डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जागतिकीकरण आणि बेरोजगारी : काय म्हणतेय तरुणाई?

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला एक तप पूर्ण झाले. ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अनेकांना लक्षवेधी स्वप्ने दाखवण्यात आली. जागतिकीकरणामुळे लाखोंच्या संख्येने रोजगार वाढेल; आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात घटेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. आता मात्र मूल्यमापनाचा काळ समोर येऊन ठेपला आहे. जागतिकीकरणाने खरोखरच किती रोजगार उपलब्ध करून दिले? बेरोजगारांना या प्रक्रियेची मदत झाली का? आजचे तरुण खरोखरच कसे आयुष्य जगत आहेत?... असे अनेक प्रश्न आज सर्वसामान्यांपुढे उभे आहेत. दिवाळी अंकाच्या निमित्ताने आम्ही या प्रश्नाचा वेध घ्यायचा ठरवला आणि समाजातल्या विविध घटकांमध्ये पाहणी केली. प्रत्येक स्तरातील तरुण नजरेसमोर ठेवले; आणि अनेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या रोजगारासंदर्भातील अडचणी समजून घेतल्या. या चर्चेनंतर जागतिकीकरणाचे भेसूर रूप समोर आले. त्याचाच हा प्रत्यक्ष मुलाखतींवर उभा राहिलेला ताळेबंद.

जागतिकीकरण आणि बेरोजगारी 
जागतिकीकरणाची प्रक्रिया आता एवढी स्थिरावली आहे, की समाज आणि अर्थकारणाच्या क्षेत्रात या प्रक्रियेचे व्यवस्थित मूल्यमापन करता येईल. खरे तर टोकाचा विरोध आणि टोकाचा पाठिंबा देणारे काही अपवाद वगळले तर जागतिकीकरणाच्या विविध पडसादांचा अभ्यास सुरू आहे. जागतिकीकरणामुळे काय बरे-वाईट घडणार, याचे आडाखे पूर्वीपासूनच बांधले जात होते. या प्रक्रियेच्या समर्थकांना तिचे विविध लाभ दिसत होते. देशाला, इथल्या माणसांना मोठ्या प्रमाणावर प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील, असा समर्थकांचा दावा होता. शेती आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांसमोर आव्हाने आणि उज्ज्वल भवितव्य आहे, असे मानले जात होते. या दोन क्षेत्रांची प्रगती याचा सरळ अर्थ म्हणजे रोजगारात वाढ होणार. पण प्रत्यक्षात काय घडले? 

खरे तर बेरोजगारी हे इथल्या समाजाचे जुनाट दुखणेच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या प्रश्नाबाबत वेगळ्या रीतीने पहायला त्या वेळच्या चळवळीने शिकवले. प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळायलाच हवा व तो रोजगार पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे मत जनमानसावर पक्के ठसले. स्वातंत्र्यानंतर हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती; पण स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवापर्यंत या अपेक्षेचा चक्काचूर झाला. तरीही शासनाने मात्र आपली जबाबदारी संपूर्णपणे झटकली नव्हती. दोन हातांना काम आणि कामाचा वाजवी दाम ही प्रत्येक पक्षाची ठळक भूमिका होती. त्याच वेळी बी.ए., बी.एड. केले की शिक्षकाची नोकरी मिळते; बी.कॉम., एम.कॉम. झाल्यावर बँकेत चिकटता येते, यावर बऱ्याच लोकांचा विश्वास होता. ज्यांच्या मनी या संदर्भात अविश्वास होता, ते सरकारच्या विरोधात आंदोलने छेडत होते. या प्रश्नावर जनजागृती करून सत्तेपर्यंत जाता येईल अशी स्थिती होती.

1980 नंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. एकविसावे शतक, संगणक युग या शब्दांच्या मोहिनीला सुरुवात झाली. 1990 पर्यंत तर, स्वातंत्र्योत्तर काळातील अपयशाला नेहरूप्रणीत अर्थकारण जबाबदार होते, अशी टीका कुणीही करू लागले. नंतरच्या काळात सरकारने जवळपास प्रत्येक क्षेत्रातून अंग काढून घ्यायला सुरुवात केली. सरकारने काहीतरी करावे, ही अपेक्षा बाळगणे जनतेने केव्हाच सोडून दिले होते. आहेत त्या कर्मचाऱ्यांचे पगार ज्या सरकारला वेळच्या वेळी करता येत नाहीत, ते सरकार देशातल्या कोट्यवधी बेरोजगारांना नोकर्या देईल, हे अपेक्षिणे हास्यास्पद आहे हे सर्वांनाच कळून चुकले. अशा परिस्थितीत 'जागतिकीकरण', 'मुक्त अर्थव्यवस्था’ अशा शब्दांचा आधार होता. हा आधार किती पोकळ आहे, हे गेल्या पाच वर्षांमध्ये लक्षात येत आहे. 'हा मंदीचा परिणाम आहे’ किंवा 'जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचे चांगले किंवा वाईट परिणाम जोखण्यासाठी हा काळ अपुरा' असे म्हणणार्यांनी स्वतःच्या मनाशी तरी आपली गफलत होत आहे हे मान्य करावे, अशी परिस्थिती आहे. सरकारचे अपयश दाखवणारे आणि जागतिकीकरणाचा फुगा फुटला असे सांगणारे अभ्यासक मोठ्या संख्येने आहेत; पण वास्तवात काय आहे?

महाराष्ट्रापुरता विचार केला तर चार-पाच वर्षांपूर्वी दोन तरुणांनी नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. शेतकऱ्यांनी तर मोठ्या संख्येने हा मार्ग आपलासा केला. बेरोजगारी, कर्जबाजारीपणा या प्रश्नांची ही निश्चितच दुःखद परिणती आहे. दरवर्षी 1 कोटी रोजगार निर्माण करणे संघटित क्षेत्राला शक्य नाही अशी कबुली आता मिळाली आहे. नॅशनल सॅंपल सर्व्हे बरोबरच गेल्या तीन वर्षात सरकारने दोन कृतिगटांची या समस्येचा आढावा घेण्यासाठी नियुक्ती केली. दोन्ही कृतिगटांनी ही समस्या तीव्र बनत असल्याचे मान्य करतानाच उदारीकरण हाच या समस्येवरचा मार्ग सांगितला आहे.

उदारीकरण सामान्यांपर्यंत काय घेऊन जाते? खरोखरच लोकांना पुरेसा रोजगार मिळतो आहे का? रोजगारासाठी शिक्षण उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटते का? जीवनावश्यक समस्या सुटल्या नाहीत तर युवावर्ग पेटून वगैरे उठतो. त्यांची या प्रश्नाकडे पाहण्याची भूमिका काय? पदवी, त्यानंतर नोकरी आणि नोकरी मिळाली नाही तर बेकार ही बेरोजगारीची पारंपरिक व्याख्याच गृहीत धरून या प्रश्नाचा वेध घ्यायचा; की असलेले काम गेलेले लोक, कोणत्याही क्षणी काम जाण्याची शक्यता आहे; अशा बेरोजगारांपासून सुरुवात करायची? साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी, तरुण वर्गाशी, विद्यार्थीवर्गाशी बोलूनच मिळतील.

भानावर येऊन काय उपयोग?
शिरीष आज चाळिशीकडे झुकला आहे. तो अभियंता आहे. ही पदवी घेतल्यानंतर त्याला काम मिळाले. हा इंजिनीयर कसा तरी रडतखडत झाला. त्याचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा त्याला अशा कंपनीत नोकरी मिळेल, अशी कल्पना देखील नव्हती. कंपनी चांगली होती; एवढेच नव्हे तर घरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर होती. ही एक गोष्ट देखील त्याच्यासाठी अपार आनंदाची होती. त्याचे मित्र त्याच्यावर 'जळत'; आणि हे 'जळणे' ही त्याला आवडे. घरातला एकुलता एक. त्यामुळे त्याला साऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली. कामात त्याने अक्षरशः स्वतःला झोकून दिले. कंपनीकडून त्याचे फळही त्याला मिळाले. भराभर त्याला बढती मिळाली. लग्न, संसार या गोष्टी रीतसर सुरू झाल्या. कंपनीतर्फे तो दोनवेळा परदेशी जाऊन आला. तिथेही त्याने आपला ठसा उमटवला. आता त्याला 'सी.ई.ओ.' बनण्याची स्वप्ने पडू लागली. सततच्या कष्टांतून पडलेले हे स्वप्न होते. यासाठी तो नियोजनपूर्वक काम करत होता. त्याच्यासमोर क्षेत्र होते ते माहिती तंत्रज्ञानाचे, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा फारसा परिचय नव्हता; पण त्याने तो करून घेतला. एवढेच नव्हे तर त्यातही तो निष्णात बनला. आता फक्त संधीची वाट होती. ही संधी त्याला झटक्यात मिळाली. सॉफ्टवेअर क्षेत्रात नव्यानेच सुरू झालेल्या एका कंपनीची जाहिरात त्याने वाचली. अत्यंत बारकाईने त्याने सर्व चौकशी केली. पगारासह सर्वच गोष्टी आकर्षक आहेत, हे त्याला जाणवले आणि एक दिवस त्याने पहिल्या नोकरीला राम राम ठोकला.

ही कंपनी नवी होती. त्यामुळे एकंदर कर्मचाऱ्यांची संख्या कमी. पूर्वीच्या अवाढव्य कंपनीच्या तुलनेत हे काम फारच किरकोळ होते. काम जास्त नसले तरी कंपनीतील सर्वांनाच भावी यशाच्या कल्पनेने पछाडले होते. शिरीष सकाळी जे घर सोडायचा ते रात्री केव्हातरी घरी यायचा. जाण्याची वेळ निश्चित पण परतणे मात्र कामावर अवलंबून असे. नवी नोकरी सुरू होऊन दोन महिने झाले तरी पगार मिळाला नाही. सर्वच जण थोडे कावरेबावरे झाले. कंपनीची आत्ता कुठे सुरुवात आहे. हळूहळू सर्व ठीक होईल. अशी कंपनीच्या व्यवस्थापकांकडून समजावणी झाली. शिरीषसारख्या मंडळींच्या गाठीशी चार पैसे होते, त्यामुळे त्यांना धीर होता. उरलेले लोक 'फ्रेश' होते त्यामुळे त्यांनीही फार कटकट केली नाही. नंतरचे एक-दोन महिने व्यवस्थित पगार मिळाला. सारे खूष झाले, पण कंपनीने पूर्वी कबूल केलेल्या एकेक सवलती काढून घ्यायला सुरुवात केली. नंतर तर पगारही देणे बंद केले. कारण अर्थातच आर्थिक मंदी हे होते. शिरीष आणि त्याचे सहकारी आता लढ्याच्या पवित्र्यावर आले. कंपनीच्या विरोधात कशी पावले टाकायची याची आखणी सुरू झाली. प्रत्यक्षात कोर्टात मात्र कोणी गेलेच नाही. कारण या लढ्याच्या पूर्वतयारीतच 6 महिने गेले. या सहा महिन्यांत कामही झाले नाही आणि पैसेही मिळाले नाहीत. हळूहळू सर्वांचाच धीर सुटू लागला. बऱ्याच जणांनी कंपनी सोडली आणि उरलेल्यांना कंपनीने ‘जोर का झटका धीरे से’, अशी शिरीषवर वेळ आली.

आज शिरीष घरापासून तीन-चार महिने दूर असतो. सॉफ्टवेअर क्षेत्राच्या गुंत्यात त्याने स्वतःला अडकवून घेतले. त्यामुळे त्याने हे क्षेत्र सोडले नाही. पूर्वीच्या नोकरीतला पगार ही आता त्याच्यासह घरातल्या सर्वांची गरज होती. तेवढा पैसा मिळवण्यासाठी ही भटकंती, वणवण अटळ होती. आज तो म्हणतो, “इतके दिवस मंदीचे कारण सांगत मी मनाची समजूत घातली. पूर्वीच्या कंपनीने माझ्यापेक्षा वरच्या पदावरच्या अधिकाऱ्यांनाही हाकलले. माझाही नंबर केव्हा तरी लागला असताच. पण आज हा इन्फोसिसचा फुगाही फुटला आहे. येत्या दोन वर्षांत या क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येतील, पण स्वतःला मी कसा फसवू? नोकरीच्या बाबतीत जेवढ्या नव्या संधी आहेत तेवढ्याच घराच्या पातळीवर जबाबदार्याही आहेत. या जबाबदार्या वाढत आहेत. आज मी 'चान्स' घेण्याच्या परिस्थितीत नाही. सततचा बदल हे तर या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. हे बदल पेलण्याची ताकद आता नाही. आता फक्त अस्तित्वासाठी कामाला जुंपून घेणे हाती आहे!" शिरीषच्या या परिस्थितीला काय म्हणायचे?

फिरून डी.टी.पी. ऑपरेटरच!
सईची कथाही शिरीषसारखीच. ती एम.कॉम. झाली. एका सामाजिक संस्थेत नोकरीला लागली. एम.कॉम. होऊन कुठे चांगली नोकरी मिळणार, असा तिच्यापुढे प्रश्न होता. त्यामुळे घराची गरज, एक वेगळ्या प्रकारचं काम आणि करिअरच्या दृष्टीनेही चांगलं म्हणून तिने ही नोकरी पत्करली. संस्था सामाजिक असली तरी व्याप मोठा होता. पी. एफ., ग्रॅच्युइटी अशा सुविधाही तिथे होत्या. सईने तिथली हिशेबाची कामे सांभाळता सांभाळता संगणकाचे बारकावेही जाणून घेतले. मधल्या काळात संगणकाची एक पदविकाही पदरात पाडून घेतली. पूर्वीचा एम.कॉम. मुळे आलेला न्यूनगंड हळूहळू कमी होऊ लागला. ती या संस्थेत स्थिरावली. आणखी एक-दीड वर्ष तिथे वाट पाहिली असती, तर ग्रॅच्युइटी आणि अन्य लाभही तिला मिळाले असते. पण या क्षेत्रात आवड म्हणून ती आली नव्हती. गरज आणि करिअर हे तिचे ध्येय पक्के होते. याच दरम्यान तिने कर्ज काढून संगणक घेतला. हा निर्णय किती योग्य होता हे नंतरच्या एका जाहिरातीने तिला पटले. जाहिरात होती 'मेडिकल ट्रान्सक्रिप्शन'ची! कामाचे एकंदर स्वरूप, त्यातून मिळणारे पैसे हे सर्व पाहता सईसारखी स्त्री हुरळून गेली नसती, तरच नवल. त्यात घरातले वातावरणही तिला अनुकूलच होते. इंजिनिअरींगचा डिप्लोमा घेऊनही नवर्याला नोकरी नव्हती. पदरी एक मूल होते. सासू-सासर्यांची जबाबदारी होती. पण नवऱ्याला नेमकी याच काळात नोकरी लागली. मासिक उत्पन्नाला हातभार लागला. सईच्या दृष्टीने 'रिस्क' घेण्याचा हाच काळ होता. तिने नवर्याशी चर्चा केली. चार महिने वाट बघितली. नवऱ्याचा 'प्रोबेशन पिरियड' संपला आणि तो कंपनीत कायम झाला. सईने या परिस्थितीत 'ट्रान्सक्रिप्शन'चा कोर्स पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

हा व्यवसाय चांगला पैसा देणारा आहे. आता नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला राबायची गरज नाही. नवऱ्याने ती जबाबदारी घ्यावी आणि आपण घरासाठी अधिक पैसा मिळवावा, या विचारांनी तिने नोकरी सोडली. जाहिरातीप्रमाणे परवडत नसतानाही तो कोर्स पूर्ण केला. आता ट्रान्सक्रिप्शनची कामे लगेच सुरू होतील अशी वेडी आशा तिला नव्हती. तरीही एक-दोन कामे तिच्याकडे आली. कोर्समध्ये शिकवलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्षातले काम यांतली तफावत तिला लगेच जाणवली. तरीही तिने ही कामे कशीबशी पूर्ण केली. परिणाम अनपेक्षित नव्हता. संबंधितांनी तिचे काम सरळ नाकारले. पुढे पुढे तर कामे येणेही बंद झाले आणि सगळ्यांत कहर म्हणजे ज्या कंपनीत तिचा नवरा नुकताच कामाला लागला होता, त्या कंपनीत नोकर कपातीला सुरुवात झाली. एक दिवस तिच्या नवऱ्यावरही ती वेळ आली. आज सई आणि तिचा नवरा जगण्यासाठी आणि झालेली कर्जे फेडण्यासाठी झटत आहेत. सईची निव्वळ 'डी.टी.पी. ऑपरेटर' अशी अवस्था झाली आहे. ही सारी खंत व्यक्त करताना ती म्हणते, “खरं तर मी पूर्वीची नोकरी सोडायला नको होती. कोणतेही नवे काम करताना शिकण्यासाठी थोडा वेळ लागणारच. पण या काम देणाऱ्या कंपन्यांना त्याची फिकीर नाही. काही कामे व्यक्तिगत होती. मी त्यांना भेटून माझी अडचण सांगितली, पण आम्ही तुम्हांला काम देऊ परंतु ट्रेनिंग नाही, असे त्यांनी सरळ सांगितले. आता जगण्यासाठी केवळ डी.टी.पी. चे काम करावे लागणार आणि माझ्याच बिल्डिंगमध्ये तीनजण हे काम करतात. काय करायचं?”

जिवावर उदार होऊनही उपयोग नाही
सुनीलची वेगळीच व्यथा आहे. गावी राहणारा आणि आडदांड शरीराचा हा पोरगा एकदाचा दहावी पास झाला. तोवर त्याला एकूण परिस्थितीचा अंदाज आला. शिक्षणात आपल्याला गती नाही आणि शिकूनही काही उपयोग नाही, हे त्याने जाणले. पाठी एक भाऊ आणि दोन बहिणी. सुनील दोन वर्षे घरी बसून होता. शेती होती पण पाऊस नव्हता. आई- वडील रोजावर. यानेही लाज न बाळगता रोजंदारीवर जायला सुरुवात केली. असे किती काळ जगणार; आणि त्यातून हाती काय लागणार, या प्रश्नाने त्याचा पिच्छा सोडला नाही. शेवटी घरातले सगळे नको म्हणत असताना तो लष्करात भरती झाला. त्याच्या इतर मित्रांनीही हाच मार्ग पत्करला होता. लष्करात जाताना त्याला कोणतीच अडचण आली नाही. घरी हमखास आणि जगण्यापुरते पैसे पाठवू शकेल, याची खात्री त्याच्या नोकरीमुळे सर्वांना आली. पाठच्या भावांचे शिक्षण सुरू झाले.

सुनील नंतरचा भाऊ मॅट्रिक झाला. त्याने आय.टी.आय.ला प्रवेश मिळवला. आय. टी. आय. पूर्ण झाले; पण त्याला काम मिळाले नाही. लगेच काम मिळणे शक्य नव्हते. तरी ती गरज होतीच. पुढे एका कंपनीत त्याला काम मिळाले. घरात हमखासपणे आता चार हात कमावते झाले. आईवडिलांचा भार थोडा हलका झाला. बहिणींच्या लग्नाची तयारी सुरू झाली. याच काळात सुनीलच्या भावाला कंपनीने इतर कामगारांप्रमाणेच काढून टाकले. पुन्हा रोजगारीचा प्रश्न उभा राहिला. बहिणीच्या लग्नाची सगळी मोहीम बारगळली. आता बेरोजगार राहणे त्या घराला परवडणारे नव्हते.

स्वतःचा उद्योग काढणे डिग्री असूनही शक्य नव्हते. भाऊ मिल्ट्रीत आहे. तेव्हा काहीतरी करून एखादा एस.टी.डी. बूथ तरी मिळेल, अशा विचाराने प्रयत्न सुरू झाले. ही साधारणपणे चार वर्षांपूर्वीची घटना. तेव्हा कारगील युद्ध नुकतेच संपले होते. जवानांच्या बाजूने सहानुभूतीचे वातावरण होते. या मार्गाने तरी काम होईल का, अशी भाबडी आशा सुनीलच्या आईवडिलांना होती. वाडीबाहेरचे जग त्यांनी फारसे पाहिले नव्हते. पण सुनीलचा भाऊ वास्तव जाणून होता. गाव सोडून तो पुण्यात आला. त्याने कॉप्युटर कोर्सला नाव घातले. तीही पदविका पदरात पाडून घेतली. मधल्या काळात सुनीलला आर्थिक ताण जाणवला. पण भाऊ धडपडत आहे म्हटल्यावर त्याने तो ताण सहन केला. काही काळ सुनीलच्या भावाने कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरीही मिळवली. या नव्या नोकरीने आधारही दिला आणि नवी वाटही दाखवली. संगणकाच्या नोकरीत चांगला जम बसतो आहे हे लक्षात येताच बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू झाली. बक्कळ हुंडा मोजून एकदाचे लग्न झाले. बहिणीच्या सासरचे लोक आणि कर्जदार या दोघांच्या कचाट्यात घर सापडले. या सगळ्या प्रकारात आज घटकेला एकट्या सुनीलच्या कमाईवर घर चालते. “चकमक झाली आणि मी मेलो तर बरं होईल, उरलेल्या शहीद जवानांच्या घरच्या लोकांना सरकारने जशी मदत केली तशी माझ्यानंतर माझ्या घरालाही मिळेल!" सुनीलचे हे उद्गार वेदनादायी आहेत. आज कित्येक युवक धडधाकट शरीर या भांडवलाच्या आधारे जवान म्हणून भरती होत आहेत. त्यांच्यासमोर दुसरा पर्यायही नाही. हा एक प्रकारचा 'शरीरविक्रय' म्हणता येईल? उद्या चकमकीत अपंगत्व आले तर सगळेच संपले!

नियोजन करूनही निराशाच!
सुनील ग्रामीण भागात वाढला. त्याच्या समोर शेतीशिवाय दुसरा पर्यायही नाही. पण साहिलचे तसे नाही. बारावीला तो गुणवत्ता यादीतच आला असता पण ही संधी थोडक्यात हुकली. आज बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स आणि एम.बी.ए. या दोन्ही मजबूत पदव्या घेऊनही तो निराशच आहे. तो बेरोजगार नाही पण त्याच्याच शब्दांत सांगायचे तर, "दोन वर्षांत सॉफ्टवेअर आणि आय. टी. चं मार्केट साफ झोपलं आहे. सेलफोन व्यवसायात माझे महिन्याचे उत्पन्न जेवढे होते त्याच्या वनफोर्थसुद्धा सध्या मिळत नाही. कॉपिटिशन जबरदस्त वाढली आहे. आज केवळ माझा व्यवसाय नावापुरता चालू आहे. सगळा मंदीचा फटका!" अवघ्या तिशीत साहिलला ही निराशा कशी आली?

खरे तर साहिलला सुरुवातीपासून नोकरीचा तिटकारा होता. त्याला व्यवसायच करायचा होता. त्यामुळे इंजिनीयरिंगची पदवी घेऊन त्याने एम.बी.ए. ही पूर्ण केले. त्यानंतर सेलफोनच्या व्यवसायात तो आला. सारे काही नवे आणि आव्हानात्मक होते. साहिलने अवघ्या काही महिन्यांत निव्वळ नफा चार आकडी तर उत्पन्न, पाच आकडी घरात नेले. पुण्यात कॅम्प भागात ऑफिस थाटण्याइतपत मजल मारली. ज्या वेगाने त्याची भरभराट झाली तेवढ्याच वेगाने उतारही वाट्याला आला. आज त्याचे 'ऑफिस' घरात आहे. तो 2006 ची वाट पहात आहे. या एकदोन वर्षांत एकूण मंदी कमी होईल आणि 'आय. टी. 'ला पुन्हा 'प्रॉस्पेक्टस्' निर्माण होतील असे त्याचे म्हणणे आहे. पण त्याच्या वागण्या-बोलण्यात एक निराशेचा सूर डोकावल्याखेरीज रहात नाही. आज 'स्टेटस्' टिकवण्यासाठी तो इतक्या प्रकारची कामे करत आहे, की त्याची 'कार्य ओळख' त्यालाही सांगता येत नाही.

व्यवस्थापनाशी भांडणारी ऑफिसरांची संघटना 
साहिलने व्यवसायाऐवजी नोकरी पत्करली असती तर काय घडले असते? पुणे परिसरातील नामांकित कंपनीचे हे उदाहरण त्यालाही पुरेसे ठरावे. एका आंतरराष्ट्रीय कंपनीमधील ऑफिसर वर्गाची ही कथा आहे. गेले काही महिने कंपनीचे व्यवस्थापन बदलले. नवे व्यवस्थापक, नवी धोरणे, नवे तंत्रज्ञान, नोकरीवर गदा येणार का? अशा एक ना अनेक प्रश्नांनी तिथल्या कामगारवर्गाचीच नव्हे तर ऑफिसर वर्गाची सुद्धा झोप उडवली आहे. कामगार कपातीला या कंपनीने केव्हाच सुरुवात केली. आता आपल्यावरही गदा येणार या भीतीने 'ऑफिसरवर्ग’ चिंताग्रस्त आहे. ठराविक महिन्यांनंतर मुंबईला कंपनीच्या मुख्य शाखेत जाऊन व्यवस्थापकांशी भांडणे हा त्यांचा महत्त्वाचा उद्योग झाला आहे. नोकरी टिकवण्यापासून ते नवी नोकरी मिळवण्यापर्यंत एकमेकांना मदत करण्यासाठी त्यांनी एका अनौपचारिक संघटनेची स्थापना केली आहे. आलटून पालटून रजा टाकून ते हे सर्व उपद्व्याप सांभाळतात. त्याशिवाय त्यांना पर्यायही नाही. पंचवीस ते चाळीस वयोगटातले हे सर्व ऑफिसर आहेत. यातील तरुण मंडळी काही तरी पर्याय शोधतील पण अशा प्रख्यात कंपनीत काम मिळाल्यावर निर्माण झालेल्या आशा-आकांक्षांचे काय, हा प्रश्न शिल्लक राहतोच. चाळिशीच्या घरातल्या लोकांची दुःखे तर सांसारिक आणि त्याही पलीकडची आहेत.

आणखी फार तर दहा वर्षे काम करू शकेन! 
सहकारी बँकेत काम करणार्या 37 वर्षांच्या प्रदीपची ही खंत आहे. दहा वर्षांनंतर म्हणजे पन्नाशीच्या आतच तो सेवानिवृत्तीची भाषा बोलतो आहे. दोन वर्षांपूर्वी अगदी किरकोळ चुकीने त्याला बँकेने 'काढून’ टाकले. बँकेकडे त्याने अनेक वेळा रदबदली केली, पण अगदी शिपायापासून ते त्याच्यासारख्या ऑफिसरपर्यंत बँकेने सगळ्यांचेच छळसत्र आरंभले. कुणाच्या अशा काही बदल्या केल्या की त्यांना दुसऱ्या राज्यांतील शाखेत काम करायची वेळ आली. प्रदीपवर ही वेळ जेव्हा आली तेव्हा त्याला ती 'नामुष्की' वाटली पण त्याच्या इतर मित्रांनाही याच प्रकारे काढून टाकण्यात आले. आज प्रदीपला नोकरी आहे. पूर्वीइतकाच पगार देणारी आहे. पण तो निवृत्तीची भाषा का बोलतो आहे?

प्रदीप बँकेत लागला तो ऑफिसर म्हणून. पहिली तीन वर्षे बँकेने त्याला अक्षरश: राबवून घेतले. एम. सी. एम. झालेल्या प्रदीपला तीन वेळा केवळ उशिरा आला म्हणून 'प्रोबेशन पिरियड’ ही वाढवण्यात आला. सांसारिक जबाबदाऱ्या असणाऱ्या या माणसाला अल्सर, इन्सोम्नेनिया, मधुमेह या विकारांनी ग्रासले आहे. आज तो राहतो मुंबईत आणि कंपनी आहे नागपूरला. कुटुंब नागपूरला हलवावे तर तेही शक्य नाही. कारण कामानिमित्त त्याला सतत संपूर्ण देशभर हिंडावे लागते. महिन्या दोन महिन्यांनी ती घरी येतो. ही कंपनी त्याला सगळ्या सुविधा देते, पण काम एवढे असते की, "ही कंपनी मला झोपायची परवानगी देते, हीच सर्वात मोठी सवलत आहे", असे तो म्हणतो. "कंपनीने मला काढून टाकले तर डी.टी.पी. ऑपरेटर खेरीज मी काहीच काम करू शकणार नाही", असे म्हणण्याइतपत त्याला नैराश्य आले आहे.

खाणावळ चालवणारा लघुउद्योजक!
वीस वर्षांपूर्वी कंपनीत लेथ मशीनवर काम करणार्या सदाशिवला आपण कधी लघुउद्योजक बनू असे वाटलेही नाही. पण त्याने सुशिक्षित बेरोजगार योजनेतून कर्ज उचलले आणि एक छोटा वर्कशॉप टाकला. पाहता पाहता त्याचा एक लघुउद्योग निर्माण झाला. दहा कामगार असणार्या 'इंडस्ट्री 'चा तो मालक बनला. पुणे परिसरातील औद्योगिक पट्ट्यातील त्याच्या या कारखान्याला पहिला फटका बसला तो मोठ्या कंपन्यांचा. तो ज्या कंपन्यांना माल पुरवायचा त्या कंपन्या त्याच्या स्पर्धक बनल्या. त्याचा धंदा खालावला. पर्यायाने कामगार काढून टाकावे लागले. आज तो खाणावळ चालवतो. त्याला या परिस्थितीबाबत फार खंत नाही. त्याच्या भाषेत सांगायचे तर, "मी आज जिथे आहे तिथे सुखात आहे. स्वतःचा वर्कशॉप होईल अशी मला केव्हाच खात्री नव्हती.

गावात अशा प्रकारच्या कामाची गरज होती. तेव्हा मी हा धंदा सुरू केला. देवाच्या कृपेने तो चांगला चालला. पुढे एम.आय.डी.सी.त जागा घेण्याइतपत बरकत आली. हा नावारूपाला आलेला धंदा आज फारसा चालत नाही. पण त्याचे किती दुःख करू? माझ्यासारखे कितीतरी लोक आहेत. सगळ्या सुविधा मोठ्या कंपन्यांना मिळतात. आज मला वर्कशॉपवर पाण्याचे दोन कॅन भरून न्यावे लागतात. जिथं पाण्यापासूनच प्रश्न आहे तिथं बाकीच्या गोष्टी काय बोलणार? माझ्यापेक्षा मला इतर लोकांचंच जास्त दुःख वाटतं. मी या गावचा आहे. एक काळ गाव मला 'अरे-तुरे' करायचं, आज 'शेठ' म्हणतात. पण बाहेर गावावरूनच नाही तर 'यु.पी.'मधून आलेल्या कामगारांनी काय करायचं? त्यांना ना आगा ना पीछा. उद्या या लोकांच्या गुन्हेगारी टोळ्या होणार, हे मी शंभर टक्के सांगतो. मंदी हे एक कारण झालं. उद्या मंदी एकदम संपली तरी जे एकदा आयुष्यातून उठले ते उठलेच ना? सदाशिव अगदी सहजगत्या हे सर्व मांडतो. त्याला जागतिकीकरण, नवी अर्थरचना वगैरे शब्द फारसे समजतही नाहीत. बंद पडणारा कारखाना आणि उघड्यावर आलेली कुटुंबे पाहिली की त्याच्यातला 'कामगार' जागा होतो.

ही काही वानगीदाखल उदाहरणे झाली. सक्तीने सेवानिवृत्ती घ्यायला लावून अनेकांची सर्वार्थाने कशी ससेहोलपट झाली आहे हे आपण पहातच आहोत. नवरा बायको मोठ्या पदावर काम करत आहेत तरीही त्यांना पापड-लोणच्यासारखे व्यवसाय शोधावे लागत आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यावरही या क्षेत्रातले बडे प्रकाशकही छोट्या प्रकाशन संस्थांना हाताशी धरून आपले काम कमी करत आहेत. सरकारी क्षेत्रात कोणत्याही प्रकारची संधी नाही, जे काही भवितव्य आहे ते खासगी क्षेत्रातच अशी आजच्या तरुण पिढीसमोरची स्थिती आहे. नोकरीची महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे शिक्षण. हे शिक्षण नोकरीसाठी निरुपयोगी आहे. ही बाब केव्हाच सर्वज्ञात झाली. तरीही बी.ए.बी.एड. केल्यावर निदान शिक्षकाची नोकरी तरी मिळण्याची शाश्वती होती. वशिल्याने बँकेत वा सरकारी खात्यात नोकरीची काही तरी संधी असे. आज सरकारी क्षेत्रात नोकऱ्या नाहीत. शिक्षण निरुपयोगी आणि खर्चिकही बनले आहे. अशा परिस्थितीत सध्या कॉलेज आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या व भवितव्याची स्वप्ने पाहणाऱ्या अथवा थोडे फार शिक्षण घेऊन व्यवसाय किंवा नोकरीच्या संधी असणार्या युवावर्गाची काय मनःस्थिती आहे? त्यांना एकंदरच या परिस्थितीबाबत काय वाटते, त्यांच्या भवितव्याविषयी काय कल्पना आहेत, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. जागतिकीकरण आणि बेरोजगारी या समस्येकडे नव्हे तर एकूणच अवतीभवतीच्या परिस्थितीकडे ते कोणत्या भूमिकेतून पाहतात, हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

शेतमजुरीपेक्षाही नोकरी चांगलीच
केदार मूळचा परभणीचा. एका खेड्यातला. शेतमजुरी हा एकच पर्याय आपल्या आईवडिलांसमोर आहे हे त्याने पाहिले. गावी राहून काही करता येईल असे त्याला वाटले नाही. सात वर्षांपूर्वी तो पुण्यात आला. आज तो एका छोट्या कंपनीत अकाउंटंट आहे. ही सर्व वाटचाल त्याने कशी केली? "गावाकडं सगळा दुष्काळच. माझ्या मोठ्या भावाने स्टेनोकोर्स केला. म्हणून मी दहावीपर्यंत शिकलो. त्यानंतरचं शिक्षण भावाच्या किंवा आणखी कुणाच्या जिवावर करावं असं मला वाटलं नाही. मुळात शिकण्याची फारशी संधी नव्हती. मराठवाड्यापेक्षा पुण्यात गेलो तर काही करता येईल असं माझ्या मनात सारखं येत असे. पण तशी संधी नव्हती. माझ्या भावाचा एक मित्र पुण्यात नोकरी करत होता. त्याच्या ओळखीच्या एका कंपनीला ऑफिस- बॉय हवा होता. मला त्याने विचारले, चांगली संधी मिळत होती तर ती कशाला सोडायची म्हणून मी पुण्याला आलो."

"पुढच्या शिक्षणाच्या आधी मला नोकरीच मिळाली. पुण्यात आमच्या साहेबांनी एका ठिकाणी राहण्याची सोय केली. चार पैसे मिळू लागले. हीच नोकरी करत रहायचं की शिक्षण घ्यायचं हा प्रश्न होता. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या होत्या. रात्रीच्या कॉलेजमध्ये शिकून बारावी झालो. मी जसजसा शिकू लागलो. कष्ट करू लागलो. तशी माझी कामात प्रगती होत गेली. माझी धडपड बघून साहेबही खूष झाले. त्यांच्या मदतीने मी बी.कॉम. व पुढे एम.कॉम. ही केले. साहेबही फारसे स्थिरावले नव्हते, त्यामुळे माझ्या एकट्यावरच ऑफिसची सगळी जबाबदारी असे. खरं तर मी वर्षभरच ऑफिसबॉय होतो. त्यानंतर मी त्यांचा पी.ए.च झालो असं म्हटलं तरी चालेल. नोकरीनेच मला खूप शिकविले आणि शिक्षणाचे महत्त्व काय आहे ते ध्यानी आले. आज एम.कॉम.

झालो तरी ऑफिस झाडून काढताना मला लाज वाटत नाही. मला वाटतं की हीच माझी सगळ्यांत स्ट्राँग बाजू आहे. नुसत्या शिक्षणामुळे मला ग्लोबलायझेशन म्हणजे काय हे फारसं समजलंच नसतं. आमच्या कंपनीत आज जे चढ-उतार चालू आहेत, त्यावरून माझ्यासह सर्वांच्याच डोक्यावर टांगती तलवार आहे हे मला पुरतं ठाऊक आहे. पण कष्ट केले तर सारं काही साधतं असं मला वाटतं. समजा, जागतिकीकरण वगैरे काही आलंच नसतं, तर मी काय करणार होतो? गावी राहून एकतर बेकार राहिलो असतो. एखादी डिग्री मिळवली असती आणि निव्वळ नोकरीसाठी वणवणत राहिलो असतो. आज माझी ही नोकरी गेली तरी चार पैसे गाठीला आहेत. कामाचा अनुभव आहे. डिग्री आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझे पाय जमिनीवर आहेत." एवढ्या आत्मविश्वासाने बोलणार्या केदारला जेव्हा व्यवहारातली उदाहरणं दिली, त्यावर काही प्रश्न विचारले तेव्हा मात्र तो गप्प बसला. नुसत्या एम. कॉम. ला कोण विचारतो. उद्या लग्न झालं, पुण्यासारख्या शहरात संसार चालवायची वेळ आली तर आत्ता मिळतो तेवढा पगार पुरेल का, या प्रश्नाला त्याच्याकडे फारशी उत्तरे नव्हती. याहीपेक्षा एकाच वेळी शिकत व नोकरी करत, तुझी जागी झालेली महत्त्वाकांक्षा या नोकरीपुरतीच मर्यादित आहे का, या प्रश्नावर तो गप्प झाला. पण नंतर म्हणाला, “रोज पेपरमध्ये अकाउंटंट पाहिजे म्हणून तीन-चार जाहिराती येतात. मला कुठेही नोकरी मिळेलच! शिवाय मी पुन्हा घरी कॉम्प्युटर घेतला आहेच! शेवटी पुन्हा कॉम्प्युटरच!!"

साहेब पाठीशी आहेत तंवर वांधा नाही! 
स्वप्निलकडे आज स्वतःची हीरो होंडा आहे. आईवडिलांचा एकुलता एक आणि लाडका मुलगा. दरमहा दीड हजार रुपये मिळवतो. शिक्षण फक्त दहावी! हा 'पिग्मी कलेक्शन’ चं काम करतो. त्याला 'साहेबां’नी हीरो होंडा घेऊन दिली, "मी आमदार साहेबांच्या खास मर्जीतला आहे. शिक्षणात काही अर्थ नाही. हे तुम्हांला कशाला सांगायचं? साहेबांनी दोन वर्षांपूर्वी बँक सुरू केली आणि बचतीचं काम मी करायला लागलो. गेल्या इलेक्शनमध्ये मी साहेबांसाठी रग्गड काम केलं. आणखी एक-दोन वर्षांत आपण नगरसेवक म्हणून उभं राहणारच. साहेबांचा फुल सपोर्ट आहे. स्वप्निलला जेव्हा अशा किती जणांकडे 'हीरो होंडा' आहेत, असं विचारलं तेव्हा अर्धाडझन नावं तर त्याने एका दमात सांगितली. हे सगळे साहेबांच्या मर्जीतले आहेत ना? यावर तो चटकन 'हो' म्हणाला. मग साहेब तुलाच कशासाठी पाठिंबा देतील? या प्रश्नावर तो जरा अडखळला आणि पुढे जाऊन उद्या समजा ही बँक बुडित निघाली आणि तुला रस्त्यावर यावे लागले तर? या प्रश्नावर तर तो बिथरलाच. असा काही प्रकार घडला किंवा साहेबांनी मला दूर केले तर मग काय? "फुकट इतकी वर्ष घालवली का? एवढं सगळं सोपं नाही?" हे वाक्य उच्चारताना त्याची नजर भेदक झाली. “चाललंय तोपर्यंत ठीक, नंतर राडाच!" हे वाक्य त्याने उच्चारले नसते तरी चालले असते.

आता काय करू? तुम्हीच सांगा!
"दहावीला जेव्हा 72 टक्के मार्क मिळाले तेव्हा मी खूप खचलो. मला डी.एड. करून शिक्षक व्हायचं होतं. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून मी अर्ज केला. शेवटी धुळ्याच्या कॉलेजला वेटिंग लिस्टवर नाव आलं." सागर सांगत होता. पुढच्या वर्षी अॅडमिशन मिळेल याची खात्री झाली. तेव्हा फीसाठी मी नोकरी करायला लागलो. या नोकरीतून वर्षभरात जेवढे पैसे मिळवले तेवढे सगळे डी.एड.साठी राखून ठेवले. शाळेत मी पहिला आलो त्यामुळे सरपंचांसह सर्वांनीच मदत केली. या सगळ्यांच्या प्रयत्नाने मला डी.एड.ला फर्स्ट क्लास मिळाला; पण शिक्षकसेवक म्हणून सुद्धा माझा विचार अजून झाला नाही. मी नोकरीची वाट पहातो आहे." निव्वळ डी. एड. च्या जोरावर हा नोकरीचं स्वप्न बघतो हा खरं तर आमच्यासाठी धक्का होता. हा पुढे शिकत का नसावा, याबाबत त्याला जेव्हा खोदून विचारलं तेव्हा तो म्हणाला, "दहावीपर्यंत शिकलो हेच खूप झाले. वडील लहानपणीच वारले. आईनं खस्ता खाऊन मला शिकवलं. अशा परिस्थितीत आणखी पुढं शिकणं म्हणजे आईवर निव्वळ अन्याय होता. मी कष्ट करू शकतो, मला डोकं आहे म्हणून आईही मला चार पोरांसारखं लगेच कामाला जुंपायच्या विरुद्ध होती. म्हणून हा डी.एड. चा पर्याय निवडला. आता यापेक्षा वेगळं काय करू? सागरची ही कोंडी विचित्रच म्हणावी लागेल.

आणखी आठ वर्षे हाती आहेत
शिक्षणातून नोकरीकडे असा सर्वांचा प्रवास असतो. मितालीचे उदाहरण मात्र वेगळे आहे. मिताली मूळची कोल्हापूरची. बी.कॉम. झाल्यावर तिने पत्रकारितेची पदविका घेतली. एका दैनिकात तिला नोकरीही मिळाली. याच काळात ती एका जाहिरात कंपनीत काम करत होती. सगळे काही सुरळित चालू होते. आज मिताली समाजशास्त्रात एम.ए. करत आहे. त्यासाठी ती पुण्यात येऊन राहिली आहे. हा निर्णय का घ्यावा वाटला, या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणते, "दहावीपर्यंत शिक्षण ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही. घरातून मला पाठिंबाही नव्हता आणि विरोधही नव्हता. मी बी.कॉम.ला कॉलेजमध्ये पहिली आले आणि घरच्या लोकांना काहीसा धक्का बसला. या सर्व यशाचं खरं श्रेय माझ्या प्राध्यापकांना आणि त्याहीपेक्षा मित्र-मैत्रिणींना आहे. स्पर्धा, शिक्षणाची ओढ, त्याचे महत्त्व मला, राज्याच्या अन्य भागांतून विद्यापीठात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे समजले. आमचा ग्रूप धमाल करायचा पण अभ्यासाकडे मात्र कधी कुणी दुर्लक्ष केलं नाही."

"बी.कॉम. नंतर माझी एकंदर आवड पाहून मला जर्नालिझमचा कोर्स करण्याचा सल्ला सर्वांनीच दिला. मलाही नवं काही शिकण्याची ओढ होती. या डिप्लोमातही मला चांगले मार्क्स मिळाले. बी.कॉम. आणि पत्रकारितेचा कोर्स यामुळे मला एका दैनिकात चटकन नोकरीही मिळाली. सुरुवातीला मी पार्टटाईम नोकरी करत होते. त्याच वेळी एका जाहिरात कंपनीबरोबर कामही करत होते. मी एकटीच वर्षाला दोन-अडीच लाखांच्या जाहिराती मिळवत होते. पत्रकारिता आणि जाहिराती गोळा करणं या कामाने मला एकच गोष्ट शिकवली की अधिकाधिक 'कॉंपिटिटिव्ह' रहाणं अपरिहार्य आहे. आणखी खूप शिकायला हवं. आज आपल्या हातांत संधी आहे. ही संधी नाकारली तर फक्त पैसेच मिळवत राहू आणि आणखी काही वर्षांनी मग अस्थिरतेचा आणि अकार्यक्षमतेसह सामना करणं अवघड आहे. हे ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं त्याक्षणी मी नोकरी सोडली आणि शिक्षणासाठी पुण्यात आले."

मितालीचा दृष्टिकोन अगदी सरळ व स्पष्ट आहे, हे लक्षात येताच तिला शिक्षणाची निरुपयोगिता, त्यावर सतत वाढत जाणारा खर्च, या विषयांवर विचारले. ती म्हणाली, “उपयुक्तता आणि खर्च या गोष्टी सापेक्ष आहेत. तुम्हांला यशस्वी व्हायचं तर कष्टापासून पैशांपर्यंत सर्वच काही घसघशीतपणे मोजणं अटळ आहे.” “तुला पूर्वी शिक्षणाची आवड नव्हती. तू नंतर शिकत गेलीस, ज्ञानाचं महत्त्व तुला पटलं आहे. मग ही संधी कितीजणांना मिळू शकते? तू पत्रकारही आहेस, लोकांचे प्रश्न मांडतेस. समाजशास्त्रासारखा विषय निवडलास. या सगळ्या प्रश्नांबाबत तुला काय वाटते?" हे विचारल्यावर ती क्षणभर थबकली. मग म्हणाली, “याला आज तरी काही पर्याय नाही." चर्चा पुढे राजकीय पक्ष, जीवनमूल्य याकडे वळली. निव्वळ नफा हे उद्दिष्ट असणारी व्यवस्था कशी स्वीकारतेस? यावर तिची प्रतिक्रिया वेगळीच होती. “आज परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटना ती सुधारेल असं मला वाटत नाही. स्वातंत्र्य चळवळीचा मला आधार वाटतो व त्या काळच्या नेत्यांबाबत आदरही वाटतो. उद्या अशाप्रकारे काम करण्याची गरज वाटली तर ते कामही मी करेन. आहे त्या परिस्थितीला कायमच ठामपणे सामोरं जायचं असतं!"

खरे तर अशी आणखी कितीतरी उदाहरणे सांगण्यासारखी आहेत. पण या सर्व उदाहरणांतून एक गोष्ट ठळकपणे जाणवली की बेरोजगारीच्या प्रश्नाचा साचेबद्ध विचार करून चालणार नाही. समाजातल्या वंचित वर्गातील तरुणांसमोरची परिस्थिती फार बदललेली नाही. रोजगाराच्या नव्या वाटा शोधू पाहणारी ही पिढी अत्यंत सावध आहे. फार दूरचा विचार करून जगणे, नव्या संधींचा त्या दृष्टीने विचार करणे याला ते आज तरी नकार देत आहेत. बारावीनंतर आजच्या काळात हात-पाय हलवणार्या कुणालाही पोटापुरते पैसे मिळतात. आपली एकंदर कुटुंब रचना लक्षात घेतली तर मुले सुद्धा ग्रॅज्युएट होईपर्यंत म्हणजे कमीत कमी तीन-चार वर्षे घरात राहू शकतात. जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांची त्यांना खबरबात नाही. कारण हा 'कृतक रोजगार’ त्यांच्या हाताशी आहे. आम्ही बारावीत शिकणाऱ्या एका मुलाशी बोललो. तो गेली तीन वर्षे बारावी करतो आहे पण सकाळी एका कंपनीत, रात्री एका वृत्तपत्राच्या कार्यालयात काम करतो. आज त्याची कमाई तीन ते साडेतीन हजार रुपये दरमहा एवढी आहे. तो बारावीच नव्हे तर बी.ए.ही करणार आहे आणि त्याच वेळी नोकरीही करणार आहे. त्याला राहते घर आहे. त्यामुळे आज तरी त्याला कशाची फिकीर नाही.

शिक्षणासाठी भरपूर वेळ व पैसा देऊन तुटपुंज्या पगारावर कुंथत जगणार्यांशीही आम्ही बोललो. बी.सी.एस. करूनही 2-3 हजार रुपये पगारावर काम करणारा हा युवागट दुसरे कोणते काम करण्याच्या मनःस्थितीत नाही. सर्व काही 'उत्तम' झाले मग शेवटच असा का या प्रश्नाने तो व्यथित झाला आहे. हे तरुण-तरुणी घरी काही काळ बसून राहतात आणि मग याच क्षेत्रातले काम शोधतात. ज्या पगाराची नोकरी असेल तिचा मग स्वीकार होतो.

खरा पिचत चालला आहे तो कालपर्यंत 'स्थिर' असलेला व जागतिकीकरणाने एकदम 'अस्थिर' बनलेला प्रौढ वर्ग. या मंडळींनाही आपल्यावरच्या परिस्थितीला जागतिकीकरण जबाबदार आहे असे वाटत नाहीच. समाजातील बरेच जण या अवस्थेत असतील तर अस्थिरतेचे, शोषणाचे, अनारोग्य या पातळीवर समानता आली आहे. या सर्व गोष्टी अनिष्ट आहेत, त्या बदलल्या पाहिजेत हे जाणवणे अवतीभवतीच्या राजकारणावर, समाजकारणावर अवलंबून असते. त्या आघाडीवरही आज बऱ्यापैकी गोंधळ आहे. आंदोलन, चळवळ हे शब्द सुद्धा या पिढीला समजावून सांगावे लागतात. त्या परिस्थितीत उत्स्फूर्त कृती ही फार मोठी अपेक्षा ठरते.

आजवर चळवळीने प्रत्येक प्रश्नाचा मूलभूत विचार करत कृती केली आहे. बेरोजगारीच नव्हे तर आज समाजाच्या समोरील सर्वच प्रश्न 'मूलभूत'रीत्या बदलत आहेत हे लक्षात घेतले तर परिस्थितीवर काही पर्याय निघेल!
 

Tags: Pune Journalism Sociology Politics Youth Unemployment Globalization पुणे पत्रकारिता समाजकारण राजकारण तरुण बेरोजगारी जागतिकीकरण weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके