डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शबाना आझमींना भेटल्यानंतरची मी...

फिल्मची स्टोरी आणि इतर पात्रं समजल्यावर मला खूप चांगले वाटते की, मी या फिल्मचा एक भाग आहे. कारण या फिल्ममधल्या ‘मरियम’च्या वडिलांप्रमाणेच माझे वडील आहेत. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा मला पाठिंबा आहे. जेव्हा आमच्या फिल्मच्या कथेतले लोक मरियमच्या वडिलांना खूप दुखावतात, तेव्हा मला असे वाटले की, कोणी तरी माझ्या वडिलांसोबतच हे सर्व करते आहे!

मिजवान- लखनौपासून पाच तासाच्या अंतरावर वसलेले जिल्हा आझमगड, उत्तर प्रदेशमधील एक छोटेसे गाव... भारताचे सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते कैफी आझमी यांनी या गावात 1993 मध्ये ‘मिजवान वेल्फेअर सोसायटी’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे स्त्रियांना महत्त्वपूर्ण विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे, विविध कलांचे ज्ञान आणि जगाशी संवाद साधण्याचा अनुभव मिळावा म्हणून प्रयत्नशील असणे. शाळा आणि इंटर-कॉलेजद्वारे महिलांना प्रगती करण्याची समान संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या संस्थेचे बीज पेरण्यात आले. कैफी आझमी, त्यांची मुलगी शबाना आझमी आणि मुलगा बाबा आझमी यांनी या रोपट्याला मोठ्या प्रेमाने व प्रामाणिकपणे जोपासले. या मेहनतीचे फळ म्हणजेच- मिजवान गावची कन्या अदिती सुबेदी!

वडील कैफी आझमी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तसेच दूर होत चाललेल्या मनांना जवळ आणण्याच्या उद्देशाने शबाना आझमी यांनी भाऊ बाबा आझमी यांच्यासह ‘मी रक्सम ’ (I Dance) नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. भरतनाट्यम्‌ हा नृत्यप्रकार या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. एक बारा-तेरा वर्षांची सामान्य मुस्लिम कुटुंबातील मुलगी. तिला भरतनाट्यम्‌ शिकायचे आहे. वडिलांचा पूर्ण पाठिंबा आहे. नृत्यगुरू तिला हे नृत्य शिकवायला आनंदाने तयार आहे. मात्र तिने हे नृत्य शिकणे व करणे हे कृत्य इस्लामविरोधी आहे, असे म्हणणारे मुल्ला-मौलवी व त्यांचा नेता एका बाजूला आहेत. तर दुसऱ्या बाजूला आहेत, तिने हे नृत्य शिकणे व करणे  भारतीय सभ्यता व संस्कृती यात बसत नाही, असे म्हणणारे हिंदू धर्माभिमानी. अशी मध्यवर्ती कल्पना असणाऱ्या या चित्रपटातून असा प्रश्न उपस्थित केला आहे की,  कोणताही कलाप्रकार  कोणत्याही देवाच्या वा धर्माच्या विरोधात कसा असू शकेल ?

‘मी रक्सम’ नुकताच CoS-FF 2020 (The Coalition of South -sian Film Festivals) मध्ये ओपेनिंग नाईट फिल्म म्हणून दाखवला गेला. मिजवान आणि आझमगडमधील लोकांसाठी ही फिल्म महत्त्वाची आहे, कारण यात मुख्य नायिकेच्या भूमिकेत 17 वर्षांची अदिती सुबेदी आहे!

इन्स्टाग्राम अकाऊंटवर आदितीच्या बालपणीचे छायाचित्र पोस्ट करताना शबाना आझमी यांनी लिहिले आहे की, ‘त्या वेळी या मुलीच्या डोळ्यांतील चमक मला भावली. तिच्यात इतर अनेक गुण असतील ज्यामुळे ही मुलगी नक्की प्रगती करेल असेच मला वाटून गेले.’

लहानपणी जेव्हा अदिती शेकोटीजवळ बसली होती, तेव्हा शबाना यांनी तिला अचानक हाक मारली आणि ती वळताच तिचे छायाचित्र काढले. पुढे आदितीने मिजवान फॅशन शोमध्ये भाग घेतला, तेव्हा तेच चित्र प्रवेशद्वारावर पोस्टररूपाने लावण्यात आले होते.

तिच्या आयुष्यातील पहिल्या चित्रपटाचा अनुभव आणि त्यासाठी घेतलेले परिश्रम व झालेल्या बदलाचा प्रवास जाणून घेण्यासाठी अदिती सुबेदीची घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न : अदिती, सर्वप्रथम तुला या चित्रपटासाठी शुभेच्छा! मिजवान गावात तुझा जन्म आणि संगोपन झाले आहे. गावाबद्दल तू आम्हाला काय सांगशील?

- मिजवान हे आझमगडमधील एक छोटेसे गाव आहे, ज्याला पूर्वी पिनकोडसुद्धा नव्हता! ...आणि आज मिजवानच्या भरतकामाचे क्लायंट रेंज हॉलिवुड अभिनेत्रींपासून बॉलीवुडमधील अनेक कलाकारांपर्यंत आहेत! कैफी आझमी- ज्यांना आम्ही सर्व जण ‘दादा-बाबा’ म्हणतो- त्यांचा जन्म मिजवानमध्ये झाला. त्यांनी सुरू केलेल्या ‘मिजवान वेल्फेअर सोसायटी’द्वारे आतापर्यंत खूप महत्त्वपूर्ण काम केले गेले आहे. त्याच कामाचा परिणाम म्हणून, उदा.- आज माझ्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांना स्काइप आणि इतर ऑनलाईन माध्यमांद्वारे थेट अमेरिका व लंडनमधून इंग्रजीची शिकवणी मिळते! आमचे गाव खूप सुंदर आहे. इथे निसर्गातील बऱ्याच सुंदर गोष्टी आहेत. या गावातील लोकही चांगले, खूप हुशार आहेत. मला इथले वातावरण आवडते, कारण इथे सगळे मिळून-मिसळून राहतात. मुलगी असो किंवा मुलगा- आमच्या गावात कोणताही भेदभाव नाही आणि सर्वांना पुढे जाण्याची समान संधी मिळते. मिजवानमधील लोक खूप परिश्रम करतात. शबाना आझमी- ज्यांना आम्ही ‘शबाना बुआ’ म्हणतो- त्या बऱ्याचदा कामाच्या संदर्भात येथे येतात. त्या आल्या की, इथले वातावरण अधिक चांगले होते. आम्ही त्यांच्याबरोबर तासन्‌तास बोलतो. त्यांच्याकडे सांगायला बऱ्याच नव्या गोष्टी असतात. मिजवानमधील कोणतीही व्यक्ती त्यांची भेट कधीही घेऊ शकते. मिजवान हे एक चांगले गाव आहे. मला वाटते की, या गावाने स्वतःमध्ये सतत बदल घडवला आहे आणि म्हणून ते प्रगती करीत आहे.

प्रश्न : एकूणच तुझे बालपण कसे होते आणि तुझ्या कुटुंबाबद्दलसुद्धा आम्हाला सांगशील...?

- माझा जन्म 2004 मध्ये झाला. कुटुंबात माझे आई-वडील आहेत. एक मोठी बहीण आणि एक छोटा भाऊ आहे. माझे वडील श्री.गोपाल सुबेदी हे शिबली नॅशनल कॉलेजमध्ये लायब्ररी सहाय्यक आहेत आणि  आई श्रीमती निर्मला ही पोस्ट ऑफिसमध्ये काम करते. बहीण बी.एस्सी शिकत आहे आणि छोटा भाऊ सातवीत शिकतो आहे. माझे शालेय शिक्षण मिजवानपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘कैफी आझमी पायोनियर स्कूल’मध्ये झाले आहे. आमचे शाळेचे दिवस खूप चांगले होते. मला अगदी लहानपणापासून नृत्य करण्याची खूप आवड आहे. आमच्या शाळेत असे अनेक कार्यक्रम होत, ज्यांत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्यांची कला दाखविण्याची संधी मिळत होती. इतर मुलांप्रमाणे मलाही काही ठरावीक विषयांमध्ये जास्त रस नव्हता. मी बऱ्याचदा खेळण्यात आणि नृत्य करण्यात दंग असायचे. यासाठी मला आई कधी कधी रागवायचीसुद्धा! तर, शाळा चांगली होती आणि बालपणही छान होतं.

प्रश्न : तुझ्या कुटुंबात इतर कुणाला नृत्य किंवा अभिनयात रस आहे का? तुझ्यात ही आवड कशी निर्माण झाली?

- मला लहानपणापासूनच डान्स करायला आवडत होतं. माझ्या घरी कुणीही कधीच नृत्य शिकलेले नाही आणि त्यांना यात तसा फारसा रसही नाही. पण मला डान्स आवडतो आणि मला कोणीही तो करण्यास कधीच रोखले नाही. त्यात माझी आवड कशी तयार झाली याचे उत्तर मला माहीत नाही; पण हो- जेव्हा मी डान्स करते, तेव्हा माझ्यात कुठून तरी खूप आत्मविश्वास येतो आणि मला चांगले वाटते. मी आधी नृत्याचे प्रशिक्षण कधीच घेतलेले नाही. ‘मी रक्सम’ चित्रपटासाठी जेव्हा मुंबईला गेले, तेव्हा प्रथमच भरतनाट्यम शिकले. नृत्याचे इतके प्रकार असतात, हेसुद्धा मला माहीत नव्हते! आधी मी केवळ बॉलीवुड गाण्यांवर डान्स करायचे. मला वाटते की, या चित्रपटामुळे नृत्याशी माझे नाते आणखी घट्ट झाले आहे.

प्रश्न : ‘मी रक्सम’ फिल्ममध्ये तू मरियम नावाची मुलगी साकारली आहे. चित्रपटानुसार या मुलीला भरतनाट्यम्‌ नृत्य शिकायचं आहे, पण तिचे काही नातेवाईक आणि तिच्या गावातील काही लोक तिला तसे करण्यापासून रोखतात; कारण ती मुस्लिम कुटुंबातील आहे. तुझ्या वैयक्तिक आयुष्यात अशा प्रकारचा अनुभव कधी तुला आला आहे का?

- बिलकुल नाही! माझ्या बाबतीत असे कधी झाले नाही; उलट मला जे काही शिकायचे आहे किंवा प्रगती करायची आहे, यासाठी माझ्या आई आणि वडिलांनी पूर्ण सहकार्य केले आहे. आमच्या फिल्ममध्ये मरियमचे वडील ‘सलीम’ तिला साथ देतात, तिच्याशी स्पष्टपणे बोलतात आणि जेव्हा ती डान्स सोडून देण्याचा विचार करते, तेव्हा तिची समजूत काढतात. तिला विरोध करणाऱ्यांना नम्रपणे समजवायला जातात... अगदी तसेच माझे वडील आहेत! ते मला नेहमी सांगतात- ‘तुला जे करायचे आहे ते कर. आम्ही सर्व जण तुझ्याबरोबर राहू. फक्त एक प्रॉमिस कर की- तू तुझे निवडलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही परिश्रम लागतात, ते मनापासून करशील...’ माझी आईदेखील त्यांच्याशी सहमत आहे.

तू नातेवाइकांबद्दलही प्रश्न विचारला होता, बरोबर? (: होय) माझे स्वत:चे नातेवाईक खूप सपोर्टिव्ह आहेत आणि मला असेही वाटते की, जेव्हा आई-वडील आपल्याबरोबर असतात तेव्हा जगाबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही.

प्रश्न : तू शबानाजींना कधी भेटलीस? मी एका मुलाखतीत ऐकले होते की, तू आठवी इयत्तेत असताना शबाना आझमींच्या घरी गेली आणि त्यांना सांगितलं की, तुला मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये सहभागी व्हायचे आहे! त्याबद्दलही आम्हाला सांगशील?

- मिजवानमध्ये शबाना बुआंना जवळपास प्रत्येक जण ओळखतो आणि आधी सांगितल्याप्रमाणे इथले कोणतेही विद्यार्थी शबाना बुआंना कधीही भेटू शकतात. मीदेखील त्यांना माझ्या लहानपणापासूनच पाहत आलेली आहे. त्यांनीही मला लहानपणापासून पाहिले आहे. त्या माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. त्या स्वतः ताकदीच्या कलाकार आहेत आणि व्यक्ती म्हणून त्या इतक्या छान आहेत की, कदाचित त्यामुळेच त्या इतर लोकांचे मन जाणून त्यांना इतकी मदत करू शकतात. मलादेखील त्यांच्यासारखी चांगली व्यक्ती बनायचं आहे.

मनीष मल्होत्रा यांच्यासमवेत ‘मिजवान वेल्फेअर सोसायटी’ दर वर्षी ‘मिजवान फॅशन शो’ आयोजित करते. मनीष मल्होत्रा यांच्या डिझाईनमधील चिकनकरीचे काम मिजवानमधील कलाकार करतात. शबाना बुआ 2017 मध्ये मिजवानला आल्या होत्या, तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘मलाही फॅशन शोमध्ये भाग घ्यायचा आहे. मलाही मुंबईला जायचे आहे.’ यावर शबाना बुआंनी मला विचारले, ‘अच्छा, तिथे जाऊन तुला काय करायचे आहे?’ मी म्हणाले, ‘मला स्टेजवर जाऊन कॅटवॉक करायचा आहे!’ तर त्या म्हणाल्या, ‘ठीक आहे, या वेळी मी तुला बोलवेन.’ ...आणि त्यांनी मला बोलावलं.

मी आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसले होते. मी मुंबईला पोहोचले, तेव्हा तिथे मनीष मल्होत्रासर होते. इतर अनेक कलाकार होते. मी त्या वर्षी शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्याबरोबर रॅम्पवर चालले होते. माझ्यासाठी हा नवा अनुभव होता, कारण मुंबई शहर माझ्या गावापेक्षा खूप वेगळंच होतं. आमचं गाव खूप शांत आहे. इथं मुंबईसारख्या गाड्या धावत नाहीत, पण मला मुंबई शहरसुद्धा आवडले होते. मुंबईहून गावाला परतल्यावर काही दिवस माझं मन रमत नव्हतं. मला असं वाटत होतं की, पुन्हा मुंबईला जाण्याची संधी मिळायला हवी.

प्रश्न : इतक्या लहान वयात मिळालेल्या या अनुभवानंतर तुझ्या मनात नवी उमेद आणि कलाक्षेत्रात अधिक काम करण्याची संधी मिळावी, अशी आशा जागृत झाली असेलच? तुझा पुढचा अनुभव म्हणजे ‘मी रक्सम’ फिल्ममधील ‘मरियम’ची भूमिका! मी हे जाणून घ्यायला उत्सुक आहे की- तू या फिल्मपर्यंत कशी पोहोचलीस?

- मी 2017 मध्ये मिजवान फॅशन शोमध्ये भाग घेतल्यानंतर जवळजवळ एका वर्षानंतरची गोष्ट आहे. सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते, तेव्हा माझ्या पप्पांना बाबा अंकलचा फोन आला की- ते एक फिल्म बनवत आहेत आणि त्यात एका मुलीची भूमिका आहे. जर अदितीला ही भूमिका साकारायची असेल, तर तिला एक ऑडिशन व्हिडिओ बनवून पाठवायला सांगा. मिजवान फॅशन शोमध्ये जेव्हा मला माइकवर बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा मी म्हणालो होते की- ‘मला शबाना बुआसारखी अभिनेत्री आणि एक चांगली व्यक्ती व्हायचं आहे.’ आता मला असं वाटतं की, मी तिथे हे व्यक्त केल्यामुळे बाबा अंकल यांना  कदाचित असं वाटलं असावं की, मीसुद्धा ऑडिशन देऊ शकेल. त्यांनी अनेक मुलींची ऑडिशन घेतली होती, पण त्यांना गावात राहणारी माझ्या वयाची मुलगी या भूमिकेसाठी हवी होती.

माझ्या वडिलांनी मला हे सांगितलं आणि माझ्या बहिणीच्या मदतीने आम्ही आमच्या फोनवर एक लहान ऑडिशन रेकॉर्ड केली आणि ती बाबा अंकल यांना पाठवली. त्यांना ती आवडली आणि त्यांनी मला फोनवर त्यांच्या चित्रपटाची कहाणी सांगितली. मला त्यांनी स्क्रिप्टमधील काही संवाद रेकॉर्ड करून पाठवण्यास सांगितलं. मी स्वतःच माझी तयारी करून त्या संवादाचे व्हिडिओ बनवून पाठविले. मी आयुष्यात कधीच अभिनय केला नव्हता, परंतु बाबा अंकल यांनी फोनवर दृश्य समजून सांगितलं आणि मला त्याचेसुद्धा व्हिडिओ बनवून पाठवायला सांगितलं. मी ते पाठविले. त्यानंतर बाबा अंकल स्वत: मिजवानला आले. माझ्याबरोबर बसून संपूर्ण स्क्रिप्ट वाचून मग त्यांनी मला ‘मरियम’चे पात्र समजावून सांगितलं. एकदा तर, माझ्या दैनंदिन जीवनात मी जे काही करते, त्याप्रमाणे त्यांनी मला सगळं करण्यास सांगितलं. जसे की- शाळेतून येणे, नंतर कापटात कपडे शोधणे, शाळेसाठी तयार होणे वगैरे... मी हे सर्व केले आणि त्यांनी ते त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतले. मग ते मुंबईला गेले आणि तिथेच त्यांच्या टीमला त्यांनी हे सर्व दाखवले. मला काही दिवसांनी फोन आला आणि ते म्हणाले की- अदिती, ‘तू तयारी सुरू कर. आता तुला भरतनाट्यम्‌ शिकायचे आहे, त्यासाठी तुला मुंबईला यावे लागेल; कारण ‘मरियम’च्या भूमिकेसाठी तुझी निवड झाली आहे!’ अशा प्रकारे मी या फिल्मपर्यंत पोहोचले.

प्रश्न : तुझ्या संपूर्ण फिल्ममध्ये भरतनाट्यम्‌ खूप महत्त्वाचे आहे. तू आम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतंस की, तू फक्त बॉलीवुड गाण्यांवर डान्स केलेला होतास. तू या चित्रपटासाठी भरतनाट्यम्‌ नृत्य शिकलीस. भरतनाट्यम्‌ शिकण्याचा तुझा एकूण प्रवास कसा होता?

- हो, सांगते. मी या चित्रपटाच्या तयारीसाठी सप्टेंबर 2018 मध्ये मुंबईला गेले होते. तिथे बाबा अंकल यांनी माझी ओळख दीपाली सलील यांच्याशी करून दिली. त्यांच्याकडून मी भरतनाट्यम शिकले. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा खूप शांतपणे ‘हॅलो मॅम’ म्हणाले. बाबा अंकल माझ्यासोबत होते म्हणून मला तितकी भीती वाटत नव्हती. नंतर दीपालीअक्काने... मी त्यांना  अक्का म्हणते... मला डान्स करून दाखवण्यास सांगितला. मी त्यांना सांगितलं की, मी भरतनाट्यम शिकलेली नाही. मग त्या म्हणाल्या की, कोणत्याही गाण्यावर नृत्य केलेस तरी चालेल. म्हणून मी बॉलीवुडमधील ‘काला चश्मा’ गाण्यावर डान्स करून दाखवला. त्या मला भरतनाट्यम शिकवण्यास तयार होतील की नाही, हे मला कळत नव्हते.

नंतर मी त्यांच्याकडून ऐकले की, माझ्या डान्स ऑडिशनवेळी त्यांच्या मनात तीन गोष्टी होत्या. त्यांनी बाबाअंकल यांना सांगितलेलं होतं की, जर या मुलीकडे  तीन गोष्टी असतील, तरच मी तिला चार महिन्यांत या चित्रपटासाठी भरतनाट्यम शिकवू शकेन. त्या तीन गोष्टी अशा होत्या- 1) माझी परिश्रम घेण्याची तयारी किती आहे? 2) माझ्यामध्ये ताल आणि सूर यांची जाण किती आहे? 3) डान्स करताना माझा आत्मविश्वास किती आहे? ...आणि दीपालीअक्का मला भरतनाट्यम शिकवण्यास तयार झाल्या, हे ऐकून मला खूप आनंद झाला.

पण नंतर हळूहळू मला जाणवायला लागलं की, भरतनाट्यम करणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यात अनेक बारकावे आहेत आणि प्रचंड मेहनत आहे. कारण भरतनाट्यम नृत्यात आपल्याला पाय गुडघ्यांत वाकवून, दोन्ही पायांचा डायमंड आकार बनवून पूर्ण वेळ उभे राहावे लागेल. शरीराच्या कठोर परिश्रमाबरोबरच मनाकडेदेखील लक्ष द्यावे लागते; कारण आपले हात, हातांची बोटं, पाय, मान, चेहरा... सर्व एकत्र काम करत असतं! वेगवेगळ्या हस्तमुद्रा (हातांच्या मुद्रा) शिकताना दीपालीअक्काला माझ्यासाठी खूप कष्ट करावे लागले. उदाहरणार्थ- त्रिपताका मुद्रा- ज्यात आपल्या हाताची सर्व बोटं सरळ असून एकमेकांना चिकटलेली असतात आणि केवळ ‘अनामिका’ हे बोट त्याच्यावरून दुसऱ्या जॉइंटपासून पुढच्या दिशेने वाकवलेले असते! सुरुवातीला काहीच सोपे नव्हते. बऱ्याच वेळा माझ्या बोटांना आम्ही सेलोटेप लावून ठेवायचो. हळूहळू माझ्या बोटांना मुद्रा करण्याची सवय झाली. माझे दोन्ही गुडघे सुजले होते आणि पायही दुखायचे. आम्ही डॉक्टरकडे गेलो तेव्हा मला कळले की, आपण आपल्या जेवणाकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे. आपल्या शरीरात कॅल्शियम, प्रथिने इत्यादी सर्व पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात असायला हवीत. कॅल्शियम कमी असल्यामुळे मला नृत्य करण्यास काही अडचणी येत होत्या. बाबा अंकल, तन्वी आंटी, शबाना बुआ आणि त्यांच्या टीमने माझी खूप काळजी घेतली. मला योग्य आहार दिला गेला- जेणेकरून माझे कॅल्शियम योग्य प्रमाणानुसार होईल. तेव्हा मला प्रथमच कळले की, आपण आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर कदाचित आपण आपल्या आवडीची गोष्टसुद्धा करू शकणार नाही. मला डान्स करायला खूप आवडतं आणि तो करता यावा म्हणूनच मी स्वतःची काळजी घेऊ लागले.

एक महिन्यानंतर, भरतनाट्यममधील काही मूलभूत गोष्टी शिकून पूर्ण झाल्यावर फिल्मसाठी आवश्यक असलेल्या नृत्य-दिग्दर्शनास सुरुवात केली. यादरम्यान मला बऱ्याच वेळा होमवर्क दिले जायचे आणि दुसऱ्या दिवशी जर मी होमवर्क करून आलेली नसेल, तर दीपालीअक्का रागवायची. स्टेजवर सराव व्हायचा, तेव्हा तिथे आमच्यासोबत बरेच लोक काम करत असायचे. तेव्हा मला वाईट वाटायचे की, मी माझा गृहपाठ का केला नाही? माझ्यामुळे बऱ्याच लोकांचा वेळ वाया गेला, वगैरे. हे एक-दोन वेळा घडल्यानंतर मी ठरवलं की, आपण आपला होमवर्क अधिक लक्ष देऊन पूर्ण केला पाहिजे. मला आठवते की, दीपालीअक्का आमच्या शेवटच्या सीनदरम्यान किंचित टेन्शनमध्ये होत्या. मी योग्यरीत्या नृत्य करेन की नाही, याची त्यांना काळजी वाटत होती. त्यांनी मला जवळ बोलावले आणि मला प्रेमाने समजावून सांगितलं. मला घट्ट मिठी मारली. माझ्या मनात अनेक मिश्र भावना होत्या, कारण आमच्या भरतनाट्यम नृत्य-प्रशिक्षणाचा तो शेवटचा दिवसही होता.

भरतनाट्यममुळे मी काही महत्त्वाच्या गोष्टी शिकले आहे. जसे की- जेव्हा आपण बसतो, तेव्हा आपले खांदे नकळत झुकतात. आपण कसे बसलो आहोत, याची आपण काळजी घेत नाही. पण भरतनाट्यम नृत्य करून, मला आपल्या शरीराचे पोश्चर योग्य ठेवण्याची सवय झाली. आजही जेव्हा मी माझ्या पायांत घुंगरू बांधते, तेव्हा माझ्यामध्ये कुठून तरी एक अद्‌भुत ऊर्जा येते आणि खूप आत्मविश्वास वाटतो. माझ्यावर विश्वास ठेवून भरतनाट्यम शिकवल्याबद्दल मी दीपालीअक्काचे खूप आभार मानते. अजूनही शनिवार-रविवारी व्हिडिओ कॉलवर त्या मला भरतनाट्यम शिकवतात.

प्रश्न : ‘मी रक्सम’दरम्यान तुझा शूटिंगचा अनुभव कसा होता?

- मुंबईत जुहू येथे जानकी कुटीर आहे. आम्ही तिथे रिहर्सल करायचो. या चित्रपटाचे सर्व कलाकार म्हणजे अभिनेते आणि बॅकस्टेज कलाकार एकत्र भेटायचे. काही लोक पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते आणि काही माझ्यासारखे होते, जे सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत होते. प्रत्येकाला रिलॅक्स करण्यासाठी आमच्याकडून बाबा अंकल विविध कृती करून घ्यायचे. जसे की- लाफ्टर क्लब! यामध्ये सगळे जण एका वर्तुळात उभे राहून वेगवेगळ्या प्रकारे हसत असत. सुरुवातीला मी खूप ऑकवर्ड झाले, पण नंतर सर्वांसोबत कधी मिसळले हे मलाच कळले नाही. बाबा अंकलसुद्धा आमच्या-बरोबरच बसायचे. असे नव्हते की, ते दिग्दर्शक आहेत तर ते वेगळ्या जागी बसतील आणि आम्ही कुठे तरी दुसऱ्या जागी बसू. ते सर्वांसोबत राहायचे.

मी पाहिले की, तिथे प्रत्येक जण दिलेल्या वेळेवर पोहोचत असे. वाचन आणि तालमीसाठी ठेवलेल्या वेळेत तेच काम व्हायचे. त्यानंतर जर वेळ उरला तर आम्ही नाचायचो, वेगवेगळे पदार्थ बनवायचो. मी तिथे लोकांना बघूनच बऱ्याच गोष्टी शिकले आहे, ज्या कदाचित मला आत्ता शब्दांत सांगतासुद्धा येणार नाहीत. फिल्मची स्टोरी आणि इतर पात्रं समजल्यावर मला खूप चांगले वाटते की, मी या फिल्मचा एक भाग आहे. कारण या फिल्ममधल्या ‘मरियम’च्या वडिलांप्रमाणेच माझे वडील आहेत. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा मला पाठिंबा आहे. जेव्हा आमच्या फिल्मच्या कथेतले लोक मरियमच्या वडिलांना खूप दुखावतात, तेव्हा मला असे वाटले की, कोणी तरी माझ्या वडिलांसोबतच हे सर्व करते आहे! मला असेही वाटायला लागले की, माझे वडील मला पाठिंबा देत असतील तर मीही माझे स्वप्न मेहनतीने पूर्ण करीन.

मरियमच्या भूमिकेत शिरण्यासाठी बाबा अंकल यांनी  मला खूप मदत केली. एकदा त्यांनी मला एक पेपर घेऊन त्यावर मरियम कशा प्रकारची मुलगी आहे, ती कशी राहत असेल, कोणत्या शॅम्पूने अंघोळ करत असेल, कसे कपडे घालत असेल, तिच्या दैनंदिन जीवनात काय चालले असेल, ती तिच्या आयुष्यात काय करू शकेल... वगैरे. अशा बऱ्याच गोष्टी लिहायला सांगितल्या. आमच्या फिल्मच्या टीममधील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य केले आणि यामुळे मी मरियमची  भूमिका करू  शकले.

प्रश्न : तू वयाच्या सोळाव्या वर्षी एका फिल्मसाठी मुंबईत गेली, आणि तिथे एक भरगच्च आडनिडं वेळापत्रक पाळलंस. त्या वर्षी तुझी दहावीची परीक्षासुद्धा होती आणि तू पूर्ण वेळ शाळेला जाऊ शकली नव्हतीस. हे सगळं सोडून आपण घरी गेलं पाहिजे, असं तुला कधी वाटलं नाही?

- बिलकुल नाही! मी माझे स्वप्न जगत होते आणि त्यात मला इतका आनंद होत होता की, मी सांगू शकत नाही. होय, मला माझ्या गावाची आणि कुटुंबाची खूप आठवण यायची. मी त्यांच्याशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर बोलत असे. एकदा किंवा दोनदा भरतनाट्यम शिकत असताना माझे पाय खूप दुखत होते आणि ते मी माझ्या आईला सांगितलं. आई म्हणाली, ‘तू आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम करते आहेस. त्यात तुला काही अडचणी येतील. तू प्रथमच भरतनाट्यम शिकत आहेस, म्हणून तुझे पाय दुखत असावेत. जर तू सराव करत राहिलीस, तर तुझ्या वेदना हळूहळू कमी होतील.’ आई-वडिलांशी बोलून मला काम करण्याचे धैर्य मिळायचे. मला माझ्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत. कारण जेव्हा मी माझे शूटिंग संपवून गावात परतले, तेव्हा त्या सर्व लोकांनी मला माझ्या अभ्यासामध्ये खूप मदत केली आणि यामुळे मला चांगले गुण मिळवून दहावी उत्तीर्ण होण्यात यश आले.

प्रश्न : नसिरुद्दीन शाह यांनी या फिल्ममध्ये हाशिम शेठची भूमिका साकारली आहे. त्यांना भेटण्याचा अनुभव कसा होता?

- मला नसिरुद्दीनसरांना भेटून खूप आनंद झाला. जेव्हा मी त्यांच्यासमोर अभिनेत्री म्हणून करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा ते मला म्हणाले, ‘तुला अभिनेत्री व्हायचे आहे, तर नक्की हो! पण त्याचबरोबर तुझा अभ्याससुद्धा सुरू ठेव. नुसतीच अभिनेत्री होण्यापेक्षा एक सुशिक्षित अभिनेत्री होणे महत्त्वाचे आहे.’ मला त्यांचे म्हणणे पटले आहे आणि म्हणून मी माझ्या अभ्यासाकडेही लक्ष देते.

प्रश्न : या फिल्मनंतर तुझ्या आजूबाजूला काही बदल झाले आहेत का? लोक आता तुझ्याशी कसे वागतात?

- फार काही बदललेले नाही. मला सर्व पूर्वीसारखेच वाटते. माझे कुटुंब, माझे परिचित, माझी शाळा, मित्र- सर्व माझ्याशी पूर्वीसारखेच वागतात. मला सर्वांकडून प्रेम मिळते आणि ते माझ्या कामासाठी माझे कौतुकदेखील करतात. काही मीडियासाठी ऑनलाईन मुलाखती झाल्या, कुठे बातम्या आल्या- वगैरे... अशा प्रकारच्या काही नव्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत, इतकेच.

प्रश्न : ‘मी रक्सम’मधील तुझा आवडता सीन कोणता आहे?

- मला आमच्या फिल्ममधील माँटाजेस खूप आवडले आहे. माँटाजेस म्हणजे- बँकग्राऊंडला एक संगीत वाजत राहतं. छोट्या तुकड्यांमध्ये मरियमचा भरतनाट्यम शिकण्याचा प्रवास दाखवला आहे. पहिल्या तुकड्यात ती फक्त पाहत आहे, त्यानंतर दुसऱ्या तुकड्यात ती काही तरी करण्याचा प्रयत्न करीत आहे, तिसऱ्या तुकड्यात तिला नृत्य करता येते आहे... मला हे खूपच आवडलं.

प्रश्न : धन्यवाद अदिती! तू तुझे अनुभव मोठ्या सहजतेने शेअर केलेस. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की- आत्ता तुझ्यासाठी यशस्वी होण्याचा अर्थ काय?

- यशस्वी होणे...? माझ्यासाठी यशस्वी होणे म्हणजे- सर्वप्रथम आपले स्वतःचे काही तरी स्वप्न असायला हवे आणि दुसरं म्हणजे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे मेहनत घ्यायला हवी. त्यासाठी आपल्याला जे काही शिकणे आवश्यक आहे, ते शिकायला हवे किंवा आपल्यात जो काही बदल करायला लागेल, त्यासाठी तयार असायला हवे. त्याचबरोबर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे कुणी आपल्यासोबत उभे असतात, साथ देतात- त्यांच्याबद्दल आपण आदर बाळगला पाहिजे. बाबा अंकल, तन्वी आंटी, शबाना बुआ अन्‌ त्यांच्या संपूर्ण टीममुळे मी मिजवानसारख्या छोट्या गावातून मुंबईपर्यंत येऊ शकले आणि एका चांगल्या फिल्मचा भाग बनले... बाबादादा म्हणजे कैफी आझमी यांच्यासारखे लोक... यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला टिकवता यावा, यांच्यासारखे चांगले काम करता यावे, यांच्यासारखी एक चांगली व्यक्ती बनता यावं- एवढंच!

मुलाखत व शब्दांकन : दिपाली अवकाळे

Tags: शबाना आझमी हिंदी चित्रपट अदिती सुबेदी मुलाखत दिपाली अवकाळे dipali awkale interview film kaifi azmi shabana azmi aditi subedi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके