठोके मंद मंद पडत चालले होते. बेळगावातीलच एका हृदयविकार तज्ज्ञांना त्यांनी त्वरेने फोन केला. आपल्या पाठच्या भावाच्या काळजीने सोबत झोपायला राहिलेले रामचंद्र ऊर्फ भाऊ आपल्या भावाची प्राणांतिक धडपड असहायपणे पहात होते. मला बरं करा रे, नाथ आपल्या भावाला म्हणाले, उद्या वेंगुर्ल्यात माझी अतिशय महत्त्वाची सभा आहे. चुकवून चालणार नाही ती मला. परंतु त्यांचा प्राण कंठाशी आला होता. त्यातच त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ आली. ती थांबेच ना. त्यामुळे यातना अधिकच वाढल्या. इकडे डॉक्टर त्यांना वाचवण्याचा शर्थीने प्रयत्न करत होते. एकामागून एक तीन इंजेक्शन्स त्यांनी पटापट त्यांच्या शरीरात टोचली. परंतु शेवट जवळ आल्याची जाणीव त्यांना झालेलीच होती. काही चमत्कार घडावा अशी आर्त प्रार्थना करत भाऊ उद्विग्नपणे खोलीत येरझाऱ्या घालत होते. नाथ त्यांना म्हणाले, क्रिस्टलला बोलावून घे, भाऊ . खोकत, धडपडत, धापा टाकत ते कसाबसा श्वास घेत होते. खोकला काही थांबत नाही हा. त्यातूनही ते म्हणाले. थकले होते, मलूल झाले होते, पण धडपड चालूच होती. शेवटी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सारे काही शांत झाले. 

नाथ पैंच्या डॉक्टरांना सगळी लक्षणे दिसतच होती. मुळातच दुबळे झालेले त्यांचे हृदय कामाचा इतका मोठा ताण फार काळ सहन करणे शक्यच नव्हते. बेळगावची सभा रद्द करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना अगोदरच दिला होता. परंतु नाथ पैंना आपली सारी ऊर्जा लोकांमधूनच मिळत असे. लोकांशी संवाद टाळण्याचा हा सल्ला नाथांना मुळीच मानवला नाही. सतरा जानेवारी हा दिवस बेळगावात हुतात्मा दिन म्हणून पाळला जाई. हा लोकनेता जवळजवळ दहा वर्षांनी तिथल्या युनियन जिमखान्यावरील सभेत बोलणार होता. महाराष्ट्र कर्नाटकाचा (त्यावेळचे म्हैसूर राज्य) सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. अशा वेळी त्यांना तिथे जाणेच भाग होते. 

निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोशात होती. पंतप्रधान इंदिरा गांधींनी मुदतीपूर्वीच लोकसभा बरखास्त केली होती आणि निवडणुका वर्षभर आधीच लागल्या होत्या. निवडणूकीचा काळ म्हणजे नाथ पैंना या राज्यातून त्या राज्यात सतत फेऱ्या माराव्या लागण्याचा काळ. त्यांचे हृदय कमकुवत झाले होते आणि त्याचा परिणाम आता किडन्यांवर होऊ लागला होता. पण त्यांच्या दृष्टीने हे काही कामाचा झपाटा कमी करण्याचे कारण होऊ शकत नव्हते. मुंबई- दिल्ली- कोंकण अशा त्यांच्या फेऱ्या चालू झाल्या होत्या. पक्षकार्यकर्त्यांना भेटणे, तपशीलवार निवडणूक नीती ठरवणे हे सारे चालू होते. साखरवाडीला प्रसपचे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन होते आणि तिथेही त्यांच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता होती. बेळगावच्या लोकांना त्यांनी आपल्या प्रश्नात संपूर्ण लक्ष घालावे असे वाटत होते आणि कोकणातही सारे त्यांचीच वाट पहात होते. आपल्या ढासळत्या प्रकृतीचा विचार करायला त्यांना सवड कुठे होती? 

डॉक्टर्स आणि कुटुंबीय यांचा विरोध झुगारुन नाथ पै सतरा जानेवारीच्या भव्य मेळाव्यात बोलण्यासाठी मुंबईहून बेळगावला जायला निघाले. मुंबई विमानतळावरच त्यांची डॉ.टी.एच.तुळपुळे या प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांशी गाठ पडली. ते हैद्राबादला निघाले होते. पाहताक्षणीच नाथ पैंची तब्येत काही त्यांना ठीक वाटली नाही. बेळगावचा दौरा पुढे ढकलण्याची सूचना त्यांनी केली. पण नाथ काही ऐकेनात. त्यांची माणसे बेळगावात त्यांची वाट पहात होती. शेवटी विमानतळाच्या प्रस्थानस्थळावरच एका खोलीत तुळपुळेंनी त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके घाईघाईत तपासले आणि तिथेच आवश्यक त्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले. लगेच त्यांनी जवळच जुहूला राहणाऱ्या डॉ.नरदेंना फोन केला आणि नाथसाठी ही औषधे घेऊन तात्काळ विमानतळावर येण्यास सांगितले. पण नेमक्या त्याच वेळी पंतप्रधान त्या मार्गावरुन जाणार असल्याने रस्ता काही काळ इतरांसाठी बंद करण्यात आला होता. डॉ.नरदे त्यामुळे अगदी जवळ रहात असूनही वेळेवर विमानतळ गाठू शकले नाहीत. आवश्यक औषधे न घेताच नाथ विमानात चढले. हा आपला शेवटचाच विमान प्रवास ठरेल याची कल्पना त्यांना कुठून असणार?

आपल्या गाडीतून त्यांना सभास्थानाकडे नेताना डॉ.याळगींनी नाथना निक्षून बजावले होते, ‘दहा म्हणजे दहाच मिनिटं बोलायचं बघा तुम्ही.’ परंतु दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बेळगावच्या युनियन जिमखान्यावर त्यांची संजीवनी असलेली बेळगावची माणसे समोर पाहताच हा इशारा क्षणार्धात विसरला गेला. त्यांचा शब्द न शब्द टिपायला आतुर असलेला जनसागर समोर उफाळला होता. दहा मिनिटांचा एक तास केव्हा झाला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. महाजन अहवालाच्या चिंधड्या उडवीत, लोकसभेतील या विषयावरील चर्चा आणि प्रगती यांचे विवरण करत आपण यातून पुढे कसा मार्ग काढला पाहिजे हे ते समजावत राहिले. समोरच्या प्रत्येक श्रोत्यांच्या हृदयात त्यांना शिरायचे होते. बेळगाव महाराष्ट्रात आल्याशिवाय रहात नाही हा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात त्यांना जागवायचा होता. घरी परतताना सोबतच्या सहकाऱ्यांना ते म्हणाले, ‘माझे मन मी लोकांसमोर खुले केले, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी मी केलेल्या अविश्रांत प्रयत्नांचा आढावा त्यांच्यासमोर घेतला, राहावलं नाही मला. अखेर आज मी त्यांच्या ऋणातून मुक्त झालो!’ सभेच्या त्या भारलेल्या वातावरणात आणि नाथ यांच्या प्रभावी भाषणाच्या प्रवाहात चिंब भिजलेल्या त्यातल्या कुणालाही त्या वेळी असे वाटले नाही कीस, त्यांच्या या शेवटच्या शब्दांत भविष्याची काही भयावह सूचना असेल. मात्र या संवादानंतर थोड्याच वेळाने राष्ट्र आणि राष्ट्रातील माणसांना समर्पित अशी एक तेजस्वी जीवनज्योत कायमची विझून गेली.

(250 रुपये किंमतीचे हे पुस्तक विक्रीसाठी साधना मीडिया सेंटर, 020-24459635 येथे उपलब्ध आहे.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके